Friday, February 5, 2016

शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल?
   देशातील शिक्षणाचा विशेषत: उच्च शिक्षणाचा दर्जा खालावलेला असून ही घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत, चिंतेची बाब आहे. ज्या विद्यापीठात/महाविद्यालयात प्रामुख्याने संशोधनावर भर दिला जातो आणि ज्ञानवृद्धीवर भर दिला जातो अंशांचा शोध घेण्याचा प्रयत्न केंद्र शासनाने सुरू केला आहे.पण हे काम सोपे नाही. 
आपल्या देशात आजमितीला जवळजवळ ७०० विद्यापीठे आहेत. महाविद्यालयांची संख्या जवळजवळ ३४,००० आहे. यात शिकवणारे १२ लक्ष शिक्षक आहेत आणि विद्यार्थी म्हणून नोंदविलेल्यांची संख्या दीड कोटी इतकी आहे. खरेतर हा संख्यात्मक विकास (विस्तार) आणखी होण्याची आवश्यकता आहे. अनेक लोक या संख्यावाढीला विकास समजायला तयार नाहीत. त्यांच्यामते ही सूज आहे. विकासाचा पहिला टप्पा म्हणून विस्तार (संख्यावाढ) आवश्यक आहे, हे मान्य करावयास हवे असले तरी आता गुणवत्ता वाढीवर भर देण्याची गरज आहे, हे मान्य केलेच पाहिजे. संख्या आणि गुणवत्ता यांत सामान्यतः व्यस्त प्रमाण राहिलेले आढळत आले आहे. पण असे म्हणून काहीतरी न करता स्वस्थ बसणे योग्य नाही. युजीसीने ही परिस्थतीत दूर करण्यासाठी दोन पुरस्कार जाहीर केले आहेत. १. 'काॅलेज आॅफ एक्सलन्स'- म्हणजे उच्च प्रतीची गुणवत्ता असलेले महाविद्यालय आणि २. 'काॅलेज विथ पोटेंशियल फाॅर एक्सलन्स'-म्हणजे उच्च प्रतीची गुणवत्ता प्राप्त करण्याची क्षमता असलेले महाविद्यालय. अशा महाविद्यालयांना निधी उपलब्ध करून दिला जातो. या निमित्ताने अशा महाविद्यालयांना रोख स्वरूपात पैसा तर मिळतोच शिवाय त्यांचा गौरवही केला जातो.
             पण नुसती महाविद्यालये गुणवान होऊन चालणार नाही. त्यांना गुणवान विद्यार्थीही मिळाले पाहिजेत. गुणवत्ताधारक विद्यार्थी आजकाल विज्ञान शाखेकडे पाठ फिरवू लागले आहेत. यावर उपाय म्हणून विज्ञान शाखा असलेल्या महाविद्यालयाला 'स्टार काॅलेज' हा पुरस्कार दिला जातो.केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ बायो टेक्नाॅलाॅजी हा विभाग हा पुरस्कार देत असते. सध्या शुल्क वाढीबद्दल सर्वत्र ओरड एेकायला येते. विज्ञान शिक्षणाचा खर्च आणि त्याची आकारले जाणारे शुल्क यांची तुलना केली तर हे शुल्क कमी पडते.पण समाजाची आर्थिक स्थिती बघितली तर शुल्कात आणखी वाढ करता येणार नाही, म्हणून हे अनुदान आहे. या अनुदानाचे उपयोग वेतन आणि अन्य सुविधांसाठी केला जातो. शिक्षणाचा दर्जा वाढावायासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. यासाठीची युजीसी अनुदान देते. नॅकचे मूल्यांकन  ए दर्जाचे असेल आणि गुणांक ३.५ पेक्षा जास्त असेल तर अशा प्रगतीपथावरील महाविद्यालयाला पुरस्कार दिले जातात. यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकास तर भर पडतेच शिवाय विद्यार्थ्याला गुणवत्तायुक्त शिक्षणही मिळते. अमेरिकेतील महाविद्यालयांना शिक्षण आपल्या येथील शिक्षणाच्या तुलनेत कितीतरी महाग आहे. तिथे गुणवत्ताधारकांसाठी भरपूर रकमेच्या शिष्यवृत्त्या भरपूर संख्येत असतात. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात/ विद्यापीठात प्रवेश घ्यावा म्हणून वीस टक्के शुल्क सवलत देऊन आपापसात चढाओढ करणारी महाविद्यालये/ विद्यापीठे त्या देशात आहेत.आपल्या देशातील मंदिरात आणि मठात भरपूर पैसा असतो. त्यांनी होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या ठेवल्या तर त्या पैशाचा युगानुकूल उपयोग तर होईलच आणि पदरी पुण्य पडेल, ते वेगळेच. 
     सुरवातीला 'काॅलेज विथ पोटेंशियल फाॅर एक्सलन्स'-म्हणजे उच्च प्रतीची गुणवत्ता प्राप्त करण्याची क्षमता असलेली महाविद्यालये निवडतात. त्यापैकी नॅकचे मूल्यांकन  ए दर्जाचे असेल आणि गुणांक ३.५ पेक्षा जास्त असेल तर अशा प्रगतीपथावरील महाविद्यालयाला 'काॅलेज आॅफ एक्सलन्स'- म्हणजे उच्च प्रतीची गुणवत्ता असलेले महाविद्यालय हा पुरस्कार दिला जातो. निधी तीन वर्षांसाठी दिला जातो. ६० टक्के रकम पहिल्या टप्प्यात तर उरलेली ४० टक्के रकम पुढे टप्प्याटप्प्याने दिली जाते. असे या बहुमानाचे ढोबळमानाने स्वरूप आहे.
                            पुरस्कारासाठीच्या पाच अटी
        महाविद्यालयाने पुरस्कारासाठीच्या पाच अटी लक्षात ठेऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
      १. शिक्षकांना ज्ञानाच्या सोयी कशाप्रकारे उपलब्ध करून देणार आहात.चर्चासत्रे, परिषदा यांचा उपयोग कसा करणार?
      २. अद्ययावत प्रयोगशाळा व त्या चालवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आहे किंवा कसे?
      ३.विद्यार्थ्यात संशोधन वृत्ती वाढण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कोणते उपाय करणार?
      ४. पायाभूत सोयी सुविधा असाव्यात आणखी कोणत्या गोष्टी हव्या आहेत?
      ५. विद्यार्थी आणि शिक्षक यांना सामाजिक कार्याची ओळख व्हावी यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत?
 अशाप्रकारे महाविद्यालयांना भरपूर प्रमाणात निधी तर उपलब्ध होतोच तसेच शिक्षकांना पेपरप्रकाशित करण्यासाठी किंवा संशोधनासाठी व्यासपीठही मिळते.माहिती आणि तंत्रज्ञान यांचा वापर सुरू होईल. सराव वाढेल . महाविद्यालयात नवीन सोयी सुविधा उपलब्ध होतील.

No comments:

Post a Comment