My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, November 28, 2022
डेमोक्रॅट पक्षाचे तिहेरी यश गेले, पण…
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक२९/११/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
डेमोक्रॅट पक्षाचे तिहेरी यश गेले, पण…
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail-kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
8 नोव्हेंबर 2022 ला अमेरिकेत मध्यावधी निवडणुका पार पडल्या. या काळपर्यंत अध्यक्ष ज्यो बायडेन यांची निम्मी कारकीर्द पार पडलेली असल्यामुळे यांना मध्यावधी निवडणुका म्हणावयाचे. ज्यो बायडेन यांच्या निम्म्या कार्यकाळाचे मूल्यमापन या निमित्ताने मतदारांनी केले आहे, असे मानले जाते. ही निवडणूक हाऊस आॉफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या म्हणजेच प्रतिनिधी सभेच्या सर्वच्या सर्व, म्हणजे 435 जागांसाठी, सिनेटच्या 100 पैकी, 6 वर्षांची मुदत संपलेल्या सदस्यांच्या 35 जागांसाठी आणि 36 राज्ये व तीन टेरिटोरियल गव्हर्नरांच्या पदांसाठी पार पडली. आपल्या राज्यसभेप्रमाणे अमेरिकेतही सिनेटचे 1/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात. यावेळी मात्र 34 ऐवजी 35, जागांसाठी निवडणूक झाली कारण एक जागा आकस्मिक कारणांमुळे निर्माण झाली होती. याखेरीज ॲटर्नी जनरल, राज्यांचे परराष्ट्र सचिव, अनेक शहरांचे महापौर आदी अनेक पदांसाठीची निवडणूकही याचवेळी घेतली गेली. अमेरिकेत सर्व निवडणुका एकाच दिवशी घेतल्या जातात, त्या अशा.
निवडणुकीची तारीख कशी ठरते?
अमेरिकेच्या घटनेनुसार दर दोन वर्षांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतरच्या पहिल्या मंगळवारी मतदान होते. यावर्षी नोव्हेंबर महिन्यातला पहिला सोमवार 7 तारखेला आला आहे. आणि पहिल्या सोमवार नंतरचा पहिला मंगळवार अर्थातच 8 तारखेला आला. म्हणून 8 नोव्हेंबरला 2022 ला मतदान झाले. या निवडणुकीत अध्यक्ष मात्र निवडला गेला नाही, कारण त्याचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. तर हाऊसचा कार्यकाळ दोन वर्षांचाच असल्यामुळे हाऊसमधील 435 प्रतिनिधींचीच निवडणूक झाली.
हाऊसमध्ये 435 प्रतिनिधी कोणत्या नियमानुसार ?
8 नोव्हेंबरला 2022 ला झालेल्या निवडणुकीत हाऊसमध्ये म्हणजे कनिष्ठ सभागृहात रिपब्लिकन पक्षाला निसटते बहुमत मिळाले आहे. 435 प्रतिनिधींच्या हाऊसमध्ये प्रत्येक राज्याला त्या राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असते. भारताप्रमाणेच मतदार संघ असतात. तसेच राज्य कितीही लहान असले तरी त्याला किमान एक तरी प्रतिनिधी हाऊसमध्ये मिळतोच. जसे, हवाई बेटे. कॅलिफोर्नियात अमेरिकेतील 12 टक्के लोक राहतात आणि म्हणून हाऊसमध्ये कॅलिफोर्नियाला 53 प्रतिनिधी मिळाले आहेत. टेक्सासमध्ये 8.5 टक्के लोकसंख्या व म्हणून हाऊसमध्ये त्या राज्याचे 36 प्रतिनिधी आहेत. फ्लोरिडा व न्यूयॅार्क मध्ये प्रत्येकी 6 टक्के लोकसंख्या व म्हणून हाऊसमध्ये 27 प्रतिनिधी आहेत. उरलेल्या राज्यात उरलेली लोकसंख्या राहते व म्हणून त्यांचे हाऊसमध्ये त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधी आहेत.
अमेरिकेची लोकसंख्या जवळजवळ 33 कोट असून क्षेत्रफळ ठोकळमानाने 1 कोटी चौरस किलोमीटर आहे. देशात एकूण 50 राज्ये आहेत. यापैकी 48 राज्ये सलग आहेत तर मागे केव्हातरी रशियाकडून विकत घेतलेले अलास्का आणि जपानजवळची हवाई बेटे ही राज्ये भौगोलिक दृष्ट्या सलग नाहीत. ती मुख्य भूमीपासून दूर आहेत.
सिनेटमध्ये 100 सिनेटर्स कोणत्या नियमानुसार?
सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे. सिनेटमध्ये 50 राज्यांमधून प्रत्येकी 2 असे 100 सदस्य असतात. मग ते राज्य हवाईसारखे लहानसे असो वा कॅलिफोर्नियासारखे सर्वात मोठे असो. उपराष्ट्राध्यक्ष (सध्या कमला हॅरीस) हा सिनेटचा पदसिद्ध सभापती असतो. मतदानावेळी समसमान मते झाली, तर निर्णायक मत देण्याचा अधिकार सभापतीला असतो.
सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत कायम राहिले आहे. निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे 28 राज्यात गव्हर्नर होते. अमेरिकेत गव्हर्नर प्रत्यक्ष निवडणुकीने राज्यातील सर्व मतदारांच्या मतदानानुसार निवडला जातो. गव्हर्नरची तुलना आपल्या येथील मुख्यमंत्र्याशी करता येईल. तीन राज्ये रिपब्लिकन पक्षाच्या हातून निसटली आणि डेमोक्रॅट पक्षाकडे आली. आता 25 राज्यातच रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर असतील. तसेच 24 म्हणजे जवळजवळ तेवढ्याच राज्यात डेमोक्रॅट पक्षाचे गव्हर्नर असतील. अलास्काचा निकाल यायचा आहे. मध्यावधीत एवढे यश सत्ताधारी पक्षाला 1934 नंतर पहिल्यांदाच मिळते आहे.
हाऊसमध्ये 435 जागा असतात. म्हणजे बहुमतासाठी 218 जागा हव्यात. 2020 मध्ये डेमोक्रॅट पक्षाला 222 तर रिपब्लिकन पक्षाला 213 जागा मिळाल्या होत्या. 2022 च्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला 48% मते व 212 जागा तर रिपब्लिकन पक्षाला 52% मते पण 219 जागा मिळाल्या आहेत. यांची बेरीज 431 होते. चार जागाचे निकाल लवकर येणार नाहीत. ते कसेही लागले तरी सध्याच रिपब्लिकन पक्षाला 219 जागा मिळालेल्या असल्यामुळे त्यांचे हाऊसमधील बहुमत नक्की झाले आहे. या चारही जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाल्या तरी त्यांच्या जागा 223 च होतील. हे निसटते बहुमत आहे. मध्यावधी निवडणुकीत सामान्यत: विद्यमान अध्यक्षाच्या पक्षाच्या, हाऊस आणि सिनेटमधील जागा, कमी होत असतात. हे मतदारांच्या नाराजीमुळे (अॅंटिइन्कंबन्सीमुळे) होत असते. ज्यो बायडेन यांच्या कारकिर्दीची 2 वर्षे पूर्ण झाल्यानंतरची मतदारांची नाराजी या निवडणुकीतही दिसली पण अपेक्षेप्रमाणे भरपूर दिसली नाही. यावेळी रिपब्लिकन पक्षाची लाट दिसून येईल असे निवडणूक पंडितांचे भाकित होते ते चुकीचे ठरले. लढत अटीतटीचीच राहिली. पत्रपंडितांच्या अपेक्षेप्रमाणे एकतर्फी झाली नाही. रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्यात म्हणजे, फ्लोरिडा, टेनसी आणि टेक्सास या राज्यात त्यांना हाऊसमध्ये 2020 च्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या हे खरे आहे. तसेच डेमोक्रॅट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या न्यूयॅार्क प्रांतातही त्यांनी अनपेक्षित अशी मुसंडी मारली आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला हाऊसमध्ये निसटते बहुमत मिळाले, हेही खरे. पण 52% मते मिळूनही अपेक्षेइतक्या जास्त जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाल्या नाहीत. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षच्या बाजूची लाट नव्हती, हे नक्की.
पण सिनेटच्या निवडणुकीत तर मतदार रिपब्लिकनांच्यावर फार मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसून आले. सिनेटमध्ये डेमोक्रॅट पक्षाला 2020 प्रमाणे बहुमत मिळाले आहे. म्हणजे त्यांना दोन अपक्ष धरून 50 जागा मिळाल्या आहेत. डेमोक्रॅट पक्षाच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस या सिनेटच्या पदसिद्ध अध्यक्षा आहेत. त्यांना टाय ब्रेकिंग व्होट (समसमान मते पडल्यास द्यावयाचे निर्णायक मत) देण्याचा अधिकार असतो. रिपब्लिकन पक्षाला 49 जागा मिळाल्या आहेत. एका जागेचा निकाल यायचा आहे ती जागा रिपब्लिकनांना मिळाली तरी त्यांच्याही जागा 50 म्हणजे डेमोक्रॅट पक्षाइतक्याच होतील. पण डेमोक्रॅट पक्षाचे सिनेटधील बहुमत उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्या टाय ब्रेकिंग व्होट मुळे निश्चित आहे. हा विजय डेमोक्रॅट पक्षासाठी फार मोठा मानला जातो. कारण सत्ताधारी पक्षाला मध्यावधीत असे यश 1934,1962 आणि 2002 नंतर प्रथमच मिळाले आहे.
अमेरिकन राज्य घटनेतील आर्टिकल 1 मधील तरतुदीनुसार कायदे शाखेला ( लेजिस्लेटिव्ह ब्रॅंचला) अमेरिकन कॅांग्रेस असे नाव आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेव्ह आणि सिनेट यांची मिळून अमेरिकन काँग्रेस बनलेली आहे. कायदे करणे, युद्ध जाहीर करणे, अध्यक्षांनी केलेल्या नेमणुकींना मान्यता देणे किंवा त्या फेटाळणे, चौकशी करणे असे अधिकार घटनेने कॅांग्रेसला दिले आहेत.
हाऊसचे अधिकार
आर्थिक विधेयके मांडणे, संघीय आधिकाऱ्यांवर महाभियोग चालविणे (इंपीच), आणि इलेक्टोरल कॅालेजमध्ये अध्यक्षाची निवड करतांना समसमान मते पडली तर अध्यक्षाची निवड करणे असे महत्त्वाचे अधिकार हाऊसला आहेत.
सिनेटचे अधिकार
लहान राज्ये आणि मोठी राज्ये यांना प्रत्येकी दोन प्रतिनिधी सिनेटमध्ये दिले आहेत. मोठ्या राज्यांचा वरचष्मा निर्माण होऊ नये, यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. लहान राज्यांचे हितसंबंध जपण्यासाठी घटनाकारांनी हा उपाय योजला आहे. हाऊसमध्ये बिले (50%+1) अशा साध्या बहुमताने पास करता येतात. सिनेटमध्ये मात्र ⅔ म्हणजे 60 मते मिळाली तरच बिले पास होऊ शकतात. अध्यक्षांनी केलेल्या वकिलांच्या, न्यायाधिशांच्या नियुक्त्या कायम (कन्फर्म) करणे किंवा पेटाळणे, करारांना मंजुरी (रॅटिफाय) देणे किंवा ते फेटाळणे, परकीयांशी व्यापारविषयक बाबींसंबंधीच्या करारांना सिनेट आणि हाऊसचीही संमती आवश्यक असेल. हाऊसकडून आलेल्या महाभियोगाच्या प्रकरणी सुनावणी करून निर्णय घेणे, हा सिनेटला मिळालेला पार मोठा अधिकार मानला जातो.
दोन्ही सभागृहांनी पारित केलेली बिलेच अध्यक्षाकडे स्वाक्षरीसाठी पाठविता येतील. अध्यक्ष व्हेटोचा अधिकार वापरू शकेल पण असे बिल प्रत्येक सभागृहाने दोनतृतियांश मतांनी पुन्हा पारित केल्यास व्हेटो निरसित (ओव्हरराईड) होईल.
ट्रायफेक्टस किंवा तिहेरी यश नाही.
2020 च्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला तिहेरी यश मिळाले होते. याला ट्रायफेक्टस असे संबोधतात. याचा अर्थ अध्यक्ष ज्या पक्षाचा त्याच पक्षाचे हाऊस व सिनेटमध्ये बहुमत असणे हा आहे. 2020 च्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला असे तिहेरी यश मिळाले होते. पण यावेळी 2022 मध्ये हाऊसमध्ये डेमोक्रॅट पक्षाचे बहुमतच राहिलेसे नाही. यामुळे बिले पारित करण्याचे बाबतीत बायडेन यांना अडचणींचा सामना करावा लागेल.
कोरोनाची हाताळणी, रशिया-युक्रेन युद्ध, महागाई, येऊ घातलेली मंदी, गर्भपातविरोधी कायदे, गोळीबाराच्या घटनांवर परिणामकारक उपाययोजना, 6 जानेवारी 2020 ला ट्रंपसमर्थकांनी कॅपिटॅालवर केलेल्या हल्याचे संदर्भात लोकशाहीची जपणूक करून ती टिकवण्यासाठीचे प्रयत्न, असे मुद्दे या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षासाठी उपयोगाचे आणि महत्त्वाचे ठरले. या निकालात नाराजी निदर्शक (अँटी इन्कंबन्सी) बाबींचा प्रभाव नक्कीच जाणवतो आहे पण त्याचबरोबर मध्यावधीत सामान्यत: न दिसणारी मतदारांची राजीदर्शक (प्रोइन्कंबन्सी) मानसिकताही दिसून येते, हे विशेष म्हटले पाहिजे. थोडक्यात काय की, हा निकाल जसा डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने आहे तसाच तो रिपब्लिकनांच्या विरोधातही नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment