Wednesday, February 3, 2016

एका अफलातून अवलियाची अफलातून  कल्पना
        अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील याॅर्क शहराच्याजवळच जोड्याच्या आकाराची इमारत आहे.जोड्याच्या आकाराचे ‘शू हाउस’ ही एक अजब कमाल आहे. याची रचना करणारा एक अवलियाच म्हटला पाहिजे. याची बांधणी कर्नल मालोन हेन्स याने केली आहे. याचा पादत्राणे तयार करण्याचा व्यवसाय होता. माणूस हाडाचा ‘बेपारी’ होता. या व्यवसायातला तो बादशहा (विझार्ड) मानला जातो. निरनिराळ्या ठिकाणी त्याची चाळीस दुकानांची मालिका होती. आपल्या इथे आमची कुठेही शाखा नाही, अशी जाहिरात आपण पाहिली असेल. 'आमची शाखा कुठे नाही?', असा जणू याचा सवाल असे. आपली आणि आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी म्हणून त्याने  चक्क जोड्याच्या आकारचे ‘शू हाउस’ बांधले आहे. ४८ फूट लांब, १७ फूट रुंद आणि २५ फूट उंचीचे हे पादत्राणगृह हेन्सने १९४८ साली बांधले. बांधकामात लाकडाचा उपयोग मुख्यत: करण्यात आला असून आवश्यक तिथे तारा आणि सिमेंटचा वापर मजबुतीसाठी केला आहे. यात तीन बेड रूम्स, दोन बाथ रूम्स एक किचन आणि लिव्हिंग रूम आहे..
     सुरवातीला हेन्स वयस्कर दाम्पत्याला या ‘गेस्ट हाउसमध्ये’ रहायला बोलवी. त्यांची राजेशाही बडदास्त ठेवी. जातांना त्यांना कपडेलत्ते देऊन त्यांची बोळवण करी. पुढे तो हे ‘गेस्ट हाउस’ मधुचंद्राला येणाऱ्या जोडप्यांना देऊ लागला. हेन्सच्या आरोग्यविषयक सवयी वाखाणण्यासारख्या होत्या. तो स्वत: निर्व्यसनी तर होताच पण धुम्रपानविरोधी मोहीम सुरु होण्या अगोदारपासूनच त्याचा धुम्रपानाला विरोध होता. रस्त्याने  कोणी सिगरेट ओढत जाताना दिसला तर तो त्याच्या तोंडातील सिगरेट काढून घेई. त्याने सिगरेट पिणे सोडल्यास त्याला पैसे देऊ करी. त्याने जसा भरभरून पैसा मिळवला तसाच तो वाटून टाकला. ‘मी या जगात निष्कांचन अवस्थेत जन्माला आलो आहे, निष्कांचन अवस्थेतच जगाचा निरोप घेईन’, असे तो म्हणत असे. हे ऐकले की, ‘मुठ्ठी बांधके आये हो,(मूल जन्माला येत तेव्हा त्याच्या मुठी आवळलेल्या असतात), हाथ पसारे जावोगे’, या (बहुदा) महात्मा  कबीराच्या दोह्यातील पंक्तीची आठवण होते.असो. आज हे ‘शू हाऊस’ एक पर्यटन स्थळ झाले आहे. ते व्यापारी तत्त्वावर भाड्याने मिळते. नुकताच या वास्तूत एक कार्यक्रम आयोजित झाला. बाल साहित्याचा एक लेखक आपले पुस्तक विकत घेऊन येणाय्रा बाल वाचकाला त्या पुस्तकावर स्वाक्षरी देणार आहे. बालगोपाल मंडळी आणि त्यांचे पालक यांना अनुक्रमे खाऊ आणि चहा ( नव्हे कॅाफी) फराळासाठीही थांबवून घेणार आहेत

No comments:

Post a Comment