Showing posts with label Articles -GENERAL. Show all posts
Showing posts with label Articles -GENERAL. Show all posts

Thursday, April 21, 2016

ग्रेट बॅरियर रीफचे भवितव्य धोक्यात?
                वसंत गणेश काणे
    आॅस्ट्रेलिया खंडातील क्विन्सलंडला लागून असलेल्या कोरल समुद्रात २ हजार ३०० किलोमीटर लांब आणि ३ लक्ष ४४ हजार चारशे चौरस मीटर क्षेत्रफळाची एक औरस चौरस व ऐसपैस रीफ आहे. रीफ म्हणजे पाण्यात जेमतेम बुडालेला दगड(बेट). या अफाट रीफ मध्येच ९०० लहानमोठी बेटे सुद्धा आहेत. हा भाग सलग पर्वतासारखा नसून त्यात २३०० घड्या आहेत. आपल्या सातपुड्यात जशा सात रांगा आहेत,तसाच काहीसा प्रकार म्हणायचा. प्रवाळ(कोरल पाॅलिप) नावाच्या सूक्ष्म जंतूंच्या अवशेषांपासून समुद्रात जेमतेम बुडालेल्या या जणू पर्वत रांगाच आहेत. ही अजस्त्र भिंत आॅस्ट्रेलिया खंडासाठी वरदान आहे. खोल समुद्रात वावरणारे शार्क सारखे भयंकर मासे ही भिंत ओलांडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे जलविहारासाठी व मासेमारीसाठी ही सुरक्षित व निसर्गनिर्मित सोय आहे. ही भिंत आणि आॅस्ट्रेलियाचा किनारा यातील ही चिंचोळी पट्टी अवकाशातूनही दिसते. अनेक जीवांचे आश्रयस्थान असलेली व प्रवाळांच्या अवशेषांपासून बनलेली ही नैसर्गिक भिंत (रीफ) १९८१ मध्ये जागतिक वारसास्थळ( वर्ल्ड हेरिटेज साईट) म्हणून मान्यता पावली. क्विन्सलंड प्रांताने तिला आपल्या राज्याचे मानचिन्ह(आयकाॅन) म्हणून गौरविले आहे. मानवी उपद्रव, अतिरेकी मासेमारी आणि पर्यटकांच्या अवांछनीय क्रिया यावर आॅस्ट्रेलियन सरकारने प्रतिबंध घालून या वारशाचे जतन करत आणले आहे.
    पण आता मात्र एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. वातावरणातील बदलामुळे या रीफच्या सोबतीने राहणाऱ्या जीवसृष्टीत मोठ्या प्रमाणात बदल होत असून हा प्रवाळथर समूह( रीफ) आता वेगाने झिजू लागला आहे. तळपत्या उन्हामुळेही हे रंगीबेरंगी प्रवाळ खडक पांढरेफट्ट पडत असून त्यांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत चालले आहे.
   आणखी एक नैसर्गिक आपत्ती या अजस्त्र संरक्षक भिंतीच्या राशीला लागली आहे. निसर्गात स्टारफिश नावाचा जलचर आहे. या प्राण्याने अमरत्त्वाच्या दिशेने निदान अर्धे अंतर पार केले आहे, असे म्हणता येईल. या प्रण्याला मारण्याकरिता तुम्ही त्याचे शेकडो तुकडे केले तरी अल्पावधीतच प्रत्येक तुकडा आपल्या वाट्याला न आलेला शरीरभाग तयार करतो आणि शेकडो स्टारफिश आपल्या समोर उभे ठाकतात. रामायणात अहिरावण आणि महिरावणांची कथा आहे. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक अहिरावण व महिरावण तयार होत असे. या कथेची या निमित्ताने आठवण होते. प्रवाळ हे स्टारफिशचे आवडते अन्न आहे. स्टारफिशचे हजारो भाईबंद या भिंतीवर/या रीफवर तुटून पडले असून निदान ५०टक्के हिस्सा त्यांनी गिळंकृत केला आहे असे हवाई पाहणीतून दिसले आहे.
    २० व्या शतकाच्या मध्यात असाच हल्ला या स्टारफिशच्या भाईबंदांनी केला होता. आॅस्ट्रेलियाने या काळात या निमित्ताने आणीबाणी सदृश पावले उचलून यांना नष्ट करण्यासाठी लोकांचे गट समुद्र किनारी १५/१५ दिवसांसाठी पाठविले होते. एकेक स्टारफिश चिमट्यात पकडायचा आणि फाॅर्मलीनसारख्या द्रवात बडवून मारायचा, असे या मोहिमेचे स्वरूप होते. कारण स्टारफिशला हाताचा स्पर्श झाल्यास आपल्याला इजा होते. या मोहिमेत शाळकरी मुले सुद्धा सामील झाली होती, अशा आशयाचे माहितीपर लेख प्रसिद्ध झाले होते.
   यावेळी ग्लोबल वाॅर्मिंग सारखे नैसर्गिक (की मानवनिर्मित?) संकटही या अनमोल ठेव्याच्या नाशाला कारणीभूत होताना दिसते आहे. असा एका नैसर्गिक घटकाचा प्रकोप होऊन दुसरा नैसर्गिक घटक नष्ट होण्याचा प्रकार प्रथमच आमच्या पाहण्यात येतो आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

Saturday, February 6, 2016

कोण म्हणतो हे कलियुग आहे म्हणून?
वसंत गणेश काणे
(एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ नागपूर -४४० ०२२)
ह्ल्ली  मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया,अमेरिका        
Email – kanewasant@gmail.com
Blog – kasa mee? (07122221689) 9422804430
लारा रुसो, काली ग्वास्ती आणि रीस वर्खोव्ह्न या तिघा ‘रूम मेट्स’नी एक कोच खरेदी केला. दुकानाचे नाव होते सॅल्व्हेशन आर्मी स्टोअर. जुन्या वस्तू दान स्वरुपात  घ्यायच्या आणि थोडा नफा  घेऊन त्या विकायच्या, अशा प्रकारचे जुन्या वस्तू स्वस्त दराने गरजूंना विकण्याचा व्यवसाय करणारे ते दुकान होते. ही घटना आहे, न्यूयॉर्क पासून १२० किलोमीटर उत्तरेला असलेल्या पाल्झ या गावातली. कोच आणि सोबत एक खुर्ची यांची किंमत ५५ डॉलर देऊन त्यांनी ही खरेदी केली.
जुन्या कोचला ठिकठिकाणी फुगवटे होते
कोचाचे हात जरा जास्तच फुगलेले वाटल्यामुळे रिझने  झिप उघडून आत काय आहे ते पहिले. तो काय आश्चर्य! हाताला आलेला फुगवटा एका पाकिटामुळे होता! पाकीट उघडून बघीतले तर आत ४००० डॉलरच्या नोटा होत्या!! आत आणखीही पाकिटे होती. नोटांनी भरलेली. एकूण ४०,८०० डॉलर होते. तिघांनाही लॉटरी लागल्याचा आनंद झाला. आश्चर्याने वासलेला ‘आ’ काही केल्या बंदच होईना.
त्यांचा आनंद गगनात मावेना. काय गडबड आहे हे पाहण्यासाठी शेजारीपाजारी जमा झाले. त्यांनीही या तिघांचे लॉटरी लागल्याबद्दल अभिनंदन केले.
वेगळीच कलाटणी
पण या सर्व गोष्टीला एक वेगळीच कलाटणी लावणारी घटना घडली ती अशी. एका पाकिटात एक डिपॉझिट स्लीप होती. त्यावर एका महिलेचा पत्ता लिहिलेला होता. दुसरे दिवशी या तिघांनी तिची भेट घेतली. ती ९१ वर्ष वयाची एक विधवा होती.तिची प्रकृती ठीक नव्हती. तो कोच आणि ते पैसे तिचेच होते. तिनेच ते पैसे त्या कोचात ठेवले होते. ती आजारी असतांना तिच्या नातेवाईकांनी तो कोच जुन्या वस्तू गरजूंना स्वस्त किमतीत देणाऱ्या ‘सॅल्व्हेशन आर्मी स्टोअर’ या  दुकानाला देणगी (डोनेशन) स्वरुपात दिला होता. 
‘आम्ही हे पैसे सहज ठेवू शकलो असतो पण मग आम्हाला आयुष्यभर टोचणी लागली असती’, असे या तिघांनी पत्रकारांना (असोसिएटेड प्रेस) सांगितले.       

Friday, February 5, 2016

जागतिक मंदी आणि भारत  
  आज सर्वजगभर मंदीचे लाट आहे. मंदीच्या या  लाटेतून बाहेर पकडण्याचा निकराचा प्रयत्न जगातील सर्व देश करीत आहेत. मंदीचा परिणाम समजून घेण्यासाठी एक प्रत्यक्ष उदाहरण बघूया. जी ई ही एक जागतिक कीर्तीची अमेरिकन कंपनी असून ती  उद्याेगजगात आपली प्रतिष्ठा राखून आहे. तिचा रेल्वेची इंजिने तयार करण्याचा एक कारखाना असून तिच्या इतर अनेक कारखान्यांच्या तुलनेत या कारखान्याच्या क्रमांक खूपच वरचा होता. दर वर्षी ह्या कारखान्यात शेकडोंनी इंजिने तयार होत असत. जगभर ही इंजिने विकली जात. इंजिनांची मागणी करणार्या देशात इण्डोनेशिया सारखा आशियातील देश जसा होता तसा इंग्लंड सारखा युरोपातील देशही होता. मंदीचा परिणाम होऊन या दोन्ही आणि जगातील अन्य देशांनी आपल्या मागण्या रद्द केल्या. एकाही इंजिनाची मागणी नसतांना हा एवढा मोठा प्रचंड कारखाना कसा चालवायचा? त्यामुळे कामगार कपात करणे भाग झाले. त्या गावात अक्षरश: हाहाःकार माजला. कधीतरी मागणी येईल या अपेक्षेने कमीतकमी कामगार ठेवून आणि त्यांच्या मिळकतीत नियमात बसेल ती आणि बसेल तशी कपात करीत हा कारखाना कंपनीने जिवंत ठेवला आहे. सर्व कंपन्या अशा दानतीच्या नव्हत्या/नसतात/नाहीत. त्यांनी सरळ आपला गाशा गुंडाळला आणि एकजात सर्व कर्मचारी रस्त्यावर आले. थोड्याफार फरकाने हा प्रकार सर्व जगभर घडत आहे. मंदीच्या प्रश्नाचे गांभीर्य, भयानकता, दाहकता आणि विदारकता लक्षात येण्यासाठी हा तपशील उपयोगी पडेल.
                            जी-२०’चे कायम आणि नियंत्रित सदस्य
     ‘ग्रुप ऑफ २० नेशन्स’ किंवा ‘जी-२०’ असे नाव असलेला २० देशांचा एक आहे. यातील सदस्य देश : १) अर्जेंटिना, २) ऑस्ट्रेलिया, ३) ब्राझील, ४) कॅनडा, ५) चीन, ६) फ्रान्स, ७) जर्मनी, ८) भारत, ९) इंडोनेशिया, १०) इटली, ११) जपान, १२) कोरिया, १२) मेक्सिको, १४) रशिया, १५) सौदी अरेबिया, १६) दक्षिण आफ्रिका, १७) युनायटेड किंगडम (इंग्लंड), १८) युनायटेड स्टेट्‌स (अमेरिका) आणि २०) युरोपियन युनियन हे आहेत. जगातील अर्थक्षेत्रामधली ही सर्वात मोठी संस्था आहे. वरील सर्व देशातील  अर्थव्यवस्था स्थिर आणि मजबूत समजली जाते. जगातील दोनतृतीयांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते. याशिवाय या देशांचे ग्लोबल डोमेस्टिक प्रॉडक्ट (जी. डी. पी.) हे ८५ टक्के आहे, तसेच ग्लोबल ट्रेडिंगसुद्धा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
कालांतराने काही देशांना कायम निमंत्रित म्हणूनही मान्यता देऊन जी-२० ला व्यापक रूप देण्याच्या प्रयत्न झाला. ते देश असे : १) स्पेन, २) बेनीन, ३) ब्रुनेई, ४) कम्बोडिया, ५) चिली, ६) कोलंबिया, ७) इक्वेटोरियल गुनिया, ८) इथोपिया, ९) कझाकिस्तान, १०) मालवी, ११) नेदरलॅण्ड, १२) स्वित्झरलॅण्ड, १३) थायलंड, १४) युनायटेड अरब अमिरात, १५) व्हिएतनाम, १६) मरटेनिया, १७) म्यानमार, १८) न्यूझीलंड आणि १९) सिंगापूर या नवीन आणि आर्थिक दृष्ट्या छोट्या देशांनाही आमंत्रित सदस्य म्हणून मान्यता दिली गेली. अशा या अतिव्यापक संस्थेची आतापर्यंत आठ संमेलने झाली आहेत.

                              प्रगतीचा दर शून्यावर
        सध्याच्या जागतिक मंदीतून जगातील बडेबडे देश सुटलेले नाहीत. जगातील देशांचे दोन प्रकारात वर्गीकरण करतात. विकसित देश आणि विकसनशील देश. याच अर्थाचा दुसराही शब्दप्रयोग म्हणजे प्रगत देश आणि प्रगतीपथावर असलेले देश. या देशांच्या प्रमुखांची बैठक आॅस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन येथे नुकतीच पार पडली. या निमित्ताने  एक भयावह स्थिती समोर आली आहे. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या देशांच्या प्रगतीचा/विकासाचा दर खूपच कमी आहे. अप्रगत/विकसनशील देशांचा प्रगतीचा दर १.७ टक्के आहे. तर विकसित देशांच्या प्रगतीचा दर त्यांच्या तुलनेत जेमतेम एक टक्काच जास्त आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर अनेक देशांच्या प्रगतीचा दर शून्यवरही जाऊ शकतो असे दिसते आहे. पण दोन चिंताजनक बाबी समोर येत आहेत.एक असे की ही जागृती निर्माण व्हायला सहा महिन्यांचा अवधी लागला. दुसरे असे की, अशा परीस्थितीतही युक्रेनच्या प्रश्नावरून रशियाने अर्ध्यातूनच आपले चंबूगवाळे आवरून बैठकीतून काढतां पाय घेतला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, अगदी जीवावर बेतले तरी सर्व राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांनाच प्राधान्य देत आहेत. अमेरिका, चीन, जपान या सकट सगळ्या देशांचे विकास दर घसरत चालले असून ही घसरण थांबावी यासाठी त्यांना पराकोटीचे प्रयत्न करावे लागत/लागणार आहेत.
                              भारत पुष्कळ प्रमाणात स्वावलंबी 
          या सर्व राष्ट्रांना भारताशी मैत्री हवी आहे. याची कारणे दोन आहेत. भारत ही त्यांच्यासाठी एक फार मोठी बाजारपेठ आहे. भारताचा विकासदरही घसरला असला  तरी तो या राष्ट्रांइतका घसरलेले नाही. तो असात वाढत राहिला तर लवकरच सहा टक्के इतका होऊ शकतो. यांचे कारणही समजून घेणे उपयोगाचे ठरणारआहे. जगातील बहुतेक देश परस्परावलंबी झाले आहेत. एकाचे अर्थकारण बिघडले की त्याचा परिणाम दुसर्या देशाच्या अर्थकारणावरही होतोच. त्यामुळे भारतातही मंदीची लाट आली आहे. पण आपण पुष्कळ प्रमाणात स्वावलंबी आहोत. खनिज तेलाचा एक अपवाद सोडला तर आपली अर्थव्यवस्था आपल्याच भरवशावर उभी आहे. सध्या तेलाचे भाव घसरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जगभरात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सगळे देश आपल्या देशाकडे अपेक्षेने पाहत आहेत. हे देश आणि त्यांचे राष्ट्रप्रमुख आपल्याकडे आदराने पाहतात आपल्याला मान देतात यांचे हेही प्रमुख कारण आहे. सध्या सोन्याचे भावही उतरत आहेत. मंदीचा सामना कोणताही एक देश स्वत:च्या भरवशावर करू शकणार नाही. सर्वांना एकमेकाशी सहकार्य करावे लागेलच. 
                                      मूलभूत सुधारणा आवश्यक
       आपल्यालाही अनेक मूलभूत सुधारणा कराव्या लागतील. व्यवस्थापनात चुस्ती आणावी लागेल, शिथिलता दूर करावी लागेल. काळा पैसा परत आणण्यासाठी जी २० देश एका  विचाराने आणि परस्पर सहकार्य करण्याच्या बाबतीत सहमतीने काम करण्याचा निर्धार करीत आहेत, ही फार मोठी उपलब्धी ठरली आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या प्रयत्नाला  या बाबतीत मिळालेले हे यश भविष्यात खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या देशात उत्खनन करून तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. आपला देश जगात महासत्ता म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही. एवढेच नाही तर जगाचे पालकत्व करणार्या देशांमध्ये आपले प्रमुख स्थान असणार आहे. पण त्यासाठी देश पातळीवर कठोर निर्णय  तातडीने घ्यावे लागणार आहेत. संसदेत आवश्यक ते बहुमत सत्ताधारी पक्षाजवळ आहे. राज्यसभेत तशी स्थिती नाही. ही अडचण क्षात घेऊनच सहमतीचे राजकारण त्या सभागृहात निर्माण होण्याची आणि तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.  

Thursday, February 4, 2016

                        *   द रेड सारी अर्थात लाल साडी 
    आपल्या जीवनकाळात आपल्यावरच एखादी कादंबरी लिहिली जावी हा योग किती  व्यक्तींच्या आयुष्यात आला असेल बरे? त्यातून ही व्यक्ती एक महिला आहे. तिची जीवनगाथा एखाद्या परीकथेसारखी आहे, असे काहींना वाटते तर काही या विधानाशी अंशत:च सहमत आहेत.कारण परीकथेत शेवटी कसं सगळं चांगलं चांगलं होत. या कथेच तसं नाही. परीकथेत तिला शेवटी तिच्या आवडीचा राजकुमार भेटतो आणि कथा संपते. पुढे काय होतं, याची उत्सुकता कुणालाच नसते. यानंतर त्यांनी सुखाने आणि गुण्यागोविंदाने संसार केला अशी पुस्ती काही कथाकार किंवा कादंबरीकार जोडत असत. पण वाचकांनी हे गृहितच धरलेलं असे. पणप्रत्यक्ष जीवन असे नसते. आजकाल तर अनेक कथा कादंबर्यांची सुरवातच मुळी नायक नायिकेच्या मीलनानंतर सुरू होते. ते असो.
          या कादंबरीमुळे फार मोठे वादळ उठले होते. या कादंबरीच्या बाजारातल्या प्रती परत बोलवा, कादंबरीवर बंदी घाला या त्यातल्यात्यात सौम्य मागण्या म्हटल्या पाहिजेत. बिचारा कादंबरीकार कुणाचीही बदनामी करण्याचा आपला हेतू नाही/नव्हता, असे कंठरवाने ओरडून सांगत होता. पण कुणी ऐकेल तर शपत. शेवटी २०१५ च्या जानेवारी महिन्यात ही कथा कादंबरी रूपाने उपलब्ध झाली आणि तिच्यावर वाचकांच्या एकच उड्या पडल्या.
                              नमनालाच घडाभर तेल 
     नमनालाच घडाभर तेल लागले असे काहींना वाटण्याची शक्यता आहे. पण नमन नीट झालेलेच बरे नाही का? तेलाचे काय घेऊन बसलात? या कादंबरीचा लेखक एक प्रसिद्ध कादंबरीकार, पटकथालेखक, चित्रपटनिर्माता आहे. जगातील सतरा भाषात त्याच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. त्याने ही कादंबरी स्पॅनिश भाषेत लिहिली आहे. लेखकाचे नाव आहे हाविए मोरो. या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद भारतात आज उपलब्ध झाला आहे. यात नाट्यमयता (नाटक की कादंबरी) जरा जास्त आहे, असे म्हणतात. पण ही तुलना करायला स्पॅनिश भाषा यायला हवी. 
                      लाजरी बुजरी मुलगी ते प्रभावशाली महिला
      या कादंबरीची नायिका आहे एक इटालियन युवती, सोनिया मायनो. तिच्या पित्याची आपल्या तीन मुलींवर करडी नजर असे. मधल्या सोनियाला तो विशेष जपत असे. आपली ही लाजरी बुजरी मुलगी भारतातील एका शक्तिशाली घराण्यातील युवकाच्या प्रेमात पडल्याचे कळताच तो अतिशय निराश झाला. वयाच्या अठराव्या वर्षी एखाद्या सामान्य मुलीसारखी ती  १९६५ साली ती केम्ब्रिजला जायचे ठरविते काय, तिथे राजीव गांधी या तरुणाशी तिची गाठ पडते काय आणि पुढे सामान्य कादंबर्यात जे घडते ते घडून ती दोघे विवाहबद्ध होतात काय, हे सर्व त्या पित्यासाठी अनाकलनीय होते.  ह्याच सामान्य मुलीने (महिलेने) २००४ साली भारतात सत्तांतर घडवून आणले, हा चाळीस वर्षांचा कालखंड या कादंबरीत रेखाटलेला आढळतो.  बांग्लादेश युद्ध, आणीबाणी आणि आॅपरेशन ब्ल्यू स्टार  यांच्या पार्श्वभूमीवर नेहरु-गांधी घराण्यातील जीवनक्रम लेखकाने कल्पनेने रंगवलेला आहे, यावर विश्वास बसत नाही. आज भारतातातच  नाही तर संपूर्ण जगात एक प्रभावशाली महिला म्हणून तिचा सार्थ लौकिक आहे. एक विशेष उल्लेख करण्याची बाब अशी आहे की, या कादंबरीत सोनियांच्या नजरेतून नेहरु-गांधी घराण्याचा इतिहास मांडलेला तरी लेखकाचे सोनियांशी किवा नेहरु-गांधी घराण्यातील कोणाशीही कसल्याही प्रकारचे बोलणे कधीही झालेले नाही. त्यामुळे ही कलाकृती परीकथेच्या सदरात टाकावी तर तिला वास्तवाचा भरभक्कम आधार आहे. असे काही लिखाण होते आहे याची कल्पना स्वत: सोनिया यांना किंवा आणखी कुणाला नसणार. तरीही प्रथमपुरुषी एकवचनी लेखन प्रकाराशी मिळता जुळता हा लेखनप्रकार हेही या कादंबरीचे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे.
    या कादंबरीची कथानायिका सोनिया एका सामान्य कुटुंबात जन्मलेली आहे. नियतीने तिला एका असामान्य घराण्याची सून बनविले आहे. या घराण्याची (नेहरु-गांधी घराणे) तुलना एखाद्या आधुनिक राजघराण्याशीच करायला हवी. विशेष म्हणजे भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील राजवटीवर साठ वर्षे या घराण्याची सत्ता होती. या सुनेवर एकापाठोपाठ एक आघात होत गेले. ते तिने समर्थपणे झेलले. ती स्वत:ची इच्छा नसतानाही (जे तिचे कधीही क्षेत्र नव्हते ) राजकारणात शिरते आणि असामान्य कर्तृत्व दाखवते. कथेच्या नायिकेच्या बाबतीत जे नाट्य अपेक्षित आहे ते या नायिकेचे जीवननाट्य आहे. या कादंबरीचे हेही एक वैशिष्ट्य आहे. लेखकाचे वैशिष्ट्य असे की, हे वास्तव त्याने जगाला उपलब्ध नसलेली अन्य कोणतीही जास्तीची माहिती त्याच्या संग्रही नसतांना कल्पिताच्या आणि कल्पकतेच्या आधारे रंगवले आहे.
                लेखकाचा कल्पना विलास
    नेहरु-गांधी कुटुंबीय असोत किंवा आणखी कोणतेही कुटुंबीय असोत, वैयक्तिक पातळीवर चारचौघांसारखेच वागणार. त्यावेळच्या भावना रंगवतांना कल्पिताचाच आधार घ्यावा लागणार. यासाठी कथानायिकेच्या अंतर्मनात डोकावण्याची किमया लेखकाला कितपत साधते यावर कादंबरीचे यश अवलंबून असते. कोणतीही कादंबरी वाचनीय होते ती लेखकाच्या या कौशल्यामुळे. कादंबरीचा कॅनव्हास भव्य आहे. उत्तुंग व्यक्तिमत्वे राजकीय डावपेचात आणि साठमारीत दंग आहेत. पण कादंबरीत ते वावरतात आजोबा, पिता,पुत्र, नातू किंवा आजी,आई, कन्या, नात या कौटुंबिक स्वरुपात. या निमित्ताने अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्र या नाटकातील  पात्रांची आठवण होते. कृष्णार्जुनादी महाभारतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे अण्णासाहेबांनी अक्षरश: माजघरात आणून बसवली आहेत. लेखकानेही असाच काहीसा प्रकार केला आहे. 
      या कादंबरीत तसे अनेक नायक, नायिका आहेत. खलनायक व खलनायिका आहेत.  सध्या मल्टिस्टारचा जमाना आहेना तसाच काहीसा प्रकार म्हणाना. जवाहरलाल, इंदिरा, राजीव, सोनिया हे सज्जन तर संजय, मनेका दुर्जन ! जनता पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे नेते वाईट अशी भूमिका घेण्यावाचून लेखकासमोर दुसरा उपायच नव्हता.
                        लेखकाने वास्तवाशी इमान
    पण एकंदरीने लेखकाने वास्तवाशी इमान राखलेले आहे. इंदिरा गांधींचे संजय बाबतचे आंधळे पुत्रप्रेम, भ्रष्टाचारी सहकार्यांना सांभाळून घेण्याचा स्वभाव लेखकाच्या नजरेतून सुटलेला नाही. कविगत स्वातंत्र्याचा आधार घेत लेखकाने सोनिया गांधी मात्र आदर्श सून, पत्नी आणि माता म्हणून दाखविल्या आहेत. राजीव गांधींची हत्येच्या रूपाने सोनियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. राजीवजींच्या चितेकडे पाहतांना सतीच्या क्रूर आणि पाशवी चालीचा निषेध करणार्या सोनियांच्या मनात चितेला जवळ करण्याचा विचार येऊन गेला, अशी कल्पना लेखकाने केली आहे.
               ' आमच्याबद्दल लिहिलेलं आम्ही कधीच वाचत नसतो'
      हे सर्व ठीक आहे. पण लाल साडी आली कुठून? तिचा या सर्वाशी काय संबंध? पंडित नेहरू तुरुंगात असतांनाची गोष्ट. त्यांनी कातलेल्या सुतापासून ही लाल साडी विणलेली आहे. ती अगोदर इंदिरा गांधींनी, नंतर सोनिया गांधींनी आणि आता प्रियांका गांधींनी समारंभ प्रसंगी वापरलेली आहे. हे आणखी एक कविगत स्वातंत्र्य!
     पण वास्तव हे कल्पितालाही मागे टाकते म्हणतात. हे वास्तव कोणते? काँग्रजनानी या कादंबरीवर बंदी घालावी अशी मागणी केली. यात काँग्रेसचे अभिषेख सिंघवी सारखे प्रवक्तेही आहेत.!!
   कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर लेखकाची श्रीमती सोनिया गांधींसमोर लेखक उभा ठाकला. 'मॅडम मी चार वर्षे आपली साथ करीत होतो', लेखकाने आपली ओळख देण्याचा प्रयत्न केला. तरीही सोनिया गांधींचा चेहरा निर्विकारच होता. ' मी द रेड सारीचा लेखक. ' आमच्याबद्दल लिहिलेलं आम्ही कधीच वाचत नसतो', असे म्हणत सोनिया पुढे निघाल्या. सोनिया गांधींना असा काही संवाद झाल्याचे आठवत नाही.
      













   

न्यूयाॅर्क शहरात कालीमाता 
वसंत गणेश काणे
एंपायर स्टेट बिल्डिंग ही अमेरिकेतील १०२ मजली महाकाय इमारत या देशाचे भूषण आहे. एंपायर स्टेट बिल्डिंगवर लुई सायहाेय आणि सहकारी यांनी विजेची रोषनाई करून कालीमातेची प्रतिकृती उभी केली आहे. ही प्रतिकृती आश्चर्यचकित करणारी एक आधुनिक करामत म्हटली पाहिजे. कालीमाता ही अंधार दूर करणारी, साक्षात कालस्वरूप मानली जाते. भूतलावरून अनेक जीवजाती नष्टप्राय होत चालल्या आहेत. त्याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने जी जनजागरण मोहीम सुरू होती तिची सांगता अमेरिकेत एका विशेष प्रकारे झाली. अमेरिकेतील एंपायर स्टेट बिल्डिंगच्या संपूर्ण भागावर कालीमातेचे रूप साकारले होते. संपूर्ण इमारतीवर विद्युत रोषनाई अशाप्रकारे केली होती की, त्यातून कालीमातेचे दर्शन होत होते. पर्यावरणाला बाधक आचारविचार, जुन्या चुकीच्या समजुती, चालीरीती, रिवाज, भ्रामक कल्पना, असत्य, अन्याय, शोषण  यांचा विनाश करणारी म्हणून कालीमाता  या इमारतीवर प्रगट झाल्याचे दाखवण्याचा कलाकाराचा हेतू होता.  लुई सायहाेय आणि सहकारी यांचे जेवढे अभिनंदन करावे आणि त्यांच्या योजकतेला अभिवादन करावे तेवढे थोडेच आहे. या कलाकृतीच्या निमित्ताने पर्यावरण संरक्षणासोबत जागतिक एकात्मतेचा संदेशही ते देत आहेत.

कोण म्हणतो हे कलियुग आहे म्हणून?
वसंत गणेश काणे
(एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ नागपूर -४४० ०२२)
ह्ल्ली  मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया,अमेरिका        
Email – kanewasant@gmail.com
Blog – kasa mee? (07122221689) 9422804430
लारा रुसो, काली ग्वास्ती आणि रीस वर्खोव्ह्न या तिघा ‘रूम मेट्स’नी एक कोच खरेदी केला. दुकानाचे नाव होते सॅल्व्हेशन आर्मी स्टोअर. जुन्या वस्तू दान स्वरुपात  घ्यायच्या आणि थोडा नफा  घेऊन त्या विकायच्या, अशा प्रकारचे जुन्या वस्तू स्वस्त दराने गरजूंना विकण्याचा व्यवसाय करणारे ते दुकान होते. ही घटना आहे, न्यूयॉर्क पासून १२० किलोमीटर उत्तरेला असलेल्या पाल्झ या गावातली. कोच आणि सोबत एक खुर्ची यांची किंमत ५५ डॉलर देऊन त्यांनी ही खरेदी केली.
जुन्या कोचला ठिकठिकाणी फुगवटे होते
कोचाचे हात जरा जास्तच फुगलेले वाटल्यामुळे रिझने  झिप उघडून आत काय आहे ते पहिले. तो काय आश्चर्य! हाताला आलेला फुगवटा एका पाकिटामुळे होता! पाकीट उघडून बघीतले तर आत ४००० डॉलरच्या नोटा होत्या!! आत आणखीही पाकिटे होती. नोटांनी भरलेली. एकूण ४०,८०० डॉलर होते. तिघांनाही लॉटरी लागल्याचा आनंद झाला. आश्चर्याने वासलेला ‘आ’ काही केल्या बंदच होईना.
त्यांचा आनंद गगनात मावेना. काय गडबड आहे हे पाहण्यासाठी शेजारीपाजारी जमा झाले. त्यांनीही या तिघांचे लॉटरी लागल्याबद्दल अभिनंदन केले.
वेगळीच कलाटणी
पण या सर्व गोष्टीला एक वेगळीच कलाटणी लावणारी घटना घडली ती अशी. एका पाकिटात एक डिपॉझिट स्लीप होती. त्यावर एका महिलेचा पत्ता लिहिलेला होता. दुसरे दिवशी या तिघांनी तिची भेट घेतली. ती ९१ वर्ष वयाची एक विधवा होती.तिची प्रकृती ठीक नव्हती. तो कोच आणि ते पैसे तिचेच होते. तिनेच ते पैसे त्या कोचात ठेवले होते. ती आजारी असतांना तिच्या नातेवाईकांनी तो कोच जुन्या वस्तू गरजूंना स्वस्त किमतीत देणाऱ्या ‘सॅल्व्हेशन आर्मी स्टोअर’ या  दुकानाला देणगी (डोनेशन) स्वरुपात दिला होता. 
‘आम्ही हे पैसे सहज ठेवू शकलो असतो पण मग आम्हाला आयुष्यभर टोचणी लागली असती’, असे या तिघांनी पत्रकारांना (असोसिएटेड प्रेस) सांगितले.       

Wednesday, February 3, 2016

अमेरिकन स्त्रीचे हिंदू नाव
वसंत काणे
     नीलमच्या ओळखीची एक अमेरिकन स्त्री आहे. ती व्यवसायाने नर्स असून घटस्फोटिता आहे. तिने बहुदा इस्कॅान फाऊंडेशन किंवा चिन्मय मिशनच्या सहकार्याने हिंदू धर्म स्वीकारला आहे. तिला आम्ही हिंदुस्थानातून रुद्राक्षाची माळ भेट म्हणून दिली होती. धर्म परिवर्तनानंतर तिने आपले मूळचे 'केली' हे नाव बदलून हिंदू नाव स्वीकारले होते. पण तिची एक खूप मोठी अडचण होती. तिला आपले नाव उच्चारताच येत नसे. तिचे जुने परिचित व आप्तेष्ट तिला जुन्याच 'केली' या नावाने हाक मारीत. पण आपल्या नवीन नावाचा आपल्याला उच्चारही करता येऊ नये, याचे तिला सारखे वैषम्य वाटत असे. तिच्या गुरूने तिला एकदा तिचे नाव कसे उच्चारायचे ते सांगितलेही होते. पण ते ती विसरून गेली होती. तिला दुसरीही एक गोष्ट माहीत होती ती ही की, प्रत्येक हिंदू नावाला अर्थ असतो. आपल्या नावाचा अर्थ काय आहे हेही तिला जाणून घ्यायचे होते. गुरू आता बरेच दूर राहत असल्यामुळे भेटी होत नव्हत्या. त्यामुळे तो मार्ग खुंटला होता.
   आम्ही भारतीय म्हणून तिने आम्हाला तिचे नाव कसे उच्चारायचे आणि त्याचा अर्थ काय ते विचारले. तिने तिचे नाव आपल्या परीने उच्चारूनही दाखविले पण आम्हालाही काही बोध होईना. 'कशमा' असा काहीसा उच्चार ती करीत होती. तोही तिला धड उच्चारता येत नव्हता. बराच वेळ विचार केल्यानंतर आम्हाला एक कल्पना सुचली. तुझ्या नावाचे स्पेलिंग करून सांगता येईल का, असे विचारताच तिने पटकन स्पेलिंग लिहून दाखविले. ते होते 'के एस एच ए एम ए'.  'क्षमा' आम्ही चटकन ओळखले. पण तिला हा शब्दच उच्चारता येत नव्हता. त्यावर उपाय म्हणून जिभेला बरीच वेडीवाकडी वळणे देत तिने प्रयत्न चालवला होता. 'क्ष' या अक्षराचा उच्चार तिला काही करता येईना. शेवटी तो नाद तिने सोडला. 'ते जाऊ द्या', पण याचा अर्थ काय? आम्ही आपल्या परीने तिला दया, क्षमा, शांती या तत्त्वत्रयींचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. हे मात्र तिला कळले. काही संकल्पनांना देशकालाचे बंधन नसते, हे या निमित्ताने जाणवले
अमेरिकेतील सेकंड हॅंड फोन मार्केट
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन,
यॅार्क,  पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
     सध्या अमेरिकेत सेकंड हॅंड फोन मार्केट खूप जोरात आहे. निरनिराळ्या मोबाईल कंपन्यांची नवनवीन माॅडेल्स बाजारात आली आहेत किंवा येत आहेत. अशा वेळी अनेक हौशी लोक आपले जुने फोन विकून टाकतात आणि नवीन मोबाईल विकत घेतात. अनेकदा हे फोन नवीन फोन सारखेच असतात. पण हौसेला मोल नसते, असे महणतात. त्यातही खिशात पैसे खुळखुळत असतील तर मुळी विचारायलाच नको. काही कंपन्या असे फोन विकत घेतात. आपल्याकडे टी व्हीवर एक जाहिरात दाखविली जात होती. एक महिला आपल्या जुन्या फ्रिजलाच कशी चिकटून असते आणि नवीन फ्रिजची माहिती कळताच कशी धपकन खाली पडते, ही जाहिरात अनेकांनी पाहिली असेल. या कंपनी सारख्या या कंपन्या असतात. त्या जुने फोन विकत घेतात.त्या एका दुसय्रा कंपनीकडे पाहणी, चाचणी आणि दुरुस्तीसाठी पाठवतात. इथे त्या मोबाईल फोनची सर्वांगीण म्हणजे अगदी नखशिखांत परीक्षा होते. ही करतांना एम आर आय काढण्यासाठी वापरतात, तशी मशीन्स असतात. यात  तळापासून वरच्या पृष्ठभागापर्यंतचे एकेक थर तपासले जाऊन खराब झालेले भाग कोणते, दुरुस्त करता येण्यासारखे भाग कोणते, चांगल्या स्थितीतील भाग कोणते अशी नोंद फिल्मसह बाहेर येते. यानुसार बदल, दुरुस्ती व घासपूस व साफसुफ करून तो फोन सेकंड हॅंड मार्केटमध्ये दाखल होण्यासाठी तयार करतात. तिसरीच कंपनी हे फोन सवलतीच्या दराने व हा फोन सेकंड हॅंड आहे, हे सांगून विकते. सध्या हा व्यापार तेजीत आहे बाजारपेठ गजबजली आहे. कारण नवनवीन कंपन्यांची आकर्षक मॅाडेल्स नवीन वैशिष्ट्यांसह बाजारात आली आहेत किंवा येत आहेत. जुनी मॅाडेल्स हजारोच्या संख्येत टाकून दिली जात आहेत.
 ॲपल ही कंपनी अतिशय चोखंदळ मानली जाते. किंचितही उणीव असेल, जसे ॲपलच्या लोगोवर( चिन्हावर) लहानसा ओरखडाही असेल तर ते ती मान्य करीत नाही. तो भाग काढून टाकण्यास सांगते. या प्रकारे तयार होणाय्रा  मालावरही त्या त्या मूळ कंपन्या लक्ष ठेवून असतात. काही कंपन्या मात्र अशा आहेत की, ज्यांचे फोन कोणतीही कंपनी दुरुस्तीसाठी स्वीकारत नाही. अशा प्रकारे नवीन युगात नवनवीन बाजारपेठा फुलताहेत.

   माझा असाही एक प्रवास
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
दूरध्वनी - (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   मानवी जीवनात योगाचे आणि योगायोगाचे अनेक प्रसंग येत असतात. पाच महिन्यांच्या दीर्घ कालखंडानंतर अमेरिकेतून भारतात मायदेशी परत येत असतांना याॅर्क ते नेवार्क हे अंतर कारने पार करीत होतो. वाटेत अभूतपूर्व पावसाने व वादळाने झोडपून काढले. मार्गात बहुदा चांगलाच मोठा अपघात झाला होता. वाहने मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. त्यामुळे प्रथम उलट दिशेने तोंड करून काही अंतर कापून वेगळी वाट धरावी लागली. पण 'वादळवाट' आमची पाठ सोडत नव्हती. रात्री ८.४५ चे विमान होते. चार तासांचा अवकाश ठेवून निघालो होतो. प्रत्यक्षात जेमतेम दोन तासच शिल्लक असतांना नेवार्कला पोचलो. केबीनमध्ये ठेवायची बॅग ४५ पाऊंडच वजन दाखवत होती. त्यामुळे हायसे वाटले. ती केबिनमध्ये टाकली. इथूनच ओम्कार, अनुषा ही नातवंडे आणि अजित हा मुलगा परत फिरले. एक बॅग व एक आधुनिक 'दप्तर' एवढेच सामान सोबत होते. सिक्युरिटी तपासणी होऊन १२३ क्रमांकाच्या गेटपाशी येऊन थांबलो. आजूबाजूला इतरांच्या बॅगांकडे बघितले तो लक्षात आले की, माझ्या बॅगांना टॅग्जच लावायची राहिली होती. ती मिळवण्यासाठी परत फिरलो. सिक्युरिटी चेक करणाऱ्या जवळ टॅग्ज नव्हती, ती कुठे मिळतील हे ते सांगू शकत नव्हते. हे आम्हाला माहित नसते, ते युनायटेड एअर लाईन्सवालेच जाणोत, असे ते म्हणत होते आणि आणखी आत प्रारंभ बिंदूकडे जाऊही देत नव्हते. शेवटी त्यातला एक म्हणाला गेटवरच विचारा. त्यांच्याजवळही टॅग्ज असतात. ते ती तुम्हाला देतील. पुन्हा गेटपाशी परत आलो. इतरांच्या बॅग्जना टॅग्ज लावलेली होती. ते ती कुरवाळण्याचे निमित्ताने पक्की धरून ठेवत होते. तेवढ्यात गेटवरची उद्घोषिका आली. तिच्यासमोर ओशाळवाणा आणि अपराधी चेहरा करून उभा राहिलो. माझी अडचण तिला समजेल अशा शब्दोच्चारासह मी तिला सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. तिला ते बहुदा त्यामुळेच कळत नव्हते. शेवटी तिला एकदाचा अर्थबोध झाला. तिने मला विचारले, तुम्हाला इथे कुणी येऊ दिले? शक्य तेवढा अपराधी व बावळट चेहरा करीत ( यासाठी मला मुद्दाम प्रयत्न करावे लागत नाहीत, असे मला ओळखणाय्रांचे प्रामाणिक मत मला माहीत होते) मी अंगठ्यानेच पाठीमागे बोटाने इशारा केला. तिने एकजळजळीत कटाक्ष त्या दिशेने टाकला. त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला. तुमच्याजवळ टॅग्ज आहेत का? , मी धैर्य एकवटून पण खरे सांगायचे तर पुरेसे धैर्य एकवटले नसतांनाच विचारले. तिने माझ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकीत म्हटले,'आय मस्ट सी दी बॅग्ज फर्स्ट. व्हेअर आर दे?' मी पुन्हा अंगठा दाखवला, अर्थात आता विरुद्ध दिशेकडे. माझ्या बावळटपणाची कमाल मला तिच्या चेहय्रावर स्पष्ट दिसत होती.  ' मे आय ब्रिंग देम हिअर?', मी तरखडकरी संकेत पाळत 'कॅन'  असा शब्दप्रयोग न करता 'मे' असा शब्दप्रयोग करीत म्हटले. आता तिच्या चेहय्रावर 'मूर्तिमंत कीव मजसमोर उभी राहिलेली' मी पहात होतो. हायसे वाटून मी शक्य तेवढ्या लगबगीने बॅग्ज घेऊन आलो आणि चेहय्रावर पुन्हा एकदा अपराधी भाव आणित उभा राहिलो. आता तिच्या चेहय्रावरील कीव दाखवणारे भाव क्षणार्धात अंतर्धान पावले होते. त्यांची जागा आता तुच्छतादर्शक भावांनी घेतली होती.
' ओ दीज स्माॅल बॅग्ज?' असे म्हणत ती म्हणाली, 'दीज नीड नाॅट हॅव टॅग्ज'. काय हा बावळटपणा, असेच बहुदा स्वत:शीच पुटपुटत ती परत फिरली. 'आत सोडतील तेव्हा गेटवर तुम्हीच असाल नं?' मी खुंटी हलवून पक्की करण्याच्या हेतूने म्हटले. तिने मागे वळून पाहण्याचे देखील कष्ट घेतले नाहीत. एक सहप्रवासी हे सर्व बघत होता. 'कशाला विचारण्याच्या भानगडीत पडलात? अशा गोष्टी दडपून न्यायच्या असतात.' मी ‘होय’ म्हणत बॅगांकडे पाहिले. त्या कुठे आणि कशा दडपता आल्या असत्या? असा प्रश्न मनात आला पण पोक्तपणाने मी तो विचार बाजूला सारला. असा पोक्तपणा हा माझा स्थायी भाव आहे. तो म्हणाला, 'मी सगळे बारकाईने पाहत होतो. तिने तुम्हाला फारच 'हे' केले असते तर मी तिचे चालू दिले नसते. ह्या काय दोन जास्तीच्या टॅग्ज माझ्या खिशात आहेत. असोत म्हणून मी त्या घेऊन ठेवल्या होत्या.' त्याने त्या टॅग्ज माझ्यासमोर लंबकाप्रमाणे हलवत म्हटले. मी त्या टॅग्ज घेतल्या नाहीत. माणसात स्वाभीमान नावाचीही गोष्ट असते, हे मला त्याला जाणवून द्यायचे होते. अशी संधी मी सहसा हातची जाऊ देत नाही.
   यथावकाश आस्मादिक आपल्या ३२ फ या जागेपाशी आले. जवळची इलेक्ट्रॅानिक उपकरणे 'स्वीच आॅफ' करायची होती. माझ्या जवळ दोन मोबाईल होते. एक जुनापाना नोकिया होता. तो मी नागपुरात वापरतो. तो तितपतच कामाचा आहे. नवीन ॲंन्ड्राॅईड आहे. तो मुख्यत: व्हाॅट्स अॅपसाठी वापरतो. आय पॅड स्वीच आॅफ करण्याची गरज नसते. तेवढ्यात घोषणा झाली विमानात 'वाय फाय' उपलब्ध करून देणार होते. पण त्यासाठी वीस डाॅलर लाणार असे वाटल्यावरून तो विचार मी बाजूला सारला. समोरच्या सीटवर एक जोडपे जुळ्या तान्हुल्यांना घेऊन बसले होते. दोन भाग केलेले एक टोपले त्यांनी समोर ठेवले होते. एकेका भागात एकेक तान्हुले पहुडले होते. या जोडप्याची विमान कर्मचाय्राशी बरीच बाचाबाची झाली होती. मी आपल्या जागेवर आलो तेव्हा विषय सामोपचाराने मिटला आहे, हे जाणवले. ही वादळानंतर प्रस्थापित झालेली शांतता  होती. 'आम्हाला माफ करा', असे कर्मचारी म्हणत असावा, असा मी तर्क केला आणि 'अहो चालायचच, माफी कसली मागता?', असे ते जोडपे आळीपाळीने आपापल्या भाषेत म्हणत असावेत, हे कळायला मला वेळ लागला नाही. माझ्या टॅग्ज न लावताच आत आणलेल्या बॅग्ज ठेवण्यासाठी वरच्या 'कपाटाची खिट्टी ' फिरवताच त्यातून डोक्यावर अनेक कोरड्या व ओल्या वस्तूंचा वर्षाव व्हायला सुरवात झाली. लहानपणी संक्रांतीला आपली अशीच लूट झाली असावी, असा विचार मनात आला. त्यावेळी बोरे, उसाचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, लिमलेटच्या गोळ्या आणि अशाच वस्तू माझ्या डोक्यावरून भूतलावर अवतरल्या असतील. 'प्रौढत्वी निज शैशवास जपण्याचा बाणा' आपला  असल्यामुळे हे असे घडले असावे, अशी समजूत करून घेत मी वरकरणी चेहरा हसरा ठेवीत होतो. पण काही वस्तूंची टोचणी व बोचणी चांगलीच जाणवत होती. पण लहानपणी सुद्धा डोक्यावर केस नसतीलच की, मग तेव्हा लहानपणी जे सहन केले असेल, त्याचा मोठेपणी आस्वाद घेण्याची संधी अनायासे मिळते आहे तर ती का सोडा, असा समजुतदारपणाचा भाव माझ्या मनात आला. ते जोडपे त्यांच्या भाषेत आपली माफी मागून दिलगिरी व्यक्त करते आहे, हे लक्षात यायला वेळ लागला नाही. मीही चक्क मराठीत, ' अहो चालायचच, त्यात काय मोठसं?', असे म्हटले. ते त्यांना कळल्याचे जाणवले. अशाप्रकारे मी आपला मराठी बाणा व्यक्त करीत आपल्याच विचारात उभा असतांना एक एअर होस्टेस समोर येऊन केव्हा उभी राहिली ते कळले नाही. तुम्हाला ह्या बॅगा जवळ घेऊन बसता येणार नाही, असे तिने बजावले. काय बोलावे चटकन न कळल्यामुळे मी फक्त वरच्या कपाटाकडे अंगुलीनिर्देश केला. काही वस्तू त्रिशंकूप्रमाणे किंवा आत रहायचं की बाहेर (डोक्यावर) पडायचं याचा निर्णय न झाल्यमुळे अधांतरी लटकत होत्या. झाली एवढी लूट खूप झाली, थोडक्यात समाधान मानावे, असा (पुन्हा एकदा) पोक्त विचार करून मी वर लटकत असलेल्या वस्तंच्या माय्राच्या टप्यापासून डोक्यावर हात फिरवीत बाजूला सरलो. 'ही छोटी बॅग तुम्ही जवळ सीटखाली ठेवू शकाल पण ही दुसरी चांगलीच मोठी आहे, एअर होस्टेस मला बजावत होती.आता दुसय्रा बॅगेने चोहोबाजूंनी अंमळ बाळसे धरले असले तरी ते बोलून दाखवण्याची (आणि तेही इंग्रजीत) काय आवश्यकता होती? मी चेहय्रावरच नापसंतीचा भाव आणला. ही बॅग तुम्हाला केबिनमध्ये ठेवावी लागेल. मी हादरलो आहे, घाबरलो आहे की गोंधळलो आहे, हे तिला कळणार नाही, असे भाव मी चेहय्रावर आणले. तिनेही भावाबद्दल घासाघीस न करता ' अहो, घाबरू नका, बॅग केबिनमध्ये ठेवण्यासाठी आम्ही तुमच्याकडून जास्तीचे पैसे मागणार नाही’, असे म्हणत माझे शंकानिरसन तर केलेच पण 'अंदरकी बात' तिच्या लक्षात आली असल्याचेही दाखवले. अर्थात हा तिचा चक्क गैरसमज होता. आपल्या अज्ञानातले सुख भोगू द्या की तिला, असा विचार करून मी तो गैरसमज तिच्या लक्षात आणून देण्याच्या भानगडीत पडलो नाही. तेवढ्यात दुसरी एक हवाई सुंदरी तिथे हरिणीच्या चपळाईने आली आणि म्हणाली, २२ नंबरच्या सीटच्या वरच्या कपाटात ही बॅग मावेल,असे मला वाटते असे तिने माझ्या (बाळसेदार) बॅगेचा अंदाज घेत म्हटले. पहिलीच्या चेहय्रावरचा अविश्वास लपत नव्हता आणि तुच्छता तर स्पष्ट दिसत होती. मी मात्र अर्थातच तिकडे कानाडोळा केला आणि काहीशा चपळाईने ती जागा हस्तगत करून मराठी पाणी दाखवले. अशाप्रकारे २२ नंबरच्या सीटवरील कपाटात बॅग ठेवून '३२ फ' नंबरच्या सीटवर आस्मादिक स्थानापन्न झाले. २२ नंबर लक्षात ठेवा, नाहीतर उतरतांना पुन्हा गोंधळ होईल. वरकरणी समजुतदारपणा दाखवीत पण मनातून खवचटपणे ती हवाई सुंदरी आपल्याशीच बोलली. पण आता या दोन्ही जागी माझी मालकी पुढच्या साडे तेरा तासांसाठी तरी नक्की झाली होती. या आनंदात असल्यामुळे मी त्याच्यावर विरजण पडू दिले नाही.

  विमानात येतायेता एक वेगळाच प्रकार घडला होता. गेटवर एका कर्मचारी महिलेने मला विचारलेहोते, तुम्हाला एक्झिट गेट जवळची जागा हवी आहे का? ती काय म्हणते आहे ते मला सुरवातीला कळलेच नाही. मी काही बोलणार एवढ्यात ती म्हणाली, तुम्ही याबाबत आत गेल्यावर ठरवणार का? मला हेही कळले नाही. पण हो म्हणून मी आत शिरलो. आमचे एक सहप्रवासी महणाले, तिने तुम्हाला विचारले. आमच्याकडे बघितले सुद्धा नाही. लोक कपड्याकडे पाहून माणसाची किंमत करतात. मी माझ्या कपड्यांकडे बघितले. मी सूट घातला होता. यामागे एक वेगळीच भूमिका होती. इकडे अमेरिकेत येताना सूट आणण्याचे ठरविले होते. पण तोच खूप जागा अडवू लागला म्हणून विचार केला की, सूट घालून का जाऊ नये? विमानातच तर बसून जायचे आहे. सूट मळण्याचा प्रश्नच नव्हता. थोडा चुरगळला असता. इस्त्री करून चालणार होते. तोच सूट परतीच्या प्रवासात अंगावर होता. म्हणून तिने मला दाराजवळची सीट जास्तीचे पैसे भरून घेता का, म्हणून विचारले होते. ही कपड्यांची कमाल होती.
   विमानात तेरा साडे तेरा तास कंटाळा न येता जावेत, म्हणून आयपॅडवर लिहीत होतो. निम्मे अंतर कापायला बराच वेळ लागला. पण पुढचे निम्मे अंतर लवकर कापले गेले, असे वाटले. सहार विमानतळ आला. छत्रपती शिवाजी टर्मिनस हा उच्चार आमच्या वैमानिकाच्या तोंडून ऐकतांना आनंद व अभिमान वाटत होता. आदल्या दिवशीच एअर इंडियाची ईमेल आली होती. देशांतर्गत उड्डाणे सुद्धा आता याच ठिकाणाहून होणार होती. आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय अशी  दोन वेगवेगळी विमानतळे आता एक होणार होती. मुहूर्त होता १ आॅक्टोबरचा. मी पहिल्या प्रवाशांपैकी एक असणार होतो. ‘नथिंग टु डिक्लेअर’च्या रांगेत सामील होण्यापूर्वी इमीग्रेशन काउंटरवरून स्टॅम्प मारून घेतला आणि देशात पुन्हा परत आल्याची नोंद सरकारदरबारी करून घेतली. रात्रीचे साडे नऊ वाजत आले होते. आपल्या मायदेशी परतल्याची बातमी इथल्या व तिथल्या अशा दोन्ही घरी व्हावी म्हणून मोबाईल स्वीच आॅन करून फोन करण्याचा प्रयत्न केला. पाहतो तर काय दोन्ही फोन रुसलेले! काय करावे काही कळेना.मुक्कामी पोचताच दोन्हीकडे कळविण्याचा शिरस्ता होता. फोन झाला नसता तर दोन्हीकडून चौकशीला सुरवात झाली असती. पण साडे नऊ नंतर लगेच दुसरी कोणतीच फ्लाईच नसल्यामुळे लगेच सामसूम झाली. सहार विमानतळाची वास्तू एखाद्या चक्रव्युव्हासारखी आहे. डोमेस्टिक फ्लाईटचा प्लॅटफाॅर्म सापडत नव्हता. लिफ्टने दोन्ही तिन्ही लेव्हल्स पालथ्या घातल्या. बाहेर जाल तर सकाळचे चार वाजेपर्यंत आत प्रवेश मिळणार नाही, हे मला द्वापालाने सांगितले होते. आतापर्यंत खूप भटकंती झालीहोती. मनात विचार आला निम्मे मुंबई नागपूर अंतर तर हेलपाट्यातच कापले गेले असेल. रात्री बारा वाजता वीस/पंचेवीस मुलांचा एक गट कुठूनतरी अवतरला. त्यांच्यापैकी एकाला फोनबद्दल विचारले. तो म्हणाला, ‘आम्ही सगळे सौदीहून परत आलो आहोत. आमचीही स्थिती तुमच्यासारखीच झाली आहे. आमचेही फोन लागत नाहीत’. तेवढ्यात कुणीतरी बोलले की, देशांतर्गत फेय्रा एच टर्मिनसवरून सुरू होणार आहेत. निश्चित माहिती तर मिळाली या आनंदात व उत्साहात होतो. यानंतर एका खुर्चीवर आसनस्थ होताहोता एकाने सांगितले की 'एच' विभागातली  ६२७ क्रमांकाच्या खिडकीवर नागपूरच्या फ्लाइटची व्यवस्था आहे. आता नेमकी माहिती मिळाली होती. चार वाजण्याची वाट पहात थांबायचे ठरवले. साडेतीनलाच जाग आली. एक फेरफटका मारण्याचे ठरवून 'एच'च्या शोधात निघालो. एका दिशेने गलबल दिसली. काही महिला ड्रेसकोड स्वरूपात हळदी रंगाची साडी आणि कुंकवी लाल रंगाचे ब्लाऊज घालून लगबगीत वावरत होत्या. पुढे गेलो तर सूटबुटातली साहेब मंडळी दिसली. तेवढ्यात एक महिला लगबगीने माझ्या दिशेने आली आणि तिने विचारले, ‘सर, कहा जाना है आपको?’.  ‘नागपूर’, असे उत्तर ऐकताच ती चक्क मराठीत म्हणाली, ‘ती काय समोरची खिडकी’. 'चार वाजता सुरवात होणार होती ना?', मी म्हटले. 'नाही, आपण येऊन बोर्डिंग पास घेऊ शकता'. मी काउंटरवर गेलो. एकजण तातडीने पुढे आला त्याने माझी मोठी बॅग वजनासाठी उचलून वजनासाठी ठेवली. '४५ किलो, ॲडिशनल पेमेंट किती द्यावे लागेल? ', मी विचारले. 'काही नाही', उत्तर ऐकताच मला आश्चर्यच वाटले. बोर्डिंग पास घेतला. डोमेस्टक फ्लाईटच्या शोधात निघालो. चक्रव्युव्हाची आठवण होत होती. प्रत्येक दिशेने वळणे घेतली.मजल्यांवर वरखाली उतरलो. सिक्युरिटी चेकसाठी उभा राहिलो.
 'बॅग टॅग्ज? ' प्रश्न ऐकला आणि डोक्यावर हात मारला. पण त्याशिवाय पर्यायच नव्हता. 'मार्गदर्शकाते वाट पुसतु' परत जाण्यावाचून पर्याय नव्हता. बॅगेसाठी दोन व शिवाय 'जवळ असोत, म्हणून' आणखी दोन टॅग्ज उचलून परत आलो. तपासणीचे सर्व सोपस्कार झाले.  ४३ नंबरच्या गेटपाशी आलो. काउंटरपाशी गेलो. अगत्याने आगतस्वागत झाले. वाट पाहण्याशिवाय आता काहीही काम शिल्लक राहिले नव्हते. म्हणून एका खुर्चात विसावलो. केव्हा डोळा लागला ते कळले नाही. एकदम गडबड गोंगाट सुरू झाला आणि झोप खाडकन उघडली.
      सुरवातीला मला अर्थबोधच होत नव्हता. मग लक्षात आले की, आपण विमानतळावर आहोत आणि आपल्या परतीच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा अजून पूर्ण व्हायचा आहे. समोर प्रवाशांची रांग दिसत होती. गेटवर कर्मचारी सज्ज झाले होते आणि आता एकेकाला आत सोडणार होते. मी ( शक्य तेवढी) चपळाई करीत आपले चंबूगवाळे गोळा केले आणि प्रवासी दप्तर खांद्यावर टाकून चालू लागलो. एक सूटबूटधारी मला न्याहाळून पाहत होता. तो मला न्याहाळत नसावा हे स्पष्ट होते. कारण तसे काहीच कारण नव्हते. म्हणून मी थबकून मागे वळून पाहिले तर मागे कुणीच नव्हते. आश्चर्ययुक्त चेहय्राने मी पुढे चालू लागलो. रांगेच्या शेवटी जाऊन उभे राहण्याचा माझा विचार होता. पण तो सूटबूटधारी आपली तुंदिलतनू सावरीत शक्यत्या चपळाईने माझ्याकडे आला.
   'धिस वे ,सर! इफ यू विल प्लिज सर!', मी थबकून उभा झालो . माझ्या बॅगचे वजन ४५ पाऊंड होते. डोमेस्टिक फ्लाईटवर ३० पाऊंड की असेच काहीतरी वजन जादा पैसे न भरता सोबत नेता येते, हे मला माहित होते. ॲडिशनल चार्जेस किती हवेत, हे मी स्वत:हून विचारले होते. आजच्या पुरता डोमेस्टिक काऊंटरवर इंटर नॅशनल फ्लाईटच्या काऊंटर वरचा कर्मचारी आला असेल, त्याने माझ्याकडून जास्तीचे पैसे मागितले नाहीत ते नाहीतच पण मी स्वत:हून जास्त पैसे भरण्याची तयारी दाखवल्यावर ५० पाऊंड का असे काहीसे वजन अतिरिक्त पैसे न भरता सोबत नेता येते , असे सांगत त्याने मलाच वेड्यात काढले होते. आता ऐनवेळी मला आडवत होते. या सर्व प्रकारात माझा काय दोष?  मी मनात 'डिफेन्स' तयार ठेवून ताठर झालो. 'व्हेअर इज युवर तिकीट सर?'. मी काहीही न बोलता पण घुश्शातच पासपोर्ट व तिकीट त्याच्यासमोर धरले. ' दी पासपोर्ट इज नोमोअर नेसेसरी सर! कीप इट इन युवर पाॅकेट सर!’ त्याने तिकीट आपल्या हातात घेतले, रांगेतून मला बाहेर काढले आणि काऊंटरपर्यंत माझ्यासोबत आला. काऊंटर फाॅईल कापून माझ्या हातात दिले. 'चेक धिस!' म्हणून तिकिटाचा उरलेला भाग त्याने कर्मचाय्राच्या हाती दिला. 'इट वाॅज नाॅट माय फाॅल्ट!'. मी उसन्या अवसानाने म्हटले. माझे तिकीट प्रकाश झरोक्यात धरून तो कर्मचारी उभा होता. आवश्यक तो ध्वनी कानी पडेना. 'सम थिंग राॅंग सर! वी विल चेक इट सर!' त्याने काहीशा रागानेच इकडे तिकडे पाहिले. टिटटाप वेषातील चार पाच कर्मचाय्रांनी काऊंटरला गराडा घातला. प्रत्येक जण मनाला येईल ती खुंटी पिरगळत होता, पण व्यर्थ! शेवटी त्यांना हवा असलेला ध्वनीसंकेत त्या मशीन मधून बाहेर पडला. गराडा घालणारे कर्मचारी विजयी मुद्रेने बाजूला सरले. 'धिस इज युवर टिकीट सर! यू आर दी फर्स्ट कस्टमर टु फ्लाय फ्राॅम मुंबई टू नागपूर बाय अवर फर्स्ट फ्लाईट सर!' त्याने इशारा केला. एअर इंडियाचे शे पन्नास कर्मचारी आपापला गणवेश परिधान करून मार्गावर दुतर्फा उभे राहून टाळ्या वाजवीत त्यांच्या पहिल्या वहिल्या प्रवाशाचे उत्साहात स्वागत करीत होते. कॅमेय्राचा 'क्लिकक्लिकाट' संपत नव्हता. शूटिंगसाठी आलेले टीव्ही युनीट एकेक पाऊल मागे घेत मागेमागे सरकत होते. तसतसे एक एक पाऊल टाकीत त्या 'जनरल मॅनेजर' सोबत आस्मादिकांची स्वारी एकेक पाऊल पुढे सरकत होती. आता आमच्या मागे हळूहळू प्रवाशांची रांग तयार होत चालली होती. आम्ही मिरवणुकीने पण आस्ते कदम पुढे सरकत होतो.
  माझ्या चेहय्रावरची गोंधळलेपणाची, बावळटपणाची, अपराधीपणाची, उसन्या अवसानाची झाक आता पार पळाली असणार होती. मी सावरलो. नेत्याच्या आविर्भावात त्या 'बड्या' मंडळींच्या अभिवादनाचा स्वीकार करू लागलो. तेवढ्यात एक कर्मचारी समोर आला. त्याने माझ्या हातात शीत पेयाचा पाव लिटरचा चौकोनी डबा कोंबला. ‘धिस इज युवर प्रेझेंट सर!’ असे म्हणत तो माझ्या मागच्या प्रवाशाकडे वळला. तिकीट, बॅग, व तो डबा धरता धरता माझी धांदल उडत होती. वळणावर एअर इंडियाचा 'महाराजा' वेगळीच भावमुद्रा धारण करून सुहास्यवदनाने माझ्या स्वागतासाठी सज्ज झाला होता.
   आज नव्याची नवलाई होती. आजपासून डोमेस्टिक फ्लाईट सुद्धा सहार वरून उड्डाण 'भरणार' होती. आकाशात या नवीन तळावरून झेप घेणारे पहिले विमान मुंबई- नागपूर मार्गावरचे होते. त्या विमानतले आम्ही सगळे पहिले प्रवासी होतो. त्यातला मी पहिला प्रवासी ठरलो होतो. आमच्या स्वागतासाठी सगळा मार्ग नव्या नवरीसारखा सजला होता. प्रत्येक स्तरावरची यंत्रणा पहिल्यानेच कार्यरत होत होती व म्हणून पहिलटकरणीच्या वेदना आणि पहिल्या अपत्यसंभवाचा आनंद एकाचवेळी अनुभवत होती. सगळ्या कार्यक्रमाला सांस्कृतिक स्पर्शासोबत 'काॅरपोरेट टच'ही होता.
    नव्या कोय्रा करकरीत विमानाच्या दारात हवाई सुंदय्रा मोजक्या हास्याने आमचे स्वागत करीत होत्या. त्यांच्या चमूची प्रमुख जातीने 'हवे नको' पहात होती. लाल गालिचावरून आम्ही पुढे सरकत होतो. मार्गाच्या दुतर्फा तीनतीन खुर्च्या होत्या. पहिल्या आणि तिसय्रा खुर्च्यांना कुंकवी लाल रंगाचे सीट कव्हर होते. मधल्या खुर्चीला काळसर पिवळा पण हळदी रंग होता. हीच रंगसंगती सुंदय्राच्या पोषाखातही होती.
   प्रारंभिक सूचना देऊन झाल्यावर, ‘आज आमच्याकडून आपणासगळ्यांना चहा नास्ता आहे बरं का, तसेच एक फाॅर्म आम्ही आपल्याला देऊ. त्यात आमच्या प्रत्येक तरतुदीला आपल्याला 'क्रम'(रेट) द्यायचा आहे. शेवटी आम्हाला आपली सेवा आणखी चांगली करता यासाठीच्या सूचना नोंदवायच्या आहेत’, आवाजात विलक्षण आर्जवी मार्दव होते.
    विसंगत अशी एकच सूचना वाटली. संकटप्रसंगी काय करायचे, विमान पाण्यात बुडू लागले तर काय करायचे, हे ऐकतांना आम्ही एकदम गंभीर झालो. पण यात चूक असे काही म्हणता यायचे नाही. टायटॅनिकच्या पहिल्याच जलप्रवासात तिला जलसमाधी मिळाली होती! वास्तवाचे भान विसरून कसे चालेल?




डचेस ऑफ डेथ’, 'क्वीन ऑफ क्राइम', 'रहस्यसम्राज्ञी' लेखिकेची रहस्य गाथा
वसंत गणेश काणे
   न्यूयाॅर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर बातमी होती. ती एकाएकी बेपत्ता झाली होती. सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिका बेपत्ता!!!  सगळ्या जगभर एक खळबळ उडाली. पोलिस खाते खडबडून जागे झाले. कसून शोध सुरू झाला. एकेक दिवस जसजसा पुढेपुढे सरकत होता तसतसे जनमानस अस्वस्थ होत होते.निरनिराळे तर्ककुतर्क समोर येत होते. वावड्या उठत होत्या. होम सेक्रेटरी रोज पोलिसात चौकशी करीत. माहिती देणाय्राला १०० पाऊंडाचे बक्षीस एका वृत्तपत्राने जाहीर केले. एक हजार पोलिस, १५ हजार स्वयंसेवक, आकाशात घिरट्या घालीत अनेक विमाने यांनी सर्व परिसर पिंजून काढला. आपण याॅर्कशाॅयरला जात आहोत, अशा आशयाची चिठ्ठी तिने आपल्या सेक्रेटरीच्या नावे लिहून ठेवली होती. काही दिवसांनी तिची कार एका ओसाड जागी आढळून आली. आतमध्ये तिचे कपडे होते. मुदत संपून गेलेले ड्रायव्हिंग लायसन्सही बाजूला पडले होते. संघर्ष किंवा झटापट झाल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. ती एकतर स्वत:हून कार टाकून गेली असावी किंवा कोणीतरी तिला धाक दाखवून कार सोडून जाण्यास भाग पाडले असावे. सगळेच मती कुंठीत करणारे होते. शेरलाॅक होम्सचा जन्मदाता सर आर्थर काॅनन डाॅईलने आपल्या संग्रही असलेला तिचा हातमोजा पोलिसांना देऊ केला. कदाचित याचा उपयोग तिचा शोध घेण्यासाठी होऊ शकेल, या कल्पनेने.
     बेपत्ता होण्याच्या संभाव्य कारणांवर चर्चा सुरू झाली. लेखन करूनकरून आपल्याला खूप थकवा आला आहे, अशी तिची तक्रार सुरू झाली होती, ती निराशेने ग्रस्त झालेली वाटायची,  तिच्या आईचे नुकतेच निधन झाले होते, नवरा बदफैली निघाला होता. यापैकी एखादे कारण असेल का? काहीच कळत नव्हते. तपास पुढे सरकत नव्हता. तीन डिसेंबरला नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले होते आणि लगेच ती बेपत्ता झाली होती. हळूहळू लोक नकारात्मक भूमिका घेऊ लागले. हा तिचा 'पब्लिसिटी स्टंट' तर नसेल ना? अप्रामाणिक नवय्रावर खुनाचा आळ यावा, म्हणून रचलेले कुभांड तर नसेल ना?
    १४ डिसेंबर १९२६ ला शेवटी तब्बल दहा दिवलांनी शोध मोहिमेला यश आले. साहित्यप्रेमींच्या गळ्यातली ताईत असलेली सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिका ॲगाथा ख्रिस्ती एकदाची सापडली. स्वान हायड्रोपॅथिक हाॅटेल - आजचे नाव स्वान हाॅटेल - मध्ये ती आढळली. हाॅटेलच्या रजिस्टरवर तिने आपले नाव नोंदवले होते, तेरेसा नील. नील हे तिच्या नवय्राच्या प्रेयसीचे आडनाव होते!  जनतेने सुटकेचा निश्वास टाकला. तमाम रसिकवर्गाचा दहा दिवस टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. पण चिंता मिटली नव्हती. ॲगाथा भ्रमिष्ट झाली होती. तिला ॲम्नेशियाचा ( विस्मरण) अटॅक आला होता. मानसोपचार तज्ञांची चमू कारणांचा शोध घेऊ लागली. पण शेवटपर्यंत नक्की निदान झाले नाही. नेहमीप्रमाणे तज्ञांमध्ये मतभेद झाले. पण हळूहळू ती 'नाॅर्मलवर' आली.
  ॲगाथा ख्रिस्तीची १२५ वी जयंती १५ सप्टेंबरला२०१५ ला जगभर साजरी झाली. १५ सप्टेंबर १८९० ला या लोकप्रिय लेखिकेचा जन्म झाला होता. तिला जाऊन आता चाळीस वर्षे होत आहेत. मरणोत्तरही ती तितकीच लोकप्रिय आहे. तिला समीक्षक अभिजात लेखिका मानतात. काही लेखक लोकप्रिय असतात. तर काही अभिजात लेखनासाठी प्रसिद्ध असतात. लोकप्रियता, अभिजातता, मरणोत्तरही लोकप्रियता आणि तीही एखाद्या लेखिकेच्या वाट्याला, असे क्वचितच आढळते.
                         
                  ॲगाथा मेरी क्लॅरिसा ख्रिस्तीला डेमहूड
      डेम ॲगाथा मेरी क्लॅरिसा ख्रिस्ती ( १५ सप्टेंबर १८९० - १२ जानेवारी १९७६) ही ब्रिटिश लेखिका गुन्ह्यावर कादंबय्रा व लघुकथा लेखिका तसेच नाट्यलेखिका म्हणून गाजली, जगभर मान्यता पावली. तिच्या एकूण सहा प्रेमकथाही आहेत पण त्या टोपणनावाने लिहिलेल्या आहेत. एकूण सहासष्ट रहस्य कादंबय्रा व १४ लघुकथा तिच्या स्वत:च्या खाती जमा आहेत. तिची स्वत:ची अशी स्वतंत्र लेखनशैली होती. सर आर्थर काॅनन डाॅईल यांचा एकच मानसपुत्र होता, शेरलॅाक होम्स. पण हिचे अनेक गुप्तहेर मानसपुत्र होते/ कन्याही होत्या. हरक्यूल पॅायरॅाट, जेन मार्पल, पारकर पाईन, हार्ले क्विन अशी नावे आजच्या एका टीव्ही मालिकेतील अस्मिताप्रमाणे घरोघरी अगदी किचनपर्यंत पोचली होती. जगातले सगळ्यात लांबलचक नाटक 'माऊस ट्रॅप' हे एक रहस्यमय कथेवर आधारित असून ते तिच्या नावावर आजही विक्रमी लांबीचे म्हणूनच आहे. या नाटकाचे आजवर २५,०००प्रयोग झाले असून अजूनही ते होतच असतात. ब्रिटिश राजसत्तेने 'डेम' ही पदवी प्रदान करून तिचा गौरव केला होता. पुरुषांचा गौरव 'नाईटहूड' प्रदान करून तर स्त्रियांचा 'डेमहूड' प्रदान करून केला जात असे. ॲगाथाचा गौरव तिच्या साहित्यक्षेत्रातील योगदानानबद्दल करण्यात आला होता ( आपल्याकडे पद्मश्री वगैरे पदव्या आहेत, तसा प्रकार). असे अनेक गौरव तिच्या खात्यावर जमा आहेत. त्यातले अनेक आजवर मोडले गेलेले नाहीत. टी व्ही, रेडिओ, व्हिडिओ गेम्स व कॅामिक्स या सर्व माध्यमांना तिची भुरळ पडली आहे. सहाशे सदस्य संख्या असलेल्या क्राईम रायटर्स असोसिएशनने तिची   'दी मर्डर आॅफ राॅजर ॲक्राॅईड' ही कादंबरी सर्वोत्तम कादंबरी म्हणून १५ सप्टेंबर २०१५ ला तिच्या १२५ व्या जयंतीच्या मुहुर्तावर घोषित केले आहे
     एका उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या ॲगाथाने पहिल्या महायुद्धात एका हॅास्पिटलमध्ये काम केले होते. हरक्यूल पॅायरॅाट हा तिचा पहिला मानसपुत्र मानला जातो. सर्वाधिक खप असलेल्या कादंबय्रा लिहिणारी कादंबरीकार म्हणून गिनीज बुकात तिची नोंद आहे. खपाच्या दृष्टीने विचार केला तर शेक्सपीअरचे साहित्य, बायबल यानंतर क्रम लागतो ॲगाथा ख्रिस्तीचा. जगातल्या एकूण १०३ भाषात तिच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. हा विक्रमही अजूनतरी कुणी मोडलेला नाही.
डेथ ऑन दि नाइल, डेथ कम्स ॲज दि एण्ड, मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस, पेल हॉर्स, मिरर क्रॅक्ड फ्रॉम साइड टु साइड, कर्टन, माउस ट्रॅप, ॲंड देन देअर वेअर नन,  विटनेस फॅार प्रॅासिक्यूशन ही नावे सुद्धा सार्थ असणार याची कल्पना वाचकांना येते आणि 'डचेस ऑफ डेथ’, 'क्वीन ऑफ क्राइम', 'रहस्यसम्राज्ञी' हे किताब तिला रसिकांनी का दिले असतील हे लक्षात येते
  अभिजाततेचा मान तिच्या लिखाणाला प्राप्त होण्यासाठी काही अंगभूत  वैशिष्ट्येही कारणीभूत झाली असावीत.


             ॲगाथा ख्रिस्तीच्या जीवनावरील चित्रपटाने उडालेला भडका
   'डेथ ऑन दि नाईलचे' कथानक नाईल नदीवरील एका जहाजावर घडते आहे. 'डेथ कम्स ॲज दि एण्डचे' कथानक ४००० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील थडग्याशी संबंधित पुजाय्राच्या जीवनाशी संबंधित आहे. 'मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस' ही एक सूडकथा आहे तर 'मिरर क्रॅक्ड फ्रॉम साइड टु साइड' ही अभिनेत्रीच्या जीवनातील निराशा चित्रित करते. कर्टन, माउस ट्रॅप, ॲंड देन देअर वेअर नन,  विटनेस फॅार प्रॅासिक्यूशन या आणि अशा सर्व साहित्यकृतीत कथानकाला साजेशीवेगवेगळीपार्श्वभूमी ॲगाथाने योजिली आहे.
         ॲगाथाने आत्मचरित्र लिहिले आहे पण त्यात तिच्या जीवनातील 'बेपत्ता प्रकरण' मात्र बेपत्ता आहे. एका चित्रपट निर्मात्याने या प्रकरणावर आधारित एक काल्पनिक चित्रपट काढला. ह्या चित्रपटातील कथेचा  वास्तवातील व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असा फलक त्यात सुरवातीलाच दाखवलेला आहे. त्यात असे दाखविले होते की, ॲगाथाने आत्महत्या करायचे ठरवून असा घाट घातला होता की, तिच्या हत्येचा आळ तिच्या नवय्राच्या प्रेयसीवर येईल. पण एका अमेरिकन वार्ताहराला या बनावाचा सुगावा लागतो आणि ऐनवेळी तो तिला थांबवतो. ही चित्रकथा पाहून ॲगाथाचे चाहते चांगलेच खवळले. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांनी संबंधितांना कोर्टात खेचले आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. पण अमेरिकन कोर्टाने हे दावे फोल ठरवले. चित्रपटात ॲगाथाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री वनेसा रेडग्रेव्हने तर नवय्राची भूमिका तिमोथी डाल्टनने सजीव केली होती.वार्ताहराची भूमिका डस्टिन हॅाफमनने वठवली होती.
    पण वस्तुस्थिती काय होती हे बाहेर यावे म्हणून शोधपत्रकारितेला घुमारे फुटण्यास एक चांगले निमित्त मिळाले. यानुसार बळकटी या कथेला मिळाली की, ॲगाथाने आपल्या नवय्राला लाजेने मान खाली घालावी लागावी, म्हणून हा सर्व डोलारा उभा केला होता. एका सिद्धहस्त रहस्यकथाकार लेखिकेने बदफैली पतीचे पितळ उघडे पाडण्यासाठी रचलेला हा एक 'सुसंस्कृत व अहिंसक डाव' होता. पण स्वत: एक अद्वितीय रहस्यकथाकार असूनही या 'बेपत्ता नाट्याचा' शेवट तिच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही. कथेने भलतेच वळण घेतले. सत्य काय होते कुणास ठावूक.
   ॲगाथाने १९२८ मध्ये नवय्रापासून घटस्फोट घेतला. मुलीचा ताबा मिळवला आणि ख्रिस्ती अडनाव कायम ठेवले. तिने आपल्यापेक्षा सोळा वर्षाने लहान आरकिआॅलाॅजिस्टशी(पुरातत्त्ववशास्त्री) विवाह केला. तिने एके ठिकाणी म्हटले आहे की, नवरा म्हणून पुरातत्त्वशास्त्री चांगला असतो. कारण त्याचा स्वभाव असा असतो की,  वास्तू जसजशी जुनी होत जाते, तसतशी ती त्याला अधिकाधिक आवडू लागते. नवीन नवय्राची इच्छा तिने दारू प्यावी अशी होती. पण मला आपले पाणीच बरे वाटते, असे ती म्हणायची. मोठ्या मुष्किलीने व आवडत नसून सुद्धा ती सिग्रेट ओढायला तयार झाली. पण एका अटीवरच. दिवसा लंचनंतर आणि रात्री डिनर नंतरच म्हणजे दिवसातून फक्त दोनदाच ती सिग्रेटीओढायची. पण जेमतेम सहा महिनेच हा प्रकार सुरू राहिला. पण तिचे पुढचे आयुष्य सुखात गेले. नवीन नवय्रामुळे तिला खूप फिरता आले. कथा गुंफतांना निरनिराळी पृष्ठभूमी निवडता आली. एकाहून एक सरस कथा रचता आल्या.
     
    ब्रिटिश गुप्तहेर एजन्सी - एम१५ हादरली
   १९४२ मध्ये ब्रिटिश गुप्तहेर एजन्सीला - एम१५ला - ॲगाथाने एक हेर आपल्या खात्यात घुसवला आहे, असा संशय आला. त्याचे असे झाले की, ॲगाथाने आपल्या एका गुप्तहेर कथेत मेजर 'ब्लेचले' नावाचे एक पात्र रंगवले होते.  इंग्लंडमध्ये  दोघे पंचमस्तंभी ( स्वदेशाविरुद्ध शत्रूला सामील असलेले) घुसलेले आहेत आणि मेजर 'ब्लेचले' त्यांच्या मागावर आहे, असे काहीसे ते कथानक होते. एम१५ हादरले कारण त्यांच्या कार्यालयाचे नाव होते 'ब्लेचले पार्क'. सांकेतिक भाषेतील गुप्तसंदेशांची फोड या ठिकाणी व्हायची. ॲगाथाने रंगवलेल्या पात्राचे नाव 'ब्लेचले' ठेवलेले पाहून ॲगाथाला काही कार्यालयीन गुपिते कळली असावीत, तिला माहिती पुरवणारे आपल्या कार्यालयात शिरकाव करण्यात यशस्वी झाले असावेत, असा संशय त्यांना आला. ॲगाथाला त्यांचा संशय फेडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तिचे चित्रण किती वास्तव वाटायचे, याचा परिचय या उदाहरणावरून यावा.
  मॅक्स मॅलोव्हनला -ॲगाथाच्या नवीन नवय्राला - याच सुमारास 'नाईटहूड' ही पदवी बहाल करण्यात आली. नवरा 'नाईट' व बायको 'डेम' असे उभयता सारख्याच पदवीने गौरवले गेले. अशी उदाहरणे खूपच विरळी आहेत. लेखिका म्हणून ख्रिस्ती पण अन्य व्यवहारात त्याचे अाडनाव लावून लेडी मॅलोवन म्हणून वावरू लागली.
    १९७५च्या नाताळमध्ये तिची ‘कर्टन’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि वाचक अतिशय अस्वस्थ व नाराज झाले. कारणही तसेच होते.  हरक्युल पाॅरो हे तिच्या मानसपुत्रांपैकी एक अतिशय  लोकप्रिय  पात्र होते. तो मरण पावल्याचे अगाथाने या कादंबरीत दाखविले होते. जनमानस हे मान्य करायला तयार नव्हते.  हरक्युल पॉरोचा मृत्यू हा एका वास्तवातील व्यक्तीचा मृत्यूप्रमाणे वाचकांच्या चर्चेचा आणि वृत्तपत्रांच्या बातमीचा विषय झाला. अशाचप्रकारे त्याच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रांनी छापली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ही निधन वार्ता पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे हरक्युल पॉरोचा फोटोही छापला. हे  काल्पनिक छायाचित्र न्यूयाॅर्क टाईम्सने मुद्दाम तयार करून घेतले होते. या धक्यातून रसिकजन सावरतात न सावरतात तोच त्यांना दुसरा एक धक्का बसला. १२ जानेवारी १९७६ रोजी खुद्द अगाथा ख्रिस्तीच मरण पावली. शेरलाॅक होम्स या आपल्या मानसपुत्राला पुनर्जीवित करण्यास  सर आर्थर काॅनन डॅाईल या लेखकाला रसिकांनी भाग पाडले कारण जन्मदाता हयात होता. पण खुद्द जन्मदात्रीच हे जग सोडून गेल्यामुळे बिचाय्रा हरक्युल पॉरोला चिरविश्रांती घेण्यावाचून पर्यायच नव्हता!



   प्लॅसिबो, नॅसिबो आणि श्रद्धा
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
 
 जादूटोणा विधेयक पारित करणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य आहे. फसवेगिरी, भोंदूपणा, लबाडणूक, अंधश्रद्धा यांना पायबंद बसलाच पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण नुसता कायदा करून प्रश्न सुटत नसतात. कायद्याची अंमलबजावणी कशी होते, हेही तेवढेच महत्त्वाचे असते. या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होईल, असा विश्वास आपण बाळगू या.
   प्लॅसिबो म्हणजे काय?
     पण या निमित्ताने दुसरीही एक बाजू समोर येते आहे. या बाबीचा अभ्यास मानसशास्त्र अनेक वर्षांपासून करीत आहे. याला ‘पलॅसिबो’असे नाव आहे. या प्रकाराची माहिती आणि महती सर्वसामान्यांना होण्याचीही आवश्यकता आहे. हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. लॅटिन भाषेतील मूळ शब्दाचा अर्थ आहे, ‘मी तुझे समाधान करीन’.( आय शॅल प्लीज यू, असे इंग्रजीत म्हणता येईल). ‘प्लॅसिबो इफेक्ट’, याचा अर्थ ‘रुग्णाला बरे वाटते’, असा करता येईल. विषय समजावा म्हणून तेवढ्यापुरतीच व्याख्या करायची झाली तर असा पदार्थ( किंवा असे काहीतरी) की ज्यात मुळात औषधी गुणधर्म नाही पण तरीही त्याच्या सेवनाने बरे होण्याची इच्छा रोग्याच्या मनात प्रबळ होते व तो खरोखरच बरा होतो. मुळात हा पदार्थ मात्र निष्क्रिय (इन ॲक्टिव्ह) असतो. पण रोग्याची समजूत, ते एक औषध आहे, अशी असते.
  असाही एक प्रयोग
    या पदार्थाची परिणामकारकता जोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आहेत. एक प्रयोग उदाहरणादाखल घेता येईल.रक्तदाबाचे पन्नास रुग्ण घेऊन त्यांचे प्रत्येकी पंचेवीसचा एक असे दोन गट केले. एका गटाला रक्तदाब कमी करणारे औषध दिले तर दुसऱ्या गटाला एक निष्क्रिय पदार्थ औषध म्हणून दिला. औषधिशास्त्रात याला खोटी/बनावट पद्धत ( शॅम प्रोसिजर) असे म्हणतात. काही दिवसांनी रुग्णांची तपासणी केल्यास, ज्यांनी खरोखरचे औषध घेतले त्यांच्या रक्तदाबात जशी सुधारणा झालेली आढळली, तशीच सुधारणा दुसऱ्या गटातील रुग्णांमध्येही झालेली आढळली. त्यांनी तर औषध घेतले नव्हते. एक साधा/निष्क्रिय पदार्थ औषध म्हणून घेतला होता. मग असे का व्हावे?  या पदार्थाचा उपयोग रुग्णाची ‘बरे होण्याची इच्छा’ बळावण्यासाठी होतो, असे मानतात. साध्या गोळ्या, साधे पाण्याचे इंजेक्शन, लुटुपुटूची शस्त्रक्रिया(शॅम सर्जरी) यांचा उपयोग करूनही रोग्याला बरे वाटते, असा अनुभव आहे. रोग्याला मात्र खरीखुरी उपाययोजना केली जाते आहे, असे सांगितले जाते. यालाच ‘प्लॅसिबो इफेक्ट’, असे म्हणतात
नैतिक की अनैतिक ?
    व्यक्तीच्या आरोग्यावर समज/आकलन (परसेप्शन) आणि मेंदूची भूमिका (ब्रेन रोल) यांचा परिणाम होत असतो, असे यावरून दिसते. मग वस्तुस्थिती काही का असेना. पण प्लेसिबोला एक उपचार पद्धती म्हणून शास्त्रज्ञांचा विरोध आहे. औषध म्हणून वापरला जाणारा पदार्थ आणि उपचार पद्धती याला ‘प्लॅसिबो’ हे एकच नाव प्रचारात आहे. प्रयोगशाळेत केलेला एक प्रयोग म्हणून याला मान्यता देता येईल. पण एक उपचार पद्धती म्हणून नैतिक दृष्ट्या याला मान्यता देता यायची नाही. कारण यात उपचारकर्ता - डॅाक्टर- व रुग्ण यांच्या संबंधात फसवणूक( डिसेप्शन) आणि अप्रामाणिकपणा (डिसआॅनेस्टी) यांना स्थान असू नये, असा आग्रह असतो, हे आहे. प्लॅसिबोचे यश रुग्णाच्या फसवले जाण्याच्या प्रमाणावर (डिग्री आॅफ पेशंट डिसेप्शन) अवलंबून असते. ते अविश्वसनीय (अनरियायेबल) व अंदाज बांधता न येणारे (अनप्रेडिक्टेबल) असते.
   पण ज्या गोष्टीमुळे रुग्णाला बरे वाटते तिचा उपयोग/वापर न करणे, ही बाबही नैतिकतेला कितपत धरून आहे? हाही प्रश्न उपस्थित होत नाही का? अर्थात उपचार पद्धतीचा एकमेव प्रकार म्हणून ही पद्धत वापरू नये, हे मात्र मान्य करावयासच हवे, यात शंका नाही.
  प्लॅसिबो - संशोधनाची एक पद्धत
    रुग्णविषयक संशोधनात मात्र प्लॅसिबोला विशेष महत्त्व आहे. वेदनाशमनाच्या बाबतीत तर प्लॅसिबोचे महत्त्व जाणवण्याइतपत महत्त्वाचे ठरले आहे. मात्र प्लॅसिबोचा परिणाम कसा आणि किती व्हावा ही बाब व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असल्याचे आढळते. तसेच रोगपरत्वेही फरक आढळून येतो. काही रोगांवर प्लॅसिबोचा परिणाम लवकर व भरपूर होतो तर इतर रोगांचे बाबतीत तसे होत नाही. प्लॅसिबोचा परिणाम प्राणिमात्रांवरही होताना आढळतो. प्लॅसिबोचा उपयोग करून शरीरात निरनिराळ्या हार्मोन्सची निर्मिती करता येते तसेच त्याचे प्रमाणही नियंत्रित करता येते.
प्लॅसिबोवर परिणामकरणारे घटक
    प्लॅसिबोचा जास्तीतजास्त परिणाम होण्यासाठी काही घटक महत्त्वाचे असतात. डाॅक्टर व पेशंट यात किती प्रमाणात भावनिक बंध, संबंध व विश्वास आहे, यावर परिणाम कमी किंवा जास्त होणे अवलंबूनअसते. मानसशास्त्रात ‘कंडिशनिंग’ नावाची एक अवस्था मानली जाते. जसे एखादा पदार्थ अमली आहे, हे जाणवून दिले, तर त्यामुळे दारूसारखी नशा चढते.पण तेच वस्तुस्थिती वेगळी होती, असे पटवून देता आले, तर ती नशा लगेच उतरते सुद्धा. प्लॅसिबोची परिणामकारकता रंग व आकार यावर सुद्धा अवलंबून असते. ऊष्ण रंगाच्या ( हाॅट कलर्ड - जसे लालभडक रंगाच्या) गोळ्या, शीत रंगाच्या ( कूल कलर्ड- जसे हिरव्या रंगाच्या) गोळ्यांपेक्षा अधिक परिणाम करणाऱ्या असतात. गोळ्यांपेक्षा कॅपशूल्सचाही परिणाम अधिक होताना दिसतो. तसेच आकाराचेही आहे. मोठ्या आकाराच्या गोळ्या अधिक परिणामकारक ठरतात.
नॅसिबो म्हणजे काय?
     प्लॅसिबोचा परिणाम सकारात्मक तसाच नकारात्मकही होतो. समज आणि अपेक्षा कशा आहेत, यावर हे अवलंबून असते. या पदार्थामुळे वाईट घडणार आहे, असा समज असला किंवा झाला तर नकारात्मक परिणामही होतात. या प्रकाराला नॅसिबो असे म्हणतात.मुळात हा शब्दही प्लॅसिबो या शब्दाप्रमाणे लॅटिन असून त्याचा अर्थ ‘मी अपाय करीन’( आय विल हार्म) असा आहे.जुन्या काळातील कथांमध्ये आपण ‘शाप’ आणि ‘वर’ या गोष्टी ऐकल्या आहेत.यांची नॅसिबो आणि प्लॅसिबोशी तुलना करण्याचा मोह आवरत नाही.
   नॅसिबो व प्लॅसिबो हा विषय अनेक ग्रंथांनाही आवरणार नाही, असा या विषयाचा आवाका मोठा आहे. पण शरीराला होणाऱ्या व्याधींवर औषधाप्रमाणे मन व बुद्धी त्या व्याधींकडे कशाप्रकारे पाहतात, यावरही व्याधी बरे होणे न होणे अवलंबून असते, हे मान्य होण्यास हरकत नसावी. ( जुने लोक ‘त्याला रोगाची भावना झाली’, असा शब्दप्रयोग करून आजारपणाचा उल्लेख करीत, असे आठवते)
श्रद्धेचे महत्त्व
   एक हलकेफुलके उदाहरण आपल्याला विचार करायला प्रवृत्त करील, असे वाटते. सचिन आणि सुप्रियाचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा विनोदी चित्रपट बहुतेकांना आठवत असेल. गणपती पुळ्याला स्वत: विवस्त्रावस्थेत न जाता एक पुतळा नेऊन नवस फेडला तरी चालेल, हे सांगणारा ‘साधू’ प्रत्यक्षात एक नट होता आणि त्याने सांगितलेला उपाय हा एक खोटेपणाचा आणि भोंदूपणाचा प्रकार होता, हे सांगितल्यावर सुप्रियाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया अंतर्मुख करायला लावणारी आहे. ती म्हणते, ‘ तो साधू भोंदू असेल,पण माझी श्रद्धा खरी आहे. म्हणून तुम्ही हा नवस फेडाच’. परिणाम होणे न होणे हे साधूच्या खरेखोटेपणापेक्षा स्वत:ची श्रद्धा  आणि विश्वास यावर अवलंबून असते, असे तिला सुचवायचे होते. दगडाला देवत्त्व प्राप्त करून देण्याची किमया भक्तालाच साध्य असते. म्हणूनच तर देव भक्तासाठी काहीही करायला तयार होत नसेल ना?


   हाॅस्पिटलवर दरोडा पडतो तेव्हा -
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
दूरध्वनी -(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन,
यॅार्क,  पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  आॅस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरातील लेडी सिलेंटो चिल्ड्रेन्स हाॅस्पिटलमधील ही घटना. दोन कुख्यात दरोडेखोर (चाचे ) आत घुसले!! सर्वत्र एकच गोंधळ उडाला. आता काय होणार या लहान लहान रुग्णांचं! पण कसलं काय अन् कसलं काय! सगळ्यांनी त्या चाच्यांना (दरोडेखोरांना) गराडा घातला! बिछान्यावर एरवी खिळून असलेली बालके अंगात कसलातरी संचार व्हावा, अशी ताडकन उठून बसली.  काहींनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले. काहींनी तर चक्क मिठ्याच मारल्या! यात मुली आघाडीवर असाव्यात ना?
  सर्व कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. त्यांनाही अतिशय आनंद झाला. कारणही तसेच होते. ते दोघे लोकप्रिय सिनेकलाकार होते, जाॅनी डेप आणि स्टीफन ग्रॅहॅम!
  त्याचे असे झाले होते की, हे दोघे 'पायरेट्स आॅफ कॅरिबियन - डेड मेन टेल नो टेल्स' च्या शूटिंगसाठी तयार झालेले असतांना त्यांच्या मनात आले की, ही बाल गोपाल मंडळी आपल्यावर एवढे प्रेम करीत असतात, आपण मात्र याची परतफेड करीत नाही. शूटिंग सुरू व्हायला थोडा वेळ होता. ते तडक निघाले. आणि हाॅस्पिटलमध्ये येऊन दाखल झाले. आणि हा बालगोपाल दुखणाइतांचा आनंद मेळा संपन्न झाला. तो जवळजवळ तीन तास सुरू होता. जे बिछान्याला खिळून होते त्यांच्याजवळ जाऊन या दोघांनी त्यांचे क्षेमकुशल चिंतले. अनेक दिवसांच्या औषधोपचाराने जे साध्य झाले नव्हते व नसते असे चैतन्य निर्माण झाले. मुलांनी आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढले, म्हणजे 'सेल्फी' काढली. दरोडेखोरांनी दरोडा घालून मिळवलेली 'लूट' आपल्या बालमित्रांबरोबर 'शेअर' केली. हा ठेवा त्यांची आयुष्यभर साथ करणार होता.
 हाॅस्पिटलच्या अधिकाय्रांना अगोदर कल्पना देऊन व ठरवून हे दोघे हेलिकाॅप्टरने छतावरच उतरले होते. या दोघा दरोडेखोरांच्या भेटीने पेशंट्स तर सुखावलेच पण , त्यांच्या पालकांनाही आपल्या मुलांच्या दुखण्याचा विसर पडला आणि सर्व कर्मचारी वर्ग सुद्धा काही तासापुरता का होईना आपली व्यावसायिक धांदल, धडपड बाजूला ठेवून या आनंदमेळाव्यात सामील झाला होता.
एका पेशंटने म्हटले आहे की,माझे आॅपरेशन झाल्यानंतर आजच मी इतकी हसले. तर दुसरीने म्हटले आहे, आता मी लवकर बरी होणार!
 दरोडेखोर म्हणाले आमच्याही वाट्याला ही या अनुभवाची वेगळीच दौलत आली आहे. प्रत्येकदा दौलत सोन्यानाण्यातच असते, असे थोडेच आहे?

ग्रॅंड डॅाग
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
 दूरध्वनी (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॅार्क,  पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
     आजवर ग्रॅंड सन, ग्रॅंड डॅाटर हे शब्द अनेकदा कानावर पडत आले आहेत. पण 'ग्रॅंड डॅाग' शब्द ऐकला आणि अर्थबोध होईना. आमचे शेजारी आपल्या मुलाकडे जायला निघाले होते. मुलगा, सून, नातू एका मोठ्या सहलीला जाणार होते. घर सांभाळण्याची जबाबदारी आजी व आजोबा यांच्यावर आली होती. एरवी घराला कुलुप लावूनही जाता आले असते पण 'ग्रॅंड डॅाग'ला सांभाळण्याचा प्रश्न होता. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा यांच्याकडे दुर्लक्ष करून चालले नसते. त्याच्या ओळखीचे कुणीतरी असेल तरच त्याने काही खाल्ले असते. सुरवातीची काही मिनिटे नीट अर्थबोध होत नव्हता. नंतर लक्षात आले की, ही खास स्वारी म्हणजे घरचा पाळीव कुत्रा होता. मुलगा आईवडलांचे विमानाचे तिकीट काढणार होता. आणखी काही खर्च येणार असेल तर तो करण्याचीही मुलाची तयारी होती. आजी व आजोबांच्या लेखी तो कुत्रा ग्रॅंड डॅाग होता.
 
     इथले हौशी लोक अशीच काळजी मांजरांचीही घेतात, म्हणून ऐकले. एका मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे. तिला मांजरींचा विलक्षण लळा आहे. नवविवाहित दाम्पत्याने ठरविले आहे की, आपल्याला मूल होऊ  देणे परवडणारे नाही. माझ्या आवडत्या मांजरींनाच तुम्ही आपले नातनातू समजा, असे आईवडलांना त्यांनी सांगितले आहे. आता त्या मार्जार कुलोत्पन्न प्राण्यांचे, खय्रा नातवंडांनाही हेवा वाटावा, असे लाड व कोडकौतुक होत असते. प्राणी पाळण्यासाठी परवाना, त्याचे निरनिराळ्या लशी टोचण्याचे वेळापत्रक आदी सोपस्कार कसोशीने पाळावे लागतात. एकदा बीचवर गेलो असतांना एक महिला कुत्र्याला फिरायला घेऊन आली होती. हातात आपल्याकडे कचरा गोळा करायला वापरतात तसे दांडा असलेले सूप होते. कुत्रा जाताजाता आपले नैसर्गिक विधी उरकीत होता. मालकीण त्याची ‘शी’ तत्परतेने गोळा करून सोबतच आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत गोळा करीत होती. थोड्या वेळाने ती कुत्र्याला सोबत घेऊन कारमध्ये बसून निघून गेली. जाताना सोबत ती पिशवीही घेऊन जायला विसरली नाही. प्राणी पाळण्याची हौस असलेले अनेक जण या देशात आहेत. त्यांचे कोडकौतुक हा हौसेचा आणि कुटुंबात व मित्रमंडळीत चर्चेचा विषय असतो. इतर देशात माणसाचा जन्माला येण्यापेक्षा इथे प्राण्याच्या जन्माला आलेले काय वाईट? पण असे काहीच प्राणी आहेत. इतर प्राणी भक्ष म्हणून पाळले व जोपासले जातात. मात्र आताशा शाकाहाराचा पुरस्कार करणारा एक संप्रदायही वाढीला लागला आहे.

       इथे काही लोक असेही आहेत की जे निरनिराळ्या वंशाची मुले दत्तक घेऊन त्यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे वाढवतात. मात्र स्वत:ला मूल होऊ देत नाहीत. वंशभेद आणि वंशद्वेशाच्या घटनाही कानावर पडत असतात. पण शहाणे व जाणते लोक याचा निषेध करण्यासाठी पुढे येत असतात.
    आमच्या ‘नगरात’ पन्नासेक घरे आहेत. ते जगातील सर्व देशातील, सर्व जाती धर्माचे, वंशाचे  लोक राहतात. यॅार्क( न्यूयॅार्क नव्हे) ही अमेरिकेची पहिली राजधानी होती. पण आज ते अमेरिकेतील तसे एक लहानसेच शहर आहे. त्यातही आमचे ‘नगर’ म्हणजे आणखीनच चिमुकले म्हटले पाहिजे. पण इथे जगाचे प्रातिनिधिक रूप बघायला मिळते. अमेरिकेत सर्व संस्कृतींचा मिलाप पहायला मिळतो. ‘ग्लोबल व्हिलेज’चे हे लघरूप आहे.


राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग - कथा, व्यथा आणि उतारा
वसंत गणेश काणे
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?

सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तीची नियुक्तीप्रक्रिया निर्धारित करण्याचे अधिकार संसदेला असल्याची भूमिका केंद्र सरकारने ३ डिसेंबरला २०१५ला गुरुवारी लोकसभेत मांडली. यापूर्वी सरकारच्या या भूमिकेशी असहमती दर्शवीत सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तीच्या नियुक्तीसाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्यासंदर्भातील केंद्राचे विधेयक रद्दबातल ठरविले होते. १६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे विधेयक रद्द केले होते. त्याचे पुनर्विलोकन करण्याचा सरकारचा विचार आहे अथवा नाही, असा प्रश्न खासदारांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना विधिमंत्री सदानंद गौडा यांनी संविधानाच्या अधीन राहून संसदेला न्यायमूर्तीची नियुक्तीप्रक्रिया ठरवता येऊ शकते, असे उत्तर दिले. तसेच, न्यायमूर्तीच्या नियुक्तीसाठी अस्तित्वात असलेल्या कॉलेजियम पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक ते बदल सरकारकडून सुचविण्यात आल्याचेही सांगितले. यासंदर्भातील विधेयक रद्द झाल्यानंतर विधिमंत्री प्रथमच या विषयावर संसदेत बोलले आहेत. राज्यसभेत संविधानावर झालेल्या चर्चेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरन्यायाधीशांव्यतिरिक्त इतर कुणालाही न्यायमूर्तीच्या नियुक्तीप्रक्रियेत सामील करून घेतले जात नसल्याबद्दल टीका केली होती.
    सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी हा निकाल दिला आहे. त्यानुसार न्यायाधीशांची नियुक्ती कोणी व कशी करावी, याबद्दल देशभरात विचारमंथन सुरू झाले आहे. हा विषय सर्वसामान्य माणसाचाही विचाराचा व चिंतेचा असल्यामुळे किंवा आता झाला असल्यामुळे या विषयाची पूर्वपीठिका त्यांच्या माहितीसाठी व त्यांना चटकन समजेल, अशा पद्धतीने मांडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. असे झाले तर सर्वसामान्य व्यक्तीही या विषयाचा तपशीलवार अभ्यास करून आपले मत बनवू शकेल, असे वाटते.  केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त केले, तर संसदेच्या सार्वभौमत्वाला बसलेला हा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे.श्री जेटली यांनी तर न्यायालयाचा निर्णय चुकीच्या तर्कावर आधारित आहे, अशी जळजळीत टीका केली आहे. पण या मुद्याच्याआधारे सर्वोच्च न्यायालयाशी संघर्ष करण्याची शासनाची भूमिका नसेल, असे शासनाच्या वतीने जाहीर झाले आहे. प्रसिद्ध कायदेपंडित व लोकसभेचे माजी सभापती श्री. सोमनाथ चॅटर्जी यांनी शासनाने न्यायव्यवस्थेशी संघर्ष करू नये, पण राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचा मुद्दाही सोडू नये, असा निदान वरकरणी तरी अर्थबोध न होणारा सल्ला दिला आहे. कायदेमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका यात समतोल असावा, हे घटनेला अभिप्रेत असलेले तत्त्वच ‘आजचे न्यायाधीशच उद्याच्या न्यायाधीशांची नेमणूक करतील’, ही काॅलेजियमची व्यवस्था मान्य केल्यामुळे बाजूला सारली गेली आहे. बुद्धिमान व चारित्र्यसंपंन्न व्यक्तींची न्यायाधीशपदी नियुक्ती होईल, ही अपेक्षा या पद्धतीमुळे साध्य झाली नाही, असा अनुभव आहे. माजी कायदामंत्री व कायदेतज्ञ शांतिभूषण यांनी तर अतिशय कठोर शब्दात या पद्धतीवर टीका केली आहे. मर्जीतील न्यायाधीशांची निवड, निवड करतांना मनमानी, न्यायाधीशांचेच आपापसातील वाद यांचे ग्रहण या पद्धतीला लागले आहे. क्वचितच न्याय देणारा सरन्यायाधीश झाला, हुशार व गुणवंत जिल्हा न्यायाधीशांची निवड तर क्वचितच होते,असे मत माजी सरन्यायाधीश बालकृष्णन यांनी व्यक्त केले आहे. ख्यातनाम वकील नरीमन, माजी कायदा मंत्री भारद्वाज, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस एस सोधी यांनी जाहीररीत्या टीका केली आहे. सर विन्स्टन चर्चिल यांच्या मते बुद्धिमान व चारित्र्यसंपन्न व्यक्तींना न्यायाधीश व्हावेसे वाटले नाही तर समाजाची फार मोठी हानी होईल, असे म्हटले आहे.
 घटनेतील 'ती' दोन कलमे
       राज्यघटनेतील १२४(२) व २१७(१) ही कलमे न्यायाधीशांच्या नेमणुका कशा व्हाव्यात, याबद्दलची आहेत. न्यायसंस्थेशी विचारविनीमय करूनच न्यायाधीशांच्या नेमणुका व्हाव्यात, अशी तरतूद यात असली तरी नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार राष्ट्रपतीकडे असल्यामुळे न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबतचा निर्णय प्रत्यक्षात कार्यपालिकेकडेच होता. कारण कार्यपालिकेची (केंद्रीय मंत्रिमंडळाची) शिफारस पाळण्याचे बंधन राष्ट्रपतींवर आहे. पुन्हा एकदा विचार करा, असे राष्ट्रपती म्हणू शकतात, पण असा विचार करून तीच शिफारस पुन्हा केल्यास राष्ट्रपतींना मान्यतानिदर्शक स्वाक्षरी करावीच लागते. ( अशी स्वाक्षरी करण्यास किती वेळ घ्यावा, याबद्दल उल्लेख नसल्यामुळे  अनेक राष्ट्रपतींनी त्यांना हवा तेवढा किंवा भरपूर वेळ घेतल्याची उदाहरणेही आहेत) पण याचा आधार घेऊन सरकार अनेकदा आपल्याला हवे तसे न्यायमूर्ती नेमू लागले. म्हणजेच याचा परिणाम प्रतिबद्ध/वचनबद्ध (कमीटेड) न्यायव्यवस्था निर्माण होण्यात झाला. श्रीमती इंदिरा गांधींच्या काळात तर हा विषय पराकोटीला गेला होता असे म्हटले जाते. न्यायसंस्थेला विचारात घेणे म्हणजे तिची संमती असणे/घेणे असा होत नाही, असे उघडउघड बोलले जाऊ लागले. १९५० साली आपण जी राज्यघटना स्वीकारली तिच्यातील तरतुदींचा हा परिणाम होता.
             घटनेचा गाभा व मूळ चौकट निश्चित झाली.
    २७ फेब्रुवारी  १९६७ ला गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता.  नंतर २४ एप्रिल १९७३ ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार प्रकरणीही असाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. राज्यघटनेचा गाभा कोणता व चौकट कोणती, हे सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच स्पष्ट केले. या संज्ञा व संकल्पनाही तेव्हापासूनच उल्लेखिल्या जाऊ लागल्या. यांना बाधा आणणारे कायदे संसदेला करता येणार नाहीत, असे स्पष्ट झाले.
         आणीबाणीतील घटना दुरुस्त्या
   १९७५ साली अलाहाबाद हायकोर्टाने श्रीमती इंदिरा गांधी यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असा ठपका ठेवून त्यांची निवडणूक जोव्हा अवैध ठरवली तेव्हा त्यांनी आणीबाणी लागू केली व ३९ वी घटना दुरुस्ती पारित केली  यानुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने केली व अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णयच रद्दबातल ठरवला. ४१ व्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्याविरुद्ध फौजदारी खटले भरता येणार नाहीत, अशीही तरतूद केली. ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे नागरिकांच्या देशाबद्दलच्या मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यात आला. याचा व्यवहारात अर्थ असा झाला की, कर्तव्यपालन केले नाही, ही सबब पुढे करून कोणत्याही नागरिकाला अटक करण्याचे अनिर्बंध अधिकार सरकारला मिळाले. पुढे जनता सरकार आले त्याने ४४ वी घटना दरुस्ती करून या सर्व तरतुदी रद्द केल्या व  यानुसार घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का लागेल, असे कोणतेही बदल करण्यास संसदेला प्रतिबंध करण्यात आला व आजतागायत ते चालू आहे.
आणीबाणीनंतरचे इंदिराशासन
      इंदिरा गांधी १९८० साली पुन्हा सत्तेवर आल्या. त्यांनीही ४४ वी घटना दुरुस्ती अमान्य केली नाही. परंतु १९८० पासून सुरू झालेल्या त्यांच्या कारकीर्दीत न्यायाधीशांच्या बदल्यांची अनेक प्रकरणे उच्च न्यायालयांनीच सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविली तेव्हा नियुक्त्या आणि बदल्यांचा अधिकार कोणाचा, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायाधीशांच्या घटनापीठाला घ्यावा लागला. न्या. पी. एन. भगवती यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या खंडपीठाने  निकाल देतांना ‘घटना कशी आहे' हे पाहिले. या नियुक्त्यांमध्ये सरन्यायाधीशांच्या म्हणण्यास महत्त्व आहेच परंतु ते निर्विवाद नव्हे, असा या निकालपत्राचा आशय आहे.  याचा अर्थ असा होतो की, न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये राज्यपाल अथवा राष्ट्रपती यांना देखील घटनेने अधिकार दिलेले आहेत. हा फक्त सरन्यायाधीशांचा किंवा न्यायसंस्थेचा अधिकार नाही. अंतिम अधिकार राष्ट्रपतींना आहे.
       ही व्यवस्था १९९३ पर्यंत अबाधितपणे सुरू राहिली. ही बारा वर्षे प्रशासनाचा नियुक्ती व बदल्यांच्या संदर्भातला अंतिम अधिकार मान्य करीत न्यायसंस्थेचे काम सुरू होते. १९५० पासून अधूनमधून व १९८० नंतर काहीशा जास्त प्रमाणात न्यायाधीशांच्या नियुक्त्या व बदल्या योग्य पद्धतीने होत नाहीत, न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप व बांधिलकी विचारात घेतली जाते, अशी तक्रार समोर येऊ लागली. हा आक्षेप पूर्णपणे चूक होता, असे म्हणता येणार नाही. सेवाज्येष्ठता आणि धवल कारकीर्द या दोन निकषांवर न्यायाधीशांची  नियुक्ती होणे, घटनेला अपेक्षित आहे, यात शंका नाही. हे घडेल, असे घटनाकारांनी गृहीत धरले होते. पण नेहमी तसेच घडत होते, असे म्हणता येत नाही. बहुदा म्हणून व समोर असलेल्या प्रकरणांचा विचार करून, सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती जगदीशशरण वर्मा यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यांचे एक खंडपीठ नेमले. या खंडपीठाने  न्यायाधीश नियुक्त्यांमध्ये सरन्यायाधीशांनाच महत्त्व असायला हवे, असे नमूद केले. निर्णय एकाच व्यक्तीने घेणे योग्य होणार नाही (बहुदा) म्हणून नेहमी दोन अन्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानेच सरन्यायाधीशांनी नियुक्त्यांचे वा बदल्यांचे निर्णय घ्यावेत, असे नमूद करण्यास न्या. वर्मा  विसरले नाहीत. परंतु दोघांच्या सल्ल्यानेच निर्णय व्हावा ही अपेक्षा पूर्ण होईना. म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने जुलै १९९८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याकरवी सरन्यायाधीशांकडे याबाबत एक प्रस्ताव पाठविला. यात न्यायिक नियुक्त्यांबद्दल आणखी स्पष्टता असण्याची आवश्कता अधोरेखित करून सर्वोच्च न्यायालयानेच ही स्पष्टता कशी आणता येईल, ते सुचवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्रुटी आम्ही नमूद केली आहे, ती कशी दूर करायची ते तुमचे तुम्हीच सुचवा, हे सुचवतांना अटलजींच्या सरकारने सौजन्याची सीमा न ओलांडता नेमकेपणाही साधला होता. या सूचनेवर ऑक्टोबर १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयातील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने जो निर्णय दिला, त्यात ‘कॉलेजियम’ अथवा न्यायाधीशवृंदांच्या सूचनेनुसार न्यायिक नियुक्त्या वा बढत्या व्हाव्यात, असे नमूद केले. काॅलेजियममधील चार ज्येष्ठ न्यायाधीश अधिक सरन्यायाधीश अशा पाच जणांनी मिळून नियुक्त्या करण्याची पद्धती निश्चित केली.
                                'काॅलेजियम सिस्टिम आॅफ अपाॅइंटमेंट आॅफ जजेस'
        अशाप्रकारे 'काॅलेजियम सिस्टिम आॅफ अपाॅइंटमेंट आॅफ जजेस' या पद्धतीचा उगम 'थ्री जजेस केस' मध्ये आहे. यापैकी पहिले प्रकरण एस पी गुप्ता यांनी १९८१ साली यांनी दाखल केले होते तर दुसरे प्रकरण १९९३ साली न्यायमूर्ती जगदीशशरण वर्मा (जे एस वर्मा) यांच्यासमोर दाखल झाले होते आणि तिसरे १९९८ साली त्यावेळचे राष्ट्रपती आर के नारायणन यांनी न्यायालयाचे मत रेफरन्स द्वारे जाणून घेण्यासाठीचे  होते. न्यायालयांचे स्वातंत्र्य म्हणजे काय? हा मुद्दा या तीन प्रकरणांच्या निमित्ताने निकालात निघाला. राज्याच्या कोणत्याही शाखेला म्हणजे कार्यपालिका (एक्झिक्युटिव्ह - शासन) व विधिपालिका ( लेजिस्लेटिव्ह- कायदे मंडळ) यांना न्यायाधीशांच्या नियुक्तीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार असणार नाही, असे या निर्णयाचे सार होते, असे म्हणता येईल. म्हणून न्यायाधीशांच्या नियुक्त्या कशा व्हाव्यात, याबद्दलची पद्धती स्वत: न्यायालयांनीत निर्माण केली. तीच ही  'काॅलेजियम सिस्टिम आॅफ अपाॅइंटमेंट आॅफ जजेस' होय. १९९३ साली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जे एस वर्मा यांनी  न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणात बदल व्हावा असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयीन नेमणुका करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार ( प्रायमसी) न्यायालयांनाच आहे, अशी परिणिती या निर्णयामुळे पुढे निर्माण झाली. पुढे १९९८ मध्ये याचाच परिणाम म्हणून काॅलेजियमची पद्धती विकसित झाली. यानुसार सरन्यायाधीश व चार वरिष्ठ न्यायाधीशच सर्वोच्च न्यायालयातील व उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या करतील, अशी तरतूद निर्माण झाली. 'न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची नियुक्ती करायची', असे थोडक्यात या पद्धतीचे वर्णन करता येईल.  २०१३ मध्ये श्री सूरज इंडिया ट्रस्टच्या विद्यमाने या निर्णयाला आव्हान दिले गेले. तेव्हा त्यांना हा प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही (लोकस स्टॅंडी) हे निमित्त सांगून ही केस फेटाळण्यात आली.
                                      काॅलेजियमला घटनेत आधार नाही.
   या काॅलेजियम पद्धतीबाबत भारताच्या राज्यघटनेत किंवा वेळोवेळी पारित झालेल्या घटना दुरुस्त्यांमध्ये उल्लेख नाही. या पद्धतीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती (काॅलेजियम) तयार करण्यात आली.  सरन्यायाधीश, संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व आणखी दोन ज्येष्ठ न्यायाधीश यांची ही समिती सखोल  अभ्यास करून माहिती  मिळवील, योग्य उमेदवारांची निवड करील व त्यांच्या नेमणुकीसाठी शिफारस करील, असा निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांची समिती या नावांची छाननी करील. या समितीचे अध्यक्षही सरन्यायाधीशच असतील. उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती देण्यासाठी शोध घेण्याचे तसेच न्यायाधीशांच्या बदल्या करण्याचा अधिकारही या समितीला असतील, असे या काॅलेजियमचे स्वरूप होते, कार्यकक्षा होती  व अधिकार होते.
        काॅलेजियम वरील आक्षेप
        ही पद्धती १९९८ पासून २०१४ पर्यंत कार्यान्वित होती. संसद, कार्यकारी मंडळ व व न्यायव्यवस्था यात सत्तासंतुलन असले पाहिजे. या काळात काॅलेजियममुळे या मूलभूत विषयाला बाधा पोचते, अशा स्वरुपाचे आक्षेप अनेक संस्थांनी नोंदवले. यात १. घटनात्मक पुनर्विचार समितीचे अध्यक्ष न्या व्यंकटचलय्या  २. केंद्रीय विधी आयोग  ३. प्रसासकीय सुधारणा आयोग   ४. संसदीय स्थायी समिती अशा या चार महत्त्वाच्या संस्था आहेत. ५. न्यायमूर्ती जे एस वर्मा यांनीही आपल्याला ही व्यवस्था अभिप्रेत नव्हती, असे नमूद केले. आपल्या निकालाचा गैरअर्थ लावला हे स्वत: वर्मांनीच म्हटले आहे. ६. गेली दोन दशके काॅलेजियम पद्धती कार्यवाहित आहे. पण या काळात झालेल्या नियुक्त्याही वादग्रस्त ठरल्या आहेत. न्या दिनकर यांच्या नियुक्तीचे उदाहरण तर डोळ्यात अंजन घालणारे आहे. या वादग्रस्त नियुक्तीचा उल्लेख निर्णय देणाऱ्या पाच न्यायमूर्तीपैकी एक न्यायमूर्ती श्री. चेलमेश्वरच करीत आहेत, हेही लक्षात घ्यावयास हवे. ७. कधीकधी तर नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाच्या शिफारसी सुद्धा काॅलेजियमने फेटाळल्या, म्हणजे न्यायमूर्तींची एक चमू दुसऱ्या चमूच्या शिफारसी नाकारत होती. याचा कोणताही अर्थ लावला, किंवा संभाव्य असे सर्व अर्थ लावले तरी त्यावरून काय समोर येईल? हा एक चिंतेचा व चिंतनाचा विचार नक्कीच आहे.
                                   व्यंकटचलैय्या कमीशनची स्थापना
    २००२ साली एन डि ए सरकारने व्यंकटचलैया कमीशन नेमले. त्याने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग नेमण्याची शिफारस केली. मनमोहनसिंग सरकारने यादृष्टीने  बदल करण्याचा व राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्याचा विचार केला होता. पण पुरेसे संख्याबळ हाती नव्हते म्हणून म्हणा किंवा हे सरकार निर्णय घेणारे सरकार असण्यापेक्षा निर्णय न घेणारे सरकार होते म्हणून म्हणा, न्यायाधीशांच्या नियुक्तीची काॅलेजियम पद्धती कायम राहिली. पण २०१४ सालात मोदी सरकारने पारित केलेल्या व निम्या राज्यांच्या विधानसभांनीही पारित केलेल्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याची मूळ कल्पना मनमोहनसिंग सरकारची होती, ही नोंद महत्त्वाची ठरणार आहे. तसेच आज जे सत्तेवर आहेत, त्यांच्या हाती मात्र  ह्या कायद्यानुसार नेमणूक करण्याची  तरतूद नसावी, ही या पक्षाची भूमिकाही लक्षात घ्यावी लागणार आहे.
      राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग
   २०१४ सालच्या मे महिन्यात सत्तेत येताच मोदी सरकारने संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात हे घटना विधेयक 'तात्काळ' मंजूर करवून घेतले. त्याला लोकसभेतील शंभर टक्के आणि एकट्या श्री राम जेठमलानी यांचा अपवाद वगळता राज्यसभेच्या ९९ टक्के सदस्यांचे आणि देशातील २६ प्रमुख राजकीय पक्षांचे समर्थनही मिळविले.
    राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगात सहा सदस्यांच्या समावेश होता.  १.सरन्यायाधीश  २. सर्वोच्च न्यायालयाचे दोन ज्येष्ठ न्यायमूर्ती, ३. केंद्रीय विधी व न्यायमंत्री,  ४. समाजातील दोन 'महनीय/नामवंत'( एमिनंट पर्सन्स) सदस्य. या दोन 'महनीय/नामवंत सदस्यांची निवड तीन सदस्यांची समिती करणार होती. या त्रिसदस्य समितीत अध्यक्षस्थानी पंतप्रधान व सदस्य म्हणून  सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता(सर्वामोठ्या विरोधी पक्षाचा नेता) असणार होता या तीन सदस्यांच्या या समितीत सरन्यायाधीशांचा समावेश असला तरी त्यांचे मत निर्णायक नव्हते, पण सरन्यायाधीश दोन 'नामवंतां'च्या निवडप्रक्रियेत सहभागी होणार होते.  सहा सदस्यांच्या निवड समितीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व दोन ज्येष्ठ न्यायमूर्तीं असे तिघे असणार होते. तसेच विधी व न्यायमंत्री आणि दोन 'नामवंत' असे तिघे 'अन्य सदस्य' असणार होते.
   न्यायिक आयोगाच्या स्थापनेसाठी झालेली ९९ वी घटनादुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार नाही,  हा विषय त्यांच्या क्षमतेच्या पलीकडचा आहे, असे घटनापीठाचे म्हणणे आहे. ही घटना दुरुस्ती मान्य केल्यास न्यायपालिका स्वातंत्र्य गमावून बसेल आणि संसद तसेच कार्यपालिकेचा न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप होईल, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
                             महनीय/नामवंत सदस्यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह
   दोन महनीय/नामवंत सदस्यांच्या निवडीचा मुद्दा न्यायपालिकेला राजकीय हस्तक्षेप वाटला असावा. या महनीय व्यक्ती तमीलनाडूमधील एखाद्या ॲडव्होकेटची क्षमता( ॲबिलिटी ) व प्रतिबद्धता( इंटेग्रिटी) याबद्दल खात्री कशी काय देऊ शकतील, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला व एखादे नाव सांगा, असे म्हटले. यावर शासनाच्यावतीने श्री रोहतगी यांनी श्री. स्वामीनाथन यांच्या नावाचा दाखला दिला. काॅलेजियमने गुणवत्तेचा निकष पाळला नाही. काॅलेजयमने सुमार योग्यतेच्या व्यक्तींची नेमणूक केली, असे रोहतगी म्हणाले. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कोणतीही पद्धत स्वीकारली तरी चुका या होणारच. त्या किती गंभीर आहेत, हा खरा प्रश्न आहे. नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाच्या शिफारसी सुद्धा काॅलेजियमने फेटाळल्या, म्हणजे न्यायमूर्तींची एक चमू दुसऱ्या चमूच्या शिफारसी नाकारते, याचा अर्थ काय लावायचा? वरकरणी ही न्यायपालिका आणि संसदेतील राजकीय वर्ग यांच्यातील रस्सीखेच वाटते खरी पण अप्रत्यक्षपणे यात पंतप्रधान व विरोधी पक्षनेता हे दोघेही येतात. जो पंतप्रधान मंत्रिमंडळ, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांची निवड करू शकतो. खुद्द राष्ट्रपतींच्या निवडीतही सहभागी होऊ शकतो, तो व विरोधी पक्षनेता हे दोघे दोन नामवंत सदस्यांच्या निवडीत  सरन्यायाधीशांच्या सोबत सहभागी का नसावेत?
      न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यांच्या घटनापीठात न्या. जे. चेलमेश्वर, न्या. मदन लोकूर, न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. आदर्शकुमार गोयल यांचा समावेश होता. न्या. चेलमेश्वर यांनी न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याची बाजू  उचलून धरली तर उरलेलेल्या चौघांनी कॉलेजियम प्रणाली योग्य ठरवली. कॉलेजियम प्रणालीमध्ये निवडकर्त्या न्यायमूर्तींवर उत्तरदायित्व नसते असे सांगत न्यायमूर्ती दिनकर यांच्या वादग्रस्त निवडीवर बोट ठेवण्यासही न्या चेलमेश्वर विसरले नाहीत. हायकोर्टाकडून पाठविलेली नावे कॉलेजियममध्ये फेटाळली जातात, याचाही उल्लेख त्यांनी केला आहे.  तसेच याची गेल्या दोन दशकांतील काही उदाहरणेही त्यांनी नमूद केली. पण काॅलेजियमच्या विरोधात निर्णय मात्र दिला नाही.
                                   देशोदेशीच्या पद्धती
  न्यायाधीशांच्या निवडीबाबत  निरनिराळ्या देशातील पद्धतींचा अभ्यासही उपयोगी ठरण्यासारखा आहे.
१. इंग्लंड- सरन्यायाधीश, उपसरन्यायाधीश व इंग्लंड, स्काॅटलंड व उत्तर आयर्लंड मधून न्यायिक नियुक्ती आयोगाने नेमलेला प्रत्येकी एक सदस्य अशा पाच जणाची चमूला नियुक्तीचे अधिकार आहेत.
२.अमेरिका - अध्यक्ष नेमणुकी करतो व सिनेट त्यांची पुष्टी (कनफर्म) करते.
३. कॅनडा - गव्हर्नर काऊन्सिल नावे सुचवते व सत्ताधारी व विरोधी पक्षाचे मिळून एकूण पाच खासदार त्यांची फेरतपासणी(रिव्ह्यू) करून तीन नावे पंतप्रधानाला सुचवतात.
४. जर्मनी - अर्धी नावे कार्यपालिका (एक्झिक्यूटिव्ह) निवडते व उरलेली अर्धी कायदेमंडळ (लेजिस्लेटिव्ह) निवडते.
५. फ्रान्स - न्यायिक उच्च मंडळ ( हायर काऊंसिल आॅफ मॅजिस्ट्रसी) नावे सुचविते. अध्यक्ष यातून निवड करतो.
  प्रत्येक देशाच्या पद्धतीत तपशीलात थोडाफार फरक असला तरी लोकप्रतिनिधींना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना कोणत्याही देशात वगळलेले नाही, हे स्पष्ट होईल.
     जेव्हाजेव्हा निवडणुकीनंतर सरकार बदलते, तेव्हातेव्हा प्लॅनिंग कमीशनचे सदस्य, राजपाल बदलले जातात. काहींची कारकीर्द संपायला एकदोन महिनेच राहिलेले असतात तर काहींची नियुक्ती होऊन एक दोन महिनेच झालेले असतात. न्यायाधीशांच्या बाबतीतही असेच होणार नाही, याचा काय भरवसा? असे झाले तर शासनधार्जिणी न्यायव्यवस्था निर्माण होईल. त्यातून साठ टक्के दावे सरकार विरुद्धच असतात, अन्य देशातील नागरिकांप्रमाणे भारतीय नागरिक प्रगल्भ व परिपक्व नाहीत. तिथे न्यायाधीश जनतेसमोर आपल्या गुणवत्तेबाबत माहिती देत असतात. अशा स्थितीत न्यायसंस्थेत शासनाचा हस्तक्षेप योग्य ठरणार नाही.
   सरकार चुकले तर कोर्टाचे दरवाजे ठोठावता येतात पण न्यायाधीश चुकले तर का?  अपील करता येते पण सर्वोच्च न्यायालयच चुकले तर काय? यावर फेरविचार याचिकेचा मार्ग उपलब्ध आहे, असे न्यायालयाने सांगितले.
       हे घटनापीठ सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यांचेच होते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या पाहता हे घटनापीठ तसे आकाराने लहानच होते. मोठ्या पीठाकडे हा विषय सुपूर्द करण्यास या पीठाने नकार दिला. ३ नोव्हेंबरला काॅलेजियममध्ये कोणत्या सुधारणा कराव्यात, ते सुचवा, एवढाच विषय या पीठाने समोर ठेवला आहे. राजकारण्यांनी अशी भूमिका घेतली असती तर आश्चर्य वाटले नसते.पण सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यांचे घटनापीठ जेव्हा असा निर्णय घेते, तेव्हा त्यांनी सखोल विचार करूनच असा निर्णय केला असणार असेच गृहीत धरणे भाग आहे. यथावकाश तो विचार आपल्यापर्यंत पोचेलच, अशी अपेक्षा बाळगून तोपर्यंत थांबणेच सध्यातरी आपल्या हाती आहे.
      १.पारदर्शकता निर्माण होईल, अशी व्यवस्था करणे, २. तक्रार निवारण यंत्रणा उभी करणे, ३. पात्रतेचे निकष ठरविणे, ४.सचिवालय निर्माण करून एक स्थायी व्यवस्था उभारणे अशा अनेक सूचना न्यायमूर्ती जे एस खेहर यांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यांच्या खंडपीठासमोर दिनांक ३ नोव्हेंबरला करण्यात आल्या आहेत.
   आता  ‘भावी न्यायाधीशांच्या नियुक्त्या विद्यमान न्यायाधीशच करतील’, हा मुद्दा वगळून जनतेनेही काॅलेजियम पद्धती निर्दोष कशी होईल, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जनतेकडून बार व असोसिएशन कडून वर नमूद केलेल्या चार मुद्यांबाबत सूचना मागवल्या आहेत.
      राष्ट्रपतींनी कलम 143 खाली सर्वोच्च न्यायालयाचाच सल्ला मागावा, हा एक मार्ग असू शकेल. राष्ट्रीय न्यायिक आयोगात सदस्य या नात्याने कायदा मंत्र्यांच्या ऐवजी  निःपक्षपातीपणा अपेक्षित असलेले सभापती किंवा उपराष्ट्रपती किंवा असे कुणी नेमावेत काय? दोन महनीय/नामवंत/ख्यातनाम व्यक्तींऐवजी दोन निष्णात कायदेपंडित आयोगावर आणल्यास उत्तम न्यायाधीशांची निवड करता येईल का? कॉलेजियम पद्धतीवर अपारदर्शकतेचा आरोप केला जातो. त्याचप्रमाणे पक्षपातीपणाचाही आरोप केला जातो. यात काय सुधारणा करता येईल, हे सर्वोच्च न्यायालयालाच विचारावे. कुणालाही निरंकुश सत्ता मिळू नये, हे मात्र महत्त्वाचे आहे. कारण सत्ता भ्रष्टाचाराला जन्म देते आणि निरंकुश सत्ता तर भ्रष्टाचारालाच जन्म देते. सर्वोच्च न्यायालयाला हे सांगण्याची आवश्यकता नाही/नसावी. पण आपली सत्ता सोडण्यास कुणीही सहसा तयार नसते. न्यायखाते तरी याला अपववाद ठरेल, अशी आशा, अपेक्षा आणि प्रार्थना करण्याशिवाय बापुड्या जनसामान्याच्या हाती दुसरे आहे तरी काय?





 
 


 

हार्ड पाॅवरला स्मार्ट (साॅफ्ट) पाॅवरचा पर्याय किती संभवनीय?
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॅार्क,
पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

          जोसेफ नाय हा एक ज्येष्ठ अमेरिकन राजकीय विचारवंत मानला जातो. आंतरराष्ट्रीय संबंध आणि नवउदारमताचा प्रणेता आणि पुरस्करता म्हणून तो जगातील मोजक्या बुद्धिमंतांपैकी एक मानला जातो. त्याने व राॅबर्ट कीहेन या  बुद्धिमंतासोबत/ सहकाय्रासोबत 'सत्ता आणि स्वातंत्र्य ( पाॅवर ॲंड इनडिपेंडन्स )' हा ग्रंथ लिहून एक राजकीय सिद्धांत मांडला आहे. 'स्मार्ट पाॅवर' किंवा 'चतुर शक्ती' या नावाने हा सिद्धांत ओळखला जायचा. सध्या जोसेफ नाय फेसबुकवर उपलब्ध असतो. पण कितीतरी अगोदरपासूनच अमेरिकेचे माजी अध्यक्ष जाॅन एफ केनडी आणि बिल क्लिंटन यांच्या विचारांवर याच्या मताचा पगडा होता, असे मानतात. भारताच्या राजकारणाच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला असता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे स्वतंत्रपणे पण याच विचाराला अनुसरून आहेत, हे जाणवते. पण खरे तर हा भारतीय राजनीतीचा प्राचीन वारसा आहे, हे लक्षात येते. नव्हे हा राजनीतीचा नव्हे तर नीतीचा वारसा आहे आणि तो मवाळ शक्तीच्या संकल्पनेच्या तुलनेत चांगलाच संपन्न आहे हे लक्षात येईल. जोसेफ नाय याने तो संक्षिप्त रूपात किंवा अपूर्ण रूपात नव्याने मांडला, असे फारतर मानता येईल. भारतीय संस्कृती जगभर पसरली ती तरवारीच्या जोरावर नव्हे तर आणखी कशाच्या तरी जोरावर. जोसेफचा सिद्धांत या नीतीचा मागोवा घेत आहे, पाऊलखुणा शोधत पुढे जातो आहे असे म्हणता येईल.
                                                'इज दी अमेरिकन सेंच्युरी ओव्हर?'
        अमेरिकेची सध्याची परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल ज्यो (जोसेफ) नायने दाखविलेल्या मार्गाने चालू आहे, असे मानले व म्हटले जाते. २०१४ साली ज्यो नायला अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरण मंडळात सन्मानपूर्वक समाविष्ट करून अमेरिकेने त्याच्या मताचे अनुसरण करण्याचे ठरविले आहे, असे मानतात. तो संरक्षणविषयक धोरण समितीचाही सदस्य आहे. 'इज दी अमेरिकन सेंच्युरी ओव्हर?'( अमेरिकेचे शतक संपले आहे काय?) या शीर्षकानुसार त्याने नुकताच एक ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला आणि उच्चस्तरावर चर्वितचर्वण सुरू झाले. तसे नायचे आणखी डझनभर ग्रंथही विचारप्रवर्तक मानले जातात.
                                                       अमेरिकेने वेगळा पर्याय स्वीकारावा
          आता 'स्मार्ट पाॅवर' ऐवजी 'साॅफ्ट पाॅवर' असा शब्दप्रयोग प्रचलित असून चतुर शक्तीची जागा मवाळ शक्तीने घेतली आहे. हा शब्दप्रयोग नायने प्रथम १९८० साली केला असला तरी प्रत्यक्षात तो १९९० सालपासून प्रतिष्ठा पावला आहे. परराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेने आजवर कधीही मवाळ सत्ता वापरली नव्हती. क्यूबा, व्हिएटनाम, इराक विषयक धोरण ठरवितांना मवाळपणाऐवजी मस्तवालपणाचाच आधार अमेरिकेने घेतला आहे. या प्रकरणात सैनिकी अपयशाच्या जोडीला अपमान व अपकीर्ती अमेरिकेच्या वाट्याला आलेली दिसते. इराण प्रकरणी अमेरिकेने जो शहाणपणा दाखविला आहे त्याच्या मुळाशी ही 'अद्दल' आहे की ज्यो नायचा मवाळ शक्तीचा (साॅफ्ट पाॅवरचा) सिद्धांत आहे, ते यथावकाश कळेल.
 मवाळ शक्ती सिद्धांत बळजबरीऐवजी आकर्षणावर, प्रलोभनावर, समजुतीच्या राजकारणावर भर देतो. प्राचीन भारतीय नीती ( राजनीती नव्हे) याच्या कितीतरी पुढे गेली होती. ती आत्मीयतेवर आधारित होती. बुद्धाचे तत्त्वज्ञान विस्तारले ते दया आणि करुणा यांचा पुरस्कार करीत. मर्यादापुरुषेत्तम भगवान रामचंद्राची कीर्ती तर दिगंत पसरली होती. राम आणि राजा हे शब्द जणू समानार्थी झाले होते. इजिप्तचे प्राचीन शासक स्वत:ला रॅमसी १, रॅमसी २ अशी नावे स्वीकारून  स्वत:चा गौरव करून घेत, असे म्हणतात. हे न तरवारीच्या बळावर साध्य झाले होते न राजनीतीच्या! मग कोणती होती ही नीती? तिचा आधार होता. आत्मीयता. वन वर्ल्ड किंवा ग्लोबल व्हिलेजच्या किती तरी अगोदर आपल्याला 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेचा साक्षात्कार झाला होता.
                                           वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
       पण ही झाली वडलांची कीर्ती. आजचे काय? याच नीतीचा आविष्कार अटल बिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौय्रातील त्यांची जी वक्तव्ये ऐकायलाआली/ येत आहेत, त्यातून व्यक्त होताना दिसते. ही भारताची जुनीच परंपरा राहिलेली आहे. मोदींचे दौरे आताचे, त्यांचे वृत्त ताजे, तसेच वृत्तप्रसार माध्यमेही प्रचंड गतीमान, म्हणून चटकन जाणवतात, इतकेच. प्रत्येक देशाची काही बलस्थाने असतात. लोकशाही, हाॅलिवुड, साहित्य, खाद्यपदार्थ, संगणक  व तत्त्वज्ञान ही अमेरिकेची बलस्थाने आहेत. जागतिक लोकमताला आपल्याकडे खेचून आणण्यात ती किती यशस्वी झाली आहेत, ते आपण जाणतोच. यांचा प्रतिमासंवर्धनासाठी अमेरिकेने अतिशय कुशलतेने उपयोग करून घेतला आहे. जग अमेरिकेचे या क्षेत्रात अनुकरण व अनुसरण करीत आहे. 'अनुकृती ही सर्वोत्तम स्तुती',  ही उक्ती मान्य केली तर या गोष्टीचे महत्त्व लक्षात येण्यास मदत होईल.
                                             बलस्थाने ओळखून युगानुकूल करण्याची गरज
          भारताची बलस्थाने कोणती? आपल्याला संपन्न असा सांस्कतिक वारसा आहे. आपले संगीत, शिल्पकला, नृत्य या कला जगभर वाखाणल्या जातात. आयुर्वेदाला स्वीकारण्यास जग तयार आहे ( त्याचे रूप विज्ञान अनुसरणारे व वस्तुनिष्ठ होण्याची आवश्यकता आहे. ही आवश्यकता आपण पूर्ण करीत आहोत, ही चांगली बाब आहे) 'योगाचे' ( 'योग' म्हणायचं नाही बरं!) अनुसरण जगभर होत आहे. भारतीय तत्त्वज्ञान व साहित्य यालाही जगात मान्यता आहे. हिंदू धर्म हा उदारमतवादी म्हणून विद्वान मंडळी स्वीकारत आहेत. झिरपण्याचा सिद्धांत ( परकोलेशन थिअरी) मान्य केला तर तो सामान्यांमध्येही स्वीकार्य ठरण्यास हरकत नसावी. या सिद्धांतानुसार असे मानतात की, एखादे मत अगोदर ज्येष्ठांना, विद्वानांना आणि श्रेष्ठांना मान्य होते आणि मग हा विचार हळूहळू जनसामान्यातही झिरपत जातो. भारतीय खाद्यपदार्थही लोकप्रिय होत आहेत. संकटकाळी मदतीसाठी आत्मीयतेने व कर्तव्य म्हणून धावून जाण्याची भारताची भूमिका ( नेपाळचा भूकंप), शांततारक्षणाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या आपल्या सैन्यदलाची संयमित व निपक्षपातीपणे काम करण्याची वृत्ती व निरलस भूमिका, युद्ध कौशल्यातील सफाई (युनोच्या शांततारक्षक दलातील आपला सहभाग) यामुळे भारताची प्रतिष्ठा वर्धिष्णू आहे. अनिवासी भारतीय हे सुद्धा एक बलस्थान सिद्ध होण्यासारखे आहे. पण आपल्याबद्दल असूयेची भावना निर्माण होणार नाही याची काळजी भारतीयांना घ्यावी लागेल. नागरिकत्व बहाल करण्याचे बाबतीतले भारतीयांच्या संबंधातले देशोदेशींचे व्हिसाविषक नियम सर्वात कडक आणि काटेकोर का आहेत, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.
                                           कोणती शक्ती श्रेयस्कर मवाळ की जहाल?
         म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, मवाळ शक्तीचा वापर जपून केला पाहिजे. ती उलटूही शकते. अमेरिका आपल्या धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा विचार करीत आहे, असे दिसते. रणनीती कूस बदलते आहे. इराणशी झालेला करार याचा परिचायक ठरावा. चीनही रुपेरी चाबूक वापरतो आहे. मदत व कर्जाच्या रूपाने पैशाची उधळण करतो आहे. श्रीलंका त्याच्या जाळ्यात सापडेल की काय ही भीती श्रीलंकेतील सत्ताबदलामुळे काहीशी कमी झाली आहे. पाकिस्तानचे तसे नाही. अमेरिका आणि चीन या दोघांकडूनही तो पैसे व सामग्री उकळतो आहे. अर्थात हे दोघेही कच्या गुरूचे चेले नाहीत. ते पैसे देतील पण तरीही आर्थिक नाड्या आपल्या हाती ठेवतील. अण्वस्त्रे पाकिस्तानात पण त्यांचा रिमोट आपल्या हाती ठेवतील. शस्त्रास्त्रे देतील पण दारुगोळ्यासाठी पकिस्तानला आपल्यावर अवलंबून ठेवण्याची काळजी घेतील. पण केवळ याच्याच भरवशावर राहून चालणार नाही. तिकडे इजिप्तमधील शासक सुन्नीपंथीय असूनही इसीसशी( तिचे नेतृत्त्वही सुन्नीच असले तरी) फटकून वागते आहे हे खरे पण इजिप्तच्या जनतेची सहानुभूती मात्र इसीसकडे आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नायजेरियात बोको हरामला नुकतीच एक जबरदस्त थप्पड बसली असली तरी तेवढे पुरेसे नाही. ते पुरते नामोहरण झालेले नाहीत. पाकिस्तानच्या कुरबुरही सहजासहजी थांबणार नाहीत. अतिरेकी हल्ले करण्याचे साहस करून पाहणारच. त्यामुळे मवाळ शक्ती व शस्त्राधारित जहाल शक्ती ( हार्ड पाॅवर ) यांचा प्रसंग व देशपरत्वे तारतम्याने वापर करण्यात आपल्या परराष्ट्र नीतीचा कस लागणार आहे. 'ठकाशी ठक, उद्धटाशी उद्धट', ही नीती कालबाह्य होण्यासाठी प्रत्येक देशातील जलवाहिन्यांमधून बरेच पाणी वाहून जावयाचे अजूनही बाकी राहिले आहे, हे विसरून चालणार नाही.