My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, March 28, 2022
निर्वासितांमधले आपले तुपले
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक३०/०३/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
निर्वासितांमधले आपले तुपले
वसंत गणेश काणे, बीएस्सी,एमए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
पाश्चात्य लोक इतरांना मानवतेवर व्याख्याने देत असतात. पण ते स्वत: सध्या उद्भवलेल्या युक्रेन हल्ला प्रकरणी मात्र वंश, वर्ण, देश, धर्म बघूनच कसे वागायचे ते ठरवत आहेत, हे पाहिले की, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, हे जाणवते. युद्ध झाले, दुष्काळ पडला, एखादी नैसर्गिक आपत्ती आली की लोक निर्वासित होतात, त्यांना स्थलांतर करावे लागते. सध्या येमेन, अफगाणिस्तान आणि सीरियामधून असे हजारो निर्वासित जगातील निरनिराळ्या देशात स्थलांतरित झाले आहेत. त्यापैकी अनेकांनी युक्रेनमध्ये आश्रय घेतला होता. पण त्यांच्यावर आणि आश्रय देणाऱ्या युक्रेन देशातील लोकांवरही दुसऱ्या देशात आश्रय घेण्याची वेळ यावी हा नियतीचा क्रूर विनोदच म्हटला पाहिजे.
पुन्हा पुन्हा निर्वासित
अमेरिकेतील वॅाशिंगटन पोस्ट सारख्या दैनिकांमध्ये आलेली या बाबतची वृत्ते प्रातिनिधिक मानली पाहिजेत. येमेनमधील अहमद नावाचा तरूण (प्रत्यक्षातले नाव वेगळेही असू शकेल), वाटेत लागलेले देश वगळून युक्रेनमधील खारकिव येथे स्थायिक झाला होता. कारण युक्रेन हा देश सुसंस्कृत, संपन्न आणि सुरक्षित देश आहे, असे तो ऐकून होता. पण या तरुणाला आणि याच्या सारख्या इतर अनेकांना आता पुन्हा एकदा निर्वासित होऊन एखाद्या दुसऱ्या सुरक्षित देशात आसरा घेण्याची वेळ आली आहे.
तोफांचा भडिमार आणि बंदुकीच्या अखंड फैरीतून जीव मुठीत धरून तो कसाबसा वाट काढीत अशांत पूर्व युक्रेमनधून सध्या काहीशा शांत असलेल्या पश्चिम युक्रेनच्या दिशेने निघाला. अहमद हा तसा एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी होता. एका आदर्श शहराबाबतच्या त्याच्या ज्या अपेक्षा होत्या त्यातल्या बऱ्याच अपेक्षा खारकिव शहर पूर्ण करीत होते. तिथे त्याने अल्पावधीतच बऱ्यापैकी माया जमवली होती. ती मागे टाकून तो आता दूर सुरक्षित ठिकाणी जायला निघाला होता. असा हा त्याच्यावर ओढवलेला दुसरा प्रसंग होता. अगोदर येमेन सोडतांना त्याला नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडावे लागले होते. खारकिवमध्ये आपल्यावर अशी वेळ पुन्हा येणार नाही असे त्याला वाटले होते. पण आता युक्रेनही सोडून युरोपातल्या दुसऱ्या एखाद्या देशात आश्रय घेणे त्याला भाग पडले होते. असे अहमद सारखे एकूण निदान 25 लाख लोक युक्रेनमधून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशातील हजारो लोक सुरक्षित आसरा शोधत बाहेर पडले होते. देशोधडीला लागलेल्या यावेळच्या लोकांचा हा लोंढा मात्र अतिवेगवान लोंढा ठरतो आहे. अहमदला पायपीट करीत पोलिश सीमेपर्यंत यायला तीन दिवस लागले होते. त्याने येमेनमधल्या आपल्या आईवडलांशी संपर्क साधला. मी एका फाईव्ह स्टार हॅाटेलमध्ये खुशाल आहे, असे अहमदने त्यांना सांगितले आणि मग तो स्वत:शीच विषण्णपणे हसला.
संगणक मासुमा
अशीच दुसरी एक व्यक्ती एक महिला आहे, मासुमा ताजिक (खरे नाव वेगळे असू शकेल) ही संगणक तज्ज्ञ आहे. . ती अफगाणिस्तानमधून कीव या युक्रेनच्या राजधानीत येऊन विसावली होती. तालिबान्यांनी काबूल काबीज करताच ती कशीबशी निसटून युक्रेनमध्ये आली होती. आता तिच्याही नशिबी दुसऱ्यांदा जीव मुठीत धरून पळणे आले आहे. पाठीवर घ्यायच्या बॅगमध्ये (बॅकपॅक) काही कपडे आणि तिची एक अति मौल्यावान वस्तू होती. कोणती होती ती वस्तू? तो होता तिचा लॅपटॅाप! लॅपटॅाप हा तिचा खराखुरा आणि सच्चा साथीदार होता. इतर अनेकांनी खरेपणा आणि सच्चेपणा हे दोन निकष पूर्ण केले नव्हते. यावरून काय ते समजावे. काबूलपासून हा लॅपटॅाप तिची साथ करीत होता. ‘मी कीवला आले आणि आता मुक्त वातावरणात श्वास घेऊ शकेन असे मला वाटले. पण आता कळतंय की, जीवनात कशाचीच हमी नसते. येईल तो दिवस चांगला मानून साजरा करायचा, एवढेच आपल्या हाती आहे. जगातून निरनिराळ्या अडकाठ्या आणि अडथळे दूर करता आले तर माझ्यासारख्या आश्रयाच्या शोधात असणाऱ्यांना मोलाची मदत मिळेल. अगोदर काबूलमधून आणि आता कीवमधून मी माझ्या मित्रपरिवाराला सोडून आले आणि आता मला त्यांच्याही सुरक्षेबाबत काळजी वाटते आहे. कारण हे ते होते की, जेव्हा मी घरदार सोडून रस्त्यावर आले होते, तेव्हा त्यांनी मला आसरा दिला होता. पण त्यामुळेच त्यांच्यासमोरही आता काय वाढून ठेवले असेल कुणास ठावूक?’, मासुमा स्वत:शीच पुटपुटत होती.
बिन नावाचा चिमुकला
आणखी एक 11 वर्षांचा मुलगा सीरियातून आपल्या कुटुंबियांसह युक्रेनमध्ये आला होता. तो आता निघाला होता, स्लोव्हाकियाच्या दिशेने. एकटाच. तेही पायी. त्याच्या हातावर फोन नंबर टिकाऊ शाईने नोंदवला होता. हा नंबर स्लोव्हाकियातील त्याच्या नातेवाईकाचा होता. फेसबुकवर सीरियनांचा एक गट सक्रिय आहे. त्यांना उद्देशून एक आवाहनवजा विनंती करण्यात आली होती की, ‘कृपया या मुलाला युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी मदत करा, आसरा द्या, स्लोव्हाकियाला कसे जायचे याबाबत मार्गदर्शन करा’.
सीरियामध्येही रशियानेच हल्ले केले होते. यावेळी रशिया होता सीरियाच्या अध्यक्षांच्या बाजूने. बसर-अल-असाद यांना अभय देण्यासाठी रशियाने कंबर कसली होती, तीही अमेरिकेच्या विरुद्धच! अमेरिकेला भ्रष्टाचारी बसर-अल-असाद ऐवजी एखादा बंडखोर सज्जन राजकारणी सत्तेवर आणायचा होता, तर याच कारणासाठी रशियाला विद्यमान अध्यक्षच सत्तेवर असावा, असे वाटत होते. खुद्द सीरियात कुणाला काय हवे होते, हे विचारायला कुणालाच सवड नव्हती. यावर टिप्पणी करायलाच हवी का?
अहमद येमेनमधून बाहेर पडला खरा पण येमेनची गोष्ट वेगळी होती. तो सांगत होता, ‘तिथे आम्ही सगळे कुटुंबीय निदान एकत्र तरी होतो. अशावेळी मेलो काय किंवा जगलो काय याची तमा नसते. पण इथे युक्रेनमध्ये स्थिती वेगळी होती. ओळखीचे असे कमी होते. काय करावे याचा निर्णय घेणे कठीण झाले होते’. पण येमेनी नागरिकांची युक्रेनमधली संख्या अगदीच कमी नव्हती. संघर्ष सुरू होताच त्यांनी क्राऊड फंडिंग सुरू केले. निधी उभारण्याच्या या प्रक्रियेत सामान्य लोकच थोडे थोडे पैसे जमा करतात. तेही इंटरनेटची मदत घेऊन. संगीतकार, सिनेकलाकार आणि असेच इतर अन्य कलाकार यांनी हा निधी गोळा केला होता. अहमद रेल्वेने जर्मनीला जायला निघाला. येमेनहून युक्रेनला आल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला होता. आता पलायन संपेल. जीवनात स्थैर्य येईल, असे वाटले होते. पण कसलं काय? इथूनही पुन्हा पलायनाची वेळ आली आहे. जर्मनीत नातेवाईक आहेत. त्यांची बहुदा भेट होईल आणि पुन्हा एकदा अभ्यास सुरू करता येईल, असे त्याला वाटते आहे.
अरब अहमद, आफ्रिकन अहमद आणि आशियन अहमद
अहमद हा एकटा नाही. असे अनेक अहमद आहेत. कुणी अरब आहेत, कुणी आफ्रिकन आहेत, तर कुणी दक्षिण आशियातले आहेत. पण यापैकी प्रत्येकाशी निरनिराळ्या युरोपीयन देशात होणारा व्यवहार वेगवेगळा असतो. जे गोरे नाहीत आणि युक्रेनीयन नाहीत त्यांच्या वाट्याला येणारा व्यवहार भेदभावपूर्ण असतो. काही खाजगी बस वाहक तर त्यांना बसमध्ये शिरूच देत नाहीत. अगदी सीमेवर सुद्धा, सैनिक म्हणजे जे अधिकृत कर्मचारी आहेत, तेही त्यांना परत युक्रेनमध्ये ढकलत आणि त्यांच्याऐवजी युक्रेनियनांना आत घेतांना दिसत असत. मानवता वगैरे मुद्दे भाषणे देतांना, चर्चेसाठी विषय निवडतांना, लेख लिहितांना छान वाटतात. व्यवहारात मात्र वंशभेदाला, रंगभेदाला, धर्मभेदाला विसरणे कठीण जाते, हेच कटू सत्य आहे.
अहमद दरकोस दरमजल करीत पोलटावाला पोचला होता. तिथून पश्चिमेकडे येण्यासाठी रेल्वेच्या खचाखच भरलेल्या डब्यात तो कसाबसा शिरला. हा प्रवास आटोपताच पुन्हा 15 तासांचा दरकोस दरमजल प्रवास सुरू झाला. वाटेत भेटणारे आणि सोबत चालणारे सर्वच लोक एकमेकांच्या ना ओळखीचे ना पाळखीचे. पण ते मात्र एकमेकांना मदत करीत होते. समदु:खी म्हणून. हा एक सुखद अनुभव होता. हे झाले मनाचे. पण शरीराचे काय? चालून चालून अहमदच्या पायात संवेदनाच उरली नव्हती. पायांच्या हालचाली यांत्रिक स्वरुपाच्या होत चालल्या होत्या. एक जाणीव मात्र कायम जागृत होती. ती होती भीतीची.
2015 आणि 2016 मध्येही सीरियातून निर्वासितांचे लोंढे युरोपात आले होते. आता 2022 मध्ये युक्रेनियनांचा लोंढा युरोपात येतो आहे. येणाऱ्या निर्वासितांची व्यवस्था करण्याची ‘कला’ युरोपला आता चांगलीच अवगत झाली आहे. युरोपमधल्या 27 देशांनी यांना 3 वर्षे तात्पुरते रहाण्याची तजवीज करूनच ठेवली आहे. नंतरचं ज्याचं त्यानं पहाव! यापूर्वी अशी व्यवस्था नसल्यामुळे आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून येणाऱ्या निर्वासितांना तर त्रिशंकू अवस्थेतच रहावे लागायचे. कारण ते ‘ब्लॅक’ किंवा ‘ब्राऊन’ होते ना! गोऱ्यांच वेगळं होतं. ते एकमेकात सहज मिसळून जायचे.
शेवटी अहमद एकदाचा सीमा ओलांडून पोलंडला पोचला. त्याच्यासोबत त्याचा इराकी मित्रही होता. त्यामुळेच पोलंडमधल्या इराकी कुटुंबाने त्यांना आसरा दिला. युक्रेनच्या उध्वस्तांच्या कथा आता त्याच्यासाठी मागे पडल्या आहेत। अहमदने आईवडलांना पूर्वीप्रमाणेच फोन करून कळविले आहे की, तो आनंदात आहे. हे मात्र मनापासून होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment