Friday, February 5, 2016

 

                                                  'स्वंय' - एक वरदान
                                                                                                                        

      विदेशात जाऊन शिक्षण घेणे सर्वांनाच शक्य होते/असते, असे नाही. पण असे शिक्षण आपल्यालाही घेता यावे,अशी अनेक होतकरू / गरीब युवकांना वाटत असते. या युवकांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण झाल्या तर यात त्यांचा व्यक्तिगत लाभ होतो/होणार हे खरे आहे , तसेच या निमित्ताने देशातील मनुष्यबळाचा विकास होऊन पर्यायाचे देशाचाही लाभ होणार, हेही तेवढेच खरे आहे. अशा सर्व युवकांना शासकीय खर्चाने विदेशात शिक्षणासाठी पाठविणे शासनालाही परवडणारे नाही. यांवर काहीच उपाय नाही काय? 
                                            युवकांची उमेद खचून नये
   आपल्या देशात राहूनच जगातील कोणत्याही मोठ्या/चांगल्या/प्रतिष्ठित विद्यापीठांत सुरू असलेल्या वर्गाला अप्रत्यक्षपणे उपस्थित राहता आले तर किती बहार होईल, असे स्वप्न अनेकांच्या मनांत यापूर्वी आलेही असेल. पण उपयोग काय? शेवटी निराशाच पदरी येणार, उमेद खचणार. याप्रकारे युवा मन हताश होणे देशालाही परवडणारे नाही. हे मन बंड करून उभे राहू शकते, अतिरेकी होऊ शकते. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, असे समाजस्वास्थ्याची काळजी करणार्यांना अनेक वर्षे वाटत होती पण उपाय सापडत नव्हता.
                                                    स्वयं योजनेचा स्वरूप
    केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी युवावर्गाची ही अडचण जाणून  'स्वयं' या नावाची एक योजना आखली आहे.  या योजनेनुसार मंत्रालय विदेशातील विशेषत: अमेरिकातील काही निवडक अभ्यासक्रम स्वीकारणार आहे. हे अभ्यासक्रम 'आॅन लाईन' स्वरूपाचे असतील.  तसेच हे अभ्यासक्रम पदव्युत्तर पातळीचे असतील.  अमेरिकेतील मानांकनप्राप्त विद्यापीठे, तसेच आय आय टी , आय आय एम या सारख्या त्या देशातील शिक्षणक्षेत्रातील प्रमुख आणि प्रगत संस्था यांची निवड शासकीय पातळीवर केली जाईल. स्वयंचे विस्तारित स्वरूप किंवा नाव बरेच लांबलचक आहे. 'स्टडी वेब आॅफ अॅक्टिव्ह लर्निंग फाॅर यंग अॅस्पायरिंग माईंड्स' हे नाव आश्वासक आणि अर्थवाही आहे. अध्ययन, क्रीयाशीलता, होतकरू युवामने, यावर भर देत असतांनाच इंटरनेट या आधुनिकतम तंत्राच्या उपलब्धतेची ग्वाही हे नाव देत आहे. 
                                            योजना सर्वांना उपलब्ध
     यासाठीची प्राथमिक तयारी आणि पार्श्वभूमी तयार झाल्यानंतरच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय ही योजना जनतेसमोर घेऊन येत आहे, हा एक नवीन, स्वागतार्ह, अनुकरणीय आणि अभिनंदनीय पायंडा ठरावा, तसेच त्याचे आश्वासक स्वरूपही जाणवावे, असे आहे. प्रारंभी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या शाखा निवडल्या जातील.  निर्धारित किमान पात्रता असलेली कोणत्याही व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्र असेल. तिला या आॅन लाईन अभ्यासक्रमाचा लाभ घेतां येईल.अगदी अल्प आणि वाजवी शुल्क भरून प्रमाणपत्रही मिळणार आहे.भारतीय संदर्भ आणि जागतिक स्तरावरचे ज्ञान यांचा सुरेख, सक्षम, सार्थ आणि सुयोग्य संगम होण्यावरच या योजनांची यशस्विता अवलंबून आहे याची जाणीव ठेवूनच आतापर्यंतची वाटचाल झालेली आहे. पुढील तीन वर्षात किमान एक कोटी लोक या योजनेचा लाभ घेतील, ही अपेक्षा पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.


No comments:

Post a Comment