My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Sunday, March 20, 2022
लहानपणं देगा देवा - बायका माणसं पडद्याच्या एकाच बाजूला
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेतील मुलगा अजू आणि सून नीलम यांनी न्यूजर्सीला जाऊन काश्मीर फाईल्स पाहिल्याचे कळविले होते. असेच कुठे तरी जाऊन त्यांनी पावनखिंडही पाहिला होता. पेन्सिलव्हॅनियातील यॅार्क येथून हे न्यूजर्सीला किंवा असेच कुठेतरी फक्त चित्रपट पहायला गेले होते.
आमच्या अंजनगाव-सुर्जीला गोपाल टॅाकीज होते. तिथे आम्ही चित्रपट पहायला सहकुटुंबसहपरिवार जात असू. एकूण सातआठ जण असत. थिएटरमध्ये पडद्याच्या समोरच्या जागेत पुरुष मंडळी तर मागच्या बाजूला जनना असायचा. त्यांना चित्रे उलट दिसत असली तरी ‘संवाद सुलट ऐकायला येतात ना, झालं तर मग’, अशी महिला मंडळींची भूमिका असायची. पुरेशी गर्दी झाल्याशिवाय चित्रपट सुरू होत नसे. पडद्यासमोर जमिनीवर सोबत आणलेली सतरंजी हांतरून, बैठक मारून, मान उंच करून आम्ही सिनेमा पाहत असू. मानेला रग यायची. पण सिनेमा पहायचाय ना, मग एवढी तयारी असायलाच हवी, अशी आम्ही एकमेकांची समजूत घालीत असू. सिनेमात खून माऱ्यामाऱ्या अशी दृश्ये आली की मला खूप भीती वाटायची. माझ्या एका बाजूला मनू आणि दुसऱ्या बाजूला बंडू बसत असत. अशावेळी मी एका हाताने मनूचा तर दुसऱ्या हाताने बंडूचा हात घट्ट धरून बसत असे. आईची तशी सक्त ताकीद असायची. ‘वसंतावर लक्ष ठेवा, सिनेमा संपला की बाहेर पडतांना भरकटेल कुठेतरी’. आईच्या सूचनेचे तंतोतंत पालन करीत ती दोघे मला आपल्या दोघांमध्येच मध्येच बसवत असत. सुरवातीपासूनच काळजी घेतलेली बरी, असा त्यांचा दूरदर्शी विचार असायचा.
भीतीदायक सीन येणार हे कळताच ती दोघे प्रामाणिकपणे माझा हात धरून ठेवायचे आणि मला डोळे गच्च मिटून बसायला सांगायचे. सीन संपला की ते आपला हात सोडून घ्यायचे. मी डोळे घट्ट मिटून बसत असे. ही बाब सोपी नसायची. मी मध्येच डोळे किलकिले करीत असे. कसे कुणास ठावूक पण हे त्यांच्या लक्षात यायचे आणि ‘डोळे मीट’, असे म्हणत माझे हात घट्ट धरायचे. तरीही ‘हे सीन संपल्याचे सांगायला विसरले तर काय घेता’, या शंकेने माझे मधूमधून डोळे किलकिले करणे आणि त्यांचे दाटणे सुरूच असायचे. शेवटी शेजारचा बाप्या खालच्या आवाजात ओरडायचा, ‘ गप्प बसा पोट्टे हो’.
सिनेमा पाहून परत येतांना मनू, बंडूची तक्रार असायची. ‘वसंतामुळे आम्हाला इतरांची बोलणी खावी लागतात’. वडिल त्यांची समजूत घालायची की, पुढच्यावेळी आपण वसंताला घरीच ठेवून येऊ. आई म्हणायची, ‘काही नको, घरी आणखी उपद्व्याप करून ठेवील. त्यापेक्षा मी त्याला माझ्याच बरोबर ठेवीन. अनेक बायांजवळ त्यांची मुलं असतात’. ‘बायकात बसायचं’, घोर अपमान वाटायचा मला. शिवाय चित्रही उलटी दिसतात, ते वेगळच.
गोपाल टॅाकीजमध्ये जुने पुराणे सिनेमे लागायचे. नवीन चांगले, मध्येच फिल्म न तुटणारे चित्रपट अमरावतीला लागत. अशा वेळी जेवणखाण करून आम्ही दुपारी तिकिट काढून मोटारीने अमरावतीला जात असू. फर्स्ट शो पहायचा. की परत मोटारीने अंजनगाव! अमरावतीला ‘जनाना पडदेके पीछे’, असा प्रकार नसायचा. बायकापुरुष पडद्याच्या समोरच बसायचे, तेही खुर्च्यांवर. चैन असायची. थिएटरमध्ये शिरणारे आम्ही बहुदा पहिलेच असायचो. बत्तीस मैल मोटार प्रवास करून तिकिटाच्या रांगेत पहिला नंबर लावणारे दुसरे कुणी फारसे नसावेत. असतीलच तर अगोदरच्या दिवशी तरी येऊन गेलेले असावेत किंवा नंतरच्या दिवशी तरी येणार असायचे. थिएटरमध्ये आपणच पहिले आहोत हे पाहून मी आईला म्हणायचो, ‘थिएटर भरायला निदान एक तास तर लागेल’. ‘ तू बघच, पात मिनिटात थेटर भरते की नाही ते’. एक चांगला चित्रपट सलग, सुरळीत आणि सगळ्यांनी सरळ आणि एकत्र बघितल्याचा आनंद इतका असायचा की स्वत:ला मोटारीत कोंबत परतीचा प्रवास करतांना आम्हाला कधीही कंटाळा आला नाही. घरी पोळ्या सकाळीच करून ठेवलेल्या असायच्या. ‘उगीच भूक भूक करीत बसू नका, पिठलं भात काय? आत्ता होईल’. असं म्हणून महिला वर्ग पदर खोचून कामाला लागायचा, मुलीबाळी पाटपाणी करायच्या, आणि आस्मादिक बालगोपाळ भूक, भूक करीत भुणभुण करायला मोकळे सुटत असू.
पेन्सिलव्हॅनियातून स्वत: कार चालवीत न्यू जर्सीत जाऊन पिक्चर पाहणे आणि मोटारीत स्वत:ला कोंबून अमरावतीला जाऊन सिनेमा पाहणे, तसे एकाच जातकुळीचे. नाहीका?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment