राज्यक्रांती दिनी मोदींचा खास सन्मान!
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक:२५/०७/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
राज्यक्रांती दिनी मोदींचा खास सन्मान!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
Email - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
राज्यक्रांती दिनी मोदींचा सन्मान करणारा फ्रान्स!
फ्रान्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ‘ले इको’ या प्रमुख फ्रेंच दैनिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीत मोदी म्हणाले आहेत की, विकसनशील देशांचा नेता म्हणवून घेण्याऐवजी या देशांचे सामूहिक नेतृत्व उदयाला यावे ही भारताची भूमिका आहे. बहुविविधतेमध्येही सौहार्दाने राहता येते हे भारतासारख्या जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीने जगाला दाखवून दिले आहे. भारताची युवाशक्ती हे देशाचे बलस्थान असल्याचेही मोदी यांनी सांगितले. भारताने नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून आणि अन्य देशांच्या स्वायत्ततेचा आदर ठेवून शांततापूर्ण पद्धतीने प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. चीनच्या संरक्षण क्षेत्रातील आक्रमक गुंतवणूक धोरणाविषयी मोदी म्हणाले, की भारताला जे भविष्य घडवायचे आहे त्यासाठी शांतता महत्त्वाची आहे. मात्र अद्याप अशा शांततेती हमी आम्हाला मिळालेली नाही.
दरवर्षी 14 जुलै 2023 ला फ्रान्समध्ये साजऱ्या होणाऱ्या बॅस्टिल डे परेडला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने दरवर्षी या कार्यक्रमाला कोणाला ना कोणाला बोलवण्याची प्रथा फ्रान्समध्ये नाही. म्हणजे खास पाहुणे म्हणून निमंत्रित करून हा मान खास नरेंद्र मोदी यांना फ्रान्सने दिला आहे तर! फ्रान्ससाठी 14 जुलै म्हणजेच ‘बॅस्टिल डे’ हा दिवस, फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रमुख घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जात असतो. हा फ्रेंच राज्यक्रांतीचा आरंभ दिन मानला जातो. दरवर्षी साजरा होणारा 14 जुलै हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी फ्रान्समध्ये सामूहिक सुट्टी असते आणि संपूर्ण देश उत्सवी वातावरणात मग्न असतो. या दिवशी, सरकारकडून एक भव्य लष्करी परेड आयोजित केली जाते. दरवर्षी परेड पाहण्यासाठी भारतासह अन्य देशातून मोठ्या संख्येने लोक ‘बॅस्टिल डे’ सेलिब्रेशनला उपस्थित राहतात. यावेळी या सोहळय़ामध्ये भारताचे तिन्ही दलांचे 269 सदस्यांचे पथक आणि 3 राफेल विमाने सहभागी झाली आहेत.
14 जुलैचे महत्त्व
14 जुलै 1789 या दिवशी बॅस्टिल तुरुंगावर क्रांतिकारकांनी हल्ला करून आपल्या 7 सहकाऱ्यांची सुटका केली होती. ‘बॅस्टिल’ किंवा ‘बॅस्टिल सेंट- अॅंटोनी’, हा फ्रान्समधला अत्यंत कुप्रसिद्ध असा तुरुंग तर होताच. तसेच ते 16 व्या लुईच्या अडदांड, अरेराव, लहरी आणि एकमेव सत्ताकेंद्राचे ते एक हिडिस प्रतीकही होते. 14 जुलै 1789 ला कोपलेल्या जनता जनार्दनाने या सत्ताकेंद्राच्या मर्मावरच पहिला आणि अंतिम घाव घातला. यानंतर फ्रान्समधील या जुलमी सत्ताकेंद्रांचे कंबरडेच मोडले. जुलमी सत्ताकेंद्र पार कोलमडले आणि स्वातंत्र्याची नवीन पहाट अंधार चिरून प्रगट झाली आणि पुढे फ्रान्सने स्वत:सोबत संपूर्ण जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तत्त्वत्रयीचे उदक अर्पण केले.
14 जुलै 1880 ला पॅरिसमध्ये प्रथमच बॅस्टिल मिलिटरी परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर फ्रान्समध्ये दरवर्षी बॅस्टिल मिलिटरी परेड आयोजित केली जाते. ही परेड जगातील सर्वात जुनी आणि आजही बहुदा सर्वात मोठ्या परेडपैकी एक मानली जाते.हिचे आयोजन दरवर्षी पॅरिसमधील चॅम्प्स - ऐलिलिसिस या मैदानावर केले जात असते. ज्यामध्ये फ्रान्सच्या राष्ट्रपतींसह सर्व मान्यवर उपस्थित असतात. सुमारे साडेनऊ हजार सैनिक परेडमध्ये सहभागी होतात. ज्यामध्ये 7800 सैनिक पायी चालत परेडमध्ये सहभागी होतात आणि उर्वरित सैनिक वाहने, घोडे किंवा लष्करी विमानात स्वार होतात. 1880 पासून, चालू असलेली बॅस्टिल डे लष्करी परेड आजपर्यंत केवळ दोनदा (दुसरे महायुद्ध व कोरोनाच्या काळात) आयोजित केलेली नव्हती.
प्रथा अशा सुरू होतात!
1937 पासून संध्याकाळी एका नवीन कार्यक्रमाची जोड या कार्यक्रमाला मिळाली आहे. ही प्रथा कशी सुरू झाली तिची कथा तशी मनोरंजकच म्हणावी लागेल. हा कार्यक्रम ‘फायरमन्स बॅाल्स’ या नावाने ओळखला जातो. त्याचे असे झाले की, अग्निशामक दलाच्या एका केंद्रप्रमुखाने 14 जुलैला आपल्या केंद्राच्या आवाराची द्वारे संध्याकाळी उघडली आणि कुतुहलापोटी तिथे गोळा झालेल्यांसमोर सहज म्हणून विविध व्यायामप्रकार, कसरती, शरीरचापल्ययुक्त व्यायाम व क्रीडा अशा शारीरिक कसरती आणि आतषबाजीचे निरनिराळे प्रकार दाखवले. हा प्रकार गोळा झालेल्या नागरिकांना इतका आवडला की तेव्हापासून इतर अग्निशमनदलकेंद्रांनीही त्याचे अनुकरण करणे सुरू केले. तेव्हापासून सकाळी पॅरिसला परेड आणि संध्याकाळी अग्निशमनदलांच्या केंद्राचे हे असे कार्यक्रम सर्वत्र सुरू झाले. मूळ कार्यक्रमाला जोडून एखादी प्रथा कशी अचानक सुरू होते, याचे हे नमुनेदार उदाहरण ठरावे.
मोदींच्या स्वागताला उपस्थित कोण, कोण?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या कार्यकाळातील हा सहावा फ्रान्स दौरा आहे. पण या भेटीदरम्यान फ्रान्सचे सन्माननीय पाहुणे या नात्याने पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न, सिनेट (वरिष्ठ सभागृह) आणि नॅशनल असेंब्ली (कनिष्ठ सभागृह) यांच्या अध्यक्षांसह फ्रान्सच्या संपूर्ण राजकीय नेतृत्वाशी एक विशेष निमित्त साधून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी या भेटीदरम्यान, 26 ‘राफेल-एम’ म्हणजेच ‘राफेल सागरी लढाऊ विमाने’ आणि तीन स्कॉर्पीन पाणबुड्यां खरेदीसाठी करार करण्याबाबत सहमती मिळविली. हा करार संरक्षण क्षेत्रातील बलाढ्य कंपनी सॅफ्रॅान सोबत सुमारे 96 हजार कोटी रुपयांचा असणार आहे. 14 जुलैलाच संध्याकाळी निरोपादाखल लॉवर संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ खास जंगी आणि शाकाहारी मेजवानी आयोजित करण्यात आली.
पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यादरम्यान सुरक्षा समितीत भारताला स्थायी सदस्यता, सुरक्षा, अंतराळ, नागरी आणि आण्विक सहभाग, सायबर तंत्रज्ञान, हवामान बदल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवाद या आणि अशा अनेक मुद्द्यांवर उभयपक्षी समाधानकारक अशी चर्चा केली.
द्विपक्षीय संबंधाचे महत्त्व!
फ्रान्स हा भारताचा जुना आणि अत्यंत विश्वसनीय सहकारी आहे. गेल्या 25 वर्षांच्या या मैत्रीत कधीही अंतर पडलेले नाही. विशेष असे की, फ्रान्स आणि भारत ह्यांचे स्वत:चे असे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे. भारताने 1998 मध्ये न्युक्लिअर चाचणी केली तेव्हा फ्रान्सने भारतावर बंधने घालण्याच्या प्रस्तावाचा विरोध केला होता. फ्रान्सने भारताला आधुनिक जेट फायटर विमाने आणि पाणबुड्या पुरवल्या होत्या. त्यात आता नौदलासाठीच्या 26 राफेल जेट विमाने आणि पाणबुड्या यांची लवकरच भर पडणार आहे. युक्रेन युद्धामुळे रशियाकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र पुरवठ्याबाबत पूर्वीइतकी खात्री आता राहिलेली नाही. त्यामुळेही या व्यवहाराचे विशेष महत्त्व आहे. भारत आणि अमेरिकेनंतर, भारत आणि फ्रान्स यातील द्विपक्षीय संबंधाला विशेष महत्त्व आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनची सध्या जी मुलखावेगळी आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांना आणि नियमांना गुंडाळून ठेवून मनमानी सुरू आहे, तिला भारत आणि फ्रान्स यांचा कडक विरोध आहे, ही बाब उभयपक्षीच नव्हे तर अन्य देशांनाही दिलासा देणारी सिद्ध झाली आहे.
No comments:
Post a Comment