My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, January 10, 2022
सेमीकंडक्टरच्या विश्वात भारताचा दमदार प्रवेश
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
आपल्या सारख्या सामान्य माणसांना सेमीकंडक्टर हे नाव माहीत झाले असले, त्याची खूप आवश्यकता आहे हेही कळले असले आणि आपण याबाबत पूर्णपणे परावलंबी आहोत, हेही जाणवले असले तरी सेमीकंडक्टर म्हणजे नक्की काय याची पुरेशी माहिती आपल्यापैकी अभ्यासक वगळता इतरांना क्वचितच असेल. शास्त्रीय परिभाषा जास्तीतजास्त वगळून सर्व सामान्यांना याबाबत थोडीशी कामचलाऊ माहिती जरी मिळाली तरी त्यांना ती हवीशी आणि बोधप्रद वाटू शकेल.
शाळेत शिकत असतांना विद्युत वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार पदार्थांचे दोन प्रकार पडतात, हे आपल्याला माहीत आहे. विद्युत वाहून नेणारे, जसे धातू आणि विद्युत वाहून नेऊ न शकणारे जसे, लाकूड, काच यासारखे अधातू हे बहुतेकांच्या लक्षात असेल. विद्युत वाहून नेणारे ते वाहक किंवा कंडक्टर्स आणि वाहून नेऊ न शकणारे ते विद्युतरोधक किंवा इनशुलेटर्स किंवा नॅान कंडक्टर्स.
पण सेमीकंडक्टर म्हणजे काय? सेमीकंडक्टर हा विद्युतवाहक आणि विद्युतरोधक यातील मधली स्थिती म्हणता येईल. सेमीकंडक्टर हा एक असा पदार्थ आहे की जो दोन धातूंमध्ये वाहकाचे काम करतो. जसे सिलिकॅान किंवा वाळू आणि गार. याशिवाय जर्मॅनियम नावाचा विद्युत वाहून नेऊ शकणारा असा मूलपदार्थ असा आहे की ज्यात काही गुण धातूंचे तर काही गुण अधातूंचे असतात. तसेच गॅलियम आर्सेनाईड किंवा कॅडमियम सेलेनाईड यासारखे संयुक्त पदार्थ हे सुद्धा असेच वाहकाचे काम करणारे पदार्थ आहेत. पण या वाहकांचे वैशिष्ट्य असे आहे, की ते विद्युतवहनाची गती नियंत्रित म्हणजे कमी किंवा जास्त करू शकतत. सेमीकंडक्टरचा हा गुण उद्योगांसाठी वरदान ठरला आहे.
सेमीकंडक्टरचा सर्वत्र वापर
निरनिराळी डिव्हायसेस (साधने) तयार करण्यासाठी उद्योगात सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. चीप्स, ट्रान्झिस्टर, इंटेग्रेटेड सर्किट्स, कॅाम्प्युटर्स, इलेक्ट्रॅानिक डिव्हायसेस, डायोड्स ही नावेही काहींना माहीत झाली असतील. अतिसूक्ष्म आकार ही सेमीकंडक्टरची विशेषता आहे. सेमीकंडक्टरमधील सघनता (कॅामपॅक्टनेस), विश्वसनीयता (रिलायबिलिटी), इंधनाची बचत (पॅावर एफिशियन्सी) आणि स्वस्तता (लो कॅास्ट) या गुणांमुळे आता असे क्वचितच एखादे यंत्र किंवा उपकरण असेल की ज्यात सेमीकंडक्टरचा वापर होत नसेल. सेमीकंडक्टरमुळे प्रक्रिया वेगाने पडतात, तसेच त्या अचूक आणि उच्च दर्जाच्या असतात. या गुणांमुळे सेमीकंडक्टर उद्योग चांगलाच फोफावला आहे. या उद्योगात कोट्यवधी डॅालर्सच्या उलाढाली होऊ लागल्या आहेत.
मक्तेदारी संपवलीच पाहिजे
आज सेमीकंडक्टर उद्योगात अमेरिका, चीन, चिमुकले तैवान, दक्षिण कोरिया, जपान आणि नेदरलंड अशांचीच मक्तेदारी निर्माण झाली आहे. या देशांनी सेमीकंडक्टरचा पुरवठा करण्यात हात आखडता घेतला तर जगभरातील एकूणएक उद्योग जणू गुदमरून जातील. ही स्थिती भारतासारख्या देशाला तर मुळीच परवडणारी नाही. आत्मनिर्भरतेचा ध्यास घेण्यामागचे हे एक प्रमुख कारण आहे. सध्या भारत सेमीकंडक्टरसाठी चीनवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे पुरवठा शृंखला तोडून किंवा पुरवठा कमी करून किंवा किंमत वाढवून चीन भविष्यात भारताला शह देण्याच्या प्रयत्न करू शकतो. काही महिन्यांपूर्वी चीनच्या अडवणुकीमुळे भारतात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माणही झाला होता. अनेक कारखाने विशेषत: ॲाटो उद्योग बंद पडले होते. करोनाचा तडाखा आणि सेमीकंडक्टर चिप्सचा जगभर पडलेला तुटवडा यापैकी अधिक हानिकारक कोण अशी तुलना अनेकांना करावीशी वाटली यावरून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येऊ शकेल. सेमीकंडक्टरच्या बाबतीत चीनवरील अवलंबित्व तर भारताला मुळीच परवडणारे नाही. कारण तो देश कृत्रिम तुटवडा केव्हा निर्माण करील, ते सांगता यायचे नाही. तसेच आयात केलेल्या सेमीकंडक्टर्सपेक्षा देशात निर्माण होणाऱ्या कंडकर्सची किंमत केव्हाही कमी असेल आणि त्यामुळे वस्तू स्वस्त होतील, हेही दुर्लक्षिण्यासारखे नाही.
गेमचेंजर
सेमीकंडक्टरच्या तुटवड्याची ही अडचण लक्षात घेऊन भारताने 16 डिसेंबर 2021 ला एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 76 हजार कोटी रुपयाच्या प्रोत्साहन निधीची घोषणा केली. पुढील काही वर्षे हा निधी उपलब्ध असेल. सुरवातीला एवढी मोठी रक्कम अडकवून ठेवणे सामान्य गुंतवणूकदाराला शक्य होणार नाही म्हणून ही तजवीज शासनाने केली आहे. हा निर्णय परिस्थितीत आमूलाग्र बदल करणारा (गेम चेंजर) ठरू शकतो. या आधारावर भारतात सेमीकंडक्टर उद्योग नजीकच्या भविष्यकाळात मूळ धरून विकास पावायला प्रारंभ होईल. लाखोच्या संख्येत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उभे होतील. नुसते इंजिनिअर्सच 1 लाखाच्या जवळपास लागतील. इतर सहाय्यकांची संख्यातर यापेक्षा कितीतरी जास्त असेल, हे उघड आहे. पण हा मुद्दा तसा गौण आहे. ज्या बाबीसाठी आपण जगावर पूर्णत: अवलंबून आहोत आणि वेळोवेळी खऱ्या किंवा कृत्रिम तुटवड्याचा, अडवणुकीच्या धोरणाचा सामना करीत आलो आहोत, ती अडचण कायमची दूर करण्यासाठी उचलेले हे पाऊल आहे.
सेमीकंडक्टरचे नित्य बदलणारे तंत्रज्ञान
सेमीकंडक्टरक्षेत्र हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि नित्य बदलणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्र आहे. अशा क्षेत्रात प्रचंड भांडवली गुंतवणूक करावी लागते, फार मोठी जोखीम उचलण्याची तयारी ठेवावी लागते, भांडवल गुंतवणुकीतून मिळणारा परतावा खूप उशिराने मिळणार असल्यामुळे तेवढा धीर असावा लागतो. तंत्रज्ञानक्षेत्रात नित्य नव्याने बदल होत असल्यामुळे अगोदर केलेली गुंतवणूक अनेकदा वाया जाण्याची भीती असते. हा धोका पत्करण्याचीही तयारी असावी लागते. खाजगी भांडवलदार यासाठी सहसा तयार होत नाहीत. असे असूनही वेदांत आणि व्हिडिओकॅान यांनी भांडवल गुंतवण्याची तयारी दाखविली आहे, हे विशेष.
संकल्प, भारताला सेमीकंडक्टरचे केंद्र बनविण्याचा !
इंटेल ही अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली एक प्रमुख कंपनी आहे. ती भारतात सेमीकंडक्टर उत्पादन युनिट स्थापन करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टरचे संशोधन आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्याचा आणि सेमीकंडक्टर उत्पादनाचे केंद्र (हब) तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून इंटेल कंपनीनेही युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीतंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंटेलच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सेमीकंडक्टर अतिशय आवश्यक असल्यामुळे या प्रकारच्या सेमीकंडक्टर्सना सर्वत्र फार मोठी मागणी आहे. सेमीकंडक्टर उत्पादनाचे भारत हे एक मोठे केंद्र व्हावे या दिशेने भारताचे प्रयत्न कसे सुरू झाले आहेत, याची यावरून माहिती मिळेल.
दुसरे असे की, भारत आणि तैवान यांच्यात एका वर्षाच्या आत भारतात सुमारे ५५ हजार कोटी रुपये गुंतवणुक करून सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लँट स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्लँटमधून ५जी उपकरणे, इलेक्ट्रिक कारची चिप यासारख्यांची निर्मिती होईल. भारतात जमीन, वीज, पाणी आणि कुशल मनुष्यबळ यांची तशी अडचण नाही. पण सेमीकंडक्टरच्या निर्मितीत लाखो गॅलन अतिशुद्ध (अल्ट्रा-प्युअर) पाणी लागते. त्यामुळे प्लॅंट उभारणीसाठी मुबलक पाणी पुरवठा सतत होऊ शकेल अशी जागा सहजासहजी उपलब्ध होऊ शकणार नाही. ती शोधावीच लागेल. तैवानमध्ये सोमीकंडक्टरसाठी इतके पाणी वापरले गेले की शेवटी जलसंकट उभे राहिले होते. भारत आणि तैवान यात करात सूट आणि सवलतींबाबत चर्चा सुरू झाली असून उभयपक्षी घासाघीस होणे तसे अपेक्षितच आहे. याशिवाय तैवानला भांडवली खर्चातही भारताची भागीदारी हवी आहे. सध्या आपण गरजवंत आहोत, हे लक्षात ठेवून आणि भावी लाभ लक्षात घेऊन भारताला योग्य भूमिका घ्यावी लागेल. भारताची 2025 सालची सेमीकंडक्टरची आयात 7 ते 8 लाख कोटी रुपयांची असणार आहे. त्यामुळे हा सौदा भारतालाही लाभदायकच ठरणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चिपच्या पुरवठ्याच्या प्रश्नावर क्वॉड बैठकीत चर्चा केली होती. चिप्स सिलिकॅानच्या बनलेल्या असतात. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकी दौऱ्यावर असतांना क्वालकॉम कंपनीचे सीईओ क्रिस्टियानो ई अमोन यांच्यासोबत भारतात गुंतवणुकीबाबत चर्चा केली होती. क्वालकॉम ही कंपनी सेमीकंडक्टर, सॉफ्टवेअर आणि वायरलेस तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी आहे, हे विशेष.
भारताचे भूषण असलेला टाटा समूह भारतात 2200 कोटी रुपये खर्चून कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा यापैकी एका राज्यात सेमीकंडक्टरचा कारखाना उभारण्याच्या विचारात आहे. टाटा समूहाचा कामाचा कामाचा उरक पाहता या वर्षाअखेर हा कारखाना सुरू करण्याचा त्यांचा मनोदय प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. हा एक आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट प्लांट (OSAT) असणार आहे. अशा कारखान्यात, सिलिकॅानवर निरनिराळ्या प्रक्रिया करून चिप्स तयार केल्या जातील. या प्रक्रियांना पॅकेजिंग, असेम्बलिंग आणि टेस्टिंग अशी नावे आहेत. थोडक्यात असे की, यात कच्या मालापासून वस्तू तयार होणार आहेत. ही निर्मितिप्रक्रिया सुटे भाग आयात करून भारतात फक्त जोडणी करण्यापुरती मर्यादित असणार नाही.
टाटा समूह सॉफ्टवेअरच्या बाबतीत सध्याच आघाडीवर आहे. आता तो हार्डवेअरमध्येही आपले आपले पाय रोवण्याच्या आकांक्षेने उतरतो आहे. आपण सॅाफ्टवेअरमध्ये बऱ्यापैकी स्थान राखून आहोत पण हार्डवेअर क्षेत्रात तेवढेच कच्चे आहोत. या क्षेत्रात वर्ष संपण्याअगोदरच टाटांचा कारखाना संकल्पानुसार सुरू झाला तर ती त्यांच्याइतकीच संपूर्ण देशासाठीही अभिमानाची बाब असेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment