तुर्की-सीरियातील महाभूकंप
तरूण भारत, मुंबई. रविवार, दिनांक १२/०२/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
शत्रुत्व विसरून मदतीला धावले वैरीही!
तुर्की आणि सीरिया या दोन देशातच नव्हे तर परिसरातही 6 फेब्रुवारी 2023 ला सोमवारी भूकंपाचे दोन मोठे म्हणजे 7.8 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेचे धक्के बसले. या भूकंपाचे केंद्र तुर्कीतील गाझियानटेप हे शहर होते भूकंपाचा केंद्रबिंदू 18 किमी खोलवर होता. या मोठ्या धक्क्यांसह काही तासांतच अल्प तीव्रतेचे 75 पेक्षा जास्त धक्के बसल्यामुळे दूर अंतरावरील सायप्रस (456 किमी), लेबेनॉन (874किमी), इस्रायल (1381किमी), इजिप्त(1411किमी) आदी देशांचाही परिसर हादरला. पण तुर्की आणि सीरिया या देशात झालेली वित्त आणि जीवित हानी अभूतपूर्व स्वरुपाची मानली गेली आहे. या भूकंपांनी निसर्गासमोर मानव किती हतबल आहे, याचा परिचय करून दिला आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा भूकंप ठरला आहे. तुर्कीमधील भूकंपामुळे 21000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले असून शेजारच्या सीरियातील मृतांचा यात समावेश नाही. तुर्कीला आणि सीरियाला मदत करण्यासाठी सर्व जग एकवटल्याचे दृश्य समोर आले आहे.
नेपाळमध्ये 2015 मध्ये आलेल्या 7,8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात जवळजवळ 9000 लोक मृत्युमुखी पडले होते. पण 6 फेब्रुवारी 2023 चा भूकंप यापेक्षा कितीतरी अधिक प्राणघातक ठरला आहे.
सीरियातील सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या भागात मृतांची संख्या 1 हजार 250 वर पोहोचली आहे, तर 2 हजारावर नागरिक जखमी आहेत. ‘व्हाईट हेल्मेट’ या स्वयंसेवी संस्थेच्या माहितीनुसार बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य भागात 1 हजारावर लोक मृत्युमुखी पडले आहेत व 2 हजारावर लोक जखमी झाले आहेत. अंतिम आकडे यापेक्षा निदान दुप्पट तरी असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
मै फिरभी जिंदा हूं।
सीरियातील एका गावात मृत आईशी नाळ जोडलेले एक रडणारे नवजात अर्भक आढळले. या कुटुंबातील वाचलेले हे एकमेव अर्भक होते, असे या कुटुंबाच्या नातलगांनी सांगितले आहे. भूकंपानंतर सुमारे दोन दिवसांनी, बचाव कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांच्या एका मुलाला, आरिफ कानला, एका कोसळलेल्या निवासी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. या मुलाच्या शरीराचा खालचा भाग काँक्रीट स्लॅब आणि वाकलेल्या गजांमध्ये अडकला होता. बचाव कर्मचाऱ्यांनी त्याच्या मोकळ्या शरीरावर उबदार पांघरूण घातले. काळजीपूर्वक गज कापले, ढिगारा हळूहळू बाजूला सारला आणि त्याची सुटका केली. मुलाची सुटका झाल्यावर आधी वाचवण्यात आलेले त्याचे वडील एर्तुग्रुल किसी हमसून हमसून रडले. काही तासांनंतर, आदिमान शहरात बचावकर्त्यांनी दहा वर्षीय बेतुल एडिसला तिच्या घराच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी अॅडेलहेड मरशग यांनी या भूकंपग्रस्त प्रदेशात तब्बल दोन कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोचली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भूकंपात आत्तापर्यंत दोन्ही देशातले मिळून 25 हजारावर नागरिक मृत्युमुखी पडले असून 20 हजारांपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. हा आकडा आणखी किती वाढेल, ते कुणालाही सांगता यायचे नाही. भूकंपामुळे 10 भारतीय नागरिकही तुर्कीमध्ये सुरक्षित पण अडकले असून एक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
भूकंप का व कसे होतात?
भूकवच हे नारळाच्या करवंटीसारखे एक साल किंवा कवच आहे. नारळात जसे पाणी असते, तसेच भूकवचाखाली अतिउष्ण द्रवरूप पदार्थ असतात. यात सतत तीव्र हालचाल होत असते. भूकवचाखालील प्रस्तरांच्या (टेक्टोनिक प्लेट्स) हालचालींमुळे भूकवचाला हादरे बसत असतात. हे हादरे मागे-पुढे आणि वर–खाली असे दोन प्रकारचे असतात. यामुळे जमिनीला भेगा पडतात. जमिनीला जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात. जमिनीच्या पोटात असणारे विविध प्रस्तर (टेक्टोनिक प्लेट्स ) मागे-पुढे, खाली-वर सरकून जमिनीला भेगा पडल्यामुळे भूकंप होतो. भूगर्भात होत असलेल्या घडामोडींमुळे एडनच्या आखाताचे विस्तारीकरण होत आहे, असे एक मत आहे. तुर्कस्तान, सीरियामध्ये झालेल्या भूकंपांमागे भूगर्भातील प्रस्तरांच्या घर्षणातून निर्माण झालेल्या ताणासह एडनच्या आखाताच्या विस्तारीकरणाचा परिणाम आहे, असे हे मत सांगते. भूकंपप्रवण क्षेत्र म्हणजे पृथ्वीवर वारंवार भूकंप होणारा भाग होय. भूगर्भातील हालचालींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर हालचाली होतात. यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. तज्ज्ञांच्या मते जगभरात दरवर्षी सुमारे ३० लाख भूकंप होतात. मात्र हे आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. कारण बऱ्याच ठिकाणच्या भूकंपांची तीव्रता अतिशय कमी असते. बहुसंख्य भूकंप हे समुद्रात होतात. भूकंपाची नोंद करणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ म्हणतात. ही एकप्रकारची फुटपट्टी आहे. भूकंप मोजण्याच्या मापाला रिश्टर स्केल असे नाव आहे. रिश्टर मापनपद्धत ही भूकंपाच्या धक्क्याची क्षमता आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या उर्जेचे प्रमाण मोजण्याचे परिमाण आहे. रिश्टर स्केल जेव्हा एका युनिटने वाढते तेव्हा ऊर्जा दहापटीने वाढलेली असते. मापन पट्टीवरील सर्वात लहान माप शून्य तर सर्वात मोठे माप 10 हे आहे. तुर्कीमधले 7.8 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेचे धक्के किती मोठे आहेत, हे यावरून कळून येईल. ही यंत्रे बऱ्याचदा मोठमोठया धरणांजवळ बसवलेली असतात. कारण अशा ठिकाणी जमिनीत पाणी मुरुन भूकंप होण्याची शक्यता असते. याठिकाणी भूकंप झाला तर जलाशय फुटून मोठे नुकसान होऊ शकते.
भूकंपाची कारणे दोन प्रकारची आहेत.
१.ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात. यात भूपृष्ठाच्या आतील लाव्हा भूकवच भेदून बाहेर पडतो. हे नैसर्गिक कारण आहे.
2. मोठमोठया धरणांचा जमिनीवर ताण पडणे, खाण कामात भूकवच भंगून जमिनीत महाकाय खड्डा निर्माण होणे, निरनिराळ्या कामासाठी भूपृष्ठाखाली सुरुंग लावले जाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.
3. पृथ्वीच्या पोटात प्रचंड उष्णता असल्याकारणाने त्यात प्रचंड दाबाखाली असलेला तप्त लाव्हारस कवच कच्चे असेल, कच्चे झाले असेल किंवा कच्चे केले गेले असेल अशा ठिकाणी उफाळून वर येऊन भूकंप होतात.
पृथ्वीच्या गर्भातील हालचालींमुळे होत असलेले भूकंप ही काही नवीन बाब नाही. जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागात रोज भूकंपाचे सौम्य धक्के बसतच असतात. तरीही नेमक्या कोणत्या दिवशी आणि कुठे अधिक तीव्रतेचा भूकंप होऊ शकेल, याचा नेमका अंदाज देणारे तंत्र अद्याप तरी विकसित झालेले नाही. यावर एकच उपाय आहे. तो असा की, भूकंपाची शक्यता गृहीत धरून उपाय करण्याच्या तयारीत 24/7 तयार असणे. भूकंप तर होणारच. पण अगाऊ काळजी घेतली तर दुर्घटनेतील प्राणहानी कमी करता येते.
यावेळी तुर्की आणि सीरिया या दोन्ही देशात मिळून पाच ते सात हजारांहून अधिक इमारती पडल्या. हे दोन्ही देश वेगळ्या संकटांचा सामना आधीपासूनच करीत होते. तुर्की आर्थिक संकटामुळे जेरीस आला होता, तर सीरियाला गेली 11 वर्षे यादवी छळते आहे. यावेळी भूकंप झालेला भूभाग हा मुळातच भूकंपप्रवण आहे. म्हणजे या ठिकाणचे भूकवच कच्चे आहे. हिमालयीन भूभाग खूपच भूकंपप्रवण आहे. तुर्की आणि सीरिया यांचे भूकवच हिमालयाइतके कच्चे नाही. तुर्कीच्या अगदी खाली ॲनाटोलियन टेक्टोनिक प्रस्तर आहे. तर उत्तरेला युरेशियन प्रस्तर आहे. ॲनाटोलियन टेक्टोनिक प्रस्तर आणि युरेशियन प्रस्तर हे ज्या ठिकणी एकमेकांना स्पर्श करतात तो बिंदू धोकादायक आहे. खालील द्रवातील हालचालीमुळे किंवा अन्य काही कारणांनी दोन प्रस्तर एकमेकांवर चढले किंवा त्यांच्यात घर्षण जरी झाले, किंवा ते किंचितसे (0.1सेमीपेक्षाही कमी) वरखाली किंवा मागेपुढे जरी सरकले, तरी वर भूतलावर मोठा भूकंप होण्याची शक्यता नेहमीच असते. यावेळी तसेच झाले आणि हा अनर्थ ओढवला आहे.
कठीण समय येता कामास आले ‘ऑपरेशन दोस्त’।
या भागात गेल्या काही वर्षांत पाच रिश्टरपेक्षा अधिक तीव्रतेचे धक्के जाणवले नव्हते. 1970 पासून आतापर्यंत तीनदा 6 किंवा किंवा त्याहून अधिक रिश्टर तीव्रतेचे धक्के या भागात बसले आहेत. त्यातील शेवटचा मोठा धक्का सन 2000 मधला होता. त्यानंतर 23 वर्षांनी आता हा मोठ्या तीव्रतेचा धक्का बसला आहे. या भूकंपामुळे इमारती मोठ्या प्रमाणात पडल्या. म्हणून हजारो लोक ढिगाऱ्यात दबून मेले आणि कितीतरी जखमी झाले आहेत. इमारतींच्या खाली ढिगाऱ्यात माणसे दबल्यामुळे बचाव कार्य अवघड आणि वेळ खाऊ झाले आहे. भूकंपानंतर तुर्की आणि सीरिया यांना भारतासह संपूर्ण जगभरातून तत्परतेने मदत मिळत आहे. तुर्कीमधील भूकंपाची माहिती मिळताच भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ आयोजित करून तिथे तातडीने सैन्यदलाची वैद्यकीय चमू रवाना केली. हा तोच तुर्की आहे की जो काश्मीर प्रश्नी पाकिस्तानची कड घेत असतो! भारताने नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फोर्स (एनडीआरएफ) च्या तुकड्या आणि वैद्यकीय मदत पाठवली. याशिवाय क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट टीम, ऑर्थोपियाडिक सर्जिकल टीम, जनरल सर्जिकल टीम, मेडिकल स्पेशालिस्ट टीम आणि इतर मेडिकल टीम या सर्वांना नेणाऱ्या विमानांना पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून पुढे जाऊ दिले नाही. करे तर भारताची मदत पाकिस्तानच्या मित्राला होत होती! असे असून सुद्धा असा व्यवहार पाकिस्ताननेच करावा!! त्यामुळे पाकिस्तानला वळसा घालूनच भारतीय विमानांना तुर्कस्तानच्या हद्दीत दाखल होता आले!!!.
भारताने अशा प्रकारे तात्काळ आणि सर्वप्रकारची मदत पुरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. तुर्की आणि सीरिया सारख्या इतर अनेक देशांनाही भारताने मदत केली आहे. अडचणीच्या वेळी कोणताही भेदभाव न करता मानवतेच्या शुद्ध भूमिकेतून मदत करणारा देश अशी भारताची प्रतिमा जगात झाली आहे. कोविडची लस पुरविणे किंवा औषधे पाठविणे ही आत्ताची उदाहरणे आहेत.
तुर्की आणि सीरियातील प्रलयकारी भूकंपातील बळींची संख्या 25 हजारांवर गेली असून ती आणखी कितीतरी वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. हजारो नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत, तर हजारोंवर जखमी उपचार घेत आहेत. तुर्कीचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांनी मदतीबद्धल भारताचे आभार मानले आहेत. ‘गरजेच्या वेळी मित्रच धावून येतो,’ या शब्दात त्यांनी भारताचे आभार मानले आहेत. खऱ्या मित्राची या निमित्ताने तुर्कीला झालेली ओळख यापुढेही कायम राहील, अशी अपेक्षा करू या.
जगभरातूनही मदतीचा ओघ
पृथ्वीवरच्या सर्व खंडातून तुर्की आणि सीरिया कडे मदत यायला सुरवात झाली आहे. युरोपीयन युनीयन शोध मोहिमेत आणि बचाव कार्यात मदत करते आहे. यात युनीयनमधील बल्गेरिया, झेक रिपब्लिक, फ्रान्स, नेदरलंड, पोलंड, रोमानिया यांचा सक्रिय सहभाग आहे. यातील काही देशांचे सॅटलाईट्स आकाशातून हानीचा आढावा घेत आहेत. जर्मनी मदत छावण्या उभारतो आहे. तसेच जनरेटर, तंबू आणि ब्लॅंकेट्स पुरवणार आहे. ग्रीस परंपरागत वैर विसरून सी-130 ही वाहतुक विमाने, प्रशिक्षित कुत्री पाठवतो आहे. स्वीडनही मदतीसाठी तत्परतेने पुढे आला आहे. तुर्कीने स्वीडनला नाटोची सदस्यता देऊ नये, अशी भूमिका घेतलेली असून सुद्धा! रशियानेही मदतीची तयारी दाखविली आहे, तेही तुर्की नाटोचा सदस्य असून सुद्धा! ही यादी अशीच पुढे वाढविता येईल.
विशेष नोंद घ्यावी असे काही भूकंप
2004 या वर्षी हिंदी महागरात 9.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. 1906 या वर्षी सॅनफ्रान्सिसको येथे 7.8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता.1976 मध्ये चीनमधील तंग्शन येथे 7.6 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. अगादिर हे मोरोक्कोमधील एक शहर आहे. 1960 या वर्षी येथे 5.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता.
मदत करतांना पक्षपात नाही
तुर्की व सीरियातील भूकंपबळींची संख्या 25 हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन हे या भूकंपग्रस्त क्षेत्राला सध्या भेटी देत आहेत. पहिल्या दिवशी बचावकार्य तोकडे पडल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु त्यानंतर आता मदत कार्याने वेग घेतला आहे. याबाबत स्थिती सुधारल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या कोणत्याही नागरिकास, भलेही तो कुर्द का असेना, आम्ही मदतीपासून वंचित ठेवणार नसल्याचे अडदांड आणि अरेराव व्यक्तिमत्त्वाचे असूनही एर्दोगन यांनी स्पष्ट केले आहे. संकटकाळी कधीकधी असेही घडून येते तर! कुर्द आणि तुर्की यात सतत चकमकी झडत असून सुद्धा! तुर्की आणि सिरियात भूकंपग्रस्त भागात ठिकठिकाणी अनेक बचाव पथके भेदभाव न करता दिवस-रात्र मदतकार्य करत आहेत. या विनाशकारी भूकंपामुळे कोसळलेल्या हजारो इमारतींच्या ढिगाऱ्यांतून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हा भूकंप एका दशकाहून अधिक काळातील सर्वात प्राणघातक ठरला आहे.
या दोन्ही देशात इमारती कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप आहे. याचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की, भूकंपप्रवणक्षेत्रात इमारती बांधतांना बिल्डिंग कोडचे पालन केले गेले नव्हते. ते केले असते तर इतक्या इमारती नक्कीच पडल्या नसत्या. या बाबीची सर्वच देशांनी नोंद घ्यायला हवी आहे. अर्थात त्यात भारतही आलाच!
No comments:
Post a Comment