Monday, July 31, 2023

      फ्रान्ससमधील उद्रेक

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०१/०८/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.      

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?  

      

फ्रान्समधील उद्रेक

 

परवाना नसताना वाहन चालविणाऱ्या नाहेल मर्झाक या सतरा वर्षांच्या अल्जेरियन वंशाच्या मुस्लीम मुलाला एका फ्रेंच पोलिस अधिकाऱ्याने 27 जून 2023 ला गोळी घालून ठार मारले. म्हणजे आता महिना उलटून गेला आहे. यानंतर  फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू झालेल्या दंगलींचे लोण फ्रान्सच्या इतर शहरांमध्येच नाही तर युरोपातील अन्य देशांमध्येही पसरले. पोलिसांनी ज्या दंगलखोरांना अटक केली त्यातील बहुतेक किशोरवयीन, फ्रेंच बोलणारे आणि मध्यपूर्व आणि आफ्रिका यातील स्थलांतरितांपैकी आहेत. अशाच जमावाने पॅरिसच नव्हे, तर फ्रान्सच्या बहुतेक शहरांमध्ये जाळपोळीचे आणि तोडफोडीचे लोण पोहोचले होते, पॅरिसचे महापौर यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यात त्यांचे कुटुंबीय जखमीही झाले होते. यावरून लोकक्षोभाची तीव्रता जाणवावी. शेवटी फ्रान्सच्या अध्यक्षांना आपला जर्मनीचा याचवेळी नियोजित असलेला दौरा रद्द करावा लागला. गेल्या २७ वर्षांत प्रथमच फ्रान्सचे अध्यक्ष जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार होते!

    या दंगलींमागे एका 17 वर्षांच्या मुलाची पोलिसांनी केलेली ‘हत्या’ ही एक प्रासंगिक घटना आहे. तसे पाहिले तर फ्रान्स हा युरोपातील सर्वाधिक वांशिक विविधता असलेला देश आहे. वंश आणि वर्ण  याबाबतीत फ्रान्समध्ये सहसा भेदभाव केला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही देशातील आज जुना झालेला वांशिक  व धार्मिक भेदभाव अशावेळी पुन्हा डोके वर काढतोच. स्थलांतरितांच्या आगमनानंतर तर हा प्रकार वाढतो आहे. या स्थलांतरितांमधील निदान काहींच्या मानसिकतेच्या प्रश्नाबाबत फ्रान्सला कायमस्वरूपी उत्तर शोधावेच लागेल. 

   नक्की काय घडले?

   पॅरिसच्या नानटेरी या उपनगरात ही घटना घडली. नाहेल आपली मर्सिडीज गाडी बसच्या मार्गावरून नेत होता. हे नियमांच्या विरुद्ध असल्यामुळे वाहतुक पोलिसाने त्याला थांबण्यास सांगितले. पण तो  गाडी वेगाने पुढे नेतच राहिला. वाहतुक पोलिसांना अनेक पादचारी आणि सायकलस्वार यांच्या जीवाला ही बाब धोका निर्माण करते आहे, हे दिसत होते. पुढे वाहतूक कोंडीमुळे नाहेलला थांबावेच  लागले. पोलिसांनी त्याला इंजिन ताबडतोब बंद करण्यास सांगितले. त्यानंतरही त्याने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसाने त्याच्यावर गोळी चालविली. छातीमध्येच घुसलेल्या गोळीमुळे नाहेलचा जागीच मृत्यू झाला, असे या घटनेचे पोलिसांनी केलेले वर्णन आहे. पण हे वर्णन व्हिडिओतील दृश्यांशी जुळत नाही, असे म्हणतात,  म्हणून हा आगडोंब उसळला, असा त्यांचा निष्कर्ष आहे. 

   नाहेलच्या हत्येनंतर  हे दंगे उसळले असले तरी या निमित्ताने जनतेतील अन्य काही घटकांच्या मनात साठलेला असंतोष सुद्धा बाहेर पडतो आहे. आजच्या फ्रान्समध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढली आहे. सामाजिक भेदभाव आणि आर्थिक विकासाच्या संधींच्या अभावामुळे कमी उत्पन्न असलेल्या वर्गांत प्रचंड राग खदखदत आहे. या दंग्यांच्या निमित्ताने तो संयमाचे बांध फोडून बाहेर पडतो आहे, असे काही समाजशास्त्रज्ञांना  वाटते आहे. तर नुकत्याच आलेल्या निर्वासितांमध्ये घुसखोरी करून फ्रान्समध्ये आलेल्या इस्लामी कट्टरवाद्यांकडे काहींनी बोट दाखविले आहे. कारण या ‘सामान्य लोकांच्या’ हाती आधुनिक शस्त्रे कशी काय असतात? हा प्रश्न अनेक शक्यतांकडे अंगुलीनिर्देश करीत आहे.’ त्यामुळे फ्रान्समध्ये आश्रयासाठी आलेल्यात विस्थापित किती आणि घुसखोर किती, हा प्रश्न समोर आला आहे.

   45 हजारांहून अधिक पोलिस रस्त्यावर वर उतरवूनही परिस्थिती नियंत्रणाखाली येत नव्हती, ही सामान्य घटना नाही. पुरेसे सबळ कारण नसतांना एका बेजबाबदार पोलिसाने केलेली हत्या आणि त्यानंतरची प्रमाणाबाहेरची युरोपभर पसरलेली जाळपोळ, मोडतोड या दोन्ही घटना कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तर महत्त्वाच्या आहेतच पण त्या वंशभेद आणि वर्णभेद यावरही लक्ष केंद्रित करीत आहेत. ‘नाहेल हा ‘अरब’ असल्याने त्याला मारले गेले, त्याऐवजी एखादा गौरवर्णीय मुलगा असता, तर पोलिसांनी त्याला मारला नसता,’ अशी संतप्त प्रतिक्रिया लगेचच उमटली आणि उद्रेक युरोपभर पसरला, यामुळे या आंदोलनाची जातकुळी वेगळीच असल्याचे जाणवते. नेहलने गाडी थांबविली नाही म्हणून गोळीवार केल्याचा पोलिसांचा दावा असला, तरी व्हिडिओ या घटनेची पुष्टी करीत नाही अशा अफवांमुळे परिस्थिती प्रमाणाबाहेर चिघळत गेली. 

   अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या आवाहनालाही प्रतिसाद नाही!

    नाहेलच्या हल्लेखोराला माफी नसल्याचे सांगून फ्रान्सचे अध्यक्ष सॅम्युअल मॅक्रॉन यांनी शांततेचे आवाहन केले असले, तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दोन हजारांहून अधिक वाहने आणि सातशेहून अधिक इमारती संतप्त जमावाने जाळल्या आहेत. सुमारे तीन हजार लोकांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून, त्यामध्ये किशोरवयीन स्थलांतरितांच्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पॅरिससकट अनेक शहरांमध्ये ही हिंसक आणि प्रखर आंदोलने पसरली. दंगेखोरांसाठी आणि असामाजिक तत्त्वांसाठी ही अपूर्व संधी असते. संपूर्ण देशात तब्बल 45 हजार पोलिसांना कामावर लावले. त्यांनी  तीन हजारांवर कथित दंगेखोरांना अटकही केली आहे. पण व्यर्थ! हिंसाचार काही थांबण्याचे नाव घेत नाही. अपप्रचार करणाऱ्या समाज माध्यमांपासून मुलांना दूर ठेवा, असे आवाहन अध्यक्ष मॅक्रॅान यांनी पालकांना केले आहे, तरी सुद्धा!

    गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे संशयास्पद वर्तन असलेल्यांवर थेट गोळीबार करण्याचा अधिकार तेथील पोलिसांना आहे. पण नाहेलचे कृत्य या प्रकारात बसत नाही, हे खरे आहे. नाहेलचे वडिल मोरोक्कोमधील (आफ्रिका) आहेत.  आई अल्जेरियन आहे. म्हणजे नाहेल आफ्रिकन-अरब वंशाचा होता. तो श्वेतवर्णीय नव्हता. त्यामुळे  पोलिसांनी त्याला बेधडक गोळी घालून ठार केले. हा मुद्दा  फ्रान्सच्या अनेक नागरिकांना पटलेला दिसतो आहे. याचे महत्त्वाचे एक कारण असे आहे की, फ्रेंच समाज तसा एकजिनसी नाही. म्हणजे असे की, फ्रान्समध्ये 60 वर्षाच्या आतल्या किमान 32% नागरिकांचा एक पूर्वज (आई किंवा बापाकडून) विस्थापित होऊन आलेला आहे. तर 18 वर्षाखालील 83% मुलांचा एक पूर्वज मुळात विस्थापित होता. त्यामुळे नाहेलसारख्यांची पुरेशा कारणाअभावी हत्या होते, तेव्हा फ्रेंच समाजातील एक मोठा गट चवताळून उठतो.

दंगल न शमण्याचे आणखी एक कारण 

       ज्या पोलिस अधिकाऱ्यामुळे एकुलत्या एका नाहेलचा जीव गेला त्या पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा खूप उशिराने दाखल करण्यात आला आहे. म्हणून या कारवाईचा व्हावा तेवढा परिणाम होताना दिसत नाही. 

   आता फ्रान्समधील सत्तारूढ पक्षाने पोलिसांना नागरिकांवर पाळत ठेवण्याचे म्हणजेच हेरगिरी करण्याचे अधिकार देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या पोलिसांना संशयित व्यक्तींवर दुरून नजर ठेवता येणार आहे.

खरा फ्रान्स कोणता?

 फ्रान्सच्या 7 कोटी लोकसंख्येत 50% ख्रिश्चन, 33 % धर्म न मानणारे, तर मुस्लिम 4% चार टक्केच आहेत. पण आता मध्यपूर्वेतून व आफ्रिकेतून विस्थापित होऊन आलेल्यांमध्ये काही दहशतवाद्यांचे छुपे हस्तकही असतात. हे हस्तक स्थलांतरितांच्या मुलांची माथी भडकवीत असतात.  हा केवळ एकट्या फ्रान्सचा अनुभव नाही. त्यांच्यामुळेही जुने प्रश्न नव्याने आणि नवीन प्रश्न तीव्र स्वरुपात युरोपात पुढे येत असतात.

    23 जूनला ज्या फ्रान्समध्ये हे कांड घडले पण त्याच फ्रान्समध्ये पुढे 14 जुलै हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस मोठ्या दिमाखात  सर्वत्र संपन्न झाला. आणि खात्री पटली की, खरा आणि मूळ फ्रान्स 14 जुलैचा,  23 जूनचा नव्हे!


No comments:

Post a Comment