Wednesday, February 3, 2016

हार्ड पाॅवरला स्मार्ट (साॅफ्ट) पाॅवरचा पर्याय किती संभवनीय?
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॅार्क,
पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

          जोसेफ नाय हा एक ज्येष्ठ अमेरिकन राजकीय विचारवंत मानला जातो. आंतरराष्ट्रीय संबंध आणि नवउदारमताचा प्रणेता आणि पुरस्करता म्हणून तो जगातील मोजक्या बुद्धिमंतांपैकी एक मानला जातो. त्याने व राॅबर्ट कीहेन या  बुद्धिमंतासोबत/ सहकाय्रासोबत 'सत्ता आणि स्वातंत्र्य ( पाॅवर ॲंड इनडिपेंडन्स )' हा ग्रंथ लिहून एक राजकीय सिद्धांत मांडला आहे. 'स्मार्ट पाॅवर' किंवा 'चतुर शक्ती' या नावाने हा सिद्धांत ओळखला जायचा. सध्या जोसेफ नाय फेसबुकवर उपलब्ध असतो. पण कितीतरी अगोदरपासूनच अमेरिकेचे माजी अध्यक्ष जाॅन एफ केनडी आणि बिल क्लिंटन यांच्या विचारांवर याच्या मताचा पगडा होता, असे मानतात. भारताच्या राजकारणाच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला असता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे स्वतंत्रपणे पण याच विचाराला अनुसरून आहेत, हे जाणवते. पण खरे तर हा भारतीय राजनीतीचा प्राचीन वारसा आहे, हे लक्षात येते. नव्हे हा राजनीतीचा नव्हे तर नीतीचा वारसा आहे आणि तो मवाळ शक्तीच्या संकल्पनेच्या तुलनेत चांगलाच संपन्न आहे हे लक्षात येईल. जोसेफ नाय याने तो संक्षिप्त रूपात किंवा अपूर्ण रूपात नव्याने मांडला, असे फारतर मानता येईल. भारतीय संस्कृती जगभर पसरली ती तरवारीच्या जोरावर नव्हे तर आणखी कशाच्या तरी जोरावर. जोसेफचा सिद्धांत या नीतीचा मागोवा घेत आहे, पाऊलखुणा शोधत पुढे जातो आहे असे म्हणता येईल.
                                                'इज दी अमेरिकन सेंच्युरी ओव्हर?'
        अमेरिकेची सध्याची परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल ज्यो (जोसेफ) नायने दाखविलेल्या मार्गाने चालू आहे, असे मानले व म्हटले जाते. २०१४ साली ज्यो नायला अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरण मंडळात सन्मानपूर्वक समाविष्ट करून अमेरिकेने त्याच्या मताचे अनुसरण करण्याचे ठरविले आहे, असे मानतात. तो संरक्षणविषयक धोरण समितीचाही सदस्य आहे. 'इज दी अमेरिकन सेंच्युरी ओव्हर?'( अमेरिकेचे शतक संपले आहे काय?) या शीर्षकानुसार त्याने नुकताच एक ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला आणि उच्चस्तरावर चर्वितचर्वण सुरू झाले. तसे नायचे आणखी डझनभर ग्रंथही विचारप्रवर्तक मानले जातात.
                                                       अमेरिकेने वेगळा पर्याय स्वीकारावा
          आता 'स्मार्ट पाॅवर' ऐवजी 'साॅफ्ट पाॅवर' असा शब्दप्रयोग प्रचलित असून चतुर शक्तीची जागा मवाळ शक्तीने घेतली आहे. हा शब्दप्रयोग नायने प्रथम १९८० साली केला असला तरी प्रत्यक्षात तो १९९० सालपासून प्रतिष्ठा पावला आहे. परराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेने आजवर कधीही मवाळ सत्ता वापरली नव्हती. क्यूबा, व्हिएटनाम, इराक विषयक धोरण ठरवितांना मवाळपणाऐवजी मस्तवालपणाचाच आधार अमेरिकेने घेतला आहे. या प्रकरणात सैनिकी अपयशाच्या जोडीला अपमान व अपकीर्ती अमेरिकेच्या वाट्याला आलेली दिसते. इराण प्रकरणी अमेरिकेने जो शहाणपणा दाखविला आहे त्याच्या मुळाशी ही 'अद्दल' आहे की ज्यो नायचा मवाळ शक्तीचा (साॅफ्ट पाॅवरचा) सिद्धांत आहे, ते यथावकाश कळेल.
 मवाळ शक्ती सिद्धांत बळजबरीऐवजी आकर्षणावर, प्रलोभनावर, समजुतीच्या राजकारणावर भर देतो. प्राचीन भारतीय नीती ( राजनीती नव्हे) याच्या कितीतरी पुढे गेली होती. ती आत्मीयतेवर आधारित होती. बुद्धाचे तत्त्वज्ञान विस्तारले ते दया आणि करुणा यांचा पुरस्कार करीत. मर्यादापुरुषेत्तम भगवान रामचंद्राची कीर्ती तर दिगंत पसरली होती. राम आणि राजा हे शब्द जणू समानार्थी झाले होते. इजिप्तचे प्राचीन शासक स्वत:ला रॅमसी १, रॅमसी २ अशी नावे स्वीकारून  स्वत:चा गौरव करून घेत, असे म्हणतात. हे न तरवारीच्या बळावर साध्य झाले होते न राजनीतीच्या! मग कोणती होती ही नीती? तिचा आधार होता. आत्मीयता. वन वर्ल्ड किंवा ग्लोबल व्हिलेजच्या किती तरी अगोदर आपल्याला 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेचा साक्षात्कार झाला होता.
                                           वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
       पण ही झाली वडलांची कीर्ती. आजचे काय? याच नीतीचा आविष्कार अटल बिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौय्रातील त्यांची जी वक्तव्ये ऐकायलाआली/ येत आहेत, त्यातून व्यक्त होताना दिसते. ही भारताची जुनीच परंपरा राहिलेली आहे. मोदींचे दौरे आताचे, त्यांचे वृत्त ताजे, तसेच वृत्तप्रसार माध्यमेही प्रचंड गतीमान, म्हणून चटकन जाणवतात, इतकेच. प्रत्येक देशाची काही बलस्थाने असतात. लोकशाही, हाॅलिवुड, साहित्य, खाद्यपदार्थ, संगणक  व तत्त्वज्ञान ही अमेरिकेची बलस्थाने आहेत. जागतिक लोकमताला आपल्याकडे खेचून आणण्यात ती किती यशस्वी झाली आहेत, ते आपण जाणतोच. यांचा प्रतिमासंवर्धनासाठी अमेरिकेने अतिशय कुशलतेने उपयोग करून घेतला आहे. जग अमेरिकेचे या क्षेत्रात अनुकरण व अनुसरण करीत आहे. 'अनुकृती ही सर्वोत्तम स्तुती',  ही उक्ती मान्य केली तर या गोष्टीचे महत्त्व लक्षात येण्यास मदत होईल.
                                             बलस्थाने ओळखून युगानुकूल करण्याची गरज
          भारताची बलस्थाने कोणती? आपल्याला संपन्न असा सांस्कतिक वारसा आहे. आपले संगीत, शिल्पकला, नृत्य या कला जगभर वाखाणल्या जातात. आयुर्वेदाला स्वीकारण्यास जग तयार आहे ( त्याचे रूप विज्ञान अनुसरणारे व वस्तुनिष्ठ होण्याची आवश्यकता आहे. ही आवश्यकता आपण पूर्ण करीत आहोत, ही चांगली बाब आहे) 'योगाचे' ( 'योग' म्हणायचं नाही बरं!) अनुसरण जगभर होत आहे. भारतीय तत्त्वज्ञान व साहित्य यालाही जगात मान्यता आहे. हिंदू धर्म हा उदारमतवादी म्हणून विद्वान मंडळी स्वीकारत आहेत. झिरपण्याचा सिद्धांत ( परकोलेशन थिअरी) मान्य केला तर तो सामान्यांमध्येही स्वीकार्य ठरण्यास हरकत नसावी. या सिद्धांतानुसार असे मानतात की, एखादे मत अगोदर ज्येष्ठांना, विद्वानांना आणि श्रेष्ठांना मान्य होते आणि मग हा विचार हळूहळू जनसामान्यातही झिरपत जातो. भारतीय खाद्यपदार्थही लोकप्रिय होत आहेत. संकटकाळी मदतीसाठी आत्मीयतेने व कर्तव्य म्हणून धावून जाण्याची भारताची भूमिका ( नेपाळचा भूकंप), शांततारक्षणाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या आपल्या सैन्यदलाची संयमित व निपक्षपातीपणे काम करण्याची वृत्ती व निरलस भूमिका, युद्ध कौशल्यातील सफाई (युनोच्या शांततारक्षक दलातील आपला सहभाग) यामुळे भारताची प्रतिष्ठा वर्धिष्णू आहे. अनिवासी भारतीय हे सुद्धा एक बलस्थान सिद्ध होण्यासारखे आहे. पण आपल्याबद्दल असूयेची भावना निर्माण होणार नाही याची काळजी भारतीयांना घ्यावी लागेल. नागरिकत्व बहाल करण्याचे बाबतीतले भारतीयांच्या संबंधातले देशोदेशींचे व्हिसाविषक नियम सर्वात कडक आणि काटेकोर का आहेत, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.
                                           कोणती शक्ती श्रेयस्कर मवाळ की जहाल?
         म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, मवाळ शक्तीचा वापर जपून केला पाहिजे. ती उलटूही शकते. अमेरिका आपल्या धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा विचार करीत आहे, असे दिसते. रणनीती कूस बदलते आहे. इराणशी झालेला करार याचा परिचायक ठरावा. चीनही रुपेरी चाबूक वापरतो आहे. मदत व कर्जाच्या रूपाने पैशाची उधळण करतो आहे. श्रीलंका त्याच्या जाळ्यात सापडेल की काय ही भीती श्रीलंकेतील सत्ताबदलामुळे काहीशी कमी झाली आहे. पाकिस्तानचे तसे नाही. अमेरिका आणि चीन या दोघांकडूनही तो पैसे व सामग्री उकळतो आहे. अर्थात हे दोघेही कच्या गुरूचे चेले नाहीत. ते पैसे देतील पण तरीही आर्थिक नाड्या आपल्या हाती ठेवतील. अण्वस्त्रे पाकिस्तानात पण त्यांचा रिमोट आपल्या हाती ठेवतील. शस्त्रास्त्रे देतील पण दारुगोळ्यासाठी पकिस्तानला आपल्यावर अवलंबून ठेवण्याची काळजी घेतील. पण केवळ याच्याच भरवशावर राहून चालणार नाही. तिकडे इजिप्तमधील शासक सुन्नीपंथीय असूनही इसीसशी( तिचे नेतृत्त्वही सुन्नीच असले तरी) फटकून वागते आहे हे खरे पण इजिप्तच्या जनतेची सहानुभूती मात्र इसीसकडे आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नायजेरियात बोको हरामला नुकतीच एक जबरदस्त थप्पड बसली असली तरी तेवढे पुरेसे नाही. ते पुरते नामोहरण झालेले नाहीत. पाकिस्तानच्या कुरबुरही सहजासहजी थांबणार नाहीत. अतिरेकी हल्ले करण्याचे साहस करून पाहणारच. त्यामुळे मवाळ शक्ती व शस्त्राधारित जहाल शक्ती ( हार्ड पाॅवर ) यांचा प्रसंग व देशपरत्वे तारतम्याने वापर करण्यात आपल्या परराष्ट्र नीतीचा कस लागणार आहे. 'ठकाशी ठक, उद्धटाशी उद्धट', ही नीती कालबाह्य होण्यासाठी प्रत्येक देशातील जलवाहिन्यांमधून बरेच पाणी वाहून जावयाचे अजूनही बाकी राहिले आहे, हे विसरून चालणार नाही.

No comments:

Post a Comment