Wednesday, February 3, 2016

अमेरिकेतील ओसाडवाडी - सेंट्रालिया.

    अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील कोलंबिया काउंटी ( जिल्हा)मधले लोकसभेत प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार असलेले गाव(मतदार संघ) सिंट्रालिया. १९६२ पर्यंत या गावी जवळपास १ हजार १०० लोक रहात असत. २००९ साली या ठिकाणाला आम्ही भेट दिली तेव्हा जेमतेम ८/१० लोक येथे रहात होते. त्यांनी हे गाव सोडण्यास नकार देऊन इथेच ठिय्या मांडला होता.  आज या गावाची ओसाडवाडी झाली आहे. याला न आहे झिपकोड ( पिनकोड) क्रमांक न इथे आहे टपाल सेवा. घरे इमारती जमीनदोस्त करण्यात आली आहेत. रस्ते नावाला
 आहेत पण ते कुठेही 'जात' नाहीत. पूर्वी सारखी दुकाने नाहीत, शाळा नाहीत. भुतांशिवाय इथे आणखीही कुणी राहत तर नाहीना, हे जाणून घेण्याच्या इच्छेपोटी या गावाला आम्ही भेट देण्याचे ठरविले. २००९ साली वाट चुकलो होतो. थोडी वळणे व वळसे घ्यावी लागली होती. पण या वेळी तसे झाले नाही. आमची गाडी मुक्काम पोस्ट ( चुकलो ना मुक्काम ना पोस्ट असलेल्या) ओसाडवाडीच्या- सेंट्रालियाच्या - बाह्य परिधीवर येऊन थडकली.
 सेंट्रालिया हे एकेकाळी कोळशाची खाण असलेले गाव होते. हे गाव १९६२ साली खाणीत भडका उडून आगीच्या भक्षस्थानी पडले. गावाचा फार मोठा भाग जून बेचिराख झाला. बहुदा कचरा जाळण्यासाठी पेटवलेली आग तशीच धुमसत राहिली असावी. ती पुरतेपणी न बुजवलेल्या खाणीच्या मुखापर्यंत पोचली असावी आणि एकच भडका उडाला. आग विझवण्याचे अटोकाट प्रयत्न झाले पण व्यर्थ! अजूनही येथे धुराचे लोट जमिनीतून वर येतांना दिसतात. असा भूभाग चारशे एकर पसरला आहे आणि आजच्या अंदाजानुसार आणखी २५० वर्षेतरी असाच धुमसत राहणार आहे. या घटनेवर सायलेंट हिल या नावाची व्हिडिओ गेम मालिका आणि चित्रपट बेतलेले आहेत.
१९६२ साली या गावावर हे अरिष्ट ओढवले पण लोकांनी गाव सोडले नाही. ते चिवटपणे टिकून राहिले. पण १९७९ मध्ये धोक्याचा पहिला इशारा मिळाला .पेट्रोल साठवायच्या टाकीतील पेट्रोलचे उष्णतामान ५५ डिग्री फॅरेनहाईट असले पाहिजे ते १७२ अंशापर्यंत वर गेलेले दिसले. एक लहान मुलगा खेळत होता. त्याच्या पायाखालची जमीन खचली.किती म्हणून विचाराल तर १४७ फूट! हे पुरेसे नव्हते म्हणून की काय सेंट्रालिया गावातून जाणारा  हाय वे ६१ जागोजागी उखडू लागला, खचू लागला. दुरुस्त केला की लगेच खचायचा? आता भूपृष्ठाखालून कार्बन माॅनो ॲाक्साईड हा विषारी वायू बाहेर पडू लागला. लोकांचे घसे खवखवू लागले. लोकांनी शासकीय मदत स्वीकारून  गाव सोडण्याचा निर्णय घेतला. शेजारची गावे चांगली सुस्थितीत होती केवळ काही अंतरावर जे घडत होते, त्याचा मागमूसही जाणवत नव्हता. हळूहळू रस्ते सारखे सारखे उखडू लागले. दुरुस्तीचा खर्च परवडेना. पुन्हा धोका काही कमी होत नव्हता.शेवटी १९९४ मध्ये हाय वे चा तेवढा हिस्सा राडा रोडा टाकून कायमचा बंद करण्यात आला. आता हा रस्ता सेंट्रालियाला वगळून( बायपास करून) जातो.      
           अर्थात उखडलेल्या व उंच सखल खडबडीत रस्यावरून थोडे फार चालण्याचा तयारी असेल मूळ गावापर्यंत पोचता येते. या मार्गाला 'ग्रॅफिटी हाय वे' म्हणतात. कारण जागोजागी बालगोपालांनी केलेल्या रंगीत  चित्रकृतीच्या खुणा दिसत असतात. जागोजागी भेगा पडलेल्या आहेत. त्यातून सतत धूर येत असतो. वासाने मळमळायला होते. सर्वत्र पडझड दिसत होती पण दफनभूमी मात्र अगदी जशीच्या तशी आहे, असे ऐकले. निसर्गालाही तिची आवश्यकता जाणवली असावी, म्हणूनच बहुदा एवढा प्रकोप होऊनही तो तिच्या वाटेला गेला नसावा. एरवी कुठेही न जाणारे रस्ते आणि ओसाड माळरान याशिवाय फारसे काही दिसत नाही. २००८ मध्ये याच ठिकाणी वीज वाहून नेणारा खांब, रेल्वे यार्ड, रेल्वे वॅगन्स तशीच सोडून दिलेली घरे दिसत होत. यावेळी ती दिसली नाहीत. कदाचित यावेळी आम्ही त्या नेमक्या जागी आलो नसू. त्यावेळी काही लोक हट्टाने तिथेच रहात होते.यावेळी २०१५ मध्ये ते दिसले नाहीत. असे म्हणतात की एक महिला पोलीस आपल्या व्हॅन मधून अधूनमधून फेरफटका मारते आणि कुणी फोटो काढतांना दिसला तर त्यालाते फोटो डिलिट करायला लावते. आम्हाला अशी महिला दिसली नाही. त्यामुळे २००८ मध्ये काढलेले धुराचे फोटो आमच्याजवळ आहेत. यावेळी धूर निघतांना दिसत नव्हता. नुकताच पाऊस पडलेला असेल तर असा धूर येतो, असे म्हणतात. धुराचा फोटो घेता आला नाही म्हणून आम्ही खट्टू झालो. पण लगेच मनात विचार आला, की काय गंमत आहे पहा, इथे एक अख्खे गाव बेचिराख झाले होते, होत्याचे नव्हते झाले होते आणि आम्ही त्या अग्निकांडाच्या धुमसत्या खुणा नोंदवता आल्या नाहीत, म्हणून नाराज झालो होतो. यालाच का जीवन ऐसे नाव आहे?

No comments:

Post a Comment