Thursday, February 4, 2016

जॅान नॅशचा अपघाती मृत्यू

वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॅार्क,
पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
                                                                                      Blog - kasa mee?

            'ए ब्युटिफुल माईंड' या आॅस्कर विजेत्या चित्रपटाचा प्रेरणाश्रोत, विख्यात गणितज्ज्ञ, निर्णयक्षमतेशी संबंधित गणितातील गेम थिअरीचा जनक, अर्थशास्त्रातील १९९४ चा नोबेल पारितोषिक विजेता, आठवड्यापूर्वीच गणितातील अतिशय मानाच्या ॲबेल पारितोषिकाने गौरवांन्वित झालेला विजेता,  शिझोफ्रेनिया या मनाचा कॅन्सर समजल्या जाणाय्रा रोगाला औषधांच्या नव्हे तर मनोबलाच्या सहाय्याने  व आंतरिक शक्ती जागवून यशस्वी झुंज देणारा झुंझार लढवय्या, जिच्याशी १९५७ साली विवाह केला तिला १९६२ साली घटस्फोट देणारा आणि दिलजमाई होऊन तिच्याशीच पुन्हा  २००१ विवाह करणारा, गोंधळ आणि परस्परविरोध यांचे अजब रसायन स्वभावात असलेला, काहीसे स्वैरजीवन जीवन जगणारा, एक अनौरस पुत्र असलेला,  निस्सीम प्रेम करणाय्रा स्वत:च्या पत्नीच्या बाबतीत कधी प्रेमाची तर कधी द्वेशाची भूमिका घेणारा, स्वत:च्या मुलालाही शिझोफ्रेनिया झाल्याचे कळताच त्याच्या मदतीसाठी धावून जाणारा, ॲबेल पारितोषिकाचा स्वीकार करून सपत्निक परतीच्या वाटेवर असलेला,  ८६ वर्षांचा जॅान नॅश आपली ८२ वर्षांची पत्नी अॅलिशिया हिच्यासह एका मोटार अपघातात २३ मे २०१५ ला  जगाचा निरोप घेता झाला.
अपघाती मृत्यू
    त्याचे असे  झाले की, नॅश पतीपत्नी  न्यू जर्सी प्रांतात कारने प्रवास करीत होते. बहुदा सीट बेल्ट न लावता ! दुसय्राची कार यांच्या  कारवर आदळली आणि हे दोघेही गाडीबाहेर फेकले गेले. असा हा जीवघेणा अपघात झाला होता. ॲलिशियाचे आपल्या नवय्रावर निरतिशय प्रेम होते. साथीदाराची जपणूक कशी करावी, याचा तिने आदर्शच उभा केला होता. या आजारपणाच्या आणि नंतरच्या काळात  या दांपत्त्याने मानसिक आरोग्याचा ध्यास  घेतला होता आणि त्या दृष्टीने ते इतरांनाही सतत साह्य व मदत करीत असत.
मुलाचे पाय पाळण्यात दिसले पण फक्त आईला!
        वेस्ट व्हर्जिनिया प्रांतातील ब्ल्यूफिल्ड येथे जन्मलेल्या जॅान नॅशचे प्रारंभीचे शिक्षण पिट्सबर्गला झाले. शाळेत त्याची गणितातली गती सामान्य दर्जाची गणली जायची. शिक्षक त्याला अपरिपक्व मानायचे.  मात्र त्याच्या आईला त्याच्या बौद्धक क्षमतेची चाहूल लागली होती. प्रश्न सोडविण्याची त्याची पद्धत नवीन आणि वेगळी असायची, हे तिला जाणवत असे.
      जसजसे जॅानचे वय वाढत गेले तसतसे त्याच्या बुद्धीला नवनवीन घुमारे फुटत गेले. त्याला कार्नेगी विद्यापीठाची पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली( शिष्यवृत्तीचे पूर्ण आणि निम्मी असे दोन प्रकार असत.) अभियांत्रिकी आणि रसायन या विषयात त्याचे मन रमेना. गणितात मात्र त्याच्या बुद्धीची झेप एवढी मोठी होती की गणिताचा सर्व अभ्यास वेळेपूर्वीच पूर्ण करून तो पदवी संपादन करता झाला.  पुढे तो प्रिन्सटनचा रहिवासी झाला. प्रिन्सटन विद्यापीठाच्या परिसरात १९८० ते १९९० या दशकात, एकाच पायावर भर देत भरभर चालणारी, छोटीछोटी पावले टाकत जाणारी किंवा वाचनालयातील एका कोपय्रात बसून भराभर व एकापाठोपाठ अगम्य गणितीय समीकरणे खरडणारी ही वल्ली पाहून काही लोक तिच्यापासून चार हात अंतर ठेवूनच असत. तो काय करतो आहे, हे ज्यांना थोडेफार कळत होते, ते सुद्धा त्याच्या ज्ञानसाधनेत उगाच व्यत्यय नको म्हणून का होईना, पण त्याच्या पासून दूरच असत. त्याची ओळख 'अलौकिक बुद्धिमत्तेचा पुरूष', अशा तीन शब्दातच करून दिली जायची. हा विसाव्या शतकातला अतिश्रेष्ठ असा एकमेव गणिती आहे, असे लोक मानू लागले.
चार शब्दांचे शिफारसपत्र !
       प्राध्यापक रिचर्ड डफिन हे त्याचे गुरू. त्यांनी त्याला फक्त चार शब्दांचे शिफारस पत्र दिले. 'धिस मॅन इज जिनीयस'. प्रिन्सटन विद्यापीठाला एवढेच पुरेसे होते. विद्यापीठात त्याची शीघ्रकोपी, एकलकोंडा, अलिप्त, चमत्कारिक, घुमा, फळ्यावर सतत गणितीय समीकरणे खरडणारा अवलिया  म्हणून ओळख झाली होती.
आईनस्टीनशी मतभेद
    जॅान कोणाचीही भीडमुर्वत ठेवीत नसे. शब्दच्छल त्याला माहितच नव्हता. आईन्स्टीन आणि न्यूमन हे त्यावेळचे दिग्गज! या दोघांनाही जॅानच्या कल्पनांचे मूलभूत स्वरूप पटत नव्हते. त्यांनी त्याला तसे स्पष्ट सांगितले सुद्धा. पण याचा जॅानच्या भूमिकेवर काहीही परिणाम झाला नाही. तो आपल्या विचारांवर आणि भूमिकांवर अडिग राहिला.
   वयाच्या २२ व्या वर्षी २७ पानी प्रबंध लिहून त्याने डॅाक्टरेट प्राप्त केली. पुढे तर त्याने आपला प्रबंध ३१७ शब्दातच आटोपता घेतला. एवढ्या चिमुकल्या प्रबंधाला आजवर कधीही नोबेल पारितोषिक मिळालेले नाही.
'एखाद्या खेळीमध्ये अनेक व्यक्ती सहभागी असतील तर जोपर्यंत इतर सहभागी व्यक्ती आपली चाल बदलत नाहीत, तोपर्यंत कुणालाही आपली चाल बदलून लाभ होणार नाही', असा काहीसा जॅान नॅशचा समतोलाचा सिद्धांत आहे.
  समजा, एखादा लहानसा गुन्हा करतांना अ आणि ब असे दोन गुन्हेगार सापडले आहेत आणि याबाबत पुरेसा पुरावा उपलब्ध आहे, अशी आपण कल्पना करू या. या गुन्ह्यासाठी दोन वर्षांची कैदेची शिक्षा आहे, अशीही आपण कल्पना करू या. चौकशी दरम्यान असे लक्षात आले की, या दोघांनी दरोडाही घातला आहे आणि त्यासाठी दहा वर्षांच्या कैदेची शिक्षा आहे. पण याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे कुणातरी एकाचे सहकार्य आवश्यक आहे. सहकार्य केले म्हणून एकाला शिक्षेत सूट आणि दुसय्राला पुरेपूर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे, असे ही गृहीत धरू या.
चार संभावना
१. दोघांनीही आपले गुन्हे कबूल केले तर सहकार्य केल्याचा फायदा दोघांनाही मिळेल आणि प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा होईल.
२. अ ने आपला गुन्हा कबूल केला आणि ब ने नाकबूल केला तर सहकार्य केले म्हणून अ ला एक वर्षांची शिक्षा होईल पण ब ने सहकार्य न केल्यामुळे त्याला दहा वर्षांची शिक्षा होईल.
३.ब ने आपला गुन्हा कबूल केला आणि अ ने नाकबूल केला तर सहकार्य केले म्हणून ब ला एक वर्षांची शिक्षा होईल पण अ ने सहकार्य न केल्यामुळे त्याला दहा वर्षांची शिक्षा होईल.
४. दोघांनीही आपला गुन्हा नाकबूल केला तर दरोड्याबाबतचा आरोप सिद्ध करता येणार नाही आणि लहानशा गुन्ह्याबद्दलच दोघांनाही प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा होईल.
   दोघांनीही आपला गुन्हा मान्य केल्यास प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा होईल. हीच संतुलित अवस्था आहे. अन्य तीन अवस्थांमध्ये एखाद्याने आपली भूमिका बदलली तर काय दुसय्रावर काय परिणाम होईल? नॅशचा समतोल सिद्धांत सांगण्याचा हा प्रयत्न नाही. थोडीशी झलक जरी दिसली तरी पुरे, असा मर्यादित उद्देश आहे.

पण संशोधनाच्या याच काळात त्याला शिझोफ्रेनिया या मानसिक रोगाने पछाडले. अनेकदा या रोगाचा उल्लेख मनाचा कॅन्सर असा केला जातो. नॅशचे सिद्धांत जगभर वाखाणले आणि उपयोगात आणले जात होते. पण अनेक लोक तो मेला आहे, असेच समजत होते. आयुष्यभर  तो या रोगाशी सतत २५ वर्षे झुंझत होता. हा रोग त्याच्या विद्वत्तेचा मूळ स्रोत असलेल्या जाणिवेच्या मुळावरच उठला होता.  १९५७ साली त्याचा ॲलिशियाशी विवाह  झाला होता. या काळापासूनच गेम थिअरीबाबतचे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते आणि याचसुमारास त्याला शिझोफ्रेनियाचाही त्रास व्हायला सुरवात झाली. ॲलिव्हियाने मानसोपचार तज्ज्ञाकडून त्याच्यावर वेळोवेळी उपचार करवले. पण हे रोगी इतरांसाठी धोकादायक ठरू शकतात. आपल्या मुलाच्या जिवावर बेतल्याचे लक्षात  आल्यावर मात्र ॲलिव्हिशिचा निरुपाय झाला. पतीपत्नी घटस्फोट घेऊन १९६२ साली विभक्त झाले. पण एकमेकापासून दुरावले मात्र नव्हते.
नोबेल पारितोषिकाचा मानकरी
    नॅशचा समतोल सिद्धांत 'नॅश इक्विलिब्रिम' म्हणून शास्त्रीय जगतात सर्वविदित आहे. यासाठीच तो नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला. हा सिद्धांत काहीसा असा आहे. 'संघर्ष आणि सहकार्याच्या अवस्थांचे विश्लेषण करणे आणि अशा अवस्थेत लोक एकमेकांशी कसे वागतील याविषयी अंदाज बांधणे'. आर्थिक विश्लेषणात ही बाब खूप महत्त्वाची ठरली आहे. संगणक, उत्क्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात तिचा खूप उपयोग झाला आहे. भ्रष्टाचार आणि ग्रीसमधील आर्थिक संकट यांचे निवारण करतांनाही हा सिद्धांत उपयोगी ठरला आहे. गणितासारख्या विषयाचा व्यावहारिक आणि दैनंदिन जीवनातील बाबींशी संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकासाठी उपयोग होण्याचे हे जगाच्या इतिहासातील एवढे ठळक असे बहुदा पहिलेच उदाहरण असावे. एवढेच नाही तर गणित, अर्थशास्त्र आणि विज्ञानाच्या अभ्यासकांच्या अनेक पिढ्यांना जॅान नॅशचे गेम सिद्धांताच्या निमित्ताने मांडलेले विचार प्रेरणादायी ठरले आहेत.
          ॲास्कर विजेता चित्रपट -
 २००१ साली त्याच्या जीवनावर 'ए ब्युटिफुल माईंड' या नावाचा चित्रपट निघाला. गणितविषयातील त्याचे अलौकिक संशोधन आणि शिझोफ्रेनिया सारख्या रोगाशी त्याची २५ वर्षांची यशस्वी झुंज या दोन्हीमुळे तो 'ए ब्यूटिफुल माईंड' या चित्रपटाचा नायक ठरला. रसेल क्रो या अभिनयकुशल नटाने या चित्रपटात जॅान नॅशची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला २००२ साली ॲास्कर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००२ मधील ॲास्कर पारितोषिक  वितरण सोहळ्याला दिलजमाई झालेले नॅश पतीपत्नी उपस्थित होते. कारण पुन्हा विवाह करून ते पतीपत्नी झाले होते.
       आपल्या संशोधनाचे महत्त्व जॅानला कधीच जाणवले नाही. अतिशय क्षुल्लक कार्यासाठी मला नोबेल पारितोषिक मिळाले, असा विनोद तो आयुष्यभर करीत राहिला. मनोनिग्रहच्या भरवशावर वयाची तिशी ओलांडण्यापूर्वीच त्याचे आयुष्यभराचे कार्य पूर्ण होत आले होते. श्रीनिवास रामानुजन, बर्नहार्ड रीमन यांनी विशीतच जीवनातील अलौकिक  कार्य साध्य केले नव्हते काय? याच मालिकेतील आणखी एक मणी होता जॅान नॅश!

No comments:

Post a Comment