Thursday, February 4, 2016

                        *   द रेड सारी अर्थात लाल साडी 
    आपल्या जीवनकाळात आपल्यावरच एखादी कादंबरी लिहिली जावी हा योग किती  व्यक्तींच्या आयुष्यात आला असेल बरे? त्यातून ही व्यक्ती एक महिला आहे. तिची जीवनगाथा एखाद्या परीकथेसारखी आहे, असे काहींना वाटते तर काही या विधानाशी अंशत:च सहमत आहेत.कारण परीकथेत शेवटी कसं सगळं चांगलं चांगलं होत. या कथेच तसं नाही. परीकथेत तिला शेवटी तिच्या आवडीचा राजकुमार भेटतो आणि कथा संपते. पुढे काय होतं, याची उत्सुकता कुणालाच नसते. यानंतर त्यांनी सुखाने आणि गुण्यागोविंदाने संसार केला अशी पुस्ती काही कथाकार किंवा कादंबरीकार जोडत असत. पण वाचकांनी हे गृहितच धरलेलं असे. पणप्रत्यक्ष जीवन असे नसते. आजकाल तर अनेक कथा कादंबर्यांची सुरवातच मुळी नायक नायिकेच्या मीलनानंतर सुरू होते. ते असो.
          या कादंबरीमुळे फार मोठे वादळ उठले होते. या कादंबरीच्या बाजारातल्या प्रती परत बोलवा, कादंबरीवर बंदी घाला या त्यातल्यात्यात सौम्य मागण्या म्हटल्या पाहिजेत. बिचारा कादंबरीकार कुणाचीही बदनामी करण्याचा आपला हेतू नाही/नव्हता, असे कंठरवाने ओरडून सांगत होता. पण कुणी ऐकेल तर शपत. शेवटी २०१५ च्या जानेवारी महिन्यात ही कथा कादंबरी रूपाने उपलब्ध झाली आणि तिच्यावर वाचकांच्या एकच उड्या पडल्या.
                              नमनालाच घडाभर तेल 
     नमनालाच घडाभर तेल लागले असे काहींना वाटण्याची शक्यता आहे. पण नमन नीट झालेलेच बरे नाही का? तेलाचे काय घेऊन बसलात? या कादंबरीचा लेखक एक प्रसिद्ध कादंबरीकार, पटकथालेखक, चित्रपटनिर्माता आहे. जगातील सतरा भाषात त्याच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. त्याने ही कादंबरी स्पॅनिश भाषेत लिहिली आहे. लेखकाचे नाव आहे हाविए मोरो. या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद भारतात आज उपलब्ध झाला आहे. यात नाट्यमयता (नाटक की कादंबरी) जरा जास्त आहे, असे म्हणतात. पण ही तुलना करायला स्पॅनिश भाषा यायला हवी. 
                      लाजरी बुजरी मुलगी ते प्रभावशाली महिला
      या कादंबरीची नायिका आहे एक इटालियन युवती, सोनिया मायनो. तिच्या पित्याची आपल्या तीन मुलींवर करडी नजर असे. मधल्या सोनियाला तो विशेष जपत असे. आपली ही लाजरी बुजरी मुलगी भारतातील एका शक्तिशाली घराण्यातील युवकाच्या प्रेमात पडल्याचे कळताच तो अतिशय निराश झाला. वयाच्या अठराव्या वर्षी एखाद्या सामान्य मुलीसारखी ती  १९६५ साली ती केम्ब्रिजला जायचे ठरविते काय, तिथे राजीव गांधी या तरुणाशी तिची गाठ पडते काय आणि पुढे सामान्य कादंबर्यात जे घडते ते घडून ती दोघे विवाहबद्ध होतात काय, हे सर्व त्या पित्यासाठी अनाकलनीय होते.  ह्याच सामान्य मुलीने (महिलेने) २००४ साली भारतात सत्तांतर घडवून आणले, हा चाळीस वर्षांचा कालखंड या कादंबरीत रेखाटलेला आढळतो.  बांग्लादेश युद्ध, आणीबाणी आणि आॅपरेशन ब्ल्यू स्टार  यांच्या पार्श्वभूमीवर नेहरु-गांधी घराण्यातील जीवनक्रम लेखकाने कल्पनेने रंगवलेला आहे, यावर विश्वास बसत नाही. आज भारतातातच  नाही तर संपूर्ण जगात एक प्रभावशाली महिला म्हणून तिचा सार्थ लौकिक आहे. एक विशेष उल्लेख करण्याची बाब अशी आहे की, या कादंबरीत सोनियांच्या नजरेतून नेहरु-गांधी घराण्याचा इतिहास मांडलेला तरी लेखकाचे सोनियांशी किवा नेहरु-गांधी घराण्यातील कोणाशीही कसल्याही प्रकारचे बोलणे कधीही झालेले नाही. त्यामुळे ही कलाकृती परीकथेच्या सदरात टाकावी तर तिला वास्तवाचा भरभक्कम आधार आहे. असे काही लिखाण होते आहे याची कल्पना स्वत: सोनिया यांना किंवा आणखी कुणाला नसणार. तरीही प्रथमपुरुषी एकवचनी लेखन प्रकाराशी मिळता जुळता हा लेखनप्रकार हेही या कादंबरीचे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे.
    या कादंबरीची कथानायिका सोनिया एका सामान्य कुटुंबात जन्मलेली आहे. नियतीने तिला एका असामान्य घराण्याची सून बनविले आहे. या घराण्याची (नेहरु-गांधी घराणे) तुलना एखाद्या आधुनिक राजघराण्याशीच करायला हवी. विशेष म्हणजे भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील राजवटीवर साठ वर्षे या घराण्याची सत्ता होती. या सुनेवर एकापाठोपाठ एक आघात होत गेले. ते तिने समर्थपणे झेलले. ती स्वत:ची इच्छा नसतानाही (जे तिचे कधीही क्षेत्र नव्हते ) राजकारणात शिरते आणि असामान्य कर्तृत्व दाखवते. कथेच्या नायिकेच्या बाबतीत जे नाट्य अपेक्षित आहे ते या नायिकेचे जीवननाट्य आहे. या कादंबरीचे हेही एक वैशिष्ट्य आहे. लेखकाचे वैशिष्ट्य असे की, हे वास्तव त्याने जगाला उपलब्ध नसलेली अन्य कोणतीही जास्तीची माहिती त्याच्या संग्रही नसतांना कल्पिताच्या आणि कल्पकतेच्या आधारे रंगवले आहे.
                लेखकाचा कल्पना विलास
    नेहरु-गांधी कुटुंबीय असोत किंवा आणखी कोणतेही कुटुंबीय असोत, वैयक्तिक पातळीवर चारचौघांसारखेच वागणार. त्यावेळच्या भावना रंगवतांना कल्पिताचाच आधार घ्यावा लागणार. यासाठी कथानायिकेच्या अंतर्मनात डोकावण्याची किमया लेखकाला कितपत साधते यावर कादंबरीचे यश अवलंबून असते. कोणतीही कादंबरी वाचनीय होते ती लेखकाच्या या कौशल्यामुळे. कादंबरीचा कॅनव्हास भव्य आहे. उत्तुंग व्यक्तिमत्वे राजकीय डावपेचात आणि साठमारीत दंग आहेत. पण कादंबरीत ते वावरतात आजोबा, पिता,पुत्र, नातू किंवा आजी,आई, कन्या, नात या कौटुंबिक स्वरुपात. या निमित्ताने अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्र या नाटकातील  पात्रांची आठवण होते. कृष्णार्जुनादी महाभारतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे अण्णासाहेबांनी अक्षरश: माजघरात आणून बसवली आहेत. लेखकानेही असाच काहीसा प्रकार केला आहे. 
      या कादंबरीत तसे अनेक नायक, नायिका आहेत. खलनायक व खलनायिका आहेत.  सध्या मल्टिस्टारचा जमाना आहेना तसाच काहीसा प्रकार म्हणाना. जवाहरलाल, इंदिरा, राजीव, सोनिया हे सज्जन तर संजय, मनेका दुर्जन ! जनता पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे नेते वाईट अशी भूमिका घेण्यावाचून लेखकासमोर दुसरा उपायच नव्हता.
                        लेखकाने वास्तवाशी इमान
    पण एकंदरीने लेखकाने वास्तवाशी इमान राखलेले आहे. इंदिरा गांधींचे संजय बाबतचे आंधळे पुत्रप्रेम, भ्रष्टाचारी सहकार्यांना सांभाळून घेण्याचा स्वभाव लेखकाच्या नजरेतून सुटलेला नाही. कविगत स्वातंत्र्याचा आधार घेत लेखकाने सोनिया गांधी मात्र आदर्श सून, पत्नी आणि माता म्हणून दाखविल्या आहेत. राजीव गांधींची हत्येच्या रूपाने सोनियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. राजीवजींच्या चितेकडे पाहतांना सतीच्या क्रूर आणि पाशवी चालीचा निषेध करणार्या सोनियांच्या मनात चितेला जवळ करण्याचा विचार येऊन गेला, अशी कल्पना लेखकाने केली आहे.
               ' आमच्याबद्दल लिहिलेलं आम्ही कधीच वाचत नसतो'
      हे सर्व ठीक आहे. पण लाल साडी आली कुठून? तिचा या सर्वाशी काय संबंध? पंडित नेहरू तुरुंगात असतांनाची गोष्ट. त्यांनी कातलेल्या सुतापासून ही लाल साडी विणलेली आहे. ती अगोदर इंदिरा गांधींनी, नंतर सोनिया गांधींनी आणि आता प्रियांका गांधींनी समारंभ प्रसंगी वापरलेली आहे. हे आणखी एक कविगत स्वातंत्र्य!
     पण वास्तव हे कल्पितालाही मागे टाकते म्हणतात. हे वास्तव कोणते? काँग्रजनानी या कादंबरीवर बंदी घालावी अशी मागणी केली. यात काँग्रेसचे अभिषेख सिंघवी सारखे प्रवक्तेही आहेत.!!
   कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर लेखकाची श्रीमती सोनिया गांधींसमोर लेखक उभा ठाकला. 'मॅडम मी चार वर्षे आपली साथ करीत होतो', लेखकाने आपली ओळख देण्याचा प्रयत्न केला. तरीही सोनिया गांधींचा चेहरा निर्विकारच होता. ' मी द रेड सारीचा लेखक. ' आमच्याबद्दल लिहिलेलं आम्ही कधीच वाचत नसतो', असे म्हणत सोनिया पुढे निघाल्या. सोनिया गांधींना असा काही संवाद झाल्याचे आठवत नाही.
      













   

No comments:

Post a Comment