Wednesday, February 3, 2016

   हाॅस्पिटलवर दरोडा पडतो तेव्हा -
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
दूरध्वनी -(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन,
यॅार्क,  पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  आॅस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरातील लेडी सिलेंटो चिल्ड्रेन्स हाॅस्पिटलमधील ही घटना. दोन कुख्यात दरोडेखोर (चाचे ) आत घुसले!! सर्वत्र एकच गोंधळ उडाला. आता काय होणार या लहान लहान रुग्णांचं! पण कसलं काय अन् कसलं काय! सगळ्यांनी त्या चाच्यांना (दरोडेखोरांना) गराडा घातला! बिछान्यावर एरवी खिळून असलेली बालके अंगात कसलातरी संचार व्हावा, अशी ताडकन उठून बसली.  काहींनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले. काहींनी तर चक्क मिठ्याच मारल्या! यात मुली आघाडीवर असाव्यात ना?
  सर्व कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. त्यांनाही अतिशय आनंद झाला. कारणही तसेच होते. ते दोघे लोकप्रिय सिनेकलाकार होते, जाॅनी डेप आणि स्टीफन ग्रॅहॅम!
  त्याचे असे झाले होते की, हे दोघे 'पायरेट्स आॅफ कॅरिबियन - डेड मेन टेल नो टेल्स' च्या शूटिंगसाठी तयार झालेले असतांना त्यांच्या मनात आले की, ही बाल गोपाल मंडळी आपल्यावर एवढे प्रेम करीत असतात, आपण मात्र याची परतफेड करीत नाही. शूटिंग सुरू व्हायला थोडा वेळ होता. ते तडक निघाले. आणि हाॅस्पिटलमध्ये येऊन दाखल झाले. आणि हा बालगोपाल दुखणाइतांचा आनंद मेळा संपन्न झाला. तो जवळजवळ तीन तास सुरू होता. जे बिछान्याला खिळून होते त्यांच्याजवळ जाऊन या दोघांनी त्यांचे क्षेमकुशल चिंतले. अनेक दिवसांच्या औषधोपचाराने जे साध्य झाले नव्हते व नसते असे चैतन्य निर्माण झाले. मुलांनी आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढले, म्हणजे 'सेल्फी' काढली. दरोडेखोरांनी दरोडा घालून मिळवलेली 'लूट' आपल्या बालमित्रांबरोबर 'शेअर' केली. हा ठेवा त्यांची आयुष्यभर साथ करणार होता.
 हाॅस्पिटलच्या अधिकाय्रांना अगोदर कल्पना देऊन व ठरवून हे दोघे हेलिकाॅप्टरने छतावरच उतरले होते. या दोघा दरोडेखोरांच्या भेटीने पेशंट्स तर सुखावलेच पण , त्यांच्या पालकांनाही आपल्या मुलांच्या दुखण्याचा विसर पडला आणि सर्व कर्मचारी वर्ग सुद्धा काही तासापुरता का होईना आपली व्यावसायिक धांदल, धडपड बाजूला ठेवून या आनंदमेळाव्यात सामील झाला होता.
एका पेशंटने म्हटले आहे की,माझे आॅपरेशन झाल्यानंतर आजच मी इतकी हसले. तर दुसरीने म्हटले आहे, आता मी लवकर बरी होणार!
 दरोडेखोर म्हणाले आमच्याही वाट्याला ही या अनुभवाची वेगळीच दौलत आली आहे. प्रत्येकदा दौलत सोन्यानाण्यातच असते, असे थोडेच आहे?

No comments:

Post a Comment