Wednesday, February 3, 2016



डचेस ऑफ डेथ’, 'क्वीन ऑफ क्राइम', 'रहस्यसम्राज्ञी' लेखिकेची रहस्य गाथा
वसंत गणेश काणे
   न्यूयाॅर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर बातमी होती. ती एकाएकी बेपत्ता झाली होती. सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिका बेपत्ता!!!  सगळ्या जगभर एक खळबळ उडाली. पोलिस खाते खडबडून जागे झाले. कसून शोध सुरू झाला. एकेक दिवस जसजसा पुढेपुढे सरकत होता तसतसे जनमानस अस्वस्थ होत होते.निरनिराळे तर्ककुतर्क समोर येत होते. वावड्या उठत होत्या. होम सेक्रेटरी रोज पोलिसात चौकशी करीत. माहिती देणाय्राला १०० पाऊंडाचे बक्षीस एका वृत्तपत्राने जाहीर केले. एक हजार पोलिस, १५ हजार स्वयंसेवक, आकाशात घिरट्या घालीत अनेक विमाने यांनी सर्व परिसर पिंजून काढला. आपण याॅर्कशाॅयरला जात आहोत, अशा आशयाची चिठ्ठी तिने आपल्या सेक्रेटरीच्या नावे लिहून ठेवली होती. काही दिवसांनी तिची कार एका ओसाड जागी आढळून आली. आतमध्ये तिचे कपडे होते. मुदत संपून गेलेले ड्रायव्हिंग लायसन्सही बाजूला पडले होते. संघर्ष किंवा झटापट झाल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. ती एकतर स्वत:हून कार टाकून गेली असावी किंवा कोणीतरी तिला धाक दाखवून कार सोडून जाण्यास भाग पाडले असावे. सगळेच मती कुंठीत करणारे होते. शेरलाॅक होम्सचा जन्मदाता सर आर्थर काॅनन डाॅईलने आपल्या संग्रही असलेला तिचा हातमोजा पोलिसांना देऊ केला. कदाचित याचा उपयोग तिचा शोध घेण्यासाठी होऊ शकेल, या कल्पनेने.
     बेपत्ता होण्याच्या संभाव्य कारणांवर चर्चा सुरू झाली. लेखन करूनकरून आपल्याला खूप थकवा आला आहे, अशी तिची तक्रार सुरू झाली होती, ती निराशेने ग्रस्त झालेली वाटायची,  तिच्या आईचे नुकतेच निधन झाले होते, नवरा बदफैली निघाला होता. यापैकी एखादे कारण असेल का? काहीच कळत नव्हते. तपास पुढे सरकत नव्हता. तीन डिसेंबरला नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले होते आणि लगेच ती बेपत्ता झाली होती. हळूहळू लोक नकारात्मक भूमिका घेऊ लागले. हा तिचा 'पब्लिसिटी स्टंट' तर नसेल ना? अप्रामाणिक नवय्रावर खुनाचा आळ यावा, म्हणून रचलेले कुभांड तर नसेल ना?
    १४ डिसेंबर १९२६ ला शेवटी तब्बल दहा दिवलांनी शोध मोहिमेला यश आले. साहित्यप्रेमींच्या गळ्यातली ताईत असलेली सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिका ॲगाथा ख्रिस्ती एकदाची सापडली. स्वान हायड्रोपॅथिक हाॅटेल - आजचे नाव स्वान हाॅटेल - मध्ये ती आढळली. हाॅटेलच्या रजिस्टरवर तिने आपले नाव नोंदवले होते, तेरेसा नील. नील हे तिच्या नवय्राच्या प्रेयसीचे आडनाव होते!  जनतेने सुटकेचा निश्वास टाकला. तमाम रसिकवर्गाचा दहा दिवस टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. पण चिंता मिटली नव्हती. ॲगाथा भ्रमिष्ट झाली होती. तिला ॲम्नेशियाचा ( विस्मरण) अटॅक आला होता. मानसोपचार तज्ञांची चमू कारणांचा शोध घेऊ लागली. पण शेवटपर्यंत नक्की निदान झाले नाही. नेहमीप्रमाणे तज्ञांमध्ये मतभेद झाले. पण हळूहळू ती 'नाॅर्मलवर' आली.
  ॲगाथा ख्रिस्तीची १२५ वी जयंती १५ सप्टेंबरला२०१५ ला जगभर साजरी झाली. १५ सप्टेंबर १८९० ला या लोकप्रिय लेखिकेचा जन्म झाला होता. तिला जाऊन आता चाळीस वर्षे होत आहेत. मरणोत्तरही ती तितकीच लोकप्रिय आहे. तिला समीक्षक अभिजात लेखिका मानतात. काही लेखक लोकप्रिय असतात. तर काही अभिजात लेखनासाठी प्रसिद्ध असतात. लोकप्रियता, अभिजातता, मरणोत्तरही लोकप्रियता आणि तीही एखाद्या लेखिकेच्या वाट्याला, असे क्वचितच आढळते.
                         
                  ॲगाथा मेरी क्लॅरिसा ख्रिस्तीला डेमहूड
      डेम ॲगाथा मेरी क्लॅरिसा ख्रिस्ती ( १५ सप्टेंबर १८९० - १२ जानेवारी १९७६) ही ब्रिटिश लेखिका गुन्ह्यावर कादंबय्रा व लघुकथा लेखिका तसेच नाट्यलेखिका म्हणून गाजली, जगभर मान्यता पावली. तिच्या एकूण सहा प्रेमकथाही आहेत पण त्या टोपणनावाने लिहिलेल्या आहेत. एकूण सहासष्ट रहस्य कादंबय्रा व १४ लघुकथा तिच्या स्वत:च्या खाती जमा आहेत. तिची स्वत:ची अशी स्वतंत्र लेखनशैली होती. सर आर्थर काॅनन डाॅईल यांचा एकच मानसपुत्र होता, शेरलॅाक होम्स. पण हिचे अनेक गुप्तहेर मानसपुत्र होते/ कन्याही होत्या. हरक्यूल पॅायरॅाट, जेन मार्पल, पारकर पाईन, हार्ले क्विन अशी नावे आजच्या एका टीव्ही मालिकेतील अस्मिताप्रमाणे घरोघरी अगदी किचनपर्यंत पोचली होती. जगातले सगळ्यात लांबलचक नाटक 'माऊस ट्रॅप' हे एक रहस्यमय कथेवर आधारित असून ते तिच्या नावावर आजही विक्रमी लांबीचे म्हणूनच आहे. या नाटकाचे आजवर २५,०००प्रयोग झाले असून अजूनही ते होतच असतात. ब्रिटिश राजसत्तेने 'डेम' ही पदवी प्रदान करून तिचा गौरव केला होता. पुरुषांचा गौरव 'नाईटहूड' प्रदान करून तर स्त्रियांचा 'डेमहूड' प्रदान करून केला जात असे. ॲगाथाचा गौरव तिच्या साहित्यक्षेत्रातील योगदानानबद्दल करण्यात आला होता ( आपल्याकडे पद्मश्री वगैरे पदव्या आहेत, तसा प्रकार). असे अनेक गौरव तिच्या खात्यावर जमा आहेत. त्यातले अनेक आजवर मोडले गेलेले नाहीत. टी व्ही, रेडिओ, व्हिडिओ गेम्स व कॅामिक्स या सर्व माध्यमांना तिची भुरळ पडली आहे. सहाशे सदस्य संख्या असलेल्या क्राईम रायटर्स असोसिएशनने तिची   'दी मर्डर आॅफ राॅजर ॲक्राॅईड' ही कादंबरी सर्वोत्तम कादंबरी म्हणून १५ सप्टेंबर २०१५ ला तिच्या १२५ व्या जयंतीच्या मुहुर्तावर घोषित केले आहे
     एका उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या ॲगाथाने पहिल्या महायुद्धात एका हॅास्पिटलमध्ये काम केले होते. हरक्यूल पॅायरॅाट हा तिचा पहिला मानसपुत्र मानला जातो. सर्वाधिक खप असलेल्या कादंबय्रा लिहिणारी कादंबरीकार म्हणून गिनीज बुकात तिची नोंद आहे. खपाच्या दृष्टीने विचार केला तर शेक्सपीअरचे साहित्य, बायबल यानंतर क्रम लागतो ॲगाथा ख्रिस्तीचा. जगातल्या एकूण १०३ भाषात तिच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. हा विक्रमही अजूनतरी कुणी मोडलेला नाही.
डेथ ऑन दि नाइल, डेथ कम्स ॲज दि एण्ड, मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस, पेल हॉर्स, मिरर क्रॅक्ड फ्रॉम साइड टु साइड, कर्टन, माउस ट्रॅप, ॲंड देन देअर वेअर नन,  विटनेस फॅार प्रॅासिक्यूशन ही नावे सुद्धा सार्थ असणार याची कल्पना वाचकांना येते आणि 'डचेस ऑफ डेथ’, 'क्वीन ऑफ क्राइम', 'रहस्यसम्राज्ञी' हे किताब तिला रसिकांनी का दिले असतील हे लक्षात येते
  अभिजाततेचा मान तिच्या लिखाणाला प्राप्त होण्यासाठी काही अंगभूत  वैशिष्ट्येही कारणीभूत झाली असावीत.


             ॲगाथा ख्रिस्तीच्या जीवनावरील चित्रपटाने उडालेला भडका
   'डेथ ऑन दि नाईलचे' कथानक नाईल नदीवरील एका जहाजावर घडते आहे. 'डेथ कम्स ॲज दि एण्डचे' कथानक ४००० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील थडग्याशी संबंधित पुजाय्राच्या जीवनाशी संबंधित आहे. 'मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस' ही एक सूडकथा आहे तर 'मिरर क्रॅक्ड फ्रॉम साइड टु साइड' ही अभिनेत्रीच्या जीवनातील निराशा चित्रित करते. कर्टन, माउस ट्रॅप, ॲंड देन देअर वेअर नन,  विटनेस फॅार प्रॅासिक्यूशन या आणि अशा सर्व साहित्यकृतीत कथानकाला साजेशीवेगवेगळीपार्श्वभूमी ॲगाथाने योजिली आहे.
         ॲगाथाने आत्मचरित्र लिहिले आहे पण त्यात तिच्या जीवनातील 'बेपत्ता प्रकरण' मात्र बेपत्ता आहे. एका चित्रपट निर्मात्याने या प्रकरणावर आधारित एक काल्पनिक चित्रपट काढला. ह्या चित्रपटातील कथेचा  वास्तवातील व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असा फलक त्यात सुरवातीलाच दाखवलेला आहे. त्यात असे दाखविले होते की, ॲगाथाने आत्महत्या करायचे ठरवून असा घाट घातला होता की, तिच्या हत्येचा आळ तिच्या नवय्राच्या प्रेयसीवर येईल. पण एका अमेरिकन वार्ताहराला या बनावाचा सुगावा लागतो आणि ऐनवेळी तो तिला थांबवतो. ही चित्रकथा पाहून ॲगाथाचे चाहते चांगलेच खवळले. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांनी संबंधितांना कोर्टात खेचले आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. पण अमेरिकन कोर्टाने हे दावे फोल ठरवले. चित्रपटात ॲगाथाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री वनेसा रेडग्रेव्हने तर नवय्राची भूमिका तिमोथी डाल्टनने सजीव केली होती.वार्ताहराची भूमिका डस्टिन हॅाफमनने वठवली होती.
    पण वस्तुस्थिती काय होती हे बाहेर यावे म्हणून शोधपत्रकारितेला घुमारे फुटण्यास एक चांगले निमित्त मिळाले. यानुसार बळकटी या कथेला मिळाली की, ॲगाथाने आपल्या नवय्राला लाजेने मान खाली घालावी लागावी, म्हणून हा सर्व डोलारा उभा केला होता. एका सिद्धहस्त रहस्यकथाकार लेखिकेने बदफैली पतीचे पितळ उघडे पाडण्यासाठी रचलेला हा एक 'सुसंस्कृत व अहिंसक डाव' होता. पण स्वत: एक अद्वितीय रहस्यकथाकार असूनही या 'बेपत्ता नाट्याचा' शेवट तिच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही. कथेने भलतेच वळण घेतले. सत्य काय होते कुणास ठावूक.
   ॲगाथाने १९२८ मध्ये नवय्रापासून घटस्फोट घेतला. मुलीचा ताबा मिळवला आणि ख्रिस्ती अडनाव कायम ठेवले. तिने आपल्यापेक्षा सोळा वर्षाने लहान आरकिआॅलाॅजिस्टशी(पुरातत्त्ववशास्त्री) विवाह केला. तिने एके ठिकाणी म्हटले आहे की, नवरा म्हणून पुरातत्त्वशास्त्री चांगला असतो. कारण त्याचा स्वभाव असा असतो की,  वास्तू जसजशी जुनी होत जाते, तसतशी ती त्याला अधिकाधिक आवडू लागते. नवीन नवय्राची इच्छा तिने दारू प्यावी अशी होती. पण मला आपले पाणीच बरे वाटते, असे ती म्हणायची. मोठ्या मुष्किलीने व आवडत नसून सुद्धा ती सिग्रेट ओढायला तयार झाली. पण एका अटीवरच. दिवसा लंचनंतर आणि रात्री डिनर नंतरच म्हणजे दिवसातून फक्त दोनदाच ती सिग्रेटीओढायची. पण जेमतेम सहा महिनेच हा प्रकार सुरू राहिला. पण तिचे पुढचे आयुष्य सुखात गेले. नवीन नवय्रामुळे तिला खूप फिरता आले. कथा गुंफतांना निरनिराळी पृष्ठभूमी निवडता आली. एकाहून एक सरस कथा रचता आल्या.
     
    ब्रिटिश गुप्तहेर एजन्सी - एम१५ हादरली
   १९४२ मध्ये ब्रिटिश गुप्तहेर एजन्सीला - एम१५ला - ॲगाथाने एक हेर आपल्या खात्यात घुसवला आहे, असा संशय आला. त्याचे असे झाले की, ॲगाथाने आपल्या एका गुप्तहेर कथेत मेजर 'ब्लेचले' नावाचे एक पात्र रंगवले होते.  इंग्लंडमध्ये  दोघे पंचमस्तंभी ( स्वदेशाविरुद्ध शत्रूला सामील असलेले) घुसलेले आहेत आणि मेजर 'ब्लेचले' त्यांच्या मागावर आहे, असे काहीसे ते कथानक होते. एम१५ हादरले कारण त्यांच्या कार्यालयाचे नाव होते 'ब्लेचले पार्क'. सांकेतिक भाषेतील गुप्तसंदेशांची फोड या ठिकाणी व्हायची. ॲगाथाने रंगवलेल्या पात्राचे नाव 'ब्लेचले' ठेवलेले पाहून ॲगाथाला काही कार्यालयीन गुपिते कळली असावीत, तिला माहिती पुरवणारे आपल्या कार्यालयात शिरकाव करण्यात यशस्वी झाले असावेत, असा संशय त्यांना आला. ॲगाथाला त्यांचा संशय फेडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तिचे चित्रण किती वास्तव वाटायचे, याचा परिचय या उदाहरणावरून यावा.
  मॅक्स मॅलोव्हनला -ॲगाथाच्या नवीन नवय्राला - याच सुमारास 'नाईटहूड' ही पदवी बहाल करण्यात आली. नवरा 'नाईट' व बायको 'डेम' असे उभयता सारख्याच पदवीने गौरवले गेले. अशी उदाहरणे खूपच विरळी आहेत. लेखिका म्हणून ख्रिस्ती पण अन्य व्यवहारात त्याचे अाडनाव लावून लेडी मॅलोवन म्हणून वावरू लागली.
    १९७५च्या नाताळमध्ये तिची ‘कर्टन’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि वाचक अतिशय अस्वस्थ व नाराज झाले. कारणही तसेच होते.  हरक्युल पाॅरो हे तिच्या मानसपुत्रांपैकी एक अतिशय  लोकप्रिय  पात्र होते. तो मरण पावल्याचे अगाथाने या कादंबरीत दाखविले होते. जनमानस हे मान्य करायला तयार नव्हते.  हरक्युल पॉरोचा मृत्यू हा एका वास्तवातील व्यक्तीचा मृत्यूप्रमाणे वाचकांच्या चर्चेचा आणि वृत्तपत्रांच्या बातमीचा विषय झाला. अशाचप्रकारे त्याच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रांनी छापली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ही निधन वार्ता पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे हरक्युल पॉरोचा फोटोही छापला. हे  काल्पनिक छायाचित्र न्यूयाॅर्क टाईम्सने मुद्दाम तयार करून घेतले होते. या धक्यातून रसिकजन सावरतात न सावरतात तोच त्यांना दुसरा एक धक्का बसला. १२ जानेवारी १९७६ रोजी खुद्द अगाथा ख्रिस्तीच मरण पावली. शेरलाॅक होम्स या आपल्या मानसपुत्राला पुनर्जीवित करण्यास  सर आर्थर काॅनन डॅाईल या लेखकाला रसिकांनी भाग पाडले कारण जन्मदाता हयात होता. पण खुद्द जन्मदात्रीच हे जग सोडून गेल्यामुळे बिचाय्रा हरक्युल पॉरोला चिरविश्रांती घेण्यावाचून पर्यायच नव्हता!



No comments:

Post a Comment