My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, January 3, 2022
तबलिघी जमात - एक प्रश्नचिन्ह?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील सुन्नी मुस्लीमबहुल देश. हा वाळवंटी प्रदेश असून क्षेत्रफळाने आजूबाजूच्या देशांच्या तुलनेत खूपच मोठा म्हणजे 22 लक्ष 50 हजार चौ.किमी आहे. खनीज तेल आणि नैसर्गिक वायू यांनी या देशाला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. अरब जगातात हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा देश असून याची लोकसंख्या मात्र क्षेत्रफळाच्या मानाने खूप कमी म्हणजे 3.5 कोटी आहे. रियाध ही सौदीची राजधानी असून आधुनिकतेचा पुरस्कार करणारा सलमान हा सौदीचा राजा आहे. मक्का मदिना ही इस्लामींची पवित्र स्थळे सौदी अरेबियात आहेत. मोहंमदांचा जन्म मक्केचा मानला जातो. मदिना हे दुसऱ्या क्रमांकाचे पवित्र स्थळ आहे.यामुळे सौदी अरेबियाचे सुन्नी मुस्लीम जगतात महत्त्वाचे स्थान आहे.
सौदी अरेबियात बंदी!
अशा सौदी अरेबियाने तबलिघी जमात आणि दावा गटावर बंदी घातली आहे. या दोघांना मिळून अल अहबाब म्हणून ओळखले जाते. तबलिघी जमात या शब्दाचा शब्दश: अर्थ, ‘समावेशी जमात’ असा होईल. सर्व सुन्नींना एकत्र आणून प्रेषिताच्या काळात ज्याप्रकारे धर्माचरण होत असे, त्यानुसार सर्व सुन्नींचे आचरण असले पाहिजे, असे आग्रहाने प्रतिपादन करणारी ही मंडळी आहेत, असे सांगितले जाते. पण वस्तुस्थिती अशी आणि एवढीच आहे का?
मुस्लीम समाजातच परिवर्तन घडविण्याची आवश्यकता
अनेकांच्या मते तबलिघी हे प्रामुख्याने असे प्रचारक आहेत की ज्यांना, केवळ धर्मांतरच नव्हे तर, आजच्या विस्मृत मुस्लीम समाजातही परिवर्तन घडवून आणायचे आहे. म्हणून ही चळवळ मुख्यतः सामान्य मुस्लिमांवरच लक्ष केंद्रीत करीत असते. त्यांचा धर्मावरील विश्वास पुनरुज्जीवित व्हावा, त्यांना धार्मिक विधी, पोषाख आणि आचरण या विषयांवर मार्गदर्शन करावे, हा त्यांचा उद्देश असतो. ती मुस्लीम लोकात धर्माला अपेक्षित असलेले आचरण असावे यावर भर देत असते. याबाबतच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्येही हाच दृष्टीकोन मांडलेला दिसतो.
तबलिघींना सुन्नींचाच विरोध
पण जमातीची ही भूमिका खुद्द सुन्नींनाच मान्य नाही. याचे एक कारण असे असावे की, या निमित्ताने सुन्नींमध्ये एक पुराणमतवादी नेतृत्व नव्याने उभे होऊ पाहते आहे आणि हे प्रस्थापित आधुनिक नेतृत्वाला मान्य नसावे. सर्वसाधारण समजूत आहे त्याप्रमाणे मुस्लीम समाज एकसंध नाही. सुन्नी, शिया, बोहरा, वाहाबी, अहमदिया ही आणि अशी आणखी काही नावे आपल्यापैकी अनेकांना निदान ऐकून माहीत असतील. सुन्नी हा मुस्लिमांमधला फार मोठा म्हणजे 80 % एवढा गटसुद्धा एकसंध नाही. या सगळ्या सुन्नींना एका सूत्रात बांधण्याची ही चळवळ आहे. सर्व सुन्नींमध्ये धर्मकांडे (रायच्युअल्स), पोषाख आणि वैयक्तिक वर्तन याबाबत प्रेषिताच्या काळात जे संकेत पाळले जायचे ते अगदी जसेच्या तसे पाळण्यावर यांचा भर आहे. कर्मकांड म्हणजे काय? तर धार्मिक विधीतील रूढ संस्कार किंवा प्रथा. या चळवळीचे 25 कोटी अनुयायी आहेत, असे मानतात. ते मुख्यत: दक्षिण आशियात म्हणजे श्रीलंका, भारत, बांग्लादेश, भूतान, नेपाळ, पाकिस्तानात राहतात. तसे पाहिले तर जवळजवळ 200 देशात यांचे अनुयायी आहेत. 20 व्या शतकातील ही मुस्लिमांची एक महत्त्वाची आणि मोठी धार्मिक चळवळ मानली जाते.
दावा म्हणजेच काय?
मुस्लिमांनी अल्लांची पूजा पवित्र कुराण आणि प्रेषित मुहंमद यांनी सांगितल्याप्रमाणे करावी, यावर दावाचा भर आहे आज उलेमांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.
इस्लामवरील संकट
आधुनिकतेचा पुरस्कार करणाऱ्या, सुधारणावादी, तसेच काहीसे प्रगतीपर धोरण स्वीकारू पाहणाऱ्या सौदी अरेबियाने या दोन्हींना सनातनी चळवळींना, म्हणजे तबलिघी आणि दावा यांना, समाजावरील संकट म्हणून घोषित केले आहे. या गटांच्या कारवाया 175 पेक्षा जास्त देशात पसरल्या आहेत. इस्लाममधील ही सर्वात मोठी आणि कट्टरतेचा आग्रह धरणारी धार्मिक चळवळ आहे. या चळवळीचा परिणाम दहशतवादी कारवाया सुरू होण्यात झाला आहे, असे सौदी अरेबियाने आरोप करतांना म्हटले आहे. याला अनुसरून इस्लामिक घडामोडीचे मंत्री अब्दुल लतीफ अल शेख यांनी सर्व मशिदींमधील प्रवचनकारांना दर शुक्रवारी ह्या गटांच्या खऱ्या स्वरुपाची जाणीव करून देण्यासंबंधी आदेश दिले आहेत. ‘धर्मजागृतीच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करणाऱ्या, कायद्याला धरून न वागणाऱ्या, समाजाला धोका निर्माण करणाऱ्या, शिवाय तरुणांना दहशतवादाकडे प्रवृत्त करणाऱ्या या लोकांपासून सावध राहण्यासाठी सूचना प्रसारित करा. त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका’, असे म्हणत सौदी अरेबियातील लोकांवर, तबलिघी आणि दावा गटाशी संबंध ठेवण्यावर सौदी सरकारने बंदी घातली आहे.
तबलिघींचा खरा इतिहास कोणता?
तबलिघी जमात याच नावाची एक वेगळी चळवळ बरीच अगोदर म्हणजे 1927 साली मौलानै मुहंमद इलियास या नावाच्या एका इस्लामिक विद्वानाने स्थापन केली होती. ही सुद्धा सनातनी सुन्नी मुसलमानांची कडक धर्मकांडांचा पुरस्कार करणारी चळवळ होती. या चळवळीचे बोधवाक्य होते, ‘मुस्लिमांनो, मुस्लीम व्हा’. मुस्लिमांनो, नुसते नावालाच मुस्लीम राहू नका तर खऱ्या अर्थाने मुस्लीम व्हा, असा या बोधवाक्याचा अर्थ आहे. हे जर खरे असेल तर सौदी सरकारने या दोन तबलिघींपैकी कोणत्या तबलिघींवर बंदी घातली आहे किंवा या दोन्हीवरही बंदी घातली आहे का, हे स्पष्ट झालेले नाही.
2013 मध्ये कझखस्थानने कडक कर्मकांडांचा पुरस्कार करणाऱ्या तबलिघी जमातीला जहाल (एक्सट्रिमिस्ट) ठरवून तिच्यावर बंदी घातली होती. पण यांची कोणती विधाने जहाल स्वरुपाची आहेत, हे मात्र कुणी कधीच, अगदी न्यायालयांनीही, स्पष्ट केले नव्हते. पण मग इराण, रशिया, तजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, आणि उझबेकिस्तान यांनीही तबलिघींवर उगीचच बंदी घातली असेल का, असाही प्रश्न केला जातो.
देवबंदची सौदीवर टीका
इस्लामिक सेमिनरी दारूल उलूम देवबंदने सौदी अरेबियावर कडक शब्दात टीका केली आहे. दहशतवादाचे खापर तबलिघी जमातीवर फोडता येईल असा कुठलाही आधार समोर आलेला नाही, असे देवबंदचे म्हणणे आहे. शिर्क म्हणजेच अनेक देवांवर विश्वास. ते नको. बिदत म्हणजे नवनवीन धार्मिक कल्पना. त्याही नकोत. हा तबलिघींचा प्रमुख आग्रह असतो. ते दहशतवादाचे समर्थन करीत नाहीत. तरीही तबलिघीवर तसे आरोप केले जातात, ते अर्थहीन आणि निराधार आहेत, असे म्हणत सौदी सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि बंदी हुकूम मागे घ्यावा, असा आग्रह देवबंदने धरला आहे.
आजच्या तबलिघी चळवळीने 200 देशात हातपाय पसरले आहेत. ही जगातली सर्वात मोठी इस्लामिक धर्मप्रचार करणारी चळवळ आहे. या चळवळीचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा लक्षात आले की, उगमाचे रहस्य देवबंद प्रथेत आहे. देवबंदच्या मदरशात फक्त लहान मुलांवरच संस्कार केले जातात. पण प्रौढांचे काय? प्रौढांवरही विस्मृतीत गेलेले संस्कार नव्याने करण्याची तेवढीच आवश्यकता आहे, हे जाणवल्यामुळे लहान मुलांसाठी जसे मदरसे, तिथे जसे लहान मुलांवर संस्कार केले जातात, तसेच ही लहान वयाची मर्यादा ओलांडून प्रौढांवरही संस्कार करण्याची आवश्यकता आहे, असे वाटून प्रौढांवरही पुन्हा संस्कार करण्यास सुरवात केली पाहिजे, असे धुरिणांना जाणवले असले पाहिजे. म्हणूनच तबलिघी ही प्रौढांवर संस्कार करणारी चळवळ सुरू झाली असली असणार. प्रगतीपथावरील इस्लाम म्हणजेच नैरुत्य आशियातील तबलिघी जमात, अशा शीर्षकाचा ग्रंथ लिहिला गेल्याची नोंद फरिश ए नूर यांच्या लिखाणात सापडते आहे. यावरूनही याच विचाराला बळकटी मिळते.
भरकटलेल्या मुस्लिमांनी खरे मुस्लीम व्हावे
या ग्रंथात तबलिघी हे वेगळ्या प्रकारचे धर्मप्रचारक असून भरकटलेल्या मुस्लीम समाजाला पुन्हा सत्याच्या मार्गावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा दावा केला आहे. मुस्लीम समाजातील सर्वसामान्य लोकात जागृती करून धर्मावरील विश्वासाचे पुनर्जागरण करणे हा या चळवळीचा हेतू आहे. याचा अर्थ असा होतो की, धर्मप्रचाराबरोबरच जे मुस्लीम धर्मात आहेत, तेच धर्माचरणापासून दूर चालले असून त्यांना मुस्लीम धर्माच्या कर्मकांडात, आचरणात आणि व्यवहारात आणण्याची आवश्यकता त्या धर्मातील धुरीणांना वाटू लागली आहे. एकीकडे जे मुस्लीम नाहीत त्यांना मुस्लीम धर्मात आणण्याइतकेच, जे नावापुरतेच धर्मात आहेत, त्यांनाही खऱ्या अर्थाने संस्कारित करून धार्मिक बनविण्याची आवश्यकता धर्मप्रमुखांना वाटू लागली आहे. म्हणूनच मुस्लिमांनो, मुस्लीम व्हा हा नारा त्यांनी दिला असावा.
तबलिघी नक्की कसे?
एका संशोधनानुसार तबलिगी जमातीचे बहुतेक सदस्य धर्मनिष्ठेने आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करीत असतात. हे खरे असले तरी निदान काही लोक तरी नक्कीच अतिरेकी घटकांशी संबंध ठेवून असतात, हे नाकारता यायचे नाही. कारण एकाने विमानात बॅाम्ब ठेवला होता तर दुसऱा तालिबानी सैनिकांना कट्टर धार्मिकतेचे शिक्षण देत होता. एक बाब मात्र खरी आणि समाधानाची आहे ती ही की, खुद्द मुस्लिमांमधीलच काही गट सुद्धा तबलिघींच्या कथनी आणि करनी बाबत साशंक असून त्यांच्यावर बरीक लक्ष ठेवून आहेत. तबलिघी जमातीतील व्यक्ती केवळ धर्मनिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नती यासाठीच प्रयत्नशील असतात, असे जे म्हटले जाते, त्यावर विश्वास ठेवणे त्यांनाही कठीण वाटते आहे. साधनेचा पुरस्कार करणाऱ्या या पाक व्यक्ती आहेत, अशी खात्री भारतालाही नाही. तरीही हे कोण आहेत, असा साळसूद प्रश्न भारतातही का बरे विचारला जात असेल ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment