Saturday, February 6, 2016

कोण म्हणतो हे कलियुग आहे म्हणून?
वसंत गणेश काणे
(एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ नागपूर -४४० ०२२)
ह्ल्ली  मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया,अमेरिका        
Email – kanewasant@gmail.com
Blog – kasa mee? (07122221689) 9422804430
लारा रुसो, काली ग्वास्ती आणि रीस वर्खोव्ह्न या तिघा ‘रूम मेट्स’नी एक कोच खरेदी केला. दुकानाचे नाव होते सॅल्व्हेशन आर्मी स्टोअर. जुन्या वस्तू दान स्वरुपात  घ्यायच्या आणि थोडा नफा  घेऊन त्या विकायच्या, अशा प्रकारचे जुन्या वस्तू स्वस्त दराने गरजूंना विकण्याचा व्यवसाय करणारे ते दुकान होते. ही घटना आहे, न्यूयॉर्क पासून १२० किलोमीटर उत्तरेला असलेल्या पाल्झ या गावातली. कोच आणि सोबत एक खुर्ची यांची किंमत ५५ डॉलर देऊन त्यांनी ही खरेदी केली.
जुन्या कोचला ठिकठिकाणी फुगवटे होते
कोचाचे हात जरा जास्तच फुगलेले वाटल्यामुळे रिझने  झिप उघडून आत काय आहे ते पहिले. तो काय आश्चर्य! हाताला आलेला फुगवटा एका पाकिटामुळे होता! पाकीट उघडून बघीतले तर आत ४००० डॉलरच्या नोटा होत्या!! आत आणखीही पाकिटे होती. नोटांनी भरलेली. एकूण ४०,८०० डॉलर होते. तिघांनाही लॉटरी लागल्याचा आनंद झाला. आश्चर्याने वासलेला ‘आ’ काही केल्या बंदच होईना.
त्यांचा आनंद गगनात मावेना. काय गडबड आहे हे पाहण्यासाठी शेजारीपाजारी जमा झाले. त्यांनीही या तिघांचे लॉटरी लागल्याबद्दल अभिनंदन केले.
वेगळीच कलाटणी
पण या सर्व गोष्टीला एक वेगळीच कलाटणी लावणारी घटना घडली ती अशी. एका पाकिटात एक डिपॉझिट स्लीप होती. त्यावर एका महिलेचा पत्ता लिहिलेला होता. दुसरे दिवशी या तिघांनी तिची भेट घेतली. ती ९१ वर्ष वयाची एक विधवा होती.तिची प्रकृती ठीक नव्हती. तो कोच आणि ते पैसे तिचेच होते. तिनेच ते पैसे त्या कोचात ठेवले होते. ती आजारी असतांना तिच्या नातेवाईकांनी तो कोच जुन्या वस्तू गरजूंना स्वस्त किमतीत देणाऱ्या ‘सॅल्व्हेशन आर्मी स्टोअर’ या  दुकानाला देणगी (डोनेशन) स्वरुपात दिला होता. 
‘आम्ही हे पैसे सहज ठेवू शकलो असतो पण मग आम्हाला आयुष्यभर टोचणी लागली असती’, असे या तिघांनी पत्रकारांना (असोसिएटेड प्रेस) सांगितले.       

No comments:

Post a Comment