My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, November 7, 2022
शी जिनपिंग = गोर्बाचेव्ह नाही, तर स्टॅलिन+ माओ
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक ०८/११/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
शी जिनपिंग = गोर्बाचेव्ह नाही, तर स्टॅलिन+ माओ
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर - 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
नुकत्याच म्हणजे 16 ऑक्टोबर 2022 ते 22 ऑक्टोबर 2022 या काळात कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायना (सीपीसी) च्या बेजिंग येथील कुप्रसिद्ध तियानमेन चौकातील दी ग्रेट हॅाल ॲाफ दी पीपल या मध्यवर्ती सभागृहात पार पडलेल्या पंवार्षिक संमेलनात नवीन असे विशेष काही ठरणार नाही, जुनेच धोरण अधिक नेटाने पुढे रेटण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी जी राजकीय विश्लेषकांची अपेक्षा होती ती पुष्कळशी खरी ठरली आहे. 1989 याच चौकात प्रदर्शनकरी विद्यार्थ्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. अनपेक्षित पण असेच काहीसे याहीवेळी घडले. ज्या सभेत शी जिनपिंग तिसऱ्यांदा सर्वोच्चपदाची विराजमान झाले, त्याच सभेत त्यांच्या शेजारीच डाव्या हाताला बसलेल्या आणि त्यांच्या आधी चीनमध्ये सर्वोच्चपदावर असलेल्या, माजी अध्यक्ष हू जिंताओ यांना या महासभेतून 2300 प्रतिनिधींच्या समोर हुसकावून लावण्यात आल्याचे दृश्य साऱ्या जगाने पाहिले. यावेळी व्यासपीठावर शी जिनपिंग यांच्या उजव्या हाताला पंतप्रधान ली केकियांग हे क्रमांक दोनचे नेते बसले होते. ते दृश्य सर्व जगाला व्यवस्थित दिसावे अशीच व्यवस्था करण्यात आली होती किंवा कसे, ते सांगता येणार नाही. ज्या हू जिंताओ यांना हुसकावून लावण्यात आले, त्यांच्या कार्यकाळात चीनची आर्थिक प्रगती वेगाने झाली होती. शी जिनपिंग यांच्या कार्यकाळातच आर्थिक प्रगतीचा वेग अतिशय मंदावला आहे. म्हणजे हू जिंताओ यांची कारकीर्द शी जिनपिंग यांच्या तुलनेत निदान आर्थिक दृष्ट्या तरी उजवी ठरते, असे म्हणायला हवे. पक्षातल्या आणि सरकारमधल्याही विरोधकांना या दृश्याच्या निमित्ताने स्वत: एक शब्दही न उच्चारता शी जिनपिंग यांनी काय जाणवून दिले असेल, ते सांगण्याची आवश्यकता नसावी. माओनंतर शी जिनपिंग हेच त्यांच्या नंतरचे तसेच आणि तेवढेच शक्तिमान नेते ठरणार आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सामर्थ्यशील असलेला चीन आता अधिक आक्रमक होणार आहे. शी जिनपिंग चीनची मंदावलेली अर्थकारणाची गती आता पुन्हा रुळावर आणायची आहे. पण चिनी समाज वयस्क होत चालला असल्यामुळे चीनला तरूण मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे, आहे त्या मनुष्यबळावर, खूप ताण पडतो आहे. सेवानिवृत्त ब्रिटिश पायलटांना भरपूर पगार देऊन स्थानिक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षक म्हणून नेमल्याच्या वार्ता समोर आल्या आहेत, हे वृत्त या दृष्टीने पुरेसे बोलके आहे. नागरिकांमधला असंतोष शमवण्यासाठी तैवान आणि लडाख प्रकरणी काहीतरी नेत्रदीपक करून दाखविण्याशिवाय शी जिनपिंग यांच्या हाती आता विशेष काही उरले नाही. म्हणून तैवानला आणि लडाख प्रकरणी भारताला अधिक सावध रहावे लागणार आहे, हे निश्चित आहे. याशिवाय चीन नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, मालदीव आदी देशांना भारतविरोधी भूमिका घ्यायला भाग पाडील, ते वेगळेच. त्याचप्रमाणे पाकिस्तानला तर भारताविरुद्धच्या उपद्रवी कारवाया करण्याचे बाबतीत आणखी चेव येईल, यातही शंका नाही. पण याचवेळी याही बाबीची नोंद घेतली पाहिजे की, शी जिनपिंग यांनी स्वत: आजवर एकदाही भारताचा स्पष्ट नामोल्लेख करीत विरोधी वक्तव्ये केलेली नाहीत आणि मोदींनीही अगदी तीच नीती अवलंबिली आहे, यावरही अनेक निरीक्षकांनी बोट ठेवले आहे. पण मग कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायना (सीपीसी) च्या बेजिंग येथे पार पडलेल्या पंचवार्षिक अधिवेशनात सुरवातीलाच गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात चिनी सैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या क्वी फाबाओ या कमांडरचा सन्मान करून आणि चित्रफीत दाखवून चीन भारताला कोणता इशारा देऊ इच्छितो आहे? का या संघर्षात चीनच वरचढ होता, अशी चिनी जनतेची दिशाभूल करण्यासाठीचा हा खटाटोप आहे? या संघर्षात चीनचे फक्त 4च म्हणजे अतिशय कमी सैनिक गारद झाले असा चीनचा दावा आहे. तटस्थ माध्यमे सुद्धा चीनचे अनेक सैनिक, म्हणजे 40 ते 60 सैनिक, यावेळी यमलोकी पोचले, त्यांच्या नव्याने बांधलेल्या कबरीही त्याच भागात दिसत आहेत, हे छायाचित्रे दाखवून सांगतात, त्याचे काय? असे म्हणतात की, चीनच्या दाव्यावर चिनी जनताच विश्वास ठेवण्यास तयार नाही. म्हणून हा चित्रफीत दाखवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठीचा खटाटोप आहे. हे काहीही असले तरी उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुरवातच या चित्रफीत दाखवण्याच्या घटनेने झाली याची भारताने गंभीर दखल घेतली पाहिजे, हे मात्र नक्की.
ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएटनाम, फिलिपीन्स या देशांनी तर आपली सैनिकी शक्ती वेगाने वाढविण्यास सुरवात केली आहे आणि वेळीच सावधगिरीचे पाऊल उचलले आहे.
शी जिनपिंग यांच्या जीवनाविषयी पाश्चात्य लेखकांनी विपुल लेखन केलेले आढळते. भारतीय वृत्तसृष्टीतील अनेक लेखकांनीही त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी, त्यांच्या रणनीतीविषयी, आर्थिक नीतीविषयी, शिक्षण नीतीविषयी निरनिराळ्या निमित्ताने लेखन केलेले आहे. त्यांचे अवलोकन केले तर क्वचितच मूलभूत मतभेदाचे मुद्दे आढळतात. बांबू कर्टन भेदून किंवा त्यातून झिरपत येणाऱ्या बातम्यातूनही पुष्कळसे समान चित्रच उभे राहतांना दिसते. भारतीय लेखकांपैकी काही चीनमध्ये जाऊन आलेले आहेत तर काही परराष्ट्रव्यवहार खात्यातील वरिष्ठ अधिकारपदावर काम केलेले किंवा करणारे किंवा अन्यप्रकारे जाणकार आहेत.
शी जिनपिंग = स्टॅलिन+माओ
शी जिनपिंग हे चीनचे गोर्बाचेव्ह सिद्ध होतील, असे भविष्य 2012 या वर्षी एका राजकीय निरीक्षकांने वर्तवले होते. त्या वर्षी शी जिनपिंग हे चीनमध्ये सर्वोच्चपदी प्रथम आरूढ झाले होते. मिखाईल सेर्गेयेव्हिच गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएट रशियात 1985 ते 1991 या कालखंडात राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. यांच्या कार्यकाळातच सोव्हिएट रशियाचे 15 राष्ट्रांमध्ये विभाजन झाले होते. सोव्हिएट युनीयन मधील ते देश असे आहेत. 1) रशिया 2) युक्रेन 3) बेलारस 4) उझबेकिस्तान 5) कझाकस्तान 6) जॅार्जिया 7) अझरबाईजान 8) लिथुॲनिया 9) मोल्डोव्हा 10) लॅटव्हिया 11) किर्गिस्तान 12) ताजिकीस्तान 13) आर्मेनिया 14) तुर्कमेनिस्तान 15) इस्टोनिया ही ती 15 राष्ट्रे होत. झपाट्याने खालावत चाललेल्या सोव्हिएत युनीयनची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी त्यावेळी सत्तेवर आलेल्या गोर्बाचेव यांनी परिस्थिती सुधारण्याच्या हेतूने ग्लास्नोस्त (पारदर्शकता) व पेरेस्त्रोयका (पुनर्रचना) ही दोन धोरणे जाहीर केली होती. शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेव यांनी केलेल्या प्रयत्नांची इतिहासाने आवर्जून नोंद घेतली आहे. सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतल्यामुळे सोव्हिएत युनीयनचे विघटन झाले. हा तपशील यासाठी महत्त्वाचा ठरतो की, शी जिनपिंग हेही अशीच उदारमतवादी भूमिका घेतील, असा अंदाज या भाष्यकाराने बांधला होता.
पण प्रत्यक्षात घडले ते नेमके याच्या विरुद्ध आहे. शी जिनपिंग यांच्या कारकिर्दीत 90% जनता एकाच हान वंशाची पण 50 भाषा बोलणाऱी असलेला चीन टोकाचा विस्तारवादी झाला. उदारमतवाद तर सोडाच, चीनमध्ये जनतेवर पोलादी पकड लादली गेली. ग्लास्नोस्त (पारदर्शकता) लयाला गेली आणि पेरेस्त्रोयका (पुनर्रचना) झाली, पण ती मोकळेपणा संपवणारी झाली. म्हणून कदाचित आणखी एका राजकीय निरीक्षकाने टिप्पणी करीत म्हटले आहे की, गोर्बाचेव्ह नाही, तर शी जिनपिंग हे स्टॅलिन+माओ झाले आहेत. हे दोघेही अनुक्रमे रशिया आणि चीनमधले अतिशय क्रूर आणि हुकुमशाही वृत्तीचे शासक मानले जातात. शी जिनपिंग यांनी तर या दोघांवरही कडी केली आहे, असे या निरीक्षकाला नोंदवायचे आहे, असे दिसते आहे.
शी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायना (सीपीसी) चे जनरल सेक्रेटरी आणि सेंट्रल मिलिटरी कमीशनचे 2012 पासूनच अध्यक्ष होते. ते 2013 या वर्षी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचेही अध्यक्ष झाले. त्यापूर्वी 2008 ते 2013 या कालखंडात ते चीनचे उपाध्यक्ष होते. त्यांचा जन्म 15 जून 1953 चा, म्हणजे चीनमध्ये 1948 या वर्षी क्रांती झाल्यानंतरचा, म्हणजे स्वतंत्र आणि साम्यवादी चीनमधला आहे.
अपेक्षाभंग
10 वर्षांपूर्वी शी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायना (सीपीसी) चे जनरल सेक्रेटरी पदी पदोन्नत झाले आणि अनेकांना एक उदारमतवादी नेता सत्तेवर आल्याचा आनंद झाला. जियांग झेमिन आणि हु जिंतोव्ह प्रमाणे हा नेताही यापुढे चीनमध्ये वेगळी भूमिका पुढे राबवील असे त्यांना वाटले होते. माओनंतर चीनमध्ये एकाधिकारशाहीला काहीशी उतरती कळा लागली होती. माओच्या क्रूरतेविरुद्धची ही प्रतिक्रियाच होती म्हणाना. कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायना (सीपीसी) उदारमतवादी दृष्टीकोण स्वीकारू लागली होती, पक्षांतर्गत लोकशाही विकास पावू लागली होती, एकाधिकारशाही ऐवजी सामूहिक नेतृत्व उदयाला येत चालले होते. हे धोरण शी जिनपिंग पुढे रेटतील असा भरवसा निर्माण झाला होता आणि चीनमध्येही एक गोर्बाचेव्ह उदयाला येईल, अशी अनेकांची अपेक्षा होती. पण कसचं काय अन् कसचं काय! पुढे जेव्हा शी जिनपिंग घटनेतील तरतुदीत अपवाद घडवून आणणार आणि तिसऱ्यांदा (नव्हे तहाहयात) सत्तेवर राहणार हे जगासमोर समोर आले तेव्हा मिखाइल गोर्बाचेव्ह नव्हे तर स्टॅलिन आणि माओ यांचे संयुक्त व्यक्तिमत्त्व चीनमध्ये सत्तारूढ होणार हे स्पष्ट झाले.
जसा हा, तसाच तो
काही समीक्षक मात्र शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यात साम्ये शोधतात, ती अशी. पुतिन यांनी आधी युक्रेनचा क्रीमिया प्रांत गिळंकृत केला आणि नंतर युक्रेनचे चार प्रांत खालसा केले. शी जिनपिंग यांनी हाँगकाँगवर हात मारल्यानंतर आता तैवान ताब्यात घेण्याचा डाव रचला आहे. अमेरिका दोघांचाही समान शत्रू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे दोन्ही हुकुमशहा, स्वत:ला साम्यवादी म्हणवणारे, आपापल्या देशावर मजबूत पकड असलेले, तहाहयात सत्तेवर राहता यावे म्हणून घटनाच बदलणारे, येताजाता पूर्ववैभवाचे माहात्म्य गाणारे, इतरांसमोर परस्पर मैत्रीचे ग्वाही देणारे पण आपापसात स्पर्धाभाव जोपासणारे, विरोधकांचे उघडउघड समूळ उच्चाटन करणारे, माघारलेली अर्थव्यवस्था स्वकीयांच्या आणि परकीयांच्याही नजरेस पडू नये म्हणून निरनिराळ्या कृप्त्या योजणारे, विस्तारवादाचा आधार घेत नागरिकांना प्रक्षुब्धावस्थेत ठेवणारे, म्हणून जसा हा, तसाच तो, यावर हे समीक्षक भर देतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment