Sunday, December 26, 2021

जगाच्या पाठशाळेतील एक ‘शहाणा’ मुलगा’- बांग्लादेश वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? भारत आणि मुक्ती वाहिनी यांनी यांनी पाकिस्तानच्या कचाट्यातून मुक्त केलेल्या बांग्लादेशची म्हणजेच पीपल्स रिपब्लिक ॲाफ बांग्लादेशची 17 कोटीच्या जवळपास असलेली लोकसंख्या बहुतांशी इस्लाम धर्मीय आहे. गेल्या 50 वर्षात त्याने साध्य केलेली प्रगती काहींच्या मते नेत्रदापक नसेलही पण ती आश्वासक नक्की आहे आणि भारताला आपले परिश्रम सार्थकी लागल्याचे समाधान देणारी आहे. बांग्लादेशाच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला भारत आहे तर दक्षिणेला बंगालचा उपसागर आणि आग्नेयेला म्यानमार आहे. नेपाळ आणि भूतान यांच्या मध्ये सिलीगुडी कोरिडॅार ही भारताची चिंचोळी पट्टी आहे. चीन (तिबेट) आणि बांग्लादेश यात भारताचे सिक्कीम हे राज्य येते. बांग्लादेशात सर्वात मोठे ढाका हे राजधानीचे शहर असून आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्रही आहे. दुसरे मोठे शहर चितगाव हे प्रमुख बंदर आहे. शेती व्यवसाय बांग्लादेशात शेती हे रोजगार मिळवून देणारे केंद्र असून त्याचा जीडीपीमधील वाटा 14% पेक्षा जास्त आहे. 43 % लोक शेतीवर अवलंबून असणारे आहेत. बांग्लादेशात शेतकी उत्पादनांचा अनुकूल प्रभाव रोजगार, सुबत्ता, मानव विकास, अन्नसमृद्धी यावर झालेला दिसतो. पूर नियंत्रण आणि सिंचन याबाबबत बांग्लादेशाने मिळवलेले यश याला कारणीभूत आहे. जोडीला असलेल्या खतांच्या नेमक्या वापराची, योग्य वितरण व्यवस्थेची आणि चलन पुरवठ्याची आश्वासक तजवीज आणि साथही तेवढीच महत्त्वाची आहे. बांग्लादेश म्हटले की तांदूळ आणि ज्यूट यांचीच आठवण मुख्यत: येते. पण गव्हापेक्षा मका आणि भाजीपाला ही दोन पिकेही लक्ष वेधणारी आहेत. मका हे मुख्यत: कोंबड्यांचे खाद्य आहे तर ईशान्य भागातले चहाचे मळे देशातील आणि देशाबाहेरील चहाबाजांची तल्लफ पुरवणारे आहेत. निसर्गाने दिलेली सुपीक जमीन आणि पाण्याचा पुरेसा पुरवठा यांचा पुरेपूर फायदा घेत बांग्लादेशात तांदळाची वर्षाला तीने पिके घेतली जातात. याशिवाय बटाटे, फळफळावळ आणि माशांची शेती यामुळे बांग्लादेशाची अन्नसमृद्धीच्या दिशेने दौड सुरू आहे. उर्जानिर्मिती बांग्लादेशातील विजेचे उत्पादन 2020 मेगॅवॅट्स इतके होते. बांग्लादेशात जमिनीखाली नैसर्गिक वायू मुबलक प्रमाणात असून उर्जेचा 56 % पुरवठा नैसर्गिक वायूच्या आधारे होतो. यांच्या जोडीला खनीज तेल, जलविद्युत आणि कोळसा हेही आहेत. शिवाय भूतान आणि नेपाळकडून बांग्लादेश जलविद्युत विकत घेणार आहे. रशियाच्या मदतीने एक 2160 मेगॅवॅट क्षमतेचे न्युक्लिअर प्लॅंटही उभारले जात आहे. उर्जेच्या अपारंपरिक स्रोतात सौर उर्जा निर्मितीवर बांग्लादेश भर देतो आहे. पाणी पुरवठा बांग्लादेशात 98 % लोकांना पाणी पुरवठा हातपंपांच्या आधारे होत असतो. पण भूजल आर्सेनिक मिश्रित असल्यामुळे शुद्ध पाणी ही बांग्लादेशाची निकडीची समस्या होऊन बसली आहे. कर आकारणी बांग्लादेशात करांचे दर एकतर कमी आहेत आणि करवसुलीचे प्रमाणही समाधानकारक नाही. याचा परिणाम सुविधांवर झाला आहे. स्वच्छतेच्या सोयी 56 % लोकांनाच उपलब्ध आहेत. यासाठी विशेषत: ग्रामीणक्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या उभारणीवरच भर दिला जातो आहे. उद्योग बांग्लादेशात वस्त्रोद्योग हा महत्त्वाचा उद्योग आहे. तयार कपड्यांच्या 5 हजार फॅक्टरी बांग्लादेशात आहेत. सुयांचा वापर करून आणि यांत्रिक हातमागांचा वापर करून तयार केल्यजाणाऱ्या कापडापासून कपडे तयार करून मुख्यत: त्यांचीच निर्यात जगभर होते. कोणत्याही अमेरिकन मॉलमध्ये बांग्लादेशातील तयार कपड्याचा गाळा हटकून असतोच. यांच्या निर्यातीतून बांग्लादेशाला भरपूर परकीय चलन मिळत असते. कामगारांचे वेतनमान कमी असल्यामुळे उत्पादन खर्च कमी असतो त्यामुळे मालाची कमी किंमत ठेवणे शक्य झाले आहे. याशिवाय औषधनिर्मिती उद्योग, इलेक्ट्रॅानिक्स, जहाज बांधणी, दोन व चारचाकी वाहनांची निर्मिती, चर्म उद्योग, ज्यूट, कागद, काच, प्लॅस्टिक, खाद्यपदार्थ, भूगर्भातील वायू, पोलाद आदींशी संबंधित उद्योग बांग्लादेशात उभारले गेले आहेत. भांडवली गुंतवणूक गुंतवणुकीला आकर्षित करील असे आर्थिक धोरण बांग्लादेशाने स्वीकारले आणि याचा परिणाम भांडवल उपलब्ध होण्यात झाला असून विविध क्षेत्रात नवनवीन प्रकल्प उभे होत आहेत. सरकारी क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे धोरण बांग्लादेशाने स्वीकारले आणि फारसा विरोध न झाल्यामुळे आमलातही आणता आले. अंदाजपत्रकात आर्थिक शिस्तीचे (बजेटरी डिसिप्लिन) काटेकोरपणे पालन केले जाते. बांग्लादेशाने सवंग लोकप्रियतेच्या नादी लागून वारेमाप आणि अस्थानी खर्च केले नाहीत. व्यापाराला चालना मिळेल अशी धोरणे राबविली. याचा परिणाम आर्थिकक्षेत्रात वेगाने प्रगती होण्यात झाला. सकल राष्ट्रीय उत्पन्नात 7 % वाढ नोंदविली गेली आणि आता 10 % वाढ दृष्टिपथात येते आहे. या सर्वावर कोविड-19 च्या प्रकोपाचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो हे खरे आहे. पण आज ना उद्या एकतर कोविड- 19 जाईल तरी किंवा मानव त्याचा इतर आजारांप्रमाणे स्वीकार करून त्याच्यासह जीवनाचे रहाटगाडगे सुरू ठेवण्यात यशस्वी तरी होईल. कोरोनामुळे बसलेली खीळ लवकरच सैल होईल आणि प्रगतीचा आलेख वर जाऊ लागेल यात शंका नाही. कारण मूळ पाया शाबूत राखण्यात बांग्लादेशाने यश मिळविले आहे. दारिद्यनिर्मूलन बांग्लादेशात दारिद्र्निर्मूलन मोहीम जेमतेम बरी म्हणावी इतपतच यशस्वी झालेली दिसते. तरीही अवाजवी राजकीय आणि अन्य हस्तक्षेप टाळता आले तर आर्थिक प्रगती संथपणे खात्रीने होत राहते, हे म्हणणे बांग्लादेशाचे बाबतीत तरी खरे ठरतांना दिसते आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो, महिलांच्या सहभागाचा. एका पाहणीनुसार निरनिराळ्या क्षेत्रातील महिलांचा सहभाग 45 % इतपर्यंत वाढला आहे. मुलींच्या शाळाप्रवेशाचे उद्दिष्ट बांग्ला देशाने 98 % इतके ठेवले असून ते नजीकच्या काळात सहज शक्य होईल, असे मानले जाते. वर्ल्ड एकॅानॅामिक फोरमनुसार पितृसत्ताक पद्धती अनुसरणारा बांग्लादेश लिंग समानतेच्या बाबतीत 47 व्या क्रमांकावर मानला आहे. श्रमिकक्षेत्र कामगार क्षेत्राचा विचार करायचा झाला तर एका पाहणीनुसार बांग्लादेशात ठोकळमानाने 40 % कामगार कृषिक्षेत्रात, 20 % उद्योगक्षेत्रात, 40 % सेवाक्षेत्रात आढळून येतात. उद्योग आणि सेवाक्षेत्रात येणाऱ्यांचे प्रमाण वाढते असून कृषिवर अवलंबून राहणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे दुसऱ्या एका पाहणीत आढळून आले आहे. जगभरात बहुतेक ठिकाणी विकसनशील देशात हाच कल आढळतो. बेरोजगारीचे प्रमाण कोविडपूर्व काळात सरासरीने 4.2 %, फक्त पुरुषात 3.1 % आणि फक्त महिलात 6.7% असल्याचे सांगतात. पण हे खरे मानावे तर बांग्लादेशातून भारतात होत असलेली घुसखोरी आर्थिक कारणास्तव होत असते असे कसे मानता येईल? याचा अर्थ असा की, सांगितले जाते त्यापेक्षा बेकारीचे प्रमाण बांग्लादेशात खचितच जास्त आहे. बहुदा म्हणूनच बांग्लादेशी आता जगभर आढळू लागले आहेत. दहशतवादी कारवाया एका अमेरिकन एजन्सीच्या अहवालानुसार बांग्लादेशमधील दहशतवादी कारवाया 2020 मध्ये बऱ्याच कमी झाल्या आहेत. याचे श्रेय त्यांनी जोरदार शोधमोहीम आणि अटकसत्राला दिले आहे, हे महत्त्वाचे. 2021 या वर्षात तीन दहशतवादी कारवाया घडल्या पण प्राणहानी झाली नाही. पण साऊथ एशियन टेररिझम पोर्टलनुसार बांग्लादेशात 197 दहशतवादी दबा धरून आहेत. 1999 पासून 2019 पर्यंतच्या काळात दहशतवादी कारवायांचा बांग्लादेशाला बराच उपद्रव होत होता अशा नोंदी आहेत. बांग्लादेशातील दहशतवाद्यांनी 441 वेळा भारतात घुसून घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न केल्याच्याची नोंद आहे. भारताने कुंपण घालून आणि पाहरे बसवून दहशतवाद्यांच्या कारवायांना आवर घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण अशा प्रयत्नांचा पूर्णपणे बंदोबस्त करणे अतिशय कठीण असते. धार्मिक सौहार्द्य बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे की, बांग्लादेश ही धार्मिक सौहार्द्याची भूमी आहे. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार, श्रद्धेनुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. कुणाचा कोणताही धर्म असला तरी हिंसाचार करणाऱ्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा करण्यात येईल. वंगबंधूंच्या कन्येच्या सद्हेतूबद्दल संशय घेण्याचे कारण नाही. पण बांग्लादेशातील एका कट्टर आणि धर्मांध गटाची भारतद्वेशी मानसिकता या भूमिकेशी मुळीच जुळत नाही. नागरिकतेबाबत भारताने स्वीकारलेली भूमिका यांना मान्य नाही. दुर्गा पूजेच्या निमित्ताने झालेल्या दंगली, मंदिरांची मोडतोड अशा घटना याची साक्ष पटवतात. कट्टरतेच्या निमित्ताने खालिदा झिया आणि रोशवान इर्षाद यांची नावे उदाहरणादाखल देता येतील. आयात निर्यात निर्यातीचा विचार केला तर बांग्लादेशातून होणाऱ्या निर्यातीपैकी, 58 % निर्यात युरोपीयन युनीयन मध्ये,16.3 % अमेरिकेत 3.1 % जपानमध्ये, 3 % कॅनडात आणि फक्त 2.4 % च भारतात होते, असे कोविडपूर्व आकडे सांगतात. कोविडचा प्रकोप जसजसा कमी होत गेला तसतशी निर्यात वाढत जात असल्याचे दिसते. आयातीच्या बाबतीतली स्थिती अशी आहे. चीन मधून होणारी आयात 21.5 % टक्के (निर्यात मात्र जवळजवळ नाहीच), भारतातून 12.2%, सिंगापूरमधून 9.2 %, युरोपीयन युनीयन कडून 6.5 % आणि उरलेली इतर देशांकडून असा हिशोब मांडला जातो. खेळ, कला आणि शिक्षण बांग्लादेशात भारताप्रमाणे हुतूतू, क्रिकेट, फुटबॅाल, हॅाकी,बुद्धिबळ,गोल्फ, हॅंडबॅाल, व्हॅालिबॅाल हे लोकप्रिय खेळ आहेत. 2000 वर्षांपासूनच्या कला बांग्लादेशाने जपल्या आणि जोपासल्या आहेत. यात फोटोग्राफी, आर्किटेक्चर, शिल्पकला आणि पेंटिंग्ज प्रमुख आहेत. नाट्यक्षेत्राचा जन्म तर 4 थ्या शतकातला आहे. बांग्लादेशातले संपन्न सिनेक्षेत्र ढालीवुड नावाने ओळखले जाते. बांग्लादेशाच्या राज्यघटनेतील 17 व्या कलमानुसार मुलांसाठी 10 वर्षांचे शिक्षण नि:शुल्क आणि सक्तीचे आहे. यात 5 वर्षांचे प्राथमिक आणि 5 वर्षांचे माध्यमिक शिक्षण येते. यात बदल होत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वांसाठी शिक्षण आणि विकासाची किमान उद्दिष्टे (मिनिमम डेव्हलेपमेंट गोल्स) यांना बांग्लादेशाने आपल्या शिक्षणविषयक उद्दिष्टात समाविष्ट केले आहे. शिक्षणाचे माध्यम बंगाली आणि इंग्रजी आहे. साक्षरतेचे प्रमाण 78.70 % असून पुरुषात 80.40 % आणि महिलांमध्ये 78.90 % म्हणजे स्त्री व पुरुषांमध्ये जवळजवळ सारखेच आहे. बांग्लादेशातील मदरसे यात धार्मिक शिक्षण धार्मिक वातावरणात अरेबिकमधून दिले जाते. काही मदरशांमधील विद्यार्थी स्थानिक मशिदीत नोकरीही करतात. या मुलांनीही सर्वसामान्य शिक्षण पद्धतीनुसार अपेक्षित असलेले शिक्षणही घेतलेच पाहिजे, असा नियम आहे. काही मदरसे बेवारशी मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या अन्न आणि निवाऱ्याची अशी तिहेरी जबाबदारी उचलतात. मदरशांचे दोन प्रकार आहेत. कौमी मदरसे आणि आलिया मदरसे. कौमी मदरसे - खाजगी संस्था आपल्या पैशाने कौमी मदरसे चालवतात. देवबंदी सिस्टीम ॲाफ एज्युकेशन नुसार दिलेल्या शिक्षणात विज्ञानाबाबत वेगळाच दृष्टीकोन अवलंबिला जातो. आज विज्ञानाचे दोन प्रकार मानले जातात. कल्पनेवर आधारित बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञान आणि प्रायोगिकतेवर आधारित अनुभवजन्य विज्ञान (रॅशनल ॲंड एंपिरिकल सायन्स) मदरशात रॅशनल सायन्सेस शिकविली जात नाहीत. 2 % मुले या प्रकारचे प्राथमिक शिक्षण घेतांना आढळतात. तर 2.2 % मुले माध्यमिक शिक्षण घेतात आलिया मदरसे - खाजगी संस्थांद्वारे शिक्षण देणाऱ्या या मदरशांना शासकीय अनुदान मिळते. शिक्षणासाठीच्या अंदाजपत्रकातील 11.5 % तरतूद आलिया मदरशांसाठी असते. 8.4 % मुले या प्रकारचे प्राथमिक शिक्षण घेतांना आढळतात. तर 19 % मुले माध्यमिक शिक्षण घेतात. अरेबिक वगळता इतर शाळा आणि मदरसे यातील शिक्षण सारखेच असते, असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळीच आहे. संरक्षणावरील खर्च बांग्लादेशाच्या अंदाजपत्रकात 6.1 % रक्कम संरक्षणावर खर्च केली जाते. ही रक्क्म सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.1 % इतकीच आहे. तर पाकिस्तानच्या अंदाजपत्रकात 16 % रक्कम संरक्षणावर खर्च केली जाते. ही रक्कम सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4 % इतकी आहे. संरक्षणावरील खर्च कमी करून ती रक्कम बांग्लादेशाने रचनात्मक बाबींवर खर्च केली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की गेल्या 50 वर्षात बांग्लादेशाने उद्योग व शिक्षणासारख्या बाबतीत भरीव प्रगती करायला सुरवात केली आहे. बांग्लादेशातील धर्म बांग्लादेशात 90.4 % मुस्लीम, 8.5 % हिंदू, 0.6 % बौद्ध, 0.4 % ख्रिश्चन आणि उरलेले इतर आहेत. सेक्युलर स्टेट असलेल्या बांग्लादेशाच्या घटनेने प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण इस्लाम हा ‘स्टेट रिलिजन ॲाफ रिपब्लिक’आहे. बहुतेक बांग्लादेशी बंगाली मुस्लीम आहेत. सुन्नी बहुसंख्येत असून शिया आणि अहमदियाही अल्प प्रमाणात आढळतात. उर्दूचा शिरकाव 17 व्या शतकात मुख्यत: ढाकासारख्या व्यापारी केंद्रातच झाला आहे. भाषा बांग्लादेशात 98 % लोक बंगाली भाषा बोलतात. ती बंगाली लीपीत लिहिली जाते. 1987 च्या लॅंग्लेज इंप्लिमेंट ॲक्टनुसार सरकारी कामकाजात बंगाली भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल मात्र इंग्रजीतच असतात. उच्च शिक्षणात इंग्रजीचा वापर होतो. उर्दू भाषेला सरकारी भाषा बनविण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेला. आज उर्दू भाषेचा वापर स्थलांतरित बिहारी मुस्लीम लोक करतात, असे म्हटले जाते. खरेतर यातील बहुतेक बांग्लादेशात उरलेले पाकिस्तानी आहेत. परराष्ट्र संबंध बांग्लादेश स्वतंत्र झाल्यानंतर 1972 मध्ये राष्ट्रकुलाचा (कॅामनवेल्थचा) सदस्य झाला. नंतर 1974 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य झाला. आतापर्यंत तो दोनदा सुरक्षा समितीवरही निवडून आला आहे.1986 मध्येतर हुमायून रशिद चौधरी हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदीही निवडून आले होते. बांग्लादेशाला वर्ल्ड ट्रेड ॲारगनायझेशनची सदस्यताही मिळाली आहे. विशेष असे की, संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता प्रस्थापन बलात (युनायटेड नेशन्स पीसकीपिंग फोर्स) बांग्लादेशाचे एक लक्षाहून अधिक सैनिक सहभागी असतात. या फोर्सने शांतता प्रस्थापित करण्याच्या आजवरच्या 54 मोहिमांमध्ये जबाबदारीची भूमिका पार पाडली आहे. मध्यपूर्व, बाल्कन क्षेत्र, आफ्रिका आणि कॅरेबियन क्षेत्रात या मोहिमा आयोजित होत्या. याबाबींचा सविस्तर उल्लेख यासाठी करायचा की, निर्माण झाल्यानंतर लगेचच एक जबाबदार राष्ट्र म्हणून जगाने बांग्लादेशाला स्वीकारले आहे. बांग्लादेशाने पुढाकार घेऊन साऊथ एशियन असोसिएशन फॅार रीजनल कोॲापरेशन (सार्क) या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. ही आर्थिक आणि भूराजकीय संघटना असून तिची स्थापना 8 डिसेंबर 1985 ला करण्यात आली. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव हे सार्कचे प्रथम सदस्य होते. सार्कमध्ये अफगाणिस्तानचा सदस्य म्हणून प्रवेश 2007 मध्ये झाला. बांग्लादेशने ॲार्गनायझेशन ॲाफ इस्लामिक कोॲापरेशन (ओआयसी) ची सदस्यता 1973 मध्येच घेतली आहे. ही संघटना मुख्यत: मुस्लीमबहुल देशांतील विवाद आणि संघर्षात समेट घडवून आणण्याचा उद्देश समोर ठेवून स्थापन करण्यात आली आहे. डेव्हलपिंग एट (आठ) कंट्रीजच्या संस्थापक सदस्यांपैकी बांग्लादेश एक आहे. यात बांग्लादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, मलायशिया, नायजेरिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान हे सदस्य आहेत. बांग्लादेशाला मान्यता देणारा पहिला देश म्यानमार होता. या दोन्ही देशांचे हितसंबंध सारखेच असून सुद्धा रोहिंग्या निर्वासितांच्या घुसखोरीमुळे बांग्लादेश आणि म्यानमार यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरावरील स्वामित्वाबाबत बांग्लादेश आणि म्यानमार यात वाद निर्माण झाला होता. शेवटी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाच्या मध्यस्तीने मार्गी लागला. पुढे 2016 आणि 2017 मध्ये बौद्ध धर्मी म्यानमारमधील, 7 लक्ष मुस्लीमधर्मी रोहिंग्ये निर्वासितांनी, पिटाळले गेल्यामुळे, बांग्लादेशात बेकायदा प्रवेश केला. अत्याचार, वांशिक द्वेश, वंशविच्छेद यामुळे जीव वाचवण्यासाठी आपण आश्रयाला आलो आहोत, असा दावा रोहिंग्यांनी केला आहे. बांग्लादेशाने आणि आंतरराष्ट्रीय जगताने या प्रकाराबाबत म्यानमारवर कडक शब्दात टीका केली होती. संयुक्त राष्ट्रसंघानेही म्यानमारवर ठपका ठेवला असून हा वांशिक द्वेशातून घडलेला प्रकार असल्याचे म्हटले आहे. भारत आणि बांग्लादेश यातील संबंध समाधानकारक राहिले असून यांना विशेष राजकीय महत्त्व आहे. बांग्लादेशातील वृत्तपत्रांनी भारताला ‘बांग्लादेशाचा विश्वसनीय मित्र’, म्हणून संबोधले आहे. भारत आणि बांग्लादेश ही दक्षिण आशियातील परस्पर व्यापारसंबंध असलेली सर्वात मोठी जोडी आहे. यांचे आर्थिक आणि पायाभूत सोयीसुविधा संबंधातले जमिनीवरील आणि सागरातील वाहतुक प्रकल्प, यात सहयोग आणि सहकार्य असते. समान सांस्कृतिक वारसा, लोकशाही मूल्यांवर विश्वास आणि बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील भारताचे सहकार्य यामुळे या देशांच्या मित्रत्वाच्या संबंधाना भरभक्कम पाया लाभला आहे. बांग्लादेशातील कट्टर आणि धर्मांध घटकांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार, मंदिरांची तोडफोड, सीमेवर होणाऱ्या हिंसक कारवाया मात्र थांबण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सामायिक नद्यांमधील पाण्याच्या वाटपाबाबतचा प्रश्नही चर्चेने सुटण्यासारखा आहे. म्यानमारमधील मुस्लीम रोहिंग्यावरच्या कथित अत्याचारांचा निषेध करण्यास रशिया आणि चीन यांच्याप्रमाणे भारतानेही नकार दिला होता. म्यानमार मधील रोहिंग्यांच्या मानवीहक्कांचे हनन होते आहे आणि ते थांबले पाहिजे ही बांग्लादेशाची भूमिका होती. यामुळे भारत आणि बांग्लादेशात कटुता निर्माण झाली होती. पण भारताने बांग्लादेशात आलेल्या रोहिंग्यांसाठी सामग्री वाहून नेण्यास हवाई मदत केली, याचीही नोंद घ्यावयास हवी. गोधनाच्या बांग्लादेशात होणाऱ्या तस्करीवर भारताने नियंत्रण आणल्यामुळे बांग्लादेशात गोमांसाचे आणि कातड्यांचे भाव वाढून महागाई वाढली, हेही त्यांच्या नाराजीचे कारण आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेश यात 550 मिलियन डॅालरचा व्यापार करार झाला आहे. यामुळे पाकिस्तानातून आयात केलेला कापूस बांग्लादेशातील वस्त्रोद्योगला उपयोगाचा ठरतो आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातील व्यापारक्षेत्रात दोस्ती झाली असली तरी राजकीय संबंध ताणलेलेच आहेत. कारण तेव्हाच्या पश्चिम पाकिस्तानमधून आलेल्या पंजाबी मुस्लीम सैनिकांनी बांग्ला मुस्लीम महिलांवर 1971 किंवा त्याअगोदर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार केले, नागरिकांचा संहार केला (जेनोसाईड) हे पाकिस्तान मान्यच करीत नाही. यासाठी जबाबदार असलेल्यांना फाशी दिल्यानंतर पाकिस्तानने विरोध आणि निषेधही केला होता. यामुळे उभय देशांच्या संबंधात फार मोठी कटुता निर्माण झाली होती. ती लवकर विस्मरणात जाणार नाही. चीन आणि बांग्लादेश (तेव्हाचा ईस्ट पाकिस्तान) यात 1950 पासूनच स्नेहाचे संबंध होते. बांग्लादेशाच्या 1971 च्या मुक्तीलढ्याचे वेळी मात्र चीनने पाकिस्तानची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे चीन आणि बांग्लादेशात संबंध प्रस्थापित होण्यासाठी 1976 साल उजाडावं लागलं. नंतर मात्र संबंधात वेगाने सुधारणा होऊन चीनने बांग्लादेशाला भरपूर शस्त्रास्त्रे पुरवून नाराजी बऱ्याच प्रमाणात कमी केली. आज बांग्लादेश जवळची 80 % शस्त्रे चीनकडून सौम्य आणि उदार अटीवर घेतलेली आहेत. आज या दोन देशातील व्यापार सर्वात जास्त आहे. आता हे दोन्ही देश बीसीआयएम व्यासपीठाचे (बांग्लादेश, चीन, भारत आणि म्यानमार यांचे व्यासपीठ) सदस्य आहेत. जपानने बांग्लादेशाला कर्ज स्वरुपात सर्वात जास्त आर्थिक मदत केली आहे. ब्रिटनचे बांग्लादेशाशी आर्थिक, सांस्कृतिक आणि सैनिकी संबंध आहेत. अमेरिका बांग्लादेशाचा आर्थिक आणि सुरक्षा क्षेत्रातला सहयोगी आहे. आयातीचा विचार केला तर अमेरिका बांग्लादेशाकडून विविध वस्तूंची आयात करते. तसेच अमेरिकेने बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही केली आहे. त्यामुळे 76 % बांग्लादेशी अमेरिकेवर बेहद्द खूश आहेत. पण यामागे अमेरिकेचा आंतरिक हेतू हा आहे की उद्या प्रशांत-भारतीयक्षेत्रात गरज भासली तर एक भरवशाचा साथीदार हाताशी असावा. युरोपीयन युनीयनसाठी बांग्लादेश ही फार मोठी बाजारपेठ आहे. बांग्लादेशाच्या विकासासाठी युरोपीयन युनीयनकडून सढळ हाताने मदत मिळत असते. पण हे बांग्लादेशाच्या कल्याणासाठीच आहे, असे नाही. आपल्या देशात उत्पादन करून प्रदूषण वाढवायचे, किंमतही जास्त मोजायची त्यापेक्षा जमीन, पाणी, वीज आणि स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या देशात उत्पादन करायचे आणि हव्यात्या वस्तू हव्यात्या प्रमाणात आयात करणे अमेरिका आणि युरोपीयन युनीयनला परवडणारे आहे आणि गुंतवणूक करणारा आयातदार, बांग्लादेशालाही निदाान आजतरी परवडणारा आहे. इतर देशांशीही बांग्लादेशाचे संबंध सलोख्याचेच आहेत. लोकशाही मूल्ये मानणारा देश असल्यामुळे पाश्चात्य देशांचे बांग्लादेशाशी बऱ्यापैकी जुळते. असा देश इस्लामी जगतात शोधावाच लागेल. बरे मध्यपूर्वेतील मुस्लीम जगताबाबत म्हणायचे तर धार्मिक आणि सांस्कृतिक सारखेपणामुळे बांग्लादेशी मनुष्यबळाच्या वाट्याला येणारे वातावरण चांगले नसूनही, तसेच सतत युद्धाच्या किंवा अस्थिर आणि असुरक्षित परिस्थितीत सुद्धा, बांग्लादेशाचे या मुस्लीम जगताशी स्नेहाचे संबंध आहेत. सौदी अरेबियाने बांग्लादेशाचा उल्लेख, मुस्लीम जगतातील एक महत्त्वाचा देश, असा केला, ते उगीचच असेल का? एकच कमतरता दिसते. ती ही की, बांग्लादेशाने इस्रायलला मान्यता दिली असली तरी इस्रायलने पॅलेस्टाईनचा भूभाग बेकायदेशीयरपणे व्यापणे बांग्लादेशाला मान्य नाही. पण आजच्या जगात मध्यस्ताकरवी गरज भागवता येते की. असा व्यवहार करणारा बांग्लादेश हा एकटाच देश नाही. बांग्लादेशी संस्था अनेक विसकसनशील देशात रचनात्मक कामात सहयोगी होत आहेत. बांग्लादेश रुरल ॲडव्हान्समेंट कमेटी (बीआरएसी) या नावाची अशासकीय संस्था 1972 मध्येच, म्हणजे जन्म झाल्यानंतर तशी लगेचच स्थापन झालेली ही संस्था, जागतिक स्तरावर विकासविषयक कामात सहकार्य आणि सहयोग करीत असते. परराष्ट्रांकडून देणग्या स्वीकारणारी ही बांग्लादेशात रीतसर नोंदणी झालेली संस्था आहे. आताआता पर्यंत ती अफगाणिस्तानमध्ये प्रशंसनीय रचनात्मक कार्य करीत होती. भारताचीही अशीच मदत होती पण ती बहुतांशी दोन सरकारांमधील करारांना अनुसरून असे. तालिबान्यांच्या ताब्यानंतर इतर अनेक प्रश्नांप्रमाणे ह्यांच्या कार्यांचे बाबतीत तालिबानी काय निर्णय घेतात, ते यथावकाश कळेलच. बांग्लादेशाने न्युक्लिअर नॅान प्रॅालिफरेशन ट्रिटी (एनपीटी) आणि कॅाम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी (सीटीबीटी) वर स्वाक्षरी केली आहे. नॅान अलाइन्ड मुव्हमेंट मध्ये (एनएएम) तर तो 1973 मध्येच दाखल झाला आहे. अशा दाखल्यांमुळे जगाच्या पाठशाळेत बांग्लादेशाचे नाव एका ‘शहण्या’मुलासारखे, निदान आजतरी झाले आहे आणि याचे पितृ्त्व भारताकडे आहे.

No comments:

Post a Comment