फोडलेल्या फुग्याचे गूढ उघड? 14/02/2023
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक१४/०२/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
फोडलेल्या फुग्याचे गूढ उघड?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 Email: kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेने हेरगिरी करण्याच्या संशयावरून आपल्या हवाई हद्दीत शिरलेल्या चिनी बनावटीच्या एका महाकाय पांढऱ्या उडत्या फुग्याचा (जायंट प्लाईंग बलूनचा) हवेतच नाश केला. सैनिकी महत्त्वाच्या तळांची पाहणी करण्याच्या हेतूने चीनने हा बलून पाठविला होता, असा अमेरिकेचा चीनवर आरोप आहे. अमेरिकेच्या या कृतीचे दोन परिणाम संभवतात. पहिले असे की, चीन आणि अमेरिका यातील अगोदरच ताणलेले राजकीय संबंध अधिकच ताणले जातील. दुसरे असे की, चीन आणि अमेरिका यातील रोडावलेले व्यापारी संबंधही आणखीच रोडावतील. हा बलून अमेरिकन भूमीपासून 6 सागरी मैल दूर समुद्रावर आलेला असतांना अमेरिकेने पाडला आहे. समुद्राचा हा भाग अमेरिकेच्या अधिकारक्षेत्रातच मोडतो. यावेळी समुद्रात अमेरिकेची जहाजे गस्त घालीत होती. मिसाईल डागल्यावर एक लहानसा स्फोट झाला. बलूनचे समुद्रात पडलेले अवशेष शोधून त्यांचा अभ्यास करण्याचा अमेरिकेचा हेतू आहे हे यावरून स्पष्ट होतो. नाश केल्यानंतर बलूनचे अवशेष समुद्रातच पडतील यासाठी अमेरिकेने विशेष काळजी घेतल्याचे दिसते. जमिनीवर अवशेष पडले असते तर वित्तहानी आणि जीवित हानी होण्याचा धोका होता. समुद्रात पडलेले बलूनचे अवशेष अमेरिकेने गोळाही केले आहेत.
चीनची सारवासारव
अमेरिकेच्या हवाई हद्दीत आढळलेला हा बलून आमचाच आहे, असे स्पष्टीकरण चीनने दिले होते. तसेच या बलूनच्या माध्यमातून पर्यावरणविषयक संशोधन करण्यात येत असून तो चुकून अमेरिकेच्या हद्दीत गेला, असेही चीनने सांगितले होते. चिनी बलून पूर्ण फुगल्यावर 90 फुटांपर्यंत व्यासाचे होतातच, त्यात नवे काही नाही, पण हा फुगा 200 फूट उंच आणि तेवढ्याच व्यासाचा आहे. त्यामुळे संशय येणारच. पण तरीही हा बिनलष्करी हेतूने पाठविलेला आणि भरकटल्यामुळे चुकून अमेरिकन हद्दीत गेलेला बलून अमेरिकेने पाडला, असे सांगत चीनने निषेध आणि संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेची ही कृती विनाकारण आणि चीनला उगीचच बदनाम करणारी आहे, असेही चीनने म्हटले आहे. मात्र हा बलून कोठून सोडण्यात आला होता? उत्तर नाही. तो कोणता अभ्यास करणार होता? उत्तर नाही. तो किती दिवस प्रवास करणार होता? उत्तर नाही. असा कोणताही तपशील चीन का देत नाही? याचेही उत्तर नाही. अशा परिस्थितीत संशय येणार नाही का? ते काहीही असो पण या घटनेमुळे अमेरिका-चीन यांच्या राजकीय संबंधांत नवीन तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नव्हे दोन्ही देशांचे आधीच ताणले गेलेले संबंध आणखीनच बिघडले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आपला चीन दौरा रद्द केला आहे, यावरून ही बाब स्पष्ट होते आहे. यावर रद्द करायला ह्या भेटीची योजना रीतसर घोषित झालीच कुठे होती, असे म्हणत चीननेही अमेरिकेला चिमटा काढला आहे.
तैवानचा चीनवर ठपका
तैवानने मात्र अमेरिकेचे हे कृत्य योग्य ठरविले आहे. चीनने आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केल्याचा आणि दुसऱ्या देशाच्या प्रभावक्षेत्रात विनाअनुमती प्रवेश केल्याचा ठपका तैवानने चीनवर ठेवला आहे. तैवानला लागून असलेल्या आणि तैवानचे आधिपत्य असलेल्या समुद्रात चीन जवळजवळ रोजच आक्रमण करीत असल्यामुळे तैवानने अमेरिकेची बाजू घेतलेली दिसते आहे.
या घटनेपूर्वी काही दिवस अगोदर उत्तर अमेरिकेतील मोंटाना राज्याच्या आकाशातही एक पांढरी वस्तू दिसत होती. चंद्रासारखी दिसणारी ही वस्तू मात्र आकाराने महाकाय फुग्यापेक्षा खूपच लहान दिसत होती. ही तर उडती तबकडी असे सर्व म्हणू लागले. काहींनी या तबकडीची छायाचित्रे काढली आणि समाजमाध्यमांवर टाकली. दुसरीकडे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना या वस्तूची माहिती मिळाल्याशिवाय कसे राहणार? त्यांना वेगळीच शंका आली. हा हेरगिरीचा प्रयत्न तर नसेल ना? चक्रे वेगाने फिरू लागली. मोंटानाच्या बिलिंग्ज विमानतळावरील सर्व उड्डाणे थोपवण्यात आली. आकाशात दिसणारी ही वस्तू नेमकी काय आहे? ती सैनिकी प्रतिष्ठाने असलेल्या मोंटोनाच्याच आकाशात कशासाठी आली आहे? असे प्रश्न एका पाठोपाठ उभे राहिले. या प्रश्नांची उत्तरे शोधली जाऊ लागली. तपासाअंती हाही चिनी बनावटीचाच फुगा असल्याचे स्पष्ट झाले. या फुग्याशी चीनचे नाव जोडले गेल्यानंतर अमेरिकेचा संशय अधिकच बळावला आणि हा फुगा अमेरिकेवर पाळत ठेवण्यासाठी सोडल्याची शंका घेतली जाऊ लागली.
हे फुगे आपलेच असल्याचे चीनने मान्य केले आहे. मात्र ते हेरगिरीसाठी अमेरिकन आकाशात पाठविल्याच्या आरोपाचा मात्र चीनने इन्कार करीत पुढे म्हटले की, हे फुगे वातावरणाचे बाबतीतल्या संशोधनासाठी सोडण्यात आले आहेत. मात्र त्यावरील नियंत्रण सुटल्यामुळे फुगा भरकटला आणि मोंटानाच्या आकाशात पोहोचला. तरीही चीनने झाल्या प्रकाराबाबत अमेरिकेची माफीही मागितली. पण चीनचा विश्वसनीयता गुणक अमेरिकेच्या हिशोबी बराच उणा असल्यामुळे चीनचे हे स्पष्टीकरण अमेरिकेने स्वीकारले नाही. राजकीय आणि लष्करी अशा दोन्ही स्तरांवर अनेक पातळ्यांवर खल सुरू झाला. हे सगळे सुरू असतानाच दक्षिण अमेरिकेच्या आकाशात तसाच दुसरा फुगा दिसल्यामुळे टेहळणीचा संशय आणखीनच बळावला. चूक एकदा होऊ शकते. दुसऱ्यांदा तसेच होत असेल, तर ती चूक कशीकाय मानता येईल? असा अमेरिकेचा सवाल आहे. ते काही नाही. अगोदर हा फुगा अमेरिकेच्या आकाशातून बाहेर काढा आणि अमेरिकेच्या अवकाश क्षेत्राबाहेर नेऊन नष्ट करा, असा निर्णय झाला. खुद्द ज्यो बायडेन यांनी हा निर्णय घेतला हे लक्षात घेतले म्हणजे अमेरिका या प्रश्नाकडे किती गंभीरतेने पाहते आहे, ते स्पष्ट होईल. म्हणूनच एका फुग्याचा समाचार घेण्यासाठी अमेरिकेची अद्ययावत लष्करी विमाने सज्ज झाली. फुग्यात स्फोटके नसतीलही. पण जड वस्तू असतीलही आणि त्या मानवी वस्ती असलेल्या भागावर पडल्या तर हानी, कदाचित जीवित हानीही, होऊ शकेल. शेवटी फुगा पाडायचाच असे ठरवून एफ 16 या लष्करी विमानाने तो फुगा समुद्रात पाडला. नुकसान तर टळले. पण त्या फुग्यात होते तरी काय? संशोधनासाठीची उपकरणे? की हेरगिरी साठीची उपकरणे? अमेरिकेने याचा शोध घेतला असता लष्करी उद्देश लक्षात आला आहे.
अमेरिकेला संशय येणे सहाजीकच
अमेरिकेला चीनच्या हेतूचा संशय विनाकारण आलेला नाही. चीनच्या विश्वसनीयतेने सद्ध्या तळ गाठला आहे. असे का झाले यासाठी अनेक कारणे सांगता येतील. आज तैवानच्या स्वायत्तत्तेबाबतचे चीनचे धोरण समर्थनीय वाटत नाही. तैवानचा तिबेट होईल, अशी तैवानसह इतर अनेकांना भीती वाटते. संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर चीन आपला हक्क सांगतो आहे. अनेक देशांचे समुद्रकिनारे या समुद्राला लागून आहेत. त्यांच्या अधिकाराचे काय? कोविड-19चे उगमस्थान चीनमध्ये आहे, असे जग मानते. प्रयोगशाळेतील दुर्लक्षामुळे किंवा हेतुपुरस्सर रीतीने चीनने हे जंतू जगभर पसरविले अशी शंका अनेकांच्या मनात आहे. प्रयोगशाळांना भेटी देण्यासाठीची परवानगी देण्याचे बाबतीत चीनने जी खळखळ केली, त्यामुळे हा संशय बळावला आहे. हॅांगकॅांगबाबत चीन दिलेली आश्वासने मोडतो आहे. युक्रेनयुद्ध प्रकरणी तटस्थ न राहता चीनने रशियाला समर्थन दिले आहे. आता अमेरिका चीनच्या फुग्याचे अवशेष गोळा करून सत्य जाणण्यासाठी तपासणी केली असता लष्करी उद्देश उघड झाला आहे. अमेरिकेने तसे अनेक देशांना कळविले सुद्धा आहे.
फुगे आजही का वापरात आहेत?
टेहळणी करण्यासाठी फुगे वापरल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. पहिल्या महायुद्धात टेहेळणीसाठी फुग्याचा वापर हे एक मान्यताप्राप्त तंत्र म्हणून प्रतिष्ठा पावले होते. दुसऱ्या महायुद्धात फुग्यांचा वापर स्फोटके वाहून नेण्यासाठी केला गेला. उपग्रह, विमाने आणि ड्रोन्स यांनी फुग्यांना आज मागे टाकलेले आढळते. तरीही फुग्याचे स्वतंत्र विशेष आहेत. फुग्यांची उंची कमीअधिक करता येते. फुग्यांना हवीती दिशाही देता येते कारण वेगवेगळ्या उंचीवर वाऱ्याची दिशा वेगवेगळी असते. कमी उंचीमुळे फुग्यातून काढलेली छायाचित्रे अधिक स्पष्ट असतात. फुग्यांचा वापरण्याचा खर्चही खूपच कमी असतो. या वैशिष्ट्यांमुळे फुगे आजही वापरात आहेत.
चिनी फुग्यात तर मोटर आणि पंखे (प्रॅापेलर) बसविलेले होते. रिमोट बटनाच्या साह्याने त्याच्या गतीवर, उंचीवर आणि दिशेवर नियंत्रण ठेवता येत असले पाहिजे. असे असेल तर ते भरकटलेच कसे?
उपग्रहाची तंत्रवैशिष्ट्ये फुग्यांपेक्षा श्रेष्ठ प्रतीची असतात. पण त्याची भ्रमणकक्षा निश्चित असते. रिमोटच्या साह्याने फुगा हव्या त्या दिशेला, हव्या त्या उंचीवर, हव्या त्या वेगाने नेता येतो. उपग्रहाची कक्षा कळली की त्याचा वेध घेणे सोपे असते. फुगा अथांग अवकाशात लपवता येतो. त्याचा माग काढणेही कठीण जाते. विमाने दुसऱ्या देशाच्या हद्दीत गेली तर लगेच बोभाटा होतो. फुग्यांच्या जाण्यायेण्यावर नजर ठेवणे कठीण असते.
चीनचे फुगे बरेच प्रगत स्वरुपाचे मानले जातात. या प्रकारच्या फुग्यांना अनआयडेंटिफाईड एरियल फेनॅामेना (युएपी) असे नाव आहे. 2022 मध्ये असे 150 च्यावर युएपी आढळले आहेत. काहींना उडत्या तबकड्या म्हटले गेले. अमेरिकेप्रमाणे जपान आणि अंदमान निकोबार च्या अवकाशातही फुगे आढळल्याचे वृत्त आहे. केवक्ळ भारतातच नव्हे तर 5 खंडात चीनने असे फुगे पाठविले होते, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. फुग्यांचा वापर अनेक देश निरनिराळ्या कारणांसाठी करीत असतात. तेही कधिकधि भरकटतात सुद्धा! बोभाटा झाला किंवा होतो तो चीनने पाठविलेल्या फुग्यांचाच. सहाजीकच आहे एकदा का कानफाट्या नाव पडले की असे होणारच! असे असले तरी या घटनेमुळे चीनचा जागतिक राजकारणातील फुगा अधिकच फुगला, हे मान्य करायलाच हवे. नाही का?
No comments:
Post a Comment