Monday, February 27, 2023

 पर्यटनामागचा असाही एक नवीन हेतू 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २७/०२/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     



पर्यटनामागचा असाही एक नवीन हेतू
 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   पर्यटन ही संज्ञा प्रवास (टूर) या शब्दाशी संबंधित आहे आणि टूर हा शब्द लॅटिन भाषेतील टॅार्नॅास'  या शब्दापासून आलेला आहे. टॅार्नॅास' या शब्दाचा मूळ अर्थ वर्तुळाकार असा आहे. याच शब्दापासून पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला आहे. एका व्यक्तीने किंवा व्यक्तीसमूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. याशिवाय पर्यटनाचा आणखी एक नवीन प्रकार  रशियन महिलांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. यासाठी त्या अर्जेंटिना या  दक्षिण अमेरिकेतील देशाला विशेष प्राधान्य देत आहेत.  

   अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनॉसऐरस ही आहे. अल्बर्टो फर्नांडिस अध्यक्ष असलेल्या या देशाची  लोकसंख्या ४ कोटी इतकी कमी आणि देशाचे क्षेत्रफळ मात्र २८ लाख चौरस किलोमीटर एवढे मोठे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा देश आहे.  भारताची लोकसंख्या 140 कोटी एवढी प्रचंड  आणि क्षेत्रफळ 33 लाख चौरस किलोमीटर असून तो जगातला सातवा मोठा देश आहे. म्हणजे क्षेत्रफळाचा विचार करता भारत आणि अर्जेंटिना या  दोन्ही देशांच्या क्षेत्रफळात फारसा फरक नाही. पण लोकसंख्येत भारत कितीतरी मोठा आहे. कुठे 4 कोटी आणि कुठे 140 कोटी! 

  टागोर आणि अर्जेंटिना 

  अर्जेन्टिनाच्या उत्तरेस पेराग्वे व बोलिव्हिया, ईशान्येस ब्राझील व उरुग्वे, पश्चिमेस चिली हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. अर्जेन्टिना देशाचा धर्म ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश व इटालियन भाषा बोलल्या जातात. रवींद्रनाथ टागोर यांनी 1924 मध्ये अर्जेंटिनाला भेट दिली होती. अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध लेखिका व्हिक्टोरिया ओकॅम्पोचे पाहुणे म्हणून ते दोन महिने तिथे राहिले. टागोरांनी अर्जेंटिनामधील त्यांच्या वास्तव्याबद्दल "पूरबी" या शीर्षकाखाली कवितांची मालिका लिहिली आहे. व्हिक्टोरिया ओकॅम्पो यांना 1968 मध्ये विश्व भारती विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली.

    दक्षिण अमेरिकेचा दक्षिणेकडचा बहुतेक भाग अर्जेंटिनाने व्यापला आहे.  या देशात विस्तीर्ण हिरवळी प्रदेश, तशीच वाळवंटे, जंगले, मोठाले पर्वत, खळाळणाऱ्या नद्या आणि विस्तीर्ण समुद्र किनारा आहे. 

  अर्जेंटिना ही स्पेनची वसाहत 

     दक्षिण अमेरिका खंडात  अर्जेंटिनाचे स्थान आणि भूमिका  महत्त्वाची राहिलेली आहे. तीन शतके म्हणजे 300  वर्षे अर्जेंटिना ही स्पेनची वसाहत होती. 1816 मध्ये अर्जेंटिनाने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.  नंतर त्याच्याच नेतृत्वाखाली दक्षिण अमेरिकेचेही दिवस पालटले. 1970 मध्ये अर्जेंटिनामध्ये हुकुमशाही राजवट आली. या राजवटीत विरोधक अचानक अंतर्धान पावत. 1982 या वर्षी ब्रिटिशांबरोबर झालेल्या युद्धात अर्जेंटिनाचा आणि त्या देशातील हकुमशाहीचाही पराभव झाला आणि त्या देशात लोकशाहीची पहाट उगवली.        

                          निसर्गाची अर्जेंटिनावर विशेष कृपा!

   लॅटिन भाषेत अरजेंटम म्हणजे चांदी. अर्जेंटिना हा लिथियमसह अनेक मौल्यवान खनिजांचा देश आहे. तो पशुधन आणि तृणधान्य संपन्न देश आहे. प्रचंड भूमी आणि विरळ लोकसंख्या यामुळे या देशात पायी चालतांना क्वचितच एखादा प्राणी दिसला तर दिसतो. त्यामुळे असे म्हणतात की, आपला प्रवास जमिनीवरून होत नसून आपण इतिहासात शिरतो आहोत, असे वाटते. जगातील डिएगो मॅराडोना, लायोनेल मेस्सी हे नामवंत फुटबॉलपटू याच देशातील आहेत. अर्जेन्टिनात लिथियम, कोळसा, शिसे, तांबे, जस्त, सोने, चांदी, निकेल व गंधकाचे साठे आहेत. हवाबंद डब्यात मांस भरून निर्यात करणे, हा अर्जेन्टिनाचा प्रमुख उद्योग आहे. अर्जेंटिनाची ही वैशिष्ट्ये मागे पडावीत अशी एक घटना घडली असून तिची सर्व जगाने नोंद घेतली आहे.

  अर्जेंटिनाचे नवीन चाहते 

    सद्ध्या अनेक रशियन गर्भवती महिला अर्जेंटिनामध्ये प्रवासी म्हणून प्रवेश करीत आहेत आणि तिथेच बाळाला जन्म देत आहेत. अर्जेंटिनाचा कायदा असा आहे की, ज्याचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला आहे, त्याला तात्काळ अरजेंटिनाचे नागरिकत्व मिळते. बाळाला नागरिकत्व मिळताच त्याच्या पाठोपाठ आईबापही नागरिकत्व मिळावे म्हणून अर्ज करतात आणि यथावकाश अरजेंटिनाचे नागरिकत्व मिळवतात. काही दिवसांपूर्वी 6 गर्भवती महिलांनी आपण पर्यटक आहोत असे सांगत अर्जेंटिनात प्रवेश केला होता. अर्जेंटिनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना देशांतरण (मायग्रेशन) अधिकाऱ्यांनी अडविले. पण कोर्टाने त्यांना  अरजेंटिनात प्रवेश करण्याची अनुमती दिली. ‘या महिलांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे त्यांना अर्जेंटिनात प्रवेश करण्यापासून अडविता येणार नाही,असा निर्णय कोर्टाने दिला.  अशा महिलांची संख्या दिवसेदिवस वाढत असून एकदा तर अशा 33 महिला एकाच विमानाने अर्जेंटिनात येऊन थडकल्या. त्या सर्व 32 ते 34 आठवडे पूर्ण झालेल्या गर्भवती महिला होत्या. गेल्या तीन महिन्यांचा हिशोब केला तर एकूण 5819 महिला अर्जेंटिनात प्रसूतीसाठी आल्या आहेत.

   कायदा असा आहे की, अर्जेंटिनात जन्म झाला रे झाला की त्या बाळाला अर्जेंटिनाचे नागरिकत्व बहाल करण्यात येते. तसेच अशा बाळांच्या आईवडलांना इतरांच्या तुलनेत लवकर नागरिकत्व दिले जाते. सध्या अर्जेंटिनाचे पोलिस खाते या प्रकारे प्रवेश  करण्यामागे एखादी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली संघटना आहे किंवा कसे, याचा शोध घेत आहे. अशाप्रकारे अर्जेंटिनात प्रवेश करून नागरिकत्व मिळविण्याचे बाबतीत अरजेंटिनाची हरकत नाही. फक्त यापेक्षा वेगळा हेतू नसावा, एवढीच अर्जेंटिनाची अपेक्षा आहे. या स्थलांतरामागे एक प्रमुख हेतू हा असतो की, अर्जेंटिनाचा पासपोर्ट असणाऱ्याला जगातील 171 देशात व्हिसाशिवाय प्रवेश मिळत असतो. अमेरिका, कॅनडा आणि दक्षिण अमेरिकेतील देशही अशाच प्रकारची सवलत देत असतात. युक्रेनयुद्धानंतर याप्रकारे प्रवेश मिळविणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. अर्जेंटिनातील वैद्यकीय सेवा उत्तम प्रतीच्या तर आहेतच पण त्या इतर देशांच्या तुलनेत स्वस्तही आहेत, असे मानले जाते. शिवाय अर्जेंटिनात प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागत नाही, हेही एक महत्त्वाचे कारण आहे.

   बर्थ टूरिझम

  बर्थ टूरिझम अर्जेंटिनालाही मानवले असून त्याची जाहिरातही केली जात असते. पण अर्जेंटिनाचे पोलिस खाते मात्र या सर्व प्रकाराकडे संशयाने पाहत असते. अटक करीत असते, कागदपत्रे बारकाईने तपासत असते. पण अर्जेंटिनात व्हिसाशिवाय प्रवेश दिला जात असल्यामुळे पोलिस खात्याचा नाईलाज होत असतो.

   बर्थ टूरिझम हा अर्जेंटिनातला एक किफायतशीर धंदा झाला आहे. अर्जेंटिनामधील कंपन्या भरपूर शुल्क आकारून यासाठी एक पॅकेजच देऊ लागली आहेत. प्रवासी व्हिसा घेऊन पासपोर्टशिवाय प्रवेश करा, बाळाला जन्म द्या, कमी खर्चात उत्तम वैद्यकीय सेवा मिळवा, बाळासाठी तात्काळ नागरिकत्व मिळवा, बाळासोबत काही दिवसांसाठी बिऱ्हाड थाटा आणि आपल्या मायदेशात परत जा, असे हे पॅकेज असते. पुढे आाईबापांनाही नागरिकत्व मिळते. आणखी काय हवे?

  अर्जेंटिना, बारबाडोस, फिजी, जमैका, मेक्सिको, पनामा आणि उरुग्वे या देशातही तिथे जन्म झालेल्यांना नागरिकत्व बहाल करण्यात येते. पण आजतरी चलती अर्जेंटिनाची आहे.

नागरिकत्व कसे मिळवता येते 

   एका देशातून दुसऱ्या देशात नागरिकत्व प्राप्त होण्यासाठी चार मार्ग उपलब्ध आहेत. 

. ‘जस सोली’ म्हणजे जन्मामुळे प्राप्त होणारे नागरिकत्व - एखाद्या मुलाचा जन्म ज्या देशात झाला त्या देशाचे नागरिकत्व त्याला जन्मामुळे प्राप्त होते. मग त्या मुलाचे आईबाप कोणत्याही देशाचे नागरिक असले तरी! ही तरतूद अमेरिका, कॅनडा, दक्षिण अमेरिकेतील बहुतेक सर्व देशात अस्तित्वात आहे.

.विवाहकरून -परदेशाचे नागरिकत्व प्राप्त करायचे असेल तर त्या देशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीशी विवाह करणे, हा किचकट आणि वेळखाऊ मार्ग अनुसरणारे बरेच आहेत. 

.भांडवल गुंतवून - व्यावहारिक भाषेत बोलायचे तर पैसे मोजून नागरिकत्व मिळविण्याचा हा मार्ग आहे. संबंधित देशाला बहुदा भांडवल हवे असते. एक लाख डॅालर पासून पुढे कितीही असा हा दर देशपरत्वे असतो.

.नागरिकीकरण (नॅचरलायझेशन) - हा मार्ग बहुतेक लोक अनुसरतांना आढळतात. सुरवातीला इच्छुक व्यक्ती व्हिसा प्राप्त करून संबंधित देशात नोकरी मिळवते. यानंतर टप्प्याटप्प्याने नागरिकत्व मिळवता येते. ही ‘सरकारी पद्धत’ किचकट आणि वेळ खाऊ असते. यथावकाश ग्रीन कार्ड आणि नंतर नागरिकत्व असा प्रवास असतो.

   निरनिराळ्या देशातला वैद्यकीय उपचारांचा खर्च वेगवेगळा असतो. अमेरिका, स्वित्झर्लंड, युरोप, कॅनडा,अॅास्ट्रेलिया यात वैद्यकीय उपचारांचा खर्च खूपच जास्त असतो. अर्जेंटिनामध्ये तो खूप कमी आहे, असे नाही. पण प्रसूतीसोबत बाळाला नागरिकत्व आणि आईबापांना नागरिकत्व देतांना प्राधान्य, याचे आकर्षण रशियन महिलांना जास्त आहे याचे एक कारण चांगल्या आणि उच्चप्रतीच्या वैद्यकीय सेवा याचे आकर्षण त्यांना आहे. युक्रेन युद्धामुळेही रशिया शिवाय इतर एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळत असेल तर पहावे, हा विचार रशियन महिलांमध्ये बळावत चालला आहे. रशियन महिलांनी आपला प्रश्न सोडवला खरा पण संवेदनशील मनांमध्ये अनेक प्रश्न उभे झाले आहेत, त्याचे काय?

  

Monday, February 20, 2023

 फोडलेल्या फुग्याचे गूढ उघड? 14/02/2023

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक१४/०२/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.       

 

फोडलेल्या फुग्याचे गूढ उघड?

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  Email: kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee?  

 अमेरिकेने हेरगिरी करण्याच्या संशयावरून आपल्या हवाई हद्दीत शिरलेल्या चिनी बनावटीच्या एका महाकाय पांढऱ्या उडत्या फुग्याचा (जायंट प्लाईंग बलूनचा) हवेतच नाश केला. सैनिकी महत्त्वाच्या तळांची पाहणी करण्याच्या हेतूने चीनने  हा  बलून पाठविला होता, असा अमेरिकेचा चीनवर आरोप आहे. अमेरिकेच्या या कृतीचे दोन परिणाम संभवतात. पहिले असे की, चीन आणि अमेरिका यातील अगोदरच ताणलेले राजकीय संबंध अधिकच ताणले जातील. दुसरे असे की, चीन आणि अमेरिका यातील रोडावलेले व्यापारी संबंधही आणखीच रोडावतील. हा बलून अमेरिकन भूमीपासून 6 सागरी मैल दूर समुद्रावर आलेला असतांना अमेरिकेने पाडला आहे. समुद्राचा हा भाग अमेरिकेच्या अधिकारक्षेत्रातच मोडतो. यावेळी समुद्रात अमेरिकेची जहाजे गस्त घालीत होती. मिसाईल डागल्यावर एक लहानसा स्फोट झाला. बलूनचे समुद्रात पडलेले अवशेष शोधून त्यांचा अभ्यास करण्याचा अमेरिकेचा हेतू आहे हे यावरून स्पष्ट होतो. नाश केल्यानंतर बलूनचे अवशेष समुद्रातच पडतील यासाठी अमेरिकेने विशेष काळजी घेतल्याचे दिसते. जमिनीवर अवशेष पडले असते तर वित्तहानी आणि जीवित हानी होण्याचा धोका होता. समुद्रात पडलेले बलूनचे अवशेष अमेरिकेने गोळाही केले आहेत. 

  चीनची सारवासारव

   अमेरिकेच्या हवाई हद्दीत आढळलेला हा बलून आमचाच आहे, असे स्पष्टीकरण चीनने दिले होते. तसेच या बलूनच्या माध्यमातून पर्यावरणविषयक संशोधन करण्यात येत असून तो चुकून अमेरिकेच्या हद्दीत गेला, असेही चीनने सांगितले होते. चिनी बलून पूर्ण फुगल्यावर 90 फुटांपर्यंत व्यासाचे होतातच, त्यात नवे काही नाही, पण हा फुगा 200 फूट उंच आणि तेवढ्याच व्यासाचा आहे. त्यामुळे संशय येणारच. पण तरीही हा बिनलष्करी हेतूने पाठविलेला आणि भरकटल्यामुळे चुकून अमेरिकन हद्दीत गेलेला बलून अमेरिकेने पाडला, असे सांगत चीनने निषेध आणि संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेची ही कृती विनाकारण आणि चीनला उगीचच बदनाम करणारी आहे, असेही चीनने म्हटले आहे. मात्र हा बलून कोठून सोडण्यात आला होता? उत्तर नाही. तो कोणता अभ्यास करणार होता? उत्तर नाही. तो किती दिवस प्रवास करणार होता? उत्तर नाही.  असा कोणताही तपशील चीन का देत नाही?  याचेही उत्तर नाही. अशा परिस्थितीत संशय येणार नाही का? ते काहीही असो पण या घटनेमुळे अमेरिका-चीन यांच्या राजकीय संबंधांत नवीन तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नव्हे दोन्ही देशांचे आधीच ताणले गेलेले संबंध आणखीनच बिघडले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आपला चीन दौरा रद्द केला आहे, यावरून ही बाब स्पष्ट होते आहे. यावर रद्द करायला ह्या भेटीची योजना रीतसर घोषित झालीच कुठे होती, असे म्हणत चीननेही अमेरिकेला चिमटा काढला आहे.

तैवानचा चीनवर ठपका 

   तैवानने मात्र अमेरिकेचे हे कृत्य योग्य ठरविले आहे. चीनने आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केल्याचा आणि दुसऱ्या देशाच्या प्रभावक्षेत्रात विनाअनुमती प्रवेश केल्याचा ठपका तैवानने चीनवर  ठेवला आहे. तैवानला लागून असलेल्या आणि तैवानचे आधिपत्य असलेल्या समुद्रात चीन जवळजवळ रोजच आक्रमण करीत असल्यामुळे तैवानने अमेरिकेची बाजू घेतलेली दिसते आहे.

  या घटनेपूर्वी काही दिवस अगोदर उत्तर अमेरिकेतील मोंटाना राज्याच्या आकाशातही एक पांढरी वस्तू दिसत होती. चंद्रासारखी दिसणारी ही वस्तू मात्र आकाराने महाकाय फुग्यापेक्षा खूपच लहान दिसत होती. ही तर उडती तबकडी असे सर्व म्हणू लागले.  काहींनी  या तबकडीची छायाचित्रे काढली आणि समाजमाध्यमांवर टाकली. दुसरीकडे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना या वस्तूची माहिती मिळाल्याशिवाय कसे राहणार? त्यांना वेगळीच शंका आली. हा हेरगिरीचा प्रयत्न तर नसेल ना? चक्रे वेगाने फिरू लागली. मोंटानाच्या बिलिंग्ज विमानतळावरील सर्व उड्डाणे थोपवण्यात आली. आकाशात दिसणारी ही वस्तू नेमकी काय आहे? ती सैनिकी प्रतिष्ठाने असलेल्या मोंटोनाच्याच आकाशात कशासाठी आली आहे? असे प्रश्न एका पाठोपाठ उभे राहिले. या प्रश्नांची उत्तरे शोधली जाऊ लागली. तपासाअंती हाही चिनी बनावटीचाच फुगा असल्याचे स्पष्ट झाले. या फुग्याशी चीनचे नाव जोडले गेल्यानंतर अमेरिकेचा संशय अधिकच बळावला आणि हा फुगा अमेरिकेवर पाळत ठेवण्यासाठी सोडल्याची शंका घेतली जाऊ लागली. 

  हे फुगे आपलेच असल्याचे चीनने मान्य केले आहे. मात्र ते हेरगिरीसाठी अमेरिकन आकाशात पाठविल्याच्या आरोपाचा मात्र चीनने इन्कार करीत पुढे म्हटले की, हे फुगे वातावरणाचे बाबतीतल्या संशोधनासाठी सोडण्यात आले आहेत. मात्र त्यावरील नियंत्रण सुटल्यामुळे फुगा भरकटला आणि मोंटानाच्या आकाशात पोहोचला. तरीही चीनने झाल्या प्रकाराबाबत अमेरिकेची माफीही मागितली. पण चीनचा विश्वसनीयता गुणक अमेरिकेच्या हिशोबी बराच उणा असल्यामुळे  चीनचे हे स्पष्टीकरण अमेरिकेने स्वीकारले नाही. राजकीय आणि लष्करी अशा दोन्ही स्तरांवर अनेक पातळ्यांवर खल सुरू झाला. हे सगळे सुरू असतानाच दक्षिण अमेरिकेच्या आकाशात तसाच दुसरा फुगा दिसल्यामुळे टेहळणीचा संशय  आणखीनच बळावला. चूक एकदा होऊ शकते. दुसऱ्यांदा तसेच होत असेल, तर ती चूक कशीकाय मानता येईल? असा अमेरिकेचा सवाल आहे. ते काही नाही. अगोदर हा फुगा अमेरिकेच्या आकाशातून बाहेर काढा आणि अमेरिकेच्या अवकाश क्षेत्राबाहेर नेऊन नष्ट करा, असा निर्णय झाला. खुद्द ज्यो बायडेन यांनी हा निर्णय घेतला हे  लक्षात घेतले म्हणजे अमेरिका या प्रश्नाकडे किती गंभीरतेने पाहते आहे, ते स्पष्ट होईल. म्हणूनच  एका फुग्याचा समाचार घेण्यासाठी अमेरिकेची अद्ययावत लष्करी विमाने सज्ज झाली. फुग्यात स्फोटके नसतीलही. पण जड वस्तू असतीलही आणि त्या मानवी वस्ती असलेल्या भागावर पडल्या तर हानी, कदाचित जीवित हानीही, होऊ शकेल. शेवटी फुगा पाडायचाच असे ठरवून एफ 16 या लष्करी विमानाने तो फुगा समुद्रात पाडला. नुकसान तर टळले. पण त्या फुग्यात होते तरी काय? संशोधनासाठीची उपकरणे? की हेरगिरी साठीची उपकरणे? अमेरिकेने याचा शोध घेतला असता लष्करी उद्देश लक्षात आला आहे. 

  अमेरिकेला संशय येणे सहाजीकच 

 अमेरिकेला चीनच्या हेतूचा संशय विनाकारण आलेला नाही. चीनच्या विश्वसनीयतेने सद्ध्या तळ गाठला आहे. असे का झाले यासाठी अनेक कारणे सांगता येतील. आज तैवानच्या स्वायत्तत्तेबाबतचे चीनचे धोरण समर्थनीय वाटत नाही. तैवानचा तिबेट होईल, अशी तैवानसह इतर अनेकांना भीती वाटते. संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर चीन आपला हक्क सांगतो आहे. अनेक देशांचे समुद्रकिनारे या समुद्राला लागून आहेत. त्यांच्या अधिकाराचे काय? कोविड-19चे उगमस्थान चीनमध्ये आहे, असे जग मानते. प्रयोगशाळेतील दुर्लक्षामुळे किंवा हेतुपुरस्सर रीतीने चीनने हे जंतू जगभर पसरविले अशी शंका अनेकांच्या मनात आहे. प्रयोगशाळांना भेटी देण्यासाठीची परवानगी देण्याचे बाबतीत चीनने जी खळखळ केली, त्यामुळे हा संशय बळावला आहे. हॅांगकॅांगबाबत चीन दिलेली आश्वासने मोडतो आहे. युक्रेनयुद्ध प्रकरणी तटस्थ न राहता चीनने रशियाला समर्थन दिले आहे. आता अमेरिका चीनच्या फुग्याचे अवशेष गोळा करून सत्य जाणण्यासाठी  तपासणी केली असता लष्करी उद्देश उघड झाला आहे. अमेरिकेने तसे अनेक  देशांना कळविले सुद्धा आहे.

   फुगे आजही का वापरात आहेत?

   टेहळणी करण्यासाठी फुगे वापरल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. पहिल्या महायुद्धात टेहेळणीसाठी फुग्याचा वापर हे एक मान्यताप्राप्त तंत्र म्हणून प्रतिष्ठा पावले होते. दुसऱ्या महायुद्धात फुग्यांचा वापर  स्फोटके वाहून नेण्यासाठी केला गेला. उपग्रह, विमाने आणि ड्रोन्स यांनी फुग्यांना आज मागे टाकलेले आढळते. तरीही फुग्याचे स्वतंत्र विशेष आहेत. फुग्यांची उंची कमीअधिक करता येते. फुग्यांना हवीती दिशाही देता येते कारण वेगवेगळ्या उंचीवर वाऱ्याची दिशा वेगवेगळी असते. कमी उंचीमुळे फुग्यातून काढलेली छायाचित्रे अधिक स्पष्ट असतात. फुग्यांचा वापरण्याचा खर्चही खूपच कमी असतो. या वैशिष्ट्यांमुळे फुगे आजही वापरात आहेत.

  चिनी फुग्यात तर मोटर आणि पंखे (प्रॅापेलर) बसविलेले होते. रिमोट बटनाच्या साह्याने त्याच्या गतीवर, उंचीवर आणि दिशेवर नियंत्रण ठेवता येत असले पाहिजे. असे असेल तर ते भरकटलेच कसे?  

  उपग्रहाची तंत्रवैशिष्ट्ये फुग्यांपेक्षा श्रेष्ठ प्रतीची असतात. पण त्याची भ्रमणकक्षा निश्चित असते. रिमोटच्या साह्याने फुगा हव्या त्या दिशेला, हव्या त्या उंचीवर, हव्या त्या वेगाने नेता येतो. उपग्रहाची कक्षा कळली की त्याचा वेध घेणे सोपे असते. फुगा अथांग अवकाशात लपवता येतो. त्याचा माग काढणेही कठीण जाते. विमाने दुसऱ्या देशाच्या हद्दीत गेली तर लगेच बोभाटा होतो. फुग्यांच्या जाण्यायेण्यावर नजर ठेवणे कठीण असते.

  चीनचे फुगे बरेच प्रगत स्वरुपाचे मानले जातात. या प्रकारच्या फुग्यांना अनआयडेंटिफाईड एरियल फेनॅामेना (युएपी) असे नाव आहे. 2022 मध्ये असे 150 च्यावर युएपी आढळले आहेत. काहींना उडत्या तबकड्या म्हटले गेले. अमेरिकेप्रमाणे जपान आणि अंदमान निकोबार च्या अवकाशातही फुगे आढळल्याचे वृत्त आहे. केवक्ळ भारतातच नव्हे तर 5 खंडात चीनने असे फुगे पाठविले होते, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. फुग्यांचा वापर अनेक देश निरनिराळ्या कारणांसाठी करीत असतात. तेही कधिकधि भरकटतात सुद्धा! बोभाटा झाला किंवा होतो  तो चीनने पाठविलेल्या फुग्यांचाच. सहाजीकच आहे एकदा का कानफाट्या नाव पडले की असे होणारच! असे असले तरी या घटनेमुळे चीनचा जागतिक राजकारणातील फुगा अधिकच फुगला, हे मान्य करायलाच हवे. नाही का?





 लिथियमचा शोध - एक फार  मोठी उपलब्धी!

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २१/०२/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

 लिथियमचा शोध - एक फार  मोठी उपलब्धी!

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  Email: kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


    भारतात पहिल्यांदाच लिथियम धातूच्या साठ्याचा शोध लागला आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बॅटरीत लिथियम वापरले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये 5.9  मिलीयन टन लिथियम साठा सापडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिऑलॅाजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल-हैमाना भागात लिथियमचे साठे सापडल्याचे केंद्रीय खणीकर्म मंत्रालयाने जाहीर केले आहे. खाणीतून काढण्यात येणाऱ्या कच्च्या मालापासून ते शुद्ध धातू मिळविण्यापर्यंतच्या प्रक्रियेचे चार टप्पे असतात. पहिला टप्पा धातूसाठी केली जाणारी पाहणी. दुसरा टप्पा प्राथमिक उत्खननाचा. तिसरा टप्पा सर्वसाधारण उत्खननाचा आणि चौथा टप्पा सखोल उत्खननाचा. काश्मीरमध्ये सापडलेला साठा हा दुसरा टप्पा आहे. सद्ध्या लिथियमचा वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी  फार मोठ्या प्रमाणात केला जातो.

   आयातीवरच अवलंबून 

    आपण  सध्या लिथियमची आयात करीत आहोत. आपण राजस्थान आणि गुजरातच्या भूगर्भातील पाण्याच्या साठ्यातून लिथियम शोधण्याचा प्रयत्न बरीच वर्षे करीत  आहोत. असाच प्रयत्न ओडिशा आणि छत्तीसगढच्या अभ्रक पट्ट्यांमधून लिथियम काढण्यासाठीही आपण केले आहेत. या शोधाचे महत्त्व यासाठी आहे की, या खनिजासाठी  आज आपण जवळजवळ संपूर्णपणे चीनवरच अवलंबून आहोत.

लिथियमची वैशिष्ट्ये

     एक काळ असा होता की लिथियम हे नाव सामान्य जनांनी ऐकलेही नसेल. आजतर हे नाव ऐकताच सर्वसामान्य व्यक्ती लगेच आपले कान टवकारते. रसायनशास्त्राच्या पुस्तकााची मर्यादा ओलांडून हे नाव जनसामान्याच्याही ओठावर आल्यामुळे त्याची माहिती आणि महती त्यांनाही सहज समजेल, या दृष्टीने सद्ध्या प्रयत्न सुरू झालेले दिसतात. लिथियम हा अल्कली धातू आहे. सफेदीचा चुना अल्कली आहे. तो पाण्यात टाकला की पाण्याला कशी उकळी फुटते, तेही आपण बघितले असेल. खायच्या पानातला चुनाही अल्कलीच आहे. कॅलशियमची कमतरता असेल तर चुन्याची निवळी प्यायला सांगितले जायचे, हे जुन्या मंडळींना तरी नक्कीच माहीत असेल. तीही अल्कलीच. अर्थातच लिथियम वेगळा कॅलशियम वेगळा. पण दोन्ही एकाच जातकुळीचे.

    ग्रीक भाषेत दगडाला म्हणतात लिथॅास.  याच अर्थाने या धातूला लिथियम हे नाव दिले आहे. लोखंड आणि सोन्यासारखे धातू मानवाला खूप अगोदरपासून माहीत होते. लिथियमचे तसे नाही. आर्फेडसन नावाच्या स्वीडिश शास्त्रज्ञाने याचा शोध 1817 मध्ये लावला. हे वर्ष भारतासाठीही महत्त्वाचे अशासाठी आहे की, याच वर्षी कोलकात्याला राजा राममोहन राय यांनी हिंदू कॅालेजची स्थापना करून आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ भारतात रोविली. पुढे यथावकाश त्या कॅालेजचे रुपांतर प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटीत झाले. 1855 साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ बुनसेन आणि इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ मॅथिसन यांनी स्वतंत्रपणे, वितळलेल्या लिथियम क्लोराईडपासून विद्युतपृथ्क्करण करून शुद्ध लिथियम मिळविले. 

  लिथियम हा धातू नरम  व रुपेरी रंगाचा असून पाण्यापेक्षाही हलका आहे. म्हणजे असे की एक घनसेंटीमीटर पाण्याचे वजन एक ग्रॅम असते तर तेवढ्याच व्यापाच्या लिथियमचे वजन जवळजवळ निम्मे म्हणजे 0.53 ग्रॅम असते. एवढ्याच सोन्याचे वजन 19.32 ग्रॅम असते. तर चांदीचे 10.49 ग्रॅम असते.  अशाप्रकारे धातूंच्या हलकेपणात लिथियमचा नंबर पहिला आहे. तसा हैड्रोजन लिथियमपेक्षा हलका आहे पण तो वायू आहे. आपल्याला पोटॅशियम आणि सोडियम ऐकून माहीत असतील. त्यांना लिथियमची वडिल भावंडे मानता येईल. नेहमीच्या उष्णतामानावर  लिथियम हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्याशी वेगाने संयोग पावतो. म्हणून लिथियम व्हॅसलीन सारख्या पदार्थात खोल साठवून ठेवतात.

 हा धातू 180.5° शतांश उष्णतामानावर वितळतो, एवढी माहिती सद्ध्या आपल्याला पुरेशी आहे. लोखंड 1,538° शतांशावर वितळते तर सोने 1,064° वर वितळते. ही तुलनात्मक माहिती यासाठी की, लिथियम किती कमी उष्णतामानावर वितळते जाणवावे. लिथियमचा उपयोग पदार्थास खास प्रकारची चकाकी देण्यात, रंगांमध्ये, चिनी मातीच्या वस्तूंमध्ये करतात. लिथियम फ्ल्युरॉक्साइड पासून तयार करण्यात येणारी विशेष काच अतिउच्च पारदर्शकता या गुणामुळे दुर्बिणीसाठी वापरतात. या काचेतून अतिनील किरणे आरपार जाऊ शकतात. लिथियमची काही संयुगे जसे - स्टिअरेट, पामिटेट वगैरे खूप उष्ण झाली तरी आपले भौतिक गुणधर्म टिकवून ठेवू शकत असल्याने त्यांच्यापासून उत्तम प्रकारचे वंगण तयार करता येते. तसेच जिथे शून्य अंश शतांशच्या खाली उष्णतामान जाते अशा ठिकाणी मोटारींमध्ये हे वंगण वापरले जाते. बेरिलियम, तांबे, जस्त आणि चांदी यांचे लिथियम युक्त मिश्रधातू विविध क्षेत्रात आपापल्या गुणांमुळे मान्यता पावलेले आहेत.

 आवर्त सारणीच्या (पिरिऑडिक टेबल) डाव्या कोपऱ्यातील मूलद्रव्ये भूकवचात विपूल प्रमाणात आढळतात पण सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अॅल्युमिनियम या सगळ्यांपेक्षा लिथियम मात्र काहीसे दुर्मिळ आहे. या पदार्थाची किमान २० प्रकारची खनिजे निसर्गात सापडतात.

  लिथियमचा बडेजाव यासाठीही आहे की, त्यात खूपमोठी उर्जा छोट्याच्या जागेत साठवता येते. भलामोठा कापसाचा ढीग ज्याप्रमाणे गठाणीत दाबूनदाबून साठवता येतो, तसेच काहीसे हे आहे. त्यामुळे लॅपटॅाप, मोबाईल यासारख्यात किंचितसा लिथियम पुरतो. इतरही धातू वापरता येतील पण मग ह्या वस्तू उचलण्यासाठी हमालच लागतील. मूड ताळ्यावर ठेवण्यासाठी जी औषधे लागतात, ती तयार करण्यासाठी लिथियम वापरतात. पुन्हापुन्हा चार्ज करायच्या बॅटऱ्या, मोबाईल, लॅपटॅाप, डिजिटल कॅमेरा, विजेवर चालणारी वाहने, हृदयासाठीचे पेसमेकर, घड्याळे यातही लिथियमचा वापर करतात. 

   लिथियमचे उत्पादन कुठे आणि किती?

     आपल्या भारतात आजवर लिथियमची खनिजे सापडली नव्हती. पण जिऑलॅाजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला इतिहासात पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियमची खनिजे सापडली आहेत. लिथियमचे नुसते साठे असून उपयोगाचे नाही. कोणाचे उत्पादन किती, हेही महत्त्वाचे आहे. 2021 या वर्षी सर्वात जास्त उत्पादन ऑस्ट्रेलियाचे म्हणजे एकूण जागतिक उत्पादनाच्या तब्बल 52% आहे. त्यानंतर चिली 25%, चीन 13%, अर्जेंटिना 6%, नंतर ब्राझील, झिंबाब्वे, पोर्तुगाल, अमेरिका प्रत्येकी 1% आणि उरलेले देश 0,1% असा हिशोब सांगितला जातो. यावरून जगातल्या तीन देशातच एकूण उत्पादनाच्या 90% लिथियमचे उत्पादन होत असते, हे लक्षात येईल. या  मक्तेदारीमुळे इतर देशांना त्यांच्या अटी मान्य कराव्याच लागत असत.  आता यातून भारताची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

लिथियमचा वापर कशासाठी किती?

  बॅटऱ्या 74%, सेरॅमिक्स आणि काच 14%, वंगण 3%, हवेवर प्रक्रिया 1% ओतकाम 2%, अन्य 6% ही टक्केवारी 2021 ची सांगितली जाते. आता वाहने मोठ्या प्रमाणावर विजेवर चालू लागली की, ही टक्केवारी पार उलटीपालटी होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे गरजेच्या तुलनेत लिथियमचे उत्पादन कमी पडेल. याचा परिणाम लिथियमचे भाव कडाडण्यात होण्याची भीती आहे.

 शून्यावरून तिसऱा  क्रमांक

   जगातील लिथियम साठ्याच्या बाबतीत चिली 9.3 दशलक्ष टनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 63 लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काश्मीरमध्ये 59 लाख टन साठा मिळाल्यानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अर्जेंटिना 27 दशलक्ष टन साठ्यासह चौथ्या, चीन 2 दशलक्ष टन साठ्यासह पाचव्या आणि अमेरिका 1 दशलक्ष टन साठ्यासह सहाव्या स्थानावर आहे.

  लिथियम हे अमृतकाळातले हे अमृतच म्हणावे लागेल. अमृतकाळात देशातील 11 राज्यात खनिजांचा मोठा साठाही मिळाला आहे. त्यात लिथियम सोबत सोनेही आहे. जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू आणि तेलंगणा यांत विविध आणि मौल्यवान खनिजे सापडली आहेत.  आता आणखी काय हवे? तर या खनिजांपासून धातू वेगळा करण्याचे प्रकल्प उभारावे लागतील.  

   लिथियम आयन बॅटरी बनवणे सोपे काम नाही. एकतर लिथियमचे उत्पादन आणि शुद्धीकरण हे काम भारतासाठी आजतरी खूप कठीण आहे. चिलीचेच पहाना, चिलीमध्ये 9.3 दशलक्ष टन साठा असूनही केवळ 0.39 दशलक्ष टन एवढेच उत्पादन होऊ शकते. तर ऑस्ट्रेलियात लिथियमचा 63 लक्ष टन साठा पण उत्पादन 0.6 दशलक्ष टन आहे. भारतात लिथियम धातू खनिजातून वेगळा करणे शक्य झाले की वस्तूंच्या किमती निदान 45% ने स्वस्त होतील असा एक अंदाज आहे. यामुळे परकीय चलनाची बचत होईल. लिथियमच्या निमित्ताने आपली कुणीही अडवणूक करू शकणार नाही. चीनकडून बॅटऱ्या आयात करण्याची गरज उरणार नाही. चीनकडून लिथियम आयात करावेच लागत होते  तेही थांबेल. याशिवाय सोबत इतर नको असलेल्या वस्तूही निमूटपणे आयात करण्याची मुलखावेगळी अट मान्य करावी लागत होती, तेही टळेल. लिथियमचा साठा सापडला म्हणजे निसर्गाची कृपा झाली. मिळालेल्या साठ्यातून उत्पादन करण्यासाठी दुसऱ्या भगिरथाचीच गरज भासेल. सुदैवाने भारताजवळ दुसरा भगिरथही आहे. त्याच्या विज्ञाननिष्ठ भूमिकेमुळे आधुनिक तंत्रज्ञान मिळविण्यातही  भारत यशस्वी होईल, अशी खात्री बाळगूया.







Saturday, February 11, 2023

 तुर्की-सीरियातील महाभूकंप

तरूण भारत, मुंबई.   रविवार, दिनांक १२/०२/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

शत्रुत्व विसरून मदतीला धावले वैरीही!

  तुर्की आणि  सीरिया या दोन देशातच नव्हे तर परिसरातही 6 फेब्रुवारी 2023 ला सोमवारी भूकंपाचे दोन मोठे म्हणजे 7.8 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेचे धक्के बसले. या भूकंपाचे केंद्र तुर्कीतील गाझियानटेप हे शहर होते भूकंपाचा केंद्रबिंदू 18 किमी खोलवर होता. या मोठ्या धक्क्यांसह काही तासांतच अल्प तीव्रतेचे 75 पेक्षा जास्त धक्के बसल्यामुळे दूर अंतरावरील सायप्रस (456 किमी), लेबेनॉन (874किमी), इस्रायल (1381किमी), इजिप्त(1411किमी) आदी देशांचाही परिसर हादरला. पण तुर्की  आणि  सीरिया या देशात झालेली वित्त आणि जीवित हानी अभूतपूर्व स्वरुपाची मानली गेली आहे. या भूकंपांनी निसर्गासमोर मानव किती हतबल आहे, याचा परिचय करून दिला आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा भूकंप ठरला आहे. तुर्कीमधील भूकंपामुळे 21000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले असून शेजारच्या सीरियातील मृतांचा यात समावेश नाही. तुर्कीला आणि सीरियाला मदत करण्यासाठी सर्व जग एकवटल्याचे दृश्य समोर आले आहे.

   नेपाळमध्ये 2015 मध्ये आलेल्या 7,8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात जवळजवळ 9000 लोक मृत्युमुखी पडले होते. पण 6 फेब्रुवारी 2023 चा  भूकंप  यापेक्षा कितीतरी अधिक प्राणघातक ठरला आहे. 

   सीरियातील सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या भागात मृतांची संख्या 1 हजार 250 वर पोहोचली आहे, तर 2 हजारावर नागरिक जखमी आहेत. ‘व्हाईट हेल्मेट’ या स्वयंसेवी संस्थेच्या माहितीनुसार बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य भागात 1 हजारावर  लोक मृत्युमुखी पडले आहेत व 2 हजारावर लोक जखमी झाले आहेत. अंतिम आकडे यापेक्षा निदान दुप्पट तरी असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

  मै फिरभी जिंदा हूं।

      सीरियातील एका गावात मृत आईशी नाळ जोडलेले एक रडणारे नवजात अर्भक आढळले.  या कुटुंबातील वाचलेले हे एकमेव अर्भक होते, असे या कुटुंबाच्या नातलगांनी सांगितले आहे. भूकंपानंतर सुमारे दोन दिवसांनी, बचाव कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांच्या एका मुलाला, आरिफ कानला, एका कोसळलेल्या निवासी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. या मुलाच्या शरीराचा खालचा भाग काँक्रीट स्लॅब आणि वाकलेल्या गजांमध्ये अडकला होता. बचाव कर्मचाऱ्यांनी त्याच्या मोकळ्या शरीरावर उबदार पांघरूण घातले. काळजीपूर्वक गज कापले, ढिगारा हळूहळू  बाजूला सारला आणि त्याची सुटका केली. मुलाची सुटका झाल्यावर आधी वाचवण्यात आलेले त्याचे वडील एर्तुग्रुल किसी हमसून हमसून  रडले. काही तासांनंतर, आदिमान शहरात बचावकर्त्यांनी दहा वर्षीय बेतुल एडिसला तिच्या घराच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी अ‍ॅडेलहेड मरशग यांनी या भूकंपग्रस्त प्रदेशात तब्बल दोन कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोचली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  भूकंपात आत्तापर्यंत दोन्ही देशातले मिळून 25 हजारावर नागरिक मृत्युमुखी पडले असून  20 हजारांपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. हा आकडा आणखी किती वाढेल, ते कुणालाही सांगता यायचे नाही. भूकंपामुळे 10 भारतीय नागरिकही तुर्कीमध्ये   सुरक्षित पण अडकले असून एक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

भूकंप का व कसे होतात?

  भूकवच हे नारळाच्या करवंटीसारखे एक साल किंवा कवच आहे. नारळात जसे पाणी असते, तसेच भूकवचाखाली अतिउष्ण द्रवरूप पदार्थ असतात. यात सतत तीव्र हालचाल होत असते. भूकवचाखालील प्रस्तरांच्या (टेक्टोनिक प्लेट्स) हालचालींमुळे भूकवचाला हादरे बसत असतात. हे हादरे मागे-पुढे आणि वर–खाली असे दोन प्रकारचे असतात. यामुळे जमिनीला भेगा पडतात. जमिनीला जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात. जमिनीच्या पोटात असणारे विविध प्रस्तर (टेक्टोनिक प्लेट्स ) मागे-पुढे, खाली-वर सरकून जमिनीला भेगा पडल्यामुळे भूकंप होतो. भूगर्भात होत असलेल्या घडामोडींमुळे एडनच्या आखाताचे विस्तारीकरण होत आहे, असे एक मत आहे. तुर्कस्तान, सीरियामध्ये झालेल्या भूकंपांमागे भूगर्भातील प्रस्तरांच्या घर्षणातून निर्माण झालेल्या ताणासह एडनच्या आखाताच्या विस्तारीकरणाचा परिणाम आहे, असे हे मत सांगते. भूकंपप्रवण क्षेत्र म्हणजे पृथ्वीवर वारंवार भूकंप होणारा भाग होय. भूगर्भातील हालचालींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर हालचाली होतात. यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. तज्ज्ञांच्या मते जगभरात दरवर्षी सुमारे ३० लाख भूकंप होतात. मात्र हे आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. कारण बऱ्याच ठिकाणच्या भूकंपांची तीव्रता अतिशय कमी असते. बहुसंख्य भूकंप हे समुद्रात होतात. भूकंपाची नोंद करणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ म्हणतात. ही एकप्रकारची फुटपट्टी आहे. भूकंप मोजण्याच्या मापाला रिश्टर स्केल असे नाव आहे. रिश्टर मापनपद्धत ही भूकंपाच्या धक्क्याची क्षमता आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या उर्जेचे प्रमाण मोजण्याचे परिमाण  आहे. रिश्टर स्केल जेव्हा एका युनिटने वाढते तेव्हा ऊर्जा दहापटीने वाढलेली असते. मापन पट्टीवरील सर्वात लहान माप शून्य तर सर्वात मोठे माप 10 हे आहे. तुर्कीमधले 7.8 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेचे धक्के किती मोठे आहेत, हे यावरून कळून येईल. ही यंत्रे बऱ्याचदा मोठमोठया धरणांजवळ बसवलेली असतात. कारण अशा ठिकाणी जमिनीत पाणी मुरुन भूकंप होण्याची शक्यता असते. याठिकाणी भूकंप झाला तर जलाशय फुटून मोठे नुकसान होऊ शकते.

भूकंपाची कारणे दोन प्रकारची आहेत.

१.ज्वालामुखीच्या  उद्रेकामुळे भूकंप होतात. यात भूपृष्ठाच्या आतील लाव्हा भूकवच भेदून बाहेर पडतो. हे नैसर्गिक कारण आहे.

2. मोठमोठया धरणांचा जमिनीवर ताण पडणे, खाण कामात भूकवच भंगून जमिनीत महाकाय खड्डा निर्माण होणे, निरनिराळ्या कामासाठी भूपृष्ठाखाली सुरुंग लावले जाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.

3. पृथ्वीच्या पोटात प्रचंड उष्णता असल्याकारणाने त्यात प्रचंड दाबाखाली असलेला तप्त लाव्हारस कवच कच्चे असेल, कच्चे झाले असेल किंवा कच्चे केले गेले असेल अशा ठिकाणी  उफाळून वर येऊन भूकंप होतात.

   पृथ्वीच्या गर्भातील हालचालींमुळे होत असलेले भूकंप ही काही नवीन बाब नाही. जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागात रोज भूकंपाचे सौम्य धक्के बसतच असतात. तरीही नेमक्या कोणत्या दिवशी आणि कुठे अधिक तीव्रतेचा भूकंप होऊ शकेल, याचा नेमका अंदाज देणारे तंत्र अद्याप तरी विकसित झालेले नाही. यावर एकच उपाय आहे. तो असा की, भूकंपाची शक्यता गृहीत धरून उपाय करण्याच्या तयारीत 24/7 तयार असणे. भूकंप तर होणारच.  पण अगाऊ काळजी घेतली तर दुर्घटनेतील प्राणहानी कमी करता येते.

   यावेळी तुर्की आणि सीरिया या दोन्ही देशात मिळून पाच ते सात हजारांहून अधिक इमारती पडल्या. हे दोन्ही देश वेगळ्या संकटांचा सामना आधीपासूनच करीत होते. तुर्की आर्थिक संकटामुळे जेरीस आला  होता, तर सीरियाला गेली 11 वर्षे  यादवी छळते  आहे. यावेळी भूकंप झालेला भूभाग हा मुळातच भूकंपप्रवण आहे. म्हणजे या ठिकाणचे  भूकवच कच्चे आहे. हिमालयीन भूभाग खूपच भूकंपप्रवण आहे. तुर्की आणि  सीरिया यांचे भूकवच हिमालयाइतके कच्चे नाही. तुर्कीच्या अगदी खाली ॲनाटोलियन टेक्टोनिक प्रस्तर आहे. तर उत्तरेला युरेशियन प्रस्तर आहे. ॲनाटोलियन टेक्टोनिक प्रस्तर आणि युरेशियन प्रस्तर हे ज्या ठिकणी एकमेकांना स्पर्श करतात तो बिंदू धोकादायक आहे. खालील द्रवातील  हालचालीमुळे किंवा अन्य काही कारणांनी दोन प्रस्तर एकमेकांवर चढले किंवा त्यांच्यात घर्षण जरी झाले, किंवा ते किंचितसे (0.1सेमीपेक्षाही कमी) वरखाली किंवा मागेपुढे जरी सरकले, तरी वर भूतलावर मोठा भूकंप होण्याची शक्यता नेहमीच असते. यावेळी तसेच झाले आणि हा अनर्थ ओढवला आहे.

कठीण समय येता कामास आले ‘ऑपरेशन दोस्त’।

  या भागात  गेल्या काही वर्षांत पाच रिश्टरपेक्षा अधिक तीव्रतेचे धक्के जाणवले नव्हते. 1970 पासून आतापर्यंत तीनदा 6 किंवा  किंवा त्याहून अधिक रिश्टर तीव्रतेचे धक्के या भागात बसले आहेत. त्यातील शेवटचा मोठा धक्का सन 2000 मधला होता. त्यानंतर 23  वर्षांनी आता हा मोठ्या तीव्रतेचा धक्का बसला आहे. या भूकंपामुळे इमारती मोठ्या प्रमाणात पडल्या. म्हणून हजारो लोक ढिगाऱ्यात दबून मेले आणि कितीतरी जखमी झाले आहेत. इमारतींच्या खाली ढिगाऱ्यात माणसे दबल्यामुळे बचाव कार्य अवघड आणि वेळ खाऊ झाले आहे. भूकंपानंतर तुर्की आणि सीरिया यांना  भारतासह संपूर्ण जगभरातून तत्परतेने मदत मिळत आहे. तुर्कीमधील भूकंपाची माहिती मिळताच भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ आयोजित करून तिथे तातडीने सैन्यदलाची  वैद्यकीय चमू रवाना केली. हा तोच तुर्की आहे की जो काश्मीर प्रश्नी पाकिस्तानची कड घेत असतो!  भारताने नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फोर्स (एनडीआरएफ) च्या तुकड्या आणि वैद्यकीय मदत पाठवली. याशिवाय क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट टीम, ऑर्थोपियाडिक सर्जिकल टीम, जनरल सर्जिकल टीम, मेडिकल स्पेशालिस्ट टीम आणि इतर मेडिकल टीम या सर्वांना नेणाऱ्या विमानांना पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून पुढे जाऊ दिले नाही. करे तर भारताची मदत पाकिस्तानच्या मित्राला होत होती! असे असून सुद्धा असा व्यवहार पाकिस्ताननेच करावा!! त्यामुळे पाकिस्तानला वळसा घालूनच भारतीय विमानांना तुर्कस्तानच्या हद्दीत दाखल होता आले!!!.

  भारताने अशा प्रकारे तात्काळ आणि सर्वप्रकारची मदत पुरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. तुर्की आणि सीरिया सारख्या इतर अनेक देशांनाही भारताने मदत केली आहे.  अडचणीच्या वेळी कोणताही भेदभाव न करता मानवतेच्या शुद्ध भूमिकेतून मदत करणारा देश अशी भारताची प्रतिमा जगात झाली आहे. कोविडची लस पुरविणे किंवा औषधे पाठविणे ही आत्ताची उदाहरणे आहेत.

  तुर्की आणि सीरियातील प्रलयकारी भूकंपातील बळींची संख्या 25 हजारांवर गेली असून ती आणखी कितीतरी वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. हजारो नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत, तर हजारोंवर जखमी उपचार घेत आहेत. तुर्कीचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांनी मदतीबद्धल भारताचे आभार मानले आहेत. ‘गरजेच्या वेळी  मित्रच धावून येतो,’ या शब्दात त्यांनी भारताचे आभार मानले आहेत. खऱ्या मित्राची या निमित्ताने तुर्कीला झालेली ओळख  यापुढेही कायम राहील, अशी अपेक्षा करू या.

जगभरातूनही मदतीचा ओघ

   पृथ्वीवरच्या सर्व खंडातून तुर्की आणि सीरिया कडे मदत यायला सुरवात झाली आहे. युरोपीयन युनीयन शोध मोहिमेत आणि बचाव कार्यात मदत करते आहे. यात युनीयनमधील बल्गेरिया, झेक रिपब्लिक, फ्रान्स, नेदरलंड, पोलंड, रोमानिया यांचा सक्रिय सहभाग आहे. यातील काही देशांचे सॅटलाईट्स आकाशातून हानीचा आढावा घेत आहेत. जर्मनी मदत छावण्या उभारतो आहे. तसेच जनरेटर, तंबू आणि ब्लॅंकेट्स पुरवणार आहे. ग्रीस परंपरागत वैर विसरून सी-130 ही वाहतुक विमाने, प्रशिक्षित कुत्री पाठवतो आहे. स्वीडनही मदतीसाठी तत्परतेने पुढे आला आहे. तुर्कीने स्वीडनला नाटोची सदस्यता देऊ नये, अशी भूमिका घेतलेली असून सुद्धा! रशियानेही मदतीची तयारी दाखविली आहे, तेही तुर्की नाटोचा सदस्य असून सुद्धा! ही यादी अशीच पुढे वाढविता येईल.

विशेष नोंद घ्यावी असे काही भूकंप  

   2004 या वर्षी हिंदी महागरात 9.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. 1906 या वर्षी सॅनफ्रान्सिसको येथे 7.8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता.1976 मध्ये चीनमधील तंग्शन येथे 7.6 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. अगादिर हे मोरोक्कोमधील एक शहर आहे. 1960 या वर्षी येथे 5.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. 

मदत करतांना पक्षपात नाही

   तुर्की व सीरियातील भूकंपबळींची संख्या 25 हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन हे या भूकंपग्रस्त क्षेत्राला सध्या भेटी देत आहेत. पहिल्या दिवशी बचावकार्य तोकडे पडल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु त्यानंतर आता मदत कार्याने वेग घेतला आहे. याबाबत स्थिती सुधारल्याचे त्यांनी सांगितले.

  आमच्या कोणत्याही नागरिकास, भलेही तो कुर्द का असेना, आम्ही मदतीपासून वंचित ठेवणार नसल्याचे अडदांड आणि अरेराव  व्यक्तिमत्त्वाचे असूनही एर्दोगन यांनी स्पष्ट केले आहे. संकटकाळी कधीकधी असेही घडून  येते तर! कुर्द आणि  तुर्की यात सतत चकमकी झडत असून सुद्धा! तुर्की आणि सिरियात भूकंपग्रस्त भागात ठिकठिकाणी अनेक बचाव पथके भेदभाव न करता  दिवस-रात्र मदतकार्य करत आहेत. या विनाशकारी भूकंपामुळे कोसळलेल्या हजारो इमारतींच्या ढिगाऱ्यांतून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हा भूकंप एका दशकाहून अधिक काळातील सर्वात प्राणघातक ठरला आहे.

  या दोन्ही देशात इमारती कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप आहे. याचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की, भूकंपप्रवणक्षेत्रात इमारती बांधतांना बिल्डिंग कोडचे पालन केले गेले नव्हते. ते केले असते तर इतक्या इमारती नक्कीच पडल्या नसत्या. या बाबीची सर्वच देशांनी नोंद घ्यायला हवी आहे. अर्थात त्यात भारतही आलाच!



Monday, February 6, 2023

 भारत-चीन संघर्षाचे नवीन आयाम

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०७/०२/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

भारत-चीन संघर्षाचे नवीन आयाम 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

    भारत आणि चीन यांच्यामध्ये हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. चीनने आपल्या बाजूने पर्वताला लागून आपल्या  फौजा उभ्या केल्या आहेत. भारतानेही आपल्या बाजूने पर्वताला लागूनच आपल्या फौजाही अशाच तैनात केल्या आहेत. याबाबतचे भारताचे हे पाऊल चीनला अपेक्षित नव्हते. भारताने ही भूमिका पूर्ण सीमेसाठी घेतल्यामुळे चीन काहीसा चकित झाल्यासारखा दिसतो आहे. गेली दोन अडीच वर्षे हीच स्थिती कायम आहे आणि या योजनेचे दोन लाभ होत आहेत. चीनची घुसखोरी सुरू होताच टिपता येते आणि दुसरे म्हणजे थोपविताही येते. चीनने गेल्या महिन्यात तावांगमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. तो का सफल झाला नाही, हे यावरून लक्षात येईल.         

   व्यापारस्पर्धा

    सीमेवर काहीही होत असले तरी भारत आणि चीनमधला व्यापार सतत वाढतो आहे. या व्यवहारात चीनची भारतात होणारी निर्यात जास्त पण भारताची चीनमध्ये होणारी निर्यात मात्र तुलनेने बरीच कमी आहे. हे प्रमाण सद्ध्या 150:100 असे आहे. हे जर तोडीस तोड म्हणजे 100:100 असते तरी चीनने तावांगमध्ये घुसखोरी करण्यापूर्वी दहादा विचार केला असता. आपल्या घुसखोरीचा व्यापारावर काहीही परिणाम होत नाही आणि व्यापारी व्यवहार आपल्याला फायद्याच राहतो, या समजातून चीनला बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. मुख्य असे की चीनचा डाव जसा लष्करी असतो, तसाच तो व्यापारीही असतो. चीनकडून भारतात होत असलेली निर्यात कमी करून चीनला व्यापारी स्तरावर उत्तर देण्याचीही आज लष्करी डावांइतकीच आवश्यकता आहे. भारताचे व्यापारी डावांचे बाबतीत सरकारी पातळीवर करायचे ते सर्व उपाय करून झाले आहेत. आता त्यात आणखी काही नवीन करण्यास फारसा वाव राहिलेला नाही. सद्ध्या आपण चीनकडून शासकीय पातळीवर जी आयात करतो आहोत, ती आपली गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शासकीय प्रयत्न जेवढे करणे शक्य होते, तेवढे भारताने केले आहेत, केलेच असणार. अमुक वस्तू घ्याल तरच तुम्हाला हवी असलेली तमुक वस्तू विकत देऊ, असाही प्रकार चालतो. त्यावरही सद्ध्यातरी उपाय नाही. पण चीनमधून भारतात येणारा फार मोठा माल खाजगी व्यापारी क्षेत्रातही येत असतो. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जे करारमदार झाले आहेत, त्यानुसार या मालाच्या भारतात येण्यावर सरकारीस्तरावर बंधने घालतांना काही  आंतरराष्ट्रीय अडथळे येतात. त्यामुळे खाजगी व्यापारस्तरावर  खूप बंधने शासन घालू शकत नाही. तो माल भारतात येणारच. पण यावर व्यापारी उपाय करू शकतात. हा माल आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवायचे ते थांबवू शकतात. कारण हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्यांनी हा माल विक्रीसाठी आपल्या दुकानात ठेवलाच पाहिजे, असे बंधन त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्यातील तरतुदी सुद्धा घालू शकत नाहीत. शिवाय असे की, हा माल भारतीय बाजारात येण्यास व्यापारीस्तरावरही पूर्णत: पायबंद घालणे शक्य नसले आणि तो बाजारात येतच राहिला तरी तो खरेदी करणे किंवा न करणे ही बाब पूर्णपणे ग्राहकांवर अवलंबून आहे. ग्राहक/नागरिक/जनता हे पाऊल उचलू शकते. या कामी कोणताही नियम आड येऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी व्होकल फॅार लोकल असा जो सकारात्मक संदेश दिला आहे, त्याचे या दृष्टीनेही महत्त्व आहे. भारताची व्यापारीतली जी एकूण तूट आहे, त्यातली 64% तूट चीनसोबत जो व्यापार होत असतो, त्यामुळे आहे, हे लक्षात घेतले म्हणजे ग्राहक आणि व्यापारी यांच्याकडे किती महत्त्वाची जबाबदारी येते आहे, ते जाणवेल.

   भारत आणि चीन यातील व्यापारामध्ये आज चीनचे नफ्याचे पारडे जड आहे. ते जर उद्या तसे राहिले नाही तर चीनला फार मोठा फटका बसू शकतो. कारण आजतरी चीनची सर्व मदार परराष्ट्रांसोबत होत असलेल्या व्यापारावरच मोठ्या प्रमाणावर आहे हिमालयाला लागून असलेली भारतासोबतची सीमा धगधगती ठेवायची असेल तर किंवा भारत-प्रशांत भागात म्हणजे इंडो पॅसिफिक रीजनमध्ये आक्रमक चाली चालू ठेवायच्या असतील तर, आज चीनच्या हाती असलेले  पैसा उभा करण्याचे एकमेव मोठे साधन परदेशांशी व्यापार हेच उरले आहे. त्याच्यावर चाप बसवता आला पाहिजे. भारताशी चीनचा जो व्यापार होत आहे त्यातून चीनला लक्षावधी डॅालरचा नफा सुटतो आहे. तो कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर भरपूर प्रयत्न झाले आहेत, भविष्यातही होतील. पण त्याबाबत आजतरी आणखी फारसेकाही करण्यासारखे शिल्लक राहिलेले नाही. याची जाणीव ठेवून भारतीय जनतेने स्वदेशीचे आणि व्होकल फॅार लोकलचे नुसते वारेच सुरू होऊन चालणार नाही. तो झंझावात असला पाहिजे. असे झाले तर सीमेवर पेटलेला बर्फ पुन्हा थंड होण्याची शक्यता दसपट वाढेल.

अपरिहार्य आयात

  आज भारताला चीनकडून काही वस्तू, सामग्री, सुटे भाग आदी घटक आयात करण्यावाचून पर्याय नाही. काय वाटेल ते करून ही स्थिती बदललीच पाहिजे. या दृष्टीने सध्या आपले जे प्रयत्न सुरू आहेत, ते समाधानकारक आहेत. पण त्यांची फळे मिळायला काही वेळ  जावा लागेल. पण ज्या वस्तू आपल्या इथे तयार होत आहेत त्या चिनी वस्तूंच्या तुलनेत गुणवत्ता आणि किमंत या बाबतीत स्पर्धा करणाऱ्या होणार नाहीत, तोपर्यंत केवळ स्वदेशी म्हणून त्यांचा स्वीकार ग्राहक किती दिवस करतील? यादृष्टीने भारताचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते प्रत्यक्ष स्वरुपात येण्यास काही वेळ लागेल, तो वेळ  देण्याची आपली तयारी असली पाहिजे. एक निर्माता हे चीनचे शक्तिस्थान नक्कीच आहे. पण ग्राहकाच्या हातीही ही नियंत्रक शक्ती निश्चितच असते. ग्राहकही निर्मात्याची कोंडी करू शकतो. ग्राहक म्हणून भारताला गमावणे चीनला परवडणारे नाही. हे चीन जाणत असणारच. एक ग्राहक या नात्याने भारतही हे जाणतो, हे चीनला आपण दाखवून देणे आवश्यक आहे. सैनिकी सामर्थ्यात भारत चीनची बरोबरी करण्याचे बाबतीत जसा आणि जेवढा जागरूक आहे. तीच स्थिती व्यापारीक्षेत्रात आली पाहिजे. पण या कामासाठी शासकीय पातळीवर  अवलंबून राहून चालणार नाही. ते पुरेसेही ठरणार नाही. या कामी जनआंदोलन करून ‘व्होकल फॅार लोकल’ आणि ‘स्वदेशी’ ही व्रते म्हणून भारतीयांना स्वीकारावी लागतील. हे जनआंदोलन व्हायला हवे आहे. सीमेवर सेना सज्ज आहे. सीमेच्या आत जनमानसही सैन्यशक्तीप्रमाणेच उभे ठाकण्याची आवश्यकता आहे.

प्रभावक्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न 

  चीन आणि भारत यांच्यातले परस्परविरोधी संबंध आता सीमेपुरते सीमित राहिलेले नाहीत. सर्वच प्रकारच्या जागतिक स्पर्धेत हे दोन देश एकमेकांचे स्पर्धक झाले आहेत. भारताचा जागतिक स्तरावरचा प्रभाव आणि स्वीकार्यता जसजशी वाढत जाईल तसतसा चीनचा जळफळाट वाढत्या प्रमाणात होणार, हे गृहीत धरून भारताने पावले उचलली पाहिजेत. चीन दक्षिण चिनी समुद्रावर आपली पकड दिवसेदिवस पक्की करत जाणार आणि अमेरिका चीनला आवरण्यासाठी त्या क्षेत्रातील देशांसाठी सुरक्षेची कवचकुंडले  उभारण्यासाठी धडपडणार, यात शंका नाही. चीनला जपान, ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा भारत या कामात  अमेरिकेच्या बाजूने सहभागी होणार याची चिंता जास्त आहे. या देशात आपापसात नौदल कवायतीही होत आहेत, हे चीनला सहन होण्यासारखे नाही. तरी बरे की, क्वाड (अमेरिका, जपान, अॅास्ट्रेलिया आणि भारत) हे लष्करी  संघटन नाही, हे त्यांनीच स्पष्ट केले आहे.

    अमेरिका आज तरी निर्विवाद महासत्ता आहे. निदान दहा वर्षे तरी ही स्थिती नक्की अशीच राहणार आहे. त्यामुळे चीनच्या आशियातील कारवाईवर मर्यादा नक्कीच पडतील, असे दिसते. यामुळे येती दहा वर्षे तरी चीन आणि भारत यातील संबंध तणावाचे राहण्याचीच शक्यता जास्त आहे. मग ती ब्रिक्सची बैठक असो किंवा शांघाय सहकार्य संघटन (एससीओ)  ची बैठक असो. जगात जसा अमेरिकेचा गट आहे, तसाच चीनच्या नेतृत्वातही एक गट निर्माण करावा असा प्रयत्न  ब्रिक्सच्या बैठकीत शी जिनपिंग करणार हे लक्षात येताच त्यांच्या अगोदरच खेळी खेळून भारताने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. ब्राझील, रशिया, इंडिया (भारत), चीन आणि साऊथ आफ्रिका हे ब्रिक्सचे सदस्य आहेत. ब्रिक्सच्या वतीने जाहीर केल्या जाणाऱ्या संयुक्तपत्रकात अमेरिकाविरोधी टिप्पणी असावी, असा चीन आणि रशिया यांचा प्रयत्न असतो तर ब्रिक्सची भूमिका तटस्थच राहील, असा भारताचा आग्रह असतो. दुसरे म्हणजे आपल्या ओंजळीने पाणी पिणारी राष्ट्रे ब्रिक्सची सदस्य  व्हावीत आणि ब्रिक्स चीन किंवा रशिया धार्जिणा व्हावा, हे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत.

  असाच प्रकार शांघाय कोॲापरेशन ॲार्गनायझेशनच्या बैठकीतही घडला आहे. शांघाय कोॲापरेशन ॲार्गनाझेशन (एससीओ) किंवा शांघाय सहयोग संघटन म्हणजे युरेशियातील (युरोप आणि आशियातील) राजकीय, आर्थिक आणि संरक्षणविषक उद्दिष्ट्ये समोर ठेऊन 15 जून 2001 ला चीन, कझख्सस्थान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापन केलेली आघाडी आहे. पाकिस्तान आणि भारतही या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेच्या बैठकीत चीनने आपल्या महामार्गप्रकल्पाला, म्हणजे बेल्ट अॅंड रोड इनिशिएटिव्हला समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला असता अशा प्रकारच्या जोडणीप्रकल्पाला (कनेक्टिव्ह प्रोजेक्ट), समर्थन मिळविण्यापूर्वीसंबंधित देशाने इतर देशांच्या अखंडतेला (टेरिटोरियल इंटेक्टिव्हिटी)  आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून मान्यता दिलेली असली पाहिजे, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे.