Saturday, May 31, 2014

Miss America & American Educational Field


मिस अमेरिका आणि अमेरिकन शालेय जगत

अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क नावाच्या शहरात ‘सेंट्रल यॉर्क मिडल स्कूल’ या नावाची तिथल्या शैक्षणिक जिल्ह्यातील (स्कूल डिस्ट्रिक्ट) एक परिसर शाळा (नेबरहुड स्कूल) आहे. अमेरिकेतील माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण तिथल्या जिल्हा परिषदेच्या परिसर शाळांमधून (काऊंटी नेबरहुड स्कूल) मधून दिले जाते. ही या भागातील एक प्रथितयश आणि प्रतिष्ठाप्राप्त शाळा मानली जाते. गेली आठ वर्षे ही शाळा वार्षिक विविधता महोत्सव (डायव्हर्सिटी सेलिब्रेशन) साजरा करीत असते. अमेरिकन समाज हा जगातील विविध देशांतून स्थलांतरित होऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांचा मिळून बनलेला आहे. या प्रत्येक घटकाचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक वारसा वेगवेगळा असतो. अशाप्रकारे तिथल्या बहुतेक भागात अशी संमिश्र प्रजा वसत आहे.
दरवर्षी साजर्‍या होणार्‍या महोत्सवात आपापल्या मूळ संस्कृतीचा परिचय करून देणारे कार्यक्रम त्या त्या संस्कृतीचा वारसा बाळगून असणारे लोक आणि विद्यार्थी सादर करीत असतात. यात खाद्य पदार्थ, वेषभूषा, सण, प्रथा, परंपरा यांचा परिचय एकमेकांना व्हावा, असा प्रमुख उद्देश असतो. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून भविष्यात एकजिनसी अमेरिकन समाज उदयाला येईल, अशी भूमिका असते. यावेळी बक्षिसे/पारितोषिके सुद्धा दिली जातात. आपल्या येथील शालेय स्नेहसंमेलनासारखे या कार्यक्रमाचे स्वरूप असते, असे म्हणता येईल.

काळी सौंदर्यवती

यावर्षी अमेरिकेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात एक विशेष घटना घडली. मूळच्या भारतीय वंशाची- एका कृष्णवर्णीय वंशाची- सौंदर्यवती- नीना दवुलुरी- ही इथल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस अमेरिका’ म्हणून निवडली गेली. अमेरिकेतही ‘गोरा-काळा वाद’ अधूनमधून डोके वर काढीत असतोच. तसेच याही वेळी झाले. नीना दवुलुरी नावाच्या एका ‘काळ्या’ मुलीने ‘मिस अमेरिका स्पर्धा’ जिंकावी, हे तिथल्या ‘गोर्‍या लोकांच्या’ पचनी सहजासहजी पडेना. पण ‘निकाल’ लागल्यानंतर हात चोळीत बसण्याव्यतिरिक्त कुणालाही फारसे काही करता येईना. थोडीफार आरडाओरड, आदळआपट, पत्रकबाजी झाली आणि हे प्रकरण निवळले.

निमंत्रण स्वीकारण्यामागची भूमिका

सेंट्रल यॉर्क मिडल स्कूलने या सौंदर्यवतीला- नीना दवुलुरीला- या वर्षीच्या कार्यक्रमात ‘प्रमुख पाहुणी’ म्हणून पाचारण केले. सामान्यत: ‘मिस अमेरिका’ म्हणून निवड झाल्यानंतर जवळजवळ एक वर्षभर या तरुणींवर विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचे बंधन करार करून टाकलेले असते. नीना दवुलुरीने हे निमंत्रण स्वीकारले.
‘माझ्या मायदेशाच्या संस्कृतीबद्दल अमेरिकन जनमानसात काही ठोकळेबाज ठरावीक (स्टिरिओटाईप) अपसमजुती (मिसकन्सेप्शन्स) आहेत, हा अनुभव घेतघेतच मी लहानाची मोठी झाली आहे. ‘आपण कसे आहोत,’ हे दाखवण्याची ही एक नामी संधी आहे, अशा भूमिकेतून मी हे निमंत्रण स्वीकारले. भाषणातून आणि प्रश्‍नोत्तरातून या समजुतींबाबत बोलत येईल, असे मला वाटत होते. समाजप्रबोधनाची ही संधी आपण साधलीच पाहिजे, असे मला वाटले.

‘आती क्या खंडाला?

या शाळेत बाराव्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी (वय वर्षे अठरा) पॅट्रिक फाव याने या कार्यक्र्रमात नीनाला एक फूल भेट दिले आणि नृत्यासाठी (प्रॉम- ‘आती क्या खंडाला?’ टाईप) पाचारण करण्याचे ठरविले. मित्रामित्रात याबाबत पैज लागली होती, असे म्हणतात. पॅट्रिकची ही वृत्ती त्याच्या मित्रमंडळीप्रमाणेच शाळेतही सर्वांच्या चांगलीच परिचयाची होती. त्याच्या ‘या’ बेताची कुणकुण शालेय प्रशासनालाही लागली. प्रशासनाने कार्यक्रम चालू असताना पॅट्रिकने असे काही करू नये, असे त्याला बजावले. हा कार्यक्रम परस्परांच्या सांस्कृतिक परिचयाच्या दृष्टीने आयोजित असल्यामुळे यावेळी असे करणे योग्य नाही, अशी प्रशासनाची भूमिका होती. एरवी असे प्रकार अमेरिकेत आणि तेही ‘मिस अमेरिके’च्या संबंधात होणे, हे स्वाभाविकच मानले जाते. प्रशासनाचेही असेच मत होते. ‘पण ही ती वेळ नव्हती.’
नीनाला कार्यक्रम सुरू असतानाच पॅट्रिकने फूल भेट दिले आणि नृत्यासाठी निमंत्रित (प्रॉमपोजल) केले. नीनाने फूल स्वीकारीत ही बाब हसण्यावारी नेली. पण प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेत पॅट्रिकला तीन दिवसांसाठीची निलंबनाची शिक्षा केली.

बिच्चारा पॅट्रिक!

पॅट्रिकच्या समर्थनार्थ अमेरिकन जनता, सोशल व प्रिंट मीडिया निरनिराळी टीव्ही चॅनेल्स उभी झाली. या प्रश्‍नाला अमेरिकेतच नव्हे, तर जगभर प्रसिद्धी मिळाली. सगळे जण पॅट्रिकच्या बाजूने उभे झाले.
स्वत: नीनाला जेव्हा हे वृत्त कळले, तेव्हा तिनेही प्रशासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे सुचविले. देशभरातील विद्यार्थ्यांत मिसळणे, त्यांच्याशी संवाद साधणे, हा ‘मिस अमेरिका’ या नात्याने माझ्यासाठी महत्त्वाचा आणि सन्मानाचा विषय आहे, असे ती म्हणाली. शिक्षणाच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने साकार करावीत, मेधावी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आकांक्षा यांचा परिचय त्यांच्या भेटीतून मला होत असतो आणि यातून मलाही प्रेरणा मिळत असते. पण माझे कार्यक्रम अगोदरच ठरलेले असल्यामुळे पॅट्रिकच्या निमंत्रणाचा स्वीकार मला करता येत नाही.
पॅट्रिकचे म्हणणे असे आहे की, मी स्वत:ला आवरू शकलो नाही. त्याच्या दुसर्‍या साथीदाराने या संपूर्ण प्रसंगाचे चित्रण केले आहे. नीनाने सुहास्यवदनाने माझी फुलाची भेट स्वीकारली. ‘बघू या पुढे कधी’, असे भाव मला तिच्या चेहर्‍यावर दिसले.
अमेरिकेतील जनमानस, एकजिनसी अमेरिकन समाज निर्माण होण्याच्या दिशेने केले जाणारे प्रयत्न, शालेय कार्यक्रमांचे स्वरूप, सैल स्त्री-पुरुष संबंध, शालेय प्रशासनाची विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची आग्रही भूमिका, देशोदेशीच्या प्रथा, परंपरा, नैतिकतेच्या कल्पना यांचा परिचय होण्याचे आणि आपल्यालाही अंतर्मुख करण्याचे दृष्टीने हा ‘कथाभाग’ उपयोगी पडेल, असे वाटते.
- वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०


No comments:

Post a Comment