Wednesday, February 3, 2016

                                         भाषण ओबामांचे, भाषण निरोपाचे!
                          वसंत गणेश काणे,
   बराक हुसेन ओबामा आफ्रिकन मुस्लिम पिता व ख्रिश्चन मातेच्या पोटी जन्म; सलग दोनदा निवडून आलेला आफ्रिकन- अमेरिकन( कृष्णवर्णी) अध्यक्ष(अशा एकूण १४  व्यक्ती आहेत. या पैकी जाॅर्ज बुश, क्लिंटन, रीगन, आयसेनहोव्हर व रुझवेल्ट यांची नावे या पिढीला माहीत असण्याची शक्यता आहे); लोकमानसाची नाडी जाणणाऱा नेता (या नेत्याचे २००८ सालचे स्लोगन ‘येस वी कॅन’ तर २०१२ सालचे स्लोगन  ‘फाॅरवर्ड’ हे होते. याला अनुसरूनच त्यांची कारकीर्द होती); साम्राज्यवादी नव्हे तर सुसंस्कृत व शांततावादी म्हणून अमेरिकेतच नव्हे तर जगभर ओळख असलेला डेमोक्रॅट पक्षाचा कृष्णवर्णी अध्यक्षीय उमेदवार; शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकाचा विजेता; २००८ मध्ये वारसा म्हणून आलेल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वी मात करणारा व अमेरिकेतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुशीत ( काऊंटी स्कूल) ज्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला असा लोकनेता; अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन, रोजगार निर्मितीत लक्षणीय वाढ,, ओबामा केअर ही गरिब व मध्यम वर्ग यांच्यासाठीची आरोग्यविमा योजना राबवण्यासाठी अमेरिकेच्या  सर्वोच्च न्यायालयात अपूर्व संघर्ष करून विजय मिळविणारा कळकळीचा, कळवळीचा, तळमळीचा व झुंझार अग्रणी; केनडीनंतर भारतीय जनतेची मने जिंकणारा व पंतप्रधान मोदींचा दोस्त असलेला बराक हुसेन ओबामा आपल्या निरोपाच्या भाषणानेही जगभर ठसा उमटवता झाला.
‘फायनल स्टेट आॅफ दी युनियन ॲड्रेस’ -अमेरिकेच्या राज्य घटनेनुसार बराक हुसेन ओबामा हे सलग दोनदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले असल्यामुळे तिसऱ्यांदा अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत. प्रथेप्रमाणे दरवर्षाच्या सुरवातीला अमेरिकेचा अध्यक्ष तेथील संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त सभेला संबोधित करीत करतो. २००८ पासून सतत सहा वेळा असे भाषण ओबामा यांनी केले आहे. पण १३ जानेवारी २०१६ च्या भाषणाची गोष्ट वेगळी होती. हे त्यांचे अशा प्रकारचे शेवटचे अधिकृत भाषण असणार होते. यानंतर त्यांचा आवाज या संयुक्त सभेत पुन्हा कधी गुंजणार नव्हता. एक फर्डा वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे पण आता या अशा सभांच्या निमित्ताने येथे येणे नाही.
    या तसे पाहिले तर वार्षिक पण यावेळच्या शेवटच्या भाषणाला म्हणतात, ‘फायनल स्टेट आॅफ दी युनियन ॲड्रेस’. या भाषणाचे अमेरिकेतील सर्व श्राव्य व दृक्श्राव्य माध्यमे अनक्रमे ध्वनिप्रक्षेपण व प्रक्षेपण करीत असतात. अमेरिकेतील सर्व धुरीण या निमित्ताने एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येत असतात. जाॅर्ज वाॅशिंगटनने सुरू केलेली, पण राजेशाहीची आठवण जागी करणारी (राजा/राणी प्रजेला संबोधते आहे असे वाटते म्हणून) असे संबोधून जेफरसनने बंद केलेली पण वुल्ड्रो विल्सनने पुन्हा सुरू केलेली ही प्रथा अमेरिकेचे खास वैशिष्ट्य आहे.
   डेसिग्नेटेड सर्व्हायव्हर - या भाषणाला उपाध्यक्ष ज्यो बिडनही उपस्थित होते. तसाच वाईट प्रसंग ओढवला व अण्वस्त्र हल्ल्यात सर्वच गारद झाले तर अध्यक्षाच्या तोडीचा निदान एक तरी सदस्य कार्यभार सांभाळण्यासाठी व कारभारात सातत्य राखण्यासाठी उपलब्ध असावा म्हणून असा सदस्य या किंवा अशा प्रकारच्या अन्य सभेला/ कार्यक्रमाला येत नाही. त्याला दूर अज्ञात स्थळी, सुरक्षित ठेवले जाते. अध्यक्षाइतकीच सुरक्षा त्याला या काळात प्रदान केली जाते. अशा सदस्याला ‘डेसिग्नेटेड सर्व्हायव्हर’ असे नाव आहे. यावेळी गृहखात्याचे सुरक्षा सचिव जे जाॅनसन हे डेसिग्नेटेड सर्व्हायव्हर होते. ते या सभेत उपस्थित नव्हते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व रशिया एकमेकावर सतत गुरगुरत असत. एकमेकांना अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत असत. तेव्हापासून सावधानतेची बाब म्हणून सुरू असलेली ही प्रथा आता जवळजवळ पस्तीस वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. ‘इटर्नल व्हिजिलन्स इज दी प्राईस आॅफ लिबर्टी’, स्वातंत्र्यासाठी सतत जागरूक राहण्याची किंमत चुकवावी लागते, ती अशी.
 खरी अमेरिका कोणती? - अगोदरच ओबामा हा फर्डा वक्ता, त्यातून असे हे खास भाषण.  त्यामुळे त्यांच्या वक्तृत्त्व शैलीला घुमाऱ्यावर घुमारे फुटत होते. जगाविषयीची कळकळ व शांतताप्रियता, जगावर प्रभाव हवा पण तो  पोलिसी खाक्याच्या आधारे नको, असे सांगत दहशतवाद, ढासळलेल्या व पांगळी झालेल्या अर्थव्यवस्थेने कूस बदलली असली तरी ती पुरतेपणी सावरलेली नाही याची प्रांजळ कबुली व जगाच्या सारीपटावर अमेरिकेचे अनन्यसाधारण स्थान हे तीन प्रमुख मुद्दे त्यांच्या भाषणात प्रथमत: व प्राथम्याने येणे अपेक्षितच होते.  तरीही देशाला उज्वल बनवण्याच्या विजिगिशु वृत्तीचे दर्शन, मतभेद असेल तर वैर; सहमती असेल तरच ऐकण्याची भूमिका लोकशाहीला कशी मारक आहे, या मुद्याचे सुस्पष्ट विवेचन , सुविचारांची पखरण, नाव न घेता व ठेवता सुसंस्कृत पण ठामेठोक भूमिका त्यांनी घेतली. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे वाचाळ व शब्दबंबाळ भाषणे ठोकणारे उमेदवार, डोनाल्ड ट्रम्प  मुसलमानांविषयी जमेल तितकी बेजबाबदार विधाने करून जास्तीत जास्त ख्रिस्ती मतदारांना आपल्याकडे वळवत आहेत, हे चूक असून एखाद्याचा जन्म, धर्म व कांती यावरून त्यास वेगळे पाडणे हे मागास राजकारण आहे, असे सुस्पष्ट व सडेतोड मत त्यांनी नोंदवले. त्याचबरोबर अफगाणिस्थान व सीरिया प्रकरणी आपले  राजकारण अपयशी ठरल्याचे मान्य करून याबाबतची संपूर्ण  जबाबदारी स्वीकारली. इस्लामिक स्टेट हा मानवतेला धोका आहे पण सर्व मुस्लिम त्याज्य नाहीत, हे रिपब्लिकनांना पटवण्यासाठी त्यांनी आपले वाक्चातुर्य पणाला लावले. यावेळी त्यांनी मुस्लिम देशांशी मैत्री केली पण लादेनला शोधून ठार केले, याची आठवण श्रोत्यांना नक्कीच झाली असेल.कोणाला तरी वाटते ( जाॅर्ज बुश यांचे नाव त्यांनी घेतले नाही) म्हणून कोणीतरी युद्ध करते, असे व्हायला नको, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले. पण बुश यांच्या काळात अमेरिकेने अफगाणिस्तान, इराक आदींविरोधात युद्ध छेडले, त्यात अमेरिकेचे केवळ दुहेरी नुकसान झालेनाही. आर्थिक आणि जीवितहानी तर झालीच. तसेच जगभर एक अडदांड, अरेरावी, स्वयंघोषित रखवालदार अशी अपकीर्तीही झाली,
 ‘‘आपले काम चोख करणारा रस्त्यावरचा पोलीस, आपल्या संरक्षणासाठी वाटेल ते पणास लावणारा जवान, मुलांना उत्तेजन देणारे वडील, आपले मतदान कर्तव्य बजावणारा तरुण मतदार, ही अमेरिका माझ्या माहितीची आहे.
 चातुर्याचे दर्शन- वांशिक विविधतेने नटलेले, धर्म, वंश व कांती यानुसार भेदाभेद न करणारे अमेरिका हे  एक राष्ट्र आहे, याचा विसर पडू देऊ नका, असे प्रतिपादन करतांनाच  विकृत दृष्टीचे व घरात बसून विध्वंसाचे कट रचणारे अमेरिकेच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण करू शकणार नाहीत, अशी कोपरखळी त्यांनी रिपब्लिकन वाचाळवीरांना मारली. निकोप दृष्टी, विशाल हृदय, व दुर्दम्य आशावाद असलेला उत्तराधिकारी निवडा,असे आवाहन करतांना त्यांनी आपल्या चातुर्यगुणांचा मोठ्या खुबीने वापर केला.  एडिसन बरोबर सॅली राइड या पहिल्या महिला अमेरिकी अंतराळवीरचा गौरवपूर्ण उल्लेख ते का करीत असावेत?  सॅली राइड या महिलेचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार हिलरी क्लिंटन या आहेत.अमेरिकेत महिला मतदारांची संख्या भरपूरआहे. त्यांना चुचकारण्याचा उद्देशही या निमित्ताने साध्य झाला.
युगानुकूलतेला पर्याय नाही - सामाजिक क्षेत्रात युगानुकूलता स्वीकारा, अल्पसंख्यांकाना आपलेसे करून सामावून घ्या, घातपात करणाऱ्यांवर मात करून आपली वाटचाल सुरू आहे, संकटांचे संधीत रुपांतर करून आपण प्रत्येक वेळी अधिक बलशाली होऊन संकटातून बाहेर पडलो आहोत,  विवेक व विचारविनीमय यांचे आधारेच आर्थिक उन्नती, सुरक्षा, शांतता व शाश्वतता असलेलली धरती उदयाला येऊ शकेल असा दुर्दम्य आशावाद हेही त्यांच्या भाषणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
   मी ना लिंकन, ना रुझवेल्ट- गोरे- काळे, धनवंत - गरीब व मध्यमवर्ग, मुस्लिमांबाबत पराकोटीची असहिष्णुता  हे विषय हाताळतांना आपल्याला पुरतेपणी यश मिळाले नाही, अशी प्रांजळ कबुली  देतादेता  मी ना लिंकन ना रुझवेल्ट असे जेव्हा ओबामा म्हणत होते तेव्हा कृतज्ञते बरोबरच त्यांच्यातील विनम्रतेचाही  परिचय होत होता. हा स्वभावगुण राजकारण्यांमध्ये क्वचितच आढळतो.
  सुरक्षिततेसाठी उपेक्षितांची मने जिंका- चिमटे, कोपरखळ्याही भाषणाचे वैशिष्ट्य होते. स्वत:साठी सुरक्षित मतदार संघ निर्माण करण्यासाठी खटपटी लटपटी करणाऱ्या खासदारांची व राजकारण्याची खिल्ली उडवून जास्तीतजास्त नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्याचा आपला मनोदय व्यक्त करून त्यांनी  उपेक्षितांची मने जिंकली व सुरक्षित मतदार संघ निर्माण करणे शक्य व योग्य  नसून नेत्यांना लोकाभिमुख होण्याशिवाय गत्यंतर नाही, याची जाणीव करून दिली.
   अमेरिकेतही विधेयके अडकून पडली - पर्यावरणात काहीही हानिकारक बदल होत नसून विनाकारण या प्रश्नाचा बाऊ केला जातो आहे, असे म्हणून आपला उद्योग बिनधास्त चालवू इच्छिणाऱ्यांना त्यांनी अत्यंत परखड शब्दात सुनावले की, स्वत:ला  अनुभव आला म्हणजेच वस्तुस्थिती काय आहे हे कळेल. त्यासाठी कोशातून बाहेर येऊन बघा, म्हणजे खात्री पटेल,   क्युबा आणि अन्यत्र सुरू असलेले संघर्ष संपवण्याचा आपण अहर्निश प्रयत्न करू अशी ग्वाही देत ओबामा म्हणाले की, आर्थिक आणि जीवित हानी टाळण्याचे दृष्टीने केलेले माझे प्रयत्न काॅंग्रेसने हाणून पाडले, ही खेदाची बाब आहे.( अमेरिकेतील संसदेत सुद्धा आपल्या इथल्यासारखीच बरीचशी स्थिती असल्यामुळे अनेक विधेयके अडकून पडली आहेत, याची आठवण झाल्यावाचून रहात नाही.)
  औचित्य आणि संवेदनशीलता - ओबामांचे सहकारी व अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बिडन यांच्या मुलाचे नुकतेच कॅन्सरने  निधन झाले होते, कॅन्सरवर हमखास उपाय शोधून काढण्यासाठी (मून शाॅट निर्माण करण्यासाठी) ‘मिशन कंट्रोल’ची स्थापना करून त्याच्या प्रमुखपदी ज्यो बिडन यांचीच नेमणूक करून आपल्या संवेदनशीलतेचा परिचय करून देण्यास ते चुकले नाहीत,
   परखड इशारा-  जगाला सध्या निराशेने ग्रासले आहे. ही स्थिती बदलली नाही तर आपलीही पुन्हा टोळ्यात विभागणी होईल. मग जे आपल्या सारखे दिसत नाहीत, आपल्या सारखी पूजाआर्चा करीत नाहीत, आपल्याला वाटते त्या प्रमाणे मतदान करीत नाहीत, ज्यांचा वारसा आपल्या सारखा नाही, त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अाळ आणून त्यांची अडवणूक करायची, हे प्रकार सुरू होतील. या मार्गाने आपण जाऊ शकत नाही, तसे केल्यास समृद्धी येणार नाही, हवी तशी सुरक्षा मिळणार नाही, सर्वात महत्त्वाची बाब ही की, जगाने आपल्याकडे अपेक्षेने व आदर्श म्हणून पहावे, असे आपल्यात काहीच उरणार नाही. डेमोक्रॅट व रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षात धनदांडगे उद्योगपती आहेत. त्यांची सवंग व उठवळ बडबड अमेरिकेतील जनमानसात लोकप्रिय होऊ पाहते आहे. त्यांना  ओबामा यांनी हा इशारा दिला आहे.
विरोधकही देशभक्तच- ओबामांच्या कार्यकाळात शत्रू वाढले, मूजोर झाले व अमेरिका एक राष्ट्र म्हणून कमजोर झाले, हा रिपब्लिकनांचा आरोप त्यांचा नामोल्लेख न करता ओबामांनी खोडून काढला व अमेरिका आज जगातील सर्वात बलशाली राष्ट्र आहे, असे ठासून सांगितले. जे आपल्याशी सहमत नसतात, त्यांच्या मनात आपल्याबाबत द्वेशाची भावना असते किंवा आपले विरोधक हे देशभक्त नाहीत, असे मानून चालणार नाही. राजकीय कलह मिटविण्यच्याबाबतीत जे अपयश आले त्यात माझ्यावरही ठपका येतोच, हे मला मान्य आहे.                                                              
      रिकामी खुर्ची - माझ्या कारकिर्दीत पक्षांमधला द्वेश आणि अविश्वास पराकोटीला गेले,  हे माझे अपयश आहे  लिंकन किंवा रुझवेल्ट यांच्या तोडीचा अध्यक्ष असता तर परस्पर सहयोगाचे वातावरण अधिक चांगल्याप्रकारचे राहिले असते. पण मी आपणास आश्वासन देतो की, मी जोपर्यंत मी या पदावर आहे तोपर्यंत मी आहे त्यापेक्षा आणखी चांगला होण्याचा प्रयत्न करीन. ओबामा यांनी जंगजंग पछाडले पण शस्त्र नियंत्रणाचा मुद्दा ते शेवटाला नेऊ शकले नाहीत. शस्त्र बाळगण्याच्याबाबतीतल्या सैल धोरणामुळे बळी गेलेल्याबाबत बोलतांना त्यांना ६ जानेवारीला भाषण करतांना अश्रू आवरता आले नव्हते.  (पण नंतर विरोधकांनी हे सर्व नाटक होते, नक्राश्रू होते, डोळ्यातून अश्रू यावेत म्हणून त्यांनी कांदा वापरला अशी टिप्पणी करून त्यांची खिल्ली उडवली). मात्र जे बंदुकीच्या गोळीला बळी पडले त्यांची आठवण म्हणून १३ जानेवारीच्या निरोपाच्या भाषणाचे वेळी हिंसाचारात बळी पडलेल्यांसाठी प्रातिनिधिक स्वरूपात सभागृहातील अतिथी कोशात( गेस्ट बाॅक्स) त्यांनी एक आसन मोकळे सोडले होते. ती रिकामी खुर्ची खूप काही सांगून गेली.






No comments:

Post a Comment