Thursday, February 4, 2016




                   शिंपला भेदणारा मोती
       पडतील स्वाती तर पिकतील मोती, याचा पूर्ण अर्थ असा की, स्वाती नक्षत्रात पडलेला पावसाचा थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो असा आहे. स्वाती नक्षत्रात चांगला पाऊस पडला तर जोंधळे (ज्वारी) मोत्यासारखे होतात असे शेतकय्रांमध्ये म्हटले जाते. स्वाती नक्षत्रात पाऊस पडला तर तो पिकांसाठी इतका चांगला असतो की, शेतात जणू धान्य नाही तर मोतीच उगवतात. मोत्यांची भुरळ मानवाला नेहमीच पडत आलेली आहे. आॅइस्टर (शंपला ) नावाचा एक जलचर आहे. याचे शरीर अगदी लुसलुशित असते. पाण्यात वावरतांना शिंपल्यात शिरलेले वाळूचे कण टोचू नयेत म्हणून हा प्राणी स्वत:भोवती एक आवरण तयार करतो. आता हे कण अगदी गुळगुळीत होतात. हेच ते मोती. आजकाल शिंपला उघडून त्यात मुद्दामून चिमुटभर वाळू टाकतात. ते टोचू नयेत म्हणून तो जलचर त्याला आपल्या जीवनरसाने झाकून टाकतो आणि मोतीच मोती मिळतात. अशी करतात मोत्यांची शेती! पण हे असतात कल्चर मोती. त्यांना नैसर्गिक रीत्या तयार झालेल्या मोत्याची सर नसते. एका पर्शियन कवीने -रूमीने - आपल्या कवितात 'मोत्यांचा वापर' अनेकदा केला आहे. त्याच्या एका कवितेत समुद्र मोत्याला आवाहन करतो की, तू शिंपले भेदून   बाहेर ये आणि माझ्या विशाल विश्वात मुक्तपणे वावरण्याचा आस्वाद घे. पण मोती स्वत:हून कधीच बाहेर पडत नाही, अशी समजूत आहे. पण त्यानं बाहेर पडायला हवं.
शिंपल्यातून बाहेर पडणारा मोती - असा हा मोती शिंपल्यातच अडकून पडतो त्याला शिंपला उघडून बाहेर काढावे लागते, असे म्हणतात.पण एक मोती स्वप्रयत्नाने शिंपला भेदून बाहेर पडला अशी कल्पना करून अफगाण अमेरिकन लेखिका नादिया हाशमी हिला 'द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल' हे शीर्षक आपल्या कादंबरीला द्यावेसे वाटावे ही कल्पना जशी रम्य आहे तशीच ती कादंबरीच्या कथानकाचा एका वाक्यात परिचय करून देणारीही आहे. 
    स्त्री मुक्ती ही जागतिक समस्या आहे. स्त्रीच्या वाट्याला कोषातील बंदिस्त जीवन का यावे/आले?  पुरुष सत्तेमुळे? कट्टरपंथीयांच्या धार्मिक सत्तेमुळे? धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील संगनमतामुळे?  'नको हा स्त्री जन्म', असा टाहो फोडण्याची पाळी जगभरातील सर्वच जातीधर्माच्या स्त्रियांवर का आली? ही तसं पाहिलं तर एक समाजशास्त्रीय समस्या आहे. ही समस्या विषय स्वरूपात घेऊन अनेक साहित्यकृती जन्माला आल्या आहेत. त्यातच हा विषय जेव्हा एखादी स्त्री हाताळते, तेव्हा त्या साहित्यकृतीला एक वेगळीच धार निर्माण होणार यात नवल ते काय? स्वत: एक अफगाण स्त्री असल्यामुळे भुक्तभोगी स्त्रीचा जीवनपट ती कसा उलगडून दाखवते हे मुळातूनच वाचायला हवे.
  निर्बलता, दैव आणि निर्णयस्वातंत्र्याचा अभाव या तिहेरी पाशातून बाहेर पडण्याचा आजच्या अफगाण स्त्रीचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो आहे, हे सांगणे कठीण आहे. म्हणूनच बहुदा, एक 'मोती' कवच भेदून कसा बाहेर येतो, हा विषय आजही वाचनीय तसाच चिंतनीय ठरत असावा. 
 अफगाणिस्थान कालचा -  यादवी, अफूमुळे आलेली व्यसनाधीनता, त्याच अफूचा व्यापार हा उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा स्रोत असणे, शतकानुशतके, कधी मुस्लिम, तर कधी ब्रिटिश, कधी अमेरिकन  तर कधी रशियन राजवटींकडून होणारे शोषण आणि या सर्वावर कडी करणारा कट्टरपंथी तालिबानी दहशतवादी भस्मासूर यांच्या छळवादातून अफगाण समाज सतत पिचला, ठेचला गेला आहे. त्यात स्त्रियांची स्थिती तर आणखीनच दयनीय व बिकट असणार, यात काय शंका?  ११ सप्टेंबरला अमेरिकेतील दोन मनोरे उध्वस्त झाले. आणि कट्टरपंथीय दहशतवादाची भयानकता सर्व जगाला नव्याने जाणवली. दुसय्रा महायुद्धाने जसा अनेक अमर साहित्यकृतींना जन्म दिला तसाच परिणाम या दहशतवादी उद्रेकाचा होताना दिसतो आहे. हा दहशतवाद स्त्रियांना धार्मिक कट्टरतेमुळे मरणप्राय यातना देतो आहे. त्यांचे रूदन अनेकदा मूक असते. पण काही जोखड झुगारून मात देऊन मार्ग काढतात. या लढ्याची प्रेक्षणीयता तुलनेने कमी असली तरी त्यामुळे त्याचे महत्व कमी होत नाही.
    आजचा अफगाणिसेथान -  नादिया हाशमीच्या पहिल्यावहिल्या कादंबरीची 'द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल' या साहित्यपटाची लांबी एका शतकाची आहे. हे शीर्षक तिला रूमीच्या काव्यपंक्तीवरून सुचले. या कादंबरीत अफगाण स्त्रियांची कशी कोंडी झालेली आहे, याचे जसे चित्रण आहे तसेत हा संपूर्ण समाजच विघटनाच्या आणि विनाशाच्या उंबरठ्यावर कसा उभा आहे, तेही दाखविले आहे. खरे साहित्यिक  चित्रण एवढेच करून थांबत नाही, तर मुक्तीच्या मार्गावरही प्रकाश टाकीत जाते. हे सर्व गुणविशेष या कादंबरीत प्रकर्षाने जाणवतात. स्त्रीचे शोषण, तिच्यावर  होणारे अत्याचार, तिची अगतिकता, तिचे मागासलेपण, तिची मुकाट सहनशीलता यांचे चित्रण अनेक कादंबय्रात केलेले आढळते. नादिया हाशमीचे वेगळेपण यात आहे की, तिने स्त्रीचा चिवटपणा आणि जिवटपणा सुद्धा तेवढ्याच समर्थपणे मांडला आहे. 
   स्त्रीच्या हक्काच्या दोन जागा -   ज्या काळात स्त्रीयांच्या हक्काच्या जागा दोनच होत्या एक म्हणजे चार भिंतींचे घर किंवा कबर! ( आजही हीच भूमिका अफगाणिस्थानात दृढमूल आहे!) अशा काळातील  एका शतकाच्या कालखंडाची ही कथा आहे. त्यामुळे कथा खापर पणजी पासून सुरू होते याचे आश्चर्य वाटायला नको. शेकीबा असं तिचं नाव आहे. शेकीबा या शब्दाचा अर्थ आहे  अल्लाची देणगी! हिचा अर्धा चेहरा स्वयंपाक करता करता तेलाचा भडका उडून भाजलाहोता. मुलाचा पोशाख परिधान करून ती शाळेत जायची. मुलींना शाळा व शिक्षण वर्ज असलेल्या काळात अनाथ झालेली शेकीबा थोडेफार शिकली ती अशी युक्ती करून! शेकीबा ती ज्या कालखंडात वावरते आहे तो कालखंड  असा आहे की ज्यात स्त्रीला फटक्यांची शिक्षा होती. लहान वयात लग्न, सवती व सासुरवास ही सर्वमान्य जनरीत होती. शरीरसंबंधासाठी पत्नीच्या मान्यतेचा मुद्दाच नव्हता, लैंगिक भावना व्यक्त करणारीला दगडाने ठेचून मारल्याची उदाहरणे होती. शेकीबा, शायना आणि रहिमा - शेकीबाच्या मनात मात्र स्त्रीसुलभ भावनेबरोबरच वैचारिक स्वातंत्र्याची इच्छाही डोकावतांना आढळते. तिचा पती राजकारणात सहभागी असतो. रहिमा ही कादंबरीची नायिका. तिचा पतीही राजकारणीच आहे. शायमा ही तिची मावशी. कुबड असल्यामुळे हिचे लग्न होत नाही. मावशीचा तिच्यावर फार जीव. शायमा मावशी आपल्या भाचीला -रहिमाला- शेकिबाच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी कथा सांगत असते. गोष्टीवेल्हाळ रहिमाला त्या कथा खूप आवडत. कथेत व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित प्रसंग असत, तसेच त्या काळच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकणारेही प्रसंग असायचे. थोडक्यात काय तर कथावस्तूच्या एका टोकाला आहे जुन्या काळातील स्त्री शेकीबा आहे, तर वर्तमानकाळात वावरते आहे तरूण रहिमा. आपल्याला कथा समजते ती याच रहिमाच्या मुखातून. मधली पाती आहे शायमा मावशीची. कुबडेपणा स्वीकारून,पत्करून  आणि जन्मभर एकटेच रहायचे आहे, हे प्राक्तन धैर्याने व सहजतेने मान्य करीत, ती कादंबरीभर स्त्री कल्याणाची जबाबदारी आपलीच आहे, अशी भूमिका घेऊन वावरते. जुन्याकाळातील सर्वमान्य नियमांमध्ये कालोचित बदल व्हावयास हवेत, हे द्रष्टेपण हा शेकीबाचा स्वभावगुण. पण तो उपजत म्हणता यायचा नाही. प्लेगच्या साथीमध्ये कुटुंबातील सर्व घटकांचा बळी गेल्यामुळे अनाथ  झालेली शेकीबा अन्याय, अत्याचारांचा सामना करीत शेती करताकरता खेड्यातून काबूल सारख्या शहरात येते. पुरुषाचा पोशाख करून  राजवाड्यात एक सेवक म्हणून काम करू लागते. एकदा ती मैत्रिणीबरोबर राजा अमानुल्ला  आणि राणी सुरैय्या  यांच्या भाषणाला ती जाते. याने अफगाणिस्थानला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले होते आणि एका पाठोपाठ एक अशा राजकीय आणि सामाजिक सुधारणा करण्याचा सपाटा सुरू केला होता. सुरैय्या ही आधुनिक शिक्षण घेतलेली अफगाण तरुणी आणि अमानुल्ला यांचा प्रेमविवाह झालेला असतो. भाषणाच्या प्रारंभी सुरैय्या आपला बुरखा काढून टाकते आणि ' इस्लाममध्ये स्त्रीने बुरखा घेतला पाहिजे असे कुठे आहे?', असा बेधडक प्रश्न विचारते. 'स्त्रियांना समान हक्क असले पाहिजेत', ही तिची मागणी शेकीबामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते. स्त्रियाही माणूसच आहेत. जुनाट रीतीरिवाजांचे जोखड त्यांनी झुगारून दिले पाहिजे, हा विचार ऐकून सुरवातीला आश्चर्यचकित झालेल्या शेकीबाच्या मनात दृढमूल होतो. तिला पती मिळतो तो वंश विस्तारापुरता. पण याबाबत तिची तक्रार नसते. यथावकाश  शेकीबा अस्तंगत होते.
    बच्चा पोषचा परिणाम -   इतिहास सांगतो की, १९१९ ते १९२९ या अल्पकालीन कारकिर्दीनंतर अमानुल्लाला परगंदा व्हावे लागले आणि घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरू लागले. आता तरुणांसमोर युद्धावर जाणे हा एकमेव व्यवसाय शिल्लक राहतो. रहिमाला चार बहिणी असतात. तिचे अफीमबाज वडील सगळ्या मुलीच झाल्यामुळे नशीबाऐवजी पत्नीवर नाराज असतात. कुटुंबाचा गाडा रेटण्याचा भार ही पत्नी नशीब म्हणून स्वीकारते. एकापाठोपाठ पाच मुली हे या कुटुंबाचे दुसरे दुर्दैव. यावर त्याकाळच्या समजुतीनुसार 'बच्चापोष'चा उपाय केला जातो. या प्रथेनुसार हे कुटुंब रहिमा या मुलीला मुलाप्रमाणे पोशाख घालून जमेल तितके दिवस मुलगा म्हणून वाढवतात. याचे दोन फायदे असतात. मुख्य म्हणजे समाजात पुत्रवती आणि पुत्रवान म्हणून मान मिळतो. दुसरे असे की, पुढच्या खेपेला मुलगा  होण्याची शक्यता निर्माण होते, अशी समजूत दिलासा देत असते. खुद्द रहिमाचा फायदा असा झाला की, ती मुलाचा पोशाख करून शाळेत जाऊन थोडोफार शिक्षण घेऊ शकली. रहिमाने आपल्या खापर आजीचा कित्ता अशाप्रकारे मुलाचा पोशाख करून शाळेत जाऊन गिरवला. एका शतकाचे अंतर असूनही शेकीबा आणि रहिमा याचे प्राबद्ध कसे सारखेच होते, हे लेखिकेने या निमित्ताने मोठ्या खुबीने दाखविले होते. शायमा मावशीच्या मध्यस्तीने रहिमाचे शिक्षणही बय्रापैकी होते. पण पुढे अब्दुल खलिक या अडदांड, आणि दुष्ट शिपायीगड्याची नजर तिच्यावर पडते. तो तिला मागणी घालून अफिमबाज बापाकडून अफूच्या मोबदल्यात विकत घेतो. त्यामुळे नाइलाज होऊन वयाच्या तेराव्या वर्षी आपल्या पतीची चौथी बायको म्हणून रहिमा विवाहबद्ध होते. विवाहानंतर लगेच मातृत्व हा प्रकार सर्वसामान्य अफगाण मुलीप्रमाणे तिच्याही वाट्याला येतो. तीन सवती आणि सासू तिला छळछळ छळतात. ह्या सर्व नशीबाच्या गोष्टी असतात, असे पटवून आई तिची समजूत काढते. इतर मुलींच्या तुलनेत वेगळे घडते ते असे की रहिमाचा पती पार्लमेंटचा सदस्य होतो. तिची सवत (पतीची पहिली पत्नी) अक्षरशत्रू असते. तिला कागदपत्रे वाचून दाखवण्याचे (सेक्रेटरीचे) काम रहिमाच्या वाट्याला येते. याच काळात अनुभवासोबत ती संगणक शिक्षणही घेते. आपल्या पंखात पुरेसे बळ आले आहे, याची खात्री पटताच पिंजरा तोडून बाहेर पडते आणि महिलाश्रमात आश्रय स्वीकारून आपली सुटका करून घेते. याच्या मुळाशी सतत शेकीबाची आठवण करून देणारी तिची शायमा मावशी आहे. या सोबत ती रहिमाला देशाचे कलावैभव, काव्य आणि संस्कृतीचा परिचय करून देत तिच्या मनोपिंडाचे पोषण करीत असते. युद्धे, स्थानिकांमधील सत्तासंघर्ष, धार्मिक कट्टरता व कर्मकांडे आणि राजकीय उलथापालथ यातून होणारा अफगाण स्त्रियांच्या अनेक पिढ्यांचा इतिहास सांगता सांगता लेखिकेने अफगाणिस्थानातील एका शतकातील स्त्रीजीवनाचा आलेख वाचकांसमोर उभा केला आहे.
--


एका शतकाचे अंतर असलेल्या शेकीबा आणि रहिमा यांच्या आयुष्यातील पुरुषसत्तेचे ताण बरेचसे समान आहेत. शेकीबाच्या काळात फटक्यांची शिक्षा करणे, मर्जीचा विचार न करता लहान वयात लग्न होणे, सवती आणि सासुरवास असणे यासारखी िहसा आहे. शतकानंतर रहिमाची मोठी बहीण परवीन पितृसत्तेचे काच सहन न झाल्याने आत्महत्या करते. कादंबरीतील अनेक स्त्रिया आपले 'नशीब' म्हणत सर्व प्रकारचे अन्याय मुकाट स्वीकारताना दिसतात. जनानखान्यातील एका स्त्रीला आपले प्रेम व्यक्त केल्याच्या गुन्हय़ासाठी दगडाने ठेचून मारले जाते. विवाहात शरीरसंबंधासाठी स्त्रीच्या संमतीचा मुद्दा सर्रास गरलागू राहतो. कादंबरीत एकमेकांशी प्रेमळपणे वागणाऱ्या सवती आहेत. स्त्रियांवर 'तलाक'ची टांगती तलवार आढळत नाही. स्त्रिया पुरुषसत्तेत आपले स्थान पक्केकरताना इतर स्त्रियांवर सत्ता गाजविताना दिसतात, प्रसंगी िहसा करतात. सहजसुलभ लैंगिक आकर्षणाची भावना स्त्रियांना अनुभवायला येताना दिसत नाही. शेकीबाच्या मनातील अशा भावना निसटत्या रूपात उमटलेल्या आहेत.
कादंबरीची रचना करताना शेकीबाचा अर्धा चेहरा भाजलेला असणे, मावशीला कुबड असल्याने तिचे लग्न न होणे, परवीनसारख्या हळुवार मुलीच्या पायात व्यंग असणे, रहिमाचा मुलगा जहांगीर छोटय़ाशा आजाराने मरणे, शेकीबा आणि रहिमा या दोघींचे पती राजकीय वर्तुळातील असणे, दोघींचा प्रवास छोटय़ा खेडय़ातून काबूलपर्यंत होणे, त्या दोघींना 'मुलगा' होणे, त्यांना रहीम आणि शेकीब होण्याचा म्हणजेच पुरुष होण्याचा अनुभव येणे या साऱ्या गोष्टी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत. रहिमा किंवा शेकीबा अशी शीर्षके असणारी एकूण छोटेखानी ६९ प्रकरणे आहेत. लेखनातील सहजता आणि रचना या दोन्हीमुळे शतकाचे अंतर असणाऱ्या दोघींच्या आयुष्यात वाचकाला एकाच वेळी सहज संचार करता येतो. रहिमामध्ये तयार होणाऱ्या धर्याची सूक्ष्म प्रक्रिया या रचनेमध्ये चपखल पकडली आहे. शेकीबा आपले नशीब काही प्रमाणात स्वीकारते. रहिमा नशीब बदलणारा सुटकेचा मार्ग शोधते. त्यांचा हा प्रवास, त्यातील जीवघेणी वळणे, त्यांची घालमेल, कोंडी, त्यावर त्यांनी केलेली मात, त्यांचे धर्य हे सारे मुळातून वाचण्यासारखे आहे.
तेराव्या शतकातील प्रसिद्ध पर्शियन कवी रूमीच्या कवितेतील 'सागराचे पाणी मोत्याला, िशपला तोडण्याची याचना करते' या ओळीवरून कादंबरीचे शीर्षक सुचले आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मक आहे. आपल्या आधीच्या पिढीतील स्त्रिया अफगाणिस्तानमध्ये उच्चशिक्षित झाल्या. वर्तमानात मात्र अनेक स्त्रियांच्या वाटय़ाला इतके कठीण वास्तव का यावे, या विचाराने लेखिका अस्वस्थ आहे. तसेच तिच्या वाटय़ाला प्रेमळ संगोपन आणि सुस्थिती आली आहे याची उतराई होणेही तिला गरजेचे वाटते. लेखिका कादंबरीबद्दल म्हणते, 'रहिमामध्ये तयार झालेली जगण्याची ऊर्मी असंख्य अफगाण स्त्रियांमध्ये आहे. या देशातील परिस्थिती बदलण्याची तीच एक आशा आहे. म्हणून मला या धर्याची गोष्ट सांगायची होती.'
लेखिकेने शेकीबा आणि रहिमाच्या स्वप्नांची आणि धर्याची गोष्ट नेटकेपणाने सांगितली आहे. आपल्या जमिनीचे कागद मिळवून वकिलाकडे जाण्याचे धर्य शेकीबात कसे आले? कदाचित लहानपणी तिला मिळालेल्या प्रेमातून तिच्यात आत्मसन्मानाची जाणीव पक्की झाली असणार. रहिमाला शेकीबाची गोष्ट सांगणाऱ्या मावशीकडून हिंमत मिळाली असणार.
*स्त्रियांचे हक्क पुरुषसत्तेच्या जोडीने राजसत्तेच्या मर्जीवर अवलंबून असतात. आज जगभरात अनेक देशांत धार्मिक कट्टरपंथीय राजसत्ता प्रबळ होत आहेत. लोकशाहीची पीछेहाट होते आहे. कष्टकरी आणि स्त्रिया यांचा संघर्ष बिकट होत आहे. आज अफगाण स्त्रियांना जे वास्तव झेलावे लागत आहे ते अतिशय बिकट आणि अस्वस्थ करणारे आहे. त्यांच्या सुटकेचा मार्ग अंधूकपणेसुद्धा नजरेच्या टप्प्यात दिसत नसल्याने सर्वसामान्य अफगाण स्त्रीने किती काळ वाट पाहायची? महिलाश्रमात दाखल झालेल्या रहिमाचा संघर्ष सुकर राहणार आहे? गुंतागुंतीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीतून निर्माण झालेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील बिकट समस्यांना हे सोपे उत्तर तर नाही? असे प्रश्न वाचकांच्या मनात तयार करणारी ही कादंबरी महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांमधील स्वप्ने पाहण्याची आणि धर्याची ऊर्मी जगणे अर्थपूर्ण करीत असते. स्त्रियांच्या जिवटपणाचा धांडोळा घेत सामान्यांच्या धर्याच्या आणि स्वप्नांच्या कथा सांगत राहायला हव्यात. या संदर्भात कवी पाशच्या ओळी आठवतात, 'स्वप्ने मरून जाणे हे सर्वात धोक्याचे.'

'द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल'
लेखिका - नादिया हाशिमी
पृष्ठ संख्या - ४५२
प्रकाशक - विलियम मोरो
हार्पर कोलिन्सची प्रत २०१४
किंमत - यूएस डॉलर १५.९९
अरुणा बुरटे - aruna.burte@gmail.com
द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल'
There is some kiss we want
with our whole lives, the touch
of spirit on the body. Seawater
begs the pearl to break its shell.
And the lily, how passionately
it needs some wild darling!
At night, I open the window and ask
the moon to come and press its
face against mine.
Breathe into me. Close
the language-door and open the love-window.
The moon won’t use the door,
only the window.
स्त्रियांचे हक्क पुरुषसत्तेच्या जोडीने राजसत्तेच्या मर्जीवर अवलंबून असतात. आज जगभरात अनेक देशांत धार्मिक कट्टरपंथीय राजसत्ता प्रबळ होत आहेत. लोकशाहीची पीछेहाट होते आहे. कष्टकरी आणि स्त्रिया यांचा संघर्ष बिकट होत आहे. आज अफगाण स्त्रियांना जे वास्तव झेलावे लागत आहे ते अतिशय बिकट आणि अस्वस्थ करणारे आहे..
अफगाणिस्तानची ओळख रवींद्रनाथ टागोरांच्या प्रत्ययकारी 'काबुलीवाला' कथेतून आपल्यापकी अनेकांच्या लहानपणीच्या आठवणींचा खास भाग असते. त्यानंतरच्या शतकभरात अफगाणिस्तानात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. परकीय तसेच स्वकियांमधील अनेक टोळ्या यांच्यामधील सततची युद्धे आणि अमली पदार्थाचा अवैध व्यापार यामध्ये अनेक पिढय़ांची तरुणाई होरपळत राहिली. ब्रिटन, अमेरिका आणि रशिया या देशांच्या परराष्ट्र धोरणांचा परिणाम येथील सामान्य जनता झेलत राहिली. ९/११च्या ट्वीन टॉवरवरील हल्ल्यानंतर इस्लाम आणि इस्लामिक जग यांना अमेरिकन सत्तेने आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे दहशतवादी ही प्रतिमा चिकटविली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकशाहीचे आकुंचन झाल्याने इस्लामिक कट्टरपंथीय प्रबळ होत राहिले. त्या प्रमाणात कष्टकरी आणि स्त्रिया यांची कोंडी वाढत गेली. इस्लामिक जगामधील अन्याय, शोषण, मागासलेपणा, स्त्रियांना मिळणारी अमानुष वागणूक याबद्दल असलेल्या लिखाणाला बाजारपेठ मिळाली. या वातावरणात नादिया हाशिमी या अमेरिकन-अफगाण लेखिकेची 'द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल' ही पहिली कादंबरी शतकभराचा पट उभा करीत विघटनाच्या मार्गावर असलेल्या अफगाणिस्तानची कोंडी फोडायची असेल तर काय करायला पाहिजे याचा निर्देश करते. अन्याय, अत्याचार स्त्रिया मुकाट सहन करतात हा सर्वमान्य नियम. पण जगण्याच्या चिवट प्रेरणेतून तो सर्वमान्य नियम तोडण्याचा जिवटपणा सामान्य स्त्रिया दाखवतात त्याचा आलेख कादंबरी परिणामकारकतेने मांडते.
कादंबरीची नायिका रहिमा आपल्या शायिमा या मावशीकडून स्वत:च्या खापर-खापरपणजी शेकीबाची प्रेरणादायी गोष्ट ऐकत मोठी होते. वर्तमानातील रहिमाच्या आयुष्यातील उण्यापुऱ्या १५-१६ वर्षांचा काळ आणि शेकीबाच्या आयुष्याचा १९३० पर्यंतचा काळ कादंबरी एकत्र गुंफते. व्यक्तिगत आयुष्य आणि समाज या दोन्हींत घडणाऱ्या प्रसंगावर टिप्पणी करणारी शायिमा मावशी रहिमा आणि शेकीबाच्या कथेला जोडणारा दुवा आहे.
शेती करणारे शेकीबाचे प्रेमळ कुटुंब १९०३ मधील प्लेगच्या साथीत बळी गेल्याने ती अनाथ होते. शेती करीत तग धरणारी शेकीबा अनेक अत्याचार सहन करीत एका छोटय़ाशा खेडय़ातून काबूल शहरापर्यंत प्रवास करते. 'एका अनाथ मुलीच्या वाटय़ाला यापेक्षा चांगले काय आले असते,' असे म्हणत झालेल्या अन्यायाचा स्वीकार करते. एकदा पतीच्या सहकाऱ्याच्या पत्नीबरोबर राजा अमानुल्ला आणि राणी सुरैया यांचे जाहीर भाषण ऐकायला जाते. राणी सुरैया जाहीरपणे बुरखा काढत म्हणते, 'इस्लाम आणि बुरखा याचा काही संबंध नाही. स्त्रियांना समतेचे हक्क..' हे शब्द ऐकल्यावर आश्चर्यचकित झालेली शेकीबा सर्व स्त्रियांसाठी एक स्वप्न पाहते. ती मनाशी म्हणते, 'सुरैया बुद्धिमान आहे. ती म्हणते तसे झाले असते तर माझ्या जमिनीचे कागद फाडले गेले नसते. माझ्या आजीने मला शाळेत घातले असते. मला मुली असत्या तरी त्यांचेही संगोपन प्रेमाने झाले असते. मी अल्लाकडे फारसे काही मागत नाही. अनिष्ट रीतिरिवाजांचे जाच झुगारणाऱ्या मुलींना अल्लाने धर्य द्यावे. त्याही माणुसकीच्या हकदार आहेत.' साधारण १९३० च्या सुमारास शेकीबाची कहाणी संपते. त्याच सुमारास सुलतान अमानुल्लाचे वर्चस्व प्रस्थापित झालेले असते. स्त्रियांना काही प्रमाणात हक्क मिळालेले असतात.
  लढाईवर जाणे हेच उपजीविकेचे साधन असलेले रहिमाचे वडील पाच मुली झाल्याने पत्नीवर नाराज असतात. आजूबाजूच्या समाजावर तालिबानी आपली पकड बळकट करीत असतात. आईचा लळा असणाऱ्या रहिमाचा प्रवास 'बच्चा पोष' प्रथेप्रमाणे मुलगा होणे, मावशीच्या मध्यस्थीमुळे सुटलेले शिक्षण काही काळ सुरू होणे, मर्जीविरुद्ध विवाह, मातृत्व ते काबूलच्या पार्लमेंटमध्ये पतीच्या पहिल्या निरक्षर पत्नीला सरकारी कागदपत्रे वाचण्याचे मदतनीसाचे काम करण्यापर्यंत होतो. तालिबानी नियंत्रण ढिले होऊन काही प्रमाणात प्रातिनिधिक सरकार येण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे स्त्रियांनाही आरक्षणातून राजसत्तेमध्ये हिस्सा मिळतो. काबूलमध्ये तिला संगणक प्रशिक्षणाची संधी मिळते. तेथील प्रशिक्षकेच्या मदतीने ती अन्यायकारक आयुष्यातून सुटकेचा मार्ग स्वीकारत महिलाश्रमात आश्रयाला जाते.
रहिमा आणि मावशी यांच्यामधील पुढील संवादाला कादंबरीचा गाभा म्हणता येईल :
रहिमा : 'आपण आपले नशीब बदलू शकतो? आई म्हणाली होती अब्दुल खालिकशी लग्न होणे हे माझे नशीब होते. नशीब बदलणे म्हणजे अल्लाला धोखा देणे आहे.'  
मावशी : 'रहिमा, तू अनेक अडचणी झेलत आहेस. अल्लावर आपली श्रद्धा आहे. लक्षात ठेव, तुझ्यात शेकीबाचे रक्त वाहते आहे. आपले नशीब बदलण्यासाठी ती धडपडली. माणसाच्या जगण्याच्या ऊर्मीबद्दल काय म्हणतात माहीत आहे का? ती कातळाहून कठीण आणि फुलाच्या पाकळीहून कोमल असते.'

No comments:

Post a Comment