Monday, March 14, 2022

ॲापरेशन गंगा आणि भारतातील चिमुकले पोलंड वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022. मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? पोलटावा हा युक्रेनमधला मघ्यभागी वसलेला ॲाब्लास्ट (प्रांत) आहे. याच नावाचे शहर या प्रांताचे प्रमुख केंद्रही आहे. होरिश्नी, प्लावनी आणि क्रेमेनचुक ही आणखी तीन मोठी शहरे या प्रांतात आहेत. निपर नदीच्या डाव्या बाजूला हा प्रांत आहे. सुमी, खारकीव आणि कीव हे प्रांत या प्रांताला लागूनच आहेत. सामान्यत: याच नावाची शहरे या प्रांतातील प्रमुख शहरे आहेत. धुमश्चक्री सुरू असतांना बाहेर कसे काढणार? सुमी प्रांतातील सुमी या अशांत शहरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर सुखरूप काढणे हे अतिशय जोखमीचे काम होते. कारण या भागात युक्रेन आणि रशिया यांच्या सैनिकात सतत गोळीबार सुरू होता. त्यामुळे सुरक्षित मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) तयार करणे कठीण झाले होते. इथे अडकून पडलेले विद्यार्थी दहा/बारा दिवस मानसिक दबावाखाली तर होतेच, पण अन्नपाण्याचा तुटवडाही त्यांना जाणवू लागला होता. कडाक्याच्या थंडीत बर्फ वितळवून पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी लागत होती. रोजच्या गरजेच्या वस्तू आणण्यास बंकरमधून बाहेर पडावे तर केव्हा बॅाम्बहल्याची सूचना देणारा भोंगा वाजेल किंवा दुरून कुठूनतरी झाडलेली गोळी चाटून जाईल, याचा नेम नसे. सुमी शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात हे विद्यार्थी अडकून पडले होते. भारतीय वकिलातीची एक चमू पोलटावा शहरात पोचली होती आणि तिथे योग्य वेळेची वाट पाहत थांबली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. सुमी ते पोलटावा हा प्रवास तीन तासांचा आहे. लढणाऱ्या दोन्ही पक्षांनी सहयोग म्हणून संघर्षाला विराम द्यावा आणि या काळात विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढावे, असा वकिलातीच्या चमूचा प्रयत्न सुरू होता. सुरवातीला सुमा शहरातून बाहेर पडून सुरक्षित पोलटावा शहरात यायचे आणि तिथून पश्चिम सीमेकडे जायचे असी विचार चमूने निश्चित केला होता. खरेतर तिथून पूर्वेला रशियाची सरहद्द जवळ आहे. पण तो भाग अशांत होता. तो पार करण्यात धोका आहे. म्हणून बंकरमधून बाहेर काढून या 700 विद्यार्थ्यांना पश्चिमेकडील रोमानियात किंवा पोलंडमध्ये आणायचा विचार युक्रेनमधील वकिलातीने केला होता. भारताने रशिया आणि युक्रेन या दोघांना गोळीबार थांबवण्याचा वारंवार आग्रह केला. कारण त्याशिवाय 700 विद्यार्थ्यांना बंकरमधून बाहेर काढण्यात मोठी जोखीम होती. म्हणून हे फुंकून फुंकून पावले टाकणे सुरू होते. पण विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला होता. अन्न अपुरे पडू लागले होते. मैलोगणती चालतांना मुलींना विशेष गरजेच्या वस्तू मिळत नसल्याने आणि आरोग्यविषयक अन्य अडचणीही वाढत चालल्या असल्यामुळे मुलींची खूपच गैरसोय होत होती. स्वच्छतागृहांसमोर लांबचलांब रांगा असत, ही आणखी एक अडचण होती. रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यातही धोका होता. कर्नाटकचा वैद्यकीय शिक्षण घेणारा चौथ्या वर्षाचा विद्यार्थी नवीन शेकरप्पा ग्यानगौडा खारकिव येथे अशाच काही कामासाठी रांगेत आपला नंबर येण्याची वाट पाहत असतांना गोळी लागून दगावला तर कीवमध्ये पंजाबचा विद्यार्थी हरज्योत सिंग गोळीबारात जखमी झाला होता. त्याला नंतर स्ट्रेचरवरून विमानात विशेष व्यवस्था करीत आणावे लागले. त्याला आता दिल्लीच्या सैनिकी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. याशिवाय पंजाबमधीलच बर्नाला येथील चंदन जिंदल हा चतुर्थ वर्गातील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी इश्चिमिक स्ट्रोकने दगावला. तो रुग्णालयात बराच अगोदर दाखल झाला होता. मृत्यूचे वेळी त्याचे आईवडिल त्याच्या सोबत होते, असे वृत्त समोर आले आहे. असो. भलते धाडस विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याच्या बाबतीत गोळीबार, हिंसा आणि वाहतुक समस्या या तीन प्रमुख्य अडचणी होत्या. एकदा संयम सुटत चाललेल्या कुमारवयातील या उतावळ्या विद्यार्थ्यांनी नाराज आणि निराश होत स्वत:हूनच जोखीम स्वीकारत रशियन बॅार्डरकडे कूच करण्याचा निर्णय घेतला होता. कारण रशियन सीमा केवळ 50 किमी अंतरावर होती. पण ती अशांत होती. म्हणून वकिलातीने प्रत्यक्ष संपर्क साधून या. विद्यार्थ्यांना धोक्याची जाणीव करून दिल्यानंतर ते मागे परत फिरले आणि वकिलातीने सुटकेचा निश्वास टाकला. सुमी शहरातून हे विद्यार्थी पोलतावा प्रथम शहरात आणि पुढे रेल्वेने 888 किमी अंतरावरील पश्चिमेकडील लिव्ह शहरातून पोलंडमध्ये येताच भारताच्या दिशेने प्रस्थान करतेझाले. 26 फेब्रुवारीला ॲापरेशन गंगाची सुरवात झाली होती. ही योजना आखून भारत सरकारने सर्व विद्यार्थ्यांना अनेक विमान फेऱ्या योजून भारतात सुखरूप आणले आहे. यावेळी भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेली प्रतिमा खूप उपयोगाची सिद्ध झाली. जगातल्या अनेक देशांना जे शक्य झाले नाही, ते भारताला यशस्वी रीतीने पार पाडता आले आहे. पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि मोल्डोवा या देशांनी भारतीयांना आपल्या देशात प्रवेश तर करू दिलाच, शिवाय, स्वागत करून येणाऱ्यांची वस्त्रप्रावरणाची, अन्नपाण्याची, औषधांची आणि उपचारांची निकडही दूर केली. भारताने आजवर योजलेल्या बचाव मोहिमांमधला हा एक नवीन शिरपेच मानला जातो. एक अभूतपूर्व योगायोग पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, मोल्डोव्हा आणि रोमोनिया यांनी आपल्या देशात युक्रेनमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या नागरिकांना जी सर्वप्रकारची मदत केली आहे तिला तोड नाही. पोलंडच्या बाबतीत तर एक अपूर्व योगायोग घडलेला दिसतो. कधी कधी वास्तव हे कल्पितापेक्षाही कसे अधिक चमत्कृतीपूर्ण असते, असे म्हणतात, ते असे. 1939 च्या सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हजारो पोलिश नागरिकांची जीवनरेखा एकदम पुसली गेली. दोन लांडगे पोलंडवर तुटून पडले होते. अगोदर जर्मनी आणि त्याच्या पाठोपाठ रशिया. परिणामस्वरुप जेमतेम दोन महिन्यातच जगाच्या नकाशात पोलंड नावाचा देशच दिसेनासा झाला. पोलिश नागरिक जिद्दीने उठाव करायचे. पण रशियाने अशा हजारो नागरिकांना हद्दपार करून सैबेरियात आत खोलवर डांबले. त्या वाटेवर असतांना अर्ध्यांचा प्रवास तर अर्ध्यातच आटोपला. उरलेल्या बहुतेकांची पुढच्या 18 महिन्यात भूक, रोगराई आणि काबाडकष्ट यामुळे आणि कडाक्याच्या थंडीने थिजून लाकडे झाली होती. भारतात आश्रयाला कुठे रशिया, कुठे पोलंड आणि कुठे भारत? पण गुजराथचे त्यावेळचे महाराजा जामसाहेब दिग्विजयसिंगजी यांनी 500 ते1000 निराधार पोलिश पोरक्यांना आश्रय देण्याचा प्रस्ताव मांडला. या पाठोपाठ अनुकंपा आणि सहृदयतेची लाटच निर्माण झाली. पूर्व आफ्रिका, न्यूझीलंड, लेबॅनॅान, मेक्सिको आणि आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानानेही पोरक्या पोलिशांचे यजमानपद स्वीकारले. बायकापोरांसह दरकोस दरमजल करीत भारतात आलेल्यांपैकी 1000 नागरिकांची सर्व जबाबदारी गुजराथचे महाराजा जामसाहेब दिग्विजयसिंगजी यांनी स्वीकारली आणि त्यांना जमिनीचा एक तुकडाच तोडून दिला. ही वार्ता जगभर पसरली आणि निर्वासितांचा ओघ भारताच्या दिशेने यायला सुरवात झाली. काही खुष्कीच्या मार्गाने चालत, तर काही पोराबाळांना ट्रकमध्ये बसवून अफगाणिस्तानमार्गे, तर काही समुद्रमार्गे भारतात आले. देशांच्याच नव्हे तर खंडांच्याही सीमा ओलांडून आश्रयाला आलेल्या या पाहुण्यांमुळे तेव्हापासून भारत आणि पोलंड यात सांस्कृतिक पातळीवर जे स्नेहानुबंध निर्माण झाले आहेत, ते आजही पिढ्या न पिढ्या टिकून आहेत. मिनी पोलंड - वलिवडे उर्फ गांधीनगर मुळात एकूण 1000 निर्वासितांना आश्रय देण्याचे ठरले होते. पण कोल्हापूर जिल्ह्यातील शिबिरच मुळी 5000 संख्येचे म्हणजे सर्वात मोठे होते. शिबिराचे स्थान होते कोल्हापूरजवळचे त्या वेळचे वलिवडे गाव. या गावातच रेल्वे स्टेशन लगतच्या जागेतील शिबिरात 1942 ते 1948 या काळात हे 5000 आश्रयार्थी आश्रयाला होते. शिबिराची रचना पोलिश खेड्याच्या धर्तीवर केली गेली. वलिवडे येथे त्यांची शाळा, महाविद्यालये आणि चर्चच नव्हे तर सिनेमा थिएटर सुद्धा गावकरांच्या सहकार्यातून व स्नेहातून उभे राहिले. त्यांची स्वत:ची प्रशासकासह स्वतंत्र प्रशासनव्यवस्था होती. गावाच्या मध्यभागी बाजारपेठ सजली होती. खास व्यवस्था म्हणून पोलंडमध्ये असतात तशी पांढरी डुकरे मांसाहारासाठी आणवली होती. कारण त्यांना दुसरे काही चालतच नसे. भारतीयांचीही दुकाने असत. पण ती गावाच्या परिघाच्या बाहेर असत. या पोलिश नागरिकांना स्वातंत्र्याची चव मायदेशानंतर प्रथम भारतातच चाखता आली. आजही त्यांच्यातील जीवित असलेल्यांपैकी कुणीना कुणी दरवर्षी वलिवडेला भेट देत असतात. ग्रामस्थ आणि सरपंच त्यांना सर्व संबंधित जागांची सफर घडवून आणतात आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. या वेळी, 2019 मध्ये, 29 जणांनी आपल्या भारतातील आगमनाचा 80 वा वाढदिवस साजरा केला होता. दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित फोटो व पेंटिंग्ज यांनी समृद्ध असलेल्या एका वास्तुसंग्रहालयाचे औपचारिक उद्घाटनसुद्धा यावेळी कोल्हापूरमध्ये पार पडले. पोलंडचे या अगोदरचे अध्यक्ष ब्रोनिस्लॅा कोमोरोव्हस्की यांनी महाराजा दिग्विजयसिंगजींचा कमांडर क्रॅास देऊन मरणोत्तर सत्कार केला होता. हे झाले भारतातले. पोलंडमधील वॅार्सा जिल्ह्याच्या ओकोटा गावातील एका चौकात महाराजांचा पुतळा उभारून त्या चौकाला महाराजांचे नाव देण्यात आले. तिथली एक शाळाही महाराजांचे नावाने ओळखली जाते. भारतातील चिमुकले पोलंड (ए लिटिल पोलंड इन इंडिया) या नावाचा भारत व पोलंड यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकाराला आलेला चित्रपट, भारताच्या उदार आश्रयाची व आश्रयार्थींच्या कृतज्ञतेची ही गाथा संपूर्ण जगाला कथन करतो आहे, करीत राहणार आहे. त्यावेळी भारताने दाखवलेल्या उदार दिलदारीची अंशत: परतफेड करण्याची संधी युक्रेनमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या भारतीयांचे स्वागत करतांना पोलंडला मिळाली आहे. आहे की नाही हा अपूर्व योगायोग!

No comments:

Post a Comment