Wednesday, February 3, 2016

                                                              हान्स माॅमसेन
एका वादग्रस्त इतिहासकाराची अखेर
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
        हान्स माॅमसेन हा जर्मन इतिहासकार हे एक अनेक प्रकारे वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. ५ नोव्हेंबर १९३० साली जुळ्या भावासोबत जन्म घेऊन ५ नोव्हेंबर २०१५ लाच म्हणजेच वाढदिवशीच त्याने इहलोकीची यात्रा संपविली आणि तो चिरनिद्रेच्या कुशीत विसावला. आता कधी कुणास ठावूक निर्णयाचा दिवस (जजमेंट डे) उजाडेल, त्या दिवशी पापपुण्याची मोजणी होईल आणि पुढील  मार्गाची दिशा निश्चित होईल. तो पर्यंत त्याच्या आत्म्याला विश्रांती मिळावी,अशी विनंती जगातील त्याचे चाहते आणि विरोधक या दोघांनीही केली असणार. पण तो वैचारिक दृष्ट्या डावीकडे झुकलेला असल्यामुळे त्याचा मृत्यूनंतरचा ठावठिकाणा निश्चित सांगता येण्यासारखा नाही. हान्स माॅमसेन हे असे एक वादग्रस्त पण वेगळे व्यक्तिमत्त्व होते.
                                                  तीन पिढ्या इतिहासकारांच्याच
   हान्स माॅमसेनचे घराणे इतिहासकाराचेच आहे. वडील आणि आजोबा हे दोघेही इतिहासकार होते. तो स्वत:ही केवळ सुविद्यच नव्हे तर इतिहास आणि तत्त्वज्ञान यात पारंगत होता. जर्मनीतील नामवंत विद्यापीठांमध्ये त्याने प्राध्यापक म्हणून काम केले होते. तो वादग्रस्त होता यामुळे काही बिघडत नाही. उलट वादेवादे जायते तत्त्वबोधा: या उक्तीनुसार निरनिराळे मार्ग उपलब्ध होण्याची तसेच विचारांना नवीन दिशा मिळण्याची शक्यता या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून निर्माण होत असते. पण वादग्रस्तता आणि विक्षिप्तपणा यातील सीमारेषा याबाबत भान ठेवणे आवश्यक आहे, हेही तेवढेच खरे आहे.
     हिटलर एक दुबळा हुकुमशहा ?
       हिटलरला सगळे जग एक क्रूरकर्मा म्हणून ओळखते पण हे महाशय हिटलरची संभावना एक निर्बल हुकुमशहा (वीक डिक्टेटर) म्हणून करतात. हिटलरला ज्यू लोकांचे शिरकाण करणारा म्हणून जग संबोधते पण ज्यू विरोधी भावना त्याच्या कितीतरी आधीपासून युरोपात होती, असा मुद्दा ते आग्रहाने मांडित असत. ए पाऊंड आॅफ फ्लेश (एक पाऊंडभर मास) ही शेक्सपीअरची प्रसिद्ध कलाकृती. त्यातला शायलाॅक हा सावकार ज्यू दाखविला आहे. तो मुदतीत कर्ज न फेडता आल्यास तुझ्या शरीरातून एक पाऊंड मास मी कापून घेईन, अशी विलक्षण अट घालून अपमानाचा सूड उगवण्याचा डाव टाकतो. ज्यू लोकांकडे कसे पाहिले जाई याची कल्पना या कथेवरून येते.
    हिटलरने ज्यू लोकांना बंदिवान केले, छळ छावण्या उभारल्या.पण त्यांना मारून टाका, असा आदेश दिला नव्हता. या ज्यू लोकांचे काय करावे हे त्याला कळत नव्हते. जर्मन वंशच सर्वश्रेष्ठ असे तो मानत असला तरी ज्यू लोकांचा वंशविच्छेद करा असा आदेश त्याने दिला नव्हता. ज्यू लोकांना ठार करण्याचा निर्णय नोकरशाहीचा होता. नोकरशाही (विशेषत: सेनाधिकारी) आणि प्रशासन एक पाऊल ( नव्हे अनेक पावले) पुढे गेले आणि ज्यू लोकांच्या चरबीपासून तयार केलेला साबण वापरून जर्मन सेनाधिकारी अंघोळ करीत, असे म्हणण्याइतपतच्या थराला गोष्टी गेल्या.
                                   
हान्स माॅमसेनच्या चष्म्यातून हिटलर कसा ?
    हान्स माॅमसेनने ‘हिटलर आणि नोकरशाही’ या शीर्षकानुसार एक पुस्तक लिहिले आहे. हिटलर चटकन निर्णय घेत नसे, स्वत:ची प्रतिमा व प्रतिष्ठा त्याला अतिशय प्रिय होती. तसा तो हलक्या कानाचाही होता. भोवतालचे लोक काहीबाही सांगत. त्यावर त्याचा विश्वास बसे. हिटलरचे राजकीय विरोधक आणि जेते असलेले इंग्लंड, फ्रान्स व अमेरिका यांनी त्याचे जे चित्र रंगवले आहे, तेच आज जगासमोर आहे. इतिहास हे दुसरे तिसरे काही नसून जेत्यांची बाजू ( विनर्स साईड आॅफ दी स्टोरी) असते, असे इतिहासाबद्दल म्हटले जाते. हे पुष्कळ अंशी खरे असले तरी ज्यूंना नुसते पकडून छळ छावण्यात अडकवून ठेवा, एवढ्यापुरताच हिटलरचा आदेश असेल, असे मानता येणार नाही. या पापाचे अपश्रेय हिटलरचेच मानायला हवे. पण यातून हिटलरला मुक्त करण्याचा खटाटोप व तसा प्रयत्न  हान्स माॅमसेनने केला, हे मान्य केलेच पाहिजे.
                                         समकालीन इतिहासकारांचा एकमुखी विरोध
    ॲंड्रस हिलग्रुबर, इबेरहार्ड जॅकेल, क्लाॅस हिल्डब्रॅंड तसेच कार्ल डिट्रिच ब्रॅशर या समकालीन इतिहासकारांनी हान्स माॅमसेनवर नुसती खरपूस टीकाच केली नाही तर तर हिटलर आणि नाझी तत्त्वज्ञानाची दाहकता कमी करण्याचा त्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्न आहे, असा हेत्वारोपही केला आहे. इतिहासकारांमध्ये दुमत असणे वेगळे आणि एकाने दुसऱ्याच्या हेतूबद्दलच शंका घेणे वेगळे. स्विस इतिहासकार वाॅल्टर हाॅफरने तर हान्स माॅमसेनवर सरळसरळ आरोपच केला होता. ‘ ‘हिटलर जसाकसा होता ते पाहण्याची हान्स माॅमसेनची इच्छाच नाही’,म्हणून त्याला तो तसा दिसत नाही’, या शब्दात त्याने  हान्स माॅमसेनची संभावना केली आहे. एरवी हिटलरच्या कृती आणि माइन काम्फ हे त्याचे वैचारिक चोपडे यातील सुसंगती हान्स माॅमसेनच्या नजरेतून सुटण्याचे कारण नव्हते, असे त्याचे स्पष्ट मत होते.
       छळ छावण्यातील क्रूरतेचे खापर नोकरशाहीच्या डोक्यावर फोडण्याचा हान्स माॅमसेनचा प्रयत्न बहुतेक इतिहासकारांना मान्य नव्हता. ‘मालकांना’ काय अभिप्रेत आहे, कशाला त्यांची निदानपक्षी मूक संमती आहे, हे ओळखण्याची नोकरशाहीची क्षमता वादातीत असते, हे या इतिहासकारांचे म्हणणे काही खोटे नाही.
       इस्रायली इतिहासकार येहुदा बेऊर याची समीक्षा अर्थातच अतिशय कडवट असणार यात शंका नाही नाझी तत्त्वज्ञान मुळातच चुकीचे होते, असे एकीकडे म्हणायचे आणि त्याची परिणामस्वरूप असलेली छळवणूक मात्र त्यामुळे नाही, असेही म्हणायचे, हे एक अजब तर्कट आहे. हिटलर, हिमलर यांच्यासारखे शीर्षस्थ नेते आणि तृणमूल स्तरावरचे (ग्रास रूट लेव्हल) नाझी अनुयायी यांना तिरस्करणीय मानायचे पण जे घडले त्याचा दोष यंत्रणेवर टाकायचा यात वदतोव्याघात आहे, हे न कळण्यातके लोक बाळबोध नक्कीच नाहीत.
                                              राजवाड्यांचे अलौकिकत्व
      भारतीय इतिहासकार कै वि. का राजवाडे ह्यांना आपण त्यांच्या हयातीत फारसे महत्त्व दिले नाही. इंटरनेटच्या प्रसारामुळे त्यांच्या कार्याचा परिचय जगाला झाला व  पाश्चात्यांनी त्यांना अग्रपुजेचा मान दिला. समकालीन साहित्यात तत्कालीन इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात, हे राजवाड्यांनी प्रथमत: मांडले, असा गौरव पाश्चात्यांनी केल्यानंतर आपल्याला त्यांची महती कळली. ज्यू लोकांच्या द्वेशाचा मागोवा घेण्यासाठी हान्स माॅमसेननेही साहित्याची पाने चाळलेली दिसतात. पण हे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. ज्यू लोकांबद्दलचा द्वेश पूर्वीपासूनच अस्तित्वात होता, हे मान्य असले तरी हिटलरच्या उक्ती व त्यावर आधारित  कृतीच्या जबाबदारीतून त्याची सुटका होत नाही. तसा खटाटोप डावीकडे झुकलेल्या हान्स माॅमसेनने का करावा, हा प्रश्न उरतोच.
                         सर्वच हुकुमशहांच्या भोवती गूढतेचे व रहस्याचे वलय असते का?
        हिटलर हे नावही जितके क्रूरपणासाठी प्रसिद्ध आहे तसेच त्या नावाभोवती एक गुढतेचेही वलय आहे. हिटलरची अखेरही इतिहासकार, साहित्यिक व जनसामान्य या सर्वांसाठी एक रहस्यमय बाब राहिली आहे. इव्हा ब्राॅन या प्रेयसीशी मृत्यूच्या थोडेसे अगोदर विवाहबद्ध होऊन त्याने तिला पत्नीपदाचा मान मिळवून दिला, ही बाब त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची परिचायक असल्याचे मानणारेही काही कमी नाहीत. आपल्याकडेही औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे गोडवे गाणारे महाभाग आहेतच की.
     असे असले तरी  हान्स माॅमसेननच्या प्रतिपादनातील दोन मुद्दे महत्त्वाचे आहे.कोणत्याही देशात प्रथम न्यायव्यवस्था कमकुवत होते. नंतर तिच्या जोडीला लोकप्रतिनिधीही निष्प्रभ होतात. त्यामुळे गुन्हेगार प्रबळ होऊन त्यांची जागा घेतात. गुन्हेगारांना शिक्षा होईनाशी होते. हळूहळू सज्जन लोकही त्यांचे समर्थक होतात. आपल्या इथेही अनेक गुन्हेगार निवडून येत असतात, हे आपण पाहतो. पण छोटा राजन आणि अनुप चेतिया सारख्यांच्या मुसक्या बांधणे व कसाब, याकूब व अफजल गुरू सारख्यांना पकडून फासावर लटकवणे या जमेच्या बाजू आहेत, हेही अधोरेखित केले पाहिजे.

No comments:

Post a Comment