Wednesday, February 3, 2016

   माझा असाही एक प्रवास
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
दूरध्वनी - (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   मानवी जीवनात योगाचे आणि योगायोगाचे अनेक प्रसंग येत असतात. पाच महिन्यांच्या दीर्घ कालखंडानंतर अमेरिकेतून भारतात मायदेशी परत येत असतांना याॅर्क ते नेवार्क हे अंतर कारने पार करीत होतो. वाटेत अभूतपूर्व पावसाने व वादळाने झोडपून काढले. मार्गात बहुदा चांगलाच मोठा अपघात झाला होता. वाहने मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. त्यामुळे प्रथम उलट दिशेने तोंड करून काही अंतर कापून वेगळी वाट धरावी लागली. पण 'वादळवाट' आमची पाठ सोडत नव्हती. रात्री ८.४५ चे विमान होते. चार तासांचा अवकाश ठेवून निघालो होतो. प्रत्यक्षात जेमतेम दोन तासच शिल्लक असतांना नेवार्कला पोचलो. केबीनमध्ये ठेवायची बॅग ४५ पाऊंडच वजन दाखवत होती. त्यामुळे हायसे वाटले. ती केबिनमध्ये टाकली. इथूनच ओम्कार, अनुषा ही नातवंडे आणि अजित हा मुलगा परत फिरले. एक बॅग व एक आधुनिक 'दप्तर' एवढेच सामान सोबत होते. सिक्युरिटी तपासणी होऊन १२३ क्रमांकाच्या गेटपाशी येऊन थांबलो. आजूबाजूला इतरांच्या बॅगांकडे बघितले तो लक्षात आले की, माझ्या बॅगांना टॅग्जच लावायची राहिली होती. ती मिळवण्यासाठी परत फिरलो. सिक्युरिटी चेक करणाऱ्या जवळ टॅग्ज नव्हती, ती कुठे मिळतील हे ते सांगू शकत नव्हते. हे आम्हाला माहित नसते, ते युनायटेड एअर लाईन्सवालेच जाणोत, असे ते म्हणत होते आणि आणखी आत प्रारंभ बिंदूकडे जाऊही देत नव्हते. शेवटी त्यातला एक म्हणाला गेटवरच विचारा. त्यांच्याजवळही टॅग्ज असतात. ते ती तुम्हाला देतील. पुन्हा गेटपाशी परत आलो. इतरांच्या बॅग्जना टॅग्ज लावलेली होती. ते ती कुरवाळण्याचे निमित्ताने पक्की धरून ठेवत होते. तेवढ्यात गेटवरची उद्घोषिका आली. तिच्यासमोर ओशाळवाणा आणि अपराधी चेहरा करून उभा राहिलो. माझी अडचण तिला समजेल अशा शब्दोच्चारासह मी तिला सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. तिला ते बहुदा त्यामुळेच कळत नव्हते. शेवटी तिला एकदाचा अर्थबोध झाला. तिने मला विचारले, तुम्हाला इथे कुणी येऊ दिले? शक्य तेवढा अपराधी व बावळट चेहरा करीत ( यासाठी मला मुद्दाम प्रयत्न करावे लागत नाहीत, असे मला ओळखणाय्रांचे प्रामाणिक मत मला माहीत होते) मी अंगठ्यानेच पाठीमागे बोटाने इशारा केला. तिने एकजळजळीत कटाक्ष त्या दिशेने टाकला. त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला. तुमच्याजवळ टॅग्ज आहेत का? , मी धैर्य एकवटून पण खरे सांगायचे तर पुरेसे धैर्य एकवटले नसतांनाच विचारले. तिने माझ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकीत म्हटले,'आय मस्ट सी दी बॅग्ज फर्स्ट. व्हेअर आर दे?' मी पुन्हा अंगठा दाखवला, अर्थात आता विरुद्ध दिशेकडे. माझ्या बावळटपणाची कमाल मला तिच्या चेहय्रावर स्पष्ट दिसत होती.  ' मे आय ब्रिंग देम हिअर?', मी तरखडकरी संकेत पाळत 'कॅन'  असा शब्दप्रयोग न करता 'मे' असा शब्दप्रयोग करीत म्हटले. आता तिच्या चेहय्रावर 'मूर्तिमंत कीव मजसमोर उभी राहिलेली' मी पहात होतो. हायसे वाटून मी शक्य तेवढ्या लगबगीने बॅग्ज घेऊन आलो आणि चेहय्रावर पुन्हा एकदा अपराधी भाव आणित उभा राहिलो. आता तिच्या चेहय्रावरील कीव दाखवणारे भाव क्षणार्धात अंतर्धान पावले होते. त्यांची जागा आता तुच्छतादर्शक भावांनी घेतली होती.
' ओ दीज स्माॅल बॅग्ज?' असे म्हणत ती म्हणाली, 'दीज नीड नाॅट हॅव टॅग्ज'. काय हा बावळटपणा, असेच बहुदा स्वत:शीच पुटपुटत ती परत फिरली. 'आत सोडतील तेव्हा गेटवर तुम्हीच असाल नं?' मी खुंटी हलवून पक्की करण्याच्या हेतूने म्हटले. तिने मागे वळून पाहण्याचे देखील कष्ट घेतले नाहीत. एक सहप्रवासी हे सर्व बघत होता. 'कशाला विचारण्याच्या भानगडीत पडलात? अशा गोष्टी दडपून न्यायच्या असतात.' मी ‘होय’ म्हणत बॅगांकडे पाहिले. त्या कुठे आणि कशा दडपता आल्या असत्या? असा प्रश्न मनात आला पण पोक्तपणाने मी तो विचार बाजूला सारला. असा पोक्तपणा हा माझा स्थायी भाव आहे. तो म्हणाला, 'मी सगळे बारकाईने पाहत होतो. तिने तुम्हाला फारच 'हे' केले असते तर मी तिचे चालू दिले नसते. ह्या काय दोन जास्तीच्या टॅग्ज माझ्या खिशात आहेत. असोत म्हणून मी त्या घेऊन ठेवल्या होत्या.' त्याने त्या टॅग्ज माझ्यासमोर लंबकाप्रमाणे हलवत म्हटले. मी त्या टॅग्ज घेतल्या नाहीत. माणसात स्वाभीमान नावाचीही गोष्ट असते, हे मला त्याला जाणवून द्यायचे होते. अशी संधी मी सहसा हातची जाऊ देत नाही.
   यथावकाश आस्मादिक आपल्या ३२ फ या जागेपाशी आले. जवळची इलेक्ट्रॅानिक उपकरणे 'स्वीच आॅफ' करायची होती. माझ्या जवळ दोन मोबाईल होते. एक जुनापाना नोकिया होता. तो मी नागपुरात वापरतो. तो तितपतच कामाचा आहे. नवीन ॲंन्ड्राॅईड आहे. तो मुख्यत: व्हाॅट्स अॅपसाठी वापरतो. आय पॅड स्वीच आॅफ करण्याची गरज नसते. तेवढ्यात घोषणा झाली विमानात 'वाय फाय' उपलब्ध करून देणार होते. पण त्यासाठी वीस डाॅलर लाणार असे वाटल्यावरून तो विचार मी बाजूला सारला. समोरच्या सीटवर एक जोडपे जुळ्या तान्हुल्यांना घेऊन बसले होते. दोन भाग केलेले एक टोपले त्यांनी समोर ठेवले होते. एकेका भागात एकेक तान्हुले पहुडले होते. या जोडप्याची विमान कर्मचाय्राशी बरीच बाचाबाची झाली होती. मी आपल्या जागेवर आलो तेव्हा विषय सामोपचाराने मिटला आहे, हे जाणवले. ही वादळानंतर प्रस्थापित झालेली शांतता  होती. 'आम्हाला माफ करा', असे कर्मचारी म्हणत असावा, असा मी तर्क केला आणि 'अहो चालायचच, माफी कसली मागता?', असे ते जोडपे आळीपाळीने आपापल्या भाषेत म्हणत असावेत, हे कळायला मला वेळ लागला नाही. माझ्या टॅग्ज न लावताच आत आणलेल्या बॅग्ज ठेवण्यासाठी वरच्या 'कपाटाची खिट्टी ' फिरवताच त्यातून डोक्यावर अनेक कोरड्या व ओल्या वस्तूंचा वर्षाव व्हायला सुरवात झाली. लहानपणी संक्रांतीला आपली अशीच लूट झाली असावी, असा विचार मनात आला. त्यावेळी बोरे, उसाचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, लिमलेटच्या गोळ्या आणि अशाच वस्तू माझ्या डोक्यावरून भूतलावर अवतरल्या असतील. 'प्रौढत्वी निज शैशवास जपण्याचा बाणा' आपला  असल्यामुळे हे असे घडले असावे, अशी समजूत करून घेत मी वरकरणी चेहरा हसरा ठेवीत होतो. पण काही वस्तूंची टोचणी व बोचणी चांगलीच जाणवत होती. पण लहानपणी सुद्धा डोक्यावर केस नसतीलच की, मग तेव्हा लहानपणी जे सहन केले असेल, त्याचा मोठेपणी आस्वाद घेण्याची संधी अनायासे मिळते आहे तर ती का सोडा, असा समजुतदारपणाचा भाव माझ्या मनात आला. ते जोडपे त्यांच्या भाषेत आपली माफी मागून दिलगिरी व्यक्त करते आहे, हे लक्षात यायला वेळ लागला नाही. मीही चक्क मराठीत, ' अहो चालायचच, त्यात काय मोठसं?', असे म्हटले. ते त्यांना कळल्याचे जाणवले. अशाप्रकारे मी आपला मराठी बाणा व्यक्त करीत आपल्याच विचारात उभा असतांना एक एअर होस्टेस समोर येऊन केव्हा उभी राहिली ते कळले नाही. तुम्हाला ह्या बॅगा जवळ घेऊन बसता येणार नाही, असे तिने बजावले. काय बोलावे चटकन न कळल्यामुळे मी फक्त वरच्या कपाटाकडे अंगुलीनिर्देश केला. काही वस्तू त्रिशंकूप्रमाणे किंवा आत रहायचं की बाहेर (डोक्यावर) पडायचं याचा निर्णय न झाल्यमुळे अधांतरी लटकत होत्या. झाली एवढी लूट खूप झाली, थोडक्यात समाधान मानावे, असा (पुन्हा एकदा) पोक्त विचार करून मी वर लटकत असलेल्या वस्तंच्या माय्राच्या टप्यापासून डोक्यावर हात फिरवीत बाजूला सरलो. 'ही छोटी बॅग तुम्ही जवळ सीटखाली ठेवू शकाल पण ही दुसरी चांगलीच मोठी आहे, एअर होस्टेस मला बजावत होती.आता दुसय्रा बॅगेने चोहोबाजूंनी अंमळ बाळसे धरले असले तरी ते बोलून दाखवण्याची (आणि तेही इंग्रजीत) काय आवश्यकता होती? मी चेहय्रावरच नापसंतीचा भाव आणला. ही बॅग तुम्हाला केबिनमध्ये ठेवावी लागेल. मी हादरलो आहे, घाबरलो आहे की गोंधळलो आहे, हे तिला कळणार नाही, असे भाव मी चेहय्रावर आणले. तिनेही भावाबद्दल घासाघीस न करता ' अहो, घाबरू नका, बॅग केबिनमध्ये ठेवण्यासाठी आम्ही तुमच्याकडून जास्तीचे पैसे मागणार नाही’, असे म्हणत माझे शंकानिरसन तर केलेच पण 'अंदरकी बात' तिच्या लक्षात आली असल्याचेही दाखवले. अर्थात हा तिचा चक्क गैरसमज होता. आपल्या अज्ञानातले सुख भोगू द्या की तिला, असा विचार करून मी तो गैरसमज तिच्या लक्षात आणून देण्याच्या भानगडीत पडलो नाही. तेवढ्यात दुसरी एक हवाई सुंदरी तिथे हरिणीच्या चपळाईने आली आणि म्हणाली, २२ नंबरच्या सीटच्या वरच्या कपाटात ही बॅग मावेल,असे मला वाटते असे तिने माझ्या (बाळसेदार) बॅगेचा अंदाज घेत म्हटले. पहिलीच्या चेहय्रावरचा अविश्वास लपत नव्हता आणि तुच्छता तर स्पष्ट दिसत होती. मी मात्र अर्थातच तिकडे कानाडोळा केला आणि काहीशा चपळाईने ती जागा हस्तगत करून मराठी पाणी दाखवले. अशाप्रकारे २२ नंबरच्या सीटवरील कपाटात बॅग ठेवून '३२ फ' नंबरच्या सीटवर आस्मादिक स्थानापन्न झाले. २२ नंबर लक्षात ठेवा, नाहीतर उतरतांना पुन्हा गोंधळ होईल. वरकरणी समजुतदारपणा दाखवीत पण मनातून खवचटपणे ती हवाई सुंदरी आपल्याशीच बोलली. पण आता या दोन्ही जागी माझी मालकी पुढच्या साडे तेरा तासांसाठी तरी नक्की झाली होती. या आनंदात असल्यामुळे मी त्याच्यावर विरजण पडू दिले नाही.

  विमानात येतायेता एक वेगळाच प्रकार घडला होता. गेटवर एका कर्मचारी महिलेने मला विचारलेहोते, तुम्हाला एक्झिट गेट जवळची जागा हवी आहे का? ती काय म्हणते आहे ते मला सुरवातीला कळलेच नाही. मी काही बोलणार एवढ्यात ती म्हणाली, तुम्ही याबाबत आत गेल्यावर ठरवणार का? मला हेही कळले नाही. पण हो म्हणून मी आत शिरलो. आमचे एक सहप्रवासी महणाले, तिने तुम्हाला विचारले. आमच्याकडे बघितले सुद्धा नाही. लोक कपड्याकडे पाहून माणसाची किंमत करतात. मी माझ्या कपड्यांकडे बघितले. मी सूट घातला होता. यामागे एक वेगळीच भूमिका होती. इकडे अमेरिकेत येताना सूट आणण्याचे ठरविले होते. पण तोच खूप जागा अडवू लागला म्हणून विचार केला की, सूट घालून का जाऊ नये? विमानातच तर बसून जायचे आहे. सूट मळण्याचा प्रश्नच नव्हता. थोडा चुरगळला असता. इस्त्री करून चालणार होते. तोच सूट परतीच्या प्रवासात अंगावर होता. म्हणून तिने मला दाराजवळची सीट जास्तीचे पैसे भरून घेता का, म्हणून विचारले होते. ही कपड्यांची कमाल होती.
   विमानात तेरा साडे तेरा तास कंटाळा न येता जावेत, म्हणून आयपॅडवर लिहीत होतो. निम्मे अंतर कापायला बराच वेळ लागला. पण पुढचे निम्मे अंतर लवकर कापले गेले, असे वाटले. सहार विमानतळ आला. छत्रपती शिवाजी टर्मिनस हा उच्चार आमच्या वैमानिकाच्या तोंडून ऐकतांना आनंद व अभिमान वाटत होता. आदल्या दिवशीच एअर इंडियाची ईमेल आली होती. देशांतर्गत उड्डाणे सुद्धा आता याच ठिकाणाहून होणार होती. आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय अशी  दोन वेगवेगळी विमानतळे आता एक होणार होती. मुहूर्त होता १ आॅक्टोबरचा. मी पहिल्या प्रवाशांपैकी एक असणार होतो. ‘नथिंग टु डिक्लेअर’च्या रांगेत सामील होण्यापूर्वी इमीग्रेशन काउंटरवरून स्टॅम्प मारून घेतला आणि देशात पुन्हा परत आल्याची नोंद सरकारदरबारी करून घेतली. रात्रीचे साडे नऊ वाजत आले होते. आपल्या मायदेशी परतल्याची बातमी इथल्या व तिथल्या अशा दोन्ही घरी व्हावी म्हणून मोबाईल स्वीच आॅन करून फोन करण्याचा प्रयत्न केला. पाहतो तर काय दोन्ही फोन रुसलेले! काय करावे काही कळेना.मुक्कामी पोचताच दोन्हीकडे कळविण्याचा शिरस्ता होता. फोन झाला नसता तर दोन्हीकडून चौकशीला सुरवात झाली असती. पण साडे नऊ नंतर लगेच दुसरी कोणतीच फ्लाईच नसल्यामुळे लगेच सामसूम झाली. सहार विमानतळाची वास्तू एखाद्या चक्रव्युव्हासारखी आहे. डोमेस्टिक फ्लाईटचा प्लॅटफाॅर्म सापडत नव्हता. लिफ्टने दोन्ही तिन्ही लेव्हल्स पालथ्या घातल्या. बाहेर जाल तर सकाळचे चार वाजेपर्यंत आत प्रवेश मिळणार नाही, हे मला द्वापालाने सांगितले होते. आतापर्यंत खूप भटकंती झालीहोती. मनात विचार आला निम्मे मुंबई नागपूर अंतर तर हेलपाट्यातच कापले गेले असेल. रात्री बारा वाजता वीस/पंचेवीस मुलांचा एक गट कुठूनतरी अवतरला. त्यांच्यापैकी एकाला फोनबद्दल विचारले. तो म्हणाला, ‘आम्ही सगळे सौदीहून परत आलो आहोत. आमचीही स्थिती तुमच्यासारखीच झाली आहे. आमचेही फोन लागत नाहीत’. तेवढ्यात कुणीतरी बोलले की, देशांतर्गत फेय्रा एच टर्मिनसवरून सुरू होणार आहेत. निश्चित माहिती तर मिळाली या आनंदात व उत्साहात होतो. यानंतर एका खुर्चीवर आसनस्थ होताहोता एकाने सांगितले की 'एच' विभागातली  ६२७ क्रमांकाच्या खिडकीवर नागपूरच्या फ्लाइटची व्यवस्था आहे. आता नेमकी माहिती मिळाली होती. चार वाजण्याची वाट पहात थांबायचे ठरवले. साडेतीनलाच जाग आली. एक फेरफटका मारण्याचे ठरवून 'एच'च्या शोधात निघालो. एका दिशेने गलबल दिसली. काही महिला ड्रेसकोड स्वरूपात हळदी रंगाची साडी आणि कुंकवी लाल रंगाचे ब्लाऊज घालून लगबगीत वावरत होत्या. पुढे गेलो तर सूटबुटातली साहेब मंडळी दिसली. तेवढ्यात एक महिला लगबगीने माझ्या दिशेने आली आणि तिने विचारले, ‘सर, कहा जाना है आपको?’.  ‘नागपूर’, असे उत्तर ऐकताच ती चक्क मराठीत म्हणाली, ‘ती काय समोरची खिडकी’. 'चार वाजता सुरवात होणार होती ना?', मी म्हटले. 'नाही, आपण येऊन बोर्डिंग पास घेऊ शकता'. मी काउंटरवर गेलो. एकजण तातडीने पुढे आला त्याने माझी मोठी बॅग वजनासाठी उचलून वजनासाठी ठेवली. '४५ किलो, ॲडिशनल पेमेंट किती द्यावे लागेल? ', मी विचारले. 'काही नाही', उत्तर ऐकताच मला आश्चर्यच वाटले. बोर्डिंग पास घेतला. डोमेस्टक फ्लाईटच्या शोधात निघालो. चक्रव्युव्हाची आठवण होत होती. प्रत्येक दिशेने वळणे घेतली.मजल्यांवर वरखाली उतरलो. सिक्युरिटी चेकसाठी उभा राहिलो.
 'बॅग टॅग्ज? ' प्रश्न ऐकला आणि डोक्यावर हात मारला. पण त्याशिवाय पर्यायच नव्हता. 'मार्गदर्शकाते वाट पुसतु' परत जाण्यावाचून पर्याय नव्हता. बॅगेसाठी दोन व शिवाय 'जवळ असोत, म्हणून' आणखी दोन टॅग्ज उचलून परत आलो. तपासणीचे सर्व सोपस्कार झाले.  ४३ नंबरच्या गेटपाशी आलो. काउंटरपाशी गेलो. अगत्याने आगतस्वागत झाले. वाट पाहण्याशिवाय आता काहीही काम शिल्लक राहिले नव्हते. म्हणून एका खुर्चात विसावलो. केव्हा डोळा लागला ते कळले नाही. एकदम गडबड गोंगाट सुरू झाला आणि झोप खाडकन उघडली.
      सुरवातीला मला अर्थबोधच होत नव्हता. मग लक्षात आले की, आपण विमानतळावर आहोत आणि आपल्या परतीच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा अजून पूर्ण व्हायचा आहे. समोर प्रवाशांची रांग दिसत होती. गेटवर कर्मचारी सज्ज झाले होते आणि आता एकेकाला आत सोडणार होते. मी ( शक्य तेवढी) चपळाई करीत आपले चंबूगवाळे गोळा केले आणि प्रवासी दप्तर खांद्यावर टाकून चालू लागलो. एक सूटबूटधारी मला न्याहाळून पाहत होता. तो मला न्याहाळत नसावा हे स्पष्ट होते. कारण तसे काहीच कारण नव्हते. म्हणून मी थबकून मागे वळून पाहिले तर मागे कुणीच नव्हते. आश्चर्ययुक्त चेहय्राने मी पुढे चालू लागलो. रांगेच्या शेवटी जाऊन उभे राहण्याचा माझा विचार होता. पण तो सूटबूटधारी आपली तुंदिलतनू सावरीत शक्यत्या चपळाईने माझ्याकडे आला.
   'धिस वे ,सर! इफ यू विल प्लिज सर!', मी थबकून उभा झालो . माझ्या बॅगचे वजन ४५ पाऊंड होते. डोमेस्टिक फ्लाईटवर ३० पाऊंड की असेच काहीतरी वजन जादा पैसे न भरता सोबत नेता येते, हे मला माहित होते. ॲडिशनल चार्जेस किती हवेत, हे मी स्वत:हून विचारले होते. आजच्या पुरता डोमेस्टिक काऊंटरवर इंटर नॅशनल फ्लाईटच्या काऊंटर वरचा कर्मचारी आला असेल, त्याने माझ्याकडून जास्तीचे पैसे मागितले नाहीत ते नाहीतच पण मी स्वत:हून जास्त पैसे भरण्याची तयारी दाखवल्यावर ५० पाऊंड का असे काहीसे वजन अतिरिक्त पैसे न भरता सोबत नेता येते , असे सांगत त्याने मलाच वेड्यात काढले होते. आता ऐनवेळी मला आडवत होते. या सर्व प्रकारात माझा काय दोष?  मी मनात 'डिफेन्स' तयार ठेवून ताठर झालो. 'व्हेअर इज युवर तिकीट सर?'. मी काहीही न बोलता पण घुश्शातच पासपोर्ट व तिकीट त्याच्यासमोर धरले. ' दी पासपोर्ट इज नोमोअर नेसेसरी सर! कीप इट इन युवर पाॅकेट सर!’ त्याने तिकीट आपल्या हातात घेतले, रांगेतून मला बाहेर काढले आणि काऊंटरपर्यंत माझ्यासोबत आला. काऊंटर फाॅईल कापून माझ्या हातात दिले. 'चेक धिस!' म्हणून तिकिटाचा उरलेला भाग त्याने कर्मचाय्राच्या हाती दिला. 'इट वाॅज नाॅट माय फाॅल्ट!'. मी उसन्या अवसानाने म्हटले. माझे तिकीट प्रकाश झरोक्यात धरून तो कर्मचारी उभा होता. आवश्यक तो ध्वनी कानी पडेना. 'सम थिंग राॅंग सर! वी विल चेक इट सर!' त्याने काहीशा रागानेच इकडे तिकडे पाहिले. टिटटाप वेषातील चार पाच कर्मचाय्रांनी काऊंटरला गराडा घातला. प्रत्येक जण मनाला येईल ती खुंटी पिरगळत होता, पण व्यर्थ! शेवटी त्यांना हवा असलेला ध्वनीसंकेत त्या मशीन मधून बाहेर पडला. गराडा घालणारे कर्मचारी विजयी मुद्रेने बाजूला सरले. 'धिस इज युवर टिकीट सर! यू आर दी फर्स्ट कस्टमर टु फ्लाय फ्राॅम मुंबई टू नागपूर बाय अवर फर्स्ट फ्लाईट सर!' त्याने इशारा केला. एअर इंडियाचे शे पन्नास कर्मचारी आपापला गणवेश परिधान करून मार्गावर दुतर्फा उभे राहून टाळ्या वाजवीत त्यांच्या पहिल्या वहिल्या प्रवाशाचे उत्साहात स्वागत करीत होते. कॅमेय्राचा 'क्लिकक्लिकाट' संपत नव्हता. शूटिंगसाठी आलेले टीव्ही युनीट एकेक पाऊल मागे घेत मागेमागे सरकत होते. तसतसे एक एक पाऊल टाकीत त्या 'जनरल मॅनेजर' सोबत आस्मादिकांची स्वारी एकेक पाऊल पुढे सरकत होती. आता आमच्या मागे हळूहळू प्रवाशांची रांग तयार होत चालली होती. आम्ही मिरवणुकीने पण आस्ते कदम पुढे सरकत होतो.
  माझ्या चेहय्रावरची गोंधळलेपणाची, बावळटपणाची, अपराधीपणाची, उसन्या अवसानाची झाक आता पार पळाली असणार होती. मी सावरलो. नेत्याच्या आविर्भावात त्या 'बड्या' मंडळींच्या अभिवादनाचा स्वीकार करू लागलो. तेवढ्यात एक कर्मचारी समोर आला. त्याने माझ्या हातात शीत पेयाचा पाव लिटरचा चौकोनी डबा कोंबला. ‘धिस इज युवर प्रेझेंट सर!’ असे म्हणत तो माझ्या मागच्या प्रवाशाकडे वळला. तिकीट, बॅग, व तो डबा धरता धरता माझी धांदल उडत होती. वळणावर एअर इंडियाचा 'महाराजा' वेगळीच भावमुद्रा धारण करून सुहास्यवदनाने माझ्या स्वागतासाठी सज्ज झाला होता.
   आज नव्याची नवलाई होती. आजपासून डोमेस्टिक फ्लाईट सुद्धा सहार वरून उड्डाण 'भरणार' होती. आकाशात या नवीन तळावरून झेप घेणारे पहिले विमान मुंबई- नागपूर मार्गावरचे होते. त्या विमानतले आम्ही सगळे पहिले प्रवासी होतो. त्यातला मी पहिला प्रवासी ठरलो होतो. आमच्या स्वागतासाठी सगळा मार्ग नव्या नवरीसारखा सजला होता. प्रत्येक स्तरावरची यंत्रणा पहिल्यानेच कार्यरत होत होती व म्हणून पहिलटकरणीच्या वेदना आणि पहिल्या अपत्यसंभवाचा आनंद एकाचवेळी अनुभवत होती. सगळ्या कार्यक्रमाला सांस्कृतिक स्पर्शासोबत 'काॅरपोरेट टच'ही होता.
    नव्या कोय्रा करकरीत विमानाच्या दारात हवाई सुंदय्रा मोजक्या हास्याने आमचे स्वागत करीत होत्या. त्यांच्या चमूची प्रमुख जातीने 'हवे नको' पहात होती. लाल गालिचावरून आम्ही पुढे सरकत होतो. मार्गाच्या दुतर्फा तीनतीन खुर्च्या होत्या. पहिल्या आणि तिसय्रा खुर्च्यांना कुंकवी लाल रंगाचे सीट कव्हर होते. मधल्या खुर्चीला काळसर पिवळा पण हळदी रंग होता. हीच रंगसंगती सुंदय्राच्या पोषाखातही होती.
   प्रारंभिक सूचना देऊन झाल्यावर, ‘आज आमच्याकडून आपणासगळ्यांना चहा नास्ता आहे बरं का, तसेच एक फाॅर्म आम्ही आपल्याला देऊ. त्यात आमच्या प्रत्येक तरतुदीला आपल्याला 'क्रम'(रेट) द्यायचा आहे. शेवटी आम्हाला आपली सेवा आणखी चांगली करता यासाठीच्या सूचना नोंदवायच्या आहेत’, आवाजात विलक्षण आर्जवी मार्दव होते.
    विसंगत अशी एकच सूचना वाटली. संकटप्रसंगी काय करायचे, विमान पाण्यात बुडू लागले तर काय करायचे, हे ऐकतांना आम्ही एकदम गंभीर झालो. पण यात चूक असे काही म्हणता यायचे नाही. टायटॅनिकच्या पहिल्याच जलप्रवासात तिला जलसमाधी मिळाली होती! वास्तवाचे भान विसरून कसे चालेल?


No comments:

Post a Comment