Wednesday, February 3, 2016

                                                      चीन बदलेल का? कधी?
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
        बिजिंग ही चीनची राजधानी. एकेकाळी संपूर्ण शहराभोवती संरक्षक भिंत होती. पण शहराचा विस्तार जसजसा होत गेला तसतशी भिंतीची अडचण होऊ लागली. आज त्याच जागी शहराला गवसणी घालणारा रिंग रोड आहे. तो किती काळ टिकतो हे पहायचे. हाय या मुख्य नदीला तीनतीन उपनद्या मिळतात. पण तरी पाण्याचा तुटवडा. म्हणून यांगसी नदीचे काही पाणी वळवून ही तूट भरून काढण्याचा प्रयत्न झाला. जुनी राजवट जाऊन साम्यवादी राजवट आली. हिची पकड कायम रहावी आणि जगाला काय चालले आहे, ते कळू नये, म्हणून उभारलेला गुप्ततेचा पडदा बांबू कर्टन म्हणून ओळखला जातो. याची पकड खिळखिळी व्हावी म्हणून सतत प्रयत्न होत आहेत, लढे लढले जात आहेत. हे लढे केव्हा व कसे यशस्वी होतील, ते सांगणे कठीण आहे. त्यापैकी एका लढ्याची ही कहाणी.
        लढवैय्या पू झिकियांग
    या कहाणीचा नायक आहे पू झिकियांग. कोण आहे हा पू झिकियांग? हा आहे एक लढवैय्या. याच्या लढ्याचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. प्राप्त परिस्थितीनुसार लढ्याचे स्वरूप कसे बदलते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. पू झिकियांग यांना अडकवण्याचे आजवर तीन जोरदार प्रयत्न झाले. तिसऱ्या वेळी त्यांना दोषी ठरवण्यात आले. ‘राष्ट्राच्या एकात्मतेला बाधा आणण्यासाठी जनतेस चिथावणी देणे’हा आरोप योग्य ठरवीत न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली. पण काय आश्चर्य? न्यायालयानेच ती स्थगितही केली. ही टांगती तलवार त्यांना आवर घालू शकेल या कल्पनेने की आणखी कशामुळे? म्हणजे जागतिक स्तरावर त्यांना असलेली मान्यता व प्रसिद्धी माहित असल्यामुळे चिनी प्रशासन धजावले नाही, यामुळे? ज्याने त्याने आपला निष्कर्ष काढावा.
         असे लढे, असे विजय
       अनेक महत्त्वाच्या प्रकरणी पू यांनी शासनाला जेरीस आणले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शासनाच्या विरोधात लेखन करणाऱ्या लेखकांच्या व पत्रकारांच्या केसेस लढवणे यामुळे चिनी सत्ताधीशांची त्यांच्यावर खप्पा मर्जी होत गेली पण तसतशी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळत गेली. त्यांचे वकिली चातुर्य जगभर वाखाणले जाऊ लागले. पू यांनी केलेली उलट तपासणी आटोपताच न्यायाधीशांचे मत बदलल्याचे जाणवू लागले. ‘खटला शेवटाला गेला तेव्हा फिर्यादी शासन व कम्युनिस्ट पक्षच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झाले आहेत, असे जाणवले’, या शब्दात वाॅशिंगटन पोस्टने पू यांची पाठ थोपटली. चायना रिफाॅर्म मॅगॅझीन प्रकरणी तर पू यांनी इतिहासच घडवला. पत्रकार जोपर्यंत विश्वसनीय सूत्राचा आधार घेऊन लिहीत आहेत, त्यांचे लिखाण केवळ ऐकीव माहितीवर आधारित आहे, असे सिद्ध होत नाही किंवा त्यांनी एखादी बातमी कल्पनेनेच रचली आहे, असे सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना अभय मिळालेच पाहिजे, असा सुस्पष्ट निर्णय न्यायालयाने दिला आणि पू यांच्या वकिली चातुर्याला व हिंमतबाजपणाला जगभर दाद मिळाली.
      चौकशीचा ससेमिरा
       २०१४ च्या मे महिन्यात गोंधळ माजवण्याच्या आरोपाखाली पू यांना अटक करण्यात आली होती. विषय तसा खूपच जुना होता. पण खदखद शमली नव्हती. तिआनान्मेन चौकातील १९८९च्या निदर्शनांची चौकशी करा, ही मागणी करणाऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन केले, म्हणून ही अटक करण्यात आली होती. सोबत आणखी चार वकीलही होते. पू यांची कसून तपासणी करण्यात आली. त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील सर्व तपशील शोधून शोधून करून अगदी डोळ्यात तेल घालून बघण्यात आले. त्यांचे लिखाण अगदी लहानलहान टिपणे सुद्धा या तपासणीतून सुटली नाहीत. संगणकही जप्त केले. गणगोतासकट सर्व परिचितांच्याही जबान्या घेण्यात आल्या.पण देशद्रोह, लैंगिक गैरवर्तणूक किंवा भ्रष्टाचार यांचा मागमूसही दिसला नाही.नाही म्हणायला काही ‘ब्लाॅग पोस्ट’ भडकावू आहेत, असा आळ तेवढा घेता आला. खटला न्यायालयात टिकू शकला नाही तरीही या नाही त्या निमित्ताने त्यांना तुरुगांत डांबण्यात आले.
     पीडितांचा तारणहार
     अंदरकी बात वेगळीच होती. आई वाई वाई ह्या नावाच्या कलाकाराने कर वसूली खात्याविरुद्ध तक्रार गुदरली होती. तसेच तांग हुई नावाच्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना किरकोळ शिक्षा देऊन सोडण्यात आले होते. एवढेच नव्हे तर तिला शरीरविक्रय करण्यास भाग पाडले गेले. मुलीवरचा अन्याय सहन न होऊन तांग खवळून उठली. ती न्यायालयांचे दरवाजे ठोठावत राहिली. पण  तिलाच १८ महिन्यांसाठी श्रम छावणी सदृश सुधारगृहात पाठवण्यात आले. समाजमन खवळून उठले. श्रमांच्या आधारे व्यक्तीत सुधारणा करण्याची तरतूदच रद्द करावी, ह्या मागणीने त्सुनामीचे रूप धारण केले. ह्या प्रकरणी वकीलपत्र घेणाऱ्यांच्या चमूत पू आघाडीवर होता. बो झिलाई हे चीनच्या साम्यवादी पक्षातील एक बडे धेंड आहे. त्यांची टर उडवणारी कविता फॅंग हाॅंग नावाच्या कवीने केली होती. या गुन्ह्यासाठी त्याची एक वर्षासाठी श्रम छावणी सारख्या सुधारगृहात पाठवणी करण्यात आली होती. तेवढ्यात बोचे पितळ उघडे पडले. तो भ्रष्टाचारी ठरला. फॅंगनेउघड झालेल्या या माहितीचा आधार घेऊन आपल्यावरील सर्व आरोपांची पुन्हा सुनावणी व्हावी, अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर नुकसान भरपाईचीही मागणी केली. हे प्रकरण वकील या नात्याने पू यांनी हाताळले होते.
       प्रतिपादन शैलीचे वैशिष्ट्य
      पू यांचे ब्लाॅग्ज जगभर वाचले जातात. त्यांची स्वत:ची अशी वेगळी व स्वतंत्र शैली आहे. त्यांची वक्रोक्तीयुक्त लेखनशैली या प्रकारच्या लेखनाचा मापदंड ठरावा. त्यांची छोटी छोटी वाक्ये वाचून ते लेख लिहीत नाहीत तर ’ ट्विट करीत आहेत, असे वाटते. त्यामुळे वाचक ती हमखास वाचतातच. चिनी सेंन्साॅर यंत्रणेला दोष दाखवता येणार नाही पण मुद्दा तर नजरेआड होणार नाही, असे लिखाण पू यांनीच करावे, असे म्हणतात, ते उगीच नाही. त्यांचे ब्लाॅग वाचणाऱे हजारोच्या  संख्येत आहेत.अनेकदा सेंन्साॅरने त्यांचे ‘अकाऊंट’ डिलिट केले आहेत. पण दुसऱ्याच दिवशी त्यांचे ‘पुनश्च हरिओम ‘सुरू झालेले दिसते.
     चीन व अमेरिकेची जुगलबंदी
   ६ मे २०१५ अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने एक परिपत्रक जारी केले. चीनने पू झिकियांग यांना मुक्त करण्याची सूचना वजा मागणी केली. मानवाधिकारांच्या बाबतीत चीनने बांधिलकी स्वीकारली आहे ती बघता हे आवश्यक आहे, याची आठवण चीनने अमेरिकेला करून दिली. लगेच दुसऱ्या दिवशी चीनचे प्रवक्ते हुवा च्युन्यांग यांनी परतफेड करीत सुनावले की, अमेरिकेतील काही लोकांची मने खूपच विशाल असून आपले हात लांबवर पोचलेले आहेत, असा त्यांचा भ्रम आहे. वाॅशिंगटनने घरात जरा डोकावून पहावे आणि आपल्या देशात मानवी हक्कांची दशा काय आहे, हे पहावे. आपल्या पायाखाली काय जळते आहे हे न पाहता आपणच जागतिक स्तरावरचे रखवालदार (वर्ल्ड्स पोलिसमन) किंवा न्यायमूर्ति आहोत, असा आव आणून उठसूठ इतरांच्या घरगुती प्रश्नात नाक खुपसण्याचे थांबवावे.
    असे कोणते प्रकरण होते की, ज्या निमित्ताने ही जुगुलबंदी जगाला पहायला मिळाली ? पू झिकियांग यांच्यावर खटला भरण्यात आला होता. त्यांनी ‘आॅन लाईन’ टिप्पणी करून सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर टीका केली होती. २२ डिसेंबर २०१५ ला तातडीने निकाल लागला. विद्रोही भाव निर्माण करणे, वांशिक द्वेश निर्माण होतील, अशाप्रकारे लोकांना उचकावणे, या गुन्ह्यांसाठी त्यांना देशी धरण्यात आले. तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पण ती अगोदर सांगितल्याप्रमाणे स्थगित ( सस्पेंड) करण्यात आली.
      शिक्षा स्थगित करण्यामागे काय कारण असावे? पुढे काय वाढून ठेवले आहे, ते लक्षात ठेवून संबंधिताने आपल्या वर्तनात सुधारणा करावी, हे चिनी प्रशासनाला सुचवावयाचे असावे. तसेच जागतिक मत आपल्या विरुद्ध खवळून उठू नये, याची ही तजवीज असावी. अमेरिकेने तर आवाई उठविलीच होती.जागतिक स्तरावरच्या लेखक, विद्वत्जन, कार्यकर्ते आणि कायदेविषयक तज्ञांनी पू झिकियांग यांना २०१६ सालासाठीचे पारितोषिक जाहीर करून एकप्रकारे प्रत्युत्तर दिले. अमेरिकेतील कोलंबया विद्यापीठाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जागतिक मान्यता असलेले हे पारितोषिक आहे.
   चिनी न्यायव्यवस्थेवर टिप्पणी
    वांग तियानचेंग हे चीनमधले एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी झोऊ येझाॅंग नावाच्या कायद्याच्या प्राध्यापकावर आपल्या लिखणातील ५००० शब्द चोरल्याचा आरोप ठेवून त्यांना न्यायालयात खेचले. न्यायालयाने हा आक्षेप ग्राह्य धरला पण ही उचलेगिरी क्षुल्लक ठरविली. यावेळी पू नी वृत्तपत्रात टिप्पणी केली की, ‘न्यायालयाचा निर्णय
राजकीय भूमिकेतून प्रभावीत आहे’.
                                                       चीन बदलेल का? कधी?
      पू यांनी इतिहास, राज्यशास्त्र व कायदा या विषयातील पदवी संपादन केली आहे. ते साम्यवादी कधीच नव्हते. ते प्रारंभापासूनच लोकशाही चळवळीशी जुळले होते. तिआनान्मेन चौकातील निदर्शने व दहा हजार  निदर्शकांचे शिरकाण १९८९ सालचे. पण मित्रमंडळी व संबंधित कुटुंबीय यांच्या सोबत तेव्हापासून दरवर्षी न चुकता ते या स्थळाला ‘त्या’ ते भेट देत असतात. हे सर्व चिनी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. चीन कधितरी बदलेल का? दमनचक्र थांबून लोकशाहीची पहाट कधितरी उगवेल का? असे बदल बाहेरून घडवून आणता येत नसतात. हा उठाव आतूनच व्हावा लागतो. तो केव्हा होईल, हे सांगणे कठीण आहे. पण जेव्हा केव्हा होईल, तेव्हा त्याचा त्याची मुहूर्तमेढ रचणारे म्हणून ज्यांचा ज्यांचा उल्लेख होईल, त्यांच्या यादीत पू झिकियांग यांचे स्थान फार वरचे असेल यात मात्र शंका नाही.


No comments:

Post a Comment