Wednesday, February 3, 2016

पास, ढकलपास की नापास - एक ज्वलंत समस्या
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
      शिक्षणात बदल झाला पाहिजे, याबद्दल सर्वांचेच एकमत आहे.परीक्षा आणि पास-नापासाबाबत योग्य धोरण स्वीकारणे व अमलात आणणे हे यादृष्टीने टाकावयाचे एक (एकमेव नाही) महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. उद्दिष्टे, तत्त्वे आणि धोरणे यात एकवाक्यता होणे कठीण नसते. तशी एकवाक्यता निर्माण झालेलीही आहे.
    मतभेदाचा मुद्दा निर्माण होतो तो त्या उद्दिष्टानुरूप आपण वाटचाल करीत आहोत किंवा नाही हे ठरवतांना. तत्त्वेही सर्वमान्यच असतात. मतभेद होतात, ते तपशील ठरवतांना. धोरणेही मुळात चूक नसतात. घोडे पेड खाते, जेव्हा धोरणांची अंमलबजावणी सुरू होते तेव्हा.
    मुलांना नापास करू नका, हा यापैकीच एक मुद्दा आहे. आपण सध्या अमेरिकेचे अनुकरण करीत आहोत. चांगल्याचे अनुकरण जरूर करावे पण ते अंधानुकरण असू नये. अमेरिकेतील शाळात (या काऊंटी स्कूल्स  म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत बरे) दररोज मुलांच्या परीक्षा घेतल्या जात असतात व एकतर रात्री बारा पर्यंत किंवा सकाळी सात पर्यंत त्यांचे निकाल पालकांना कळविले जात असतात. याला अपवाद असतात पण ते सकारण असतात. प्रश्नपत्रिकेची आखणी, उत्तरांचे मूल्यमापन करण्याच्या आधुनिक पद्धती व तंत्रे, पालकांशी संपर्क करण्यासाठी ईमेल सारखी संपर्क यंत्रणा यामुळे विद्यार्थी रोजच्या रोज पास की नापास हे कळविण्याची व्यवस्था असते. लगेच पुन्हा परीक्षा देऊन आपला स्कोअर सुधारण्याची सोयही उपलब्ध आहे. अमुक इतके गुण मिळाले नाहीत, तर महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, याची सर्व संबंधितांना जाणीवही असते. त्यामुळे लगेचच पुन्हा परीक्षा देऊन विद्यार्थी आपले गुण किंवा गुणक्रम यात सुधारणा करण्यास धडपडत असतात. असे करूनही ज्यांना ठरावीक गुणवत्ता प्राप्त होत नाही ते विद्यार्थी बारावीनंतर प्रमाणपत्र, पदविका किंवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वी, समाधानकारक व संपन्न जीवन जगू लागतात. आपल्या येथील सामाजिक व आर्थिक मागासलेपण पाहता ही योजना जशीच्या तशी आपल्याकडे अमलात आणता येणार नाही. आरक्षण व निवडीच्या निकषात सवलती आवश्यक आहेत, हे मान्य करून धोरण आखावे लागेल, यात शंका नाही.
      जे गुणवंत असतात त्यांनी आपल्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घ्यावा म्हणून ती ती महाविद्यालये व विद्यापीठे धडपडत असतात, निरनिराळ्या सवलती जाहीर करीत असतात. या धोरणामुळे पालकच नव्हेत, तर विद्यार्थीही जागरूक व प्रयत्नशील असतात.
   या धोरणामुळे विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रश्नच सहसा उद्भवत नाही. हे तिथल्या पद्धतीचे सर्वसाधारण स्वरूपाचे वर्णन आहे, असे म्हटले तर ते फारसे चुकणार नाही. या तुलनेत आपल्या धोरणाचा विचार केला तर काय दिसेल?
     चाचणी घेणे व तिचा तपशील नोंदवण्यातच शिक्षक बेजार होत आहेत. त्यामुळे पालकांना कळवणे तर दूरच राहिले. कच्या विद्यार्थ्याने लगेच अभ्यास करून कच्चेपणा दूर करणे तर शक्यच होत नाही. यावर आपण सोपा उपाय शोधला आहे. तो म्हणजे सगक्ळ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा. याचे दुष्परिणाम दिसू लागले. आठवी पर्यंत ढकलपास पद्धतीने उत्तीर्ण होणारा विद्यार्थी नववीत तग धरू शकला नाही .
     यावर उपाय म्हणून ढकलपास पद्धत आपण चौथीनंतर थांबवणार आहोत. तशा प्रकारची शिफारस केंद्राने नेमलेल्या महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे, असे दिसते. पण चौथीपर्यंतच्या अभ्यासाचे काय? जो प्रश्न नववीच्या वर्गात पडत होता तो आता पाचवीच्या वर्गात पडणार नाही का? यावर उपाय कोणता? नापास करणार नाही पण कच्चेही राहू देणार नाही, अशी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. यादृष्टीने कच्चा राहिलेला अभ्यास उन्हाळ्याच्या सुटीत पूर्ण करण्याची योजना यशस्वी ठरेल, अशी आशा, अपेक्षा व परमेश्वरचरणी प्रार्थना आपण करूया.

No comments:

Post a Comment