Thursday, March 23, 2017

असा निवडला जातो भारताचा राष्ट्रपती
वसंत गणेश काणे
    राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्षपणे( इनडायरेक्ट) होते. या साठी एक इलेक्टोरल काॅलेज तयार केले आहे. या काॅलेजमध्ये सर्व खासदार व सर्व आमदार सदस्य (दिल्ली व पांडेचरीच्या विधानसभांचे सदस्य सुद्धा) या नात्याने मतदार असतात. म्हणून राष्ट्रपतीपदासाठी लोकसभा व राज्यसभेचे सदस्य, राज्यांच्या विधानसभांचे (विधान परिषद मात्र नाही) सदस्य मतदान करीत असतात. ही निवडणूक प्रत्यक्षपणे घ्यायचे ठरले असते तर १२५ कोटी जनतेतील जवळजवळ ८० कोटी मतदारांचे मतदान घ्यावे लागले असते. हे काम बरेच अवघड झाले असते म्हणूनच बहुदा घटनाकारांनी ही अप्रत्यक्ष निवडणूक घेण्याचे ठरविले असावे.
इलेक्टोरल काॅलेज - लोकसभेचे सदस्य - ५४३+ राज्यसभेचे सदस्य - २३३= ७७६ अशी सर्व खासदारांची एकूण संख्या आहे.  भारतातल्या सर्व राज्यातील आमदारांची एकूण  संख्या ४,१२० आहे. यात खासदारांची संख्या ७७६ मिळविली की एकूण मतदार = ४८९६ इतके होतील. इतक्या सदस्यांचे हे इलेक्टोरल काॅलेज असते. या सदस्यांच्या मतांचे मूल्य (व्हॅल्यू आॅफ व्होट) वेगवेगळे असते. ते कसे ठरवावे ते राज्य घटनेच्या ५५(२) कलमानुसार ठरले आहे.
आमदाराच्या मताचे मूल्य कसे ठरते? - प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य राज्यनिहाय वेगवेगळे असते. एक आमदार म्हणून एक मत असले तरी त्याचे मतमूल्य वेगळे असते. ते नेहमीच एकापेक्षा जास्त असते. मात्र प्रत्येक राज्यापुते प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य सारखेच असते. जसे महाराष्ट् राज्याच्या लोकसंख्येला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या (विधान परिषद नाही) सदस्यांच्या संख्येने भागले असता जी संख्या येईल, तेवढे त्या   विधानसभेच्या प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य असते. हिशोबासाठी राज्यांची १९७१ ची लोकसंख्या (सध्याची नव्हे) विचारात घेतली जाते. ४२ व्या व ८४ व्या घटना दुरुस्तीला अनुसरून हा निर्णय आहे. ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणला आहे व लोकसंख्या नियंत्रित केली आहे, त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, ही भूमिका या निर्णयामागे घेतलेली आहे. महाराष्ट्राची १९७१ ची लोकसंख्या ५०४१२२३५ (५ कोटी ४१ लाख २ हजार २ शे ३५) इतकी होती. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ सदस्य आहेत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येला २८८००० (२८८ गुणिले १ हजार) ने भागल्यास पूर्णांकातील  भागाकार १७५ येतो. दशांश चिन्हापुढचे अंक विचारात घेतले जात नाहीत. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा सदस्याच्या मताचे मूल्य १७५ इतके येते व महाराष्ट्र राज्याच्या मतांचे एकूण मूल्य ५०४०० (१७५ गुणले २८८) इतके होते. असाच हिशोब केल्यास सिक्कीमच्या प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य  ७ तर उत्तर प्रदेशाच्या प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य सर्वात जास्त म्हणजे २०८ इतके येते आहे. अशाप्रकारे सिक्कीमच्या एका सदस्याचे मत मिळाले म्हणजे जणू ७ मतमूल्य मिळाले, महाराष्ट्राच्या एका सदस्याचे मत मिळाले म्हणजे जणू १७५ मतमूल्य मिळाले व उत्तर प्रदेशाच्या एका सदस्याचे मत मिळाले म्हणजे जणू २०८ मतमूल्य मिळाले, असा हिशोब करून मतमूल्याची गणना होत असते. उत्तर प्रदेश विधान सभेच्या सर्व सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य ठरविण्यासाठी ४०३ ला (विधान सभा सदस्य संख्या) २०८ ने  ( प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य) गुणिले असता ८३,८२४ ही संख्या येते. हे उत्तर प्रदेश राज्याचे एकूण मतमूल्य ठरले. काही राज्यांचे राज्य निहाय मतमूल्य पुढीलप्रमाणे येईल. महाराष्ट्र ५०,४०० (२८८ गुणिले १७५), पश्चिम बंगाल ४४, ३९४ (२९४ गुणिले १५१) तर सिक्कीम २२४ (३२ गुणिले ७) असा हिशोब होतो. जे राज्य मोठे म्हणजेच ज्या राज्यातील मतदार संख्या जास्त, त्या राज्याच्या विधानसभेतील सदस्याच्या मताचे मूल्य त्या प्रमाणात जास्त असते. अशाप्रकारे सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य = ५,४९,४७४ (पाच लक्ष एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याहत्तर) आहे.
संसद सदस्यांच्या मताचे मूल्य कसे ठरते? - संसद सदस्याच्या एका मताचे मूल्य ठरविण्यासाठी सर्व विधानसभा सदस्यांच्या एकूण मूल्याला खासदारांच्या एकूण संख्येने भागतात. सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य = ५,४९,४७४ (पाच लक्ष एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याहत्तर) आहे. या संख्येला सर्व खासदारांच्या संख्येने म्हणजे ७७६(५४३+२३३) ने भागतात. हा भागाकार ७०८ इतका येतो म्हणून प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ इतके ठरते. म्हणून एका खासदाराचे मत मिळाले म्हणजे जणू ७०८ मतमूल्य मिळाले असा हिशोब करतात.
लोकसभेचे सदस्य ५४३ म्हणून लोकसभेतील सदस्यांचे एकूण मतमूल्य ५४३ गुणिले ७७६ = ३८४४४४ व राज्यसभेच्या सर्व सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य (२३३ गुणिले ७७६) = १६४९६४ इतके म्हणजेच सर्व ७०८ सदस्यांचे   मतमूल्य ५,४९,४०८ (पाच लक्ष एकोणपन्नास हजार चारशे आठ) इतके असते. अशाप्रकारे सर्व खासदार व सर्व आमदारांच्या मतांचे मूल्य ५४९४०८ + ५४९४७४= १०९८८८२ इतके होते.
उमेदवार कसा निवडून येतो? - पन्नास टक्क्यापेक्षा एक जास्त मत ज्याला मिळेल तो उमेदवार राष्ट्रपतीपदी निवडून येतो. ५० टक्के मूल्य = ५,४९,४४१ इतके आहे. यात एक मिळवल्यास बेरीज ५,४९,४४२ इतकी होते.
राष्ट्रपतीची निवड कशी होते? -  शिक्षक व पदवीधर मतदार संघातील पसंतीक्रमानुसार उमेदवार निवडण्याची पद्धती या निवडणुकीत वापरतात. हिला एकल संक्रामक मत ( सिंगल ट्रान्सफरेबल व्होट) असे नाव आहे. जेवढे उमेदवार तेवढे पसंतीक्रम (प्रिफरन्स) मतदार मतपत्रिकेवर नोंदवतो. प्रथम पहिल्या पसंतीक्रमानुसार मते वेगळी केली जातात. ज्या उमेदवाराला पन्नास टक्यापेक्षा निदान एकतरी मत जास्त असेल तो निवडून आला असे ठरते. जर कोणत्याच उमेदवाराला अशी पन्नास टक्यापेक्षा जास्त मते नसतील, तर सर्वात कमी मते असणाऱ्या उमेदवाराला बाद करून त्याच्या प्रत्येक मतपत्रिकेवर दुसरा क्रमांक कुणाला दिलेला आहे, ते पाहून ती मते त्या उमेदवाराला संक्रमित करतात. तरीही पन्नास टक्यापेक्षा एकतरी मत मिळविण्याचा कोटा पूर्ण होत नसेल तर सर्वात कमी मते असणाऱ्या उमेदवारांना क्रमाक्रमाने बाद करतात व कोटा पूर्ण होताच तो उमेदवार निवडून आल्याचे जाहीर करतात.
राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराची पात्रता - राज्य घटनेच्या अठ्ठावनाव्या कलमात ही पात्रता दिली आहे. ३५ वर्षे पूर्ण वयाचा, भारताचा नागरिक असलेला, लोकसभेचा सदस्य होण्यास पात्र असलेला व केन्द्र शासन, राज्य शासन वा स्थानिक अधिकरणातील कोणतेही फायद्याचे पदाचा (आॅफिस आॅफ प्राॅफिट) लाभ मिळत नसलेला कोणताही मतदार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतो. मात्र उपराष्ट्रपती, राज्याचा राज्यपाल, केंद्राचा वा राज्याचा मंत्री राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतो. एक चहा विकणारा जसा भारताचा पंतप्रधान होऊ शकतो तसेच दुसरा चहा विकणारा भारताचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार असू शकेल. मात्र त्याच्या अर्जाचे सूचन व अनुमोदन निदान प्रत्येकी पन्नास मतदारांनी केलेले असले पाहिजे. याचा अर्थ सूचक व अनुमोदक हे विधानसभा व/वा संसदेचे सदस्य असले पाहिजेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक गंभीरतेने घेतली जावी या उद्देशाने ही अट बऱ्याच उशिराने घालण्यात आली आहे.
कोण होणार नवीन राष्ट्रपती? - भाजपच्या उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक विजयानंतर जुलै २०१७ मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रपती निवडणुकीची स्थिती एकदम बदलली आहे. या पाच राज्यांमध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या १ लाख ३ हजार ७५६ हजार मतांची वाटणी होणार होती. त्यातील, सुमारे ७४ हजार मते आता जणू  भाजपच्या खिशात आली असून, राष्ट्रपती निवडणुकीतील एकूण १० लाख ९८ हजार ८८२ मतांपैकी भाजप-रालोआपाशी आता सव्वापाच लाख मते आहेत. म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी २५ हजार मतांचीच आवश्यकता आहे. ही मते मिळविणे फारसे कठीण जाऊ नये, असे वाटते. त्यामुळे भाजपला आता आपल्या पसंतीच्या व्यक्तीला राष्ट्रपतीपदी बसविणे सहज शक्य आहे.
या पूर्वीचे राष्ट्रपती
१४ विद्यमान राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी ह १४ वे राष्ट्रपती असून  यांनी पी ए संगमा यांचा २५ जुलै २०१२ ला पराभव केला होता. श्री मुखर्जी यांना खासदारांची ३,७३,११६ व आमदारांची ३, ४०, ६४७ अशी एकूण ७,१३,७६३ मते मिळाली तर पीए संगमा यांना खासदारांची १, ४५,८४८ तर आमदारांची १७०,१३९ अशी एकूण ३१५,९८७ मते मिळाली होती. या निवडणुकीत खासदारांनी क्रॅास व्होटिंग केले होते. आंध्रातील तेलगू देसम व तेलंगणा राष्ट्र समिती हे पक्ष तटस्थ (ॲबस्टेन) राहिले होते. केरळ व पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्ष व रिव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पक्ष तटस्थ राहिले. या निवडणुकीत आसाम, बिहार, हरियाना,छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, मिझोराम, जम्मू काष्मीर, महाराष्ट्र, मेघालय, नागालॅंड, पंजाब, सिक्कीम, व पश्चिम बंगाल या राज्यात एकट दुकट मते अवैध ठरली  होती. यावर टिप्पणी न करणेच शहाणपणाचे ठरेल. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडिएचा) घटक असतांनाही त्या पक्षाने रालोआ समर्थित पी ए संगमा यांना मतदान न करता  युपीए समर्थित प्रणव मुखर्जी यांना मते दिली होती.
ही निवडणूक पक्षीय व राजकीय भूमिकेवर भर देऊन लढली गेली, अशी टीका झाली होती. युपीएने सहमतीचे राजकारण न करता आर्थिक व राजकीय बक्षिसी (पॅकेज) देऊन, लालूच, धमक्या व आश्वासने देऊन युपीला ५७ हजार कोटी व बिहारला २७ हजार कोटी देऊन अनुकूल करून घेतल्याचे आरोप खुद्द संगमा यांनी केले होते. वन्यजातीचा (ट्रायबल) राष्ट्पती निवडण्याची संधी देशाने गमावली , अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. काॅंग्रेसचे प्रवक्ते यांनी मनीष तिवारी यांनी निडणूक निकाल मोठ्या मनाने स्वीकावयास हवा, असे म्हणत आंबट द्राक्षांच्या कथेची आठवण संगमा यांना करून दिली होती.काॅंग्रेसचे जनरल सेक्रेटरी जनार्दन द्विवेदी यांनी संगमांवर संकुचित दृष्टी ( नॅरो व्हिजन) ठेवल्याचा ठपका ठेवला होता.
आमदारांमध्येही पक्षाची भूमिका  बाजूस सारून क्राॅस व्होटिंग झाले होते. असे नसते तर काॅंग्रेस व जेडीएस यांची ९८ मते मिळण्याची अपेक्षा असतांना प्रत्यक्षात श्री प्रणव मुखर्जींना १९ मते जास्त मिळाली नसती. कर्नाटकच्या ११९ भाजप आमदांची मते संगमा यांना मिळतील अशी अपेक्षा असतांना त्यांना प्रत्यक्षात १०३ च मते का मिळावीत? हा विषय भाजपने गांभीर्याने घेतला. परिणाम स्वरूप कर्नाटकात राजकीय उलथापालथ होऊन तिची परिणीती जगदीश शेट्टर यांची नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून नेमण्यात झाला असे म्हणतात.
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचे, राजकीय अभिनिवेशाचे, अट्टाहासाचे दर्शन व्हावे याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. सर्वोच्चपद अराजकीय असावे, त्याची प्रतिष्ठा व प्रतिबद्धता वादातीत असावी, याची आठवण करून देण्यात आली. महत्त्वाच्या मंत्रीपदांवर असलेली व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून राहण्यास पात्र समजावी का? (राज्यघटनेची अशा उमेदवारीस हरकत नाही.) अशामुळे या पदाची गरिमा कमी होत नाही का? असे व यासारखे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, याची आठवण होते.

Wednesday, March 1, 2017

ट्रंप यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  डोनाल्ड ट्रंप यांना गेल्या निवडणुकीत मिळालेले यश विरोधकांच्या विशेषत: डेमोक्रॅट पक्षाच्या वउदारमतवादी विचारवंतांच्या पचनी पडलेले दिसत नाही. याबाबत अमेरिकेची भारताशी तुलना करता येऊ शकेल. काॅंग्रेस व तथाकथित विचारवंतांची भारतात हीच अवस्था आहे. पण सध्या तो मुद्दा आपल्यासमोर नाही. डोनाल्ड ट्रंप हे अननुभवी, धसमुसळे, अत्याग्रही आहेत. त्यामुळे चुका, अनावश्यक टिप्पणी, उर्मट व/वा उद्धट भाषा यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर जगभर चर्चा होताना दिसते आहे.
ग्लोबल अकाऊंटिबिलिटी ॲक्टचा चाप - यावर काही उपाय करता येईल का असा विचार डेमोक्रॅट पक्षाच्या उघडउघड पाठिंब्याने अमेरिकेत होत आहे. अध्यक्षांच्या हाती कोणकोणत्या बाबतीत निर्णायक किंवा जवळजवळ निर्णायक अधिकार आहेत, याचा शोध घेण्याच्या कामी काही घटनातज्ञ लागले आहेत. उद्या अध्यक्षांनी एखाद्या देशाशी युद्ध करण्याचे ठरविले तर अमेरिकन काॅंग्रेसला (हाऊस व सिनेट) विश्वासात घ्यावेच लागते. अध्यक्ष जर उद्या व्यापारी युद्ध पुकारणार असेल तर काॅंग्रेसला असेच अधिकार का असू नयेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. उपस्थित करणारे माईक ली हे घटना पंडित आहेत, हे विशेष. हे पंडित वृत्तीने सनातनी असून त्यांचे म्हणणे असे आहे की, अमेरिकन राज्यघटनेत अदूरदर्शीपणामुळे एखादी तरतूद केलेली असेल तर ती दुरुस्त करायला नको का? किंवा काही अधिकार अध्यक्षांना घटनाविरोधी पद्धतीने देण्यात आले असतील तर? ते परत घ्यायला नकोत का? जर काॅंग्रेसचे अधिकार अशाप्रकारे सीमित करण्यात आले असतील तर काही उपाय करावयास नकोत का? यावर उपाय म्हणून त्यांनी एक विधेयक सुचविले आहे. त्याचे शीर्षक आहे ग्लोबल अकाऊंटिबिलिटी ॲक्ट. खरे तर अशा प्रकारचा एक कायदा अगोदर पासूनच अस्तित्वात होता/आहे. रेग्युलेशन्स फ्राॅम दी एक्झिक्युटिव्ह इन नीड आॅफ स्क्रुटिनी (रीन्स) अॅक्ट या शीर्षकाचा हा कायदा आहे.  हा कायदा आवश्यकतेनुसार वेळोवेळी ठराविक काळापुरता हाऊसकडून पारित करून घ्यावा लागतो, असे याचे स्वरूप आहे. सध्या हा रीन्स ॲक्ट क्षपगत (एक्सपायर) झाला असून त्यावेळी सिनेटमध्ये डेमोक्रॅट पक्षाचे मताधिक्य होते.
रीन्स ॲक्ट - ५ जानेवारी २०१७ ला रीन्स कायदा पुन्हा एकदा पारित करण्यात आला आहे. यानुसार १०० दशलक्ष डाॅलरपेक्षा जास्त रकमेची तरतूद असलेल्या खर्चासाठी काॅंग्रेसची संमती आवश्यक असणार आहे. याचा सरळ अर्थ असा असणार आहे की, मोठ्या खर्चांशी संबंधित विषयांचे बाबतीत अध्यक्षांच्या अधिकारावर चाप लावण्यात आला आहे. या प्रश्नाचा  दुसराही एक पैलू असा आहे की, विधिपालिका (लेजिस्लेचर) व कार्यपालिका ( एक्झिक्युटिव्ह) या दोन घटकात मोठ्या खर्चांच्या विषयांबाबत विधिपालिकेचा वरचष्मा राहील. याचा अर्थ जे कर/उपकर वा जकात लावण्याच्या विचारात डोनाल्ड ट्रंप आहेत, त्याबाबतचे त्यांचे मनसुबे काॅंग्रेस ( हाऊस व सिनेट) यांच्या अनुमतीशिवाय पूर्ण होऊ शकणार नाहीत. हाऊस व सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असले तरी सभागृहाचे सदस्य पक्षभेद बाजूला सारून भूमिका घेतात, विचार करतात व निर्णय घेतात, असा प्रकार अमेरिकेत सर्रास रूढ आहे. म्हणजे असे की, डोनाल्ड ट्रंप यांच्या भूमिकेला सर्वच रिपब्लिकन पक्ष सदस्यांचा पाठिंबा व सर्वच डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांचा विरोध असेल, असे नाही. अमेरिकेत व्हिपचे (पक्षादेश)  स्वरूप आपल्या इथल्यासारखे नाही.
याचा परिणाम अनेक निर्णयांवर होऊ शकेल. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारणे, बाहेर देशातून स्वस्तात कामे करून घेणे ( आऊट सोर्सिंग), अमेरिकेबाहेर उद्योग उभारणे, परदेशातून नोकरीसाठी येणाऱ्या परकीय नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर प्रतिबंध घालणे, परदेशी मालावर जबरदस्त कर (३५टक्के) लावणे यासारख्या बाबतीतले डोनाल्ड ट्रंप यांचे धोरण पक्षभेद विसरून विचार करण्याच्या भूमिकेमुळे प्रभावित होऊ शकेल.
प्रस्तावित तरकूद -  कार्यपालिकेचा कर लादण्याचा कोणताही निर्णय व/वा व्यापारविषयक कोणताही निर्णय काॅंग्रेसच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त सभेत मान्यता असल्याशिवाय लागू करता येणार नाही, अशी तरतूद माईक ली सुचवीत आहेत. संरक्षणविषयक निर्णयाबाबत अशी तरतूद पूर्वीपासूनच कार्यवाहीत आहे. याचा अर्थ असा होतो की, डोनाल्ड ट्रंप यांना स्वयंनिर्णय करण्याबाबतचे अधिकार फार मोठ्या प्रमाणात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेतील निर्णयाच्या अधीन राहतील. म्हणजेच खर्च व संरक्षणविषयक काही जुजबी कारवाई करण्याचे अधिकार वगळल्यास अध्यक्षाला फारसे अधिकार न उरल्यामुळे तो  नावालाच अध्यक्ष असेल. हाऊसचे सभापती पाॅल रायन यांनी आम्ही कर/जकातवाढीला अनुमती देणार नाही, अशी घोषणा लगोलग करून टाकली आहे. यापूर्वी अमेरिकन अध्यक्षाला निर्णय घेण्याच्या बाबतीत असलेला व्यापक (व्हास्ट) विवेकाधिकार मर्यादित करून त्याची गत रबर स्टॅंप प्रेसिडेंट करण्याचाच हा प्रकार होतो आहे, असे दिसते.
सीमेवर जकात नाकी असतात. अमेरिकेच्या घटनेनुसार जकात, कर, उपकर लावण्याचा अधिकार काॅंग्रेसला(उभय सभागृहांना) असेल. खरे पाहता अमेरिकेची निर्मिती झाली तेव्हाच हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. करविषयक सर्व प्रस्ताव सभागृहातूनच पुढे येतील, अशा आशयाचा तो मुद्दा आहे. पण  घटनेचे हे कलम आताच का आठवले? देशांतर्गत उत्पादनांना संरक्षण देण्साठी डोनाल्ड ट्रंप यांनी काही बाबतीत वारेमाप कर लावण्याचा मनोदय निवडणूक प्रचार करतांना व्यक्त केला होता. त्याला अनुसरून करविषयक प्रस्ताव त्यांच्या विचाराधीन आहेत. याबाबतीतले अध्यक्षांचे अधिकार सीमित असून दोन्ही सभागृहांची संमती कशी आवश्यक आहे, याची आठवण विरोधक करून देत आहेत, असे यावरून दिसते. 
ट्रेडिंग विथ एनेमी ॲक्ट- १९१७ साली अमेरिकेने  ट्रेडिंग विथ एनिमी ॲक्ट पारित केलेला आहे. यानुसार अध्यक्षाला कर निर्धारणविषयक विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. हे अधिकार युद्धसदृश परिस्थितीत कमांडर इन चीफ या नात्याने अध्यक्षाने वापरायचे असतात.
 या कायद्यातील तरतुदीचा आधार प्रथमत: १९३३ साली प्रेसिडेंट फ्रॅंकलीन रुझवेल्टने केलेला आढळतो. त्यावेळी कोणतेही युद्ध सुरू नव्हते. तरीही अध्यक्ष या नात्याने फ्रॅंकलीन रुझवेल्टने ह्या तरतुदींचा आधार घेतला. त्यांनी आणीबाणी घोषित केली. बॅंका काही काळ बंद ठेवल्या. या कारवाईचा परदेशांशी सुरू असलेल्या व्यापाराशी काडीचाही संबंध नव्हता. पण त्यावेळी दोन्ही सभागृहांनी अध्यक्षांना साथ दिली होती. पण आज तसे घडेल का? सांगता येत नाही. काय होईल कुणास ठावूक?
१९७१ साली परिस्थिती काहीशी वेगळी होती. अमेरिका कोरियन युद्धात गुंतलेली होती. यावेळी कोरियातून येणाऱ्या मालावर १० टक्के अधिभार (सरचार्ज) लावण्याचा निर्णय त्यावेळच्या रिपब्लिकन अध्यक्षांनी - रिचर्ड निक्सन यांनी - घेतला होता. यावेळचा प्रकार काही वेगळाच होता. आणीबाणी रीतसर लावली गेली नव्हती व नंतर ती उठवलीही गेली नव्हती. ती तशीच विरली.
अध्यक्षांना असलेला विशेष अधिकार, युद्धजन्य परिस्थिती असेल तर, या परंतुकाने मूळ कायद्यात नमूद केलेला आहे. पण ही तरतूद कागदावरच शिल्लक आहे, असे दिसते. यापूर्वीच्या अध्यक्षांच्या उक्ती व कृतींचा दाखला देऊन डोनाल्ड ट्रंप त्यांचाच कित्ता गिरवू शकतात. अशी इतरही उदाहरणे देता येतील. इराक आणि अफगाणिस्थानमधील अमेरिकेचा हस्तक्षेप कोणत्या युद्धजन्य परिस्थितीत होता? 
दी इंटरनॅशनल इमर्जन्सी एकाॅनाॅमिक पाॅवर्स ॲक्ट आॅफ १९७७ - १९७७ साली अमेरिकेत आणखी एक कायदा पारित करण्यात आला आहे. दी इंटरनॅशनल इमर्जन्सी एकाॅनाॅमिक पाॅवर्स ॲक्ट आॅफ १९७७ नुसार तर आंतरराष्ट्रीय व्यापार नियमनाबाबत अध्यक्षांना आणखी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. आजमितीला असे एकूण थोडे थोडके नाहीत तर तब्बल आठ कायदे अस्तित्त्वात आहेत.
अर्थ लावण्याची अध्यक्षांना मुभा - असामान्य व विलक्षण (एक्स्ट्राॅआॅर्डिनरी व अनयुज्युअल) हे शब्दप्रयोग अर्थ लावण्याचेबाबतीत अध्यक्षाला भरपूर मुभा (लाॅंग रोप) देत आहेत. आणीबाणीसदृश परिस्थिती आहे किंवा नाही, याबाबत अध्यक्षाच्या मताला प्राधान्य देत आले आहेत. आज डोनाल्ड ट्रंप जेव्हा आक्रमक कायदेशीर पवित्रा घेत आहेत, त्यामागे या आठ कायद्यांचे भरभक्कम पाठबळ आहे. या कायद्यात, युद्धजन्य परिस्थिती असे परंतुक असले तरी, त्याची आठवण आताच तुम्हाला कशी काय होते आहे, असे म्हणून विरोधकांना गप्प करण्याच्या प्रयत्नात डोनाल्ड ट्रंप आहेत. यामुळेच बहुदा  माईक ली यांनी अध्यक्षाच्या अधिकारावर नियंत्रण आणण्यासाठीचे बिल सादर करून उभय पक्षांच्या सदस्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी जोरदार खटपट सुरू केली असावी, असा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे. ट्रंप यांचे पंख कापण्याचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, ते येत्या काळात दिसेलच. अध्यक्षाने निर्णय घ्यावा व काॅंग्रेसने त्यांची री ओढावी, असेच युद्धजन्य परिस्थितीच्या निदानाबाबत आजवर घडत आले आहे. जर हा प्रस्तावित कायदा याच स्वरुपात दोन्ही सभागृहांनी पारित केला व (पुन्हा एकदा जर) जर त्यावर अध्यक्षांनी स्वाक्षरी केली, तर मात्र अध्यक्षाच्या निर्णय घेण्याच्या अधिकारांवर खूपच मर्यादा पडलील व दोन्ही सभागृहांचे अधिकार त्या प्रमाणात वाढतील.
सेबेस्टियन गोर्का यांचा अध्यक्षीय सल्लागार चमूत समावेश -डोनाल्ड ट्रंप यांच्या अध्यक्षारोहण प्रसंगी सेबेस्टियन गोर्का यांची उपस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कोण आहेत हे गोर्का?  यांचे वडील हंगेरीतील एक अनेक सन्मानप्राप्त योद्धा होते. यांचा साम्यवाद्यांनी अतोनात छळ केला होता. तिथून सुटून अमेरिकेत आल्यावर अमेरिकेने त्यांचे स्वागत करून त्यांना नागरी सन्मान चिन्हे प्रदान केली होती. सेबेस्टियन गोर्का हे यांचे चिरंजीव आहेत. आजवर गोर्का यांना अमेरिकन विद्वतजनांनी फारसे महत्त्व दिले नव्हते. आज मात्र त्यांचा दबदबा वाढला असून दहशतवाद व राष्ट्रीय सुरक्षा विषयक डोनाल्ड ट्रंप यांच्या भूमिकेच्या पाठीशी कुठेतरी गोर्का यांचे विचार आहेत, असे मानले जाते.
मूलभूत इस्लामी दहशतवाद (रॅडिकल इस्लामिक टेररिझम) - डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या प्रथम प्रगट भाषणात मूलभूत इस्लामी दहशतवाद (रॅडिकल इस्लामिक टेररिझम) असा शब्दप्रयोग केला होता. या  शब्दप्रयोगाचे वैशिष्ट्य हे आहे की, ११ सप्टेंबरला२००१ ला  ट्विन टाॅवर्सचा विध्वंस झाल्यानंतर सुद्धा तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जाॅर्ज बुश यांनी सुद्धा हा हल्ला मूलभूत इस्लामी भूमिकेच्या विसंगत असल्याचे विधान केले होते व इस्लामला दोष दिला नव्हता. या उलट इस्लाम म्हणजेच शांतता असा राग आळवला होता. बराक ओबामा यांनीही हाच राग आळवला होता. याउलट अध्यक्षपद स्वीकारताच डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या पहिल्याच भाषणात मूलभूत इस्लामी दहशतवाद (रॅडिकल इस्लामिक टेररिझम) असा शब्दप्रयोग केला आहे व दहशतवादाच्या मुळाशी मूलभूत इस्लामी विचार आहे, असे ठणकावून सांगितले आहे.  गोर्का यांनी या भूमिकेचे समाधानपूर्वक स्वागत केले आहे.  यापूर्वी दहशतवाद कशामुळे याबद्दल दिली जाणारी सगळी कारणे त्यांनी बाद ठरविली. कोणती होती ती कारणे? मुस्लिमांवरील दडपशाही, मुस्लिमांशी असलेला स्नेहसंबंधांचा अभाव, आजवर मुस्लिमांचा झालेला छळ, मुस्लिमांचे दारिद्य, अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणातील चुका, मध्यपूर्वेतील जटिल व घाणेरडी परिस्थिती अशी वेगवेगळी कारणे दहशतवादाच्या मुळाशी आहेत, असे अमेरिकेत म्हटले जायचे. अगदी आडवळणाने सुद्धा इस्लामला जबाबदार धरले जात नसे. डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या पहिल्याच अध्यक्षीय भाषणात मूलभूत इस्लामी दहशतवाद असा शब्दप्रयोग करून ही सर्व कारणे एका फटकाऱ्यासरशी बाजूला सारली. ट्विन टाॅवर्सच्या विध्वंसानंतर अमेरिकन जनमानसातही हीच भावना होती. डोनाल्ड ट्रंप यांनी जनतेच्या मनातील याच भावनेला अध्यक्षीय भाषणात स्थान दिले व जनमानसाला आवाज मिळाला. कारण तोपर्यंत असे कुणीही उघडपणे म्हणत नव्हते. 
गोर्का आणि सहकारी यांच्या मते डोनाल्ड ट्रंप यांनी योजलेला हा शब्दप्रयोग केवळ नक्की ओळख पटवण्यापुरता मर्यादित नसून मुस्लिमजगताकडे निदान गेली १६ वर्षे अमेरिका ज्या दृष्टीने पाहत होती, तो शब्दप्रयोग त्याबाबतचा बदल अधोरेखित करीत आहे. अमेरिका या निमित्ताने आपल्या शत्रूची नव्याने व्याख्या करीत आहे.
त्यांच्या धर्मग्रंथातील युद्धाच्या वर्णनातच शोभून दिसतील असे जे शब्दप्रयोग आहेत, त्यात दहशतवादाची बीजे आढळून येतात. याकडे कानाडोळा करणे म्हणजे वस्तुस्थिती नाकारण्यासारखे आहे. अमेरिकेतील विचारवंत, उदारमतवादी, विद्वान यांना हे प्रतिपादन  म्हणजे समस्येचे अतिरेकी सुलभिकरण वाटत असले तरी अमेरिकन जनमानसाला मात्र असे वाटत नाही. याचे व्यावहारिक मूल्य खूपच महत्त्वाचे ठरते आहे. धार्मिक तत्त्वज्ञानाचा प्रभाव दहशतवादाच्या मुळाशी आहे हे ज्यांना मान्य नाही, ते सोयिस्कर अर्थ लावून आपले समाधान करून घेत आहेत, अशी गोर्का यांची टीका आहे. यावर दहशतवाद्यांना जे हवे आहे, नेमके तेच या बोलण्यातून व्यक्त होत आहे, असे प्रतिपक्षी म्हणत आहेत. पण गोर्का आपला मुद्दा सोडायला तयार नाहीत. सर्व दहशतवादी मुळात एकाधिकारवादी (टोटलिटेरियन) असतात. संपूर्ण शरणागती किंवा मृत्यू असाच पर्याय ते समोरच्यापुढे ठेवीत असतात. माणसाचे मुंडके करवतीने कापायचे झाले तर सात मिनिटे लागतात, यासाठीचे मानसिक बळ धर्माच्या प्रभावातून किंवा  धार्मिक  विकृतीतूनच येऊ शकते, असे ते म्हणतात.
 गोर्का  जाॅर्डन, इजिप्त, युनायटेड अरब अमिरात यांना धर्मातीत (सेक्युलर) राष्ट्रे मानतात. कारण धर्माचा प्रशासनाशी संबंध असू नये, असे ही राष्ट्रे मानतात. ही राष्ट्रे सुन्नीबहुल असूनही इसीसच्या विरोधात आहेत. अमेरिकेने यांना सोबतीला घ्यावे व शीत युद्धात जसा साम्यवाद्यांचा सामना केला, तीच पद्धती अमलात आणावी, असे गोर्का यांचे आग्रही प्रतिपादन आहे. डेमोक्रॅट पक्ष व उदारमतवादींना हे अमान्य आहे. याचा परिणाम म्हणून अमेरिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघालेले दिसते आहे. नजीकच्या भूतकाळात अशा  प्रसंगातून जाण्याचा प्रसंग अमेरिकेवर ओढवला नव्हता. प्रत्येक प्रकारचा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हाना केव्हा येतोच, असे म्हणतात. व्यक्तींप्रमाणे हे राष्टांनाही लागू पडते म्हणायचे.