My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Thursday, January 20, 2022
लहानपणं देगा देवा
आमच्या घरची तलवार आणि जंबिया
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
एखाद दिवशी मध्येच केव्हातरी रात्री झोप उघडल्यावर का कुणास ठावूक लहानपणच्या आठवणी जाग्या होतात. असे का होत असावे, ते कळत नाही. आज अचानक आमच्या घरच्या खऱ्याखुऱ्या तलवारीची आठवण झाली. ही तलवार आमच्या घरी कशी आली ते माहीत नाही. आम्हा मुलांना तिच्याबद्दल कुतुहल असे. पण आईने तलवारीबद्दल कुठेही बोलायचे नाही, असे बजावून सांगितले होते. याचा आमच्यावर इतका परिणाम झाला होता की, आम्ही आपापसात सुद्धा तिच्याबद्दल कुजबुजच बोलत असू. आमचे अंजनगाव -सुर्जी हे गाव तसे शांत असायचे. पण एक दिवस अफवा पसरली की, गावात कुणी क्रांतिकारक आला आहे. त्याच्याजवळ शस्त्रे आहेत आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस घरोघर जाऊन झडती घेणार आहेत. आता आपल्या घरच्या तलवारीचे काय करायचे.? दादा (माझे वडील) म्हणाले, आपण ती घराच्या (तुळईवर) एखाद्या आडव्या खांबावर ठेवून देऊ. तिथे कोणाचे लक्ष जाणार नाही. पण नंतर कोणी तरी म्हणाले की, पोलिस अशाच तर जागी शोध घेत असतात. आई म्हणाली, माझ्या मनात एक विचार आला आहे. आता ती तलवार कुणाला हवी आहे का? ती अर्थातच कुणालाच नको होती. ती अगोदरच्या पिढ्यांपैकी कोणीतरी आणून ठेवली होती, एवढेच आम्हाला माहीत होते. पण त्या तलवारीशी आमचे भावनिक नातेही जुळले होते. त्यामुळे ती टाकायची तरी कशी ? तसेच कशी टाकायची? असा विचार होता. आई म्हणाली तलवार घरीच राहील पण वेगळ्या रूपात. तुम्हाला चालेल का? नाही म्हणणे शक्यच नव्हते. आईने लोहाराला निरोप पाठवला. त्याला त्या तलवाराची विळी तयार करून देतोस का? म्हणून विचारले. तो म्हणाला की, विळी करता येईल पण ती खूपच मोठी होईल. शेवटी तिच्या चार विळ्या करायचे ठरले. पण लोहीरालाही भीती वाटत होती. तो म्हणाला, मला भीती वाटते. पोलिसांनी मला पकडले तर काय करू. शेवटी रात्री भट्टी लावायची आणि विळ्या तयार करायच्या, असे ठरले. पण लोहार घाबरतच होता. शेवटी आईने त्याला दोन आणे (आजचे बारा पैसे) मजुरी जास्त देईन म्हणून कसेबसे तयार केले. अशाप्रकारे विळ्या तयार झाल्या. पण तुमच्या घरी चार विळ्या कशा? असे झडती घ्यायला आलेल्या पोलिसाने विचारले तर काय करायचे? मी शंका विचारली. आई म्हणाली, काळजी करू नका. दोन माझ्यासाठी आणि एकेक माझ्या दोन जावांसाठी. अशा एकदम चार घेतल्यामुळे स्वस्तात मिळाल्या असे सांगेन मी. पुढे झडतीची अफवाच होती, हे कळले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. आईने एक विळी स्वत:साठी ठेवून तीन विळ्या आपल्या मैत्रिणींना दिल्या. पुढे आम्ही नागपूरला आलो. आमच्या मेयो हॅास्पिटलच्या बंगल्यात गावातले सामान हलवले तेव्हा ती विळी बरोबर आली होती. पण ती आता मधोमध झिजली होती. तिच्यावर ऊस तोडतांना ती एक दिवस काडकन तुटली आणि शेवटी भंगारात गेली.
आमच्या घरी जंबियाही होता. तो मात्र दादांनी संरक्षणासाठी घेतला होता. त्याचे काम कधीच पडले नाही. जंबियाला पाते झाकण्यासाठी कसलेतरी म्यान होते. कधीमधी तो बाहेर काढला जायचा. मी तो हातात घेऊन पहात बसायचो. पुढे माझी मोठी बहीण सुमाताई डॅाक्टर झाली. बापूराव (माझे मोठे बंधू) आणि सुमाताई दोघेही नागपूरच्या रॅाबर्टसन मेडिकल स्कूलमध्ये शिकून डॅाक्टर झाले होते. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमाताईला मुर्तिजापूरला लक्ष्मी हॅास्पिटलमध्ये पोस्टिंग मिळाले. एकटे रहायचे म्हणून काळजी होती. सुमाताईला रहायला क्वार्टर होता. तिची बाल मैत्रीण सुशी तिच्या बरोबर सोबतीला म्हणून मुर्तिजापूरला जाणार होती. सुमाताई मुर्तिजापूरला जायला निघाली तेव्हा दादांनी तिला जातांना तो जंबिया दिला होता. व्हिझिटवर एकटीला रात्री बेरात्री जावे लागू शकते, अशावेळी हा जंबिया बरोबर ठेवीत जा, असे बजावून सांगितले होते. तिचा निरोप घेतानाचा तो प्रसंग मला आजही आठवतो. तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी आलेले मी पाहिलेले होते. पुढे दोन वर्षांनी सुमाताईचे शेगावला पोस्टिंग झाले. तिचे शेगावलाच टायफॅाईडने निधन झाले. एक दिवस ती अडलेल्या बाईची सुटका करून घरी आली. घरी आल्याआल्या लगेचच तिला ताप भरला. तो टॅायफॅाईड निघाला. त्यातच ती गेली. तिचे सामान घरी आणले, पण त्यात तो जंबिया नव्हता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment