Thursday, February 4, 2016

                        इसीसच्या शक्ती आणि मर्यादा
    शस्त्रांचा अघोरी वापर, प्रचार साहित्याचा भडिमार  आणि अर्थव्यवस्था खिळखिळी  करणारे स्थलांतर घडवून आणणे असा तिहेरी हल्ला या शब्दात इसीसच्या डावपेचांचे वर्णन करावे लागेल. यापैकी पहिल्या प्रकाराची माहिती सध्या बय्राच प्रमाणात उपलब्ध आहे.. 
       आय टी आय सी (इंटेलिजन्स ॲंड टेररिझम सेंटर ) या नावाच्या संस्थेने आय एस आय एस उर्फ आय एस आय एल उर्फ आय एस  म्हणजेच इसीस च्या प्रचार यंत्रणेच्या विविध  घटकांचा अभ्यास करून प्रचार यंत्रणेचे संपूर्ण  चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. इसीसने अल्पावधित आपले बस्तान बसवले  आहे. अल कायदा किंवा तालीबानींना  हे शक्य झाले नव्हते/नाही. इसीस आर्थिकदृष्ट्याही संपन्न आहे. अल कायदाचा पैशाचा ओघ मुख्यत: देणग्यातून  येत होता. इसीसचे तसे नाही. देणग्यांना खंडणी, लुटालूट आणि खनिज तेलाचा काळाबाजार यांची  जोड देऊन  इसीस  आर्थिक दृष्ट्याही बलवान संघटन झाले आहे.
 प्रभावी प्रचार यंत्रणा 
 तसेच रणांगणावरील लढाई जिंकण्याइतकेच मने जिंकणे आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळविणे महत्वाचे आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवून अमाप पैसा आणि अन्य स्वरूपाची साधनसामग्री प्रचारासाठी उपयोगात आणण्याचे इसीसचे धोरण आहे. यासाठी कुशल मनुष्यबळ इसीसने योजले आहे. इसीसचे प्रचार साहित्य उच्च दर्जाचे असते. कुशल मनुष्यबळ इराक आणि सिरीया मधून प्राप्त होत असते. अरब राष्ट्रे व पाश्चात्य देशातूनही मनुष्यबळाचा व पैशाचा ओघ सुरू असतो. अबू महंमद अल अदनानी हा प्रचार यंत्रणेचा प्रमुख प्रवक्ता आहे. इंटरनेट व सोशल नेटवर्क यांच्या माध्यमातून आपले तत्त्वज्ञान आणि राजकीय प्रचार केला जातो आणि जगभरातून लढाऊ मनुष्यबळ आणि पैसा मिळवण्याचा प्रयत्न होत असतो.
मानसशास्त्रीय आधाराचे बळ
       इसीसने मिळवलेल्या रणांगणातील विजयाला तसेच इस्लामिक खिलापत निर्माण करण्याच्या उद्दिष्टाला मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा आधार देऊन इसीसने दुहेरी यश मिळविले आहे. आपले प्रतिस्पर्धी (जसे अल कायदा) आणि शत्रू या दोन्हींच्या मनात धास्ती निर्माण केली तसेच जागतिक जनमानसात दहशत निर्माण केली. शिरच्छेद सत्र या दृष्टीने विशेष उपयोगाचे ठरले आहे.कोणताही क्रूरकर्मा अशा कृतींच्या आधारे जनसामान्यात प्रथम दहशत निर्माण करतो. पुढे या दहशतीचे रुपांतर आदर निर्माण होण्यात होते कारण निरुपाय असेल तर छळामुळे होणारा त्रास करून घेण्याऐवजी आदराची भावना निर्माण करून स्वत:ची सुटका करून घेण्याची मनाची प्रवृत्ती असते व या गोष्टी नेणीवेत घडत असतात, असे एक मानसशास्त्रीय मत आहे.
जरब बसवण्यासाठी हत्यासत्र
   यासोबत आपल्याबद्दल कोणती वृत्ते कोण प्रसारित करीत आहे, याकडे इसीसचे बारिक लक्ष असते. प्रतिकूल वृत्ते देणाय्रा वार्ताहरांचा जाहीर शिरच्छेद करून अद्दल घडविण्याचा कार्यक्रम ठराविक कालांतराने आयोजित केला जातो. वार्तांकनाबाबत इसीसने मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित केली असून त्यांचे पालन होते आहे किंवा नाही हे कसोशीने पाहिले जाते. आपल्या अाधिपत्त्याखालील प्रदेशातून रवाना होणाय्रा वृत्तावर इसीसचे नियंत्रण असते.पत्रकार, मानवाधिकारांचे पुरस्कर्ते यांचे प्रथम अपहरण होणे किंवा त्यांचे बेपत्ता होणे, नंतर छळ होणे आणि शेवटी शिरच्छेद हा क्रम आता नित्याचा झाला आहे. पण यामुळे पुरेशी अपेक्षित प्रसिद्धी मिळेना. हे अपयश इसीसच्या चांगलेच वर्मी झोंबले आहे. त्यांनी नवीन क्लृप्ती/ युक्ती कोणती लढवली, ते पहायला हवे. कारण ही पद्धत चांगलीच यशस्वी ठरतांना दिसते आहे.
    प्रत्येक देशात मुस्लिम युवक आहेत. त्यातले अनेक शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरी उदिमासाठी आलेले असतात. त्यांचे मायदेशातील नातेवाइकांना इसीसचे हस्तक शोधून काढतात. त्यांच्या माध्मातून वस्तूंची तस्करी साधतात. किंवा परदेशातील त्यांच्या नातेवाइकांना विशिष्ट वस्तू खरेदी करून अतिरेक्यांपर्यंत पोचविण्यास सांगतात. नातेवाइकांना मायदेशात ओलिस ठेवून किंवा धाक दाखवून परदेशातील नातेवाइकांकडून हवी ती कामे ( पैसे पोचवणे, शस्त्रे पुरवणे) बिनबोभाट करून घेतात. परदेशातील गुप्तहेर यंत्रणेला यांना हुडकून काढणे कठीण होते. एरवी हा प्रकार लक्षातही आला नसता. पण काहींनी पोलिसात जाण्याची हिंमत केली. सापळा रचून अतिरेक्यांना पकडण्यात आले. संबंधित तक्रारदाराला व त्याच्या नातेवाइकांना नवीन ओळख देऊन त्यांचे दूर कुठेतरी पुनर्वसन करावे लागले. अतिरेकी आपल्याला कधीतरी हुडकून काढतील, या भीतीच्या छायेखाली दोघांनाही जन्मभर लपूनच जीवन कंठावे लागणार, हे उघड आहे. त्यामुळे अशी हिंमत करणारे विरळेच असणार.
                 इसीसच्या प्रचारतंत्राचे चार स्तंभ
१. ट्विटर - ट्विटरचे नेटवर्क खूप मोठे आहे. इसीसचे चाहतेही अनेक आहेत. त्यांचे मोठमोठे गट तयार करून त्यांना आता प्रचार साहित्य पुरवले जाते. आजमितीला ट्विटरवर इसीसचे ४६ हजार अकाऊंट्स आहेत. काही अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. असे होताच लगेचच दुसरे नवीन अकाऊंट्स उदयाला येतात. आता प्रचाराचा हा प्रकार थांबवणे अशक्य झाले आहे.
२. अनौपचारिक प्रकाशने - इसीसने हयात मीडिया सेंटर सुरू केले आहे. यांचे प्रचार साहित्य अरब जगत वगळून इतरांसाठी असते. जर्मन, इंग्लिश आणि फ्रेंच भाषेत हा प्रचार केला जातो. कधी या व्हिडिओचा काळ एक मिनिटाचा असतो याला 'मुजाट्विट' असे नाव आहे.तर कधी एक तासाचा! युद्धाच्या ज्वाळा ( फ्लेम्स आॅफ वाॅर) नावाची फिल्म सध्या गाजते आहे.
३. चाहत्यांना मित्र बनवणे - या प्रकारात जिहादी प्रचारक नावांचा किंवा इमोजींचा वापर करतात. याचा उपयोग सावज हेरून त्यांना जिहादी बनवण्यासाठी केला जातो. 'न्यूटेला' नावाचा इटालियन चाकोलेटचा प्रकार आहे. हे नाव वापरतात. दुसरे नाव 'किटन' आहे. किटन याचा अर्थ  मांजरीची डोळे बंद असलेल्या अवस्थेतील पिले असा होतो. हे सांकेतिक शब्द आहेत. वरवर निरुपद्रवी वाटतात. पण यांचा वापर व्हाॅट्स अप मेसेजेस मध्ये केला जातो. अशा मेसेजेसवर पाळत ठेवणे कठीण जाते. गुप्त संपर्काचे हे प्रभावी माध्यम आहे.
४. लिखित साहित्य- हा प्रचाराचा उघड प्रकार आहे. दाबिक नावाचे मासिक आॅन लाईन आहे. ते इंटरनेटवर वाचता येते. याची छापील आवृत्ती छान गुळगुळीत कागदावर असते. इस्लामी खिलापत स्थापन होताच निर्माण होणाय्रा सुखद विश्वाचे चित्र यात रंगवलेले असते. धार्मिक मुखंडांची वचने, धर्मग्रंथातील दाखलेही यात छापलेली असतात.
    युरोपमध्ये या प्रचाराला आळा घालण्याची मोहीम १ जुलै२०१५ पासून सुरू झाली असली तरी डिजिटल रणभूमीवर आजमितीला इसीसचाच वरचष्मा आहे. या पर्चाराच्या आधारावर आजपर्यंत ५ हजारावर तरूण इसीसच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अरब जगताकडे कूच करते झाले आहेत. आशियातून भारत, इंडोनेशिया, मलेशिया या देशात डिजीटल प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळतो आहे. कल्याण, बंगलोरची उघड झालेली प्रकरणे हिमनगाच्या टोकाप्रमाणे तर नाहीत ना, अशी शंका  शोधकर्त्यांना सतावत आहे. जवळजवळ शंभर देशातील तरूण इसीसकडे सैन्यात सामील होण्यासाठी गेले असावेत, असा अंदाज आहे.
इसीसच्या चार प्रचार संस्था 
१. अल फर्क इंन्स्टिट्यूट फाॅर मीडिया प्राॅडक्शन 
नेतृत्वाकडून येणारे संदेश प्रसारित करणे. चळवळीचा सैद्धांतिक पाया विशद करणे ही या संस्थेची प्रमुख दोन कामे आहेत.
२. दी अल इटिसम मीडिया फाऊंडेशन 
याचा शब्दश: अर्थ अल्लाची करुणा भाकणे असा असला तरी ही संस्था प्रचार साहित्य ( व्हिडिओज) तयार करून त्याचे वाटप करते.
३. अल हयात मीडिया सेंटर - हे केंद्र आपले लक्ष पाश्चात्य जगतावर केंद्रित करते. नवीन भरतीसाठी साहित्य तयार करणे हे या केंद्राचे मुख्य काम आहे.
४. अजनद मीडिया फाऊंडेशन-  जिहादी ध्वनी संगीत ध्वनिक्षेपित करणे हे या संस्थेचे काम आहे.
वैराचा त्रिकोण
       हा प्रचार करतांना जेव्हा व्यावहारिक अडचणी निर्माण होतात, तेव्हा कसे गुंतागुंतीचे पेचप्रसंग निर्माण होतात, ते जाणून घेणे उपयोगाचे ठरणार आहे. अफगाणिस्स्थानवर आपला ताबा असावा, अशी पाकिस्थानची इच्छा आहे. त्यासाठी पाकिस्थानने तालिबानला हाताशी धरले आहे. इसीसचे तालिबानशी हाडवैर आहे. म्हणजे आता पाकिस्थान आणि इसीस यांचे बिनसणार. कारण इसीसने तालिबानशी संघर्ष सुरू केला आहे. याच्यावर प्रचारशास्त्रात उपाय साडणार नाही. इसीस आणि अल कायदा यातूनही विस्तव जात नाही. तिघांनाही मुस्लिम जगतावर प्रभुत्व हवे आहे. जागतिक राजकारणातला इसीस, अलकायदा आणि तालिबानी हा वैराचा त्रिकोण आहे. 
अंतिम विजय कुणाचा?
  इसीससमोर इतररही प्रश्न आहेत. युरोपात हत्यासत्र घडवून आणणे इसीसला सोपे आहे. पण त्यामुळे युरोपात जनाधार वाढणार नाही, हे नक्की. यावर इसीसने वेगळेच दबावतंत्र वापरले आहे. मध्यपूर्व आणि आशियात अराजक माजवण्याची मोहीम हाती घेतले आहे. हत्यासत्र, बलात्कार, मुली पळवणे, दैनंदिन व्यवहार ठप्प करणे यामुळे लोक चीजवस्तू सोडून हजारोच्या संख्येत युरोपात स्थलांतर करीत आहेत. हा लोंढा थांबणे युरोपीय देशांना अशक्य झाले आहे. या लोकांजवळ कोणतीही कागदपत्रे नसतात. कोण पीडित कोण छुपा अतिरेकी, हे शोधणे अशक्य झाले आहे. हे लोक खेडोपाडी विखुरले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडतो आहे. सध्या हा उपद्रव जरी ग्रीस आणि इटाली या देशांना मुख्यत: जाणवत असला तरी तो नजीकच्या काळात ऊग्र रूप धारण करील अशी चिन्हे आहेत. असे पन्नास लाख लोक नजीकच्या काळात युरोपात शिरतील, अशी इसीसने योजना आखली आहे. पण यामुळेच युरोपमध्ये इसीसला जनतेची सहानुभूती मिळणार नाही. अफगाणिस्थानात पाय रोवणेही कठीण आहे. अफगाणिस्थान हा एकसंध देश नाही. तो निरनिराळ्या टोळ्या, जाती आणि जमातींचा देश आहे. तरीही ब्रिटिश, रशियन आणि अमेरिकन यांचे वर्चस्वासाठीचे खटाटोप त्यांनी यशस्वी होऊ दिले नाहीत. पाकिस्थानातही बलुची, पख्तून बहुल प्रदेशात असंतोष धुमसत असतो. सिंधही अशांतच आहे. अफगाणी जनता इसीस, अल कायदा, तालिबानी आणि पाकिस्थान्यांना पुरून उरेल. भारताचे मात्र अफगाणिस्थानात स्वागत आहे. पाकिस्थानला याचे वैषम्य वाटते आहे. कारण जनता ज्याच्या साथीला त्याचाच अंतिम विजय असतो.



   

No comments:

Post a Comment