My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, March 21, 2022
जीव लहान पण…
वसंत गणेश काणे
भारताने ॲापरेशन विजय योजून गोवा, दमण आणि दीव या भूभावरील पोर्च्युगीज अंमल संपविल्यानंतर 19 डिसेंबर 1961 नंतर या भागात भारतीय राज्यघटनेला अनुसरून जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर नियमितपणे निवडणुका घेतल्या जात आहेत. गोवा विधान सभेत 40 सदस्य आहेत तर उत्तर आणि दक्षिण गोवा मतदार संघातून प्रत्येकी एकेक प्रतिनिधी लोकसभेवर निवडून जात असतो.
गोव्यात 2022 मध्ये चुरशीची लढत झाली खरी. मतदान 79.61% इतके झाले पण 2017 मध्ये ही टक्केवारी 82.56 इतकी होती. म्हणजे 2.95 टक्के कमी मतदान झाले. गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यांत 5 लक्ष 40 हजार 785 मतदारांपैकी 4 लक्ष, 58 हजार 74 तर दक्षिण गोवा जिल्ह्यात 5 लक्ष 70 हजार 907 मतदारांपैकी 4 लक्ष,59 हजार 758 मतदारांनी मतदान केले. म्हणजे एकूण 11लक्ष, 11हजार, 692 मतदारांपैकी 9 लक्ष, 17 हजार, 832 मतदारंनी मतदान केले. नोटाचा वापर 10,629 मतदारांनी म्हणजे 1.1% मतदारांनी केला.
गोव्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत जरी नाही, तरी 40 पैका 20 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे 20 + अपक्ष 3 + मगोपचे 2 = 25 असे भाजप आणि मित्र यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकार निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. हा भाजपने सतत तिसऱ्यांदा म्हणजे 2012, 2017 आणि 2022 असा विजय मिळविला आहे. कॅांग्रेसला 11, आपला 2, तृणमूल कॅांग्रेस आणि परिवर्तनाची ग्वाही देणाऱ्या गोव्यातील सर्वात जुन्या प्रादेशिक पक्षाला म्हणजेच महाराष्ट्रवादी गोमांतक दल (मगोप) यांच्या युतीला 2, गोवा फॅार्वर्ड पक्ष (जीएफ पी) आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीला (आरजीपी) प्रत्येकी एकेक आणि तीन अपक्ष असा 40 जागांचा हिशोब लागतो. राष्ट्रवादी कॅांग्रेस (एनसीपी) आणि शिवसेना यांना 2027 ची वाट पहावी लागणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या जागा 7 ने वाढून 20 झाल्या तर कॅांग्रेसच्या जागा 6 कमी होऊन 11 झाल्या.
कुणी किती जागा जिंकल्या? किती जागी दुसऱ्या क्रमांकावर?
1)भाजप 20 जागी विजय, 14 जागी दुसरा क्रमांक.
2) कॅांग्रेस 11 जागी विजय, 9 जागी दुसरा क्रमांक.
3) मगोप 2 जागी विजय, 4 जागी दुसरा क्रमांक.
4) अपक्ष 3 जागी विजय, 4 जागी दुसरा क्रमांक.
5) आरजीपी 1 जागी विजय, 2 जागी दुसरा क्रमांक.
6) जीएफपी 1 जागी विजय, 1 जागी दुसरा क्रमांक.
7) आप 2 जागी विजय, 2 जागी दुसरा क्रमांक.
8) तृणमूल 0 जागी विजय, 4 जागी दुसरा क्रमांक.
यावरून असे म्हणता येईल की मतदारांवर भाजपची पकड सर्वात जास्त आहे.
जिल्हानिहाय निकाल
अ) उत्तर गोव्यात 23 जागा असून त्यात भाजपला 13, कॅांग्रेसला 6 आपला शून्य, तृणमूल व मगोप 2 आणि अन्य 2 अशी 23 जागांची विभागणी आहे.
ब) दक्षिण गोव्यात 17 जागा असून त्यात भाजपला 7, कॅांग्रेसला 6, आपला 2, तृणमूल व मगोपला शून्य आणि अन्य 2 अशी 17 जागांची विभागणी आहे.
सांकळी मतदार संघातून विद्यमान नेते डॅा प्रमोद सावंत यांनी 12,250 मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेश सगलानी यांचा 666 मतांनी पराभव केला आहे. गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांवर ज्येष्ठांनी टाकलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. गोव्यात अमित शहांनी घररोघर प्रचार केला होती, तर मोदींचे मापुसा येथील भाषण कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करणारे ठरले.
भाजपचे संख्याबळ मनोहर पर्रिकर असतांना 2012 मध्ये 21, 2017 मध्ये गोव्याऐवजी पर्रिकर केंद्रात संरक्षण मंत्री असतांना 13, तर 2022 मध्ये पर्रिकरांच्या अनुपस्थितीत 20 असा हिशोब आहे.
कॅांग्रेसचे संख्याबळ 2012 मध्ये 9 , 2017 मध्ये 17 , तर 2022 मध्ये 11 असा हिशोब आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेला 2022 मध्ये एकही जागा मिळाली नाही. 2017 मध्ये राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती.
मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर पित्याच्या मतदार संघासाठी म्हणजे पणजीसाठी अडून बसले होते. पणजी वगळून इतर दोन मतदार संघांपैकी कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढवा अशी त्यांना मोकळीक दिली होती. पण स्वत:ला पर्रिकरांचा खराखुरा वारस म्हणून घोषित करीत त्यांनी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यांना शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण त्यांना वारसा सिद्ध करता आला नाही. पणजी मतदार संघात बाबुश मोन्सेरात हे विद्यमान आमदार होते. त्यांच्या अगोदर ह्या जागी मनोहर 1994 पासून पर्रिकर निवडून येत असत. अत्यंत चुरशीच्या लढतीत बाबुश मोन्सेरात यांना 6,787, उत्पल पर्रिकरांना 6, 071 आणि कॅांग्रेसच्या एलिस गोम्स यांना 3,175 मते मिळून उत्पल पर्रिकरांना 716 मतांनी पराभव पत्करावा लागला. बाबुश मोन्सेरात हे विद्यमान भाजप आमदार आणि पूर्वाश्रमीचे कॅांग्रेस आमदार होते. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी पर्रिकरांसाठी काम केले असा बाबुशा मोन्सेरात यांनी आरोप केला. ‘मी जणू भाजप आणि कॅांग्रेस या दोन्ही पक्षांचा अनधिकृत उमेदवार म्हणूनच लढलो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी निकालानंतर दिली.
2017 मध्ये भाजपला 13 तर कॅांग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. पण अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमातक दल यांच्या पाठिंब्याने भाजपने गोव्यात सरकार स्थान केले. पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ, अशी पाठिंबा देणाऱ्यांची अट होती. ती भाजपने पूर्ण केली. पर्रिकर संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्याचे मुख्य मंत्री झाले. त्यांच्या नंतर डॅा प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. कॅांग्रेसच्या १२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला व भाजपचे संख्याबळ 27 झाले. निवडणुकीपूर्वी 9 आमदारांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये 18 च आमदार उरले होते. 2022 च्या निवडणुकीत भाजपचे 20 आमदार निवडून आले आहेत.
प्रमोद सावंत हे लहानपणापासूनचे संघाचे स्वयंसेवक आहेत. ते गोवा विधान सभेचे सर्वात तरूण अध्यक्ष राहिलेले आहेत. 2008 मध्ये त्यांना केलेल्या सूचनेला अनुसरून ते सरकारी नोकरी सोडून भाजपचे उमेदवार म्हणून पोट निवडणुकीला उभे राहिले आणि पडले. 2012 मध्ये आणि 2017 आणि आता 2022 मध्येही ते सांकळी मतदार संघातून निवडून आले आहेत.
शिवसेनेने गोवा, मणीपूर आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यात निवडणूक लढविली होती. पण कुठेही त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही आणि अनमत रक्कमही वाचली नाही. उत्तर प्रदेशात 60 जागी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 19 अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनीच बाद केले.
तृणमूल, आप आणि रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी हे पक्ष कॅांग्रेसची मते खाणारे (व्होट कटवे) सिद्ध झाले. कॅांग्रेसने त्यांना भाजपची बी टीम म्हणून शिवी हासडली. श्री चिदंबरम यांनी निकालानंतर टिप्पणी केली केली की 66% जनमत भाजपच्या विरोधात होते पण ते अनेक स्पर्धकात विभाजित झाले. गेल्या 5 वर्षात इतक्या कॅांग्रेस उमेदवारांनी पक्षबदल केला आहे की, आपण ज्याला मत देतो आहोत, तो उमेदवार निवडून आल्यार कॅांग्रेस मध्येच राहील, याचा भरवसा मतदारांना वाटत नव्हता. गोव्यात कॅांग्रेसजवळ प्रभावी नेताही नव्हता.
गोव्यात तीन जोडपीही निवडून आली आहेत. त्यातली दोन भाजपच्या तिकिटावर तर एक जोडपे कॅांग्रेसच्या तिकिटीवर निवडून आले. जेनिफर मॅान्सेरेट आणि देविया राणे यांनी आपापल्या यजमानांसह विजय नोंदविला. तर कॅांग्रेसच्या डेलिया लोबो यांनी कॅांग्रेसच्या तिकिटावर आपल्या यजमानांसह हा विक्रम नोंदविला. 4, ही महिला उमेदवारांची संख्या आजवरची महिला आमदारांची महत्तम संख्या आहे. ही टक्केवारी 10% इतकी आहे.
दलबदलूंना मतदारांनी चांगलीच अद्दल घडविली. 12 दलबदलू आमदारांपैकी 10 कॅांग्रेसचे तर 2 अन्य होते. हे भाजपात गेले होते. त्यापैकी फक्त 3 जिंकले.
40 % मंत्र्यांचा पराभव - मनोहर आजगावकर हे महाराष्ट्रवादी गोमांतक दल (मगोप) मधून तर चंद्रकात कवळेकर हे कॅांग्रेसमधून भाजपमध्ये 2019 मध्ये आले होते. हे दोघेही हरले. फिलिप नर्वी रॅाड्रिग्ज, दीपक प्रभू पौसकर आणि मिलिंद नाईक हे मंत्रीही पराभूत झाले.
टक्केवारी व एकूण मते
1) अ भाजपची मतांची टक्केवारी 0.8 ने वाढून 32.5 वरून 33.3 पर्यंत (प्रत्यक्ष मते 3 लक्ष, 16 हजार, 573) वाढली.
1) ब कॅांग्रेसची टक्केवारी 28.5 वरून 23.5 पर्यंत (प्रत्यक्ष मते 2 लक्ष, 22 हजार, 948) घसरली.
2) आपची मतांची टक्केवारी 0.5 ने वाढून 6.8 पर्यंत (प्रत्यक्ष मते 64 हजार, 354) वाढली.
3) तृणमूल - 2022 मध्ये तृणमूलची मतांची टक्केवारी 5.2% (प्रत्यक्ष मते 49 हजार 480) इतकी आहे. (2017 मध्ये निडणूक लढविली नव्हती).
4) गोवा फॅारवर्ड पार्टी - टक्केवारी - 1.8 %, एकूण मते 17,477
5) महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी - टक्केवारी 7.6 % एकूण मते 72, 269
6) राष्ट्रवादी पक्ष - टक्केवारी 1.1 %, एकूण मते 10, 86
7) शिवसेना - टक्केवारी 0.2 %, एकूण मते 1,726
8) रिव्होल्युशनरी गोवन पार्टी - 9.45% एकूण मते 93,255
9) नोटा - 1.1% , एकूण मते 10, 629
कॅांग्रेसने आप (6.8%), तृणमूल (5.2%), रेव्होल्युशनरी गोवन पार्टी (9.45%) यांच्यावर व्होट कटवे म्हणून टीका केली. यांनी मिळून 21.45% मते कुजविली आणि त्यामुळे भाजपचा विजय झाला, असे म्हटले आहे.
स्ट्राईक रेट- किती जागा लढवल्या आणि किती जिंकल्या याला स्ट्राईक रेट म्हणतात. भाजप 20/40 (50%) , कॅांग्रेस 11/37 (29.7%), आप 2/39 (5.1%) तृणमूल 0/26 (0%)
मोठ्या फरकाने जिंकणारे उमेदवार
भाजपच्या देविया विश्वजित राणे पोरियम मतदारसंघातून 17,816 मते मिळवून 13,943 च्या फरकाने निवडून आल्या
मगोपचे सुदिन ढवळीकर मारकेम मतदारसंघातून 17,816 मते मिळवून 9963 च्या फरकाने भाजपच्या संदेश भिंगी यांच्या विरोधात निवडून आले
गोव्यातील जोडपी
भाजप नेते आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे वाळपई विधानसभा मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी देवीया यांनी पर्येम मतदारसंघातून भाजपच्याच तिकिटावर निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, पर्ये या जागेचे प्रतिनिधित्व सध्या त्यांचे सासरे प्रतापसिंह राणे काँग्रेसच्या तिकिटावर करत आहेत. या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रतापसिंह राणे यांना तिकीट दिले आहे. मात्र, त्यांनी माघार घेतली आहे.
भाजपने पणजी विधानसभा मतदारसंघातून अतानासिओ मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर या ताळगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे त्यांच्या पारंपारिक केपे या मतदारसंघातून निवडणूक हरले. पत्नी सावित्री यांना पक्षाने सांगेम विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले आहे. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली पण त्यांना यश मिळाले नाही.
तृणमूल कॅांग्रेसने किरण कांडोला यांना अल्डोना मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी कविता यांना टिविम मतदारसंघातून तिकिट दिले होते. पण हे दोघेही पडले. किरण कंडोला यांना तिसऱ्या क्रमांकाची मतेही मिळाली नाहीत. पण सावित्री निदान दुसऱ्या क्रमांकावर तरी होत्या.
प्रमोद सावंत मंत्रिमंडळातील एक मंत्री मायकेल लोबो हे कलांगुटे मतदार संघातून कॅांग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले आणि पडले. त्यांच्या पत्नी डेलिया लोबो मात्र सिओलिम मतदारसंघातून कॅांग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या
ही सगळी जोडपी निवडून आली असती तर 40 पैकी 10 दहा मतदार संघ म्हणजे 40 % मतदार संघ या पाचच जोडप्यांनी आपल्या हाती ठेवले, असे झाले असते. प्रत्यक्षात दोन जोडपी आणि एकाची पत्नी डेलिया लोबो निवडून आल्याचे दिसते आहे.
अटी तटीच्या लढती
अ) 100 पेक्षा कमी फरकाने जिकलेल्या जागा
1) आंद्रे मतदार संघ आरजीपीचे वीरेश बोरकर यांनी भाजपच्या फ्रॅन्सिसको सिल्हेरिया यांचा 76 मतांनी पराभव केला. (5395 - 5319 = 76)
2) पोंडा मतदार संघ भाजपचे रवि नाईक यांनी मगोपच्या केतन भाटीकर यांचा 77 मतांनी पराभव केला (7514- 7437 = 77)
ब) 500 पेक्षा कमी फरकाने जिंकलेल्या जागा
1) बिचोलिम मतदार संघात अपक्ष डॅा चंद्रकांत शेटे यांनी मगोपच्या नरेश सावळ यांचा 318 मतांनी पराभव केला.( 9608- 9290 = 318)
2) प्रियोळ मतदारसंघात भाजपच्या गोविंद गौडे यांनी मगोपच्या दीपक ढवळीकर यांचा 213 मतांनी पराभव केला. ( 11019 - 10806 = 213)
3) नवेलिन मतदारसंघात भाजपच्या उल्हास तुएनकर यांनी तृणमूल कॅांग्रेसच्या वलंका आलेमाओ यांचा 430 मतांनी पराभव केला. (5168- 4738= 430)
4) वेलिम मतदारसंघात आपचे क्रुझ सिल्हा यांनी कॅांग्रेसच्या सॅव्हिओ डिसिल्हा यांचा 169 मतांनी पराभव केला ( 5390- 5221 = 169)
युती - लढवलेल्या जागा आणि त्यातील महिला उमेदवार
1)अ- भाजपची कोणत्याही पक्षाशी युती नव्हती. 40 पैकी 3 महिला
ब-आपची कोणत्याही पक्षाशी युती नव्हती. 39 पैकी 3 महिला
2) (युपीए)कॅांग्रेस आणि गोवा फॅारवर्ड पारटीची युती होती. कॅांग्रेस 37 पैकी 2 महिला आणि जीएफपी 3 पैकी 0 महिला
3) तृणमूल कॅांग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी यांची युती होती. तृणमूल 26 पैकी 4 महिला आणि मगोप 13 पैकी 0 महिला
4) राष्ट्रवादी कॅांग्रेस आणि शिवसेना यांची युती होती. राष्ट्रवादी 13 पैकी 0 महिला आणि आणि शिवसेना 8 पैकी 2 महिला
5) रिव्होल्युशनरीगोअन्स पार्टी आणि गोवेंचो स्वाभीमानी पार्टी यांची युती होती. आरपी 38 पैकी 2 महिला आणि गोवेंचो स्वाभीमानी 4 पैकी 1 महिला
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार / प्रमुख उमेदवार, विजय/ पराजय
भाजप -प्रमोद सावंत - विजयी
कॅांग्रेस - दिगंबर कामत - विजयी
गोवा फॅारवर्ड पार्टी - विजय सरदेसाई - विजयी
आमआदमी पार्टी - अमित पालेकर - पराभूत
तृणमूल - माहुआ मोइत्रा (महिला) - (प्रभारी) खासदार बंगाल
महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी - सुदिन ढवळीकर - विजयी
राष्ट्रवादी कॅांग्रेस - ज्योस फिलिप डिसूझा -पराभूत
शिवसेना - जितेष कामत - पराभूत
प्रचार -
भाजप - संकल्प पेटी फिरवून अपेक्षा जाणून घेतल्या.
कॅांग्रेस - न्याय योजना प्रत्येक गावातील सर्वात गरिबाला वार्षिक 72 हजाराची मदत, पेट्रोल 82 रु लिटर, प्रदूषण होणार नाही अशाप्रकारे खाणकामाला प्रारंभ, महिलांना सरकारी नोकरीत 30% आरक्षण, गोवा कोळशाचीच बाजारपेठ होऊ देणार नाही, स्थानिकांसाठी जमीनहक्क कायदा आणणार.
आप - कुटुंबातील एकाला नोकरी, ती मिळेपर्यंत दरमहा 3000, 80% नोकऱ्या स्थानिकांसाठी, 5000 रु महिना कोविडमुळे पर्यटन बंद झाल्यामुळे नोकरी गमावलेल्यांसाठी, 5000 महिना खाणबंदीमुळे नोकरी गमावलेल्यांसाठी, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, आरोग्य योजनेत सुधारणा, सर्वांना नि:शुल्क आणि उच्च दर्जाचे शिक्षण, पहिल्यांदाच भ्रष्टाचारमुक्त शासन देणार.
तृणमूल कॅांग्रेस - गृहलक्ष्मी कार्ड योजना - कुटुंबातील एका महिलेला 5000 रु महिना, कोविड बाधितांसाठी अंदाजपत्रकात 6 ते 8 % तरतूद, युवा शक्ती कार्ड - 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना 20 लाखांपर्यंत 4% दराने कर्ज शिक्षण, कौशल्यविकास, व्यवसाय सुरू करणे यासाठी, राहण्यासाठी घर नसलेल्यांसाठी माझे घर मालकी हक्क योजनेनुसार 50 हजार लोकासाठी अनुदान योजना, वाहन मित्र योजना टॅक्सी ड्रायव्हरसाठी 10 ते 30 हजाराचे अनुदान
विश्वजित राणे की मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रमोद सावंत ?
अफवांना ऊत
गोव्यात भाजपला सर्वात जास्त म्हणजे 20 जागा मिळाल्या आहेत हे खरे असले तरी बहुमतासाठी किमान 21 जागा आवश्यक आहेत, हे विसरता यायचे नाही.
विश्वजित राणे हे 2017 मध्ये कॅांग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. आपण मुख्यमंत्री व्हावे, अशी त्यांची इच्छा आणि हालचाली आहेत, असे दिसते. केंद्रातील काही नेतेही त्यांना अनुकूल आहेत, असेही बोलले जाते.
पहिले असे की, मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 9 मार्चला राणे यांनी एक विमानातला फोटो ट्विटरवर टाकला होता. त्यात राणे आणि कॅांग्रेसचे नेते डिके शिवकुमार आणि अन्य एकत्र दिसत होते. पण लवकरच तो काढून टाकण्यात आला.
दुसरे म्हणजे, 12 मार्चलाराणे हे राजपाल श्रीधरन पिल्लई यांना जाऊन भेटले. हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘तुम्ही मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत अहात का?’, असा प्रश्न विचारला असता, ‘बघू या’, असे ते म्हणाले.
तिसरे असे की, सोमवारी 11 तारखेला नरेंद्रसिंग तोमर आणि एल मुरुगन हे निरीक्षक गोव्यात आले. त्या दिवशीच्या वृत्तपत्रात राणे यांनी मतदारांचे आभार मानणारी पानभर जाहिरात लोकमतमध्ये छापली होती. त्यात प्रमोद सावंत यांचा अपवाद वगळता राज्य आणि केंद्रस्तरावरच्या नेत्यांचे फोटो होते.
प्रमोद सावंत यांनी आजवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण प्रमोद सावंत यांच्या गटाचे म्हणणे असे आहे की, ‘प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असे जाहीर करून आम्ही एका यशस्वी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकली असतांना दुसऱ्या कुणाचा विचार होईलच कसा?’.
अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा असेल. गोव्याला पुढील पाच वर्षे स्थिर आणि चांगले प्रशासन द्यायचे आहे. त्यामुळे तो जाहीर होईतो वाट पहा असे भाजपचे गोव्याचे प्रवक्ते (डेस्क- इन-चार्ज) सीटी रवि यांनी सांगितले आहे.
शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे कारण हेही आहे की, 10 ते 17 मार्च पर्यंत शुभ मुहूर्त नाहीत. त्यामुळे शपथग्रहण समारंभ त्या नंतरच होणार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment