Wednesday, February 3, 2016

मुंगी उडली आकाशी

‘मुंगी उडाली आकाशी’
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
‘मुंगी उडाली आकाशी’, असे खुद्द मुक्ताबाईंनीच म्हटले हे आपल्याला माहीत आहे. तसे पंख फुटलेल्या मुंग्या आपणही पाहिल्या आहेत. त्यांना उडतांना पाहणारे तुलनेने कमी असतील. मुक्ताबाईंनीच मुंगीने सूर्याली गिळल्याचेही सांगितले आहे. नुकतीच एक मुंगी आकाशात उडाली आहे आणि ती एका बलाढ्य शक्तीच्या नजरेला नजर देऊन उभी आहे, ही मात्र वस्तुस्थिती आहे. आणि तिचे हे कर्तृत्त्व कोणीही पाहू शकेल. कोण आहे ही मुंगी? काय आहे तिचे कर्तृत्त्व? सर्व हकीकत सुरवातीपासूनच पहावी, हे बरे.
 दुसऱ्या महायुद्धानंतर माओ त्से तुंग यांच्या नेतृत्त्वाखालील चढाईत चांग काई शेख यांचा पाडाव झाला पण तायवान बेटावर मात्र त्यांची सत्ता अमेरिकेच्या कृपाप्रसादाने टिकून राहिली. आजतागायत ती तशीच टिकून आहे. यालाच रिपब्लिक आॅफ चायना असे म्हणतात. याचे सामर्थ्य एवढे चिमुकले आहे की, कम्युनिस्ट चीनने ठरवले तर हे बेट काबीज करायला क्षणाचाही वेळ लागणार नाही पण अमेरिकेचा पाठिंबा आणि बाह्य जगाशी संबंध ठेवण्यासाठीची खिडकी म्हणूनही बहुदा चीन गप्प बसला. त्यावेळी जगात चीन एकटा पडला होता. या खिडकीचा उपयोग बाह्य जगाशी संबंध ठेवण्याच्या कमी चीनला अनेक प्रकारे झाला. आज परिस्थिती बदलली आहे. चीन एक प्रतिष्ठाप्राप्त राष्ट्र आहे. त्याचा सर्वत्र दबदबाही आहे. पण तायवान मधील रिपब्लिक आॅफ चायना टिकून आहे.
  या तायवानमध्ये  त्साई इंग वेनचा ३१ आॅगस्ट १९५६ ला जन्म झाला. लोकशाही प्रक्रियेतून पुढे जात जात आज ही महिला अध्यक्षपदी विराजमान होते आहे. राष्ट्राध्यक्षपदी पोचणारी या ‘देशातली’ ही पहिली महिला असणार आहे. हिचा जन्म तिथल्या हक्का या आदीवासी जमातीत झाला आहे, हे नमूद करायला हवे अशासाठी की ती आज ऊच्च शिक्षा विभूषित आहे. घरची आर्थिक स्थिती उत्तम, त्यामुळे  त्साय हिला एखाद्या हायफाय शाळेत जाता आले असते पण  सामाजिक परिस्थितीचे यथातथ्य आकलन व्हावे म्हणून ती  सामान्य समजल्या जाणाऱ्या सरकारी शाळेत शिकली. तरीही तिच्या बुद्धिधमत्तेला घुमारे फुटतच राहिले. इंग्लंड, अमेरिकेत जाऊन कायदा व अर्थशास्त्राचा अभ्यास करून तिने डाॅक्टरेट मिळवली. राजकारणात तिने अनेक चढाव उतार पाहिले. ती नुकतीच प्रचंड मताधिक्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाली आहे. यावेळी तळागाळातल्या जनतेने तिला आर्थिक साह्य केले अपेक्षा फक्त एकच  होती. 'तायवानवर चीनचा कब्जा होऊ देऊ नकोस'.
 आपल्या यशाचे रहस्य, प्रामाणिकपणा व चिकाटीत आहे, असे ती सांगते. राजकारणातच नव्हे तर जीवनातही अनेक चढाव उतार आले. 'उतारात मी खचले नाही तसेच चढावात मातले नाही'. अशी मोजकी, शेलकी व नेमकी वाक्ये हे तिच्या वक्तृत्त्वशेलीचे विशेष आहे.
     चीनसारख्या बलाढ्य देशाशी राष्ट्राध्यक्ष म्हणून त्साई इंग वेन यांची आता नित्य गाठ पडणार आहे. वाटाघाटीत आपल्या वाट्याला वाटाच कसा येईल, हे बघण्यात त्यांचा हातखंडा आहे. आजवर खाल्लेल्या टक्क्याटोणप्यामुळे त्यांना ही कला अवगत झाली आहे. मुंगीने आकाशात झेप तर घेतली आहे पण आता गाठ चीनसारख्या बलाढ्य ड्रॅगाॅनशी आहे. जगातील राजकीय निरीक्षकांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेण्यात आजतरी एक मुंगी यशस्वी झाली आहे, हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment