Wednesday, February 3, 2016

‘एका हिंदूस पत्र’ लिहिणारा लिओ टॉलस्टाय
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी; एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blog – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
‘एका हिंदूस पत्र’ लिहिणारा लिओ टॉलस्टाय एक विश्वविख्यात साहित्यिक आणि चिंतक म्हणूनही ओळखला जातो. टॉलस्टायच्या कादंबऱ्यांचे विश्व साहित्यात अमर स्थान आहे. मानवाच्या मनाच्या नेणिवेतील मनोव्यवहारांचे वर्णन करण्याची त्याची क्षमता केवळ वादातीतच नाही तर आजही ते स्थान तसेच कायम आहे आणि भविष्यातही ते तसेच राहणार आहे.
त्याचे एका हिंदूस लिहिलेले पत्र तर आम्हा भारतीय लोकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. कदाचित या पत्रामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले असावे. वयाच्या तीस वर्षानंतर टॉलस्टायच्या जीवनाला नैतिक आणि धार्मिक आधिष्ठान प्राप्त झाले. दुष्टाव्याचा विरोध अहिंसक मार्गाने करण्याच्या त्याच्या  भूमिकेमुळे महात्मा गांधी प्रभावित झाले होते, असे मानतात. या दोन महापुरुषांमधील संबंधाची सुरवात कशी झाली ते पाहणे रंजक तसेच बोधप्रदही आहे.  भारतीय स्वातंत्र्यलढ्याला टॉलस्टाय यांचा पाठिंबा मिळावा, अशी विनंती करणारे पत्र श्री तारकनाथ दास यांनी पाठविले होते. या पत्राला उत्तर म्हणून १४ डिसेंबर १९०८ रोजी टॉलस्टाय यांनी पाठविलेल्या पत्राचे शीर्षक आहे, ‘एका हिंदूला पत्र’. यात जुलमी परकीय सत्तेविरुद्ध लढतांना सशत्र लढ्याला शांततामय मार्गाचा - अहिंसक सविनय कायदेभंग - हाच पर्याय असू शकतो, असे टॉलस्टाय यांनी प्रतिपादन केले आहे. या पत्रात त्यांनी जसा स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे. तसाच ‘तिरुकुरलचा’ही उल्लेख आहे. तमिळ विचारवंत तिरुवलवार यांनी ‘तिरुकुरल’ म्हणजेच ‘तमिळ मराई (तमिळ वेद)’ नावाची रचना सिद्ध केली आहे. यालाच ‘चिरंतन शब्द’ असेही म्हटले जाते. टॉलस्टायचे पत्र ‘फ्री हिंदुस्थान’ नावाच्या वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर ते आफ्रिकेत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी ( त्यावेळी ते ‘महात्मा’ नव्हते) यांच्या वाचनात आले. या पत्राने महात्मा गांधी खूपच प्रभावित झाले. त्यांनी टॉलस्टायला पत्र लिहून या पत्राचा गुजराथी भाषेत अनुवाद करण्याची अनुमती मागितली. यानंतर महात्मा गांधी आणि टॉलस्टाय यांच्यात पत्राने विचारांची देवाणघेवाण सुरु झाली होती. महात्मा गांधींच्या राजकीय भूमिकेवर टॉलस्टाय याच्या विचारांचा ठसा उमटला होतं, असे मानले जाते.
कादंबरीकार टॉलस्टाय
लिओ लिओ टॉलस्टाय हा आपल्या भावंडातला चौथा मुलगा. आईबापांचे निधन लहानपणीच झाल्यामुळे तसा अनाथ म्हणूनच आपल्या मावशांकडे वाढला. बालपण, किशोर वय, तारुण्य (चाइल्डहूड, बॉयहूड आणि यूथ) अशी तीन वेगवेगळी आत्मचरित्रे त्याने त्यात्या काळात लिहिली आहेत.
    त्याचे प्राथमिक शिक्षण शाळेत न जाता घरीच झाले. तो हुशार विद्यार्थी कधीच नव्हता विद्यापीठाची पदवी त्याला संपादन करता आली नाही. तो शेती सुद्धा नीट करू शकला नाही. पण तो कायम आणि सतत लिहीत राहिला. ‘कॉनटेमपररी’ या त्या काळाच्या प्रसिद्ध नियतकालिकात त्याचे लेख प्रसिद्ध होत असत.
वॉर अँड पीस ही कादंबरी लिहायला प्रारंभ त्याने १८६० साली केला. हो कादंबरी त्याने अनेक भागात लिहून प्रसिद्ध केली. १८६९ मध्ये शेवटचा भाग लिहून त्याने ही कादंबरी पूर्ण केली. नेपोलियन कालीन युद्धाच्या कालखंडावर आधारित ही कादंबरी खूप गाजली. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली  तसेच वास्तव चित्रण असलेली काल्पनिक पात्रे हे या कादंबरीचे वैशिष्ट्य होते. ते रसिकांना खूपच भावले. ऐतिहासिक घटना आणि त्या काळातले नीतीनियम याबद्दलचे वक्रोक्तीयुक्त निबंधवजा लिखाण हा या कादंबरीचा आणखी एक विशेष म्हटला जातो. आपले दैनंदिन व्यवहार कसे आहेत, यानुसार आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होत असतो. उक्तीपेक्षा कृती कशी, यावर त्याचा भर असल्याचे जाणवते.
ॲना कॅरेनिनाचे लेखन १८७३ नंतरचे. या कादंबरीला पार्श्वभूमी होती, रशिया आणि तुर्कस्थानमधील युद्धाची. वॉर अँड पीस प्रमाणेच या कादंबरीत टॉलस्टायचे जीवनानुभव साकारले आहेत, असे मानतात. विशेषत: यातील प्रियाराधनाला  टॉलस्टाय आणि सोफिया यांच्यातील प्रणयप्रसंगांची पार्श्वभूमी लाभलेली आहे, असे म्हटले जाते. या कादंबरीचे प्रारंभीचे वाक्य वाचकांच्या स्मरणात कायम स्थान ग्रहण करून  आहे, अशी नोंद त्या काळी केलेली आढळते. ‘सर्व सुखी दाम्पत्यांचा जीवनपट सारखाच असतो. पण प्रत्येक दु:खी कुटुंबाचे दु:ख मात्र वेगवेगळे असते.’ ही कादंबरी सुद्धा ह्प्त्याहप्त्यानेच चार वर्षात १८७७ साली पूर्ण प्रसिद्ध झाली. या कादंबरीने टॉलस्टायला अफाट प्रसिद्धी आणि अमाप पैसा मिळवून दिला.
कल्पित कथांना वेगळेच वळण
१८९० नंतरच्या लिखाणात त्याच्या कल्पित कथांनी वेगळेच वळण घेतले. ‘द डेथ ऑफ इव्हान लिंच’ या त्याच्या गाजलेल्या तिसऱ्या कादंबरीत कल्पिताला नैतिकतेची आणि वास्तवाची बैठक प्राप्त झालेली दिसते. क्षुल्लक बाबींना महत्व देऊन आपण आपल्या आयुष्यातील महत्वाचा कालखंड वाया घालवला, हे नायकाला – इव्हान लिंचला- जेव्हा कळते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो, कारण त्यावेळी तो मृत्यूच्या छायेत जीवन जगत असतो.
‘फादर सर्गिअस’ या छोट्याशा कादंबरीत टॉलस्टायने आपल्या नवीन आध्यात्मिक मतांची चर्चा केलेली आढळते. तर ‘रीसरेक्षन’ या कादंबरीचा कॅनव्हास पहिल्या दोन कादंबरीन्सारखाच मोठा असूनही ती रसिकांना फारशी भावली नाही. ‘द  लिव्हिंग कॉर्प्स’ हे त्याचे वक्रोक्तिपूर्ण नाटक त्याने १८९० मध्ये लिहिले. ‘हाजी मुराद’ ह्या कादंबरिकेचा शोध त्याच्या मृत्यूनंतर लागला. हिचे लिखाण १९०४ मध्येच पूर्ण झाले होते.
मी कसा ?
आपल्या आयुष्याचा आढावा घेताना तो म्हणतो, मी युद्धात अनेकांना यमसदनी पाठविले आहे, द्वंद्व युद्धात अनेकांचा खातमा केलेला आहे, जुगार खेळलो आहे, शेतकरी आणि श्रामिकान्वर अनन्वित अत्याचार केले आहेत, वेश्यागमन केले आहे, लोकांना फसवले आहे, चोरी, लांडीलबाडी, पराकोटीचे मद्यपान केले आहे, खून, मारामाऱ्या केल्या आहेत, मी केला नाही असा एकही गुन्हा नसेल. माझ्या आयुष्याची दहा वर्षे अशी गेली आहेत. तरीही तरीही माझे समवयस्क माझी गणना नैतिक पुरुषात करतात.
युद्धातील एक क्रूर सैनिक - टॉलस्टाय
शेतीतील आपल्या धाकट्या भावाची प्रगती पाहून त्याच्या मोठ्या भावाने त्याला आपल्याप्रमाणे सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला. १८५४-५५ या काळात त्याने क्रिमियन युद्धात भाग घेतला. याच वेळी त्याने ‘सेव्हास्टोपल टेल्स’ या नावाची पुस्तके लिहिली. यात त्या काळात नवीनच असलेलल्या एक लेखन प्रकाराचा त्याने वापर केला. संज्ञा प्रवाह (स्ट्रीम ऑफ कॉनशसनेस) या नावाने हा लेखन प्रकार ओळखला जातो. एका सैनिकाच्या मनातील विचारांचा मागोवा या निमित्ताने त्याने चित्रित केला आहे.
बराचसा हेकेखोर आणि काहीसा उद्धट असल्यामुळे तो कोणत्याच प्रकारच्या लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसला नाही. विद्रोही म्हणून स्वत:ला घोषित करून तो १८५७ मध्ये पॅरिसला गेला. तिथे जुगारात सर्व  गमावून बसला आणि मायदेशी परत आला. याच वेळी त्याने आपल्या आत्मचरित्राचा तिसरा खंड ‘तारुण्य’ (यूथ ) प्रसिद्ध केला. याच काळात एका डॉक्टरच्या मुलीशी – सोफियाशी - त्याचे लग्न झाले.
विद्रोही आणि वेगळाच टॉलस्टाय
 कादंबरी लेखनातून टॉलस्टायला भरपूर पैसा मिळाला पण आध्यात्मिकदृष्ट्या टॉलस्टाय अतिशय अस्वस्थ होता. ‘जीवनाचा अर्थ’ काय हे त्याला पडलेले कोडे होते. प्रारंभी तो ऑरथोडॉक्स चर्चकडे वळला. पण त्याचे समाधान होत नव्हते. उलट सर्व चर्चेस भ्रष्ट आहेत, या निष्कर्षाप्रत तो पोचला. जर सर्व मानव ईश्वराची लेकरे आहेत, असे म्हटले आहे तर युद्ध आणि हिंसा यांना आपल्या जीवनात स्थान असूच कसे शकते, हा त्याला पडलेला प्रश्न होता. प्रस्थापित धर्ममतांच्या ऐवजी त्याने आपली मते ‘मेडिएटर’ नावाचा ग्रंथ लिहून १८८३ साली मांडली. चर्चला हे सहन होणे शक्यच नव्हते. त्याला बहिष्कृत कार्यात आले. त्याच्या पाळतीवर गुप्त पोलीस सुद्धा राहू लागले. आपल्या नवीन धर्म मतानुसार आपण संपत्तीचा त्याग केला पाहिजे, असे त्याला वाटू लागले. पण त्याची बायको सोफिया हिने या विचाराला कडाडून विरोध केला. विवाहबंध तुटेपर्यंत ताणले गेले. शेवटी टॉलस्टायने १८८१ पर्यंतच्या आपल्या सर्व मिळकतीचे स्वामित्व पत्नीकडे सोपवले आणि तणाव तुटेपर्यंत ताणू दिला नाही.
   उत्तरायुष्यात टॉलस्टायला खूप आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. पण सोफियाला मात्र त्याचे जीवनविषयक सिद्द्धांत बिलकुल मान्य नव्हते. त्याला भेटायला येणाऱ्याजाणाऱ्या शिष्यांचा ती पाणउतारा करीत असे. शेवटी टॉलस्टाय वैतागला. या गोष्टीचा बभ्रा इतका झाला की, टॉलस्टाय आणि त्याची कन्या अलेक्झांड्रा तीर्थयात्रेला निघाले. अलेक्झांड्राने आपल्या पित्याची मनोभावे सेवा आणि शुश्रुषा केली. आपली ही तीर्थयात्रा खाजगी आणि गुप्त रहावी, तिचा गाजावाजा होऊ नये, अशी त्या दोघांची इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. त्यांची ही तीर्थयात्रा खूपच खडतर ठरली. शेवटी अस्टापोवा गावच्या स्टेशनमास्तरने त्यांना आश्रय दिला
‘वॉर अँड पीस’, ‘ॲना कॅरेनिना’ आणि ‘डेथ ऑफ इव्हान लिंच’ या कादंबऱ्या लिहिणारा लेखक लिओ टॉलस्टाय आजही जगातील मोजक्या प्रमुख लेखकांपैकी एक मानला जातो. नऊ सप्टेंबर १८२८ ला जन्मलेल्या या लेखकाच्या वाट्याला ८२ वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभले होते तो २० नोव्हेन्बर १९१० ला रशियातील अस्टापोव्हो या गावी  एका स्टेशनमास्तरने दिलेल्या खोपट्यात मृत्यू पावला आणि त्याने चिरनिद्रा घेतली.

No comments:

Post a Comment