Wednesday, February 3, 2016

ग्रॅंड डॅाग
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
 दूरध्वनी (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॅार्क,  पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
     आजवर ग्रॅंड सन, ग्रॅंड डॅाटर हे शब्द अनेकदा कानावर पडत आले आहेत. पण 'ग्रॅंड डॅाग' शब्द ऐकला आणि अर्थबोध होईना. आमचे शेजारी आपल्या मुलाकडे जायला निघाले होते. मुलगा, सून, नातू एका मोठ्या सहलीला जाणार होते. घर सांभाळण्याची जबाबदारी आजी व आजोबा यांच्यावर आली होती. एरवी घराला कुलुप लावूनही जाता आले असते पण 'ग्रॅंड डॅाग'ला सांभाळण्याचा प्रश्न होता. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा यांच्याकडे दुर्लक्ष करून चालले नसते. त्याच्या ओळखीचे कुणीतरी असेल तरच त्याने काही खाल्ले असते. सुरवातीची काही मिनिटे नीट अर्थबोध होत नव्हता. नंतर लक्षात आले की, ही खास स्वारी म्हणजे घरचा पाळीव कुत्रा होता. मुलगा आईवडलांचे विमानाचे तिकीट काढणार होता. आणखी काही खर्च येणार असेल तर तो करण्याचीही मुलाची तयारी होती. आजी व आजोबांच्या लेखी तो कुत्रा ग्रॅंड डॅाग होता.
 
     इथले हौशी लोक अशीच काळजी मांजरांचीही घेतात, म्हणून ऐकले. एका मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे. तिला मांजरींचा विलक्षण लळा आहे. नवविवाहित दाम्पत्याने ठरविले आहे की, आपल्याला मूल होऊ  देणे परवडणारे नाही. माझ्या आवडत्या मांजरींनाच तुम्ही आपले नातनातू समजा, असे आईवडलांना त्यांनी सांगितले आहे. आता त्या मार्जार कुलोत्पन्न प्राण्यांचे, खय्रा नातवंडांनाही हेवा वाटावा, असे लाड व कोडकौतुक होत असते. प्राणी पाळण्यासाठी परवाना, त्याचे निरनिराळ्या लशी टोचण्याचे वेळापत्रक आदी सोपस्कार कसोशीने पाळावे लागतात. एकदा बीचवर गेलो असतांना एक महिला कुत्र्याला फिरायला घेऊन आली होती. हातात आपल्याकडे कचरा गोळा करायला वापरतात तसे दांडा असलेले सूप होते. कुत्रा जाताजाता आपले नैसर्गिक विधी उरकीत होता. मालकीण त्याची ‘शी’ तत्परतेने गोळा करून सोबतच आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत गोळा करीत होती. थोड्या वेळाने ती कुत्र्याला सोबत घेऊन कारमध्ये बसून निघून गेली. जाताना सोबत ती पिशवीही घेऊन जायला विसरली नाही. प्राणी पाळण्याची हौस असलेले अनेक जण या देशात आहेत. त्यांचे कोडकौतुक हा हौसेचा आणि कुटुंबात व मित्रमंडळीत चर्चेचा विषय असतो. इतर देशात माणसाचा जन्माला येण्यापेक्षा इथे प्राण्याच्या जन्माला आलेले काय वाईट? पण असे काहीच प्राणी आहेत. इतर प्राणी भक्ष म्हणून पाळले व जोपासले जातात. मात्र आताशा शाकाहाराचा पुरस्कार करणारा एक संप्रदायही वाढीला लागला आहे.

       इथे काही लोक असेही आहेत की जे निरनिराळ्या वंशाची मुले दत्तक घेऊन त्यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे वाढवतात. मात्र स्वत:ला मूल होऊ देत नाहीत. वंशभेद आणि वंशद्वेशाच्या घटनाही कानावर पडत असतात. पण शहाणे व जाणते लोक याचा निषेध करण्यासाठी पुढे येत असतात.
    आमच्या ‘नगरात’ पन्नासेक घरे आहेत. ते जगातील सर्व देशातील, सर्व जाती धर्माचे, वंशाचे  लोक राहतात. यॅार्क( न्यूयॅार्क नव्हे) ही अमेरिकेची पहिली राजधानी होती. पण आज ते अमेरिकेतील तसे एक लहानसेच शहर आहे. त्यातही आमचे ‘नगर’ म्हणजे आणखीनच चिमुकले म्हटले पाहिजे. पण इथे जगाचे प्रातिनिधिक रूप बघायला मिळते. अमेरिकेत सर्व संस्कृतींचा मिलाप पहायला मिळतो. ‘ग्लोबल व्हिलेज’चे हे लघरूप आहे.


No comments:

Post a Comment