Thursday, February 4, 2016


                        येमेनमध्ये घड्याळाचे काटे उलटे फिरत आहेत  
           जगातील बहुतेक देशांचा इतिहास हा प्रामुख्याने विभाजनाचा इतिहास आहे. पण तीस वर्षांपूर्वी याच्या विपरित घडले. उत्तर आणि दक्षिण येमेन एकमेकात विलीन होऊन संयुक्त येमेन राष्ट्र निर्माण झाले. विभाजनाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशांसाठी या विलिनीकरणाने एक वेगळीच आशा निर्माण झाली होती. पण आज घड्याळाचे काटे उलटे फिरतांना दिसत आहेत. येमेनचे पुन्हा विभाजन होण्याची चिन्हे दिसत आहेत. पण या संधर्षात आश्चर्य म्हणजे आजपर्यंत तरी एकाही पाश्चिमात्याची हत्या झालेली नाही. काळ्या उडदात एखादा पांढरा उडीद सापडावा, असा हा प्रकार आहे काय? या संघर्षात शियापंथीय मुस्लिम आघाडीवर आहेत. मग आता शियांना कमी क्रूर समजायचे काय, असा प्रश्न विचारला जातो आहे. 
       येमेनमधील परिस्थिती दिवसेदिवस गंभीर होत चालली असून हजारो नागरिकांना  मायदेशी परत आणण्यात भारताला मिळालेले यश पाहून अमेरिका, फ्रान्स,जर्मनी, इराक, इंग्लंड, लेबनॅान अशा २६ देशांनी आपापल्या नागरिकांना सोडविण्यासाठीही भारताने मदत करावी, अशी विनंती करावी, हे भारताच्या यशस्वी परराष्ट्र नीतीला मिळालेले एक प्रमाणपत्रच आहे, असे म्हटले पाहिजे. 'ॲापरेशन राहत' ला मिळालेले यश हा एक शिरपेचच म्हटला पाहिजे.
       उडदाची साल किंवा टरफल काळ्या रंगाचे असते. पांढर्या ( गोर्या )रंगाचा उडीद सहसा सापडणार नाही, अशा अर्थाचे एक वचन आहे. पण पांढरा उडीद सापडला की काय, असे वाटावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. उदाहरण आहे येमेनचे. हा देश हिंसाचाराने ग्रस्त झाला आहे. पण आजवर एकाही पाश्चिमात्याची हत्या या संघर्षात झालेली नाही, असे एक वृत्त आहे. हाच तो पांढरा उडीद. यामागचे कारण काय असावे, हे जाणून घ्यायचे असेल तर थोडा तपशीलवार मागोवा घ्यावा लागेल.

     येमेनमधील ९९ टक्के लोक मुस्लिम असून सुन्नीपंथीय ६५ टक्के तर शियापंथीय ३५ टक्के आहेत. संपूर्ण जगाचा विचार केला तर सुन्नीपंथीयांची मुस्लिमांमधली टक्केवारी ८० टक्के आहे. 
                         दुष्टाहाती कोलित 
    येमेनमधला संघर्ष 'हादी' आणि 'हुटी'(हुथी) या दोन सत्ताधीशांमधला आहे. कोण आहेत हे सत्ताधीश? हुटी हे शियापंथीय तर हादी हे सुन्नी पंथीय आहेत. संपूर्ण अरबस्थानात २०१० पर्यंत अंधारयुगच होते म्हणाना. बाह्य जगाशी या लोकांचा संबंध/संपर्क असा नव्हताच. असा संपर्क असू नये/ निर्माण होऊ नये, याची विशेष काळजी सत्ताधीश आणि धर्ममार्तंड घेत असत. पण इंटरनेटचा उदय झाला आणि अल्पावधीत जगात काय चालले आहे आणि जग कुठे चालले आहे, हे इतर सर्व लोकांप्रमाणे अरबस्थानातील लोकांनाही कळू लागले. याचा परिणाम असा झाला की, प्रस्थापित शासन, हुकुमशाही, राजेशाही आणि संवेदनशून्य राज्यकर्ते यांच्या विरोधात संपूर्ण अरब जगतात आंदोलने होऊ लागली. पण वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांती ज्या वेगाने झाली त्या वेगाने सांस्कृतिक व वैचारिक प्रगती झाली नाही. यामुळे धार्मिक कट्टरतेला विज्ञान आणि औद्योगिक क्रांतीची साथ मिळाली. परस्परांचे पिढीजात वैरी विचारांचे आणि धार्मिक कट्टरतेबाबत  पूर्वी सारखेच असहिष्णू राहिले. पण  आता एकमेकांविरुद्ध शस्त्रे मात्र आधुनिक वापरू लागले. एकेका स्फोटात शे दीडशे माणसे ( बहुदा निरपराध ), सहज मारली जाऊ लागली. माकडाहाती कोलित नव्हे तर दुष्टाहाती कोलित असा प्रकार झाला.
             इराण आणि सौदी अरेबियाची लढत आणि येमेनची गोची
      येमेन तसा अगदीच चिमुकला देश नाही. तशात अन्नधान्यासाठी पूर्णत: परावलंबी, तसेच अन्य अरब देशांना खनिज तेलाच्या विक्रीतून मिळणार्या पैशाची तरी उब असते पण यंमेनच्या भाग्यात हेही नव्हते/नाही. शिया सुन्नी संघर्षात पूर्वी येमेनही पोळला जात होताच, आता भरडला जाऊ लागला. सत्तेसाठी दोन शिया सत्ताधीशात किंवा दोन सुन्नी सत्ताधीशात संघर्ष होत नव्हते, असे नाही. पण हादी आणि हूटी ( हूटी ) यांच्यामधील संघर्षाला सुन्नी आणि शियामधील संघर्षाची एक वेगळी आणि आणखीची किनार होती. अल कायदा ही सुन्नींची संघटना अरब जगतात सुन्नींचे वर्चस्व आणि शियांचा सफाया करण्यासाठी हात धुवून त्यांच्या पाठीमागे लागली. तिच्या कचाट्यातून येमेनही सुटले नाही. शियांचे सत्ताकेंद्र असलेल्या इराणने येमेनमध्ये  आपला प्रभाव वाढविण्यास प्रारंभ केला. सुन्नींचा प्रभाव असलेला सौदी अरेबिया हाही येमेनचा 'बडा ' शेजारी आहे. तो कसा स्वस्थ बसणार? सौदी अरेबियात मक्का आणि मदिना ही मुस्लिमांची तीर्थस्थळे आहेत. येमेनमधील 'स्कड' प्रकारची क्षेपणास्त्रे मक्का आणि मदिनावर रोखलेली आहेत. हे सौदी अरेबियाला कसे सहन होणार/व्हावे? त्यातून आता तर अमेरिकन फौजा मायदेशी परतल्या आहेत. त्यामुळे इराण ( शियांचे सत्ताकेंद्र )आणि सौदी अरेबिया ( सुन्नींचे सत्ताकेंद्र ) या दोन बलाढ्य शत्रूंच्या संघर्षात येमेनची ससेहोलपट होते आहे.
नुताच सौदी अरेबियाचा राजा अब्दुल्ला वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन पावला आणि त्याच्या जागी त्याचा ७९ वर्षाचा सावत्र भाऊ सलमान हा त्या देशाचा सर्वेसर्वा झाला आहे. इस्लामी जगतातील ही घडामोड अनेक कारणांमुळे महत्त्वाची आहे. एक असे की, सौदी अरेबिया हा जगातला पहिल्या क्रमांकाचा खनिज तेल निर्यात करणारा देश आहे. दुसरे असे की, या देशात इस्लामचे सर्वात मोठे धार्मिक केंद्र आहे. या देशाच्य राजाचे  एक वैशिष्ट्य असे आहे की, हा सुधारणावादी होता. अर्थात प्रत्येक वेळी तो जपून पाऊल टाकीत असे. कट्टरवादी घटक बिथरू नयेत, याची तो आपल्या परीने काळजी घेत असे. असे असले तरी त्याच्याविरुद्ध कटकारस्थाने बरीच झाली. ही कारस्थाने करणारे लोक दोन प्रकारचे  होते. एक याला पदच्युत करून सत्ता हस्तगत करण्याची इच्छा असणारे आणि दुसरे सध्या जगभर हैदोस घालणारे अतिरेकी. अब्दुल्ला सुन्नी आणि अतिरेकी सुद्धा सुन्नीच. 
      अब्दुलाच्या मृत्यूचे कारण जाहीर झालेले नाही. त्याचा सावत्र भाऊ सलमानने चतुराईने आणि चपळाईने हालचाल करून राज्याची सूत्रे हाती घेतली आणि आपला जम बसवत आणला आहे. अब्दुल्लाला न्यूमोनिया झाला होता आणि इस्पिताळात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या भरवशावरच तो तग धरून आहे, अशा वार्ता ऐकू येत होत्या. पण इस्लामी देशांमध्ये सामान्यत: इतक्या सहजपणे सत्तांतर होत नसते.
         सलमानने सत्ता हस्तगत करताच महम्मदिन नायत याला आपल्यानंतरचे दुसर्या क्रमांकाचे स्थान दिले आणि आपल्या मुलांपैकी एकाला पूर्वी महम्मदिनकडे असलेले संरक्षणमंत्रीपद दिले. आपले पद स्थिर करण्याच्या उद्देशाने सलमानने टाकलेले हे पाऊल कितपत यशस्वी होते, हे काळच दाखवील.
                    अमेरिका व सौदी अरेबिया विरुद्ध असंतोष
      सध्यातरी येमेनची राजधानी 'साना' वर तुफानी हवाई हल्ले करून सौदी अरेबियाने युद्धाचा रीतसर श्रीगणेशा केला. येमेनचे अध्यक्ष अब्द राबो मंसूर हादी या सुन्नीपंथीयाची राजवट उलथून पाडण्याचा चंग येमेनमधील शियापंथीय हुटी/हूथी बंडखोरांनी बांधला आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी सौदीची ही चढाई आहे. येमेनमधला हादी व हूटी यांच्यामधला संघर्ष हा खरेतर त्या देशाचा अंतर्गत प्रश्न होता. सौदी अरेबियाने त्यात पडायला नको होते. पण सुन्नी व शिया यातील संघर्षाला आता जागतिक परिमाण लाभले आहे. या संघर्षाला आता देशांच्या सीमा उरलेल्या नाहीत.  येमेनचे यापूर्वीचे अध्यक्ष अली - अब्दुल्ला सालेह यांना २०११ मध्ये अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यांची व शिया बंडखोरांची ( हूटी ) एकजूट आहे. शियांनी मन्सूर हाती विरुद्ध जिहाद पुकारला आहे. त्यांना शिया बहुल इराण सगळी कुमक पुरवतो आहे. त्यामुळे घाबरून मंसूर हाती सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथे पळून गेले. इराण शिया बंडखोरांना मदत करतो आहे या घटनेची चाहूल सौदी अरेबियाला न लागती तरच नवल होते. बंडखोरांनी दक्षिण येमेनमध्ये आपली पकड पक्की करायला सुरवात केलेली पाहून सौदी अरेबियाने येमेनची राजधानी साना आणि बंखोरांची प्रभावक्षेत्रे असलेल्या ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले. बंडखोरांचे प्रभुत्व साना येथे तर आहेच शिवाय त्यांनी एडन बंदरावरही कब्जा मिळवला आहे. जलमार्गावर नियंत्रण आता दूर नाही. इराणची राजधानी तेहरान येथून थेट येमेनची राजधानी साना येथे विमाने शस्त्रास्त्रे घेऊन नियमितपणे फेर्या मारू लागली आहेत.
या धुमश्चक्रीचा परिणाम असा झाला की सुन्नी आणि शियांमधली तेढ आणखानच वाढली. अगोदरच या दोन पंथांमधून विस्तव जात नाही आणि आता तर शिया सुन्नीमधल संघर्ष इराण आणि सौदी अरेबिया या बड्या राष्टांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्यामुळे जागतिक स्तरावर पोचला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, जनसामान्यांना त्याची झळ सहन होईनाशी झाली आहे. सौदी अरेबियाच्या हल्ल्यांमुळे सुन्नीपंथीय सुखावले खरे पण अशा हल्ल्यात अनेकदा दोन्ही पंथांच्या लोकांचा बळी जात असतो. त्यामुळे जनमत सौदी अरेबियाच्या विरोधात जात चालले आहे. अल कायदा ही सुन्नीपंथीयांची संघटना सुरवातीपासूनच येमेनमध्ये तळ ठोकून आहे. ती शियापंथीयांच्या मशिदीत बाॅंबस्फोट घडवून आणते. अशा स्फोटात निरपराध/ निष्पाप शिया नागरिक मारले जात आहेत. हे पुरेसे नव्हते म्हणून की काय इसीस म्हणजेच आय एस ( म्हणजे इसिसचे नवे नाव - इस्लामिक स्टेट ) ही  सुन्नी मुस्लिमांची जबरदस्त संघटना देखील या लढ्यात उतरली आहे. जनता आता सौदी अरेबिया बरोबरच अमेरिकेवरही चिडली आहे. कारण अमेरिका सौदी अरेबियाला शस्त्र पुरवठा करीत आहे. येमेनचे पळपुटे व सुन्नीपंथीय अध्यक्ष हादी यांना सौदी अरेबिया आणि अमेरिका यांची जोडगोळी पुन्हा सत्तेवर बसवणार असा सार्थ संशय लोकांना येतो आहे.
                     जिवट आणि चिवट बंडखोर 
          पण तरीही हुटी/हूथी बंडखोरांचे मनोधैर्य कायम आहे. तुम्ही खुशाल बाॅंबहल्ला करा जमिनीवरील लढाईत आम्ही तुम्हाला मात देऊ, असा त्यांचा जाहीर  व खणखणित दावा आहे. मागे एकदा त्यांनी सौदी अरेबियातील काही शहरांवर ताबा मिळवून आपले म्हणणे खरे करून दाखविले होते. अमेरिकेला दोन गोष्टी सुनवायला प्रथम सरसावले ते सुन्नीबहुल जाॅर्डनचे राजे अब्दुल्ला. इराकमध्ये घुसून अमेरिकेने सद्दाम हुसेनच्या बाथ पार्टीची राजवट उलथून टाकली. इराकमध्ये शिया बहुसंख्येत आहेत. सद्दाम हुसेनच्या बाथ पार्टीच्या राजवटीत शियांचा छळ झाला. आता इराक आणि इराणमधील शिया जिहादी आणि   आय एस समर्थक सुन्नी जिहादी यांच्यात घमासान सुरू आहे. शेजारच्या सिरीयात बरार असादची राजवट आहे. त्याला मदत करण्यासाठी शिया जिहादी सरसावले आहेत. तसेच ते येमेनममध्येही आपला प्रभाव वाढवीत आहेत. पाश्चिमात्य देशासाठी सुन्नी जिहादीपेक्षा शिया जिहाजी बरे म्हटले पाहिजेत. कारण त्यांनी निदान आतापर्यंत तरी एकाही पाश्चात्याला ठार केलेले नाही.
            अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीवर परिणाम?
      येमेनमध्ये जो हिंसाचार उफाळला आहे त्यामुळे अमेरिकेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अध्यक्ष ओबामा यांचा डेमोक्रॅटिक पक्ष अडचणीत आला आहे. अमेरिकेतील येत्या अध्यक्षीय निवडणुकीत याचा फटका अमेरिकेला बसू शकतो. येमेन मधलेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम आशियातील अस्थिर वातावरण हा मुख्यत: अमेरिकेच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे, असेच सर्वांचे मत आहे. या भागात लोकशाही प्रक्रिया मूळ धरू लागली होती. इंटरनेटमुळे झालेल्या जागृतीचे हे फळ होते, असे अनेक मानतात. या प्रक्रियेला अमेरिकेच्या धोरणामुळे खीळ बसण्यास मदत झाली, असा अमेरिकेवर आरोप आहे. येमेन आणि सुन्नी बहुल सौदी अरेबिया यातील सीमारेषा बरीच लांबलचक आहे. त्यामुळे येमेनमध्ये शियांचा वरचष्मा सौदी अरेबिया कधीही सहन होणार नाही. आता तर एडनही त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे एडनचे संपूर्ण आखात त्यांच्या प्रभावाच्या टप्प्यात आले आहे. संपूर्ण येमेन आपल्या ताब्यात येऊ शकणार नाही, कारण येमेनमध्ये आपण फक्त पस्तीस टक्केच आहोत, हे समजण्याइतके शिया नक्कीच शहाणे आहेत. म्हणून किनार पट्टीवर आपला कब्जा असावा, असा त्यांचा मर्यादित पण नेमका उद्देश आहे. त्यांनी आजवर एकाही पाश्चिमात्याचा सफाया केला नाही. याचा अर्थ पांढरा उडीद सापडला असा करायचा काय? याचे उत्तर येणारा काळच देईल.
      असेच धोरण शिया आणि सुन्नी यांनी भारतीयांबद्दलही स्वीकारलेले दिसते पण त्यात केव्हा कोण कशी भूमिका घेईल ते सांगता येत नाही. येमेन, सौदी अरेबिया, इराक, इराण, अफगाणिस्तान, पश्‍चिम आशियातील लिबिया, सिरिया, आफ्रिकेतील सोमालिया, नैरोबी तसेच युक्रेन, कझाकिस्तान यांसारख्या देशांमध्येही अलीकडील काळात प्रचंड अशांतता पसरत आहे. परिस्थिती केव्हा हाताबाहेर जाईल ते सांगता येत नाही. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक काम करीत आहेत, याचे विस्मरण होता कामा नये. या भारतीय नागरिकांविषयी नेमकी माहिती भारत सरकारकडे नसते. परिणामी, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या भारतीयांची सुटका करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच यासंदर्भात एक धोरण निर्माण करण्याची गरज आहे.. बोको हराम, इसिस आदी संघटनांकडून आगामी काळातील वाढता धोका लक्षात घेता याबाबत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. पांढरा उडीद (शियापंथीय) केव्हा काळा होईल, याचा नेम नाही. काळा उडीद (सुन्नीपंथीय) झालाच तर आणखीनच काळा होईल. 'तेव्हा कुणी कुणाचे नाही', हे लक्षात ठेवून धोरणे आखली पाहिजेत.
 

No comments:

Post a Comment