रशियामधील संघर्ष!
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक ११/०७/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
रशियामधील संघर्ष!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
Email - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
गोर्बाचेव्ह यांच्या कारकिर्दीत सोव्हिएट युनियनचे विघटन झाल्यानंतर जी राज्ये अस्तित्वात आली, त्यात काही युक्रेनसारखी संपन्न राज्येही होती. युक्रेनमध्ये युरेनियम सारखी मौल्यवान खनिजे, निम्म्या जगाला गव्हाचा पुरवठा करू शकतील असे सुपीक भूप्रदेश होते, वनसंपदा, नद्या आणि ऐतिहासिक अवशेष सुद्धा होते. या सर्व गोष्टी युक्रेनला स्वत:ची स्वतंत्र आणि वेगळी ओळख सांगण्यास पुरेशा ठरणाऱ्या होत्या. पुतिन यांना सोव्हिएट युनियनचे विभाजनच मान्य नव्हते. निदान त्यातली सर्वार्थाने संपन्न असलेली राज्ये पुन्हा रशियाला जोडून घ्यावीत, असा प्रयत्न त्यांनी सुरू केला.
रशियाचीच मदत का घेत नाही?
युक्रेनच्या हे लक्षात येताच त्याने हे थोपवण्यासाठी अमेरिकेकडे सहाय्य मागून युक्रेनचा स्वतंत्र विकास करण्याच्या दृष्टीने मदतीसाठी आवाहन केले. परंतु अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी युक्रेन पासून अमेरिका खूप दूर आहे, तर रशियाची सरहद्द युक्रेनला लागूनच आहे तेंव्हा रशियाच युक्रेनला चांगल्याप्रकारे मदत करू शकेल, असा अजब सल्ला दिला. बराक ओबामानंतर ट्रंप यांच्या राजवटीत फारसे वेगळे घडले नाही. या काळात युक्रेनमध्ये निवडून आलेले राज्यकर्तेही फारसे कर्तृत्त्ववान नव्हते. शिवाय युक्रेनमध्ये राजकीय लाथाळीही सुरू होती. झेलेंन्स्की हा एकेकाळचा गाजलेला विनोदी नट आहे. पण त्याने मी युक्रेनची अखंडता कायम राखीन, असे आश्वासन देऊन निवडणुकीत भरघोस यश संपादन केले. पण याच काळात रशियाने, खाजगी सैन्य बाळगण्यास कायद्याने बंदी असूनही, ‘वॅग्नेर गट’ या भाडोत्री सैनिकांच्या मदतीने क्रिमियावर बेकायदेशीर ताबा मिळवला.
नाटोची सदस्यता द्या
अमेरिकेला आणि अन्य पाश्चात्य राष्ट्रांना आता रशियाचा हेतू चांगलाच लक्षात आला आणि त्यांनी रशियाला जी 8 मधून काढून टाकले. रशियाची मदत घेणे म्हणजे प्रत्यक्ष युक्रेनच गिळंकृत होऊ देणे, हे त्यांच्या लक्षात आले.
युक्रेनने आता नाटोने आपल्याला सदस्यता द्यावी म्हणून अर्ज केला. या सदस्यतेमुळे युक्रेनवर हल्ला म्हणजे नाटोवर हल्ला मानला गेला असता. युक्रेनशी युद्ध म्हणजे नाटोच्या प्रत्येक सदस्य राष्ट्राशी युद्ध असे ठरले असते. पण नाटोची सदस्यता मिळणे हे सोपे नव्हते. कारण नाटोच्या घटनेप्रमाणे नवीन सदस्य करून घेण्यास सर्वच सदस्य राष्ट्रांची सहमती आवश्यक असते परंतु तुर्की सारखी राष्ट्रे युक्रेनला सदस्य करून घेण्याच्या बाबतीत टोकाचा विरोध करणारी होती. याला कारणही तसेच होते. युक्रेनने या देशातील सत्तारूढ पक्षाच्या विरोधकांना मदत केली होती. त्यांची समजूत घालण्यातही युक्रेनचा बराच वेळ गेला.
रशियाचा, युक्रेनच्या नाटो सदस्य होण्याच्या प्रश्नावर तीव्र आक्षेप होता, कारण मग युक्रेन आणि रशिया यातील सरहद्द ही नाटो आणि रशिया यातील सरहद्दीसारखी झाली असती. दरम्यानच्या काळात सद्ध्याचे रशिया आणि युक्रेन यातील युद्ध सुरू झाले.
मैत्रीत बिघाड
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपले जुने मित्र वॅग्नेर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन यांची खाजगी सशस्त्र सेना मदतीला घेऊन अगोदरच्या काळात चेचन्या बंडखोरांना ठेचण्याचा प्रयत्न केला होता. नंतर रशियाने याच भाडोत्री सैनिकांच्या जोरावर क्रिमिया गिळंकृत केला. त्यांनाच आता रशियाने युक्रेन युद्धातही सहभागी केले. एकाच कामासाठी दोन्ही ‘सेना’ म्हणजे रशियन सेना आणि वॅग्नेर ग्रुपची भाडोत्री सेना एकाच वेळी प्रथमच एकाच उद्देशाने लढाईत अशाप्रकारे उतरत असाव्यात. असे सान्निध्य यापूर्वी निदान या प्रमाणात तरी झाले नसावे. हळूहळू रशियन लष्कर आणि वॅग्नेर ग्रुप यांत कुरबुरी होऊ लागल्या. यशासाठी परस्परात स्पर्धा निर्माण झाली. वॅग्नेर ग्रुप ही एक खाजगी कंपनीच आहे, म्हणाना. ती पैसे घेऊन (सुपारी घेऊन ?) मदत करते. येवगेनी प्रोगोझिन आणि पुतिन यांच्यातील संबंधामुळे सद्ध्या ती रशियाच्या बाजूने संघर्षात उतरते. यावेळी मात्र रशियाचे संरक्षण मंत्री आणि वॅग्नेर ग्रुप प्रोगोझिन यांच्यातील बेबनावामुळे रशियन सैनिकांनी वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांवरच हल्ला करून शेकडो सैनिकांना ठार केले. तर वेळेवर मदत आणि शस्त्रे रशियन सैन्याने न पुरवल्यामुळे वॅग्नेर गटाच्या सैनिकांना एकदोनदा माघार घ्यावी लागली. या आणि अशा कृत्याला पुतिन यांची मूक संमती असलीच पाहिजे, असे मानून आपल्या सैनिकांसह खुद्द मास्कोपासून केवळ 500 किलोमीटर अंतरावरच वॅग्नेर ग्रुपचे सैनिक ठाण मांडून बसले. वॅग्नेर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन यांनी रशियाच्या लष्कराने वॅग्नेर ग्रुपच्या सैनिकांवर हल्ला केला, असा आरोप केला असून पुरावा म्हणून काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावरही प्रसारित केल्या आहेत. रशियन सैनिकांनी वॅग्नेरच्या छावण्यावर हल्ला केला असून अनेक सैनिकांना मारले असल्याचेही या क्लिपमध्ये दिसते आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच आपण 25 हजार सैनिकांसह न्यायाच्या दिशेने चाललो असल्याचेही प्रोगोझिन म्हणाले आहेत. या आशयाच्याही अनेक कथा थोड्याफार फरकासह समोर येत असतात. आपण मास्कोला येणार नाही, रशियाच्या प्रतिनिधींनी इथे येऊन आपल्याशी चर्चा करावी, अशी अट वॅग्नेर गटाने घातली. या आणि अशा आशयाची अनेक उलटसुलट आणि वेगवेगळी वृत्ते कानावर येत आहेत. तर हा सर्वच खुद्द रशियाचाच एक बनावट डाव होता, असेही एक मत आहे.
वॅग्नेर ग्रुपच्या सैनिकांची ही सशस्त्र बंडखोरी मोडून काढण्याची शपथ पुतिन यांनी घेतली आहे. रशियाच्या दक्षिणेकडील रोस्तोव्ह शहराचा ताबा घेतल्याचा दावा वॅग्नेर गटाने केल्यानंतर पुतिन यांनी वॅग्नर ग्रुपची बंडखोरी मोडून काढू असा निश्चय जाहीर केला. यावेळी युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पुतिन हे पहिल्यांदाच एका मोठ्या अडचणीत सापडले असल्याचे बोलले जात आहे. बंडखोर मास्कोच्या पुढे का सरकले नाहीत, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता सर्व निवळले आहे, अशाही वार्ता येत आहेत. हे असेच, चालायचे. संपूर्ण सत्याची वाट पाहण्यातच शहाणपण आहे. कदाचित वाट पाहणे चालूच ठेवावे लागणार आहे.
भाडोत्री लष्कर
‘पीएमसी वॅग्नेर’ असे अधिकृत नाव असलेला हा वॅग्नेर गट आपण स्वत: एक खासगी कंपनी असल्याचे सांगतो. या कथित कंपनीकडे काही हजार पगारी सैनिक आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे तर हे एक ‘भाडोत्री लष्कर’ असून ‘सुपारी’ देणाऱ्या कुणालाही ते सेवा देते. चेचन्यांबरोबरच्या युद्धात यांनी मोठीच कामगिरी स्वीकारली होती. म्हणजे संघर्ष करणाऱ्या लष्करी तुकडीचे नेतृत्व केले होते, असे म्हणतात. वॅग्नेर ग्रुप हा नाझीवादी, श्वेतवर्णवादी आणि अतिउजव्या अतिरेकी विचारसरणीचा आहे. वॅग्नेर या नावाचे मूळ काय हे कुणालाच माहीत नसले तरी एका गृहीतकानुसार, हिटलरचा आवडता संगीतकार रिचर्ड वॅग्नेर याच्यावरून या तुकडीला हे नाव पडले असावे, असे म्हणतात. रशियातील अब्जाधीश येवगेनी प्रिगोझिन यांचे मोठे आर्थिक पाठबळ या कंपनीला मिळाले असून सद्ध्या तेच वॅग्नेरचे प्रमुख आहेत. युक्रेन युद्धात रशियन लष्कर आणि वॅग्नेर यांना प्रत्येकाला स्वतंत्र कार्यक्षेत्र नेमून दिले असते तर एकमेकांवरच मात करण्याचे निदान असे मुलखावेगळे प्रसंग तरी घडले नसते!
No comments:
Post a Comment