Thursday, February 4, 2016

                   एक होता राजा,एक आहे राजा आणि एक होणा राजा
   सौदी अरेबियाचा राजा अब्दुल्ला वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन पावला आणि त्याच्या जागी त्याचा ७९ वर्षाचा सावत्र भाऊ सलमान हा त्या देशाचा सर्वेसर्वा झाला आहे. इस्लामी जगतातील ही घडामोड अनेक कारणांमुळे महत्त्वाची आहे. एक असे की, सौदी अरेबिया हा जगातला पहिल्या क्रमांकाचा खनिज तेल निर्यात करणारा देश आहे. दुसरे असे की, या देशात इस्लामचे सर्वात मोठे धार्मिक केंद्र आहे. या देशाच्य राजाचे  एक वैशिष्ट्य असे आहे की, हा सुधारणावादी होता. अर्थात प्रत्येक वेळी तो जपून पाऊल टाकीत असे. कट्टरवादी घटक बिथरू नयेत, याची तो आपल्या परीने काळजी घेत असे. असे असले तरी त्याच्याविरुद्ध कटकारस्थाने बरीच झाली. ही कारस्थाने करणारे लोक दोन प्रकारचे  होते. एक याला पदच्युत करून सत्ता हस्तगत करण्याची इच्छा असणारे आणि दुसरे सध्या जगभर हैदोस घालणारे अतिरेकी. अब्दुल्ला सुन्नी आणि अतिरेकी सुद्धा सुन्नीच. 
     १९२४ साली किंग फैजल यांच्या अनेक पत्नींपैकी एकीच्या पोटी अब्दुल्ला यांचा जन्म झाला. वडलांच्या कडक शिस्तीत त्यांचे बालपण गेले. शिस्त एवढी कडक की पाहुण्याला आपली खुर्ची बसायला न देता तसेच खुर्चीत बसून राहिल्याबद्दल वडलांनी / राजे फैजल यांनी त्यांना तीन दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. घोड्यावरून रपेट आणि शिकार हे छंद असलेल्या अब्दुल्लांची अंगकाठी धिप्पाड आणि धष्टपुष्ट होती. खनिज तेलामुळे गडगंज संपत्ती पायाशी लोळण घेत असतांना देखील अब्दुल्ला यांना संपत्तीचा मोह नव्हता. १९९५ मध्ये राज् फैजल यांना पक्षघाताचा झटका आला आणि देशाची सूत्रे अब्दुल्ला यांच्या हाती आली मात्र प्रत्यक्षात राज्यारोहण २००५ मध्ये  फैजल यांच्या मृत्यूनंतर झाले. त्यांच्या राजवटीत बुरख्याचा काळा रंग जाऊन रंगीबेरंगी बुरख्यांची चाल 'फॅशन' म्हणून प्रतिष्ठा पावली. संगिताचे सूर देशात प्रथमच टी व्ही रेडिओ वरून ऐकू येऊ लागले. महिलांना लेखन स्वातंत्र्य मिळाले आणि लेखिकांचा स्वतंत्र वर्ग तयार झाला. शाळा, महाविद्यालयात सहशिक्षण सुरू झाले. कट्टर धर्ममार्तंडांचा विरोध अब्दुल्लांनी मोडून काढला.
    अब्दुलाच्या मृत्यूचे कारण जाहीर झालेले नाही. त्याचा सावत्र भाऊ सलमानने चतुराईने आणि चपळाईने हालचाल करून राज्याची सूत्रे हाती घेतली आणि आपला जम बसवत आणला आहे. अब्दुल्लाला न्यूमोनिया झाला होता आणि इस्पिताळात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या भरवशावरच तो तग धरून आहे, अशा वार्ता ऐकू येत होत्या. इस्लामी देशांमध्ये सामान्यत: इतक्या सहजपणे सत्तांतर होत नसते.
         सलमानने सत्ता हस्तगत करताच महम्मदिन नायत याला आपल्यानंतरचे दुसर्या क्रमांकाचे स्थान दिले आणि आपल्या मुलांपैकी एकाला पूर्वी महम्मदिनकडे असलेले संरक्षणमंत्रीपद दिले. आपले पद स्थिर करण्याच्या उद्देशाने सलमानने टाकलेले हे पाऊल कितपत यशस्वी होते, हे काळच दाखवील.
         दरम्यानच्या काळात तेलाचे उत्पादन कमी होऊन किमती वाढतील की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. एकेकाळी  तेलाची किंमत १०० रुपये प्रति डॅालर होती. ती ५० रुपये प्रति डॅालर झाल्यामुळे भारताचे परकीय चलन बर्याच प्रमाणात वाचले. आता किमती पुन्हा वाढल्या तर? पण अनेकांनी ही शंका फेटाळून लावली आहे. त्याचे म्हणणे असे आहे की, ज्या कारणांमुळे तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, ती कारणे जोपर्यंत कायम राहतील, तोपर्यंत खनिज तेलाच्या किमती वाढणार नाहीत.
       अब्दुल्लाने विद्यापीठस्तरावर सहशिक्षण सुरू केले होते. याबाबत कट्टर सनातन्यांनी खूप ओरड केली. हे केवळ पापच ( सिन) नाही तर हा दुष्टावा (इव्हिल) आहे, असे म्हणत जगभरातले कट्टर सनातनी संतापले. इस्लामधर्मीय अगोदरच सनातनी, त्यातही सुन्नी संप्रदायाचे अनुयायी आणखी सनातनी! या शिवाय सौदी अरेबिया मधील इस्लाम धर्मीय आणखीनच सनातनी!! इस्लामची अति पवित्र धर्मस्थाने सौदी अरेबियात आहेत. तिथे सहशिक्षण देणारे विद्यापीठ. यापेक्षा आणखी मोठा धार्मिक भ्रष्टाचार तो कोणता?
        अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशिल हे सौदी अरेबियात दुखवटा व्यक्त करण्यासाठी गेले असतांना मिशिल यांनी 'डोक्यावर पदर' घेऊन ते झाकले नाही म्हणून मोठा गहबज झाला होता. यावरून रूढी/परंपरा/कर्मकांड यांचे जोखड झुगारून देणे किती कठीण असते, हे लक्षात यावे. पण परिवर्तन हा युगाचा धर्मच आहे. त्यातून इस्लामही सुटला नाही/ किंवा सुटणार नाही. 
                                    राजा दुसरा व तिसरा
      सगळे कट्टर दहशतवादी आणि इसीसची सेना इराक नंतर सौदी अरेबियाकडे वळणार, हे जाणून/हेरून अब्दुल्लाने या दोन्ही कट्टरपंथीयांविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या मोहिमेला सक्रीय पाठिंबा दिला होता. हे दोन्ही (इसीस आणि सौदी अरेबिया) घटक सुन्नी पंथीय असूनसुद्धा एकमेकाविरुद्ध का लढत आहेत, ते सहज लक्षात येत नाही, ते यामुळेच. इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथात जे सांगितले आहे तेच सत्य आहे, तसेच ते अपरिवर्तनीय आहे, असे कट्टर दहशतवादी कितीही म्हणत असले तरी परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. परिवर्तनाची गती कमी करता येईल एकवेळ. पण ती पूर्णपणे थांबवू शकतील असे कट्टरपंथीय अजून जन्माला यायचे आहेत. ते बहुदा कधीच जन्माला येणार नाहीत. पण आजही कट्टर पंथीय जो हैदोस घालीत आहेत, तोही काही कमी नाही. 'एक होता राजा' ही कथा इथे संपते. आता सलमान यांची सत्ता सुरू होते आहे. म्हणजेच 'एक होता दुसरा राजा' या कथेचा आरंभ होतो आहे. ही कथा केव्हा आणि कशी संपणार ?  सलमान राजनीतिज्ञ मानले जातात. राजघराण्यात एकी कायम रहावी यासाठी त्यांची धडपड असते. इसीसवर हल्ले चढवण्याचे कामी ते अमेरिकेसोबत सहभागी झाले होते. पण पक्षाघाताने त्यांचा डावा हात कमजोर झाला आहे.त्यांनी राजपुत्र मुक्रीन यांना वारसदार म्हणून घोषित केले आहे. अशाप्रकारे भावी तिसर्या राजाची घोषणा झाल्यानुळे सौदी अरेबियातील राजवंश निश्चित झाला आहे.
      पण इसीस पेक्षाही भयंकर संघटना आता प्रभावी ठरणार अशी चिन्हे आहेत. या कट्टरपंथीय इस्लामी संघटनेचे नाव आहे, हिब्ज- उत- तहरीर ( एच यु टी ). इसीस ही तशी अडदांड संघटना आहे. तर हिब्ज- उत - तहरीर ही संघटना अधिक जहाल असली तरी हुशार आणि चाणाक्ष आहे. ती इसीस प्रमाणे धसमुसळेपणा करीत नाही. ही पाकिस्थान आणि बांग्लादेश यात पसरत आहे. हिचे सदस्य इसीसपेक्षा संख्येने कितीतरी जास्त आहेत, एवढेच नव्हे तर ते रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्रे वापरण्यात तरबेज आहेत.
***गृहमंत्री बिन नायफ यांच्या नावाची घोषणा
वृत्तसंस्था
रियाध, २९ एप्रिल
सौदी अरबचे नरेश सलमान बिन अब्दुल्ला अजिझ यांनी आज बुधवारी आपला वारसदार बदलला आहे. भविष्यातील आपले वारसदार म्हणून सौदी नरेशांनी गृहमंत्री मोहंमद बिन नायफ यांचे नाव जाहीर केले आहे. यामुळे या देशात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरबचे नरेश अब्दुल्ला यांच्या निधनानंतर सलमान बिन अब्दुल्ला अजिझ यांनी जानेवारी महिन्यात सत्तेची सूत्रे स्वीकारली होती. तीन महिन्यातच राजे अजिझ यांनी वारसदार बदलून नाट्यमय बदल घडवून आणला आहे. वारसदाराच्या शर्यतीत राजे अजिझ यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमान आघाडीवर होता. पण, त्यांना दुसर्‍या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. सौदीच्या शासकीय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. सौदी नरेशांनी ५५ वर्षीय मोहम्मद बिन नायफ यांना वारसदार म्हणून घोषित करीत त्यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारीही कायम ठेवली आहे. सोबतच ते सौदी नरेशांच्या राजकीय आणि सुरक्षा समितीचे प्रमुखही राहणार आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे.


***

महादरवाजाची उभारणी सुरु 

तारीख: 29 Apr 2015 15:59:13
वृत्तसंस्था
पनमा सिटी, २९ एप्रिल

पनामा कालव्यातील जलप्रवाह नियंत्रित करण्यासाठी शेकडो कोटी डॉलर्स खर्च करून उभारण्यात येणार्‍या १६ महादरवाजांपैकी अंतिम दरवाजा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. प्रशांत महासागराच्या बाजूच्या प्रवेशावर हा ४ हजार २३२ टन एवढ्‌या वजनाचा हा महादरवाजा काल मंगळवारी बसविण्यास सुरवात करण्यात आली.
पनामा कालव्यातून वाहतूक करणार्‍या जहाजांची सध्याची क्षमता अडीच पटींनी वाढविण्यासाठी या कालव्याच्या मार्गाचे विस्तारीकरण करावयाचे आहे. पनामाने २००६ मध्ये हा कालवा अधिक रुंद करण्याचा निर्णय घेतला होता. युरोपीयन बांधकाम कंत्राटदारांमधील दरांच्या स्पर्धेमुळे हे काम रखडले होते, त्यामुळे एप्रिल २०१६ मध्ये विस्तारित कालवा सुरु करण्याचे नियोजन बारगळले होते.
या दरवाजामुळे पनामा कालव्याच्या विस्ताराला आगामी काही दिवसांमध्ये सुरवात होणार आहे.
आपली एखादी वस्तू दान करणं सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तुमचं मन खूप मोठं असावं लागतं. 'दाता भवति वा न वा', ही उक्ती आजच्या काळात तर अगदीच समर्पक ठरते. पैसा कसा कमवता येईल, साठवता येईल आणि पैशातून पैसा कसा निर्माण करता येईल, हेच आज अनेक धनाढ्य मंडळींचं ध्येय आहे. परंतु, सौदी अरेबियाचे राजे अलवलीद बिन तलाल यांनी आपली तब्बल २ लाख कोटींची संपत्ती जनतेच्या भल्यासाठी, गरीब-गरजूंसाठी दान करण्याची घोषणा करून मनाच्या श्रीमंतीचंच दर्शन घडवलं आहे. 

प्रिन्स तलाल हे जगातील ऐश्वर्यवंतांपैकी एक. वडिलांकडून वारसाहक्कानं मिळालेली संपत्ती त्यांनी हुशारीनं, चिकाटीनं वाढवली. त्यांच्या मालकीच्या किंगडम होल्डिंग कंपनीकडे आज फेसबुक, अॅपलसह अनेक मोठ्या कंपन्या आणि बड्या हॉटेलांचे समभाग आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३२ अब्ज डॉलर, म्हणजेच २ लाख कोटी रुपये इतकी आहे. हा सर्व पैसा समाजाच्या हितासाठी दान करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जनहिताच्या कामांसाठी, सेवाभावी संस्थांसाठी उदारहस्ते मदत करण्यासाठी ते ओळखले जातातच; पण सर्व संपत्तीच दान करण्याचं जाहीर करून त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. या निर्णयामुळे ते वॉरेन बफे, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, मायकल ब्लूमबर्ग या दानशूर लक्ष्मीवंतांच्या यादीत जाऊन बसलेत. 



शाळा - अनाथाश्रमांची उभारणी, आरोग्याबाबत जनजागृती, रोगनियंत्रणाच्या मोहिमा, दुर्गम गावांमध्ये वीज पोहोचवणं, महिला सशक्तीकरण यासारख्या कामांसाठी आपल्या संपत्तीचा विनियोग केला जावा, अशी राजा तलाल यांची इच्छा आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना ते अर्थसाहाय्य करणार आहेत. रियादमध्ये त्यांनी ही घोषणा केली, तेव्हा त्यांची दोन मुलंही उपस्थित होती. नेमक्या किती कालावधीत ही संपत्ती दान करणार, हे निश्चित केलेलं नाही. पण योग्य नियोजन करून येत्या वर्षात समाजाच्या हितासाठीच हा पैसा दिला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

No comments:

Post a Comment