Monday, December 20, 2021

एका चिमुकल्या राष्ट्राच्या जन्माचे माहात्म्य ! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य दिशेला कॅरेबियन समुद्रातील वेस्ट इंडीज हा एक मोठा कंसाकार बेटसमूह आहे. वेस्ट इंडीज हे नाव क्रिकेटमुळे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल. या बेटसमूहाचा एक भाग ग्रेटर ॲंटिल्स या नावाने ओळखला जातो. यातील विंडवर्ड आयलंड्सना लागून असलेल्या बार्बाडोस या बेटाचा परिचय असा तपशीलवार करून देण्याचे कारण असे की, बार्बाडोस हे नाव क्रिकेटप्रेमी वगळता क्वचितच कुणी ऐकले असेल. सर गॅरी सोबर्स आणि एव्हर्टन वीक्स, फ्रॅंक वॉरेल, क्लाईड वॉलकॉट हे तीन शिलेदार, यांच्या शिवाय लगॉर्डन ग्रीनिज, माल्कम मार्शल, ज्योएल गार्नर, डेस्मंड हेन्स यांच्यावर भारतीय क्रीडाप्रेमी ते भारताविरुद्ध खेळत असूनसुद्धा बेहद्द खूश असत. पण क्रिकेटप्रेमी जगातही बार्बाडोस वेस्ट इंडिज या नावानेच क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांपैकी एक होता. चिमुकला देश 34 किलोमीटर लांब आणि 23 किलोमीटर रुंद असे हे चिमुकले बेट असून ॲालिव्ह ब्लॅासम या नावाचे इंग्लिश जहाज या बेटावर 1625 मध्ये पोचले. त्यांनी बेटाचा ताबा घेतला आणि किंग जेम्स (पहिला) याच्या स्वामित्वाची द्वाही फिरविली. ब्रिटिश पार्लमेंटने 1966 च्या कायद्यानुसार एका या बेटासाठी एका सत्ताधीशाची नेमणूक केली. त्याच्या आधिपत्याखाली बार्बाडोसला 30 नोव्हेंबर 1966 ला नवीन घटना आणि तिच्या अधिन दोन सभागृह असलेली सांसदीय लोकशाही आणि प्रशासन पद्धती असलेले स्वातंत्र्य बहाल केले. पण हा सत्ताधीश ब्रिटिश राणीच्या मार्गदर्शनानुसार काम करणारा असल्यामुळे हे स्वातंत्र्य तसे अपूर्णच होते. ही स्थिती 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अस्तित्वात होती. ब्रिटिश कॅामनवेल्थ आणि कॅामनवेल्थ अशाप्रकारे बार्बाडोसची सर्वोच्च सत्ताधारी ब्रिटिश राष्ट्रकूल (ब्रिटिश कॅामनवेल्थची) प्रमुख, नाममात्र स्वरुपात का असेना, ब्रिटनची राणी एलिझाबेथच होती. पण 2021 मध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी हा संबंध संपुष्टात आला आणि एका स्वतंत्र प्रजासत्ताकाची स्थापना झाली. ब्रिटिश कॉमनवेल्थमधील 15 राष्ट्रे आजही ब्रिटिश राणीला राष्ट्रप्रमुख मानतात. यात ॲास्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, जमैका यासारखे देश आहेत. पहिल्या तीन देशात गोरे लोक बहुसंख्य आहेत. त्यामुळे ब्रिटिश राणीला राष्ट्रप्रमुख मानण्यास त्यांची हरकत नसावी. पण बार्बाडोसने असा संबंध न ठेवता स्वतंत्र प्रजासत्ताकाची वेगळी वाट निवडली, हे विशेष म्हटले पाहिजे. ब्रिटिशांनी आपल्या वसाहतींना स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांनी ब्रिटिश कॅामनवेल्थमध्ये रहावे असा प्रस्ताव ठेवला होता. तो 15 देशांनी मान्य केला. त्यावेळी ब्रिटिश हा शब्द वगळून नुसते राष्ट्रकूल (कॅामनवेल्थ) म्हणणार असाल तर आम्ही त्यात राहू व या कॅामनवेल्थचे प्रमुखपद ब्रिटिश राणीकडे रहायला आमची हरकत असणार नाही, अशी भूमिका भारतासारख्या देशांनी घेतली होती. ती ब्रिटिश सरकारने ताबडतोब मान्य केली होती. या कॅामनवेल्थमध्ये आज लहानमोठी मिळून 53 राष्ट्रे आहेत. ब्रिटिश कॅामनवेल्थ मधील 15 राष्ट्रे या कॅामनवेल्थचीही सदस्य आहेत. कॅामनवेल्थमध्ये आशियातील 7 राष्ट्रे, आफ्रिकेतील 19 राष्ट्रे, अमेरिकेतील 13 राष्ट्रे, युरोपातील 3 राष्ट्रे, पॅसिफिक भागातील 11 राष्ट्रे आहेत. यापैकी रवांडा आणि मोझेंबिक हे देश बिटिश वसाहतीपैकी नाहीत पण तरीही त्यांनी कॅामनवेल्थची सदस्यता स्वीकारली आहे. या उलट एकेकाळी अमेरिकेत ब्रिटिश वसाहती होत्या पण आजची अमेरिका कॅामनवेल्थची सदस्य नाही. आजचा बार्बाडोस कॅामनवेल्थमध्ये आहे पण ब्रिटिश कॅामनवेल्थमध्ये मात्र नाही. आश्चर्याची बाब ही आहे की, हा निर्णय क्रिकेट पटू सर गॅरी सोबर्सला मात्र मान्य नाही. ब्रिटिशांनी बहाल केलेल्या ‘सर’कीचा तर हा परिणाम नसेल ना? कृष्णवर्णियांमध्ये जागृती अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडची हत्या एका पोलिसाने केली. त्याच्या मानेवर तो गोरा पोलीस गुढगा दाबून दाब देत होता. आपल्याला श्वास घेणेही शक्य होत नाही, असे जॉर्ज फ्लॉइड सांगत होता. पण व्यर्थ! शेवटी जॅार्ज फ्लॅाइड गुदमरून मेला. या हत्येमुळे जगातील सर्व कृष्णवर्णीयच नव्हे तर अन्यही खवळून उठले होते. अशा वातावरणात बार्बाडोसमधील बहुसंख्य कृष्णवर्णीयांनी गोऱ्यांच्या जगातील उरल्यासुरल्या सत्ताकेंद्रालाही संपविण्याचा निर्धार तर केला नसेल ना? गुलामगिरीचे जोखड झुगारून देण्याची प्रेरणा जॅार्ज फ्लॅाइडच्या हत्येमुळे जगभर निर्माण झालेल्या उद्रेकातून तर मिळाली नसेल ना? ब्रिजटाऊन या राजधानीच्या शहरात मध्यरात्री शेकडो लोक चेंबरलीन पुलावर प्रजासत्ताकाचा जयघोष करीत एकत्र आले. ‘प्राईड ॲंड इंडस्ट्री’, हे या नवीन प्रजासत्ताकाचे बोधवाक्य आहे. राष्ट्रनिष्ठेची, पूर्वजांविषयीच्या अभिमानाची ग्वाही देत प्रगतीपथावरच्या वाटचालीची खात्री ‘इन प्लेंटी ॲंड इन टाईम ॲाफ नीड’ या राष्ट्रगीतात प्रगट झाली आहे. ज्यांचा इतिहास केवळ अंधकारमय होता, ज्यांच्या वाट्याला प्रतिक्षणी गुलामगिरीमुळे केवळ यातनाच येत होत्या, ते बार्बेडियन यापुढे राष्ट्रनिष्ठेच्या स्फुलिंगासह प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. याची साक्ष या नवनिर्मित देशाच्या बोधवाक्यातून आणि राष्ट्रगीतातून व्यक्त होते आहे. ३० नोव्हेंबर हा बार्बाडोसचा स्वातंत्र्य दिनच यापुढे त्याचा प्रजासत्ताक दिन म्हणूनही साजरा होईल. जो स्वातंत्र्य दिन तोच प्रजासत्ताक दिन हे जगातले कदाचित एकमेव उदाहरण असावे. बार्बाडोस जगाचे लघुरूप 90 % बार्बेडियन्स बाजान नावाच्या आफ्रिकन आणि कॅरेबियन या मिश्र जमातीतील असून उरलेले जगातील जवळजवळ सर्व देशातून येऊन इथे स्थायिक झालेले आहेत. अशाप्रकारे बार्बाडोस एकप्रकारे संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करते. जगातील बार्बेडियन लोक बार्बाडोसमध्ये परत येण्यास सुरवात झाली आहे. त्यांचे बार्बाडोसची लेकरे म्हणून स्वागत केले जात आहे. या निमित्ताने इस्रायलची आठवण झाल्यावाचून राहत नाही. इस्रायलची स्थापना होताच जगभरातील अनेक ज्यू आपल्या मायदेशी परत आले आहेत. लहान प्रमाणावर असेल पण हाच प्रकार बार्बाडोसच्या बाबतीतही घडतो आहे. वांशिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर 3 लक्ष लोकसंख्येपैकी काळे 91 % टक्के, गोरे 4 %, संमिश्र 3.5 %, भारतीय 1 % आणि उरलेले इतर आहेत. धार्मिक दृष्ट्या 75.6% ख्रिश्चन, 20.3 % कोणताही घर्म न मानणारे, 2.5% अन्य आणि 1.3 % माहिती उपलब्ध नसलेले आहेत. मिया मोटली या पंतप्रधान तर सॅंड्रा मॅसॅान अध्यक्षा आहेत. मिया मोटली या बार्बाडोस लेबर पार्टीच्या प्रमुख आहेत. त्यांनी 72.8% टक्के मतांच्या आधारे सर्वच्या सर्व म्हणजे 30 जागा प्रतिनिधी सभेत खेचून आणल्या आहेत. सर्व जागी एकच पक्ष निवडून आल्यामुळे बिशप ज्योसेफ ॲथर्ली यांनी स्वतंत्र सदस्य म्हणून भूमिका वठवण्याचे ठरविले आहे. अशाप्रकारे विरोधी पक्षाचा एक सदस्य हाच विरोधी पक्षनेता असणार आहे. संड्रा मॅसॅान अध्यक्षा आणि मिया मोटली या पंतप्रधान ही महिलांची जोडगोळी एकाच वेळी बार्बाडोसमध्ये सत्तेवर येणे हा योगही जगाच्या इतिहासात बहुदा प्रथमच घडला असावा. बार्बाडोसच्या अध्यक्षा सॅंड्रा मॅसॅान यांनी प्रजासत्ताकाची स्थापना होत असतांना व्यक्त केलेले विचार नोंद घ्यावेत असे आहेत. ‘गरीब असू, पण आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहोत. आपणच आपल्या देशाला जपलं पाहिजे.’ बिटनच्या राणीने नवीन प्रजासत्ताकाला शुभेच्छा पाठविल्या आहेत. राणीचे पुत्र प्रिन्स चार्ल्स यांनी या प्रसंगी जातीने उपस्थित राहून, ‘ही एक नवीन सुरवात आहे’, अशा शब्दात प्रजासत्ताकाचे अभिनंदन केले आहे. मूळची बार्बाडोसची असलेली आजची अमेरिकन पॅापस्टार रिहाना यावेळी आवर्जून उपस्थित होती. चिमुकल्या देशातील चिमुकली सभागृहे बार्बाडोसच्या संसदेची दोन सभागृहे आहेत. हाऊस ॲाफ असेम्ब्ली हे कनिष्ठ सभागृह आहे. यातील 30 सदस्य हे आपल्या लोकसभेच्या सदस्यांप्रमाणे 30 मतदारसंघातून 5 वर्ष मुदतीसाठी निवडून येतील. स्पीकर 31 वा सदस्य असेल. दोन्ही बाजूंना समसमान मते पडल्यास त्याला निर्णायक मत (कास्टिंग व्होट) देण्याचा अधिकार असेल. सिनेट किंवा वरिष्ठ सभागृहात 21 अराजकीय (नॅान पोलिटिकल) सदस्य असतील. यातील 7 सदस्यांची निवड अध्यक्ष आपल्या मर्जीनुसार करतील. 12 सदस्य पंतप्रधानाच्या सल्यानुसार निवडले जातील. उरलेले 2 सदस्य विरोधी पक्ष नेत्याच्या सल्यानुसार निवडले जातील. सिनेट हे कायम सभागृह नसेल. निवडणुकीचे वेळी दोन्ही सभागृहांचे विसर्जन होईल. सिनेट स्वत: ठराव पारित करू शकेल. तसेच कनिष्ठ सभागृहात पारित झालेल्या ठरावांचे पुनरावलोकन (रिव्ह्यू) करू शकेल. सिनेटला आर्थिक विधेयके पारित करण्याचा अधिकार मात्र नसेल. सत्तारोहणप्रसंगी दिलदार प्रिन्स चार्ल्स उपस्थित सत्तारोहणप्रसंगी प्रिन्स चार्ल्स हे मानवंदना देणाऱ्यात उभे राहून राणी एलिझाबेथ यांच्या पदावनतीचे साक्षीदार ठरले आहेत. यापुढे राणी एलिझाबेथ बार्बाडोसच्या सम्राज्ञी असणार नाहीत. कारण बार्बाडोस ब्रिटिश कॅामनवेल्थचा घटक असणार नाही. तो कॅामनवेल्थचा घटक मात्र असणार आहे. एकेकाळी चिमुकले इंग्लंड म्हणून जे बेट ओळखले जायचे ते आता बार्बाडोस या नावाचे स्वतंत्र प्रजासत्ताक झाले आहे. ब्रिटिश कॅामनवेल्थच्या इतर घटकांनाही यापासून प्रेरणा मिळेल आणि तेही ब्रिटिश कॅामनवेल्थमधून बाहेर पडून कॅामनवेल्थचेच सदस्य राहणे पसंत करतील, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या विलयानंतर आता ब्रिटिश कॅामनवेल्थच्या विलयाची प्रक्रिया या निमित्ताने सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको.

No comments:

Post a Comment