Showing posts with label Profile. Show all posts
Showing posts with label Profile. Show all posts

Thursday, February 4, 2016




                   शिंपला भेदणारा मोती
       पडतील स्वाती तर पिकतील मोती, याचा पूर्ण अर्थ असा की, स्वाती नक्षत्रात पडलेला पावसाचा थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो असा आहे. स्वाती नक्षत्रात चांगला पाऊस पडला तर जोंधळे (ज्वारी) मोत्यासारखे होतात असे शेतकय्रांमध्ये म्हटले जाते. स्वाती नक्षत्रात पाऊस पडला तर तो पिकांसाठी इतका चांगला असतो की, शेतात जणू धान्य नाही तर मोतीच उगवतात. मोत्यांची भुरळ मानवाला नेहमीच पडत आलेली आहे. आॅइस्टर (शंपला ) नावाचा एक जलचर आहे. याचे शरीर अगदी लुसलुशित असते. पाण्यात वावरतांना शिंपल्यात शिरलेले वाळूचे कण टोचू नयेत म्हणून हा प्राणी स्वत:भोवती एक आवरण तयार करतो. आता हे कण अगदी गुळगुळीत होतात. हेच ते मोती. आजकाल शिंपला उघडून त्यात मुद्दामून चिमुटभर वाळू टाकतात. ते टोचू नयेत म्हणून तो जलचर त्याला आपल्या जीवनरसाने झाकून टाकतो आणि मोतीच मोती मिळतात. अशी करतात मोत्यांची शेती! पण हे असतात कल्चर मोती. त्यांना नैसर्गिक रीत्या तयार झालेल्या मोत्याची सर नसते. एका पर्शियन कवीने -रूमीने - आपल्या कवितात 'मोत्यांचा वापर' अनेकदा केला आहे. त्याच्या एका कवितेत समुद्र मोत्याला आवाहन करतो की, तू शिंपले भेदून   बाहेर ये आणि माझ्या विशाल विश्वात मुक्तपणे वावरण्याचा आस्वाद घे. पण मोती स्वत:हून कधीच बाहेर पडत नाही, अशी समजूत आहे. पण त्यानं बाहेर पडायला हवं.
शिंपल्यातून बाहेर पडणारा मोती - असा हा मोती शिंपल्यातच अडकून पडतो त्याला शिंपला उघडून बाहेर काढावे लागते, असे म्हणतात.पण एक मोती स्वप्रयत्नाने शिंपला भेदून बाहेर पडला अशी कल्पना करून अफगाण अमेरिकन लेखिका नादिया हाशमी हिला 'द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल' हे शीर्षक आपल्या कादंबरीला द्यावेसे वाटावे ही कल्पना जशी रम्य आहे तशीच ती कादंबरीच्या कथानकाचा एका वाक्यात परिचय करून देणारीही आहे. 
    स्त्री मुक्ती ही जागतिक समस्या आहे. स्त्रीच्या वाट्याला कोषातील बंदिस्त जीवन का यावे/आले?  पुरुष सत्तेमुळे? कट्टरपंथीयांच्या धार्मिक सत्तेमुळे? धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील संगनमतामुळे?  'नको हा स्त्री जन्म', असा टाहो फोडण्याची पाळी जगभरातील सर्वच जातीधर्माच्या स्त्रियांवर का आली? ही तसं पाहिलं तर एक समाजशास्त्रीय समस्या आहे. ही समस्या विषय स्वरूपात घेऊन अनेक साहित्यकृती जन्माला आल्या आहेत. त्यातच हा विषय जेव्हा एखादी स्त्री हाताळते, तेव्हा त्या साहित्यकृतीला एक वेगळीच धार निर्माण होणार यात नवल ते काय? स्वत: एक अफगाण स्त्री असल्यामुळे भुक्तभोगी स्त्रीचा जीवनपट ती कसा उलगडून दाखवते हे मुळातूनच वाचायला हवे.
  निर्बलता, दैव आणि निर्णयस्वातंत्र्याचा अभाव या तिहेरी पाशातून बाहेर पडण्याचा आजच्या अफगाण स्त्रीचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो आहे, हे सांगणे कठीण आहे. म्हणूनच बहुदा, एक 'मोती' कवच भेदून कसा बाहेर येतो, हा विषय आजही वाचनीय तसाच चिंतनीय ठरत असावा. 
 अफगाणिस्थान कालचा -  यादवी, अफूमुळे आलेली व्यसनाधीनता, त्याच अफूचा व्यापार हा उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा स्रोत असणे, शतकानुशतके, कधी मुस्लिम, तर कधी ब्रिटिश, कधी अमेरिकन  तर कधी रशियन राजवटींकडून होणारे शोषण आणि या सर्वावर कडी करणारा कट्टरपंथी तालिबानी दहशतवादी भस्मासूर यांच्या छळवादातून अफगाण समाज सतत पिचला, ठेचला गेला आहे. त्यात स्त्रियांची स्थिती तर आणखीनच दयनीय व बिकट असणार, यात काय शंका?  ११ सप्टेंबरला अमेरिकेतील दोन मनोरे उध्वस्त झाले. आणि कट्टरपंथीय दहशतवादाची भयानकता सर्व जगाला नव्याने जाणवली. दुसय्रा महायुद्धाने जसा अनेक अमर साहित्यकृतींना जन्म दिला तसाच परिणाम या दहशतवादी उद्रेकाचा होताना दिसतो आहे. हा दहशतवाद स्त्रियांना धार्मिक कट्टरतेमुळे मरणप्राय यातना देतो आहे. त्यांचे रूदन अनेकदा मूक असते. पण काही जोखड झुगारून मात देऊन मार्ग काढतात. या लढ्याची प्रेक्षणीयता तुलनेने कमी असली तरी त्यामुळे त्याचे महत्व कमी होत नाही.
    आजचा अफगाणिसेथान -  नादिया हाशमीच्या पहिल्यावहिल्या कादंबरीची 'द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल' या साहित्यपटाची लांबी एका शतकाची आहे. हे शीर्षक तिला रूमीच्या काव्यपंक्तीवरून सुचले. या कादंबरीत अफगाण स्त्रियांची कशी कोंडी झालेली आहे, याचे जसे चित्रण आहे तसेत हा संपूर्ण समाजच विघटनाच्या आणि विनाशाच्या उंबरठ्यावर कसा उभा आहे, तेही दाखविले आहे. खरे साहित्यिक  चित्रण एवढेच करून थांबत नाही, तर मुक्तीच्या मार्गावरही प्रकाश टाकीत जाते. हे सर्व गुणविशेष या कादंबरीत प्रकर्षाने जाणवतात. स्त्रीचे शोषण, तिच्यावर  होणारे अत्याचार, तिची अगतिकता, तिचे मागासलेपण, तिची मुकाट सहनशीलता यांचे चित्रण अनेक कादंबय्रात केलेले आढळते. नादिया हाशमीचे वेगळेपण यात आहे की, तिने स्त्रीचा चिवटपणा आणि जिवटपणा सुद्धा तेवढ्याच समर्थपणे मांडला आहे. 
   स्त्रीच्या हक्काच्या दोन जागा -   ज्या काळात स्त्रीयांच्या हक्काच्या जागा दोनच होत्या एक म्हणजे चार भिंतींचे घर किंवा कबर! ( आजही हीच भूमिका अफगाणिस्थानात दृढमूल आहे!) अशा काळातील  एका शतकाच्या कालखंडाची ही कथा आहे. त्यामुळे कथा खापर पणजी पासून सुरू होते याचे आश्चर्य वाटायला नको. शेकीबा असं तिचं नाव आहे. शेकीबा या शब्दाचा अर्थ आहे  अल्लाची देणगी! हिचा अर्धा चेहरा स्वयंपाक करता करता तेलाचा भडका उडून भाजलाहोता. मुलाचा पोशाख परिधान करून ती शाळेत जायची. मुलींना शाळा व शिक्षण वर्ज असलेल्या काळात अनाथ झालेली शेकीबा थोडेफार शिकली ती अशी युक्ती करून! शेकीबा ती ज्या कालखंडात वावरते आहे तो कालखंड  असा आहे की ज्यात स्त्रीला फटक्यांची शिक्षा होती. लहान वयात लग्न, सवती व सासुरवास ही सर्वमान्य जनरीत होती. शरीरसंबंधासाठी पत्नीच्या मान्यतेचा मुद्दाच नव्हता, लैंगिक भावना व्यक्त करणारीला दगडाने ठेचून मारल्याची उदाहरणे होती. शेकीबा, शायना आणि रहिमा - शेकीबाच्या मनात मात्र स्त्रीसुलभ भावनेबरोबरच वैचारिक स्वातंत्र्याची इच्छाही डोकावतांना आढळते. तिचा पती राजकारणात सहभागी असतो. रहिमा ही कादंबरीची नायिका. तिचा पतीही राजकारणीच आहे. शायमा ही तिची मावशी. कुबड असल्यामुळे हिचे लग्न होत नाही. मावशीचा तिच्यावर फार जीव. शायमा मावशी आपल्या भाचीला -रहिमाला- शेकिबाच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी कथा सांगत असते. गोष्टीवेल्हाळ रहिमाला त्या कथा खूप आवडत. कथेत व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित प्रसंग असत, तसेच त्या काळच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकणारेही प्रसंग असायचे. थोडक्यात काय तर कथावस्तूच्या एका टोकाला आहे जुन्या काळातील स्त्री शेकीबा आहे, तर वर्तमानकाळात वावरते आहे तरूण रहिमा. आपल्याला कथा समजते ती याच रहिमाच्या मुखातून. मधली पाती आहे शायमा मावशीची. कुबडेपणा स्वीकारून,पत्करून  आणि जन्मभर एकटेच रहायचे आहे, हे प्राक्तन धैर्याने व सहजतेने मान्य करीत, ती कादंबरीभर स्त्री कल्याणाची जबाबदारी आपलीच आहे, अशी भूमिका घेऊन वावरते. जुन्याकाळातील सर्वमान्य नियमांमध्ये कालोचित बदल व्हावयास हवेत, हे द्रष्टेपण हा शेकीबाचा स्वभावगुण. पण तो उपजत म्हणता यायचा नाही. प्लेगच्या साथीमध्ये कुटुंबातील सर्व घटकांचा बळी गेल्यामुळे अनाथ  झालेली शेकीबा अन्याय, अत्याचारांचा सामना करीत शेती करताकरता खेड्यातून काबूल सारख्या शहरात येते. पुरुषाचा पोशाख करून  राजवाड्यात एक सेवक म्हणून काम करू लागते. एकदा ती मैत्रिणीबरोबर राजा अमानुल्ला  आणि राणी सुरैय्या  यांच्या भाषणाला ती जाते. याने अफगाणिस्थानला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले होते आणि एका पाठोपाठ एक अशा राजकीय आणि सामाजिक सुधारणा करण्याचा सपाटा सुरू केला होता. सुरैय्या ही आधुनिक शिक्षण घेतलेली अफगाण तरुणी आणि अमानुल्ला यांचा प्रेमविवाह झालेला असतो. भाषणाच्या प्रारंभी सुरैय्या आपला बुरखा काढून टाकते आणि ' इस्लाममध्ये स्त्रीने बुरखा घेतला पाहिजे असे कुठे आहे?', असा बेधडक प्रश्न विचारते. 'स्त्रियांना समान हक्क असले पाहिजेत', ही तिची मागणी शेकीबामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते. स्त्रियाही माणूसच आहेत. जुनाट रीतीरिवाजांचे जोखड त्यांनी झुगारून दिले पाहिजे, हा विचार ऐकून सुरवातीला आश्चर्यचकित झालेल्या शेकीबाच्या मनात दृढमूल होतो. तिला पती मिळतो तो वंश विस्तारापुरता. पण याबाबत तिची तक्रार नसते. यथावकाश  शेकीबा अस्तंगत होते.
    बच्चा पोषचा परिणाम -   इतिहास सांगतो की, १९१९ ते १९२९ या अल्पकालीन कारकिर्दीनंतर अमानुल्लाला परगंदा व्हावे लागले आणि घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरू लागले. आता तरुणांसमोर युद्धावर जाणे हा एकमेव व्यवसाय शिल्लक राहतो. रहिमाला चार बहिणी असतात. तिचे अफीमबाज वडील सगळ्या मुलीच झाल्यामुळे नशीबाऐवजी पत्नीवर नाराज असतात. कुटुंबाचा गाडा रेटण्याचा भार ही पत्नी नशीब म्हणून स्वीकारते. एकापाठोपाठ पाच मुली हे या कुटुंबाचे दुसरे दुर्दैव. यावर त्याकाळच्या समजुतीनुसार 'बच्चापोष'चा उपाय केला जातो. या प्रथेनुसार हे कुटुंब रहिमा या मुलीला मुलाप्रमाणे पोशाख घालून जमेल तितके दिवस मुलगा म्हणून वाढवतात. याचे दोन फायदे असतात. मुख्य म्हणजे समाजात पुत्रवती आणि पुत्रवान म्हणून मान मिळतो. दुसरे असे की, पुढच्या खेपेला मुलगा  होण्याची शक्यता निर्माण होते, अशी समजूत दिलासा देत असते. खुद्द रहिमाचा फायदा असा झाला की, ती मुलाचा पोशाख करून शाळेत जाऊन थोडोफार शिक्षण घेऊ शकली. रहिमाने आपल्या खापर आजीचा कित्ता अशाप्रकारे मुलाचा पोशाख करून शाळेत जाऊन गिरवला. एका शतकाचे अंतर असूनही शेकीबा आणि रहिमा याचे प्राबद्ध कसे सारखेच होते, हे लेखिकेने या निमित्ताने मोठ्या खुबीने दाखविले होते. शायमा मावशीच्या मध्यस्तीने रहिमाचे शिक्षणही बय्रापैकी होते. पण पुढे अब्दुल खलिक या अडदांड, आणि दुष्ट शिपायीगड्याची नजर तिच्यावर पडते. तो तिला मागणी घालून अफिमबाज बापाकडून अफूच्या मोबदल्यात विकत घेतो. त्यामुळे नाइलाज होऊन वयाच्या तेराव्या वर्षी आपल्या पतीची चौथी बायको म्हणून रहिमा विवाहबद्ध होते. विवाहानंतर लगेच मातृत्व हा प्रकार सर्वसामान्य अफगाण मुलीप्रमाणे तिच्याही वाट्याला येतो. तीन सवती आणि सासू तिला छळछळ छळतात. ह्या सर्व नशीबाच्या गोष्टी असतात, असे पटवून आई तिची समजूत काढते. इतर मुलींच्या तुलनेत वेगळे घडते ते असे की रहिमाचा पती पार्लमेंटचा सदस्य होतो. तिची सवत (पतीची पहिली पत्नी) अक्षरशत्रू असते. तिला कागदपत्रे वाचून दाखवण्याचे (सेक्रेटरीचे) काम रहिमाच्या वाट्याला येते. याच काळात अनुभवासोबत ती संगणक शिक्षणही घेते. आपल्या पंखात पुरेसे बळ आले आहे, याची खात्री पटताच पिंजरा तोडून बाहेर पडते आणि महिलाश्रमात आश्रय स्वीकारून आपली सुटका करून घेते. याच्या मुळाशी सतत शेकीबाची आठवण करून देणारी तिची शायमा मावशी आहे. या सोबत ती रहिमाला देशाचे कलावैभव, काव्य आणि संस्कृतीचा परिचय करून देत तिच्या मनोपिंडाचे पोषण करीत असते. युद्धे, स्थानिकांमधील सत्तासंघर्ष, धार्मिक कट्टरता व कर्मकांडे आणि राजकीय उलथापालथ यातून होणारा अफगाण स्त्रियांच्या अनेक पिढ्यांचा इतिहास सांगता सांगता लेखिकेने अफगाणिस्थानातील एका शतकातील स्त्रीजीवनाचा आलेख वाचकांसमोर उभा केला आहे.
--


एका शतकाचे अंतर असलेल्या शेकीबा आणि रहिमा यांच्या आयुष्यातील पुरुषसत्तेचे ताण बरेचसे समान आहेत. शेकीबाच्या काळात फटक्यांची शिक्षा करणे, मर्जीचा विचार न करता लहान वयात लग्न होणे, सवती आणि सासुरवास असणे यासारखी िहसा आहे. शतकानंतर रहिमाची मोठी बहीण परवीन पितृसत्तेचे काच सहन न झाल्याने आत्महत्या करते. कादंबरीतील अनेक स्त्रिया आपले 'नशीब' म्हणत सर्व प्रकारचे अन्याय मुकाट स्वीकारताना दिसतात. जनानखान्यातील एका स्त्रीला आपले प्रेम व्यक्त केल्याच्या गुन्हय़ासाठी दगडाने ठेचून मारले जाते. विवाहात शरीरसंबंधासाठी स्त्रीच्या संमतीचा मुद्दा सर्रास गरलागू राहतो. कादंबरीत एकमेकांशी प्रेमळपणे वागणाऱ्या सवती आहेत. स्त्रियांवर 'तलाक'ची टांगती तलवार आढळत नाही. स्त्रिया पुरुषसत्तेत आपले स्थान पक्केकरताना इतर स्त्रियांवर सत्ता गाजविताना दिसतात, प्रसंगी िहसा करतात. सहजसुलभ लैंगिक आकर्षणाची भावना स्त्रियांना अनुभवायला येताना दिसत नाही. शेकीबाच्या मनातील अशा भावना निसटत्या रूपात उमटलेल्या आहेत.
कादंबरीची रचना करताना शेकीबाचा अर्धा चेहरा भाजलेला असणे, मावशीला कुबड असल्याने तिचे लग्न न होणे, परवीनसारख्या हळुवार मुलीच्या पायात व्यंग असणे, रहिमाचा मुलगा जहांगीर छोटय़ाशा आजाराने मरणे, शेकीबा आणि रहिमा या दोघींचे पती राजकीय वर्तुळातील असणे, दोघींचा प्रवास छोटय़ा खेडय़ातून काबूलपर्यंत होणे, त्या दोघींना 'मुलगा' होणे, त्यांना रहीम आणि शेकीब होण्याचा म्हणजेच पुरुष होण्याचा अनुभव येणे या साऱ्या गोष्टी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत. रहिमा किंवा शेकीबा अशी शीर्षके असणारी एकूण छोटेखानी ६९ प्रकरणे आहेत. लेखनातील सहजता आणि रचना या दोन्हीमुळे शतकाचे अंतर असणाऱ्या दोघींच्या आयुष्यात वाचकाला एकाच वेळी सहज संचार करता येतो. रहिमामध्ये तयार होणाऱ्या धर्याची सूक्ष्म प्रक्रिया या रचनेमध्ये चपखल पकडली आहे. शेकीबा आपले नशीब काही प्रमाणात स्वीकारते. रहिमा नशीब बदलणारा सुटकेचा मार्ग शोधते. त्यांचा हा प्रवास, त्यातील जीवघेणी वळणे, त्यांची घालमेल, कोंडी, त्यावर त्यांनी केलेली मात, त्यांचे धर्य हे सारे मुळातून वाचण्यासारखे आहे.
तेराव्या शतकातील प्रसिद्ध पर्शियन कवी रूमीच्या कवितेतील 'सागराचे पाणी मोत्याला, िशपला तोडण्याची याचना करते' या ओळीवरून कादंबरीचे शीर्षक सुचले आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मक आहे. आपल्या आधीच्या पिढीतील स्त्रिया अफगाणिस्तानमध्ये उच्चशिक्षित झाल्या. वर्तमानात मात्र अनेक स्त्रियांच्या वाटय़ाला इतके कठीण वास्तव का यावे, या विचाराने लेखिका अस्वस्थ आहे. तसेच तिच्या वाटय़ाला प्रेमळ संगोपन आणि सुस्थिती आली आहे याची उतराई होणेही तिला गरजेचे वाटते. लेखिका कादंबरीबद्दल म्हणते, 'रहिमामध्ये तयार झालेली जगण्याची ऊर्मी असंख्य अफगाण स्त्रियांमध्ये आहे. या देशातील परिस्थिती बदलण्याची तीच एक आशा आहे. म्हणून मला या धर्याची गोष्ट सांगायची होती.'
लेखिकेने शेकीबा आणि रहिमाच्या स्वप्नांची आणि धर्याची गोष्ट नेटकेपणाने सांगितली आहे. आपल्या जमिनीचे कागद मिळवून वकिलाकडे जाण्याचे धर्य शेकीबात कसे आले? कदाचित लहानपणी तिला मिळालेल्या प्रेमातून तिच्यात आत्मसन्मानाची जाणीव पक्की झाली असणार. रहिमाला शेकीबाची गोष्ट सांगणाऱ्या मावशीकडून हिंमत मिळाली असणार.
*स्त्रियांचे हक्क पुरुषसत्तेच्या जोडीने राजसत्तेच्या मर्जीवर अवलंबून असतात. आज जगभरात अनेक देशांत धार्मिक कट्टरपंथीय राजसत्ता प्रबळ होत आहेत. लोकशाहीची पीछेहाट होते आहे. कष्टकरी आणि स्त्रिया यांचा संघर्ष बिकट होत आहे. आज अफगाण स्त्रियांना जे वास्तव झेलावे लागत आहे ते अतिशय बिकट आणि अस्वस्थ करणारे आहे. त्यांच्या सुटकेचा मार्ग अंधूकपणेसुद्धा नजरेच्या टप्प्यात दिसत नसल्याने सर्वसामान्य अफगाण स्त्रीने किती काळ वाट पाहायची? महिलाश्रमात दाखल झालेल्या रहिमाचा संघर्ष सुकर राहणार आहे? गुंतागुंतीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीतून निर्माण झालेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील बिकट समस्यांना हे सोपे उत्तर तर नाही? असे प्रश्न वाचकांच्या मनात तयार करणारी ही कादंबरी महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांमधील स्वप्ने पाहण्याची आणि धर्याची ऊर्मी जगणे अर्थपूर्ण करीत असते. स्त्रियांच्या जिवटपणाचा धांडोळा घेत सामान्यांच्या धर्याच्या आणि स्वप्नांच्या कथा सांगत राहायला हव्यात. या संदर्भात कवी पाशच्या ओळी आठवतात, 'स्वप्ने मरून जाणे हे सर्वात धोक्याचे.'

'द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल'
लेखिका - नादिया हाशिमी
पृष्ठ संख्या - ४५२
प्रकाशक - विलियम मोरो
हार्पर कोलिन्सची प्रत २०१४
किंमत - यूएस डॉलर १५.९९
अरुणा बुरटे - aruna.burte@gmail.com
द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल'
There is some kiss we want
with our whole lives, the touch
of spirit on the body. Seawater
begs the pearl to break its shell.
And the lily, how passionately
it needs some wild darling!
At night, I open the window and ask
the moon to come and press its
face against mine.
Breathe into me. Close
the language-door and open the love-window.
The moon won’t use the door,
only the window.
स्त्रियांचे हक्क पुरुषसत्तेच्या जोडीने राजसत्तेच्या मर्जीवर अवलंबून असतात. आज जगभरात अनेक देशांत धार्मिक कट्टरपंथीय राजसत्ता प्रबळ होत आहेत. लोकशाहीची पीछेहाट होते आहे. कष्टकरी आणि स्त्रिया यांचा संघर्ष बिकट होत आहे. आज अफगाण स्त्रियांना जे वास्तव झेलावे लागत आहे ते अतिशय बिकट आणि अस्वस्थ करणारे आहे..
अफगाणिस्तानची ओळख रवींद्रनाथ टागोरांच्या प्रत्ययकारी 'काबुलीवाला' कथेतून आपल्यापकी अनेकांच्या लहानपणीच्या आठवणींचा खास भाग असते. त्यानंतरच्या शतकभरात अफगाणिस्तानात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. परकीय तसेच स्वकियांमधील अनेक टोळ्या यांच्यामधील सततची युद्धे आणि अमली पदार्थाचा अवैध व्यापार यामध्ये अनेक पिढय़ांची तरुणाई होरपळत राहिली. ब्रिटन, अमेरिका आणि रशिया या देशांच्या परराष्ट्र धोरणांचा परिणाम येथील सामान्य जनता झेलत राहिली. ९/११च्या ट्वीन टॉवरवरील हल्ल्यानंतर इस्लाम आणि इस्लामिक जग यांना अमेरिकन सत्तेने आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे दहशतवादी ही प्रतिमा चिकटविली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकशाहीचे आकुंचन झाल्याने इस्लामिक कट्टरपंथीय प्रबळ होत राहिले. त्या प्रमाणात कष्टकरी आणि स्त्रिया यांची कोंडी वाढत गेली. इस्लामिक जगामधील अन्याय, शोषण, मागासलेपणा, स्त्रियांना मिळणारी अमानुष वागणूक याबद्दल असलेल्या लिखाणाला बाजारपेठ मिळाली. या वातावरणात नादिया हाशिमी या अमेरिकन-अफगाण लेखिकेची 'द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल' ही पहिली कादंबरी शतकभराचा पट उभा करीत विघटनाच्या मार्गावर असलेल्या अफगाणिस्तानची कोंडी फोडायची असेल तर काय करायला पाहिजे याचा निर्देश करते. अन्याय, अत्याचार स्त्रिया मुकाट सहन करतात हा सर्वमान्य नियम. पण जगण्याच्या चिवट प्रेरणेतून तो सर्वमान्य नियम तोडण्याचा जिवटपणा सामान्य स्त्रिया दाखवतात त्याचा आलेख कादंबरी परिणामकारकतेने मांडते.
कादंबरीची नायिका रहिमा आपल्या शायिमा या मावशीकडून स्वत:च्या खापर-खापरपणजी शेकीबाची प्रेरणादायी गोष्ट ऐकत मोठी होते. वर्तमानातील रहिमाच्या आयुष्यातील उण्यापुऱ्या १५-१६ वर्षांचा काळ आणि शेकीबाच्या आयुष्याचा १९३० पर्यंतचा काळ कादंबरी एकत्र गुंफते. व्यक्तिगत आयुष्य आणि समाज या दोन्हींत घडणाऱ्या प्रसंगावर टिप्पणी करणारी शायिमा मावशी रहिमा आणि शेकीबाच्या कथेला जोडणारा दुवा आहे.
शेती करणारे शेकीबाचे प्रेमळ कुटुंब १९०३ मधील प्लेगच्या साथीत बळी गेल्याने ती अनाथ होते. शेती करीत तग धरणारी शेकीबा अनेक अत्याचार सहन करीत एका छोटय़ाशा खेडय़ातून काबूल शहरापर्यंत प्रवास करते. 'एका अनाथ मुलीच्या वाटय़ाला यापेक्षा चांगले काय आले असते,' असे म्हणत झालेल्या अन्यायाचा स्वीकार करते. एकदा पतीच्या सहकाऱ्याच्या पत्नीबरोबर राजा अमानुल्ला आणि राणी सुरैया यांचे जाहीर भाषण ऐकायला जाते. राणी सुरैया जाहीरपणे बुरखा काढत म्हणते, 'इस्लाम आणि बुरखा याचा काही संबंध नाही. स्त्रियांना समतेचे हक्क..' हे शब्द ऐकल्यावर आश्चर्यचकित झालेली शेकीबा सर्व स्त्रियांसाठी एक स्वप्न पाहते. ती मनाशी म्हणते, 'सुरैया बुद्धिमान आहे. ती म्हणते तसे झाले असते तर माझ्या जमिनीचे कागद फाडले गेले नसते. माझ्या आजीने मला शाळेत घातले असते. मला मुली असत्या तरी त्यांचेही संगोपन प्रेमाने झाले असते. मी अल्लाकडे फारसे काही मागत नाही. अनिष्ट रीतिरिवाजांचे जाच झुगारणाऱ्या मुलींना अल्लाने धर्य द्यावे. त्याही माणुसकीच्या हकदार आहेत.' साधारण १९३० च्या सुमारास शेकीबाची कहाणी संपते. त्याच सुमारास सुलतान अमानुल्लाचे वर्चस्व प्रस्थापित झालेले असते. स्त्रियांना काही प्रमाणात हक्क मिळालेले असतात.
  लढाईवर जाणे हेच उपजीविकेचे साधन असलेले रहिमाचे वडील पाच मुली झाल्याने पत्नीवर नाराज असतात. आजूबाजूच्या समाजावर तालिबानी आपली पकड बळकट करीत असतात. आईचा लळा असणाऱ्या रहिमाचा प्रवास 'बच्चा पोष' प्रथेप्रमाणे मुलगा होणे, मावशीच्या मध्यस्थीमुळे सुटलेले शिक्षण काही काळ सुरू होणे, मर्जीविरुद्ध विवाह, मातृत्व ते काबूलच्या पार्लमेंटमध्ये पतीच्या पहिल्या निरक्षर पत्नीला सरकारी कागदपत्रे वाचण्याचे मदतनीसाचे काम करण्यापर्यंत होतो. तालिबानी नियंत्रण ढिले होऊन काही प्रमाणात प्रातिनिधिक सरकार येण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे स्त्रियांनाही आरक्षणातून राजसत्तेमध्ये हिस्सा मिळतो. काबूलमध्ये तिला संगणक प्रशिक्षणाची संधी मिळते. तेथील प्रशिक्षकेच्या मदतीने ती अन्यायकारक आयुष्यातून सुटकेचा मार्ग स्वीकारत महिलाश्रमात आश्रयाला जाते.
रहिमा आणि मावशी यांच्यामधील पुढील संवादाला कादंबरीचा गाभा म्हणता येईल :
रहिमा : 'आपण आपले नशीब बदलू शकतो? आई म्हणाली होती अब्दुल खालिकशी लग्न होणे हे माझे नशीब होते. नशीब बदलणे म्हणजे अल्लाला धोखा देणे आहे.'  
मावशी : 'रहिमा, तू अनेक अडचणी झेलत आहेस. अल्लावर आपली श्रद्धा आहे. लक्षात ठेव, तुझ्यात शेकीबाचे रक्त वाहते आहे. आपले नशीब बदलण्यासाठी ती धडपडली. माणसाच्या जगण्याच्या ऊर्मीबद्दल काय म्हणतात माहीत आहे का? ती कातळाहून कठीण आणि फुलाच्या पाकळीहून कोमल असते.'
जॅान नॅशचा अपघाती मृत्यू

वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॅार्क,
पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
                                                                                      Blog - kasa mee?

            'ए ब्युटिफुल माईंड' या आॅस्कर विजेत्या चित्रपटाचा प्रेरणाश्रोत, विख्यात गणितज्ज्ञ, निर्णयक्षमतेशी संबंधित गणितातील गेम थिअरीचा जनक, अर्थशास्त्रातील १९९४ चा नोबेल पारितोषिक विजेता, आठवड्यापूर्वीच गणितातील अतिशय मानाच्या ॲबेल पारितोषिकाने गौरवांन्वित झालेला विजेता,  शिझोफ्रेनिया या मनाचा कॅन्सर समजल्या जाणाय्रा रोगाला औषधांच्या नव्हे तर मनोबलाच्या सहाय्याने  व आंतरिक शक्ती जागवून यशस्वी झुंज देणारा झुंझार लढवय्या, जिच्याशी १९५७ साली विवाह केला तिला १९६२ साली घटस्फोट देणारा आणि दिलजमाई होऊन तिच्याशीच पुन्हा  २००१ विवाह करणारा, गोंधळ आणि परस्परविरोध यांचे अजब रसायन स्वभावात असलेला, काहीसे स्वैरजीवन जीवन जगणारा, एक अनौरस पुत्र असलेला,  निस्सीम प्रेम करणाय्रा स्वत:च्या पत्नीच्या बाबतीत कधी प्रेमाची तर कधी द्वेशाची भूमिका घेणारा, स्वत:च्या मुलालाही शिझोफ्रेनिया झाल्याचे कळताच त्याच्या मदतीसाठी धावून जाणारा, ॲबेल पारितोषिकाचा स्वीकार करून सपत्निक परतीच्या वाटेवर असलेला,  ८६ वर्षांचा जॅान नॅश आपली ८२ वर्षांची पत्नी अॅलिशिया हिच्यासह एका मोटार अपघातात २३ मे २०१५ ला  जगाचा निरोप घेता झाला.
अपघाती मृत्यू
    त्याचे असे  झाले की, नॅश पतीपत्नी  न्यू जर्सी प्रांतात कारने प्रवास करीत होते. बहुदा सीट बेल्ट न लावता ! दुसय्राची कार यांच्या  कारवर आदळली आणि हे दोघेही गाडीबाहेर फेकले गेले. असा हा जीवघेणा अपघात झाला होता. ॲलिशियाचे आपल्या नवय्रावर निरतिशय प्रेम होते. साथीदाराची जपणूक कशी करावी, याचा तिने आदर्शच उभा केला होता. या आजारपणाच्या आणि नंतरच्या काळात  या दांपत्त्याने मानसिक आरोग्याचा ध्यास  घेतला होता आणि त्या दृष्टीने ते इतरांनाही सतत साह्य व मदत करीत असत.
मुलाचे पाय पाळण्यात दिसले पण फक्त आईला!
        वेस्ट व्हर्जिनिया प्रांतातील ब्ल्यूफिल्ड येथे जन्मलेल्या जॅान नॅशचे प्रारंभीचे शिक्षण पिट्सबर्गला झाले. शाळेत त्याची गणितातली गती सामान्य दर्जाची गणली जायची. शिक्षक त्याला अपरिपक्व मानायचे.  मात्र त्याच्या आईला त्याच्या बौद्धक क्षमतेची चाहूल लागली होती. प्रश्न सोडविण्याची त्याची पद्धत नवीन आणि वेगळी असायची, हे तिला जाणवत असे.
      जसजसे जॅानचे वय वाढत गेले तसतसे त्याच्या बुद्धीला नवनवीन घुमारे फुटत गेले. त्याला कार्नेगी विद्यापीठाची पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली( शिष्यवृत्तीचे पूर्ण आणि निम्मी असे दोन प्रकार असत.) अभियांत्रिकी आणि रसायन या विषयात त्याचे मन रमेना. गणितात मात्र त्याच्या बुद्धीची झेप एवढी मोठी होती की गणिताचा सर्व अभ्यास वेळेपूर्वीच पूर्ण करून तो पदवी संपादन करता झाला.  पुढे तो प्रिन्सटनचा रहिवासी झाला. प्रिन्सटन विद्यापीठाच्या परिसरात १९८० ते १९९० या दशकात, एकाच पायावर भर देत भरभर चालणारी, छोटीछोटी पावले टाकत जाणारी किंवा वाचनालयातील एका कोपय्रात बसून भराभर व एकापाठोपाठ अगम्य गणितीय समीकरणे खरडणारी ही वल्ली पाहून काही लोक तिच्यापासून चार हात अंतर ठेवूनच असत. तो काय करतो आहे, हे ज्यांना थोडेफार कळत होते, ते सुद्धा त्याच्या ज्ञानसाधनेत उगाच व्यत्यय नको म्हणून का होईना, पण त्याच्या पासून दूरच असत. त्याची ओळख 'अलौकिक बुद्धिमत्तेचा पुरूष', अशा तीन शब्दातच करून दिली जायची. हा विसाव्या शतकातला अतिश्रेष्ठ असा एकमेव गणिती आहे, असे लोक मानू लागले.
चार शब्दांचे शिफारसपत्र !
       प्राध्यापक रिचर्ड डफिन हे त्याचे गुरू. त्यांनी त्याला फक्त चार शब्दांचे शिफारस पत्र दिले. 'धिस मॅन इज जिनीयस'. प्रिन्सटन विद्यापीठाला एवढेच पुरेसे होते. विद्यापीठात त्याची शीघ्रकोपी, एकलकोंडा, अलिप्त, चमत्कारिक, घुमा, फळ्यावर सतत गणितीय समीकरणे खरडणारा अवलिया  म्हणून ओळख झाली होती.
आईनस्टीनशी मतभेद
    जॅान कोणाचीही भीडमुर्वत ठेवीत नसे. शब्दच्छल त्याला माहितच नव्हता. आईन्स्टीन आणि न्यूमन हे त्यावेळचे दिग्गज! या दोघांनाही जॅानच्या कल्पनांचे मूलभूत स्वरूप पटत नव्हते. त्यांनी त्याला तसे स्पष्ट सांगितले सुद्धा. पण याचा जॅानच्या भूमिकेवर काहीही परिणाम झाला नाही. तो आपल्या विचारांवर आणि भूमिकांवर अडिग राहिला.
   वयाच्या २२ व्या वर्षी २७ पानी प्रबंध लिहून त्याने डॅाक्टरेट प्राप्त केली. पुढे तर त्याने आपला प्रबंध ३१७ शब्दातच आटोपता घेतला. एवढ्या चिमुकल्या प्रबंधाला आजवर कधीही नोबेल पारितोषिक मिळालेले नाही.
'एखाद्या खेळीमध्ये अनेक व्यक्ती सहभागी असतील तर जोपर्यंत इतर सहभागी व्यक्ती आपली चाल बदलत नाहीत, तोपर्यंत कुणालाही आपली चाल बदलून लाभ होणार नाही', असा काहीसा जॅान नॅशचा समतोलाचा सिद्धांत आहे.
  समजा, एखादा लहानसा गुन्हा करतांना अ आणि ब असे दोन गुन्हेगार सापडले आहेत आणि याबाबत पुरेसा पुरावा उपलब्ध आहे, अशी आपण कल्पना करू या. या गुन्ह्यासाठी दोन वर्षांची कैदेची शिक्षा आहे, अशीही आपण कल्पना करू या. चौकशी दरम्यान असे लक्षात आले की, या दोघांनी दरोडाही घातला आहे आणि त्यासाठी दहा वर्षांच्या कैदेची शिक्षा आहे. पण याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे कुणातरी एकाचे सहकार्य आवश्यक आहे. सहकार्य केले म्हणून एकाला शिक्षेत सूट आणि दुसय्राला पुरेपूर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे, असे ही गृहीत धरू या.
चार संभावना
१. दोघांनीही आपले गुन्हे कबूल केले तर सहकार्य केल्याचा फायदा दोघांनाही मिळेल आणि प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा होईल.
२. अ ने आपला गुन्हा कबूल केला आणि ब ने नाकबूल केला तर सहकार्य केले म्हणून अ ला एक वर्षांची शिक्षा होईल पण ब ने सहकार्य न केल्यामुळे त्याला दहा वर्षांची शिक्षा होईल.
३.ब ने आपला गुन्हा कबूल केला आणि अ ने नाकबूल केला तर सहकार्य केले म्हणून ब ला एक वर्षांची शिक्षा होईल पण अ ने सहकार्य न केल्यामुळे त्याला दहा वर्षांची शिक्षा होईल.
४. दोघांनीही आपला गुन्हा नाकबूल केला तर दरोड्याबाबतचा आरोप सिद्ध करता येणार नाही आणि लहानशा गुन्ह्याबद्दलच दोघांनाही प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा होईल.
   दोघांनीही आपला गुन्हा मान्य केल्यास प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा होईल. हीच संतुलित अवस्था आहे. अन्य तीन अवस्थांमध्ये एखाद्याने आपली भूमिका बदलली तर काय दुसय्रावर काय परिणाम होईल? नॅशचा समतोल सिद्धांत सांगण्याचा हा प्रयत्न नाही. थोडीशी झलक जरी दिसली तरी पुरे, असा मर्यादित उद्देश आहे.

पण संशोधनाच्या याच काळात त्याला शिझोफ्रेनिया या मानसिक रोगाने पछाडले. अनेकदा या रोगाचा उल्लेख मनाचा कॅन्सर असा केला जातो. नॅशचे सिद्धांत जगभर वाखाणले आणि उपयोगात आणले जात होते. पण अनेक लोक तो मेला आहे, असेच समजत होते. आयुष्यभर  तो या रोगाशी सतत २५ वर्षे झुंझत होता. हा रोग त्याच्या विद्वत्तेचा मूळ स्रोत असलेल्या जाणिवेच्या मुळावरच उठला होता.  १९५७ साली त्याचा ॲलिशियाशी विवाह  झाला होता. या काळापासूनच गेम थिअरीबाबतचे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते आणि याचसुमारास त्याला शिझोफ्रेनियाचाही त्रास व्हायला सुरवात झाली. ॲलिव्हियाने मानसोपचार तज्ज्ञाकडून त्याच्यावर वेळोवेळी उपचार करवले. पण हे रोगी इतरांसाठी धोकादायक ठरू शकतात. आपल्या मुलाच्या जिवावर बेतल्याचे लक्षात  आल्यावर मात्र ॲलिव्हिशिचा निरुपाय झाला. पतीपत्नी घटस्फोट घेऊन १९६२ साली विभक्त झाले. पण एकमेकापासून दुरावले मात्र नव्हते.
नोबेल पारितोषिकाचा मानकरी
    नॅशचा समतोल सिद्धांत 'नॅश इक्विलिब्रिम' म्हणून शास्त्रीय जगतात सर्वविदित आहे. यासाठीच तो नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला. हा सिद्धांत काहीसा असा आहे. 'संघर्ष आणि सहकार्याच्या अवस्थांचे विश्लेषण करणे आणि अशा अवस्थेत लोक एकमेकांशी कसे वागतील याविषयी अंदाज बांधणे'. आर्थिक विश्लेषणात ही बाब खूप महत्त्वाची ठरली आहे. संगणक, उत्क्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात तिचा खूप उपयोग झाला आहे. भ्रष्टाचार आणि ग्रीसमधील आर्थिक संकट यांचे निवारण करतांनाही हा सिद्धांत उपयोगी ठरला आहे. गणितासारख्या विषयाचा व्यावहारिक आणि दैनंदिन जीवनातील बाबींशी संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकासाठी उपयोग होण्याचे हे जगाच्या इतिहासातील एवढे ठळक असे बहुदा पहिलेच उदाहरण असावे. एवढेच नाही तर गणित, अर्थशास्त्र आणि विज्ञानाच्या अभ्यासकांच्या अनेक पिढ्यांना जॅान नॅशचे गेम सिद्धांताच्या निमित्ताने मांडलेले विचार प्रेरणादायी ठरले आहेत.
          ॲास्कर विजेता चित्रपट -
 २००१ साली त्याच्या जीवनावर 'ए ब्युटिफुल माईंड' या नावाचा चित्रपट निघाला. गणितविषयातील त्याचे अलौकिक संशोधन आणि शिझोफ्रेनिया सारख्या रोगाशी त्याची २५ वर्षांची यशस्वी झुंज या दोन्हीमुळे तो 'ए ब्यूटिफुल माईंड' या चित्रपटाचा नायक ठरला. रसेल क्रो या अभिनयकुशल नटाने या चित्रपटात जॅान नॅशची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला २००२ साली ॲास्कर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००२ मधील ॲास्कर पारितोषिक  वितरण सोहळ्याला दिलजमाई झालेले नॅश पतीपत्नी उपस्थित होते. कारण पुन्हा विवाह करून ते पतीपत्नी झाले होते.
       आपल्या संशोधनाचे महत्त्व जॅानला कधीच जाणवले नाही. अतिशय क्षुल्लक कार्यासाठी मला नोबेल पारितोषिक मिळाले, असा विनोद तो आयुष्यभर करीत राहिला. मनोनिग्रहच्या भरवशावर वयाची तिशी ओलांडण्यापूर्वीच त्याचे आयुष्यभराचे कार्य पूर्ण होत आले होते. श्रीनिवास रामानुजन, बर्नहार्ड रीमन यांनी विशीतच जीवनातील अलौकिक  कार्य साध्य केले नव्हते काय? याच मालिकेतील आणखी एक मणी होता जॅान नॅश!

Wednesday, February 3, 2016

एका अफलातून अवलियाची अफलातून  कल्पना
        अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील याॅर्क शहराच्याजवळच जोड्याच्या आकाराची इमारत आहे.जोड्याच्या आकाराचे ‘शू हाउस’ ही एक अजब कमाल आहे. याची रचना करणारा एक अवलियाच म्हटला पाहिजे. याची बांधणी कर्नल मालोन हेन्स याने केली आहे. याचा पादत्राणे तयार करण्याचा व्यवसाय होता. माणूस हाडाचा ‘बेपारी’ होता. या व्यवसायातला तो बादशहा (विझार्ड) मानला जातो. निरनिराळ्या ठिकाणी त्याची चाळीस दुकानांची मालिका होती. आपल्या इथे आमची कुठेही शाखा नाही, अशी जाहिरात आपण पाहिली असेल. 'आमची शाखा कुठे नाही?', असा जणू याचा सवाल असे. आपली आणि आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी म्हणून त्याने  चक्क जोड्याच्या आकारचे ‘शू हाउस’ बांधले आहे. ४८ फूट लांब, १७ फूट रुंद आणि २५ फूट उंचीचे हे पादत्राणगृह हेन्सने १९४८ साली बांधले. बांधकामात लाकडाचा उपयोग मुख्यत: करण्यात आला असून आवश्यक तिथे तारा आणि सिमेंटचा वापर मजबुतीसाठी केला आहे. यात तीन बेड रूम्स, दोन बाथ रूम्स एक किचन आणि लिव्हिंग रूम आहे..
     सुरवातीला हेन्स वयस्कर दाम्पत्याला या ‘गेस्ट हाउसमध्ये’ रहायला बोलवी. त्यांची राजेशाही बडदास्त ठेवी. जातांना त्यांना कपडेलत्ते देऊन त्यांची बोळवण करी. पुढे तो हे ‘गेस्ट हाउस’ मधुचंद्राला येणाऱ्या जोडप्यांना देऊ लागला. हेन्सच्या आरोग्यविषयक सवयी वाखाणण्यासारख्या होत्या. तो स्वत: निर्व्यसनी तर होताच पण धुम्रपानविरोधी मोहीम सुरु होण्या अगोदारपासूनच त्याचा धुम्रपानाला विरोध होता. रस्त्याने  कोणी सिगरेट ओढत जाताना दिसला तर तो त्याच्या तोंडातील सिगरेट काढून घेई. त्याने सिगरेट पिणे सोडल्यास त्याला पैसे देऊ करी. त्याने जसा भरभरून पैसा मिळवला तसाच तो वाटून टाकला. ‘मी या जगात निष्कांचन अवस्थेत जन्माला आलो आहे, निष्कांचन अवस्थेतच जगाचा निरोप घेईन’, असे तो म्हणत असे. हे ऐकले की, ‘मुठ्ठी बांधके आये हो,(मूल जन्माला येत तेव्हा त्याच्या मुठी आवळलेल्या असतात), हाथ पसारे जावोगे’, या (बहुदा) महात्मा  कबीराच्या दोह्यातील पंक्तीची आठवण होते.असो. आज हे ‘शू हाऊस’ एक पर्यटन स्थळ झाले आहे. ते व्यापारी तत्त्वावर भाड्याने मिळते. नुकताच या वास्तूत एक कार्यक्रम आयोजित झाला. बाल साहित्याचा एक लेखक आपले पुस्तक विकत घेऊन येणाय्रा बाल वाचकाला त्या पुस्तकावर स्वाक्षरी देणार आहे. बालगोपाल मंडळी आणि त्यांचे पालक यांना अनुक्रमे खाऊ आणि चहा ( नव्हे कॅाफी) फराळासाठीही थांबवून घेणार आहेत
‘एका हिंदूस पत्र’ लिहिणारा लिओ टॉलस्टाय
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी; एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blog – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
‘एका हिंदूस पत्र’ लिहिणारा लिओ टॉलस्टाय एक विश्वविख्यात साहित्यिक आणि चिंतक म्हणूनही ओळखला जातो. टॉलस्टायच्या कादंबऱ्यांचे विश्व साहित्यात अमर स्थान आहे. मानवाच्या मनाच्या नेणिवेतील मनोव्यवहारांचे वर्णन करण्याची त्याची क्षमता केवळ वादातीतच नाही तर आजही ते स्थान तसेच कायम आहे आणि भविष्यातही ते तसेच राहणार आहे.
त्याचे एका हिंदूस लिहिलेले पत्र तर आम्हा भारतीय लोकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. कदाचित या पत्रामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले असावे. वयाच्या तीस वर्षानंतर टॉलस्टायच्या जीवनाला नैतिक आणि धार्मिक आधिष्ठान प्राप्त झाले. दुष्टाव्याचा विरोध अहिंसक मार्गाने करण्याच्या त्याच्या  भूमिकेमुळे महात्मा गांधी प्रभावित झाले होते, असे मानतात. या दोन महापुरुषांमधील संबंधाची सुरवात कशी झाली ते पाहणे रंजक तसेच बोधप्रदही आहे.  भारतीय स्वातंत्र्यलढ्याला टॉलस्टाय यांचा पाठिंबा मिळावा, अशी विनंती करणारे पत्र श्री तारकनाथ दास यांनी पाठविले होते. या पत्राला उत्तर म्हणून १४ डिसेंबर १९०८ रोजी टॉलस्टाय यांनी पाठविलेल्या पत्राचे शीर्षक आहे, ‘एका हिंदूला पत्र’. यात जुलमी परकीय सत्तेविरुद्ध लढतांना सशत्र लढ्याला शांततामय मार्गाचा - अहिंसक सविनय कायदेभंग - हाच पर्याय असू शकतो, असे टॉलस्टाय यांनी प्रतिपादन केले आहे. या पत्रात त्यांनी जसा स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे. तसाच ‘तिरुकुरलचा’ही उल्लेख आहे. तमिळ विचारवंत तिरुवलवार यांनी ‘तिरुकुरल’ म्हणजेच ‘तमिळ मराई (तमिळ वेद)’ नावाची रचना सिद्ध केली आहे. यालाच ‘चिरंतन शब्द’ असेही म्हटले जाते. टॉलस्टायचे पत्र ‘फ्री हिंदुस्थान’ नावाच्या वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर ते आफ्रिकेत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी ( त्यावेळी ते ‘महात्मा’ नव्हते) यांच्या वाचनात आले. या पत्राने महात्मा गांधी खूपच प्रभावित झाले. त्यांनी टॉलस्टायला पत्र लिहून या पत्राचा गुजराथी भाषेत अनुवाद करण्याची अनुमती मागितली. यानंतर महात्मा गांधी आणि टॉलस्टाय यांच्यात पत्राने विचारांची देवाणघेवाण सुरु झाली होती. महात्मा गांधींच्या राजकीय भूमिकेवर टॉलस्टाय याच्या विचारांचा ठसा उमटला होतं, असे मानले जाते.
कादंबरीकार टॉलस्टाय
लिओ लिओ टॉलस्टाय हा आपल्या भावंडातला चौथा मुलगा. आईबापांचे निधन लहानपणीच झाल्यामुळे तसा अनाथ म्हणूनच आपल्या मावशांकडे वाढला. बालपण, किशोर वय, तारुण्य (चाइल्डहूड, बॉयहूड आणि यूथ) अशी तीन वेगवेगळी आत्मचरित्रे त्याने त्यात्या काळात लिहिली आहेत.
    त्याचे प्राथमिक शिक्षण शाळेत न जाता घरीच झाले. तो हुशार विद्यार्थी कधीच नव्हता विद्यापीठाची पदवी त्याला संपादन करता आली नाही. तो शेती सुद्धा नीट करू शकला नाही. पण तो कायम आणि सतत लिहीत राहिला. ‘कॉनटेमपररी’ या त्या काळाच्या प्रसिद्ध नियतकालिकात त्याचे लेख प्रसिद्ध होत असत.
वॉर अँड पीस ही कादंबरी लिहायला प्रारंभ त्याने १८६० साली केला. हो कादंबरी त्याने अनेक भागात लिहून प्रसिद्ध केली. १८६९ मध्ये शेवटचा भाग लिहून त्याने ही कादंबरी पूर्ण केली. नेपोलियन कालीन युद्धाच्या कालखंडावर आधारित ही कादंबरी खूप गाजली. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली  तसेच वास्तव चित्रण असलेली काल्पनिक पात्रे हे या कादंबरीचे वैशिष्ट्य होते. ते रसिकांना खूपच भावले. ऐतिहासिक घटना आणि त्या काळातले नीतीनियम याबद्दलचे वक्रोक्तीयुक्त निबंधवजा लिखाण हा या कादंबरीचा आणखी एक विशेष म्हटला जातो. आपले दैनंदिन व्यवहार कसे आहेत, यानुसार आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होत असतो. उक्तीपेक्षा कृती कशी, यावर त्याचा भर असल्याचे जाणवते.
ॲना कॅरेनिनाचे लेखन १८७३ नंतरचे. या कादंबरीला पार्श्वभूमी होती, रशिया आणि तुर्कस्थानमधील युद्धाची. वॉर अँड पीस प्रमाणेच या कादंबरीत टॉलस्टायचे जीवनानुभव साकारले आहेत, असे मानतात. विशेषत: यातील प्रियाराधनाला  टॉलस्टाय आणि सोफिया यांच्यातील प्रणयप्रसंगांची पार्श्वभूमी लाभलेली आहे, असे म्हटले जाते. या कादंबरीचे प्रारंभीचे वाक्य वाचकांच्या स्मरणात कायम स्थान ग्रहण करून  आहे, अशी नोंद त्या काळी केलेली आढळते. ‘सर्व सुखी दाम्पत्यांचा जीवनपट सारखाच असतो. पण प्रत्येक दु:खी कुटुंबाचे दु:ख मात्र वेगवेगळे असते.’ ही कादंबरी सुद्धा ह्प्त्याहप्त्यानेच चार वर्षात १८७७ साली पूर्ण प्रसिद्ध झाली. या कादंबरीने टॉलस्टायला अफाट प्रसिद्धी आणि अमाप पैसा मिळवून दिला.
कल्पित कथांना वेगळेच वळण
१८९० नंतरच्या लिखाणात त्याच्या कल्पित कथांनी वेगळेच वळण घेतले. ‘द डेथ ऑफ इव्हान लिंच’ या त्याच्या गाजलेल्या तिसऱ्या कादंबरीत कल्पिताला नैतिकतेची आणि वास्तवाची बैठक प्राप्त झालेली दिसते. क्षुल्लक बाबींना महत्व देऊन आपण आपल्या आयुष्यातील महत्वाचा कालखंड वाया घालवला, हे नायकाला – इव्हान लिंचला- जेव्हा कळते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो, कारण त्यावेळी तो मृत्यूच्या छायेत जीवन जगत असतो.
‘फादर सर्गिअस’ या छोट्याशा कादंबरीत टॉलस्टायने आपल्या नवीन आध्यात्मिक मतांची चर्चा केलेली आढळते. तर ‘रीसरेक्षन’ या कादंबरीचा कॅनव्हास पहिल्या दोन कादंबरीन्सारखाच मोठा असूनही ती रसिकांना फारशी भावली नाही. ‘द  लिव्हिंग कॉर्प्स’ हे त्याचे वक्रोक्तिपूर्ण नाटक त्याने १८९० मध्ये लिहिले. ‘हाजी मुराद’ ह्या कादंबरिकेचा शोध त्याच्या मृत्यूनंतर लागला. हिचे लिखाण १९०४ मध्येच पूर्ण झाले होते.
मी कसा ?
आपल्या आयुष्याचा आढावा घेताना तो म्हणतो, मी युद्धात अनेकांना यमसदनी पाठविले आहे, द्वंद्व युद्धात अनेकांचा खातमा केलेला आहे, जुगार खेळलो आहे, शेतकरी आणि श्रामिकान्वर अनन्वित अत्याचार केले आहेत, वेश्यागमन केले आहे, लोकांना फसवले आहे, चोरी, लांडीलबाडी, पराकोटीचे मद्यपान केले आहे, खून, मारामाऱ्या केल्या आहेत, मी केला नाही असा एकही गुन्हा नसेल. माझ्या आयुष्याची दहा वर्षे अशी गेली आहेत. तरीही तरीही माझे समवयस्क माझी गणना नैतिक पुरुषात करतात.
युद्धातील एक क्रूर सैनिक - टॉलस्टाय
शेतीतील आपल्या धाकट्या भावाची प्रगती पाहून त्याच्या मोठ्या भावाने त्याला आपल्याप्रमाणे सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला. १८५४-५५ या काळात त्याने क्रिमियन युद्धात भाग घेतला. याच वेळी त्याने ‘सेव्हास्टोपल टेल्स’ या नावाची पुस्तके लिहिली. यात त्या काळात नवीनच असलेलल्या एक लेखन प्रकाराचा त्याने वापर केला. संज्ञा प्रवाह (स्ट्रीम ऑफ कॉनशसनेस) या नावाने हा लेखन प्रकार ओळखला जातो. एका सैनिकाच्या मनातील विचारांचा मागोवा या निमित्ताने त्याने चित्रित केला आहे.
बराचसा हेकेखोर आणि काहीसा उद्धट असल्यामुळे तो कोणत्याच प्रकारच्या लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसला नाही. विद्रोही म्हणून स्वत:ला घोषित करून तो १८५७ मध्ये पॅरिसला गेला. तिथे जुगारात सर्व  गमावून बसला आणि मायदेशी परत आला. याच वेळी त्याने आपल्या आत्मचरित्राचा तिसरा खंड ‘तारुण्य’ (यूथ ) प्रसिद्ध केला. याच काळात एका डॉक्टरच्या मुलीशी – सोफियाशी - त्याचे लग्न झाले.
विद्रोही आणि वेगळाच टॉलस्टाय
 कादंबरी लेखनातून टॉलस्टायला भरपूर पैसा मिळाला पण आध्यात्मिकदृष्ट्या टॉलस्टाय अतिशय अस्वस्थ होता. ‘जीवनाचा अर्थ’ काय हे त्याला पडलेले कोडे होते. प्रारंभी तो ऑरथोडॉक्स चर्चकडे वळला. पण त्याचे समाधान होत नव्हते. उलट सर्व चर्चेस भ्रष्ट आहेत, या निष्कर्षाप्रत तो पोचला. जर सर्व मानव ईश्वराची लेकरे आहेत, असे म्हटले आहे तर युद्ध आणि हिंसा यांना आपल्या जीवनात स्थान असूच कसे शकते, हा त्याला पडलेला प्रश्न होता. प्रस्थापित धर्ममतांच्या ऐवजी त्याने आपली मते ‘मेडिएटर’ नावाचा ग्रंथ लिहून १८८३ साली मांडली. चर्चला हे सहन होणे शक्यच नव्हते. त्याला बहिष्कृत कार्यात आले. त्याच्या पाळतीवर गुप्त पोलीस सुद्धा राहू लागले. आपल्या नवीन धर्म मतानुसार आपण संपत्तीचा त्याग केला पाहिजे, असे त्याला वाटू लागले. पण त्याची बायको सोफिया हिने या विचाराला कडाडून विरोध केला. विवाहबंध तुटेपर्यंत ताणले गेले. शेवटी टॉलस्टायने १८८१ पर्यंतच्या आपल्या सर्व मिळकतीचे स्वामित्व पत्नीकडे सोपवले आणि तणाव तुटेपर्यंत ताणू दिला नाही.
   उत्तरायुष्यात टॉलस्टायला खूप आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. पण सोफियाला मात्र त्याचे जीवनविषयक सिद्द्धांत बिलकुल मान्य नव्हते. त्याला भेटायला येणाऱ्याजाणाऱ्या शिष्यांचा ती पाणउतारा करीत असे. शेवटी टॉलस्टाय वैतागला. या गोष्टीचा बभ्रा इतका झाला की, टॉलस्टाय आणि त्याची कन्या अलेक्झांड्रा तीर्थयात्रेला निघाले. अलेक्झांड्राने आपल्या पित्याची मनोभावे सेवा आणि शुश्रुषा केली. आपली ही तीर्थयात्रा खाजगी आणि गुप्त रहावी, तिचा गाजावाजा होऊ नये, अशी त्या दोघांची इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. त्यांची ही तीर्थयात्रा खूपच खडतर ठरली. शेवटी अस्टापोवा गावच्या स्टेशनमास्तरने त्यांना आश्रय दिला
‘वॉर अँड पीस’, ‘ॲना कॅरेनिना’ आणि ‘डेथ ऑफ इव्हान लिंच’ या कादंबऱ्या लिहिणारा लेखक लिओ टॉलस्टाय आजही जगातील मोजक्या प्रमुख लेखकांपैकी एक मानला जातो. नऊ सप्टेंबर १८२८ ला जन्मलेल्या या लेखकाच्या वाट्याला ८२ वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभले होते तो २० नोव्हेन्बर १९१० ला रशियातील अस्टापोव्हो या गावी  एका स्टेशनमास्तरने दिलेल्या खोपट्यात मृत्यू पावला आणि त्याने चिरनिद्रा घेतली.



डचेस ऑफ डेथ’, 'क्वीन ऑफ क्राइम', 'रहस्यसम्राज्ञी' लेखिकेची रहस्य गाथा
वसंत गणेश काणे
   न्यूयाॅर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर बातमी होती. ती एकाएकी बेपत्ता झाली होती. सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिका बेपत्ता!!!  सगळ्या जगभर एक खळबळ उडाली. पोलिस खाते खडबडून जागे झाले. कसून शोध सुरू झाला. एकेक दिवस जसजसा पुढेपुढे सरकत होता तसतसे जनमानस अस्वस्थ होत होते.निरनिराळे तर्ककुतर्क समोर येत होते. वावड्या उठत होत्या. होम सेक्रेटरी रोज पोलिसात चौकशी करीत. माहिती देणाय्राला १०० पाऊंडाचे बक्षीस एका वृत्तपत्राने जाहीर केले. एक हजार पोलिस, १५ हजार स्वयंसेवक, आकाशात घिरट्या घालीत अनेक विमाने यांनी सर्व परिसर पिंजून काढला. आपण याॅर्कशाॅयरला जात आहोत, अशा आशयाची चिठ्ठी तिने आपल्या सेक्रेटरीच्या नावे लिहून ठेवली होती. काही दिवसांनी तिची कार एका ओसाड जागी आढळून आली. आतमध्ये तिचे कपडे होते. मुदत संपून गेलेले ड्रायव्हिंग लायसन्सही बाजूला पडले होते. संघर्ष किंवा झटापट झाल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. ती एकतर स्वत:हून कार टाकून गेली असावी किंवा कोणीतरी तिला धाक दाखवून कार सोडून जाण्यास भाग पाडले असावे. सगळेच मती कुंठीत करणारे होते. शेरलाॅक होम्सचा जन्मदाता सर आर्थर काॅनन डाॅईलने आपल्या संग्रही असलेला तिचा हातमोजा पोलिसांना देऊ केला. कदाचित याचा उपयोग तिचा शोध घेण्यासाठी होऊ शकेल, या कल्पनेने.
     बेपत्ता होण्याच्या संभाव्य कारणांवर चर्चा सुरू झाली. लेखन करूनकरून आपल्याला खूप थकवा आला आहे, अशी तिची तक्रार सुरू झाली होती, ती निराशेने ग्रस्त झालेली वाटायची,  तिच्या आईचे नुकतेच निधन झाले होते, नवरा बदफैली निघाला होता. यापैकी एखादे कारण असेल का? काहीच कळत नव्हते. तपास पुढे सरकत नव्हता. तीन डिसेंबरला नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले होते आणि लगेच ती बेपत्ता झाली होती. हळूहळू लोक नकारात्मक भूमिका घेऊ लागले. हा तिचा 'पब्लिसिटी स्टंट' तर नसेल ना? अप्रामाणिक नवय्रावर खुनाचा आळ यावा, म्हणून रचलेले कुभांड तर नसेल ना?
    १४ डिसेंबर १९२६ ला शेवटी तब्बल दहा दिवलांनी शोध मोहिमेला यश आले. साहित्यप्रेमींच्या गळ्यातली ताईत असलेली सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिका ॲगाथा ख्रिस्ती एकदाची सापडली. स्वान हायड्रोपॅथिक हाॅटेल - आजचे नाव स्वान हाॅटेल - मध्ये ती आढळली. हाॅटेलच्या रजिस्टरवर तिने आपले नाव नोंदवले होते, तेरेसा नील. नील हे तिच्या नवय्राच्या प्रेयसीचे आडनाव होते!  जनतेने सुटकेचा निश्वास टाकला. तमाम रसिकवर्गाचा दहा दिवस टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. पण चिंता मिटली नव्हती. ॲगाथा भ्रमिष्ट झाली होती. तिला ॲम्नेशियाचा ( विस्मरण) अटॅक आला होता. मानसोपचार तज्ञांची चमू कारणांचा शोध घेऊ लागली. पण शेवटपर्यंत नक्की निदान झाले नाही. नेहमीप्रमाणे तज्ञांमध्ये मतभेद झाले. पण हळूहळू ती 'नाॅर्मलवर' आली.
  ॲगाथा ख्रिस्तीची १२५ वी जयंती १५ सप्टेंबरला२०१५ ला जगभर साजरी झाली. १५ सप्टेंबर १८९० ला या लोकप्रिय लेखिकेचा जन्म झाला होता. तिला जाऊन आता चाळीस वर्षे होत आहेत. मरणोत्तरही ती तितकीच लोकप्रिय आहे. तिला समीक्षक अभिजात लेखिका मानतात. काही लेखक लोकप्रिय असतात. तर काही अभिजात लेखनासाठी प्रसिद्ध असतात. लोकप्रियता, अभिजातता, मरणोत्तरही लोकप्रियता आणि तीही एखाद्या लेखिकेच्या वाट्याला, असे क्वचितच आढळते.
                         
                  ॲगाथा मेरी क्लॅरिसा ख्रिस्तीला डेमहूड
      डेम ॲगाथा मेरी क्लॅरिसा ख्रिस्ती ( १५ सप्टेंबर १८९० - १२ जानेवारी १९७६) ही ब्रिटिश लेखिका गुन्ह्यावर कादंबय्रा व लघुकथा लेखिका तसेच नाट्यलेखिका म्हणून गाजली, जगभर मान्यता पावली. तिच्या एकूण सहा प्रेमकथाही आहेत पण त्या टोपणनावाने लिहिलेल्या आहेत. एकूण सहासष्ट रहस्य कादंबय्रा व १४ लघुकथा तिच्या स्वत:च्या खाती जमा आहेत. तिची स्वत:ची अशी स्वतंत्र लेखनशैली होती. सर आर्थर काॅनन डाॅईल यांचा एकच मानसपुत्र होता, शेरलॅाक होम्स. पण हिचे अनेक गुप्तहेर मानसपुत्र होते/ कन्याही होत्या. हरक्यूल पॅायरॅाट, जेन मार्पल, पारकर पाईन, हार्ले क्विन अशी नावे आजच्या एका टीव्ही मालिकेतील अस्मिताप्रमाणे घरोघरी अगदी किचनपर्यंत पोचली होती. जगातले सगळ्यात लांबलचक नाटक 'माऊस ट्रॅप' हे एक रहस्यमय कथेवर आधारित असून ते तिच्या नावावर आजही विक्रमी लांबीचे म्हणूनच आहे. या नाटकाचे आजवर २५,०००प्रयोग झाले असून अजूनही ते होतच असतात. ब्रिटिश राजसत्तेने 'डेम' ही पदवी प्रदान करून तिचा गौरव केला होता. पुरुषांचा गौरव 'नाईटहूड' प्रदान करून तर स्त्रियांचा 'डेमहूड' प्रदान करून केला जात असे. ॲगाथाचा गौरव तिच्या साहित्यक्षेत्रातील योगदानानबद्दल करण्यात आला होता ( आपल्याकडे पद्मश्री वगैरे पदव्या आहेत, तसा प्रकार). असे अनेक गौरव तिच्या खात्यावर जमा आहेत. त्यातले अनेक आजवर मोडले गेलेले नाहीत. टी व्ही, रेडिओ, व्हिडिओ गेम्स व कॅामिक्स या सर्व माध्यमांना तिची भुरळ पडली आहे. सहाशे सदस्य संख्या असलेल्या क्राईम रायटर्स असोसिएशनने तिची   'दी मर्डर आॅफ राॅजर ॲक्राॅईड' ही कादंबरी सर्वोत्तम कादंबरी म्हणून १५ सप्टेंबर २०१५ ला तिच्या १२५ व्या जयंतीच्या मुहुर्तावर घोषित केले आहे
     एका उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या ॲगाथाने पहिल्या महायुद्धात एका हॅास्पिटलमध्ये काम केले होते. हरक्यूल पॅायरॅाट हा तिचा पहिला मानसपुत्र मानला जातो. सर्वाधिक खप असलेल्या कादंबय्रा लिहिणारी कादंबरीकार म्हणून गिनीज बुकात तिची नोंद आहे. खपाच्या दृष्टीने विचार केला तर शेक्सपीअरचे साहित्य, बायबल यानंतर क्रम लागतो ॲगाथा ख्रिस्तीचा. जगातल्या एकूण १०३ भाषात तिच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. हा विक्रमही अजूनतरी कुणी मोडलेला नाही.
डेथ ऑन दि नाइल, डेथ कम्स ॲज दि एण्ड, मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस, पेल हॉर्स, मिरर क्रॅक्ड फ्रॉम साइड टु साइड, कर्टन, माउस ट्रॅप, ॲंड देन देअर वेअर नन,  विटनेस फॅार प्रॅासिक्यूशन ही नावे सुद्धा सार्थ असणार याची कल्पना वाचकांना येते आणि 'डचेस ऑफ डेथ’, 'क्वीन ऑफ क्राइम', 'रहस्यसम्राज्ञी' हे किताब तिला रसिकांनी का दिले असतील हे लक्षात येते
  अभिजाततेचा मान तिच्या लिखाणाला प्राप्त होण्यासाठी काही अंगभूत  वैशिष्ट्येही कारणीभूत झाली असावीत.


             ॲगाथा ख्रिस्तीच्या जीवनावरील चित्रपटाने उडालेला भडका
   'डेथ ऑन दि नाईलचे' कथानक नाईल नदीवरील एका जहाजावर घडते आहे. 'डेथ कम्स ॲज दि एण्डचे' कथानक ४००० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील थडग्याशी संबंधित पुजाय्राच्या जीवनाशी संबंधित आहे. 'मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस' ही एक सूडकथा आहे तर 'मिरर क्रॅक्ड फ्रॉम साइड टु साइड' ही अभिनेत्रीच्या जीवनातील निराशा चित्रित करते. कर्टन, माउस ट्रॅप, ॲंड देन देअर वेअर नन,  विटनेस फॅार प्रॅासिक्यूशन या आणि अशा सर्व साहित्यकृतीत कथानकाला साजेशीवेगवेगळीपार्श्वभूमी ॲगाथाने योजिली आहे.
         ॲगाथाने आत्मचरित्र लिहिले आहे पण त्यात तिच्या जीवनातील 'बेपत्ता प्रकरण' मात्र बेपत्ता आहे. एका चित्रपट निर्मात्याने या प्रकरणावर आधारित एक काल्पनिक चित्रपट काढला. ह्या चित्रपटातील कथेचा  वास्तवातील व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असा फलक त्यात सुरवातीलाच दाखवलेला आहे. त्यात असे दाखविले होते की, ॲगाथाने आत्महत्या करायचे ठरवून असा घाट घातला होता की, तिच्या हत्येचा आळ तिच्या नवय्राच्या प्रेयसीवर येईल. पण एका अमेरिकन वार्ताहराला या बनावाचा सुगावा लागतो आणि ऐनवेळी तो तिला थांबवतो. ही चित्रकथा पाहून ॲगाथाचे चाहते चांगलेच खवळले. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांनी संबंधितांना कोर्टात खेचले आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. पण अमेरिकन कोर्टाने हे दावे फोल ठरवले. चित्रपटात ॲगाथाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री वनेसा रेडग्रेव्हने तर नवय्राची भूमिका तिमोथी डाल्टनने सजीव केली होती.वार्ताहराची भूमिका डस्टिन हॅाफमनने वठवली होती.
    पण वस्तुस्थिती काय होती हे बाहेर यावे म्हणून शोधपत्रकारितेला घुमारे फुटण्यास एक चांगले निमित्त मिळाले. यानुसार बळकटी या कथेला मिळाली की, ॲगाथाने आपल्या नवय्राला लाजेने मान खाली घालावी लागावी, म्हणून हा सर्व डोलारा उभा केला होता. एका सिद्धहस्त रहस्यकथाकार लेखिकेने बदफैली पतीचे पितळ उघडे पाडण्यासाठी रचलेला हा एक 'सुसंस्कृत व अहिंसक डाव' होता. पण स्वत: एक अद्वितीय रहस्यकथाकार असूनही या 'बेपत्ता नाट्याचा' शेवट तिच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही. कथेने भलतेच वळण घेतले. सत्य काय होते कुणास ठावूक.
   ॲगाथाने १९२८ मध्ये नवय्रापासून घटस्फोट घेतला. मुलीचा ताबा मिळवला आणि ख्रिस्ती अडनाव कायम ठेवले. तिने आपल्यापेक्षा सोळा वर्षाने लहान आरकिआॅलाॅजिस्टशी(पुरातत्त्ववशास्त्री) विवाह केला. तिने एके ठिकाणी म्हटले आहे की, नवरा म्हणून पुरातत्त्वशास्त्री चांगला असतो. कारण त्याचा स्वभाव असा असतो की,  वास्तू जसजशी जुनी होत जाते, तसतशी ती त्याला अधिकाधिक आवडू लागते. नवीन नवय्राची इच्छा तिने दारू प्यावी अशी होती. पण मला आपले पाणीच बरे वाटते, असे ती म्हणायची. मोठ्या मुष्किलीने व आवडत नसून सुद्धा ती सिग्रेट ओढायला तयार झाली. पण एका अटीवरच. दिवसा लंचनंतर आणि रात्री डिनर नंतरच म्हणजे दिवसातून फक्त दोनदाच ती सिग्रेटीओढायची. पण जेमतेम सहा महिनेच हा प्रकार सुरू राहिला. पण तिचे पुढचे आयुष्य सुखात गेले. नवीन नवय्रामुळे तिला खूप फिरता आले. कथा गुंफतांना निरनिराळी पृष्ठभूमी निवडता आली. एकाहून एक सरस कथा रचता आल्या.
     
    ब्रिटिश गुप्तहेर एजन्सी - एम१५ हादरली
   १९४२ मध्ये ब्रिटिश गुप्तहेर एजन्सीला - एम१५ला - ॲगाथाने एक हेर आपल्या खात्यात घुसवला आहे, असा संशय आला. त्याचे असे झाले की, ॲगाथाने आपल्या एका गुप्तहेर कथेत मेजर 'ब्लेचले' नावाचे एक पात्र रंगवले होते.  इंग्लंडमध्ये  दोघे पंचमस्तंभी ( स्वदेशाविरुद्ध शत्रूला सामील असलेले) घुसलेले आहेत आणि मेजर 'ब्लेचले' त्यांच्या मागावर आहे, असे काहीसे ते कथानक होते. एम१५ हादरले कारण त्यांच्या कार्यालयाचे नाव होते 'ब्लेचले पार्क'. सांकेतिक भाषेतील गुप्तसंदेशांची फोड या ठिकाणी व्हायची. ॲगाथाने रंगवलेल्या पात्राचे नाव 'ब्लेचले' ठेवलेले पाहून ॲगाथाला काही कार्यालयीन गुपिते कळली असावीत, तिला माहिती पुरवणारे आपल्या कार्यालयात शिरकाव करण्यात यशस्वी झाले असावेत, असा संशय त्यांना आला. ॲगाथाला त्यांचा संशय फेडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तिचे चित्रण किती वास्तव वाटायचे, याचा परिचय या उदाहरणावरून यावा.
  मॅक्स मॅलोव्हनला -ॲगाथाच्या नवीन नवय्राला - याच सुमारास 'नाईटहूड' ही पदवी बहाल करण्यात आली. नवरा 'नाईट' व बायको 'डेम' असे उभयता सारख्याच पदवीने गौरवले गेले. अशी उदाहरणे खूपच विरळी आहेत. लेखिका म्हणून ख्रिस्ती पण अन्य व्यवहारात त्याचे अाडनाव लावून लेडी मॅलोवन म्हणून वावरू लागली.
    १९७५च्या नाताळमध्ये तिची ‘कर्टन’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि वाचक अतिशय अस्वस्थ व नाराज झाले. कारणही तसेच होते.  हरक्युल पाॅरो हे तिच्या मानसपुत्रांपैकी एक अतिशय  लोकप्रिय  पात्र होते. तो मरण पावल्याचे अगाथाने या कादंबरीत दाखविले होते. जनमानस हे मान्य करायला तयार नव्हते.  हरक्युल पॉरोचा मृत्यू हा एका वास्तवातील व्यक्तीचा मृत्यूप्रमाणे वाचकांच्या चर्चेचा आणि वृत्तपत्रांच्या बातमीचा विषय झाला. अशाचप्रकारे त्याच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रांनी छापली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ही निधन वार्ता पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे हरक्युल पॉरोचा फोटोही छापला. हे  काल्पनिक छायाचित्र न्यूयाॅर्क टाईम्सने मुद्दाम तयार करून घेतले होते. या धक्यातून रसिकजन सावरतात न सावरतात तोच त्यांना दुसरा एक धक्का बसला. १२ जानेवारी १९७६ रोजी खुद्द अगाथा ख्रिस्तीच मरण पावली. शेरलाॅक होम्स या आपल्या मानसपुत्राला पुनर्जीवित करण्यास  सर आर्थर काॅनन डॅाईल या लेखकाला रसिकांनी भाग पाडले कारण जन्मदाता हयात होता. पण खुद्द जन्मदात्रीच हे जग सोडून गेल्यामुळे बिचाय्रा हरक्युल पॉरोला चिरविश्रांती घेण्यावाचून पर्यायच नव्हता!




वाटेवेगळी - स्वेतलाना अलेक्सिव्हिच
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?

     २०१५ सालचे साहित्याविषयीचे नोबेल पारितोषिक स्वेतलाना अलेक्सिव्हिच हिला प्रदान करण्यात आले आहे. 'तिचे लेखन आपल्या आजच्या काळातील दु:खावर प्रकाशझोत टाकणारे आहे', या शब्दात स्विडिश ॲकॅडेमीने तिच्या लेखनाचा गौरव केला आहे. घटना जशा घडल्या व त्यांच्या प्रतिक्रिया जशा उमटल्या तशाच स्वरूपात ती जनतेसमोर ठेवीत असे, हा तिच्या लिखाणाचा विशेष होता. रशियन साम्राज्याचे पतन झाले त्यावेळी तिने हजारो व्यक्तींच्या मुलाखती त्याच्याच शब्दात नोंदवल्या आहेत. हे निमित्त तिला नोबेल पारितोषिक मिळवून देण्यासाठी विशेष कारणीभूत ठरले आहे. या काळातील दु:ख व धैर्य यांचे प्रकटीकरण तिला साधले आहे. नोबेल पारितोषिक मिळविणारी ती १४ वी महिला आहे. १९०१ साली महिलेला   पहिले नोबेल पारितोषिक मिळाले होते.
   हे पारितोषिक जाहीर होताच आपल्या मनात निर्माण झालेल्या भावना संमिश्र स्वरुपाच्या होत्या. इव्हान बुनिन व बोरिस पॅस्टरनिक या रशियन विजेत्यांचा नावे स्मरणपटलावर उमटली व काहीसे संकोचल्यासारखेही झाले, असे ती म्हणते.
   आता या पारितोषिकाच्या निमित्ताने मिळणाऱ्या रकमेचा विनियोग  मला माझे लिखाण प्रसिद्ध करण्यासाठी होऊन मला लेखन स्वातंत्र्याचा लाभ होऊ शकेल. कधीकधी एकेक पुस्तक लिहून हातावेगळे करण्यासाठी मला पाच ते दहा वर्षे सुद्धा लागतात.
   स्वेतलानाचा जन्म ३१ मे १९४८ साली सैनिकीपेशातील कुटुंबात झाला. वडील बेलोरुशियन तर आई युक्रेनियन होती. सैन्यातून सुटी मिळाल्यानंतर आई वडलांनी शिक्षकीपेशा तर स्वेतलानाने शिक्षण पूर्ण होताच स्थानिक वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम करण्यास प्रारंभ केला.
      लघुकथा, निबंध आणि वार्तापत्रे लिहितालिहिता तिने साहित्यातील एका नव्या वाटेने वाटचाल करण्यास सुरवात केली. ॲडेस ॲडमोव्हिच हा या लेखन प्रकाराचा जनक मानला जातो. या प्रकाराला तो कधी 'कलेक्टिव्ह नाॅव्हेल', 'नाॅव्हेल ओरेटोरिओ', 'नाॅव्हेल एव्हिडन्स', 'पीपल टाॅकिंग अबाऊट देमसेल्व्हज' अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले आहे. या नावांवरून या लेखनप्रकाराचे नेमकेपण कळत नसले तरी वेगळेपण जाणवावे.
     गेली ४० वर्षे स्वेतलाना सोव्हिएट कालीन आणि सोव्हिएटच्या पतनानंतरच्या व्यक्तींच्या मनोभूमिकांचे चित्रण करीत राहिली. सोव्हिएटचे पतन हा इतिहास झाला. स्वेतलानाच्या चित्रणात घटनांवर भर नसे. तर या घटनेनंतर जनतेच्या भावविश्वात निर्माण होणाऱ्या कल्लोळाचा मागोवा असे. जनतेच्या भावविश्वाची सहल तिने घडवून आणलेली वाचकांना जाणवते. मग ती चेर्नोबिलचा अणुभट्टीतील अपघात किंवा अफगाणिस्थानातील सोवव्हिएट युद्ध या सारखी ऐतिहासिक घटना असेल. व्यक्तिमात्राशी संबंध येण्यासाठी या घटना केवळ निमित्तमात्र असत. मूळ उद्देश संबंधितांच्या भावविश्वात डोकावण्याचा असे. भोपाळ वायुगळतीची आठवण या निमित्ताने होते. आपल्या इथे या घटनेचे निमित्त घेऊन कुणी आपली लेखणी झिजवल्याचे आठवत नाही. कुणी असा प्रयत्न केला असेल तर तोजनतेच्या स्मरणात राहिलेला निदान दिसत तरी नाही.
      अशा घटनांचा ज्या व्यक्तींच्या जीवनांवर परिणाम झाला अशा हजारो( हो, हजारो) व्यक्तींना ( ज्यात मुले, स्त्रिया, पुरूष असे सर्व प्रातिनिधिक घटक आले) स्वेतलानाने बोलते केले व त्यांच्या भावविश्वाचा मागोवा स्वत:सोबत जनतेसमोरही उलगडून ठेवला. हे लेखन म्हणजेही इतिहासच आहे पण भावभावनांचा इतिहास आहे. आत्म्याने ( परमात्म्यासमोर) मांडलेले गाऱ्हाणे आहे. हे गाऱ्हाणे ध्वनी स्वरुपात असल्यामळेही त्याचे वेगळेपण जाणवते.
        चेरनोबिलची अणुभट्टी फुटली. एक महिला मृत्युमार्गाला लागलेल्या आपल्या पतीच्या देहाला कवटाळून त्याच्याकडे असहाय्यतेने बघत असतांना एक नर्स तिच्याजवळ येते आणि म्हणते, 'बाईग, तुझा पती आता माणूस राहिलेला नाही, तो स्वत:च एक अणु भट्टी झाला आहे'. किंवा एक सैनिक म्हणतो आहे, 'आम्हाला इथे मदत करण्यासाठी नाही तर भट्टी विझवण्यासाठी वाळू टाकावी ना, तसे झोकून देण्यात आले आहे' अफगाण युद्धाच्या छायेत वावरणाऱे सैनिक, डाॅक्टर, विधवा, माता यांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात स्वेतलाना नोंदवते आहे. कोणत्या समर्थ लेखकाच्या लेखणीतून असे प्रत्ययकारी चित्रण उतरले असेल? याचा प्रत्यय येण्यासाठी स्वेतलनाच्या 'झिंकी बाॅईज' या 'पुस्तकाचाच' आधार घ्यावा लागणार.
     'मी कुणाशीही समाजवादाबाबत चर्चा केली नाही. प्रेम, जिव्हाळा, ईर्षा, बालपण, वृद्धापकाळ हेच माझ्या चर्चेचे विषय असत. नृत्य, संगीत तर कधी हेअर स्टाईल सारखा एखादा सटरफटर विषय सुद्धा 'त्यांना' बोलतं करायला पुरत असे. एखाद्या अस्तंगत जीवनाचा मागोवा घेण्यासाठी एखादा गंभीर किंवा अगडबंब विषयच हवा असतो, असं थोडंच आहे. भर आतील चित्रावर हवा, चौकट काय कोणतीही चालते. समोरच्याला बोलते करता आले की झाले.  व्यक्तीच्या मनात शिरण्याचा हा राजमार्ग आहे'.  'सामान्यांच्या जीवनातील असामान्यत्व मला नेहमीच चकित करीत आले आहे. मानवी जीवनात असंख्य सत्ये असतात. इतिहास फक्त घटनांची नोंद घेतो. भावना त्याच्या खिसगणतीतही नसतात. इतिहासात भावनांचा समावेश अयोग्य मानतात. अशा समावेशाने इतिहासाची इयत्ता उणावते, असे म्हटले जाते. मी जगाकडे लेखिकेच्या दृष्टीने आणि दृष्टीकोनातून पाहते'.
      'वाॅर्स अनवुमनली फेस' (युद्धाचा स्त्रीसुलभ नसलेला चेहरा) हे पुस्तक या प्रकारचे एकमेव पुस्तक ठरावे. ही दुसऱ्या महायुद्धाची एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून पाहिलेली कथा शेकडो स्त्रियांच्या प्रत्यक्ष मुलाखतींवर आधारित आहे. काही लाख स्त्रिया या युद्धात आघाडीवर होत्या हे किती लोकांना माहीत असेल? या स्त्रियांच्या भावविश्वात तुम्ही शिरता तेव्हा एका चैतन्याचा अनुभव तुम्ही घेत असता. पण काही वर्षात त्या अचेतन होतात. वास्तवतेची ही जाणीव तुम्हाला स्तंभीत करते.
'दी हिस्टरी आॅफ दी रेड मॅन' या पुस्तकाबाबत म्हणतात तो गेलेला नाहीप्रत्येक सोव्हिएट नागरिकाच्या ह्रदयात तो ठाण मांडून बसला आहे. कुठलाही अवघड विषय स्वेतलानाने टाळलेला किंवा निषिद्ध मानलेला नाही.  बहुतेक वेळी या शोकांतिकाच असतात. पण प्रत्येक वेळी तिने एखाद्या सर्जनच्या अलिप्ततेने विषय हाताळला आहे. 'नथिंग बट दी ट्रुथ'  ( सत्य आणि सत्याशिवाय दुसरे काहीही नाही) हा तिचा बाणा सतत कायम राहिला आहे.
         सोव्हिएट रशियाचे विभाजन ही केवळ त्या लोकांची किंवा त्या देशापुरती सीमित शोकांतिका नाही. हा केवळ त्यांच्या मनाचा मागोवा नाही. ती मानव जातीची शोकांतिका आहे. तिचा परिणाम अंततो गत्वा मानवामानवात जवळीक निर्माण होण्यातच होईल, असे आश्वस्त करणारी ही एक भव्य शोकांतिका आहे.
       तिचे संपूर्ण लेखन हे एक मौखिक इतिहास आहे. तिची मायदेशाबद्दलची ओढ (नोस्टॅल्जिया)लपून राहिलेली नाही. तिच्या साहित्याचे वर्गीकरण करता येत नाही. तसे पाहिले तर हे कल्पित लेखन(फिक्शन) नाही. नाॅन फिक्शन ( वास्तव) आहे. पण ते कितपत रसिकमान्य ठरेल, याची शंका यायची आणि प्रकाशक ते प्रसिद्ध करायला धजावत नसत. हा आतबट्याचा व्यवहार तर ठरणार नाहीना, ही चिंता त्यांना थोपवीत असे. पण आता परिस्थती बदलली आहे. स्वेतलानाला नोबेल पारितो षिक जाहीर झाले आहे. आता तिच्या लेखनावर प्रकाशकांच्या उड्या पडतील. पण ती मात्र म्हणते आहे 'आता माझी पुस्तके छापण्याइतका पैसा आता माझ्याजवळच आहे'. असे भाग्यही किती लेखकांच्या वाट्याला आले असेल?
                                                              हान्स माॅमसेन
एका वादग्रस्त इतिहासकाराची अखेर
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
        हान्स माॅमसेन हा जर्मन इतिहासकार हे एक अनेक प्रकारे वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. ५ नोव्हेंबर १९३० साली जुळ्या भावासोबत जन्म घेऊन ५ नोव्हेंबर २०१५ लाच म्हणजेच वाढदिवशीच त्याने इहलोकीची यात्रा संपविली आणि तो चिरनिद्रेच्या कुशीत विसावला. आता कधी कुणास ठावूक निर्णयाचा दिवस (जजमेंट डे) उजाडेल, त्या दिवशी पापपुण्याची मोजणी होईल आणि पुढील  मार्गाची दिशा निश्चित होईल. तो पर्यंत त्याच्या आत्म्याला विश्रांती मिळावी,अशी विनंती जगातील त्याचे चाहते आणि विरोधक या दोघांनीही केली असणार. पण तो वैचारिक दृष्ट्या डावीकडे झुकलेला असल्यामुळे त्याचा मृत्यूनंतरचा ठावठिकाणा निश्चित सांगता येण्यासारखा नाही. हान्स माॅमसेन हे असे एक वादग्रस्त पण वेगळे व्यक्तिमत्त्व होते.
                                                  तीन पिढ्या इतिहासकारांच्याच
   हान्स माॅमसेनचे घराणे इतिहासकाराचेच आहे. वडील आणि आजोबा हे दोघेही इतिहासकार होते. तो स्वत:ही केवळ सुविद्यच नव्हे तर इतिहास आणि तत्त्वज्ञान यात पारंगत होता. जर्मनीतील नामवंत विद्यापीठांमध्ये त्याने प्राध्यापक म्हणून काम केले होते. तो वादग्रस्त होता यामुळे काही बिघडत नाही. उलट वादेवादे जायते तत्त्वबोधा: या उक्तीनुसार निरनिराळे मार्ग उपलब्ध होण्याची तसेच विचारांना नवीन दिशा मिळण्याची शक्यता या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून निर्माण होत असते. पण वादग्रस्तता आणि विक्षिप्तपणा यातील सीमारेषा याबाबत भान ठेवणे आवश्यक आहे, हेही तेवढेच खरे आहे.
     हिटलर एक दुबळा हुकुमशहा ?
       हिटलरला सगळे जग एक क्रूरकर्मा म्हणून ओळखते पण हे महाशय हिटलरची संभावना एक निर्बल हुकुमशहा (वीक डिक्टेटर) म्हणून करतात. हिटलरला ज्यू लोकांचे शिरकाण करणारा म्हणून जग संबोधते पण ज्यू विरोधी भावना त्याच्या कितीतरी आधीपासून युरोपात होती, असा मुद्दा ते आग्रहाने मांडित असत. ए पाऊंड आॅफ फ्लेश (एक पाऊंडभर मास) ही शेक्सपीअरची प्रसिद्ध कलाकृती. त्यातला शायलाॅक हा सावकार ज्यू दाखविला आहे. तो मुदतीत कर्ज न फेडता आल्यास तुझ्या शरीरातून एक पाऊंड मास मी कापून घेईन, अशी विलक्षण अट घालून अपमानाचा सूड उगवण्याचा डाव टाकतो. ज्यू लोकांकडे कसे पाहिले जाई याची कल्पना या कथेवरून येते.
    हिटलरने ज्यू लोकांना बंदिवान केले, छळ छावण्या उभारल्या.पण त्यांना मारून टाका, असा आदेश दिला नव्हता. या ज्यू लोकांचे काय करावे हे त्याला कळत नव्हते. जर्मन वंशच सर्वश्रेष्ठ असे तो मानत असला तरी ज्यू लोकांचा वंशविच्छेद करा असा आदेश त्याने दिला नव्हता. ज्यू लोकांना ठार करण्याचा निर्णय नोकरशाहीचा होता. नोकरशाही (विशेषत: सेनाधिकारी) आणि प्रशासन एक पाऊल ( नव्हे अनेक पावले) पुढे गेले आणि ज्यू लोकांच्या चरबीपासून तयार केलेला साबण वापरून जर्मन सेनाधिकारी अंघोळ करीत, असे म्हणण्याइतपतच्या थराला गोष्टी गेल्या.
                                   
हान्स माॅमसेनच्या चष्म्यातून हिटलर कसा ?
    हान्स माॅमसेनने ‘हिटलर आणि नोकरशाही’ या शीर्षकानुसार एक पुस्तक लिहिले आहे. हिटलर चटकन निर्णय घेत नसे, स्वत:ची प्रतिमा व प्रतिष्ठा त्याला अतिशय प्रिय होती. तसा तो हलक्या कानाचाही होता. भोवतालचे लोक काहीबाही सांगत. त्यावर त्याचा विश्वास बसे. हिटलरचे राजकीय विरोधक आणि जेते असलेले इंग्लंड, फ्रान्स व अमेरिका यांनी त्याचे जे चित्र रंगवले आहे, तेच आज जगासमोर आहे. इतिहास हे दुसरे तिसरे काही नसून जेत्यांची बाजू ( विनर्स साईड आॅफ दी स्टोरी) असते, असे इतिहासाबद्दल म्हटले जाते. हे पुष्कळ अंशी खरे असले तरी ज्यूंना नुसते पकडून छळ छावण्यात अडकवून ठेवा, एवढ्यापुरताच हिटलरचा आदेश असेल, असे मानता येणार नाही. या पापाचे अपश्रेय हिटलरचेच मानायला हवे. पण यातून हिटलरला मुक्त करण्याचा खटाटोप व तसा प्रयत्न  हान्स माॅमसेनने केला, हे मान्य केलेच पाहिजे.
                                         समकालीन इतिहासकारांचा एकमुखी विरोध
    ॲंड्रस हिलग्रुबर, इबेरहार्ड जॅकेल, क्लाॅस हिल्डब्रॅंड तसेच कार्ल डिट्रिच ब्रॅशर या समकालीन इतिहासकारांनी हान्स माॅमसेनवर नुसती खरपूस टीकाच केली नाही तर तर हिटलर आणि नाझी तत्त्वज्ञानाची दाहकता कमी करण्याचा त्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्न आहे, असा हेत्वारोपही केला आहे. इतिहासकारांमध्ये दुमत असणे वेगळे आणि एकाने दुसऱ्याच्या हेतूबद्दलच शंका घेणे वेगळे. स्विस इतिहासकार वाॅल्टर हाॅफरने तर हान्स माॅमसेनवर सरळसरळ आरोपच केला होता. ‘ ‘हिटलर जसाकसा होता ते पाहण्याची हान्स माॅमसेनची इच्छाच नाही’,म्हणून त्याला तो तसा दिसत नाही’, या शब्दात त्याने  हान्स माॅमसेनची संभावना केली आहे. एरवी हिटलरच्या कृती आणि माइन काम्फ हे त्याचे वैचारिक चोपडे यातील सुसंगती हान्स माॅमसेनच्या नजरेतून सुटण्याचे कारण नव्हते, असे त्याचे स्पष्ट मत होते.
       छळ छावण्यातील क्रूरतेचे खापर नोकरशाहीच्या डोक्यावर फोडण्याचा हान्स माॅमसेनचा प्रयत्न बहुतेक इतिहासकारांना मान्य नव्हता. ‘मालकांना’ काय अभिप्रेत आहे, कशाला त्यांची निदानपक्षी मूक संमती आहे, हे ओळखण्याची नोकरशाहीची क्षमता वादातीत असते, हे या इतिहासकारांचे म्हणणे काही खोटे नाही.
       इस्रायली इतिहासकार येहुदा बेऊर याची समीक्षा अर्थातच अतिशय कडवट असणार यात शंका नाही नाझी तत्त्वज्ञान मुळातच चुकीचे होते, असे एकीकडे म्हणायचे आणि त्याची परिणामस्वरूप असलेली छळवणूक मात्र त्यामुळे नाही, असेही म्हणायचे, हे एक अजब तर्कट आहे. हिटलर, हिमलर यांच्यासारखे शीर्षस्थ नेते आणि तृणमूल स्तरावरचे (ग्रास रूट लेव्हल) नाझी अनुयायी यांना तिरस्करणीय मानायचे पण जे घडले त्याचा दोष यंत्रणेवर टाकायचा यात वदतोव्याघात आहे, हे न कळण्यातके लोक बाळबोध नक्कीच नाहीत.
                                              राजवाड्यांचे अलौकिकत्व
      भारतीय इतिहासकार कै वि. का राजवाडे ह्यांना आपण त्यांच्या हयातीत फारसे महत्त्व दिले नाही. इंटरनेटच्या प्रसारामुळे त्यांच्या कार्याचा परिचय जगाला झाला व  पाश्चात्यांनी त्यांना अग्रपुजेचा मान दिला. समकालीन साहित्यात तत्कालीन इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात, हे राजवाड्यांनी प्रथमत: मांडले, असा गौरव पाश्चात्यांनी केल्यानंतर आपल्याला त्यांची महती कळली. ज्यू लोकांच्या द्वेशाचा मागोवा घेण्यासाठी हान्स माॅमसेननेही साहित्याची पाने चाळलेली दिसतात. पण हे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. ज्यू लोकांबद्दलचा द्वेश पूर्वीपासूनच अस्तित्वात होता, हे मान्य असले तरी हिटलरच्या उक्ती व त्यावर आधारित  कृतीच्या जबाबदारीतून त्याची सुटका होत नाही. तसा खटाटोप डावीकडे झुकलेल्या हान्स माॅमसेनने का करावा, हा प्रश्न उरतोच.
                         सर्वच हुकुमशहांच्या भोवती गूढतेचे व रहस्याचे वलय असते का?
        हिटलर हे नावही जितके क्रूरपणासाठी प्रसिद्ध आहे तसेच त्या नावाभोवती एक गुढतेचेही वलय आहे. हिटलरची अखेरही इतिहासकार, साहित्यिक व जनसामान्य या सर्वांसाठी एक रहस्यमय बाब राहिली आहे. इव्हा ब्राॅन या प्रेयसीशी मृत्यूच्या थोडेसे अगोदर विवाहबद्ध होऊन त्याने तिला पत्नीपदाचा मान मिळवून दिला, ही बाब त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची परिचायक असल्याचे मानणारेही काही कमी नाहीत. आपल्याकडेही औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे गोडवे गाणारे महाभाग आहेतच की.
     असे असले तरी  हान्स माॅमसेननच्या प्रतिपादनातील दोन मुद्दे महत्त्वाचे आहे.कोणत्याही देशात प्रथम न्यायव्यवस्था कमकुवत होते. नंतर तिच्या जोडीला लोकप्रतिनिधीही निष्प्रभ होतात. त्यामुळे गुन्हेगार प्रबळ होऊन त्यांची जागा घेतात. गुन्हेगारांना शिक्षा होईनाशी होते. हळूहळू सज्जन लोकही त्यांचे समर्थक होतात. आपल्या इथेही अनेक गुन्हेगार निवडून येत असतात, हे आपण पाहतो. पण छोटा राजन आणि अनुप चेतिया सारख्यांच्या मुसक्या बांधणे व कसाब, याकूब व अफजल गुरू सारख्यांना पकडून फासावर लटकवणे या जमेच्या बाजू आहेत, हेही अधोरेखित केले पाहिजे.

                                          विनाश आपला व उन्नतीही आपलीच
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?

         जपानमधील होन्शु बेटाच्या मधोमध वसलेले क्योटो हे शहर हे एक महाकाय शहर असून एक हजार वर्षपर्यंत ते जपानचे राजधानीचे शहर होते. या शहरी दिनांक ११ डिसेंबर १९९७ रोजी एक आंतरराष्ट्रीय करार - क्योटो प्रोटोकाॅल- पारित झाला. या करारावर जगातील ८३ देशांच्या स्वाक्षऱ्या असून तो १६ फेब्रुवारी २००५ पासून कार्यवाहीत आला आहे.
 या कराराला कायदेशीर स्वरूप असून औद्योगिकरणामुळे विकसित झालेल्या देशांनी ग्रीन हाऊस गॅसेसच्या निर्मितीचे प्रमाण २०१० पर्यंत २९ टक्क्याने कमी करावे, अशी तरतूद आहे. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय? तर कार्बन डाय आॅक्साईड, मीथेन, नायट्रस आॅक्साईड, सल्फर  हेक्झॅफ्ल्युओराईड हे तसे सर्व परिचित व एच एफ सी (हायड्रोफ्लुरोकार्बन्स) आणि पी एफ सी (परफ्ल्युरोकार्बन्स) या नावाने ओळखल्या जाणाऱे दोन वायूगट असे एकूण पर्यावरणाला घातक असलेले सहा वायू आहेत.  युरोपियन राष्ट्रे, अमेरिका, जपान, रशिया यांना हे शड्रिपू (सहा वायू) किती प्रमाणात कमी करावे, याबाबत मुख्यत: त्यांच्या त्यांच्या विकसित स्वरूपानुसार वेगवेगळे प्रमाण नमूद केले आहे. तसेच  आॅस्ट्रेलिया सारख्यांचे बाबतीत हे प्रमाण किती वाढले तरी चालेल, अशी सूटही दिलेली आहे. हे या कराराचे सार असून त्यात इतरही लहानमोठे तपशील आहेत.
   असे करार ताबडतोब अमलात येऊ शकत नाहीत, कारण संबंधित देशांनी त्याची पुष्टी(रॅटिफिकेशन) करणे -मंजुरी देणे- आवश्यक असते. याला सहाजिकच वेळ लागतो. स्वाक्षरीचे स्वरूप  प्रतिकात्मक असते.  पुष्टी केली की तो करार पाळण्याचे कायदेशीर बंधन येते. भारत व चीन यांनी या कराराची पुष्टी केली असली तरी यांच्यावर या शड्रिपूंना आवर घालण्याचे बंधन नाही. कारण हे विकसनशील देश मानले जातात. या देशात फारसे औद्योगिकरण झालेले नाही. त्यामुळे येथे हे घातक वायु निर्माण होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.  खरे तर चीन आता प्रदूषणाचे बाबत अमेरिकेलाही मागे टाकतो आहे. येथे पाश्चात्यांची चलाखी लक्षात घ्यावयास हवी. कारखाने चीन व भारतात काढायचे, म्हणजे वायु प्रदूषण तिथे होईल व कारखान्यांमध्ये तयार झालेला माल आपल्या देशात आयात करायचा. अशाप्रकारे प्रदूषणाचे आऊटसोर्सिंग करण्याचा कुटिल डाव या देशांचा आहे. कदाचित हा डाव नसेलच तर निदान क्योटो कराराचा अनुद्देशित पण अपरिहार्य परिणाम मात्र नक्कीच आहे.
  आजमितीला या करारावर  स्वाक्षऱ्या बहुतेक देशांनी केल्या आहेत. पण पुष्टी १६९ देशांनीच केली आहे. नवीन शासन येऊ घातले आहे ही सबब पुढे करून आॅस्ट्रेलियाने (सूट मिळाली असून सुद्धा) व अमेरिकेने या कराराची पुष्टी केली नव्हती.
आॅस्ट्रेलियाने २००७ मध्ये पुष्टी केली. अमेरिका जगातील सर्वात जास्त प्रदूषण निर्माण करणारा ( सहा वायू निरमाण करणारा) देश आहे. तर आॅस्ट्रेलिया माणशी सर्वात जास्त प्रदूषण करणारा देश आहे.
      मायकेल ब्लाॅक यांनी ‘ ग्लोबल वाॅर्मिंग - इट्स अवर चाॅईस’ या लेखात व्यक्त केलेले विचार आपले डोळे उघडू शकतील का?
      चांगल्या उद्देशाने क्योटो प्रोटोकाॅल हा करार केला गेला पण कार्बन डाय आॅक्साईडचे वातावरणातील वाढते प्रमाण तसेच उष्णतामानाचा वाढता पारा चढेलच आहे. या अपयशामागे पुरेशा अभ्यासाचा अभाव हे फार महत्त्वाचे कारण आहे. निसर्गातील काही घटनांमुळेच कार्बन डाय आॅक्साईडचे शोषण पुरेशा प्रमाणात होत नाही व वातावरणाचे उष्णतामान कमी होत नाही, असे लक्षात येत आहे. जोपर्यंत अमेरिका सहकार्य करणार नाही व चीनची धुरांडी उसंत घेणार नाहीत, तोपर्यंत पर्यावरणाची विनाशाच्या दिशेने सुरू असलेली घसरण थांबणार नाही.
    यावर उपाय काय? स्वत:पासून सुरवात करा. कर्ब उत्सर्जन कमी कसे होईल, ते पहा. जनजागृती करा. आवाज उठवा. यातूनच गगनभेदी गर्जना आकाराला येईल. यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागतील. अन्यथा आर्त किंकाळ्या, निराशेचे सुस्कारे, उपाशी पोटीची तडफड यांचे ताट आपल्यासमोर वाढून ठेवलेलेच आहे. निर्णय आपला, विनाश किंवा उन्नतीही आपलीच असणार आहे.
 प्रदूषणाचे मापन
प्रदूषणाचे मापन दोन पद्धतीने करतात.
१. देश हे एकक मानून होणारे प्रदूषण - यात पहिला क्रमांक आहे चीनचा. दुसरा अमेरिकेचा, तिसरा युरोपियन युनियनचा तर चौथा आहे भारताचा. नंतर येतात रशिया, जपान, जर्मनी व दक्षिण कोरिया.
२. प्रदूषणाचे प्रमाण दर डोई किती आहे, तेही पाहिले जाते.जसे चीनची लोकसंख्या खूप जास्त आहे त्यामुळे चीनचे प्रदूषणाचे दर डोई प्रमाण अमेरिकेपेक्षा कमी आहे. पण ते भारताच्या कितीतरी पट आहे. या प्रमाणे विचार केला तर युनायटेड अरब इमीरातचे प्रमाण खूप जास्त आहे. रशिया, साऊथ कोरिया, कॅनडा, सौदी अरेबिया, आॅस्ट्रेलिया थोड्या फार फरकाने मागेपुढे असतील, इतकेच. चीन यांच्या तुलनेत कमी असला तरी पाठोपाठ आहे,  भारताचे प्रदूषणाचे दर डोई प्रमाण अत्यल्प असले तरी १९९० च्या तुलनेत ते २०१२ साली  तिप्पट चौपटही असेल. पण तरीही इतरांच्या तुलनेत खूपच कमी आहे, याची नोंद घ्यायला हवी.
 विकास म्हटला की प्रदूषण आलेच. विकासासाठी प्रदूषण निर्मितीची ‘सवलत’ आम्हाला असावी, अशी मागणी वर उल्लेख केलेले बडे देश वगळता इतर देशांची असणार, हे उघड व स्वाभाविकच आहे. प्रत्येक विकसनशील व अविकसित देश ही ‘सवलत’ आपल्याला जास्तीतजास्त असावी, याबाबत आग्रही आहे.
 या विषयाचे महत्त्व जाणून विचावंतांनी पॅरिस येथे चालू असलेल्या परिषदेच्या निमित्ताने एक खुले पत्र प्रसारित केले आहे. या पत्राचा अभ्यास उपयोगी ठरेल.
१. प्रदूषाबाबत  स्वखुशीने बंधने कुणी स्वीकारत नाही आणि स्वीकारली तर कुणी पाळत नाही. म्हणून ती अनिवार्य करा.
२. वातावरणाचे उष्णतामान निदान दोन अंशाने कमी करावे, हे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही. म्हणून वेळोवेळी आढावा घेऊन उद्दिष्टात यथोचित बदल (वाढ?) करा.
३. या शतकाचे शेवटी कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण नक्की किती असेल ते निश्चित करून कृती आराखडा ठरवा.
४. या अंतीम उद्दिष्टाच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांची वेळोवेळी समीक्षा करा.
     पोहण्याचे टाके पाण्याने पुरेपूर भरले असतांना जर त्यात आणखी पाणी ओतले तर काय होईल? तो ओसंडून वाहू लागेल. याच न्यायाने समुद्राकाठची शहरे या ओसंडणाऱ्या पाण्यात बुडू लागतील. या संकटाकडे लोक पुरेशा गंभीरपणे पाहत नाहीत.
       वातावरणात कार्बन डाय आॅक्साईड बराच काळ ठाण मांडून राहतो. त्याचा जलद गतीने निचरा होत नाही. ज्या गतीने या वायूचा निचरा होतो त्यापेक्षा अधिक गतीने तो निर्माण होतच राहिला तर एक दिवस असा येईल की ज्या दिवशी सजीव सृष्टी नष्ट व्हायला लागेल. हा दिवस वीस वर्षानंतर उगवण्याची दाट शक्यता आहे.
        असे असले तरी कार्बन डाय आॅक्साईडची निर्मिती पूर्पणे थांबवता येणार नाही. मग कुणाला किती प्रमाणात हा वायू निर्माण करण्याची सवलत असावी ? या प्रश्नावर पॅरिसला काथ्याकूट सुरू आहे हा विषय ३० डिसेंबरपर्यंत निकाली निघेल का? निघाला पाहिजे. पण निघेल का?
कोपेनहेगनमधील तूतू मैमै ऐवजी पॅरिसमध्ये स्तुती सुमने  
     हवामान बदलाबाबत नवीन करार करण्याच्या हेतूने सुरू असलेली १९६ राष्ट्रांची परिषद डिसेंबर अखेरपर्यंत चालणार असून एक कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी खटाटोप जोरात चालू आहे. एवढा खटाटोप का करावा लागतो आहे? मार्ग काढणे दुरापास्त आहे का? तर तसे नाही. जागतिक नेतृत्त्वाने योग्य विचार केला तर मानवाच्या कल्याणाचा मार्ग नक्कीच सापडू शकेल. अमेरिका व चीन काय भूमिका घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. आताआतापर्यंत अमेरिकेची भूमिका ताठर होती. कर्ब उत्सर्जन कमी करण्याची सगळी जबाबदारी अमेरिका व पाश्चात्य राष्ट्रे अविकसित व विकसनशील राष्ट्रांवर टाकीत होती. ‘तुम्ही कोळशाचा वापर करून आपले उद्योग उभारले आहेत आणि आम्हाला कोळशाचा उपयोग करू नका
, असे सांगत आहात. तेव्हा अन्य सुरक्षित तंत्रज्ञान आम्हाला अवगत करण्याची जबाबदारी तुमची आहे’, ही अविकसित राष्ट्रांची भूमिका विकसित राष्ट्रे मान्य करीत नव्हते. पण नुकतेच पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांची दूरध्वनीवरून बातचीत झाली आणि काय आश्चर्य! मोदी हे सक्षम नेते आणि प्रभावी पंतप्रधान आहेत, अशी स्तुती सुमने त्यांनी मोदींवर मुक्त हस्ते उधळली. आंतर राष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांना भावला. लगेच पॅरिसमध्ये अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी आपली भूमिका बदलली. हे एक सुचिन्ह आहे.
चेन्नईतील अवकाळी वर्षा, दिल्लीतील प्रदूषण, काही वर्षांपूर्वी मुंबईतही झालेला जलप्रलय यांचा उल्लेख पॅरिस परिषदेत वारंवर झाला. केवळ भारतच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्थानम्यानमार आफ्रिका व अनेक अविकसित देश निसर्गाच्या कोपापुढे हतबल झाले आहेत. हे सत्य असले तरी आताच कोठे अविकसित देश विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. प्रदूषण होते म्हणून तुम्ही विकासाचा मारिग सोडा, असे म्हणण्याचा अधिकार विकसित देशांना कसा काय पोचतो. प्रदूषण निर्मितीत विकसित देशांचा वाटा फार मोठा आहे. हा तूतू मैमैचा प्रकार एकमत होऊ देत नव्हता. भारताचा आवाज अरण्यरूदन ठरत होता. त्यामुळे २००९ साली कोपनहेगन परिषदेत जो तिढा सुटला नाही तो सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या २०१५ हे वर्ष चालू आहे. या काळात पॅरिस मधील सीन या नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे. तसेच ते अविकसित देशातील नद्यांमधूनही वाहून गेले आहे. याची जाणीव झाल्यामुळेच हा स्तुतीचा पाझर फुटला आहे.
   पॅरिस परिषदेची फलश्रुती
  पॅरिसमध्ये सध्या रोज निदर्शने चालू आहेत. गरीब देश सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, याची जाणीव आंदोलक सर्व जगाला करून देत आहेत. ते किंचितही भीड बाळगतांना दिसत नाहीत.विकसित देशांनी जगातील साधन संपत्तीची कशी लूट केली आहे, त्याचे प्रत्यकारी चित्रण असलेले फलक निदर्शकांच्या हाती असतात. आपण स्वत: कोणतीही बंधने स्वीकारायची नाहीत पण सर्व बंधने विकसनशील आणि अविकसित देशांच्या माथी मारायची, हा विकसित देशांचा डाव ते उघड करीत असतात. खरे पाहिले तर अविकसित देशांमुळे होणारे प्रदूषण अत्यल्प आहे. विकसित देशच प्रदूषणासाठी बहुतांशी जबाबदार आहेत. सुदैवाची गोष्ट ही आहे की, ही बाब त्या देशांमधील जनतेच्या लक्षात येऊ लागली आहे. विकसित देशातील नागरिकांनी प्रचंड प्रदूषण निर्माण करणारी जीवनशैली कायम ठेवायची आणि त्या प्रदूषणाचे जागतिक प्रमाण कमी करण्यासाठी अविकसित देशांवर बंधने घालायची, मग भलेही त्यांचा विकास खुंटला तरी चालेल हा उरफाटा न्याय त्या देशातील जनतेलाही पटेनासा होतो आहे. लोकमताचा हा रेटा पाश्चात्यांना आपली भूमिका बदलण्यास भाग पाडतो आहे.
  या पार्श्वभूमीवर भारताच्या मिशन इनोव्हेशनला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यानुसार आजवर न घडलेल्या अनेक गोष्टी नव्याने घडत आहेत.
१. परिषदेत सहभागी झालेले १२० देश प्रथमच एकत्र आले आहेत. २. त्यांनी सौर उर्जेची आघाडी उभारली आहे. यामुळे कर्ब उत्सर्जन रोखण्याचा एक पुढे येतो आहे. ३. अविकसित देशांचा विकास झाला, या देशातही वैज्ञानिक प्रगती झाली तर हे देश पहवामानातील प्रतिकूल बदलावर मात करू शकतील, हे सर्वांच्या मनावर बिंबवण्याच्या प्रयत्नांना गती मिळते आहे. ४. प्रारंभी नरेंद्र मोदींनी परिषद संपता संपता जावे असे ठरले होते. पण सर्व राष्ट्रप्रमुख सुरवातीलाच येणार हे स्पष्ट होताच तेही आपला कार्यक्रम बदलून सुरवातीलाच परिषदेत उपस्थित राहिले. स्वच्छ भारत, हरित भारत, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, उर्जानिर्मितीचे नवीन तंत्रज्ञान विकसित करून प्रदूषण कमी करण्यावर भारत देत असलेला भर हे सर्व उपक्रम परिषदेत मांडले. यामुळे विकसित देशांचा भारतावरचा विश्वास वाढला तसेच अविकसित देशांना आपल्याला निरपेक्ष भावनेने मदत करणारा मार्गदर्शक मिळाल्याचा साक्षात्कार झाला.सौर उर्जेतून शाश्वत विकास होऊशकतो, हे समजलेच नाही तर उमजले सुद्धा. ५. सौर उर्जेच्या जोडीला पवन उर्जा, बायोमास उर्जा, छोटे जलविद्युत प्रकल्प याबाबतचा अहवाल आपण यापूर्वीच संयुक्त राष्ट्र संघाला आपण सादर केल्याचे मोदींनी आपल्या भाषणातून सांगितले. ६. याचा स्वाभाविक परिणाम असा झाला की अविकसित राष्ट्रांचे नेतृत्त्व भारताकडे चालून आले. या परिषदेत बहुतेक देशांच्या स्तुतीच्या तर काही मोजक्या देशांच्या टीकेच्या केंद्रस्थानी भारतच असायचा. या अगोदरच्या परिषदांमध्ये भारताच्या विचारांची कुणी फारशी दखल घेत नसे. तेपर्व या परिषदेत संपले.
 या परिषदेची फलश्रुती यथावकाश कळेल. ती आताच सांगता येणार नाही. पण  निदान  १. यावेळी १८० देश आपली उद्दिष्टे जाहीर करतील. २. ती सर्वांना उपलब्ध होतील. ३. कर्ब उत्सर्जनाच्या प्रश्नावर सर्व देशांचे एकमत होईल. ४. वेळोवेळी या दृष्टीने होत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला जाईल.
 एकतर उन्नती आपली सर्वांची, नाहीतर विनाशही आपला सर्वांचा ही जाणीव मनाशी बाळगूनच सर्व देशांचे प्रतिनिधी आपापल्या मायदेशी परतणार हे नक्की. हेही नसे थोडके.



Tuesday, July 21, 2015

फाशीनंतरची चौकशी

धोरण 

तारीख: 21 Jul 2015 00:08:53

मोदींच्या या भेटीचे वेगळेपण कोणते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जुलै महिन्यातील आपल्या दौर्‍यात कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तान या पाच देशांना भेटी दिल्या. या भेटी देण्यामागचे कारण काय असावे, हे समजण्यासाठी थोडे मागे जाऊन पाहावे लागेल. पूर्वी हे देश रशियन ‘साम्राज्याचे’ घटक होते. पण, रशियन वर्चस्व या देशांनी मनापासून कधीच स्वीकारले नव्हते. सैनिकी बळ आणि दहशत यांच्या जोरावर या देशावर रशियाचा ताबा होता. सोव्हिएट रशियाचे विघटन झाले आणि हे देश स्वतंत्र झाले, तरी गेली वीस वर्षे अस्थिरच आहेत.
कझाकस्तान- या देशाला समुद्र किनारा नाही. रशिया, चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान यांनी कझाकस्तान हा देश वेढलेला आहे. १३ व्या शतकात चंगीजखानाने हा प्रदेश पादाक्रांत केला. असे देश पादाक्रांत केले की, तो पुरुषांची भीषण कत्तल करीत असे आणि स्त्रियांवर बलात्कार करीत असे. १९३६ साली हा सोव्हिएट रशियाचा भाग झाला. १९९१ साली तो रशियापासून विभक्त झाला. येथे ७० टक्के इस्लाम धर्मीय व २६ टक्के ख्रिश्‍चन धर्मीय लोक आहेत. उझबेकिस्तान- या देशाची ताश्कंद ही राजधानी आहे. लाल बहादूूर शास्त्रींचा देहान्त याच ठिकाणी झाला होता. हा पर्शियन साम्राज्याचा भाग होता. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात सिकंदरने हा प्रदेश पादाक्रांत केला होता. ८ व्या शतकात तुर्कांनी आक्रमण करून यांना इस्लाम धर्मीय होण्यास भाग पाडले. १९२५ साली सोव्हिएट युनियनचा एक प्रांत बनला. १९९१ साली हा रशियन साम्राज्यापासून अलग होऊन फुटून निघालेल्या अकरा देशांच्या कॉमनवेल्थचा एक घटक झाला. किर्गिस्तान- निदान २ हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या देशाने अनेक संस्कृती, साम्राज्ये, सिल्क रूट नावाने ओळखला जाणारा व्यापारी व सांस्कृतिक महामार्ग आणि विविध जातीजमातींची साथसंगत कधी राजीखुशीने, तर कधी जुलुम जबरदस्तीने केली आहे. भारतीय संस्कृतीचे अवशेष याही देशात सापडतात. याबाबतच्या संशोधनाला वावच वाव आहे. इस्लाम हा धर्म जबरदस्तीने स्वीकारलेल्या मुख्यत: किर्ग जमातीची बहुसंख्या ( ६४ टक्के) या देशात आहे. तुर्कमेनिस्तान- तुर्कमेनिस्तानची सरहद्द इराण व अफगाणिस्तानला लागून आहे. या देशात पाणी, वीज आणि स्वयंपाकाचा गॅस नि:शुल्क मिळतो. या देशात जुलमी राजवट आहे. १९९१ मध्येच रशियापासून विलग झाल्यानंतर २००६ पर्यंत या देशात नियाजोव्ह हा तहहयात अध्यक्ष होता. आजही स्थितीत फारसा फरक नाही. तरीही १९९९ साली सार्वमताने काही बदल झाले आहेत. मुस्लिम बहुसंख्य तुर्कमेनिस्तानचे भारताशी असलेले संबंध तुलनेने जुने आहेत. ताजिकिस्तान- हाही डोंगराळ भाग आहे. मुख्य म्हणजे याच्या सीमा अफगाणिस्तान (१५०० किमी) व पाकिस्तानला लागून आहेत.
शेजार्‍यांची काळजी का वाहायची?
देशकालाच्या सीमा नसलेला दहशतवाद आणि कट्टरवाद यापासून शेजारीही मुक्त असावेत, ही भूमिका मान्य केल्यास, पंतप्रधान मोदी यांनी या देशांना भेट देताना जे विविध करार केले आहेत, त्यापैकी संरक्षणविषयक बाबतीत सहकार्य आणि दरवर्षी संयुक्त सैनिकी कवायती हे दोन करार विशेष महत्त्वाचे मानले पाहिजेत. परस्पर सहकार्य, आर्थिक, सांस्कृतिक, संरक्षणविषयक, दळणवळणविषयक देवाणघेवाण आदी बाबतीतले भारताचे या देशांशी झालेले व होत असलेले करार बरोबरीच्या नात्यातून होत आहेत.
या देशांतील लोक धर्माने मुख्यत: मुसलमान आहेत. हा भाग राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असला, तरी दोन बाबतीत चांगलाच संपन्न आहे. एक म्हणजे या भागात नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे आहेत. यांना हायड्रोकार्बन्स असे नाव आहे. दुसरे असे की, येथे युरेनियमचे साठे आहेत. या शिवाय राजकीयदृष्ट्या या देशात चीनने आपले संबंध प्रस्थापित केले आहेत. एक भौगोलिक तपशील असाही आहे की, या देशांच्या सीमा चीनला लागून आहेत. भारताभोवतालच्या देशांमध्ये चीनने आपले पाय रोवण्यास प्रारंभ केला आहे आणि याबाबतीत चीनला चांगलेच यश प्राप्त झाले आहे.
चीन भोवतालचे देश
भारताने चीनभोवतालच्या देशांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे महत्त्व शब्दांत सांगण्याची आवश्यकता नसावी. या दौर्‍यावर टीका करणारे एकतर अज्ञानापोटी टीका करीत असावेत किंवा त्यांचा बोलविता धनी वेगळाच असला पाहिजे! यापैकी साम्यवादी मंडळींची टीका समजण्यासारखी आहे. एखादी रणनीती चीनच्या विरोधातली असू शकते, असे त्यांना दूरान्वयाने जरी जाणवले, तर या साम्यवादी मंडळींचा पोटशूळ जागा होतो. पण, कॉंग्रेसचे काय? कॉंग्रेसजन का टीका करीत आहेत?
अगोदरच्या कॉंग्रेस सरकारने या देशांकडे फारसे लक्ष दिले नव्हते. तसे नरसिंह राव आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी या देशांना भेटी दिल्या होत्या. करारही केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनीही या देशांना भेटी दिल्या होत्या. आता पंतप्रधान मोदी भेट देत आहेत, या बाबीवर टीका कशी करणार? म्हणून सर्वच दौर्‍यांवर, पंतप्रधानांचे लक्ष देशाबाहेरच फार आहे, यासारख्या मुद्यांपासून ते ‘सूटबुटातले सरकार’ म्हणून हिणवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
आपले अस्तित्व जगाला जाणवले पाहिजे
या दौर्‍याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, ते आणखी एका वेगळ्या दृष्टीने. भारत नावाचा देश या भूतलावर आहे, हे या देशातील राजकारणी आणि जनता यांना जाणवणे आवश्यक होते. आपल्याबद्दलची अशी जाणीव चीनने या अगोदरच या देशांना करून दिली आहे. बावळटपणा म्हणून म्हणा किंवा दुर्लक्ष म्हणून म्हणा, आपण याबाबत मागे राहिलो, हे मान्य केले पाहिजे.
प्राचीन संबंध शोधून जोपासले पाहिजेत
या देशांशी आपली भौगोलिक समीपता एकवेळ नसेलही, पण ऐतिहासिक व सांस्कृतिक समीपता नक्कीच आहे. आपण काहीही केले नाही, तर या प्रदेशात चीनचा कायमस्वरूपी वरचष्मा निर्माण होईल. प्रत्येक देशातील एका दिवसाच्या दौर्‍याने स्थायी व दृढ संबंध निर्माण होतील, या भ्रमात कुणीही राहू नये/नाहीसुद्धा. पण, पायाभरणीचे काम या दौर्‍याने नक्कीच होणार आहे. हे काम या अगोदरच व्हावयास हवे होते, पण ज्यांनी हे काम धडपणे केले नाही, त्यांनीच ओरड करावी, हे देशातील ओंगळ राजनीतीचे परिचायक आहे.
या देशांना हवे आहेत, रेल्वे मार्ग व रस्ते. यामुळे मध्य आशिया आणि युरोप यातील दळणवळण वाढीस लागणार आहे. कारण हा एक सरळ संपर्क मार्ग असणार आहे. खनिजे आहेत पण ती भूमिगत आहेत. ती बाहेर काढण्याची गरज आहे. या सर्व बाबतीत कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान भारताजवळ आहे. खनिजांना भारत ही कायमस्वरूपी बाजारपेठ आहे, हा या देशांचा फायदा आहे. पण, रस्ते नाहीत आणि तशात या देशांना समुद्र किनाराही नाही. त्यामुळे या देशांची कोंडी झाली आहे. ही कोंडी आपण फोडली नाही, तर आणखी कुणीतरी ती आज ना उद्या नक्की फोडेल. त्यात चीनचा क्रमांक पहिला असेल. पहिला प्रयत्न चीनचाच आहे. अमेरिका तशी दूर आहे. तिच्या काही चालीही उलट परिणाम करणार्‍या ठरल्या आहेत. त्यामुळे भारताने या भागाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. भारताची अशा प्रकारची परस्परपूरक व साहाय्यक मैत्री ही उभयपक्षी उपयोगाची आहे. हायड्रोकार्बन आणि युरेनियम ही भारताची गरज तर भागेलच, पण सोबतच हजारो भारतीयांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. देशातील अर्थकारणाला गती व काही बाबतीत चालना मिळेल. ही बाब चीनच्या पचनी पडणारी नाही, याचे आश्‍चर्य वाटायला नको. पण, देशातच याला विरोध आणि अपशकुन करण्याचा उपद्व्याप व्हावा, ही आपल्या देशातील राजकारणाला लागलेली कीड आहे.
या सर्व देशांत आज तरल स्थिती आहे. एक पोकळी अजूनही कायम आहे. ही पोकळी अशीच राहणार नाही. कुणीतरी भरून काढीलच. चीनने प्रारंभ केलेला आहेच. रशियाही आता नव्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव राखूनच आहे. कारण अनेक वर्षांची जुलुम जबरदस्तीची का असेना, पण या देशांशी रशियाची साथसंगत होतीच. भारताची नीती तशी नाही. बरोबरीच्या नात्याने भारताचे वागणे ‘सार्क’ देशातील बहुतेक देशांना भावले आहे. या देशात स्थिरता यावी, तरलता जावी पोकळी भरून निघावी, ही बाब या देशांच्या, भारताच्या आणि जगाच्याही हिताची ठरणार आहे. पंतप्रधान मोदींची या देशातील भाषणे पाहता आपल्याला ही जाणीव आहे, याचा प्रत्यय येतो.

Sunday, September 21, 2014

एका हिंदूस पत्र लिहिणारा लिओ टॉलस्टॉय 20 Sep 2014

इतिहास

तारीख: 20 Sep 2014 23:54:41

एका हिंदूस पत्र लिहिणारा लिओ टॉलस्टॉय

लिओ टॉलस्टॉय एक विश्‍वविख्यात साहित्यिक आणि चिंतक म्हणूनही ओळखला जातो. टॉलस्टॉयच्या कादंबर्‍यांचे विश्‍वसाहित्यात अमर स्थान आहे. मानवाच्या मनाच्या नेणिवेतील मनोव्यवहारांचे वर्णन करण्याची त्याची क्षमता केवळ वादातीतच नाही, तर आजही ते स्थान तसेच कायम आहे आणि भविष्यातही ते तसेच राहणार आहे.
त्याचे एका हिंदूस लिहिलेले पत्र तर आम्हा भारतीय लोकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. कदाचित या पत्रामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले असावे. वयाच्या तीस वर्षांनंतर टॉलस्टॉयच्या जीवनाला नैतिक आणि धार्मिक आधिष्ठान प्राप्त झाले. दुष्टाव्याचा विरोध अहिंसक मार्गाने करण्याच्या त्याच्या भूमिकेमुळे महात्मा गांधी प्रभावित झाले होते, असे मानतात. या दोन महापुरुषांमधील संबंधाची सुरवात कशी झाली, ते पाहणे रंजक तसेच बोधप्रदही आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला टॉलस्टॉय यांचा पाठिंबा मिळावा, अशी विनंती करणारे पत्र तारकनाथ दास यांनी त्यांना पाठविले होते. या पत्राला उत्तर म्हणून डिसेंबरमध्ये टॉलस्टाय यांनी पाठविलेल्या पत्राचे शीर्षक आहे- ‘एका हिंदूला पत्र.’ यात जुलमी परकीय सत्तेविरुद्ध लढताना सशत्र लढ्याला शांततामय मार्गाचा- अहिंसक सविनय कायदेभंग- हाच पर्याय असू शकतो, असे टॉलस्टॉय यांनी प्रतिपादन केले आहे. या पत्रात त्यांनी जसा स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे, तसाच तिरुकुरलचाही उल्लेख आहे. तमीळ विचारवंत तिरुवलवार यांनी तिरुकुरल म्हणजेच तमीळ मराई (तमीळ वेद) नावाची रचना सिद्ध केली आहे. यालाच चिरंतन शब्द असेही म्हटले जाते. टॉलस्टॉयचे पत्र ‘फ्री हिंदुस्थान’ नावाच्या वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर ते आफ्रिकेत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी (त्या वेळी ते महात्मा नव्हते) यांच्या वाचनात आले. या पत्राने महात्मा गांधी खूपच प्रभावित झाले. त्यांनी टॉलस्टॉयला पत्र लिहून या पत्राचा गुजराती भाषेत अनुवाद करण्याची अनुमती मागितली. यानंतर महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यात पत्राने विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. महात्मा गांधींच्या राजकीय भूमिकेवर टॉलस्टॉय यांच्या विचारांचा ठसा उमटला होता, असे मानले जाते.

कादंबरीकार टॉलस्टॉय

लिओ लिओ टॉलस्टॉय हा आपल्या भावंडातला चौथा मुलगा. आईबापाचे निधन त्याच्या लहानपणीच झाल्यामुळे तसा अनाथ म्हणूनच आपल्या मावश्यांकडे तो वाढला. बालपण, किशोर वय, तारुण्य (चाइल्डहूड, बॉयहूड आणि यूथ) अशी तीन वेगवेगळी आत्मचरित्रे त्याने त्या त्या काळात लिहिली आहेत.
त्याचे प्राथमिक शिक्षण शाळेत न जाता घरीच झाले. तो हुशार विद्यार्थी कधीच नव्हता. विद्यापीठाची पदवी त्याला संपादन करता आली नाही. तो शेतीसुद्धा नीट करू शकला नाही. पण, तो कायम आणि सतत लिहीत राहिला. कन्टेम्पररी या त्या काळाच्या प्रसिद्ध नियतकालिकात त्याचे लेख प्रसिद्ध होत असत.
‘वॉर ऍण्ड पीस’ ही कादंबरी लिहायला प्रारंभ त्याने १८६१ साली केला. ही कादंबरी त्याने अनेक भागात लिहून प्रसिद्ध केली. १८६९ मध्ये शेवटचा भाग लिहून त्याने ही कादंबरी पूर्ण केली. नेपोलियनकालीन युद्धाच्या कालखंडावर आधारित ही कादंबरी खूप गाजली. ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेली तसेच वास्तव चित्रण असलेली काल्पनिक पात्रे, हे या कादंबरीचे वैशिष्ट्य होते. ते रसिकांना खूपच भावले. ऐतिहासिक घटना आणि त्या काळातले नीतिनियम याबद्दलचे वक्रोक्तियुक्त निबंधवजा लिखाण, हा या कादंबरीचा आणखी एक विशेष म्हटला जातो. आपले दैनंदिन व्यवहार कसे आहेत, यानुसार आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होत असतो. उक्तीपेक्षा कृती कशी, यावर त्याचा भर असल्याचे जाणवते. ना कॅरेनिनाचे लेखन नंतरचे. या कादंबरीला पार्श्‍वभूमी होती, रशिया आणि तुर्कस्तानमधील युद्धाची. ‘वॉर ऍण्ड पीस’प्रमाणेच या कादंबरीत टॉलस्टायचे जीवनानुभव साकारले आहेत, असे मानतात. विशेषत: यातील प्रियाराधनाला टॉलस्टाय आणि सोफिया यांच्यातील प्रणयप्रसंगांची पार्श्‍वभूमी लाभलेली आहे, असे म्हटले जाते. या कादंबरीचे प्रारंभीचे वाक्य वाचकांच्या स्मरणात कायम स्थान ग्रहण करून आहे, अशी नोंद त्या काळी केलेली आढळते. सर्व सुखी दाम्पत्यांचा जीवनपट सारखाच असतो. पण, प्रत्येक दु:खी कुटुंबाचे दु:ख मात्र वेगवेगळे असते. ही कादंबरीसुद्धा हप्त्याहप्त्यानेच चार वर्षांत पूर्ण प्रसिद्ध झाली. या कादंबरीने टॉलस्टायला अफाट प्रसिद्धी आणि अमाप पैसा मिळवून दिला.

कल्पित कथांना वेगळेच वळण

नंतरच्या लिखाणात त्याच्या कल्पित कथांनी वेगळेच वळण घेतले. ‘द डेथ ऑफ इव्हान लिंच’ या त्याच्या गाजलेल्या तिसर्‍या कादंबरीत कल्पिताला नैतिकतेची आणि वास्तवाची बैठक प्राप्त झालेली दिसते. क्षुल्लक बाबींना महत्त्व देऊन आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा कालखंड वाया घालवला, हे नायकाला- इव्हान लिंचला- जेव्हा कळते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो, कारण त्या वेळी तो मृत्यूच्या छायेत जीवन जगत असतो. ‘फादर सर्गिअस’ या छोट्याशा कादंबरीत टॉलस्टायने आपल्या नवीन आध्यात्मिक मतांची चर्चा केलेली आढळते, तर ‘रीसरेक्षन’ या कादंबरीचा कॅन्‌व्हास पहिल्या दोन कादंबर्‍यांसारखाच मोठा असूनही ती रसिकांना फारशी भावली नाही. ‘द लिव्हिंग कॉर्प्स’ हे त्याचे वक्रोक्तिपूर्ण नाटक त्याने लिहिले. ‘हाजी मुराद’ या कादंबरिकेचा शोध त्याच्या मृत्यूनंतर लागला.

मी कसा?

आपल्या आयुष्याचा आढावा घेताना तो म्हणतो, ‘‘मी युद्धात अनेकांना यमसदनी पाठविले आहे, द्वंद्व युद्धात अनेकांचा खात्मा केलेला आहे, जुगार खेळलो आहे, शेतकरी आणि श्रामिकांवर अनन्वित अत्याचार केले आहेत, वेश्यागमन केले आहे, लोकांना फसवले आहे, चोरी, लांडीलबाडी, पराकोटीचे मद्यपान केले आहे, खून, मारामार्‍या केल्या आहेत, मी केला नाही असा एकही गुन्हा नसेल. माझ्या आयुष्याची दहा वर्षे अशी गेली आहेत. तरीही माझे समवयस्क माझी गणना नैतिक पुरुषात करतात.’’

युद्धातील एक क्रूर सैनिक- टॉलस्टाय

शेतीतील आपल्या धाकट्या भावाची प्रगती पाहून त्याच्या मोठ्या भावाने त्याला आपल्याप्रमाणे सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला. काही काळ त्याने क्रिमियन युद्धात भाग घेतला. याच वेळी त्याने ‘सेव्हास्टोपल टेल्स’ या नावाची पुस्तके लिहिली. यात त्या काळात नवीनच असलेल्या एका लेखन प्रकाराचा त्याने वापर केला. संज्ञाप्रवाह (स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस) या नावाने हा लेखन प्रकार ओळखला जातो. एका सैनिकाच्या मनातील विचारांचा मागोवा या निमित्ताने त्याने चित्रित केला आहे.
बराचसा हेकेखोर आणि काहीसा उद्धट असल्यामुळे तो कोणत्याच प्रकारच्या लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसला नाही. विद्रोही म्हणून स्वत:ला घोषित करून तो पॅरिसला गेला. तिथे जुगारात सर्व गमावून बसला आणि मायदेशी परत आला. याच वेळी त्याने आपल्या आत्मचरित्राचा तिसरा खंड ‘तारुण्य’ (यूथ ) प्रसिद्ध केला. याच काळात एका डॉक्टरच्या मुलीशी- सोफियाशी- त्याचे लग्न झाले.

विद्रोही आणि वेगळाच टॉलस्टाय

कादंबरीलेखनातून टॉलस्टॉयला भरपूर पैसा मिळाला, पण आध्यात्मिकदृष्ट्या टॉलस्टॉय अतिशय अस्वस्थ होता. जीवनाचा अर्थ काय, हे त्याला पडलेले कोडे होते. प्रारंभी तो ऑर्थोडॉक्स चर्चकडे वळला. पण, त्याचे समाधान होत नव्हते. उलट, सर्व चर्चेस भ्रष्ट आहेत, या निष्कर्षाप्रत तो पोचला. जर सर्व मानव ईश्‍वराची लेकरे आहेत, असे म्हटले आहे, तर युद्ध आणि हिंसा यांना आपल्या जीवनात स्थान असूच कसे शकते, हा त्याला पडलेला प्रश्‍न होता. प्रस्थापित धर्ममतांच्या ऐवजी त्याने आपली मते ‘मेडिएटर’ नावाचा ग्रंथ लिहून मांडली. चर्चला हे सहन होणे शक्यच नव्हते. त्याला बहिष्कृत करण्यात आले. त्याच्या पाळतीवर गुप्त पोलिससुद्धा राहू लागले. आपल्या नवीन धर्ममतानुसार आपण संपत्तीचा त्याग केला पाहिजे, असे त्याला वाटू लागले. पण, त्याची बायको सोफिया हिने या विचाराला कडाडून विरोध केला. विवाहबंध तुटेपर्यंत ताणले गेले. शेवटी टॉलस्टॉयने आपल्या सर्व मिळकतीचे स्वामित्व पत्नीकडे सोपवले आणि तणाव तुटेपर्यंत ताणू दिला नाही.
उत्तरायुष्यात टॉलस्टॉयला खूप आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. पण, सोफियाला मात्र त्याचे जीवनविषयक सिद्धांत बिलकूल मान्य नव्हते. त्याला भेटायला येणार्‍या-जाणार्‍या शिष्यांचा ती पाणउतारा करीत असे. शेवटी टॉलस्टॉय वैतागला. या गोष्टीचा बभ्रा इतका झाला की, टॉलस्टॉय आणि त्याची कन्या अलेक्झांड्रा तीर्थयात्रेला निघून गेले. अलेक्झांड्राने आपल्या पित्याची मनोभावे सेवा आणि शुश्रूषा केली. आपली ही तीर्थयात्रा खाजगी आणि गुप्त राहावी, तिचा गाजावाजा होऊ नये, अशी त्या दोघांची इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. त्यांची ही तीर्थयात्रा खूपच खडतर ठरली. शेवटी अस्टापोव्हो गावच्या स्टेशनमास्तरने त्यांना आश्रय दिला. ‘वॉर ऍण्ड पीस’, ‘ना कॅरेनिना’ आणि ‘डेथ ऑफ इव्हान लिंच’ या कादंबर्‍या लिहिणारा लेखक लिओ टॉलस्टाय आजही जगातील मोजक्या प्रमुख लेखकांपैकी एक मानला जातो. नऊ सप्टेंबर १८२८ रोजी जन्मलेल्या या लेखकाच्या वाट्याला ८२ वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभले होते. तो २० नोव्हेंबर १९१० रोजी रशियातील ऍस्टापोव्हो या गावी एका स्टेशनमास्तरने दिलेल्या खोपट्यात मृत्यू पावला आणि त्याने चिरनिद्रा घेतली.
- वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०