Monday, March 28, 2022

निर्वासितांमधले आपले तुपले तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक३०/०३/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. निर्वासितांमधले आपले तुपले वसंत गणेश काणे, बीएस्सी,एमए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? पाश्चात्य लोक इतरांना मानवतेवर व्याख्याने देत असतात. पण ते स्वत: सध्या उद्भवलेल्या युक्रेन हल्ला प्रकरणी मात्र वंश, वर्ण, देश, धर्म बघूनच कसे वागायचे ते ठरवत आहेत, हे पाहिले की, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, हे जाणवते. युद्ध झाले, दुष्काळ पडला, एखादी नैसर्गिक आपत्ती आली की लोक निर्वासित होतात, त्यांना स्थलांतर करावे लागते. सध्या येमेन, अफगाणिस्तान आणि सीरियामधून असे हजारो निर्वासित जगातील निरनिराळ्या देशात स्थलांतरित झाले आहेत. त्यापैकी अनेकांनी युक्रेनमध्ये आश्रय घेतला होता. पण त्यांच्यावर आणि आश्रय देणाऱ्या युक्रेन देशातील लोकांवरही दुसऱ्या देशात आश्रय घेण्याची वेळ यावी हा नियतीचा क्रूर विनोदच म्हटला पाहिजे. पुन्हा पुन्हा निर्वासित अमेरिकेतील वॅाशिंगटन पोस्ट सारख्या दैनिकांमध्ये आलेली या बाबतची वृत्ते प्रातिनिधिक मानली पाहिजेत. येमेनमधील अहमद नावाचा तरूण (प्रत्यक्षातले नाव वेगळेही असू शकेल), वाटेत लागलेले देश वगळून युक्रेनमधील खारकिव येथे स्थायिक झाला होता. कारण युक्रेन हा देश सुसंस्कृत, संपन्न आणि सुरक्षित देश आहे, असे तो ऐकून होता. पण या तरुणाला आणि याच्या सारख्या इतर अनेकांना आता पुन्हा एकदा निर्वासित होऊन एखाद्या दुसऱ्या सुरक्षित देशात आसरा घेण्याची वेळ आली आहे. तोफांचा भडिमार आणि बंदुकीच्या अखंड फैरीतून जीव मुठीत धरून तो कसाबसा वाट काढीत अशांत पूर्व युक्रेमनधून सध्या काहीशा शांत असलेल्या पश्चिम युक्रेनच्या दिशेने निघाला. अहमद हा तसा एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी होता. एका आदर्श शहराबाबतच्या त्याच्या ज्या अपेक्षा होत्या त्यातल्या बऱ्याच अपेक्षा खारकिव शहर पूर्ण करीत होते. तिथे त्याने अल्पावधीतच बऱ्यापैकी माया जमवली होती. ती मागे टाकून तो आता दूर सुरक्षित ठिकाणी जायला निघाला होता. असा हा त्याच्यावर ओढवलेला दुसरा प्रसंग होता. अगोदर येमेन सोडतांना त्याला नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडावे लागले होते. खारकिवमध्ये आपल्यावर अशी वेळ पुन्हा येणार नाही असे त्याला वाटले होते. पण आता युक्रेनही सोडून युरोपातल्या दुसऱ्या एखाद्या देशात आश्रय घेणे त्याला भाग पडले होते. असे अहमद सारखे एकूण निदान 25 लाख लोक युक्रेनमधून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशातील हजारो लोक सुरक्षित आसरा शोधत बाहेर पडले होते. देशोधडीला लागलेल्या यावेळच्या लोकांचा हा लोंढा मात्र अतिवेगवान लोंढा ठरतो आहे. अहमदला पायपीट करीत पोलिश सीमेपर्यंत यायला तीन दिवस लागले होते. त्याने येमेनमधल्या आपल्या आईवडलांशी संपर्क साधला. मी एका फाईव्ह स्टार हॅाटेलमध्ये खुशाल आहे, असे अहमदने त्यांना सांगितले आणि मग तो स्वत:शीच विषण्णपणे हसला. संगणक मासुमा अशीच दुसरी एक व्यक्ती एक महिला आहे, मासुमा ताजिक (खरे नाव वेगळे असू शकेल) ही संगणक तज्ज्ञ आहे. . ती अफगाणिस्तानमधून कीव या युक्रेनच्या राजधानीत येऊन विसावली होती. तालिबान्यांनी काबूल काबीज करताच ती कशीबशी निसटून युक्रेनमध्ये आली होती. आता तिच्याही नशिबी दुसऱ्यांदा जीव मुठीत धरून पळणे आले आहे. पाठीवर घ्यायच्या बॅगमध्ये (बॅकपॅक) काही कपडे आणि तिची एक अति मौल्यावान वस्तू होती. कोणती होती ती वस्तू? तो होता तिचा लॅपटॅाप! लॅपटॅाप हा तिचा खराखुरा आणि सच्चा साथीदार होता. इतर अनेकांनी खरेपणा आणि सच्चेपणा हे दोन निकष पूर्ण केले नव्हते. यावरून काय ते समजावे. काबूलपासून हा लॅपटॅाप तिची साथ करीत होता. ‘मी कीवला आले आणि आता मुक्त वातावरणात श्वास घेऊ शकेन असे मला वाटले. पण आता कळतंय की, जीवनात कशाचीच हमी नसते. येईल तो दिवस चांगला मानून साजरा करायचा, एवढेच आपल्या हाती आहे. जगातून निरनिराळ्या अडकाठ्या आणि अडथळे दूर करता आले तर माझ्यासारख्या आश्रयाच्या शोधात असणाऱ्यांना मोलाची मदत मिळेल. अगोदर काबूलमधून आणि आता कीवमधून मी माझ्या मित्रपरिवाराला सोडून आले आणि आता मला त्यांच्याही सुरक्षेबाबत काळजी वाटते आहे. कारण हे ते होते की, जेव्हा मी घरदार सोडून रस्त्यावर आले होते, तेव्हा त्यांनी मला आसरा दिला होता. पण त्यामुळेच त्यांच्यासमोरही आता काय वाढून ठेवले असेल कुणास ठावूक?’, मासुमा स्वत:शीच पुटपुटत होती. बिन नावाचा चिमुकला आणखी एक 11 वर्षांचा मुलगा सीरियातून आपल्या कुटुंबियांसह युक्रेनमध्ये आला होता. तो आता निघाला होता, स्लोव्हाकियाच्या दिशेने. एकटाच. तेही पायी. त्याच्या हातावर फोन नंबर टिकाऊ शाईने नोंदवला होता. हा नंबर स्लोव्हाकियातील त्याच्या नातेवाईकाचा होता. फेसबुकवर सीरियनांचा एक गट सक्रिय आहे. त्यांना उद्देशून एक आवाहनवजा विनंती करण्यात आली होती की, ‘कृपया या मुलाला युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी मदत करा, आसरा द्या, स्लोव्हाकियाला कसे जायचे याबाबत मार्गदर्शन करा’. सीरियामध्येही रशियानेच हल्ले केले होते. यावेळी रशिया होता सीरियाच्या अध्यक्षांच्या बाजूने. बसर-अल-असाद यांना अभय देण्यासाठी रशियाने कंबर कसली होती, तीही अमेरिकेच्या विरुद्धच! अमेरिकेला भ्रष्टाचारी बसर-अल-असाद ऐवजी एखादा बंडखोर सज्जन राजकारणी सत्तेवर आणायचा होता, तर याच कारणासाठी रशियाला विद्यमान अध्यक्षच सत्तेवर असावा, असे वाटत होते. खुद्द सीरियात कुणाला काय हवे होते, हे विचारायला कुणालाच सवड नव्हती. यावर टिप्पणी करायलाच हवी का? अहमद येमेनमधून बाहेर पडला खरा पण येमेनची गोष्ट वेगळी होती. तो सांगत होता, ‘तिथे आम्ही सगळे कुटुंबीय निदान एकत्र तरी होतो. अशावेळी मेलो काय किंवा जगलो काय याची तमा नसते. पण इथे युक्रेनमध्ये स्थिती वेगळी होती. ओळखीचे असे कमी होते. काय करावे याचा निर्णय घेणे कठीण झाले होते’. पण येमेनी नागरिकांची युक्रेनमधली संख्या अगदीच कमी नव्हती. संघर्ष सुरू होताच त्यांनी क्राऊड फंडिंग सुरू केले. निधी उभारण्याच्या या प्रक्रियेत सामान्य लोकच थोडे थोडे पैसे जमा करतात. तेही इंटरनेटची मदत घेऊन. संगीतकार, सिनेकलाकार आणि असेच इतर अन्य कलाकार यांनी हा निधी गोळा केला होता. अहमद रेल्वेने जर्मनीला जायला निघाला. येमेनहून युक्रेनला आल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला होता. आता पलायन संपेल. जीवनात स्थैर्य येईल, असे वाटले होते. पण कसलं काय? इथूनही पुन्हा पलायनाची वेळ आली आहे. जर्मनीत नातेवाईक आहेत. त्यांची बहुदा भेट होईल आणि पुन्हा एकदा अभ्यास सुरू करता येईल, असे त्याला वाटते आहे. अरब अहमद, आफ्रिकन अहमद आणि आशियन अहमद अहमद हा एकटा नाही. असे अनेक अहमद आहेत. कुणी अरब आहेत, कुणी आफ्रिकन आहेत, तर कुणी दक्षिण आशियातले आहेत. पण यापैकी प्रत्येकाशी निरनिराळ्या युरोपीयन देशात होणारा व्यवहार वेगवेगळा असतो. जे गोरे नाहीत आणि युक्रेनीयन नाहीत त्यांच्या वाट्याला येणारा व्यवहार भेदभावपूर्ण असतो. काही खाजगी बस वाहक तर त्यांना बसमध्ये शिरूच देत नाहीत. अगदी सीमेवर सुद्धा, सैनिक म्हणजे जे अधिकृत कर्मचारी आहेत, तेही त्यांना परत युक्रेनमध्ये ढकलत आणि त्यांच्याऐवजी युक्रेनियनांना आत घेतांना दिसत असत. मानवता वगैरे मुद्दे भाषणे देतांना, चर्चेसाठी विषय निवडतांना, लेख लिहितांना छान वाटतात. व्यवहारात मात्र वंशभेदाला, रंगभेदाला, धर्मभेदाला विसरणे कठीण जाते, हेच कटू सत्य आहे. अहमद दरकोस दरमजल करीत पोलटावाला पोचला होता. तिथून पश्चिमेकडे येण्यासाठी रेल्वेच्या खचाखच भरलेल्या डब्यात तो कसाबसा शिरला. हा प्रवास आटोपताच पुन्हा 15 तासांचा दरकोस दरमजल प्रवास सुरू झाला. वाटेत भेटणारे आणि सोबत चालणारे सर्वच लोक एकमेकांच्या ना ओळखीचे ना पाळखीचे. पण ते मात्र एकमेकांना मदत करीत होते. समदु:खी म्हणून. हा एक सुखद अनुभव होता. हे झाले मनाचे. पण शरीराचे काय? चालून चालून अहमदच्या पायात संवेदनाच उरली नव्हती. पायांच्या हालचाली यांत्रिक स्वरुपाच्या होत चालल्या होत्या. एक जाणीव मात्र कायम जागृत होती. ती होती भीतीची. 2015 आणि 2016 मध्येही सीरियातून निर्वासितांचे लोंढे युरोपात आले होते. आता 2022 मध्ये युक्रेनियनांचा लोंढा युरोपात येतो आहे. येणाऱ्या निर्वासितांची व्यवस्था करण्याची ‘कला’ युरोपला आता चांगलीच अवगत झाली आहे. युरोपमधल्या 27 देशांनी यांना 3 वर्षे तात्पुरते रहाण्याची तजवीज करूनच ठेवली आहे. नंतरचं ज्याचं त्यानं पहाव! यापूर्वी अशी व्यवस्था नसल्यामुळे आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून येणाऱ्या निर्वासितांना तर त्रिशंकू अवस्थेतच रहावे लागायचे. कारण ते ‘ब्लॅक’ किंवा ‘ब्राऊन’ होते ना! गोऱ्यांच वेगळं होतं. ते एकमेकात सहज मिसळून जायचे. शेवटी अहमद एकदाचा सीमा ओलांडून पोलंडला पोचला. त्याच्यासोबत त्याचा इराकी मित्रही होता. त्यामुळेच पोलंडमधल्या इराकी कुटुंबाने त्यांना आसरा दिला. युक्रेनच्या उध्वस्तांच्या कथा आता त्याच्यासाठी मागे पडल्या आहेत। अहमदने आईवडलांना पूर्वीप्रमाणेच फोन करून कळविले आहे की, तो आनंदात आहे. हे मात्र मनापासून होते.

Monday, March 21, 2022

जीव लहान पण… वसंत गणेश काणे भारताने ॲापरेशन विजय योजून गोवा, दमण आणि दीव या भूभावरील पोर्च्युगीज अंमल संपविल्यानंतर 19 डिसेंबर 1961 नंतर या भागात भारतीय राज्यघटनेला अनुसरून जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर नियमितपणे निवडणुका घेतल्या जात आहेत. गोवा विधान सभेत 40 सदस्य आहेत तर उत्तर आणि दक्षिण गोवा मतदार संघातून प्रत्येकी एकेक प्रतिनिधी लोकसभेवर निवडून जात असतो. गोव्यात 2022 मध्ये चुरशीची लढत झाली खरी. मतदान 79.61% इतके झाले पण 2017 मध्ये ही टक्केवारी 82.56 इतकी होती. म्हणजे 2.95 टक्के कमी मतदान झाले. गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यांत 5 लक्ष 40 हजार 785 मतदारांपैकी 4 लक्ष, 58 हजार 74 तर दक्षिण गोवा जिल्ह्यात 5 लक्ष 70 हजार 907 मतदारांपैकी 4 लक्ष,59 हजार 758 मतदारांनी मतदान केले. म्हणजे एकूण 11लक्ष, 11हजार, 692 मतदारांपैकी 9 लक्ष, 17 हजार, 832 मतदारंनी मतदान केले. नोटाचा वापर 10,629 मतदारांनी म्हणजे 1.1% मतदारांनी केला. गोव्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत जरी नाही, तरी 40 पैका 20 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे 20 + अपक्ष 3 + मगोपचे 2 = 25 असे भाजप आणि मित्र यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकार निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. हा भाजपने सतत तिसऱ्यांदा म्हणजे 2012, 2017 आणि 2022 असा विजय मिळविला आहे. कॅांग्रेसला 11, आपला 2, तृणमूल कॅांग्रेस आणि परिवर्तनाची ग्वाही देणाऱ्या गोव्यातील सर्वात जुन्या प्रादेशिक पक्षाला म्हणजेच महाराष्ट्रवादी गोमांतक दल (मगोप) यांच्या युतीला 2, गोवा फॅार्वर्ड पक्ष (जीएफ पी) आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीला (आरजीपी) प्रत्येकी एकेक आणि तीन अपक्ष असा 40 जागांचा हिशोब लागतो. राष्ट्रवादी कॅांग्रेस (एनसीपी) आणि शिवसेना यांना 2027 ची वाट पहावी लागणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या जागा 7 ने वाढून 20 झाल्या तर कॅांग्रेसच्या जागा 6 कमी होऊन 11 झाल्या. कुणी किती जागा जिंकल्या? किती जागी दुसऱ्या क्रमांकावर? 1)भाजप 20 जागी विजय, 14 जागी दुसरा क्रमांक. 2) कॅांग्रेस 11 जागी विजय, 9 जागी दुसरा क्रमांक. 3) मगोप 2 जागी विजय, 4 जागी दुसरा क्रमांक. 4) अपक्ष 3 जागी विजय, 4 जागी दुसरा क्रमांक. 5) आरजीपी 1 जागी विजय, 2 जागी दुसरा क्रमांक. 6) जीएफपी 1 जागी विजय, 1 जागी दुसरा क्रमांक. 7) आप 2 जागी विजय, 2 जागी दुसरा क्रमांक. 8) तृणमूल 0 जागी विजय, 4 जागी दुसरा क्रमांक. यावरून असे म्हणता येईल की मतदारांवर भाजपची पकड सर्वात जास्त आहे. जिल्हानिहाय निकाल अ) उत्तर गोव्यात 23 जागा असून त्यात भाजपला 13, कॅांग्रेसला 6 आपला शून्य, तृणमूल व मगोप 2 आणि अन्य 2 अशी 23 जागांची विभागणी आहे. ब) दक्षिण गोव्यात 17 जागा असून त्यात भाजपला 7, कॅांग्रेसला 6, आपला 2, तृणमूल व मगोपला शून्य आणि अन्य 2 अशी 17 जागांची विभागणी आहे. सांकळी मतदार संघातून विद्यमान नेते डॅा प्रमोद सावंत यांनी 12,250 मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेश सगलानी यांचा 666 मतांनी पराभव केला आहे. गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांवर ज्येष्ठांनी टाकलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. गोव्यात अमित शहांनी घररोघर प्रचार केला होती, तर मोदींचे मापुसा येथील भाषण कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करणारे ठरले. भाजपचे संख्याबळ मनोहर पर्रिकर असतांना 2012 मध्ये 21, 2017 मध्ये गोव्याऐवजी पर्रिकर केंद्रात संरक्षण मंत्री असतांना 13, तर 2022 मध्ये पर्रिकरांच्या अनुपस्थितीत 20 असा हिशोब आहे. कॅांग्रेसचे संख्याबळ 2012 मध्ये 9 , 2017 मध्ये 17 , तर 2022 मध्ये 11 असा हिशोब आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला 2022 मध्ये एकही जागा मिळाली नाही. 2017 मध्ये राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर पित्याच्या मतदार संघासाठी म्हणजे पणजीसाठी अडून बसले होते. पणजी वगळून इतर दोन मतदार संघांपैकी कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढवा अशी त्यांना मोकळीक दिली होती. पण स्वत:ला पर्रिकरांचा खराखुरा वारस म्हणून घोषित करीत त्यांनी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यांना शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण त्यांना वारसा सिद्ध करता आला नाही. पणजी मतदार संघात बाबुश मोन्सेरात हे विद्यमान आमदार होते. त्यांच्या अगोदर ह्या जागी मनोहर 1994 पासून पर्रिकर निवडून येत असत. अत्यंत चुरशीच्या लढतीत बाबुश मोन्सेरात यांना 6,787, उत्पल पर्रिकरांना 6, 071 आणि कॅांग्रेसच्या एलिस गोम्स यांना 3,175 मते मिळून उत्पल पर्रिकरांना 716 मतांनी पराभव पत्करावा लागला. बाबुश मोन्सेरात हे विद्यमान भाजप आमदार आणि पूर्वाश्रमीचे कॅांग्रेस आमदार होते. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी पर्रिकरांसाठी काम केले असा बाबुशा मोन्सेरात यांनी आरोप केला. ‘मी जणू भाजप आणि कॅांग्रेस या दोन्ही पक्षांचा अनधिकृत उमेदवार म्हणूनच लढलो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी निकालानंतर दिली. 2017 मध्ये भाजपला 13 तर कॅांग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. पण अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमातक दल यांच्या पाठिंब्याने भाजपने गोव्यात सरकार स्थान केले. पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ, अशी पाठिंबा देणाऱ्यांची अट होती. ती भाजपने पूर्ण केली. पर्रिकर संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्याचे मुख्य मंत्री झाले. त्यांच्या नंतर डॅा प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. कॅांग्रेसच्या १२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला व भाजपचे संख्याबळ 27 झाले. निवडणुकीपूर्वी 9 आमदारांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये 18 च आमदार उरले होते. 2022 च्या निवडणुकीत भाजपचे 20 आमदार निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे लहानपणापासूनचे संघाचे स्वयंसेवक आहेत. ते गोवा विधान सभेचे सर्वात तरूण अध्यक्ष राहिलेले आहेत. 2008 मध्ये त्यांना केलेल्या सूचनेला अनुसरून ते सरकारी नोकरी सोडून भाजपचे उमेदवार म्हणून पोट निवडणुकीला उभे राहिले आणि पडले. 2012 मध्ये आणि 2017 आणि आता 2022 मध्येही ते सांकळी मतदार संघातून निवडून आले आहेत. शिवसेनेने गोवा, मणीपूर आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यात निवडणूक लढविली होती. पण कुठेही त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही आणि अनमत रक्कमही वाचली नाही. उत्तर प्रदेशात 60 जागी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 19 अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनीच बाद केले. तृणमूल, आप आणि रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी हे पक्ष कॅांग्रेसची मते खाणारे (व्होट कटवे) सिद्ध झाले. कॅांग्रेसने त्यांना भाजपची बी टीम म्हणून शिवी हासडली. श्री चिदंबरम यांनी निकालानंतर टिप्पणी केली केली की 66% जनमत भाजपच्या विरोधात होते पण ते अनेक स्पर्धकात विभाजित झाले. गेल्या 5 वर्षात इतक्या कॅांग्रेस उमेदवारांनी पक्षबदल केला आहे की, आपण ज्याला मत देतो आहोत, तो उमेदवार निवडून आल्यार कॅांग्रेस मध्येच राहील, याचा भरवसा मतदारांना वाटत नव्हता. गोव्यात कॅांग्रेसजवळ प्रभावी नेताही नव्हता. गोव्यात तीन जोडपीही निवडून आली आहेत. त्यातली दोन भाजपच्या तिकिटावर तर एक जोडपे कॅांग्रेसच्या तिकिटीवर निवडून आले. जेनिफर मॅान्सेरेट आणि देविया राणे यांनी आपापल्या यजमानांसह विजय नोंदविला. तर कॅांग्रेसच्या डेलिया लोबो यांनी कॅांग्रेसच्या तिकिटावर आपल्या यजमानांसह हा विक्रम नोंदविला. 4, ही महिला उमेदवारांची संख्या आजवरची महिला आमदारांची महत्तम संख्या आहे. ही टक्केवारी 10% इतकी आहे. दलबदलूंना मतदारांनी चांगलीच अद्दल घडविली. 12 दलबदलू आमदारांपैकी 10 कॅांग्रेसचे तर 2 अन्य होते. हे भाजपात गेले होते. त्यापैकी फक्त 3 जिंकले. 40 % मंत्र्यांचा पराभव - मनोहर आजगावकर हे महाराष्ट्रवादी गोमांतक दल (मगोप) मधून तर चंद्रकात कवळेकर हे कॅांग्रेसमधून भाजपमध्ये 2019 मध्ये आले होते. हे दोघेही हरले. फिलिप नर्वी रॅाड्रिग्ज, दीपक प्रभू पौसकर आणि मिलिंद नाईक हे मंत्रीही पराभूत झाले. टक्केवारी व एकूण मते 1) अ भाजपची मतांची टक्केवारी 0.8 ने वाढून 32.5 वरून 33.3 पर्यंत (प्रत्यक्ष मते 3 लक्ष, 16 हजार, 573) वाढली. 1) ब कॅांग्रेसची टक्केवारी 28.5 वरून 23.5 पर्यंत (प्रत्यक्ष मते 2 लक्ष, 22 हजार, 948) घसरली. 2) आपची मतांची टक्केवारी 0.5 ने वाढून 6.8 पर्यंत (प्रत्यक्ष मते 64 हजार, 354) वाढली. 3) तृणमूल - 2022 मध्ये तृणमूलची मतांची टक्केवारी 5.2% (प्रत्यक्ष मते 49 हजार 480) इतकी आहे. (2017 मध्ये निडणूक लढविली नव्हती). 4) गोवा फॅारवर्ड पार्टी - टक्केवारी - 1.8 %, एकूण मते 17,477 5) महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी - टक्केवारी 7.6 % एकूण मते 72, 269 6) राष्ट्रवादी पक्ष - टक्केवारी 1.1 %, एकूण मते 10, 86 7) शिवसेना - टक्केवारी 0.2 %, एकूण मते 1,726 8) रिव्होल्युशनरी गोवन पार्टी - 9.45% एकूण मते 93,255 9) नोटा - 1.1% , एकूण मते 10, 629 कॅांग्रेसने आप (6.8%), तृणमूल (5.2%), रेव्होल्युशनरी गोवन पार्टी (9.45%) यांच्यावर व्होट कटवे म्हणून टीका केली. यांनी मिळून 21.45% मते कुजविली आणि त्यामुळे भाजपचा विजय झाला, असे म्हटले आहे. स्ट्राईक रेट- किती जागा लढवल्या आणि किती जिंकल्या याला स्ट्राईक रेट म्हणतात. भाजप 20/40 (50%) , कॅांग्रेस 11/37 (29.7%), आप 2/39 (5.1%) तृणमूल 0/26 (0%) मोठ्या फरकाने जिंकणारे उमेदवार भाजपच्या देविया विश्वजित राणे पोरियम मतदारसंघातून 17,816 मते मिळवून 13,943 च्या फरकाने निवडून आल्या मगोपचे सुदिन ढवळीकर मारकेम मतदारसंघातून 17,816 मते मिळवून 9963 च्या फरकाने भाजपच्या संदेश भिंगी यांच्या विरोधात निवडून आले गोव्यातील जोडपी भाजप नेते आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे वाळपई विधानसभा मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी देवीया यांनी पर्येम मतदारसंघातून भाजपच्याच तिकिटावर निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, पर्ये या जागेचे प्रतिनिधित्व सध्या त्यांचे सासरे प्रतापसिंह राणे काँग्रेसच्या तिकिटावर करत आहेत. या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रतापसिंह राणे यांना तिकीट दिले आहे. मात्र, त्यांनी माघार घेतली आहे. भाजपने पणजी विधानसभा मतदारसंघातून अतानासिओ मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर या ताळगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे त्यांच्या पारंपारिक केपे या मतदारसंघातून निवडणूक हरले. पत्नी सावित्री यांना पक्षाने सांगेम विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले आहे. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली पण त्यांना यश मिळाले नाही. तृणमूल कॅांग्रेसने किरण कांडोला यांना अल्डोना मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी कविता यांना टिविम मतदारसंघातून तिकिट दिले होते. पण हे दोघेही पडले. किरण कंडोला यांना तिसऱ्या क्रमांकाची मतेही मिळाली नाहीत. पण सावित्री निदान दुसऱ्या क्रमांकावर तरी होत्या. प्रमोद सावंत मंत्रिमंडळातील एक मंत्री मायकेल लोबो हे कलांगुटे मतदार संघातून कॅांग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले आणि पडले. त्यांच्या पत्नी डेलिया लोबो मात्र सिओलिम मतदारसंघातून कॅांग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या ही सगळी जोडपी निवडून आली असती तर 40 पैकी 10 दहा मतदार संघ म्हणजे 40 % मतदार संघ या पाचच जोडप्यांनी आपल्या हाती ठेवले, असे झाले असते. प्रत्यक्षात दोन जोडपी आणि एकाची पत्नी डेलिया लोबो निवडून आल्याचे दिसते आहे. अटी तटीच्या लढती अ) 100 पेक्षा कमी फरकाने जिकलेल्या जागा 1) आंद्रे मतदार संघ आरजीपीचे वीरेश बोरकर यांनी भाजपच्या फ्रॅन्सिसको सिल्हेरिया यांचा 76 मतांनी पराभव केला. (5395 - 5319 = 76) 2) पोंडा मतदार संघ भाजपचे रवि नाईक यांनी मगोपच्या केतन भाटीकर यांचा 77 मतांनी पराभव केला (7514- 7437 = 77) ब) 500 पेक्षा कमी फरकाने जिंकलेल्या जागा 1) बिचोलिम मतदार संघात अपक्ष डॅा चंद्रकांत शेटे यांनी मगोपच्या नरेश सावळ यांचा 318 मतांनी पराभव केला.( 9608- 9290 = 318) 2) प्रियोळ मतदारसंघात भाजपच्या गोविंद गौडे यांनी मगोपच्या दीपक ढवळीकर यांचा 213 मतांनी पराभव केला. ( 11019 - 10806 = 213) 3) नवेलिन मतदारसंघात भाजपच्या उल्हास तुएनकर यांनी तृणमूल कॅांग्रेसच्या वलंका आलेमाओ यांचा 430 मतांनी पराभव केला. (5168- 4738= 430) 4) वेलिम मतदारसंघात आपचे क्रुझ सिल्हा यांनी कॅांग्रेसच्या सॅव्हिओ डिसिल्हा यांचा 169 मतांनी पराभव केला ( 5390- 5221 = 169) युती - लढवलेल्या जागा आणि त्यातील महिला उमेदवार 1)अ- भाजपची कोणत्याही पक्षाशी युती नव्हती. 40 पैकी 3 महिला ब-आपची कोणत्याही पक्षाशी युती नव्हती. 39 पैकी 3 महिला 2) (युपीए)कॅांग्रेस आणि गोवा फॅारवर्ड पारटीची युती होती. कॅांग्रेस 37 पैकी 2 महिला आणि जीएफपी 3 पैकी 0 महिला 3) तृणमूल कॅांग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी यांची युती होती. तृणमूल 26 पैकी 4 महिला आणि मगोप 13 पैकी 0 महिला 4) राष्ट्रवादी कॅांग्रेस आणि शिवसेना यांची युती होती. राष्ट्रवादी 13 पैकी 0 महिला आणि आणि शिवसेना 8 पैकी 2 महिला 5) रिव्होल्युशनरीगोअन्स पार्टी आणि गोवेंचो स्वाभीमानी पार्टी यांची युती होती. आरपी 38 पैकी 2 महिला आणि गोवेंचो स्वाभीमानी 4 पैकी 1 महिला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार / प्रमुख उमेदवार, विजय/ पराजय भाजप -प्रमोद सावंत - विजयी कॅांग्रेस - दिगंबर कामत - विजयी गोवा फॅारवर्ड पार्टी - विजय सरदेसाई - विजयी आमआदमी पार्टी - अमित पालेकर - पराभूत तृणमूल - माहुआ मोइत्रा (महिला) - (प्रभारी) खासदार बंगाल महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी - सुदिन ढवळीकर - विजयी राष्ट्रवादी कॅांग्रेस - ज्योस फिलिप डिसूझा -पराभूत शिवसेना - जितेष कामत - पराभूत प्रचार - भाजप - संकल्प पेटी फिरवून अपेक्षा जाणून घेतल्या. कॅांग्रेस - न्याय योजना प्रत्येक गावातील सर्वात गरिबाला वार्षिक 72 हजाराची मदत, पेट्रोल 82 रु लिटर, प्रदूषण होणार नाही अशाप्रकारे खाणकामाला प्रारंभ, महिलांना सरकारी नोकरीत 30% आरक्षण, गोवा कोळशाचीच बाजारपेठ होऊ देणार नाही, स्थानिकांसाठी जमीनहक्क कायदा आणणार. आप - कुटुंबातील एकाला नोकरी, ती मिळेपर्यंत दरमहा 3000, 80% नोकऱ्या स्थानिकांसाठी, 5000 रु महिना कोविडमुळे पर्यटन बंद झाल्यामुळे नोकरी गमावलेल्यांसाठी, 5000 महिना खाणबंदीमुळे नोकरी गमावलेल्यांसाठी, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, आरोग्य योजनेत सुधारणा, सर्वांना नि:शुल्क आणि उच्च दर्जाचे शिक्षण, पहिल्यांदाच भ्रष्टाचारमुक्त शासन देणार. तृणमूल कॅांग्रेस - गृहलक्ष्मी कार्ड योजना - कुटुंबातील एका महिलेला 5000 रु महिना, कोविड बाधितांसाठी अंदाजपत्रकात 6 ते 8 % तरतूद, युवा शक्ती कार्ड - 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना 20 लाखांपर्यंत 4% दराने कर्ज शिक्षण, कौशल्यविकास, व्यवसाय सुरू करणे यासाठी, राहण्यासाठी घर नसलेल्यांसाठी माझे घर मालकी हक्क योजनेनुसार 50 हजार लोकासाठी अनुदान योजना, वाहन मित्र योजना टॅक्सी ड्रायव्हरसाठी 10 ते 30 हजाराचे अनुदान विश्वजित राणे की मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रमोद सावंत ? अफवांना ऊत गोव्यात भाजपला सर्वात जास्त म्हणजे 20 जागा मिळाल्या आहेत हे खरे असले तरी बहुमतासाठी किमान 21 जागा आवश्यक आहेत, हे विसरता यायचे नाही. विश्वजित राणे हे 2017 मध्ये कॅांग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. आपण मुख्यमंत्री व्हावे, अशी त्यांची इच्छा आणि हालचाली आहेत, असे दिसते. केंद्रातील काही नेतेही त्यांना अनुकूल आहेत, असेही बोलले जाते. पहिले असे की, मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 9 मार्चला राणे यांनी एक विमानातला फोटो ट्विटरवर टाकला होता. त्यात राणे आणि कॅांग्रेसचे नेते डिके शिवकुमार आणि अन्य एकत्र दिसत होते. पण लवकरच तो काढून टाकण्यात आला. दुसरे म्हणजे, 12 मार्चलाराणे हे राजपाल श्रीधरन पिल्लई यांना जाऊन भेटले. हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘तुम्ही मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत अहात का?’, असा प्रश्न विचारला असता, ‘बघू या’, असे ते म्हणाले. तिसरे असे की, सोमवारी 11 तारखेला नरेंद्रसिंग तोमर आणि एल मुरुगन हे निरीक्षक गोव्यात आले. त्या दिवशीच्या वृत्तपत्रात राणे यांनी मतदारांचे आभार मानणारी पानभर जाहिरात लोकमतमध्ये छापली होती. त्यात प्रमोद सावंत यांचा अपवाद वगळता राज्य आणि केंद्रस्तरावरच्या नेत्यांचे फोटो होते. प्रमोद सावंत यांनी आजवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण प्रमोद सावंत यांच्या गटाचे म्हणणे असे आहे की, ‘प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असे जाहीर करून आम्ही एका यशस्वी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकली असतांना दुसऱ्या कुणाचा विचार होईलच कसा?’. अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा असेल. गोव्याला पुढील पाच वर्षे स्थिर आणि चांगले प्रशासन द्यायचे आहे. त्यामुळे तो जाहीर होईतो वाट पहा असे भाजपचे गोव्याचे प्रवक्ते (डेस्क- इन-चार्ज) सीटी रवि यांनी सांगितले आहे. शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे कारण हेही आहे की, 10 ते 17 मार्च पर्यंत शुभ मुहूर्त नाहीत. त्यामुळे शपथग्रहण समारंभ त्या नंतरच होणार.
(गोवा जीव लहान पण…) तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक२२/०३/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. (गोवा जीव लहान पण…) वसंत गणेश काणे, बीएस्सी,एमए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? भारताने ॲापरेशन विजय योजून गोवा, दमण आणि दीव या भूभावरील पोर्च्युगीज अंमल संपविल्यानंतर 19 डिसेंबर 1961 नंतर या भागात भारतीय राज्यघटनेला अनुसरून जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर नियमितपणे निवडणुका घेतल्या जात आहेत. गोवा विधान सभेत 40 सदस्य आहेत तर उत्तर आणि दक्षिण गोवा मतदार संघातून प्रत्येकी एकेक प्रतिनिधी लोकसभेवर निवडून जात असतो. गोव्यात 2022 मध्ये चुरशीची लढत झाली खरी. मतदान 79.61% इतके झाले पण 2017 मध्ये ही टक्केवारी 82.56 इतकी होती. म्हणजे 2.95 टक्के कमी मतदान झाले. गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यांत 5 लक्ष 40 हजार 785 मतदारांपैकी 4 लक्ष, 58 हजार 74 तर दक्षिण गोवा जिल्ह्यात 5 लक्ष 70 हजार 907 मतदारांपैकी 4 लक्ष,59 हजार 758 मतदारांनी मतदान केले. म्हणजे एकूण 11लक्ष, 11हजार, 692 मतदारांपैकी 9 लक्ष, 17 हजार, 832 मतदारंनी मतदान केले. नोटाचा वापर 10,629 मतदारांनी म्हणजे 1.1% मतदारांनी केला. गोव्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत जरी नाही, तरी 40 पैका 20 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे 20 + अपक्ष 3 + मगोपचे 2 = 25 असे भाजप आणि मित्र यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकार निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. हा भाजपने सतत तिसऱ्यांदा म्हणजे 2012, 2017 आणि 2022 असा विजय मिळविला आहे. कॅांग्रेसला 11, आपला 2, तृणमूल कॅांग्रेस आणि परिवर्तनाची ग्वाही देणाऱ्या गोव्यातील सर्वात जुन्या प्रादेशिक पक्षाला म्हणजेच महाराष्ट्रवादी गोमांतक दल (मगोप) यांच्या युतीला 2, गोवा फॅार्वर्ड पक्ष (जीएफ पी) आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीला (आरजीपी) प्रत्येकी एकेक आणि तीन अपक्ष असा 40 जागांचा हिशोब लागतो. राष्ट्रवादी कॅांग्रेस (एनसीपी) आणि शिवसेना यांना 2027 ची वाट पहावी लागणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या जागा 7 ने वाढून 20 झाल्या तर कॅांग्रेसच्या जागा 6 कमी होऊन 11 झाल्या. कुणी किती जागा जिंकल्या? किती जागी दुसऱ्या क्रमांकावर? 1)भाजप 20 जागी विजय, 14 जागी दुसरा क्रमांक. 2) कॅांग्रेस 11 जागी विजय, 9 जागी दुसरा क्रमांक. 3) मगोप 2 जागी विजय, 4 जागी दुसरा क्रमांक. 4) अपक्ष 3 जागी विजय, 4 जागी दुसरा क्रमांक. 5) आरजीपी 1 जागी विजय, 2 जागी दुसरा क्रमांक. 6) जीएफपी 1 जागी विजय, 1 जागी दुसरा क्रमांक. 7) आप 2 जागी विजय, 2 जागी दुसरा क्रमांक. 8) तृणमूल 0 जागी विजय, 4 जागी दुसरा क्रमांक. यावरून असे म्हणता येईल की मतदारांवर भाजपची पकड सर्वात जास्त आहे. जिल्हानिहाय निकाल अ) उत्तर गोव्यात 23 जागा असून त्यात भाजपला 13, कॅांग्रेसला 6 आपला शून्य, तृणमूल व मगोप 2 आणि अन्य 2 अशी 23 जागांची विभागणी आहे. ब) दक्षिण गोव्यात 17 जागा असून त्यात भाजपला 7, कॅांग्रेसला 6, आपला 2, तृणमूल व मगोपला शून्य आणि अन्य 2 अशी 17 जागांची विभागणी आहे. सांकळी मतदार संघातून विद्यमान नेते डॅा प्रमोद सावंत यांनी 12,250 मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेश सगलानी यांचा 666 मतांनी पराभव केला आहे. गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांवर ज्येष्ठांनी टाकलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. गोव्यात अमित शहांनी घररोघर प्रचार केला होती, तर मोदींचे मापुसा येथील भाषण कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करणारे ठरले. भाजपचे संख्याबळ मनोहर पर्रिकर असतांना 2012 मध्ये 21, 2017 मध्ये गोव्याऐवजी पर्रिकर केंद्रात संरक्षण मंत्री असतांना 13, तर 2022 मध्ये पर्रिकरांच्या अनुपस्थितीत 20 असा हिशोब आहे. कॅांग्रेसचे संख्याबळ 2012 मध्ये 9 , 2017 मध्ये 17 , तर 2022 मध्ये 11 असा हिशोब आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला 2022 मध्ये एकही जागा मिळाली नाही. 2017 मध्ये राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर पित्याच्या मतदार संघासाठी म्हणजे पणजीसाठी अडून बसले होते. पणजी वगळून इतर दोन मतदार संघांपैकी कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढवा अशी त्यांना मोकळीक दिली होती. पण स्वत:ला पर्रिकरांचा खराखुरा वारस म्हणून घोषित करीत त्यांनी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यांना शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण त्यांना वारसा सिद्ध करता आला नाही. पणजी मतदार संघात बाबुश मोन्सेरात हे विद्यमान आमदार होते. त्यांच्या अगोदर ह्या जागी मनोहर 1994 पासून पर्रिकर निवडून येत असत. अत्यंत चुरशीच्या लढतीत बाबुश मोन्सेरात यांना 6,787, उत्पल पर्रिकरांना 6, 071 आणि कॅांग्रेसच्या एलिस गोम्स यांना 3,175 मते मिळून उत्पल पर्रिकरांना 716 मतांनी पराभव पत्करावा लागला. बाबुश मोन्सेरात हे विद्यमान भाजप आमदार आणि पूर्वाश्रमीचे कॅांग्रेस आमदार होते. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी पर्रिकरांसाठी काम केले असा बाबुशा मोन्सेरात यांनी आरोप केला. ‘मी जणू भाजप आणि कॅांग्रेस या दोन्ही पक्षांचा अनधिकृत उमेदवार म्हणूनच लढलो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी निकालानंतर दिली. 2017 मध्ये भाजपला 13 तर कॅांग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. पण अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमातक दल यांच्या पाठिंब्याने भाजपने गोव्यात सरकार स्थान केले. पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ, अशी पाठिंबा देणाऱ्यांची अट होती. ती भाजपने पूर्ण केली. पर्रिकर संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्याचे मुख्य मंत्री झाले. त्यांच्या नंतर डॅा प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. कॅांग्रेसच्या १२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला व भाजपचे संख्याबळ 27 झाले. निवडणुकीपूर्वी 9 आमदारांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये 18 च आमदार उरले होते. 2022 च्या निवडणुकीत भाजपचे 20 आमदार निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे लहानपणापासूनचे संघाचे स्वयंसेवक आहेत. ते गोवा विधान सभेचे सर्वात तरूण अध्यक्ष राहिलेले आहेत. 2008 मध्ये त्यांना केलेल्या सूचनेला अनुसरून ते सरकारी नोकरी सोडून भाजपचे उमेदवार म्हणून पोट निवडणुकीला उभे राहिले आणि पडले. 2012 मध्ये आणि 2017 आणि आता 2022 मध्येही ते सांकळी मतदार संघातून निवडून आले आहेत. शिवसेनेने गोवा, मणीपूर आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यात निवडणूक लढविली होती. पण कुठेही त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही आणि अनमत रक्कमही वाचली नाही. उत्तर प्रदेशात 60 जागी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 19 अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनीच बाद केले. तृणमूल, आप आणि रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी हे पक्ष कॅांग्रेसची मते खाणारे (व्होट कटवे) सिद्ध झाले. कॅांग्रेसने त्यांना भाजपची बी टीम म्हणून शिवी हासडली. श्री चिदंबरम यांनी निकालानंतर टिप्पणी केली केली की 66% जनमत भाजपच्या विरोधात होते पण ते अनेक स्पर्धकात विभाजित झाले. गेल्या 5 वर्षात इतक्या कॅांग्रेस उमेदवारांनी पक्षबदल केला आहे की, आपण ज्याला मत देतो आहोत, तो उमेदवार निवडून आल्यार कॅांग्रेस मध्येच राहील, याचा भरवसा मतदारांना वाटत नव्हता. गोव्यात कॅांग्रेसजवळ प्रभावी नेताही नव्हता. गोव्यात तीन जोडपीही निवडून आली आहेत. त्यातली दोन भाजपच्या तिकिटावर तर एक जोडपे कॅांग्रेसच्या तिकिटीवर निवडून आले. जेनिफर मॅान्सेरेट आणि देविया राणे यांनी आपापल्या यजमानांसह विजय नोंदविला. तर कॅांग्रेसच्या डेलिया लोबो यांनी कॅांग्रेसच्या तिकिटावर आपल्या यजमानांसह हा विक्रम नोंदविला. 4, ही महिला उमेदवारांची संख्या आजवरची महिला आमदारांची महत्तम संख्या आहे. ही टक्केवारी 10% इतकी आहे. दलबदलूंना मतदारांनी चांगलीच अद्दल घडविली. 12 दलबदलू आमदारांपैकी 10 कॅांग्रेसचे तर 2 अन्य होते. हे भाजपात गेले होते. त्यापैकी फक्त 3 जिंकले. 40 % मंत्र्यांचा पराभव - मनोहर आजगावकर हे महाराष्ट्रवादी गोमांतक दल (मगोप) मधून तर चंद्रकात कवळेकर हे कॅांग्रेसमधून भाजपमध्ये 2019 मध्ये आले होते. हे दोघेही हरले. फिलिप नर्वी रॅाड्रिग्ज, दीपक प्रभू पौसकर आणि मिलिंद नाईक हे मंत्रीही पराभूत झाले. मोठ्या फरकाने जिंकणारे उमेदवार भाजपच्या देविया विश्वजित राणे पोरियम मतदारसंघातून 17,816 मते मिळवून 13,943 च्या फरकाने विरोधी उमेदवाराला मात देऊन निवडून आल्या मगोपचे सुदिन ढवळीकर मारकेम मतदारसंघातून 17,816 मते मिळवून 9963 च्या फरकाने भाजपच्या संदेश भिंगी यांच्या विरोधात निवडून आले अटी तटीच्या लढती अ) 100 पेक्षा कमी फरकाने जिकलेल्या जागा 1) आंद्रे मतदार संघ आरजीपीचे वीरेश बोरकर यांनी भाजपच्या फ्रॅन्सिसको सिल्हेरिया यांचा 76 मतांनी पराभव केला. (5395 - 5319 = 76) 2) पोंडा मतदार संघ भाजपचे रवि नाईक यांनी मगोपच्या केतन भाटीकर यांचा 77 मतांनी पराभव केला (7514- 7437 = 77) ब) 500 पेक्षा कमी फरकाने जिंकलेल्या जागा 1) बिचोलिम मतदार संघात अपक्ष डॅा चंद्रकांत शेटे यांनी मगोपच्या नरेश सावळ यांचा 318 मतांनी पराभव केला.( 9608- 9290 = 318) 2) प्रियोळ मतदारसंघात भाजपच्या गोविंद गौडे यांनी मगोपच्या दीपक ढवळीकर यांचा 213 मतांनी पराभव केला. ( 11019 - 10806 = 213) 3) नवेलिन मतदारसंघात भाजपच्या उल्हास तुएनकर यांनी तृणमूल कॅांग्रेसच्या वलंका आलेमाओ यांचा 430 मतांनी पराभव केला. (5168- 4738= 430) 4) वेलिम मतदारसंघात आपचे क्रुझ सिल्हा यांनी कॅांग्रेसच्या सॅव्हिओ डिसिल्हा यांचा 169 मतांनी पराभव केला ( 5390- 5221 = 169) गोव्यातील जोडपी भाजप नेते आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे वाळपई विधानसभा मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी देवीया यांनी पर्येम मतदारसंघातून भाजपच्याच तिकिटावर निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, पर्ये या जागेचे प्रतिनिधित्व सध्या त्यांचे सासरे प्रतापसिंह राणे काँग्रेसच्या तिकिटावर करत आहेत. या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रतापसिंह राणे यांना तिकीट दिले आहे. मात्र, त्यांनी माघार घेतली आहे. भाजपने पणजी विधानसभा मतदारसंघातून अतानासिओ मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर या ताळगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे त्यांच्या पारंपारिक केपे या मतदारसंघातून निवडणूक हरले. पत्नी सावित्री यांना पक्षाने सांगेम विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले आहे. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली पण त्यांना यश मिळाले नाही. तृणमूल कॅांग्रेसने किरण कांडोला यांना अल्डोना मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी कविता यांना टिविम मतदारसंघातून तिकिट दिले होते. पण हे दोघेही पडले. किरण कंडोला यांना तिसऱ्या क्रमांकाची मतेही मिळाली नाहीत. पण सावित्री निदान दुसऱ्या क्रमांकावर तरी होत्या. प्रमोद सावंत मंत्रिमंडळातील एक मंत्री मायकेल लोबो हे कलांगुटे मतदार संघातून कॅांग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले आणि पडले. त्यांच्या पत्नी डेलिया लोबो मात्र सिओलिम मतदारसंघातून कॅांग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या ही सगळी जोडपी निवडून आली असती तर 40 पैकी 10 दहा मतदार संघ म्हणजे 25 % मतदार संघ या पाचच जोडप्यांनी आपल्या हाती ठेवले, असे झाले असते. प्रत्यक्षात दोन जोडपी आणि एकाची पत्नी डेलिया लोबो निवडून आल्याचे दिसते आहे.

Sunday, March 20, 2022

लहानपणं देगा देवा - बायका माणसं पडद्याच्या एकाच बाजूला वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अमेरिकेतील मुलगा अजू आणि सून नीलम यांनी न्यूजर्सीला जाऊन काश्मीर फाईल्स पाहिल्याचे कळविले होते. असेच कुठे तरी जाऊन त्यांनी पावनखिंडही पाहिला होता. पेन्सिलव्हॅनियातील यॅार्क येथून हे न्यूजर्सीला किंवा असेच कुठेतरी फक्त चित्रपट पहायला गेले होते. आमच्या अंजनगाव-सुर्जीला गोपाल टॅाकीज होते. तिथे आम्ही चित्रपट पहायला सहकुटुंबसहपरिवार जात असू. एकूण सातआठ जण असत. थिएटरमध्ये पडद्याच्या समोरच्या जागेत पुरुष मंडळी तर मागच्या बाजूला जनना असायचा. त्यांना चित्रे उलट दिसत असली तरी ‘संवाद सुलट ऐकायला येतात ना, झालं तर मग’, अशी महिला मंडळींची भूमिका असायची. पुरेशी गर्दी झाल्याशिवाय चित्रपट सुरू होत नसे. पडद्यासमोर जमिनीवर सोबत आणलेली सतरंजी हांतरून, बैठक मारून, मान उंच करून आम्ही सिनेमा पाहत असू. मानेला रग यायची. पण सिनेमा पहायचाय ना, मग एवढी तयारी असायलाच हवी, अशी आम्ही एकमेकांची समजूत घालीत असू. सिनेमात खून माऱ्यामाऱ्या अशी दृश्ये आली की मला खूप भीती वाटायची. माझ्या एका बाजूला मनू आणि दुसऱ्या बाजूला बंडू बसत असत. अशावेळी मी एका हाताने मनूचा तर दुसऱ्या हाताने बंडूचा हात घट्ट धरून बसत असे. आईची तशी सक्त ताकीद असायची. ‘वसंतावर लक्ष ठेवा, सिनेमा संपला की बाहेर पडतांना भरकटेल कुठेतरी’. आईच्या सूचनेचे तंतोतंत पालन करीत ती दोघे मला आपल्या दोघांमध्येच मध्येच बसवत असत. सुरवातीपासूनच काळजी घेतलेली बरी, असा त्यांचा दूरदर्शी विचार असायचा. भीतीदायक सीन येणार हे कळताच ती दोघे प्रामाणिकपणे माझा हात धरून ठेवायचे आणि मला डोळे गच्च मिटून बसायला सांगायचे. सीन संपला की ते आपला हात सोडून घ्यायचे. मी डोळे घट्ट मिटून बसत असे. ही बाब सोपी नसायची. मी मध्येच डोळे किलकिले करीत असे. कसे कुणास ठावूक पण हे त्यांच्या लक्षात यायचे आणि ‘डोळे मीट’, असे म्हणत माझे हात घट्ट धरायचे. तरीही ‘हे सीन संपल्याचे सांगायला विसरले तर काय घेता’, या शंकेने माझे मधूमधून डोळे किलकिले करणे आणि त्यांचे दाटणे सुरूच असायचे. शेवटी शेजारचा बाप्या खालच्या आवाजात ओरडायचा, ‘ गप्प बसा पोट्टे हो’. सिनेमा पाहून परत येतांना मनू, बंडूची तक्रार असायची. ‘वसंतामुळे आम्हाला इतरांची बोलणी खावी लागतात’. वडिल त्यांची समजूत घालायची की, पुढच्यावेळी आपण वसंताला घरीच ठेवून येऊ. आई म्हणायची, ‘काही नको, घरी आणखी उपद्व्याप करून ठेवील. त्यापेक्षा मी त्याला माझ्याच बरोबर ठेवीन. अनेक बायांजवळ त्यांची मुलं असतात’. ‘बायकात बसायचं’, घोर अपमान वाटायचा मला. शिवाय चित्रही उलटी दिसतात, ते वेगळच. गोपाल टॅाकीजमध्ये जुने पुराणे सिनेमे लागायचे. नवीन चांगले, मध्येच फिल्म न तुटणारे चित्रपट अमरावतीला लागत. अशा वेळी जेवणखाण करून आम्ही दुपारी तिकिट काढून मोटारीने अमरावतीला जात असू. फर्स्ट शो पहायचा. की परत मोटारीने अंजनगाव! अमरावतीला ‘जनाना पडदेके पीछे’, असा प्रकार नसायचा. बायकापुरुष पडद्याच्या समोरच बसायचे, तेही खुर्च्यांवर. चैन असायची. थिएटरमध्ये शिरणारे आम्ही बहुदा पहिलेच असायचो. बत्तीस मैल मोटार प्रवास करून तिकिटाच्या रांगेत पहिला नंबर लावणारे दुसरे कुणी फारसे नसावेत. असतीलच तर अगोदरच्या दिवशी तरी येऊन गेलेले असावेत किंवा नंतरच्या दिवशी तरी येणार असायचे. थिएटरमध्ये आपणच पहिले आहोत हे पाहून मी आईला म्हणायचो, ‘थिएटर भरायला निदान एक तास तर लागेल’. ‘ तू बघच, पात मिनिटात थेटर भरते की नाही ते’. एक चांगला चित्रपट सलग, सुरळीत आणि सगळ्यांनी सरळ आणि एकत्र बघितल्याचा आनंद इतका असायचा की स्वत:ला मोटारीत कोंबत परतीचा प्रवास करतांना आम्हाला कधीही कंटाळा आला नाही. घरी पोळ्या सकाळीच करून ठेवलेल्या असायच्या. ‘उगीच भूक भूक करीत बसू नका, पिठलं भात काय? आत्ता होईल’. असं म्हणून महिला वर्ग पदर खोचून कामाला लागायचा, मुलीबाळी पाटपाणी करायच्या, आणि आस्मादिक बालगोपाळ भूक, भूक करीत भुणभुण करायला मोकळे सुटत असू. पेन्सिलव्हॅनियातून स्वत: कार चालवीत न्यू जर्सीत जाऊन पिक्चर पाहणे आणि मोटारीत स्वत:ला कोंबून अमरावतीला जाऊन सिनेमा पाहणे, तसे एकाच जातकुळीचे. नाहीका?

Monday, March 14, 2022

ॲापरेशन गंगा आणि भारतातील चिमुकले पोलंड वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022. मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? पोलटावा हा युक्रेनमधला मघ्यभागी वसलेला ॲाब्लास्ट (प्रांत) आहे. याच नावाचे शहर या प्रांताचे प्रमुख केंद्रही आहे. होरिश्नी, प्लावनी आणि क्रेमेनचुक ही आणखी तीन मोठी शहरे या प्रांतात आहेत. निपर नदीच्या डाव्या बाजूला हा प्रांत आहे. सुमी, खारकीव आणि कीव हे प्रांत या प्रांताला लागूनच आहेत. सामान्यत: याच नावाची शहरे या प्रांतातील प्रमुख शहरे आहेत. धुमश्चक्री सुरू असतांना बाहेर कसे काढणार? सुमी प्रांतातील सुमी या अशांत शहरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर सुखरूप काढणे हे अतिशय जोखमीचे काम होते. कारण या भागात युक्रेन आणि रशिया यांच्या सैनिकात सतत गोळीबार सुरू होता. त्यामुळे सुरक्षित मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) तयार करणे कठीण झाले होते. इथे अडकून पडलेले विद्यार्थी दहा/बारा दिवस मानसिक दबावाखाली तर होतेच, पण अन्नपाण्याचा तुटवडाही त्यांना जाणवू लागला होता. कडाक्याच्या थंडीत बर्फ वितळवून पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी लागत होती. रोजच्या गरजेच्या वस्तू आणण्यास बंकरमधून बाहेर पडावे तर केव्हा बॅाम्बहल्याची सूचना देणारा भोंगा वाजेल किंवा दुरून कुठूनतरी झाडलेली गोळी चाटून जाईल, याचा नेम नसे. सुमी शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात हे विद्यार्थी अडकून पडले होते. भारतीय वकिलातीची एक चमू पोलटावा शहरात पोचली होती आणि तिथे योग्य वेळेची वाट पाहत थांबली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. सुमी ते पोलटावा हा प्रवास तीन तासांचा आहे. लढणाऱ्या दोन्ही पक्षांनी सहयोग म्हणून संघर्षाला विराम द्यावा आणि या काळात विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढावे, असा वकिलातीच्या चमूचा प्रयत्न सुरू होता. सुरवातीला सुमा शहरातून बाहेर पडून सुरक्षित पोलटावा शहरात यायचे आणि तिथून पश्चिम सीमेकडे जायचे असी विचार चमूने निश्चित केला होता. खरेतर तिथून पूर्वेला रशियाची सरहद्द जवळ आहे. पण तो भाग अशांत होता. तो पार करण्यात धोका आहे. म्हणून बंकरमधून बाहेर काढून या 700 विद्यार्थ्यांना पश्चिमेकडील रोमानियात किंवा पोलंडमध्ये आणायचा विचार युक्रेनमधील वकिलातीने केला होता. भारताने रशिया आणि युक्रेन या दोघांना गोळीबार थांबवण्याचा वारंवार आग्रह केला. कारण त्याशिवाय 700 विद्यार्थ्यांना बंकरमधून बाहेर काढण्यात मोठी जोखीम होती. म्हणून हे फुंकून फुंकून पावले टाकणे सुरू होते. पण विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला होता. अन्न अपुरे पडू लागले होते. मैलोगणती चालतांना मुलींना विशेष गरजेच्या वस्तू मिळत नसल्याने आणि आरोग्यविषयक अन्य अडचणीही वाढत चालल्या असल्यामुळे मुलींची खूपच गैरसोय होत होती. स्वच्छतागृहांसमोर लांबचलांब रांगा असत, ही आणखी एक अडचण होती. रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यातही धोका होता. कर्नाटकचा वैद्यकीय शिक्षण घेणारा चौथ्या वर्षाचा विद्यार्थी नवीन शेकरप्पा ग्यानगौडा खारकिव येथे अशाच काही कामासाठी रांगेत आपला नंबर येण्याची वाट पाहत असतांना गोळी लागून दगावला तर कीवमध्ये पंजाबचा विद्यार्थी हरज्योत सिंग गोळीबारात जखमी झाला होता. त्याला नंतर स्ट्रेचरवरून विमानात विशेष व्यवस्था करीत आणावे लागले. त्याला आता दिल्लीच्या सैनिकी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. याशिवाय पंजाबमधीलच बर्नाला येथील चंदन जिंदल हा चतुर्थ वर्गातील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी इश्चिमिक स्ट्रोकने दगावला. तो रुग्णालयात बराच अगोदर दाखल झाला होता. मृत्यूचे वेळी त्याचे आईवडिल त्याच्या सोबत होते, असे वृत्त समोर आले आहे. असो. भलते धाडस विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याच्या बाबतीत गोळीबार, हिंसा आणि वाहतुक समस्या या तीन प्रमुख्य अडचणी होत्या. एकदा संयम सुटत चाललेल्या कुमारवयातील या उतावळ्या विद्यार्थ्यांनी नाराज आणि निराश होत स्वत:हूनच जोखीम स्वीकारत रशियन बॅार्डरकडे कूच करण्याचा निर्णय घेतला होता. कारण रशियन सीमा केवळ 50 किमी अंतरावर होती. पण ती अशांत होती. म्हणून वकिलातीने प्रत्यक्ष संपर्क साधून या. विद्यार्थ्यांना धोक्याची जाणीव करून दिल्यानंतर ते मागे परत फिरले आणि वकिलातीने सुटकेचा निश्वास टाकला. सुमी शहरातून हे विद्यार्थी पोलतावा प्रथम शहरात आणि पुढे रेल्वेने 888 किमी अंतरावरील पश्चिमेकडील लिव्ह शहरातून पोलंडमध्ये येताच भारताच्या दिशेने प्रस्थान करतेझाले. 26 फेब्रुवारीला ॲापरेशन गंगाची सुरवात झाली होती. ही योजना आखून भारत सरकारने सर्व विद्यार्थ्यांना अनेक विमान फेऱ्या योजून भारतात सुखरूप आणले आहे. यावेळी भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेली प्रतिमा खूप उपयोगाची सिद्ध झाली. जगातल्या अनेक देशांना जे शक्य झाले नाही, ते भारताला यशस्वी रीतीने पार पाडता आले आहे. पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि मोल्डोवा या देशांनी भारतीयांना आपल्या देशात प्रवेश तर करू दिलाच, शिवाय, स्वागत करून येणाऱ्यांची वस्त्रप्रावरणाची, अन्नपाण्याची, औषधांची आणि उपचारांची निकडही दूर केली. भारताने आजवर योजलेल्या बचाव मोहिमांमधला हा एक नवीन शिरपेच मानला जातो. एक अभूतपूर्व योगायोग पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, मोल्डोव्हा आणि रोमोनिया यांनी आपल्या देशात युक्रेनमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या नागरिकांना जी सर्वप्रकारची मदत केली आहे तिला तोड नाही. पोलंडच्या बाबतीत तर एक अपूर्व योगायोग घडलेला दिसतो. कधी कधी वास्तव हे कल्पितापेक्षाही कसे अधिक चमत्कृतीपूर्ण असते, असे म्हणतात, ते असे. 1939 च्या सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हजारो पोलिश नागरिकांची जीवनरेखा एकदम पुसली गेली. दोन लांडगे पोलंडवर तुटून पडले होते. अगोदर जर्मनी आणि त्याच्या पाठोपाठ रशिया. परिणामस्वरुप जेमतेम दोन महिन्यातच जगाच्या नकाशात पोलंड नावाचा देशच दिसेनासा झाला. पोलिश नागरिक जिद्दीने उठाव करायचे. पण रशियाने अशा हजारो नागरिकांना हद्दपार करून सैबेरियात आत खोलवर डांबले. त्या वाटेवर असतांना अर्ध्यांचा प्रवास तर अर्ध्यातच आटोपला. उरलेल्या बहुतेकांची पुढच्या 18 महिन्यात भूक, रोगराई आणि काबाडकष्ट यामुळे आणि कडाक्याच्या थंडीने थिजून लाकडे झाली होती. भारतात आश्रयाला कुठे रशिया, कुठे पोलंड आणि कुठे भारत? पण गुजराथचे त्यावेळचे महाराजा जामसाहेब दिग्विजयसिंगजी यांनी 500 ते1000 निराधार पोलिश पोरक्यांना आश्रय देण्याचा प्रस्ताव मांडला. या पाठोपाठ अनुकंपा आणि सहृदयतेची लाटच निर्माण झाली. पूर्व आफ्रिका, न्यूझीलंड, लेबॅनॅान, मेक्सिको आणि आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानानेही पोरक्या पोलिशांचे यजमानपद स्वीकारले. बायकापोरांसह दरकोस दरमजल करीत भारतात आलेल्यांपैकी 1000 नागरिकांची सर्व जबाबदारी गुजराथचे महाराजा जामसाहेब दिग्विजयसिंगजी यांनी स्वीकारली आणि त्यांना जमिनीचा एक तुकडाच तोडून दिला. ही वार्ता जगभर पसरली आणि निर्वासितांचा ओघ भारताच्या दिशेने यायला सुरवात झाली. काही खुष्कीच्या मार्गाने चालत, तर काही पोराबाळांना ट्रकमध्ये बसवून अफगाणिस्तानमार्गे, तर काही समुद्रमार्गे भारतात आले. देशांच्याच नव्हे तर खंडांच्याही सीमा ओलांडून आश्रयाला आलेल्या या पाहुण्यांमुळे तेव्हापासून भारत आणि पोलंड यात सांस्कृतिक पातळीवर जे स्नेहानुबंध निर्माण झाले आहेत, ते आजही पिढ्या न पिढ्या टिकून आहेत. मिनी पोलंड - वलिवडे उर्फ गांधीनगर मुळात एकूण 1000 निर्वासितांना आश्रय देण्याचे ठरले होते. पण कोल्हापूर जिल्ह्यातील शिबिरच मुळी 5000 संख्येचे म्हणजे सर्वात मोठे होते. शिबिराचे स्थान होते कोल्हापूरजवळचे त्या वेळचे वलिवडे गाव. या गावातच रेल्वे स्टेशन लगतच्या जागेतील शिबिरात 1942 ते 1948 या काळात हे 5000 आश्रयार्थी आश्रयाला होते. शिबिराची रचना पोलिश खेड्याच्या धर्तीवर केली गेली. वलिवडे येथे त्यांची शाळा, महाविद्यालये आणि चर्चच नव्हे तर सिनेमा थिएटर सुद्धा गावकरांच्या सहकार्यातून व स्नेहातून उभे राहिले. त्यांची स्वत:ची प्रशासकासह स्वतंत्र प्रशासनव्यवस्था होती. गावाच्या मध्यभागी बाजारपेठ सजली होती. खास व्यवस्था म्हणून पोलंडमध्ये असतात तशी पांढरी डुकरे मांसाहारासाठी आणवली होती. कारण त्यांना दुसरे काही चालतच नसे. भारतीयांचीही दुकाने असत. पण ती गावाच्या परिघाच्या बाहेर असत. या पोलिश नागरिकांना स्वातंत्र्याची चव मायदेशानंतर प्रथम भारतातच चाखता आली. आजही त्यांच्यातील जीवित असलेल्यांपैकी कुणीना कुणी दरवर्षी वलिवडेला भेट देत असतात. ग्रामस्थ आणि सरपंच त्यांना सर्व संबंधित जागांची सफर घडवून आणतात आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. या वेळी, 2019 मध्ये, 29 जणांनी आपल्या भारतातील आगमनाचा 80 वा वाढदिवस साजरा केला होता. दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित फोटो व पेंटिंग्ज यांनी समृद्ध असलेल्या एका वास्तुसंग्रहालयाचे औपचारिक उद्घाटनसुद्धा यावेळी कोल्हापूरमध्ये पार पडले. पोलंडचे या अगोदरचे अध्यक्ष ब्रोनिस्लॅा कोमोरोव्हस्की यांनी महाराजा दिग्विजयसिंगजींचा कमांडर क्रॅास देऊन मरणोत्तर सत्कार केला होता. हे झाले भारतातले. पोलंडमधील वॅार्सा जिल्ह्याच्या ओकोटा गावातील एका चौकात महाराजांचा पुतळा उभारून त्या चौकाला महाराजांचे नाव देण्यात आले. तिथली एक शाळाही महाराजांचे नावाने ओळखली जाते. भारतातील चिमुकले पोलंड (ए लिटिल पोलंड इन इंडिया) या नावाचा भारत व पोलंड यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकाराला आलेला चित्रपट, भारताच्या उदार आश्रयाची व आश्रयार्थींच्या कृतज्ञतेची ही गाथा संपूर्ण जगाला कथन करतो आहे, करीत राहणार आहे. त्यावेळी भारताने दाखवलेल्या उदार दिलदारीची अंशत: परतफेड करण्याची संधी युक्रेनमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या भारतीयांचे स्वागत करतांना पोलंडला मिळाली आहे. आहे की नाही हा अपूर्व योगायोग!

Monday, March 7, 2022

विनोदी अभिनेता ते कणखर नेता - वोलोदिमिर झेलेन्स्की वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? कोणताही राजकीय अनुभव किंवा पृष्ठभूमी नसतांना एकदम युक्रेनच्या अध्यक्षपदी 2019 पासून आरूढ झालेला; मुळातला विनोदी अभिनेता असलेला; सर्व्हंट ॲाफ दी पीपल या विनोदी टीव्ही मालिकेत युक्रेनच्या अध्यक्षाची भूमिका वठवणारा, यहुदी वंशाचा वय वर्ष 44 असलेला, देशवासियांसाठी युक्रेन तर रशियनांना कळावे म्हणून बोलता बोलता रशियन भाषेत बोलू शकणारा सव्यसाची वक्ता असलेला, वोलोदिमिर झेलेन्स्की आज यहुदीविरोधी युक्रेनमध्ये नायक म्हणून संबोधला जातो आहे, हे वास्तव कल्पितापेक्षाही अधिक चमत्कारिक म्हटले पाहिजे. इस्रायलचा प्रमुख यहुदीच असेल हे उघड आहे. पण जगातल्या इतर कोणत्याही देशाचा प्रमुख यहुदी नाही. अपवाद आहे तो फक्त युक्रेनचा. मुरब्बी राजकारणी अशी नवीन ओळख मिळालेला झेलेन्स्की आणि त्याची वास्तुविशारद पत्नी ओलेना, यांना ओलेक्सॅंड्र नावाची 17 वर्षांची मुलगी आणि ऱ्यामा हा 9 वर्षांचा मुलगा आहे. आजच्या बिकट परिस्थिततीत हेही देशाबाहेर न जाता युक्रेनमध्येच राहिले आहेत, ही बाबही नोंद घ्यावी अशीच आहे. अभिनय हा प्रारंभ जीवनाचा कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वोलोदिमिर झेलेन्स्की याने सुखपर्यवसायी नाट्यस्तूची निवड करीत क्वार्टल 95 नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीने सुखपर्यवसायी, विनोदी, आणि कार्टूनसारखे चित्रपट निर्माण केले. ‘सर्व्हंट ॲाफ दी पीपल’ या उपहासपूर्ण विनोदी मालिकेत झेलेन्स्की हा एका कर्तव्यदक्ष शिक्षकाच्या भूमिकेत होता. भ्रष्टाचाराची चीड असलेला हा शिक्षक सोशल मीडियाद्वारे भ्रष्टाचाराविरोधात रान उठवतांना दाखविला आहे. या भूमिकेमुळे तो लोकप्रिय होतो आणि त्यालाच अध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करण्यात येते आणि तो निवडणुकीत विजयी होतो. ही पडद्यावरची कल्पित कथा पुढे प्रत्यक्षातही उतरते, असे दुसरे उदाहरण शोधले तरी सापडेल का? ही मालिका 2015 ते 2019 या कालखंडात दाखविली गेली. तिने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. ‘सर्व्हंट ॲाफ दी पीपल’ याच नावाचा राजकीय पक्ष क्वार्टल 95 या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी निर्माण केला. मालिकेचे नाव राजकीय पक्षाला, हे तरी कुठे सापडेल का? असो. युक्रेनमधील निवडणुकीचे नियम युक्रेनमध्ये अध्यक्षाची कारकीर्द 5 वर्षांची असते. पाचव्या वर्षीच्या मार्च महिन्यातील शेवटच्या रविवारी नवीन अध्यक्षाची निवडणूक झालीच पाहिजे. 2019 हे या दृष्टीने पाचवे वर्ष होते. या वर्षी मार्च महिन्यातला शेवटचा रविवार 31 या तारखेला होता. यानुसार 26 नोव्हेंबर 2018 ला युक्रेनच्या पार्लमेंटने 31 मार्च 2019 ही निवडणुकीची तारीख मुक्रर केली. निवडणूक म्हटली की, पहिला प्रश्न असतो निवडणूक निधीचा. सर्वात जास्त निवडणूक निधी पेट्रो पोरोशेन्को याच्या गाठीशी होता. निधीच्या बाबतीत झेलेन्स्कीचा क्रमांक तिसरा होता. 17 देशांच्या 19 मान्यताप्राप्त संस्थांचे 2,369 प्रतिनिधी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. खुद्द युक्रेनमधील 139 अशासकीय संस्थाही निवडणुकीवर लक्ष ठेवून होत्या. निवडून आलेला अध्यक्ष हा जनमताचे खरेखुरे प्रतिनिधित्व करीत होता किंवा नव्हता हा मुद्दा, हा तपशील पाहता निकालात निघतो. पण तरीही अशी शंका घेणाऱ्या इतरांबरोबर रशियाही होता. झेलेन्स्कीने युक्रेनच्या अध्यक्षपदाची निवडणूक देशाचा तत्कालीन अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को याच्याविरुद्ध लढविली आणि जिंकली, ती अशी. ही निवडणूक दोन फेऱ्या होऊन पार पडली. पहिली फेरी 31 मार्च 2019 ला रविवारी झाली तर दुसरी फेरी 21 एप्रिल 2019 ला रविवारीच पार पडली. पहिल्या फेरीत एकूण 34 उमेदवार उभे होते. क्रिमियाचा टवका रशियाने अगोदरच तोडला होता, तर डॅानेट्सचे ॲाब्लास्ट आणि लुहॅंन्स्क हे भूभाग रशियाधार्जिण्या फुटिरतावाद्यांच्या ताब्यात होते. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी निवडणूक घेणे शक्य नव्हते म्हणून ते वगळून झालेल्या पहिल्या फेरीच्या मतदानात 62.9% मतदान झाले. पण कुणालाही 50% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. झेलेन्स्कीला 30 % तर पेट्रो पोरोशेन्कोला 16 % मते मिळाली आणि ते अनुक्रमे पहिले व दुसरे होते. मतदानाची दुसरी फेरी तीन आठवड्यानंतर पार पडली. या फेरीत पहिलीपेक्षा थोडे कमी म्हणजे 62.1% मतदान झाले आणि ‘सर्व्हंट ॲाफ दी पीपल’ या टीव्ही सिरियल मध्ये युक्रेनच्या अध्यक्षाची भूमिका वठवणारा झेलेन्स्की, ‘सर्व्हंट ॲाफ दी पीपल’ या त्याच नावाच्या राजकीय पक्षाचा अध्यक्षपदाचा खराखुरा उमेदवारही असलेला झेलेन्स्की 73.22 % मताधिक्याने निवडून आला. प्रस्थापितांचा विरोध (ॲंटी इनकंबन्सी) ही मतदारांची भूमिका, सीमांचे प्राणपणाने रक्षण करीन हे आश्वासन आणि भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याची हमी ह्या झेलेन्स्कीच्या भूमिका त्याच्या विजयाला कारणीभूत ठरल्या. झेलेन्स्कीला 1,35,41,528 (1 कोटी, 35 लाख, 41 हजार 528) तर पेट्रो पोरोशेन्कोला फक्त 45,22,320 (45 लाख, 22 हजार, 320) मते मिळाली होती. ही आकडेवारी यासाठी महत्त्वाची ठरते की, यावरून लोकमत प्रस्थापितांच्या कारभाराला किती विटले होते, ते लक्षात यावे. मतदारांनी फार मोठ्या अपेक्षा उराशी बाळगून मोठ्या विश्वासाने एका अभिनेत्याकडे, खऱ्या नेत्याची भूमिका प्रत्यक्ष राजकीय जीवनात सोपविली होती. 2019 ते 2022 हा कालखंड तसा फारसा मोठा म्हणता यायचा नाही. पण या अल्पकाळातही झेलेन्स्कीच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सरसर वरच चढत गेला. नेटो आणि झेलेन्स्की तशी नेटोमध्ये सामील होण्याची भूमिका युक्रेनने 2014 सालीच स्वीकारलेली आहे. त्यावेळी झेलेन्स्कीचे नावही किती मतदारांना माहीत असेल कुणास ठावूक? या काळात तो एखाद्या नुक्कडमध्ये छोटी मोठी भूमिका वठवून गल्लीकरांची मने रिझवीतही असेल, कदाचित. पण गल्लीतील नाट्यनायकाला मतदारांनी दिल्लीत (चुकलो! कीव या राजधानीत असे म्हणायला हवे) मुख्य नायकाची भूमिका प्रत्यक्षात पार पाडण्यास पाठवले आणि झेलेन्स्कीने या संधीचे आणि नागरिकांच्या त्याच्यावरील विश्वासाचे सोने केले. तो खराखुरा राष्ट्रनायक ठरला. नवीन आणि अननुभवी अध्यक्षाच्या पाठीवर अपेक्षांचे गाठोडे पराभूत उमेदवार पेट्रो पोरोशेन्कोने निकालानंतर प्रतिक्रिया देताना टिप्पणी केली की, युक्रेनियनांनी नवीन आणि अननुभवी उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडला आहे. तो रशियाच्या प्रभावाखाली लगेचच जातो की नाही ते पहा. काहींची टीका होती की झेलेन्स्कीची युक्रेनमधील धनदांडग्या कोलोमोयस्की याच्याशी घनिष्ट मैत्री आहे. याच्या आणि पुतिनच्या समोर या नाटक्याचा काय निभाव लागतो, ते दिसेलच. युरोपीयन युनीयनने मात्र झेलेन्स्कीचे अभिनंदन करून सहकार्यासाठी हात पुढे केला. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेरेमी हंट म्हणाले, ‘या विजयाने जनतेला खराखुरा जनसेवक (सर्व्हंट ॲाफ दी पीपल) मिळाला आहे’. त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी निवडणुका शांततेत आणि लोकशाही पद्धतीने पार पडल्याबाबत समाधान व्यक्त करीत झेलेन्स्कीचे अभिनंदन केले. रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री ग्रिगोरी कारासिन यांची प्रतिक्रिया इतरांच्या तुलनेत काहीशी वेगळी होती. ‘नवीन नेतृत्वाने जनतेच्या आशा अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत. त्या पूर्ण होतील अशीच धोरणे देशांतर्गत आणि परराष्ट्रव्यवहारात स्वीकारली पाहिजेत’, या दोन्ही बाबतीत जनतेच्या अपेक्षा तर झेलेन्स्कीने पूर्ण केल्या, पण त्या रशियाच्या अपेक्षांशी जुळणाऱ्या नव्हत्या. थोडक्यात काय, तर पाश्चात्य जगाने झेलेन्स्कीच्या विजयाचे मन:पूर्वक स्वागत केले. रशियाने सावधगिरीचा इशारा दिला होता पण प्रत्यक्ष विरोध मात्र दर्शविला नव्हता. सध्या सुरू असलेल्या युक्रेन संकटाचा तीव्र प्रतिकार करण्याची भूमिका वोलोदिमिर झेलेन्स्की याने घेतली आहे. त्याला युक्रेनमधील जनतेची अभूतपूर्व साथ मिळते आहे. झेलेन्स्की पळून गेला आहे किंवा त्याने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत अशी अफवा पसरवली जात असतांना, त्याने सेल्फी व्हिडिओपोस्ट द्वारे तिचे खंडन केले आहे. "मी युक्रेनमध्येच आहे. आम्ही शस्त्र खाली न ठेवता देशाचे रक्षण करू, ”असे सांगत त्याने गनिमी पद्धतीने युद्ध करून सैन्याला साथ देण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. पेट्रोल बॅाम्ब तयार करण्याचा गृहउद्योग देशभर सुरू झाला आहे. वृद्ध आणि मुले वगळता उरलेली तरूण पिढी पूर्वी घेतलेल्या शस्त्रशिक्षणाला उजाळा देत किंवा नव्याने शिकत आक्रमकांना तोंड देण्यासाठी देशातच थांबली आहे. अमेरिकेकडून आलेली सुरक्षित स्थळी पोचवण्याची ऑफर झेलेन्स्की याने धुडकावून लावली आणि ‘मला दारूगोळा हवा आहे, सुखरूप बाहेर पडण्यासाठीची मदत नको आहे, तेव्हा शस्त्रे हवी आहेत, ती पुरवा, मला राईड ((रपेट) नको’, असे त्याने अमेरिकेसह सर्व जगाला सांगितले आहे. रशियाचा विचार झेलेन्स्कीला पकडायचे आणि त्याच्या जागी एखादे बाहुले बसवून युक्रेनला आपल्या दावणीला बांधण्याचे असा दिसतो. तो झेलेन्स्की याने आजपर्यंत तरी यशस्वी होऊ दिलेला नाही.