Monday, July 17, 2023

 खाजगी सैन्ये - काल, आज आणि उद्या 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १८/०७/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.  


खाजगी सैन्ये - काल, आज आणि उद्या 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

Email - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

खाजगी सैन्ये - काल, आज आणि उद्या 

   23 जून 2023 च्या अयशस्वी बंडानंतर वॅग्नेर आर्मीचे प्रमुख प्रमुख येवगेनी प्रिगोझिन बेलारूसमध्ये आले आहेत का किंवा त्यांना आणण्यात आले आहे का? किंवा ते रशियातच आहेत का? किंवा  ते आहेत तरी का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातले काहीच नक्की सांगता येत नाही. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी याच सुमारास लष्कराला संबोधन करतांना म्हटले आहे की, वॅग्नेर आर्मीचं बंड आम्ही शमवले असून त्यामुळे आता रशियाला  निर्माण झालेला गृहयुद्धाचा धोका टळला आहे. व्यक्तिश: वॅग्नेर आर्मीचे प्रमुख प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचे काय झाले, ते यथावकाश कळेल किंवा कदाचित कधीच कळणार नाही.

   युक्रेनसोबत युद्धात गुंतलेल्या पुतिन यांना वॅग्नेर ग्रुपच्या बंडाने ज्याप्रकारे अडचणीत आणले, त्यामुळे आता अशाप्रकारच्या खाजगी लष्कराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. युक्रेन युद्धापेक्षा अशा भाडोत्री सैनिकांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेबाबतच सद्ध्या जगभर  जोरात चर्चा सुरू आहे. 

  कोणतेही खाजगी/भाडोत्री सैन्य हे जिथे युद्ध सुरू असते तिथे, याच्या नाहीतर त्याच्या बाजूने लढत असते. या सैन्याने आजवर जगातील बहुतेक सर्व प्रमुख देशांना सशुल्क सेवा पुरविली आहे.  केवळ देशच नव्हे तर काही गैर-सरकारी संस्थाही त्यांच्या सशुल्क सेवांचा लाभ घेत असत, आजही घेतात, बहुदा उद्याही घेतील. जर  एका देशात अनेक खाजगी सैन्ये असतील, तर त्यांचेही आपापसात संघर्ष घडत असतात. अशा परिस्थितीत यजमान देशाला त्यांची भांडणे सक्तीचा वापर करून थांबवावी लागतात. रशियात तर  यावेळी प्रस्थापित सरकारचे संरक्षण मंत्रालय आणि वॅग्नर ग्रुप यांच्यातच टोकाचा संघर्ष उडालेला पहायला मिळाला आणि खरेतर त्यामुळेच खूप मोठा बोभाटा झाला आणि ‘खाजगी सैन्य’ पुन्हा एकदा जगाच्या स्मृतिपटलावर आले.

   अनेक देशांमध्ये खाजगी लष्करे सक्रिय असतात. सद्ध्या मात्र प्रकाशात आला आहे, रशियातला वॅग्नेर ग्रुप. असाच ग्रुप अमेरिकेही आहे. त्याचे नाव आहे, ‘अमेरिकन अॅकेडमी’. हा गट पूर्वी ‘ब्लॅक वॅाटर’ या नावाने ओळखला जायचा. अशीच आहे ब्रिटनची 'रुबीकॉन सर्व्हिस'! चीनच्या तर देशागणिक अशा खाजगी कंपन्याच आहेत, असे म्हणतात! आता बोला!! 

  शॉन मॅकफेट हे वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचे वैशिष्ट्य असे आहे की, त्यांनी अशाच खाजगी लष्करात काही वर्षं सेवाही केली होती. त्यांनी अशा लष्कराच्या कार्यपद्धतीवर लेखनही केले आहे. त्यांच्या मते, खाजगी लष्कर किंवा भाडोत्री सैन्य हा एक उद्योगच आहे. हा उद्योग आज कोणत्याही धरबंधाशिवाय वाढतो आहे आणि मोठे देश त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत.

खाजगी सेनेचा प्रारंभ 

   खाजगी सेनेची रीतसर (?) सुरुवात 1990 च्या दशकातच झाली. परंतु त्यावर निर्बंध आणण्यात अनेक देशांनी तत्परता दाखवली नाही. हा उद्योग असाच फोफावत राहिला, तर त्याचा परिणाम शेवटी आंतरराष्ट्रीय संबंधांवर होईल. लोक स्वतःचं खाजगी लष्कर बाळगायला लागतील. खाजगी उद्योगपती स्वतःचं खाजगी लष्कर बाळगतील. हीच प्रवृत्ती राहिली तर जगात अराजकता माजेल, असा इशारा या विषयीच्या तज्ञांनी दिला आहे.

  वॅग्नेर गट हे रशियाचं खाजगी लष्कर आहे, ज्याचा वापर रशियाने जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी केला आहे. 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर कब्जा केला तेव्हाही या गटाची भूमिका महत्त्वाची होती.

प्रोफेसर शॉन मॅकफेट हे आफ्रिकेमधल्या अनेक देशांत खाजगी लष्कराचा भाग बनून कार्यरत होते. ते सांगतात की, हे  सैनिक कोणालाही  उत्तरदायी नसल्यामुळे सरकारे त्यांचा वापर करून घेतात. भाडोत्री सैनिक बाळगण्याचा विशेष फायदा हा आहे की,  यांनी विनाकारण हत्या केली तरी त्याची जबाबदारी कोणावरही नसते. 

भाडोत्री सैनिकांचा इतिहास

  भाडोत्री सैनिकांची भूमिका आपल्या इतिहासाइतकीच जुनी आहे. वैयक्तिक फायदे, राजकीय हितसंबंध अशा कोणत्याही कारणास्तव लढल्या गेलेल्या युद्धांमध्ये शतकानुशतकांपासून त्यांचा वापर होत आला आहे.

   राज्याच्या नियमित सैन्याला मदत करणे, व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करणे, अशा विविध कारणांसाठी पूर्वी भाडोत्री सैनिक असत. रोमन साम्राज्यात अशा सैनिकंना 'सोलिडस' नावाचे सोन्याचे नाणे देण्यात येत असे. त्यावरूनच 'सोल्जर' हा शब्द आला आहे, असे मानतात.  इजिप्तमध्ये फारोने तर भाडोत्री सैनिकांची एक सेनाच पदरी बाळगली होती.

साम्राज्यवादाचा काळ

   युरोपियन देशांनी तर त्यांच्या वसाहतींचा विस्तार करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण राखण्यासाठी त्याच देशातील लोकांचे खाजगी लष्कर आणि भाडोत्री सैनिक यांची नियुक्ती केली होती. अमेरिकन क्रांतीच्या काळात अमेरिकन स्वातंत्र्य युद्धादरम्यान अमेरिकन वसाहती आणि ब्रिटिश साम्राज्य या दोघांनीही भाडोत्री सैनिकांचा वापर केला होता.

आधुनिक युगात भाडोत्री सैन्याचा वापर

    इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धांदरम्यान, अमेरिका आणि त्याची मित्रराष्ट्रे ब्लॅकवॉटरसारख्या खाजगी सैन्यावर अवलंबून होते. या खाजगी लष्कराने सुरक्षा, लॉजिस्टिक सपोर्ट आणि इतर सेवाही पुरवल्या आहेत.

भारतातील खाजगी सैन्याचा इतिहास

   विजयनगर साम्राज्यात सैन्याचा एक तुकडी अशी होती की, ज्या तुकडीत उझबेकिस्तान, कझाकस्तान, मध्य आशिया किंवा अफगाणिस्तान- इराणसारख्या देशांतून आलेले सैनिक होते. त्यांना योग्य वेतन दिले जात असे. त्यांनी करारावर काम केले आणि विजयनगर साम्राज्याने त्यांचा अहमदनगरच्या सुलतानाविरुद्ध तसंच गोवळकोंडा आणि हैदराबादच्या निजामाविरूद्ध वापर केला होता.

  मध्य आशियातील लोकांचा समावेश असलेल्या या खाजगी सैन्याने चोल साम्राज्याच्या विस्तारातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्याच्या काळातही खाजगी सैनिकांचा वापर सर्रास होत होता. आजच्या भारतात मात्र अशा सैन्याला कायदेशीर मान्यता नाही. खाजगी सेनेवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच  कायदा करावा लागेल.

 21 व्या शतकात अमेरिका, युरोप आणि रशियाने खाजगी सैन्याचा वापर करून इतर देशांवर ताबा मिळवला आहे, त्या देशांची सरकारे अस्थिर केली आहेत आणि स्वतःची धोरणं अंमलात आणली आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे, व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले होते. पण लक्षात कोण घेणार?

  खाजगी लष्कर आणि भाडोत्री सैनिकांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा त्यांचे नियमन करण्यासाठी कायदे करण्यात दोन अडथळे आहेत. एक म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्यच असे देश आहेत. यांच्याकडे खाजगी सैनिकांची संख्या सर्वाधिक आहे. यात  अमेरिकेचा नंबर पहिला आहे.

  दुसरा अडथळा असा आहे की, एक चांगला आंतरराष्ट्रीय कायदा तयार केला तरी आज बेलारूसमध्ये आलेल्या भाडोत्री सैनिकांना कोण अटक करेल? लिबिया, येमेन, इराकमध्ये जाऊन त्यांना कोण अटक करेल? संयुक्त राष्ट्र ते करू शकत नाही. काही लोक आंतरराष्ट्रीय कायद्यांची मागणी करत आहेत, हे खरे,  पण आजतरी हा हवेतला विचार आहे. ही फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे.

  खाजगी सैनिक हा उद्योग वाढणार आहे आणि वाढतच जाणार आहे. आजतरी त्याला कोणीही रोखू शकत नाही. मुख्य म्हणजे मोठी राष्ट्रेच त्याचा वापर करत आहेत मग त्यांना थांबवणार कोण? छोटी राष्ट्रे?  



No comments:

Post a Comment