Wednesday, February 3, 2016

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमीरचे व व्ही पी रजीनाचे
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?

         माहितीची माध्यमे तशी पूर्वापार चालत आलेली आहेत. कीर्तने, गीते, अभंग या सारखी माध्यमे  ही प्रामुख्याने संस्कार करणारी माध्यमे जशी होती, तशीच ती प्रबोधनाचेही कार्य करीत. काळ जसजसा बदलत गेला तसतशी हीमाध्यमे उत्क्रांत झाली तशीच नवीन माध्यमेही निर्माण झाली. दवंडीचे काम वृत्तपत्रेही करू लागली. नभोवाणीचा अवतार हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले. घटना घडताच दुसऱ्याच क्षणी तिती माहिती जनतेपर्यंत पोचू लागली. तरीही नभोवाणी  हे केवळ श्राव्य माध्यम होते. दूरचित्रवाणी(टीव्ही) हे खरेतर नभोवाणीचे धाकटे भावंड! पण ते कानामागून येऊनही अधिक तिखट झाले. श्रवणासोबत दृक्प्रत्ययही येऊ लागला. नभोवाणी नुसतेच ऐकवत होती. टीव्ही ऐकवण्यासोबत दाखवूही लागला. यामुळे या माध्यमाची परिणामकारकता कितीतरी पटीने वाढली. प्राचीन काळातील उदाहरण याची खात्री निरपवादपणे पटवील.
                                              माध्यमांमधली ‘लोकशाही’
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली खरी पण तो निशंक झाला तो विश्वरूप दर्शनानंतरच! असा महिमा आहे दृकप्रत्ययाचा! इंटरनेटने तर कहरच केला आहे. या माध्यमाने तर सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. इतक्या की आता या बाबतीत आणखी एखादे पाऊल भविष्यात पडेल, असे अनेकांना वाटत नाही. इंटरनेटचे एक वेगळे आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य हे आहे की माध्यमक्षेत्रात आता लोकांचा सहभाग कमलीचा वाढला. वृत्तपत्रात ‘वाचकांचा पत्रव्यवहार’, ‘मनोगत’, ‘राखावी दुरितांची अंतरे’ या सारखी ‘सदरे’ परिणामकारक ठरली कारण लोक आपापल्या प्रतिक्रिया नोंदवू लागले, प्रश्नाची  दुसरी बाजूही समोर येऊ लागली आणि माध्यमाचा स्तरही उंचावला, हे खरे. हे सत्य नाकारता येणार नाही. पण इंटरनेटमुळे जनसामान्य संपादकाच्या मांडीला मांडी लावून बसला आहे.या माध्यमांमध्ये आता ‘लोकशाही’ खऱ्या अर्थाने अवतरली.
     फेसबुक, व्हाट्सॲप, ट्विटर किंवा यासारखे प्रकार लोकसहभागासोबतच त्याची गतीही वाढवू लागले. याचे वर्णन करण्यासाठी ‘व्हायरल’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. वाऱ्याची किंवा वणव्याची उपमा देऊन एखादे वृत्त किती वेगाने पसरले हे पूर्वी सांगितले जायचे. आता वृत्त ‘व्हायरल’ झाले आहे. खुद्द व्हायरसही या गतीने पसरत असेल का?
                                              अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे पण कुणाला?
     अमीरखानची देशत्यागाबद्दलची टिप्पणी अशीच व्हायरल झाली. त्याच गतीने दुसरी बाजूही समोर आली. ‘बिचाऱ्या अमीरच्या मतस्वातंत्र्याचे काय? त्याला जे वाटले ते तो बोलला’, अशी त्याच्या उक्तीची भलावणही होऊ लागली. पण ही हकीकत इथेच संपत नाही. असेच दुसरे एक उदाहरण नुकतेच घडले आहे. हे उदाहरण वृत्तक्षेत्रातले आहे. व्ही पी रजीना या विदुषी ‘माध्यमम्’  नावाच्या मल्याळी वृत्तपत्रात उपसंपादकपदावर कार्य करतात. हे वृत्तपत्र जमाते इस्लामीच्या मालकीचे आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी फेसबुकवर ( 'माध्यमम्' या त्या नोकरी करीत असलेल्या वृत्तपत्रात नव्हे) एक लेख लिहिला. त्यात त्यांनी अनुभव कथन केला होता. त्यात सध्या गाजत असलेला सहिष्णुतेचा (किंवा असहिष्णुतेचा) मुद्दाही नव्हता.कोणत्याही पक्षावर टीका नव्हती. जात,धर्म, वंश यासारखे संवेदनशील विषयही त्यांनी हाताळले नव्हते. मग त्यांनी काय लिहिले होते?  त्यांनी मदरशाबद्दल लिहिले होते. त्यंच्यासोबत एक मुलगी मदरशात शिकत होती. मदरशातील एक उस्ताद (शिक्षक) तिचे कसे शोषण करीत असे याचे वर्णन त्यांनी या लेखात केले होते. हे लिखाण प्रत्यक्ष अनुभवावर आधारित होते. लिंगभेदाविषयी सध्या केरळ मध्ये चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने हा लेख होता. पण ही धर्मावरील टीका मानली गेली. त्सुनामीलाही मागे टाकील अशा गतीने या लिखाणावर झोड उठवली गेली. तरी बरे की हा लेख एखाद्या हिंदुत्ववाद्याचा नव्हता. शेवटी या लेखिकेचे फेसबुकवरील खातेच बंद करण्यात आले.
   अमीर खानच्या चित्रपटात हिंदू देवदेवतांवरील टीकेबद्दल आंदोलन झाले तेव्हा किंवा आता त्याने जो कांगावा केला आहे तेव्हा  देखील त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उदोउदो करणाऱ्यांची आता मात्र दातखीळ बसली आहे. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे पण ते अमीरखानचे, व्ही पी रजीनाचे नव्हे. खरे दुखणे इथे आहे.

No comments:

Post a Comment