Monday, February 27, 2023

 पर्यटनामागचा असाही एक नवीन हेतू 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २७/०२/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     



पर्यटनामागचा असाही एक नवीन हेतू
 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   पर्यटन ही संज्ञा प्रवास (टूर) या शब्दाशी संबंधित आहे आणि टूर हा शब्द लॅटिन भाषेतील टॅार्नॅास'  या शब्दापासून आलेला आहे. टॅार्नॅास' या शब्दाचा मूळ अर्थ वर्तुळाकार असा आहे. याच शब्दापासून पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला आहे. एका व्यक्तीने किंवा व्यक्तीसमूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. याशिवाय पर्यटनाचा आणखी एक नवीन प्रकार  रशियन महिलांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. यासाठी त्या अर्जेंटिना या  दक्षिण अमेरिकेतील देशाला विशेष प्राधान्य देत आहेत.  

   अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनॉसऐरस ही आहे. अल्बर्टो फर्नांडिस अध्यक्ष असलेल्या या देशाची  लोकसंख्या ४ कोटी इतकी कमी आणि देशाचे क्षेत्रफळ मात्र २८ लाख चौरस किलोमीटर एवढे मोठे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा देश आहे.  भारताची लोकसंख्या 140 कोटी एवढी प्रचंड  आणि क्षेत्रफळ 33 लाख चौरस किलोमीटर असून तो जगातला सातवा मोठा देश आहे. म्हणजे क्षेत्रफळाचा विचार करता भारत आणि अर्जेंटिना या  दोन्ही देशांच्या क्षेत्रफळात फारसा फरक नाही. पण लोकसंख्येत भारत कितीतरी मोठा आहे. कुठे 4 कोटी आणि कुठे 140 कोटी! 

  टागोर आणि अर्जेंटिना 

  अर्जेन्टिनाच्या उत्तरेस पेराग्वे व बोलिव्हिया, ईशान्येस ब्राझील व उरुग्वे, पश्चिमेस चिली हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. अर्जेन्टिना देशाचा धर्म ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश व इटालियन भाषा बोलल्या जातात. रवींद्रनाथ टागोर यांनी 1924 मध्ये अर्जेंटिनाला भेट दिली होती. अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध लेखिका व्हिक्टोरिया ओकॅम्पोचे पाहुणे म्हणून ते दोन महिने तिथे राहिले. टागोरांनी अर्जेंटिनामधील त्यांच्या वास्तव्याबद्दल "पूरबी" या शीर्षकाखाली कवितांची मालिका लिहिली आहे. व्हिक्टोरिया ओकॅम्पो यांना 1968 मध्ये विश्व भारती विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली.

    दक्षिण अमेरिकेचा दक्षिणेकडचा बहुतेक भाग अर्जेंटिनाने व्यापला आहे.  या देशात विस्तीर्ण हिरवळी प्रदेश, तशीच वाळवंटे, जंगले, मोठाले पर्वत, खळाळणाऱ्या नद्या आणि विस्तीर्ण समुद्र किनारा आहे. 

  अर्जेंटिना ही स्पेनची वसाहत 

     दक्षिण अमेरिका खंडात  अर्जेंटिनाचे स्थान आणि भूमिका  महत्त्वाची राहिलेली आहे. तीन शतके म्हणजे 300  वर्षे अर्जेंटिना ही स्पेनची वसाहत होती. 1816 मध्ये अर्जेंटिनाने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.  नंतर त्याच्याच नेतृत्वाखाली दक्षिण अमेरिकेचेही दिवस पालटले. 1970 मध्ये अर्जेंटिनामध्ये हुकुमशाही राजवट आली. या राजवटीत विरोधक अचानक अंतर्धान पावत. 1982 या वर्षी ब्रिटिशांबरोबर झालेल्या युद्धात अर्जेंटिनाचा आणि त्या देशातील हकुमशाहीचाही पराभव झाला आणि त्या देशात लोकशाहीची पहाट उगवली.        

                          निसर्गाची अर्जेंटिनावर विशेष कृपा!

   लॅटिन भाषेत अरजेंटम म्हणजे चांदी. अर्जेंटिना हा लिथियमसह अनेक मौल्यवान खनिजांचा देश आहे. तो पशुधन आणि तृणधान्य संपन्न देश आहे. प्रचंड भूमी आणि विरळ लोकसंख्या यामुळे या देशात पायी चालतांना क्वचितच एखादा प्राणी दिसला तर दिसतो. त्यामुळे असे म्हणतात की, आपला प्रवास जमिनीवरून होत नसून आपण इतिहासात शिरतो आहोत, असे वाटते. जगातील डिएगो मॅराडोना, लायोनेल मेस्सी हे नामवंत फुटबॉलपटू याच देशातील आहेत. अर्जेन्टिनात लिथियम, कोळसा, शिसे, तांबे, जस्त, सोने, चांदी, निकेल व गंधकाचे साठे आहेत. हवाबंद डब्यात मांस भरून निर्यात करणे, हा अर्जेन्टिनाचा प्रमुख उद्योग आहे. अर्जेंटिनाची ही वैशिष्ट्ये मागे पडावीत अशी एक घटना घडली असून तिची सर्व जगाने नोंद घेतली आहे.

  अर्जेंटिनाचे नवीन चाहते 

    सद्ध्या अनेक रशियन गर्भवती महिला अर्जेंटिनामध्ये प्रवासी म्हणून प्रवेश करीत आहेत आणि तिथेच बाळाला जन्म देत आहेत. अर्जेंटिनाचा कायदा असा आहे की, ज्याचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला आहे, त्याला तात्काळ अरजेंटिनाचे नागरिकत्व मिळते. बाळाला नागरिकत्व मिळताच त्याच्या पाठोपाठ आईबापही नागरिकत्व मिळावे म्हणून अर्ज करतात आणि यथावकाश अरजेंटिनाचे नागरिकत्व मिळवतात. काही दिवसांपूर्वी 6 गर्भवती महिलांनी आपण पर्यटक आहोत असे सांगत अर्जेंटिनात प्रवेश केला होता. अर्जेंटिनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना देशांतरण (मायग्रेशन) अधिकाऱ्यांनी अडविले. पण कोर्टाने त्यांना  अरजेंटिनात प्रवेश करण्याची अनुमती दिली. ‘या महिलांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे त्यांना अर्जेंटिनात प्रवेश करण्यापासून अडविता येणार नाही,असा निर्णय कोर्टाने दिला.  अशा महिलांची संख्या दिवसेदिवस वाढत असून एकदा तर अशा 33 महिला एकाच विमानाने अर्जेंटिनात येऊन थडकल्या. त्या सर्व 32 ते 34 आठवडे पूर्ण झालेल्या गर्भवती महिला होत्या. गेल्या तीन महिन्यांचा हिशोब केला तर एकूण 5819 महिला अर्जेंटिनात प्रसूतीसाठी आल्या आहेत.

   कायदा असा आहे की, अर्जेंटिनात जन्म झाला रे झाला की त्या बाळाला अर्जेंटिनाचे नागरिकत्व बहाल करण्यात येते. तसेच अशा बाळांच्या आईवडलांना इतरांच्या तुलनेत लवकर नागरिकत्व दिले जाते. सध्या अर्जेंटिनाचे पोलिस खाते या प्रकारे प्रवेश  करण्यामागे एखादी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली संघटना आहे किंवा कसे, याचा शोध घेत आहे. अशाप्रकारे अर्जेंटिनात प्रवेश करून नागरिकत्व मिळविण्याचे बाबतीत अरजेंटिनाची हरकत नाही. फक्त यापेक्षा वेगळा हेतू नसावा, एवढीच अर्जेंटिनाची अपेक्षा आहे. या स्थलांतरामागे एक प्रमुख हेतू हा असतो की, अर्जेंटिनाचा पासपोर्ट असणाऱ्याला जगातील 171 देशात व्हिसाशिवाय प्रवेश मिळत असतो. अमेरिका, कॅनडा आणि दक्षिण अमेरिकेतील देशही अशाच प्रकारची सवलत देत असतात. युक्रेनयुद्धानंतर याप्रकारे प्रवेश मिळविणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. अर्जेंटिनातील वैद्यकीय सेवा उत्तम प्रतीच्या तर आहेतच पण त्या इतर देशांच्या तुलनेत स्वस्तही आहेत, असे मानले जाते. शिवाय अर्जेंटिनात प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागत नाही, हेही एक महत्त्वाचे कारण आहे.

   बर्थ टूरिझम

  बर्थ टूरिझम अर्जेंटिनालाही मानवले असून त्याची जाहिरातही केली जात असते. पण अर्जेंटिनाचे पोलिस खाते मात्र या सर्व प्रकाराकडे संशयाने पाहत असते. अटक करीत असते, कागदपत्रे बारकाईने तपासत असते. पण अर्जेंटिनात व्हिसाशिवाय प्रवेश दिला जात असल्यामुळे पोलिस खात्याचा नाईलाज होत असतो.

   बर्थ टूरिझम हा अर्जेंटिनातला एक किफायतशीर धंदा झाला आहे. अर्जेंटिनामधील कंपन्या भरपूर शुल्क आकारून यासाठी एक पॅकेजच देऊ लागली आहेत. प्रवासी व्हिसा घेऊन पासपोर्टशिवाय प्रवेश करा, बाळाला जन्म द्या, कमी खर्चात उत्तम वैद्यकीय सेवा मिळवा, बाळासाठी तात्काळ नागरिकत्व मिळवा, बाळासोबत काही दिवसांसाठी बिऱ्हाड थाटा आणि आपल्या मायदेशात परत जा, असे हे पॅकेज असते. पुढे आाईबापांनाही नागरिकत्व मिळते. आणखी काय हवे?

  अर्जेंटिना, बारबाडोस, फिजी, जमैका, मेक्सिको, पनामा आणि उरुग्वे या देशातही तिथे जन्म झालेल्यांना नागरिकत्व बहाल करण्यात येते. पण आजतरी चलती अर्जेंटिनाची आहे.

नागरिकत्व कसे मिळवता येते 

   एका देशातून दुसऱ्या देशात नागरिकत्व प्राप्त होण्यासाठी चार मार्ग उपलब्ध आहेत. 

. ‘जस सोली’ म्हणजे जन्मामुळे प्राप्त होणारे नागरिकत्व - एखाद्या मुलाचा जन्म ज्या देशात झाला त्या देशाचे नागरिकत्व त्याला जन्मामुळे प्राप्त होते. मग त्या मुलाचे आईबाप कोणत्याही देशाचे नागरिक असले तरी! ही तरतूद अमेरिका, कॅनडा, दक्षिण अमेरिकेतील बहुतेक सर्व देशात अस्तित्वात आहे.

.विवाहकरून -परदेशाचे नागरिकत्व प्राप्त करायचे असेल तर त्या देशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीशी विवाह करणे, हा किचकट आणि वेळखाऊ मार्ग अनुसरणारे बरेच आहेत. 

.भांडवल गुंतवून - व्यावहारिक भाषेत बोलायचे तर पैसे मोजून नागरिकत्व मिळविण्याचा हा मार्ग आहे. संबंधित देशाला बहुदा भांडवल हवे असते. एक लाख डॅालर पासून पुढे कितीही असा हा दर देशपरत्वे असतो.

.नागरिकीकरण (नॅचरलायझेशन) - हा मार्ग बहुतेक लोक अनुसरतांना आढळतात. सुरवातीला इच्छुक व्यक्ती व्हिसा प्राप्त करून संबंधित देशात नोकरी मिळवते. यानंतर टप्प्याटप्प्याने नागरिकत्व मिळवता येते. ही ‘सरकारी पद्धत’ किचकट आणि वेळ खाऊ असते. यथावकाश ग्रीन कार्ड आणि नंतर नागरिकत्व असा प्रवास असतो.

   निरनिराळ्या देशातला वैद्यकीय उपचारांचा खर्च वेगवेगळा असतो. अमेरिका, स्वित्झर्लंड, युरोप, कॅनडा,अॅास्ट्रेलिया यात वैद्यकीय उपचारांचा खर्च खूपच जास्त असतो. अर्जेंटिनामध्ये तो खूप कमी आहे, असे नाही. पण प्रसूतीसोबत बाळाला नागरिकत्व आणि आईबापांना नागरिकत्व देतांना प्राधान्य, याचे आकर्षण रशियन महिलांना जास्त आहे याचे एक कारण चांगल्या आणि उच्चप्रतीच्या वैद्यकीय सेवा याचे आकर्षण त्यांना आहे. युक्रेन युद्धामुळेही रशिया शिवाय इतर एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळत असेल तर पहावे, हा विचार रशियन महिलांमध्ये बळावत चालला आहे. रशियन महिलांनी आपला प्रश्न सोडवला खरा पण संवेदनशील मनांमध्ये अनेक प्रश्न उभे झाले आहेत, त्याचे काय?

  

No comments:

Post a Comment