शाळा बाँबने उडवून देण्याची धमकी
वसंत गणेश काणे
हल्ली वास्तव्य – २२१५
लाइव्ह ओक लेन
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया, अमेरिका
दिनांक १४ मी ला अमेरिकेत
मुलाकडे पेनसिल्व्हॅनिया प्रांतातील यॉर्क या गावी रहायला आलो आणि
१५ तारखेला शाळेतून फोनवर निरोप आला की, ‘शाळा बाँबने उडवून देण्याची धमकी
आली असून संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली आहे. मुलांना वर्गातून बाहेर आणण्यात
आले असून ती मोकळ्या मैदानात बसून आहेत. पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही. श्वान
पथक आणि बाँब चा शोध घेणारे पथक तसेच अग्निशामक दल शाळेत येऊन दाखल
झाले आहे. हा निरोप आला तेव्हा आम्ही जेवत होतो. निरोप आला आणि मी एकदम हादरलोच. सून
नीलम म्हणाली की, ‘जेवणं झाली म्हणजे आपण शाळेभोवती एक चक्कर मारून येऊ’. ‘शाळा बाँबने उडवून देण्याची धमकी
आली आहे आणि तुला जेवण सुचतच कसं?’, असं मी म्हणताच ती म्हणाली की, या सत्रातली ही
चौथी धमकी आहे. प्रत्येकदा शाळेने धमकी देणाऱ्याला पोलिसांची आणि बाँब शोधक पथकाची मदत घेऊन
हुडकून काढले आहे. याही वेळी तसेच होईल’. ‘धमकी देणारे कोण होते? शाळेशी कोणाचे
वैर असणार आहे?’ ‘तिन्ही वेळी धमकी देणारी
शाळेतलीच मुले होती’, मी आश्चर्यचकित झालो. या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले
होते आणि त्यांना बाल गुन्हेगारांच्या
शाळेत पाठविण्यात आले होते. मुलं असं का करीत आहेत? शाळेवरचा राग काढण्याचा हा
प्रकार आहे, हे कळले आणि काय बोलावे तेच कळेना.
मुले मैदानात शांतपणे बसली होती
आम्ही गाडी काढली आणि
शाळेच्या दिशेने निघालो. आपल्याला शाळेत जाता येणार नाही. बाहेर मैदानात बसलेली
मुले पाहता येतील. गेल्या खेपेला पालकांनी गोंधळ घातला होता तेव्हापासून असा
प्रतिबंध घालण्यात आला आहे. तेवढ्यात आम्ही नातवाच्या फोनचा मागोवा घेतला. ओम्कार
मैदानात येऊन बसला आहे, असे त्याच्या फोनची स्थिती सांगत होती. शाळेपाशी रस्त्यावर
पोचलो तर काही पालक बाहेर थांबले होते. त्यांनी आत जाऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त
ठेवलेला दिसत होता. आम्ही तसेच एक चक्क मारून घरी परतलो पण घरात न जाता पुन्हा
आमचा मोर्चा शाळेकडे वळवला. तेवढ्यात फोनवर निरोप आला की, धमकी पोकळ होती. पोलीस
आणि बाँब शोधक पथकाने शाळेची इमारत पिंजून काढली आहे आणि बाँब न आढळल्यामुळे मुले
पुन्हा वर्गात परतली आहेत.
जिल्हा परिषदेची एक उत्तम
शाळा
यार्क शहराचे सहा का सात शैक्षणिक
जिल्हे आहेत. त्यापैकी एका जिल्ह्याच्या अधिपत्याखाली ही शाळा येते. ही जिल्हा
परिषदेची शाळा असून या शाळेत दोन हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक चांगली
शाळा म्हणून तिचा देशभर गौरव करण्यात आला असून पालक आणि शाळा व्यवस्थापनाचे संबंध
अतिशय सलोख्याचे आणि सौहाद्याचे आहेत. दरवर्षी दोनचार बिघडलेले विद्यार्थी शाळेत
असतातच. खूपच व्रात्यपणा केला तरच शाळा अशा विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकते.
एरवी त्यांना सुधरवण्याचा शाळेचा कसोशीचा प्रयत्न असतो.
काही विशेष असते तर कळलेच
असते
एवढ्यात ओम्कार शाळेतून परत
आला. हा प्रकार दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने केला होता. तू
आम्हाला फोन करून कळवले का नाहीस, असे विचारले असता तो म्हणाला की ,काही विशेष
झाले असते तर तुम्हाला कळले असतेच की. विशेष आणखी काय असणार याचा विचार करीत आम्ही
कोचावर बसकण मारली.
No comments:
Post a Comment