My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, November 14, 2022
शी जिनपिंग - एका कलंकित नेत्याचे पुत्र
वसंत काणे. शुक्रवार, दिनांक :11/11/2022
शी जिनपिंग - एका कलंकित नेत्याचे पुत्र
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक१५/११/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
शी जिनपिंग - एका कलंकित नेत्याचे पुत्र
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर - 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
शी जिनपिंग यांचे वडील शी झोंगन हे एकेकाळी माओ झे डाँग यांचे घनिष्ट सहकारी, उपपंतप्रधान आणि गनिमी युद्धतंत्रातले निष्णात सेनापती होते. पण पुढे ते माओच्या मर्जीतून उतरले आणि त्यांची रवानगी श्रम छावण्यात (लेबर कॅंप) करण्यात आली. माओच्या हयातीतच त्यांचे पुनर्वसन झाले आणि त्यांना यथावकाश पूर्वीप्रमाणे प्रतिष्ठा प्राप्त झाली. शी जिनपिंग यांची पक्षात ज्येष्ठपदी वर्णी वडलांमुळेच लागली. म्हणजे वारशाचा फायदा झाला, असे म्हणता येईल. पण ते पक्षात कर्तृत्वाच्या भरवशावरचच हळूहळू वरवर चढत गेले आणि 2007 मध्ये ते जनरल सेक्रेटरीपदी पदोन्नत झाले. 2013 मध्ये तर ते सर्वोच्चपदी आरूढ झाले.
गेली 10 वर्षे शी जिनपिंग यांच्या कारकिर्दीत सर्व लोकशाही संकेत संपत गेले आहेत तसेच प्रथा आणि नियमही मोडीत निघायला सुरवात झाली आहे. खुद्द आपल्या वडलांच्या भूमिकेपासूनही त्यांनी स्वत:ला दूर ठेवले आहे. त्यांना झालेली शिक्षा योग्यच होती, असे शी जिनपिंग म्हणू आणि मानू लागले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा विशेष नोंद घ्यावा असा आहे.
शी जिनपिंग यांचे व्यक्तिमत्त्व समजण्यास अतिशय कठीण आहे. पण त्यांच्या भूमिकेचा भारतावर आणि जगावरही प्रतिकूल परिणाम होणार असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू समजून घेणे आवश्यक झाले आहे. या दृष्टीने अनेक अभ्यासकांनी घेतलेल्या आढाव्यात कमालीचे साम्य आढळते. कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायना च्या कारकिर्दीतच चीनचा भाग्योदय होईल असे जसे शी जिनपिंग मानतात तसेच आपला जन्मही यासाठीच झाला आहे, असेही त्यांचे ठाम मत आहे, हा मुद्दाही अभ्यासकांच्या नजरेतून सुटलेला नाही.
भ्रष्टाचारविरोधी मोहिमेने कारकिर्दीचा प्रारंभ
चीनमध्ये माओ युग संपले आणि भ्रष्टाचार बोकाळला. शी जिनपिंग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवातच मुळी भ्रष्टाचारविरोधी मोहीम आयोजित करून केली. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ते कायदे आणि नियम पारित करून घेतले. त्यामुळे शी जिनपिंग यांचा एकही प्रतिस्पर्धी त्यांना विरोध करू शकला नाही. तिसऱ्यांदा सर्वसत्ताधीश झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी एक द्विसूत्री कार्यक्रम हाती घेतला. पहिले असे की, जगातील राष्ट्रांनी चीनला नष्ट करण्या प्रणच केला आहे, अशा भीतीच्या छायेखाली त्यांनी जनतेला ठेवायचा प्रयत्न केला आणि दुसरे असे की, प्रखर राष्ट्रवादासाठीचे आवाहन करीत राष्ट्रवाद सतत जागृत ठेवायचा हा कार्यक्रम हाती घेतला.
शिक्षणाची पुनर्रचना
यासाठी शी जिनपिंग यांनी सुरवात म्हणून शालेय शिक्षणाची पुनर्रचना केली. त्यानुसार ‘नेत्यावर अविचल निष्ठा ठेवा. त्याच्या आदेशांचे तंतोतंत पालन करा’, हा मुद्दा आता बालपणातच मुलांच्या मनावर बिंबवला जातो. चीनच्या इतिहासाचे सोयीस्कर पुनर्लेखन करवून पूर्वसुरींचा देदीप्यमान इतिहासच तेवढा शिकवायला त्यांनी सुरवात केली. त्यांनी अगोदरपासून सुरू असलेल्या आर्थिक धोरणात लगेच बदल केला नाही पण त्याला विस्तारवादाची जोड मात्र दिली.
चीनचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय राजकारण
चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. जगातली एकपंचमांश लोकसंख्या चीनमध्ये आहे. त्यामुळे युद्धात जगात कितीही मोठा नरसंहार झाला तरी उरणाऱ्यात चिनी बहुसंख्येने असतीलच, याची इतर चिन्यांप्रमाणे शी जिनपिंग यांनाही खात्री आहे, अशा अफवा प्रसृत होत आहेत. चीनची सैनिकी शक्तीही प्रचंड आहे. कोणत्याही बाबतीत चीन फक्त अमेरिकेच्याच मागे आहे. जगातील सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आजही चीनमध्येच आहे. निर्यात करणाऱ्या देशात चीन जसा पहिला आहे तसाच तो तर हव्या त्याच वस्तूंची आयात होऊ देणाऱ्या देशातही पहिलाच आहे. जागतिक पुरवठा साखळ्या चीननेच सर्वात जास्त संख्येत उभारल्या आहेत. म्हणून जगातील राजनैतिक समीकरणे, लष्करी समीकरणे आणि आर्थिक समीकरणे आज चीनवर अवलंबून आहेत.
भारत चीनवर व्यापारासाठी इतका अवलंबून आहे की तो चीनवर बहिष्कार टाकूच शकणार नाही, ही चीनच्या ग्लोबल टाईम्सची दर्पोक्ती उगीच नाही. सामर्थ्याच्या भरवशावर चीन दक्षिण चिनी समुद्रात बेधडकपणे कृत्रिम बेटे उभारतो आहे, हॅांगकॅांगमध्ये दडपशाही करतो आहे, तैवानला धमक्या देतो आहे, भारताची कुरापत काढतो आहे आणि व्यापारात अमेरिकेला वाकुल्या दाखवतो आहे. एकेकाळच्या आपल्या मोठ्या भावाला म्हणजे रशियाला, युक्रेनप्रकरणी काय काय चुकले, याचे पाठ उझ्बेकिस्तानमधील समरकंद येथील परिषदेत देतांना दिसतो आहे.
मध्यमवर्गच नसलेला चिनी समाज
चीनच्या आर्थिक धोरणाला चिनी साम्यवाद असे नाव जरी देण्यात आले होते तरी ते साम्यवादाच्या मूळ सिद्धांताशी कितपत जुळत होते, ते सांगणे कठीण आहे. यानुसार काही व्यक्ती इतरांपेक्षा अगोदर श्रीमंत झाल्या पाहिजेत, असे आहे. या काही व्यक्तीत आपला समावेश करून फायदा उठवत पक्षातले नेते, मोक्याच्यापदावर आरूढ असलेले प्रशासकीय आणि लष्करातील अधिकारी आणि यांचे कुटुंबीयच श्रीमंत होऊन संपत्ती धारण करते झाले. पुढे जेव्हा उदारीकरणाची नीती स्वीकारली गेली तेव्हा हेच उद्योजक म्हणून पुढे आले. बाकीचे समाज घटक, होते तिथेच राहिले. चीनमध्ये मध्यमवर्ग तर निर्माणच झाला नाही. मध्यमवर्ग ना धड श्रीमंत असतो ना धड गरीब. पण यांच्याच खांद्यावर नैतिकतेचा वेताळ आरूढ असतो, असे म्हणतात. श्रीमंतास नैतिकतेची अडचण होत असते तर गरिबास नैतिकतेची चैन परवडत नसते, असे म्हणतात. मध्यमवर्गाची अशी हेटाळणी होत असली मध्यम वर्गाचे प्रमाण आणि त्या घटकातील अस्वस्थताच सामाजिक, आर्थिक एवढेच नव्हे तर राजकीय बदलास कारण होत असते, असे मानतात. मध्यमवर्गीयांच्या संख्येवरून समाजाच्या आर्थिक स्थितीचे आणि आर्थिक वाढीचे निदान करता येते. तसेच एखाद्या समाजात महिलांचे स्थान कोणत्या दर्जाचे आहे, हेही मध्यमवर्गीयांच्या संख्येवरून कळत असते. चीनमध्ये विकासामुळे दुकाने, पेठा सजल्या पण विकत घेऊ इच्छिणाऱ्यांच्या खिशात पैसेच नव्हते. अपार्टमेंट्स उभी झाली, पण ग्राहकाअभावी ती तशीच पडून राहिली. भेटीला येणाऱ्या पाहुण्यांच्या नजरेला या ओसाडवाड्या पडू नयेत म्हणून त्या भल्यामोठ्या पडद्यांनी झाकून ठेवल्यात जातात, असे सांगतात.
शी जिनपिंग यांनी हे आर्थिक धोरण बदलायचा प्रयत्न केला तो 2021 मध्ये. त्यांनी आर्थिक विकासनीतीत आमूलाग्र बदल करून सर्वसमावेशकतेचे धोरण स्वीकारले आहे. त्याच्या यशापयशाबद्दल एवढ्याच बोलता येणार नाही. देशांतर्गत बाजारपेठेचे फळणे फुलणे, उच्च आणि कनिष्ठ मध्यमवर्गाच्या भरवशावरच फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते, हे ‘साम्यवादी’ चीनला कळू लागले आहे, असे फारतर सद्ध्या म्हणता येईल.
बेल्ट अॅंड रोड द्वारे जगस्पर्श
देशातील संपत्ती वाढली आणि लष्करी सामर्थ्यही विकास पावले. पुढे काय? बेल्ट अॅंड रोड प्रकल्पातून या विकासाला चीन वेगळीच जगस्पर्शी वाट उपलब्ध करून देऊ इच्छितो आहे. कर्ज देणे, पोलाद, सीमेंट पुरविणे, रस्ते, बंदरे, विमानतळ बांधून देणे अशा प्रकल्पाद्वारे जगातील शंभरावर देश चीनचे मिंधे झाले आहेत. कारण ते कर्जाची परतफेड करूच शकणार नाहीत. ‘अर्थेन दासता’, या न्यायाने या मिंध्यांच्या मतांच्या भरवशावर चीनने आज अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांवर आपली पकड मजबूत करायला सुरवात केली आहे. भारताने बेल्ट अॅंड रोड प्रकल्पात सहभागी होण्याचे नाकारताच चीनचा तिळपापड झाला. याची दोन कारणे संभवतात. एकतर आपल्याला नकार दिलेला चीनला सहन होत नाही. दुसरे कारण असे संभवते की, भारताचे अनुकरण इतर देशांनी करायला सुरवात केली तर काय करायचे? डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेत अध्यक्षपदावर आल्यानंतर चीन आणि अमेरिका यात व्यापार आणि चलन युद्ध निर्माण झाले याच्या मुळाशीही अमेरिकेने चीनला विरोध करायला सुरवात केली हे आहे, असे अनेकांचे मत आहे.
शी जिनपिंग यांच्या समर्थकांचाच भरणा
कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायनामध्ये हू जिंताओ यांचा यूथ लीग ग्रुप, झियांग झेमीन यांचा शांघाय ग्रुप आणि शी जिनपिंग यांचा गट असे तीन गट होते. पहिले दोन गट आज नष्टप्राय झाले आहेत, यावरून काय ते समजावे. राष्ट्राध्यक्षांसाठीची पाच वर्षांच्या दोन कालखंडांची मर्यादा 2018 मध्येच शी जिनपिंग यांनी हटविली होती. पक्षाचे संस्थापक माओ झे डॅांग यांच्यानंतर तिसरा कार्यकाळ मिळालेले ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष असतील. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात अगोदर मध्यवर्ती समितीची निवड झाली नंतर याच समितीने पोलिटब्युरोचे सदस्य निवडले. यातील एकूणएक शी जिनपिंग यांचा आजतरी कट्टर समर्थक आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी आर्थिकक्षेत्र वगळले तर चीनमध्ये राजकीय, सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षा या आघाड्यांवर कायापालटच घडवून आणला आहे.
शी जिनपिंग यांचे निष्ठावान, कार्यक्षम आणि कामसू व्यक्तिमत्त्व!
अनेक अभ्यासकांनी जरी शी जिनपिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असला तरी त्यात साम्य असलेले मुद्देच अधिक आहेत. शी जिनपिंग यांच्या वाट्याला राजकीय वारसा आलेला आहे. त्यांचे वडील उपपंतप्रधाान होते. या वारशाचा त्यांना फायद्याप्रमाणे तोटाही झालेला आहे. या वारशामुळेच ते जन्मापासूनच सत्ताकेंद्राच्या जवळ सतत राहू शकले, हा जसा फायदा झाला तसाच साम्यवादी पक्षाच्या इतिहासासंबंधी लिहिलेल्या चाकोरीबाहेरच्या एका कादंबरीचा पुरस्कार केल्यामुळे, 1962 या वर्षी शी जिनपिंग यांचे वडील शी झॅांगशन माओंच्या मनातून उतरले आणि त्यांना 16 वर्षांसाठी कारखान्यात काम करण्याची शिक्षा झाली तेव्हा लहान वयातच शी जिनपिंग एका कलंकित नेत्याचे पुत्रही ठरले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment