Wednesday, February 3, 2016

अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
            २०१६ सालच्या अखेरीला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या घटनेप्रमाणे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविता येणार नाही. डेमोक्रॅटिक पक्षाने यावेळी राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून श्रीमती हिलरी क्लिंटन यांचे नाव निश्चित केले अाहे, असे दिसते. रिपब्लिकन पक्षाला ही जागा डेमोक्रॅट पक्षाकडून जिंकून घ्यायची आहे. त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार अजून निश्चित व्हावयाचा आहे. ही निवड केवळ पक्षाचे पक्षश्रेष्ठीच करीत नाहीत. तळागाळातले कार्यकर्ते, पक्ष सदस्य व जनतेतील त्या त्या पक्षाचे समर्थक या निवडीच्या कामी सहभागी होत असतात. त्यामुळे यांची मते आपल्याला मिळावी म्हणून अनेक इच्छुक उमेदवारांचा आटापिटा सुरू असतो. यासाठी चर्चेच्या फेऱ्या झडत असतात. पाचवी फेरी नुकतीच पार पडली आहे. राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार किती उथळपणे विचार करीत आहेत, याचे प्रत्यंतर या चर्चेच्या निमित्ताने यांनी प्रगट केलेल्या विचारांवरून समजते. आजही अमेरिकेवरील आर्थिक संकट दूर झालेले नाही. पण एकाही उमेदवाराने याबाबत कोणत्याही प्रकारचे मत प्रदर्शन केलेले आढळत नाही. सगळ्यांच्या तोंडी युद्धखोरपणाची भाषा दिसते आहे. आज जगासमोर अतिरेकी उपद्रव आणि उच्छाद हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे, हे कोणीही मान्य करील. याचा सामना कसा करावा, हा प्रश्नही सर्वांनाच भेडसावत आहे, हेही खरे. पण म्हणून बेताल वक्तव्ये समर्थनीय ठरत नाहीत.
   डेमोक्रॅट पक्षाने हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी देऊ केली आहे. वाढते वय, दीर्घ व गंभीर आजार असल्याच्या अफवा (?), भ्रष्टाचाराचे आरोप हे त्यांच्या बाबतीतले मुद्दे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्ष जनतेसमोर मांडतो आहे. विख्यात कायदे तज्ज्ञ, परराष्ट्रीय धोरण राबवण्यातला त्यांचा अनुभव व हातखंडा, रोखठोख भूमिका घेण्याची वृत्ती व माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची पाठराखण करण्याची त्यांची मनोभूमिका ( आपल्या पतीचे मोनिका व्हिशिंस्की प्रकरणी उघड झालेल्या बदफैलीपणाकडे दुर्लक्ष करून त्यांनी या मनोभूमिकेचा परिचय त्यांनी जगाला करून दिला होता) व ओबामा या आपल्या पक्षांर्गत उमेदवाराला तो अध्यक्ष म्हणून निवडून येताच त्याच्या हाताखाली काम करण्याचा दाखविलेला दिलदारपणा यामुळे त्यांची बाजू उजवी ठरते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या पाकिस्थानला झुकते माप देत असत, ही भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय राजकारणात भूमिका बदलायला फारसा वेळ लागत नाही, तसेच याचे फारसे सोयरसुतकही कोणाला नसते ही गोष्ट वेगळी. ते काहीही असले तरी आजतरी रिपब्लिकन पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या तुलनेत त्यांचे स्थान उजवे आहे, हे मान्य केले पाहिजे.
   रिपब्लिकन पक्ष तसा सनातनी ( काॅन्झरव्हेटिव्ह) मानला जातो.  या पक्षाच्या उमेदवाराचा स्तर व बौद्धिक पातळी चिंता निर्माण करणारी आहे.  कारण जागतिक राजकारणात अमेरिकेची भूमिका आजवर महत्त्वाची रहात आली आहे व भविष्यातही ती तशीच राहणार आहे. आयसिसला मात्र सगळ्यांचा एकजात प्रखर विरोध आहे. ओबामांनी देशाचे वाटोळे करण्याचा चंग बांधला आहे, हेही एकजात सर्वांचे मत आहे.
  बेन कार्सन- हे न्युरो सर्जन आहेत. सगळा देशच आजारी पडला असून आता माझ्यासारख्या सर्जनचीच देशाला गरज आहे, असे यांचे म्हणणे आहे. नरसंहाराबाबत खरे तर वैद्यक शास्त्रातील कोणत्याही तज्ज्ञाने खूपच संवेदनशील असले पाहिजे.पण यांचे असे नाही.
  जेब बुश- हे फ्लोरिडा प्रांताचे गव्हर्नर आहेत. बुश कुटुंबातील आहेत. ओबामावर त्यांचा खूप राग आहे. त्यांच्यामुळे अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असे त्यांचे मत आहे.
डोनाल्ड ट्रंप- हे सतत वादग्रस्त विधाने करीत असतात. एकाही मुसलमान निर्वासिताला अमेरिकेत येऊ देऊ नये, असे त्यांचे ठाम मत आहे. इंटरनेटमुळे दहशतवाद फोफावला तेव्हा इंटरनेटवरच नियंत्रण आणले पाहिजे, असेही त्यांचे एक आवडते मत आहे. सध्या अमेरिकेत ट्रंप खूपच लोकप्रिय आहेत. त्यांची विवेकशून्य पण भडकावू भाषणे सुद्धा लोकांच्या आवडीची ठरत आहेत. ट्रंप यांचा बांधकामाचा भलामोठा व्यवसाय आहे. मध्यपूर्वेत म्हणजे मुस्लिमबहुल भागातच त्यांचा व्यवसाय सुरू आहे. या वेळी आणि या काळात ते मुस्लिमांवर स्तुतिसुमने उधळीत असतात. त्यांची राजकीय समज आणि राजकीय ज्ञानही अतिशय मर्यादित आहे. पण गडी अमेरिकन जनमानसात पाठिंबा मिळवतो आहे. यावरून काय निष्कर्ष काढायचा तो ज्याचा त्याने काढावा.
  कार्ली फिओना - पक्षाच्या संभाव्य उमेदवारात एक महिलाही आहेत. त्यांचे नाव आहे हे कार्ली फिओना. या एका बड्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सी ई ओ) आहेत. आपण धीराच्या महिला आहोत, असा त्यांचा दावा आहे. आपण स्वत: कॅन्सर वर मात केली आहे, तसेच कुटुंबातील अनेक जण मृत्यूमुखी पडले असतांनाही आपण डगमगलो नाही, असे त्या सांगत असतात. त्यामुळे आपण दशशतवाद निपटून काढण्यास समर्थ आहोत, असा त्यांचा दावा आहे.      बेकारी व ढासळलेली अर्थव्यवस्थाही राष्ट्राध्यक्षा समोरचे महत्त्वाचे व कर्तृत्त्वाला आव्हान देणारेच प्श्न असणार आहेत. पण यांचा त्या उल्लेखही करीत नाहीत. तसे पाहिले तर हे दोन प्रश्न इतर उमेदवारांनाही महत्त्वाचे वाटत नाहीत.
ख्रिस ख्रिस्ती-  यांना वर्तमानकाळातील व्यक्ती आणि निरोप घेऊन निजधामाला केव्हाच गेलेल्या व्यक्ती यात गल्लत करण्याची सवय आहे.
     डेमोक्रॅटिक पक्षाबाबतचा अॅंटिइंकंबन्सी फॅक्टर, युद्धखोरीची हमखास टाळ्या मिळवणारी भाषा, सर्वसाधारण अमेरिकन व्यक्तीचे अतिरेक्यांच्या पारिपत्यासाठी कठोर पावले उचलावीत असे दिवसेदिवस आग्रही होत चाललेले मत यामुळे रिपब्लिकन उमेदवार खरेच निवडून आला तर काय, ही समंजस अमेरिकन लोकांना धास्ती वाटते आहे. पण नोव्हेंबर २०१६ अजून पुष्कळ दूर आहे. राजकारणाला कूस बदलायला तर एक आठवडाही पुरेसा असतो. त्यामुळे आपणही सध्याच कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई करूया नको.

No comments:

Post a Comment